Diwali_4 ‘द गिल्टी’ आणि ‘माय मास्टरपीस’ एक थ्रिलर, दुसरा तिरकस!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘द गिल्टी’ आणि ‘माय मास्टरपीस’ एक थ्रिलर, दुसरा तिरकस!

एक दिवस एक तरुण मुलगा, ॲलेक्स रेन्झोकडे येतो. तुमच्यासारख्या महान चित्रकाराचा शिष्य व्हायचंय म्हणून हट्ट करून बसतो. रेन्झो त्याला घरात घेतो. पहिला धडा म्हणून एका खूप सामान असलेल्या खोलीमध्ये दोन तास बसून निरीक्षण करायला लावतो. मग ते सगळं सामान बाहेर काढायला सांगतो आणि पुन्हा एकदा त्याच खोलीत ते होतं तसंच लावून देण्याचं फर्मान सोडतो. बिचारा ॲलेक्स हे सगळं करतो. नव्याने लावलेली खोली पाहून रेन्झो त्याला म्हणतो, ‘तू शिस्तीचा आहेस. आज्ञाधारक आहेस. आणि प्रामाणिक आहेस. चांगला आर्टिस्ट व्हायचं तर या तिन्ही गोष्टी असता कामा नयेत. तेव्हा तू दुसरा एखादा व्यवसाय शोधावास हे बरं!’ वर, ‘सर्व कलावंत हे महत्त्वाकांक्षी आणि स्वार्थी असतात हे लक्षात ठेव. आणि आयुष्यात तुला दुसरी कोणतीही गोष्ट करायला जमणार असेल तर तू चांगला चित्रकार होण्याच्या लायकीचा नाहीस,’ अशी सूचनाही करतो.

स्वीडन आणि अर्जेंटिना या दोन देशांमधले दोन सिनेमे. ‘द गिल्टी’ आणि ‘माय मास्टरपीस’. अगदी टोकाची ट्रीटमेंट असणाऱ्या, पण सारख्याच ताकदीच्या या सिनेमांविषयी. एका खोलीत घडणारा थ्रिलर तुम्ही बघितलाय? नाही, ‘ट्रॅप्ड’सारखा एका घरात अडकून पडल्यामुळे पर्याय नसलेला नाही किंवा ॲक्शनपॅक्ड नाट्य असलेलाही नाही. इथली एक खोली आहे ती पोलिसांच्या हेल्पलाईनची आणि गोष्ट घडते ती केवळ फोनवरच्या संभाषणामधून.

स्विडिश दिग्दर्शक गुस्ताव मोलर यांचा पहिला वहिला सिनेमा ‘द गिल्टी’ म्हणजे थ्रिलर कसा असावा याचा अक्षरश: वस्तुपाठ आहे. अत्यंत घट्ट विणलेली पटकथा (मोलर आणि एमिड न्यागार आल्बरस्टेन यांनी लिहिलेली), क्लोजअप्सचा केलेला नेमका वापर आणि थोर अभिनय यामुळे ७५ मिनिटांचा हा सिनेमा प्रत्येक क्षणी आपली  उत्कंठा वाढवत राहतो. पुढे काय होणार, या विचाराने अस्वस्थ करत राहतो.

आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तुम्हाला बांधून ठेवतो. खूप पूर्वी, जावेद अख्तर एकदा मला म्हणाले होते, ‘‘सिनेमा पाहताना दिग्दर्शक जे दाखवत असतो ते चित्र आपण पाहतो आणि पुस्तक वाचताना आपण लेखकाच्या  शब्दांच्या माध्यमातून स्वत:चं चित्र तयार करत असतो.’’ अगदीच बरोबर आहे हे. पुस्तक वाचताना त्यातल्या व्यक्तिरेखांना रंगरूप आपण देत असतो. त्यातल्या घटना नजरेसमोर येतात त्या लेखकाच्या मदतीने, पण आपण रेखाटलेल्या असतात.

सिनेमापेक्षा पुस्तकामध्ये आपला, आपल्या विचारशक्तीचा अधिक सहभाग असतो आणि मग एखादा ‘द गिल्टी’सारखा सिनेमा पाहायला मिळतो. इथे दिग्दर्शक आपल्याला जे घडतंय त्याचं चित्र दाखवतच नाही. आणि तरीही लेखक- दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला संपूर्ण थरार आपण अनुभवतो. किंबहुना, त्या अनुभवाचे आपण एक भागीदार बनतो.

ॲसगर होम (जेकब सेडरग्रेन) एक पोलीस अधिकारी आहे. एरवी प्रत्यक्ष ॲक्शनमध्ये पुढाकार घेणाऱ्या या अधिकाऱ्याची बदली काही तरी कारणामुळे (जे कारण आपल्याला शेवटी कळतं) हेल्पलाईन विभागात झालीये. आता त्याचं काम आहे, आलेले फोन घेणं आणि ते योग्य त्या पोलीस स्टेशनपर्यंत मदतीसाठी पोचवणं. काही काही फोन्स दारू पिऊन केलेले आहेत, काही छोट्या-मोठ्या अपघाताचे आहेत. ‘मला एका चोराने लुबाडलंय’ इथपासून ते ‘माझ्या गुडघ्याला दुखापत झालीये’ इथपर्यंत.

अशाच एका रात्री असेच काही फोन्स घेत असताना ॲसगरला दबक्या आवाजातला एक फोन येतो. फोनवर बोलणाऱ्या बाईचं नाव आहे इबेन. (या व्यक्तिरेखेला आवाज दिलाय जेसिका डिनेज या अभिनेत्रीने.) जणू काही आपल्या लहान मुलाशी बोलत असावी तशी बोलतेय. समोरच्या व्यक्तीला आपण पोलिसांना फोन केलाय हे कळू नये म्हणून तिची धडपड चाललीये, हे ॲसगरसारख्या हुशार अधिकाऱ्याला ताबडतोब कळतं. त्या बाईच्या तुटक-तुटक संवादांमधून तिला तिच्या नवऱ्याने किडनॅप केलंय, हे समजतं. आणि मग एक नाट्य आपल्यासमोर उगडत जातं. कधी त्या बाईच्या फोनवरच्या संभाषणामधून, कधी तिच्या मुलीला केलेल्या फोन कॉलवरून, तर कधी तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवरून. आपल्यासमोर असतो केवळ फोनवरून बोलणारा ॲसगर. आपल्याला दिसते ती केवळ त्याची धडपड- एका आईला मदत करण्यासाठीची. एका लहान मुलीवर अपप्रसंग येऊ नये यासाठीची. आणि स्वत:च्या अपराधीपणाच्या भावनेवर मात करण्यासाठीची.

एका अत्यंत टाईट क्लोजअपमध्ये ॲसगरच्या डोळ्यापाशी येऊन थबकलेला एक अश्रू आपल्याला खूप काही सांगून जातो. एका आईची, बापाची आणि मुलीची गोष्ट सांगताना ॲसगरचं आयुष्यही आपल्यासमोर उलगडत जातं. पुन्हा, केवळ फोनवरच्या संभाषणांमधून, इतर कोणत्याही दृश्यांच्या मदतीशिवाय. इथे कॅमेरा एखाद्या वेळेसच हेल्पलाईनच्या दोन खोल्यांबाहेर जातो आणि तरीही प्रत्येक घटना आपल्या डोळ्यांसमोर घडल्याचा प्रत्यय दिग्दर्शक आपल्याला देतो. एक जबरदस्त अनुभव याखेरीज ‘द गिल्टी’साठी दुसरे शब्द नाहीत. या सिनेमाचं ट्रेलर तुम्ही इथे पाहू शकता. यू-ट्युबवरचं हे ट्रेलर पाहतानाही तुम्हाला त्यातल्या थराराचा अनुभव येईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही.

‘द गिल्टी’च्या अगदी विरुद्ध जातकुळीचा सिनेमा होता अर्जेंटिनाचा ‘माय मास्टरपीस’. दिग्दर्शक गॅस्तन द्युपरातने आपल्या या सिनेमामधून दोन मित्रांची कथा सांगितलीये. चित्रकार, चित्रकला, पेंटिंग्ज, प्रदर्शनं, ती पाहायला येणारे दर्दी- अशा अनेक गोष्टींवर त्याने भाष्य केलंय. अत्यंत नर्मविनोदी आणि उपरोधात्मक. कथेचे नायक आहेत रेन्झो नर्व्ही (लुई ब्रॅन्डोनी) आणि आरतुरो सिल्वा (ग्युलेर्मो फ्रान्सेला).

सिनेमा सुरू होतो तेव्हा एका देखण्या गाडीतून जाणारा आरतुरो आपल्याला दिसतो. पार्श्वभूमीला त्याचे शब्द आपल्या कानांवर पडतात. ‘मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, मी केलेल्या एका खुनाची.’ आणि मग ती गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते. रेन्झो एक चित्रकार आहे. आत्ममग्न, स्वत:ला हवं ते आणि हवं तेव्हाच पेंटिंग करणारा. जगाची फिकीर नाही. आपल्या चित्रांची विक्री होते की नाही याची पर्वा नाही. आरतुरो त्याचा खूप जुना मित्र आणि एका मोठ्या आर्ट गॅलरीचा मालकही. रेन्झोच्या चित्रांची सगळी प्रदर्शनं अर्थातच आलतुरोच्या गॅलरीत होतात. व्यावसायिक जगात रेन्झोचं प्रतिनिधित्व करणं, हाही आरतुरोच्या कामाचा एक भाग आहे. पण रेन्झोच्या विक्षिप्तपणामुळे आता त्याच्या चित्रांची मागणी कमी होऊ लागलीये. त्यातून, समीक्षकांना मुलाखत देणं, प्रदर्शनाच्या ठिकाणी हजेरी लावणं असल्या गोष्टींना रेन्झोच्या लेखी फारसं महत्त्व नसल्यामुळे त्यात भरच पडतेय. नव्याने येणाऱ्या चित्रकारांच्या तुलनेत वय होऊ लागलेला रेन्झो मागे पडू लागलाय. त्यातूनच या दोन मित्रांमध्ये खटके उडताहेत. टोकाची भांडणं होताहेत. एका प्रसंगात, ‘तू तुझ्या स्वत:च्या प्रदर्शनालाही येत नाहीस’, असं आरतुरो रेन्झोला फोनवर रागाने सांगतो. ते ऐकून रेन्झो तरातरा आर्ट गॅलरीत येतो. त्याच वेळी तिथे त्याची चित्रं विकत घेण्यात रस असलेली एक बाई आलेली असते. रागावलेला रेन्झो आरतुरोला म्हणतो, ‘‘मी काही प्रयत्न करत नाही असं म्हणतोस ना, ठीक आहे...’’ एवढं बोलून तो खिशातलं पिस्तुल काढतो आणि आपल्या दोन चित्रांच्या मधोमध गोळीने छेद करून निघून जातो! रेन्झोचा हा विक्षिप्तपणा आपण पदोपदी अनुभवत असतो.

एक दिवस ॲलेक्स नावाचा एक तरुण मुलगा रेन्झोकडे येतो. तुमच्यासारख्या महान चित्रकाराचा शिष्य व्हायचंय, म्हणून हट्ट धरून बसतो. रेन्झो त्याला घरात घेतो. पहिला धडा म्हणून एका खूप सामान असलेल्या खोलीमध्ये दोन तास बसून निरीक्षण करायला लावतो. मग ते सगळं सामान बाहेर काढायला सांगतो आणि पुन्हा एकदा त्याच खोलीत ते होतं तसंच लावून देण्याचं फर्मान सोडतो. बिचारा ॲलेक्स हे सगळं करतो. नव्याने लावलेली खोली पाहून रेन्झो त्याला म्हणतो, ‘‘तू शिस्तीचा आहेस, आज्ञाधारक आहेस. आणि प्रामाणिक आहेस. चांगला आर्टिस्ट व्हायचं तर या तिन्ही गोष्टी असता कामा नयेत. तेव्हा तू दुसरा एखादा व्यवसाय शोधावास, हे बरं!’’ वर, ‘‘सर्व कलावंत हे महत्त्वाकांक्षी आणि स्वार्थी असतात, हे लक्षात ठेव. आयुष्यात तुला दुसरी कोणतीही गोष्ट करायला जमणार असेल तर तू चांगला चित्रकार होण्याच्या लायकीचा नाहीस,’’ अशी सूचनाही करतो.

एक दिवस एका रेस्टॉरन्टमध्ये जाऊन भरपूर दारू पितो, यथेच्छ जेवतो आणि मग वेटरला म्हणतो, ‘‘फारच सुरेख चव होती या जेवणाची. पण माझ्याकडे पैसे नाहीत. आजवर मी समाजासाठी जे काही केलंय त्याची ही परतफेड आहे, असं तुम्ही समजावं.’’ अशा आपल्या मित्राला थोडे पैसे मिळावेत म्हणून आरतुरो त्याच्यासाठी एक कमर्शियल काम आणतो आणि अर्थातच रेन्झो त्याचीही वाट लावतो. पण कलावंत आणि व्यवसाय यांच्यात असलेली दरी, त्यासाठी कलावंताला करावी लागणारी तडजोड यासारखे अनेक पदर असणारी ही गोष्ट मग पुढे वेगवेगळी वळणं घेते. लेखक आणि दिग्दर्शकाला एकूणच कलाविश्वाविषयी, चित्रांना मिळणाऱ्या किमतीविषयी, चित्रकार आणि चित्र विक्रेते यांच्यातल्या नात्याविषयी आपल्याला सांगायचंय याची जाणीव देत जाते.

पटकथालेखक आंद्रे द्युपरात (दिग्दर्शक गॅस्तन द्युपरात यांचा भाऊ) स्वत: या जगात वावरत असतात. अर्जेंटिनाच्या नॅशनल म्युझियम ऑफ फाईन आटर्‌सचे ते संचालक आहेत. त्यामुळे त्यांना हे जग आतून-बाहेरून माहीत आहे. पण या विश्वाशी संबंध नसलेल्या प्रेक्षकांना कळणार नाही असं काहीही सिनेमात येऊ नये, याची काळजी त्यांनी घेतलीये. गॅस्तन द्युपरात यांचा याआधीचा ‘द डिस्टिंग्विश्ड सिटिझन’ या २०१६मध्ये आलेल्या सिनेमाच्या केंद्रस्थानी साहित्याचं जग होतं. हा सिनेमा अर्जेंटिनामध्ये हिट झाला होता. त्यामुळे आपल्याला पुढचा सिनेमा झटपट करता आला, असं द्युपरात यांचं म्हणणं आहे. आपल्या भावाला असलेल्या माहितीचा त्यांनी या सिनेमासाठी उपयोग करून घ्यायचं ठरवलं. ‘‘एकूणच हे विश्व आम्हाला आमच्या जवळचं वाटतं,’’

एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलंय. ‘‘चित्रकला, व्हिज्युअल आर्ट्स ही सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली कला नाही. आपण चुकीचं तर नाही ना बोलणार, या भीतीने फार कमी माणसं त्यावर भाष्य करायचं धाडस दाखवतात. मात्र, या क्षेत्रातला विरोधाभास दाखवताना त्याची चेष्टा करावी असं ठरवून आम्ही कथा लिहिलेली नाही, ती आपोआप तशी झाली. बहुधा, तिरकसपणा, उपहास आणि उपरोध आमच्यामध्ये मुळातच असावा!’’ हसता-हसता विचार करायला लावणाऱ्या ‘माय मास्टरपीस’ या सिनेमाचा ट्रेलर तुम्हाला इथे बघायला मिळेल. एक अवलिया आणि त्याचा जगाचं भान असलेला मित्र यांच्या नात्यातली गंमत थोडीफार तरी निश्चितच अनुभवता येईल.  

(२० ते ३० नोव्हेंबर या काळात दर वर्षी पणजी, गोवा येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतो. त्या महोत्सवाला मीना कर्णिक गेली अनेक वर्षे उपस्थित राहतात. या वर्षीच्या महोत्सवातील त्यांना विशेष भावलेल्या चित्रपटांविषयी त्या पाच लेख साधनात लिहिणार आहेत, त्यातील हा चौथा लेख.)

Tags: My Masterpiece चित्रपट मुग्धा कर्णिक cinema The Masterpiece The Guilty mugdha Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात