डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एलफिन्स्टन, एडवर्ड थॉमस्‌, हॉवेल, स्मिथ वगैरे इतिहासकार हे मान्य करतात की, ‘सुलतान मुहम्मद-बिन तुघलक याच्यामध्ये एक प्रकारचा विक्षिप्तपणा/ वेडसरपणा होता.’ पण दुसऱ्या बाजूच्या म्हणजे गार्डिनर, ब्राऊन, ईश्वरी प्रसाद इत्यादी इतिहासकारांच्या मते, ‘सुलतान तुघलकामध्ये वेडेपणाची झाक अशी काही नव्हती, उलट त्याच्यात अलौकिक शक्ती होती.’ एवढेच कशाला, तुघलकाचे समकालीन इतिहासकार बरानी आणि बटुटा यांनीसुद्धा सुलतानाचे चारित्र्य व त्याचे पराक्रम याबाबत पूर्णत: भिन्न निष्कर्ष मांडले आहेत. त्यामुळे पूर्वग्रहरहित मनाने आणि सर्वमान्य होईल असा निष्कर्ष काढणे खूपच अवघड आहे.

मध्ययुगीन कालखंडात दिल्लीवर अनेक सुलतानांनी सत्ता गाजवली. त्यात अल्लाउद्दीन खिलजी हा सर्वांत महान सुलतान मानला जातो, त्याच्यानंतर नाव घ्यावे लागते मुहम्मद बिन तुघलक, याने १३२५ ते १३५१ अशी २६ वर्षे सत्ता गाजवली. हा तुघलक लक्षात राहिला आहे तो त्याने केलेल्या बेधडक मोहिमांसाठी आणि अफलातून कल्पना व विचारांसाठी. विशेषत: शेती आणि प्रशासन या दोन क्षेत्रांतील हस्तक्षेपासाठी. एवढेच नाही तर तो त्याच्या कालखंडातील अन्य राजेमहाराजांपेक्षा जास्त ठळकपणे लक्षात राहतो. त्याची अनेक कारणे आहेत. तो उच्चशिक्षित होता आणि अरबी व पर्शियन भाषांवर त्याचे प्रभुत्व होते. धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, गणित, वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी विषयांतील त्याचे वाचन चांगले होते. तो उत्तम सुलेखनकार (कॅलिग्राफर) होता. लष्करी दृष्टिकोनातून पाहिले तर तो उत्कृष्ट कमांडर होता, मुबारक शहा खिलजी या सुलतानाच्या काळात एका साध्या सैनिकापासून घोडदळाच्या पलटणीचा प्रमुख होण्यापर्यंतची मजल त्याने अल्पावधीतच मारली होती. आणि त्याचे पिताजी सुलतान जियासुद्दीन तुघलक यांच्या काळात तर, तेलंगणा व वरंगल या प्रांतावरील लष्करी मोहिमेचे नेतृत्व त्याने केले होते. तो  अतिशय महत्त्वाकांक्षी होता आणि नैतिकता व चारित्र्य यासाठी त्याची ख्याती होती. त्याची स्वत:च्या धर्मावर गाढ श्रद्धा होती आणि धर्मपालन करण्यात तो कसूर करीत नव्हता, नियमित प्रार्थना करणे चुकवत नव्हता. सार्वजनिक ठिकाणी तो कधीही मद्य घेत नसे. गरीब आणि साधूसंतांच्या बाबतीत अतिशय नम्र व दयाळू पद्धतीने वागत असे, मात्र काही लोकांबाबत त्याचे वर्तन निर्दयी व क्रूर पद्धतीने होत असे. उच्चशिक्षित व ज्ञानी असला तरी त्याच्यात काही गंभीर दोष होते. घाई-गडबड-धांदल आणि उतावळेपणा या दोषांच्यामुळे, त्याचे अनेक प्रयोग अयशस्वी ठरले आणि चमको आदर्शवादी म्हणून त्याची संभावना झाली. त्याच्या पित्याचे अचानक निधन झाल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांनी तो सिंहासनावर आरूढ झाला. त्याचा पिता आणि लहान भाऊ हे दोघेही हत्तींच्या संचलनाला सलामी देण्यासाठी गेले होते, तेव्हा पॅव्हेलियन कोसळले आणि त्यातच त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात अशी कुजबूज झाली की, तो अपघात नसून कट होता आणि सत्तेवर येण्यासाठी मुहम्मद उतावीळ झालेला असल्याने त्यानेच तो अपघात घडवून आणला असावा. खरे-खोटे देव जाणो.

 

जियासुद्दीनच्या निधनानंतर लगेचच मुहम्मद-बिनतुघलकाने स्वत:ला ‘सुलतान’ म्हणून घोषित केले, नंतरचे ४० दिवस तुघलकाबादलाच राहिल्यानंतर तो दिल्लीला आला आणि तिथे अनेक ज्ञानी व शहाण्या लोकांना भेटला. त्याचा राज्याभिषेक थोड्या उशीराने बलबन येथील लाल महालात झाला. लवकरच तो त्याच्या शहाणपणासाठी व सद्‌वर्तनासाठी ओळखला जाऊ लागला. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढीस लागल्या आणि आपल्या पूर्वसुरींपेक्षा आपण खूपच जास्त आपल्या देशबांधवांसाठी करावे अशी आकांक्षा त्याच्याही मनात होती. त्यामुळे कारकिर्दीच्या अगदी प्रारंभापासूनच त्याने, देशाच्या संरक्षणासाठी व अंतर्गत सुधारणांसाठी मोठी पावले बेधडकपणे टाकायला सुरुवात केली.

सत्तेवर आल्याक्षणी त्याला असे वाटले की, देशाचे एकूण उत्पन्न व होणारा एकूण खर्च यांची तपासणी केली पाहिजे. म्हणून त्याने लगेचच अध्यादेश काढला की, सर्व प्रांतांच्या जमा-खर्चाचे हिशोब रजिस्टर सादर केले जावेत. सर्व प्रांतांच्या प्रमुखांना अशा सूचना दिल्या गेल्या की, जमा-खर्च दाखवणारी कागदपत्रे आणि त्यासंदर्भातील अन्य साधने ताबडतोब दरबारात हजर करावीत. ते सर्व ताळेबंद तपासून घेण्यासाठी त्याने एक स्वतंत्र कार्यालय उभे केले आणि तिथे खूप मोठ्या संख्येने कारकून व अधिकारी नियुक्त केले. असे करण्यामागे त्याचे दोन उद्देश होते, एक म्हणजे राज्यातील सर्व लहान-मोठी खेडी नियंत्रणाखाली आणण्याचे काम सोपे व्हावे आणि दुसरे- जमीन-महसुल मिळवण्याच्या कामात सुसूत्रता यावी. त्याची ही चाल निश्चितच वाखाणण्यासारखी होती.

तुघलकाच्या राज्यात सर्वाधिक सधन प्रदेश म्हणून ‘दोआब’ ओळखला जात असे. गंगा व यमुना या दोन नद्यांच्या खोऱ्यातील हा प्रदेश अत्यंत सुपीक होता आणि तिथून निघणारे उत्पन्न राज्यातील अन्य कोणत्याही प्रदेशापेक्षा जास्त होते. त्यामुळे दोआब प्रदेशातील उत्पन्न कर तुघलकाने अचानक वाढवले. परंतु तो निर्णय चुकीच्या वेळी घेतला गेल्याने आणि करवसुली मोहीम सदोष अहवालाच्या आधारे राबवल्याने, सुलतानाचे ते पाऊल वादग्रस्त ठरले. त्या प्रदेशातील शेतकरी आपल्या उत्पन्नातील तब्बल अर्धा वाटा कर म्हणून राजाला देत असत, अल्लाउद्दीन खिलजीच्या राजवटीपासून ते प्रमाण कायम होते. मुहम्मद-बिन-तुघलकाने त्यात आणखी दहा टक्के वाढ केली. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या त्या प्रदेशातील शेतकऱ्यांच्या मनात असंतोष फैलावत गेला. आणि ही करवाढ केली गेली तेव्हा त्या भागात भयानक दुष्काळ पडला होता. त्यामुळे, आपल्या जखमेवर मीठ चोळले जातेय, असे तेथील जनतेला वाटू लागले. त्यातच भर म्हणजे, करवसुलीसाठी जाणारे अधिकारी दुष्काळी परिस्थिती समजून घेण्याऐवजी ‘आदेशाचे पालन केले पाहिजे’ असे सांगत होते. करसंकलन करताना वेळप्रसंगी बळाचा वापर करायलाही ते मागे-पुढे पाहत नव्हते. जे शेतकरी इतका जास्त कर देण्यास इच्छुक नव्हते किंवा देण्यास सक्षम नव्हते ते गावातून स्थलांतर करीत होते, ‘तशा शेतकऱ्यांना शोधा आणि शिक्षा करा’ असे फर्मान सुलतान तुघलकाने काढले. त्यामुळे, अनेक शेतकरी जंगलामध्ये पळून गेले आणि तिथल्या दरोडेखोरांशी त्यांनी हातमिळवणी केली. नंतर मुहम्मद-बिन-तुघलकाला खरी समस्या कळली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर त्याने परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी बरेच प्रयत्न केले. ‘विस्थापित झालेल्या, पळून जाऊन रानावनात वास्तव्य करणाऱ्या लोकांनी आपापल्या गावात परत यावे, त्यांच्या शेतीसाठी सर्व सुविधा पुरवल्या जातील आणि त्यांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सुलभ हप्त्याने कर्ज दिले जाईल’ असे सुलतानाने जाहीर केले. पण फार जास्त लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही, त्याच्या हेतूंविषयी लोकांना शंका वाटत राहिली. त्यामुळे त्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. वस्तुत: दोआब प्रदेशातून जास्तीचा महसूल मिळवण्यामागचा त्याचा उद्देश काही तसा वाईट नव्हता. जास्तीच्या पैशांतून राज्याचे लष्करी बळ वाढवावे असा त्याचा विचार होता, पण ते उद्दिष्ट साध्य तर झाले नाहीच, उलट दोआब प्रदेशातील जनतेचा असा समज झाला की, हा सुलतान विक्षिप्त आहे.

कृषिक्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी मुहम्मद- बिन-तुघलकाने वेगवेगळ्या प्रकारची मोजणी केली, त्यासाठी कृषिखात्याअंतर्गत दिवाण-इ-कोही या नावाने एक विभाग सुरू केला. त्या विभागाचे मुख्य काम होते, लावगडीखाली नसलेल्या जमिनीचा शोध घेणे आणि ती जमीन सर्व सुविधांनी युक्त अशी बनवणे. या प्रकल्पाची सुरुवातच मोठ्या धडाकेबाज पद्धतीने झाली, तब्बल ६० चौरस मैल इतक्या मोठ्या जमिनीवर अश्वपालनाची तयारी सुरू केली. अन्यत्र, पडिक जमिनीत खूप मोठ्या प्रमाणात शेतमजूर कामाला लावले, त्यांना आवश्यक अवजारे आणि बियाणे दिली गेली. विविध पिके आलटून-पालटून घेण्यात  यावीत असे त्यांना सांगण्यात आले. कार्यवाहीसाठी खूप मोठ्या प्रमाणात अधिकारी नियुक्त केले गेले आणि प्रकल्पाच्या संरक्षणासाठीही एक स्वतंत्र दल तैनात केले. राज्याच्या तिजोरीतून सत्तर लाख रुपये त्या प्रकल्पासाठी खर्च झाले. इतके सर्व करूनही, ती योजना अतिशय वाईट पद्धतीने अयशस्वी ठरली. उत्पादनाचे/निर्मितीचे अपेक्षित उद्दिष्ट गाठले गेले तर नाहीच, उलट त्यातून निघालेल्या उत्पन्नापेक्षा त्यावर झालेला खर्च जास्त होता. त्याला अनेक कारणे होती. एक- लागवडीसाठी निवडलेली जमीन योग्य नव्हती. दुसरे- अधिकारी वर्ग अननुभवी होता, त्यामुळे वाईट नियोजन व सदोष अंमलबजावणी झाली. तिसरे- नियुक्त केलेले बरेच अधिकारी भ्रष्ट व अकार्यक्षम होते, त्यांनी पैशांचा व उत्पादनाचा बराच अपहार केला. आणि चौथे व सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, त्या नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी आवश्यक तितका वेळ व लक्ष देणे सुलतानाला जमले नाही. वेळ मिळाला असता तर सुलतानाने निश्चित प्रयत्न केले असते. तो प्रकल्प फसला असल्याचे लवकरच लक्षात आले, पण त्याचे अनिष्ट परिणाम दीर्घकाळ होत राहिले. त्यामुळे लोकांच्या मनात सुलतानाबाबत अढी कायम राहिली.

मुहम्मद-बिन-तुघलकाचे सर्वाधिक वादग्रस्त पाऊल म्हणजे राज्याच्या राजधानीचे स्थलांतर. त्याने आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरी (दौलताबाद) येथे हलवली, त्याला अनेक घटक कारणीभूत होते. एक- तुर्की लोक भारतात आले तेव्हा त्यांचा सुरुवातीचा तळ देवगिरीला होता, नंतरच त्यांचा विस्तार झाला. दक्षिणेकडील राज्ये काबीज करण्यासाठी लष्कराची हालचाल दिल्लीवरून करणे प्रत्येक वेळी सोयीचे ठरत नव्हते. मुहम्मद-बिन-तुघलक राजपुत्र होता, तेव्हा त्याने आपल्या पित्याचे राज्य वाढवण्यासाठी व राखण्यासाठी दक्षिणेकडील प्रदेशांत अनेक वर्षे वास्तव्य केले होते. दुसरे कारण- देवगिरी हे ठिकाण तुघलक साम्राज्याच्या मध्यवर्ती असल्याने, उत्तर व दक्षिण या दोनही बाजूंचे प्रशासन चालवणे सोपे जाणार होते. असे करण्यामागचा आणखी एक उद्देश म्हणजे, दक्षिणेकडील जिंकलेली नवी राज्ये ताब्यात ठेवता यावीत. शिवाय, दक्षिणेकडील लोकांना आपला राजा कोणी परका आहे असे वाटू नये. तिसरे कारण- वायव्य दिशेने येणाऱ्या मंगोल आक्रमकांचा धोका होता आणि तिथून दिल्ली जवळ होती. म्हणजे देवगिरी पूर्णत: सुरक्षित आणि मंगोल आक्रमकांपासून धोकामुक्त राहू शकणार होती. आणि चौथे कारण- तुघलकाला असे वाटत होते की, दक्षिणेकडे असलेल्या अफाट संपत्तीचा व साधनांचा उपयोग फार चांगल्याप्रकारे करता येईल, जर देवगिरी येथे राजधानी हलवली तर! पण इब्न बटुटा नावाच्या मोरोक्कोहून भारतात आलेल्या प्रवाशाने यासंदर्भात दिलेले कारण पूर्णत: वेगळे आहे. तो असे सांगतो की, सुलतान मुहम्मद-बिन-तुघलक दिल्ली शहराला कंटाळला होता. त्याचे कारण त्याला दिल्ली शहरातील नागरिकांची अनेक निनावी पत्रं रोज येत असत, त्या पत्रांमध्ये जहरी टीका आणि शिव्याशाप यांचा भडिमार केलेला असे. वस्तुस्थिती काहीही असो, राजधानीचे स्थलांतर करण्याचा आदेश मुहम्मद-बिन-तुघलकाने इ.स.१३२७मध्ये काढला हे खरे! प्रशासनातला सर्व अधिकारी वर्ग, न्यायव्यस्थेशी संबंधित कर्मचारी, सुफी संत व विविध क्षेत्रांतील नामवंत लोक आणि दिल्लीच्या सर्व जनतेला असे आदेश दिले गेले की, आपले बस्तान दे

वगिरीला हलवा. दिल्लीतच ज्यांचे बालपण गेले, पूर्वज राहिले ते लोक आपली जन्मभूमी सोडण्यास इच्छुक नव्हते, पण त्यांना सुलतानाचे आदेश पाळणे भागच होते. दिल्लीमध्ये राहण्यासाठी कोणालाही परवानगी नाही, असे फर्मान काढण्यात आले. बटुटाने लिहून ठेवले आहे, ‘आख्खी दिल्ली रिकामी केली गेली, कोणी शिल्लक राहिलेय का याचा शोध घेण्यास सांगण्यात आले. तेव्हा एक आंधळा आणि एक पांगळा माणूस सापडला. त्यातील पांगळ्या माणसाला जागेवरच ठार करण्यात आले आणि आंधळ्या माणसाला एका घोड्याच्या शेपटीला दोरखंडाने बांधून दौलताबादला धाडण्यात आले, तेव्हा त्या अंध माणसाचा एक पाय तेवढा दौलताबादला पोहोचला.’ बटुटाच्या नावावर आणखी एक नोंद आहे, अर्थात तिच्या सत्यतेबाबत विवाद आहेत. बटुटा म्हणतो, ‘दिल्लीचे नागरिक सुलतानाला पत्र पाठवून शिव्या देत होते, घोटाळ्यांची माहिती चव्हाट्यावर आणत होते. अशा या दिल्लीकरांना धडा शिकवण्यासाठी सुलतान तुघलकाने राजधानीचे शहर हलवले.’ इतिहासकार सर हेग यांनी बटुटाची ही नोंद सत्य असल्याचे मान्य केले आहे. इसामी यांचेही म्हणणे असेच आहे की, दिल्लीच्या नागरिकांची जिरवायची, त्यांचे खच्चीकरण करायचे, त्यांची एकजूट तोडायची या इराद्याने तुघलकाने राजधानी हलवली. म्हणजे तेसुद्धा बटुटाच्या म्हणण्याला दुजोरा देतात.

पण प्रोफेसर हबीबुल्ला आणि इतर काही लोक, पूर्णत: वेगळाच दृष्टिकोन पुढे करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘दिल्लीतील जनतेला जरी स्थलांतर करावयास लावले असले  तरी, दौलताबादपर्यंतच्या १५०० कि.मी. प्रवासात, सुलतानाने जनतेसाठी ठिकठिकाणी विश्रांतीस्थळे व मुक्कामासाठी तात्पुरती निवासस्थाने उभारली होती. परंतु हे स्थलांतर उन्हाळ्यात घडवून आणल्यामुळे आणि प्रवास दूर पल्ल्याचा व कठीण असल्याने अनेक लोक प्रवासातच मरण पावले. जे लोक दौलताबादला पोहोचले त्यांना आपण घरापासून दुरावल्याचे दु:ख अनावर झाले, दौलताबादचे हवामान व तेथील जमीन त्यांच्या तब्येतीला मानवत नव्हती आणि आपल्या जन्मभूमीची आठवण त्यांना तीव्रतेने होत होती. कारण त्यांच्या अनेक पिढ्या दिल्लीतच वास्तव्याला होत्या, या सर्वांचा परिणाम काय तर, दौलताबादला पोहोचलेल्या दिल्लीकर जनतेमध्ये असंतोष वाढीस लागला. साधारण दोनेक वर्षांनी मुहम्मद तुघलकाला दौलताबाद ही राजधानी करण्यात आपली चूक झाली असे वाटू लागले. त्याच्या हेही लक्षात आले की, पूर्वी दिल्लीत राहून दक्षिणेकडील राज्यांवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते, पण आता दक्षिणेत राहून दिल्लीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे. हळूहळू त्याचे मत बदलत गेले आणि मग इ.स.१३३५ मध्ये त्याने नवा अध्यादेश काढला, आता पुन्हा दिल्लीला राजधानी हलवायची आहे, त्यामुळे सर्व देवगिरीकरांनी दिल्लीला स्थलांतर करण्याची तयारी करावी. म्हणजे दिल्लीची सर्व जनता देवगिरीला आणण्याची त्याची घोडचूक भलतीच महागात पडली होती. वस्तुत: देवगिरीला राजधानी करताना त्याने राज्यकारभारासाठी आवश्यक तेवढ्याच कर्मचारी-अधिकाऱ्यांना स्थलांतर करावयास लावले असते तर, बराच आटापिटा टळला असता. अर्थात, देवगिरीला राजधानी बनवण्याचा तुघलकाचा प्रयोग पूर्णत: फसला तरी काही फायदेही झाले. एक म्हणजे, त्या निर्णयामुळे दक्षिण व उत्तर भारतातील लोकांचे आदानप्रदान वाढले. देवगिरीला गेलेले अनेक लोक, साधूसंत तिकडेच स्थायिक झाले. त्या लोकांनी उत्तरेकडील सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक विचार दक्षिणेकडे रूजविण्याचे प्रयत्न केले. (ती संस्कृती व त्या कल्पना-विचार तुर्कांनी उत्तरेत रूजवल्या होत्या.) या सर्वांचा परिणाम, दक्षिण व उत्तर यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीची प्रक्रिया वाढीस लागली. मात्र देवगिरीला राजधानी करण्याच्या निर्णयाचे स्वागत कोणत्याच इतिहासकाराने केलेले नाही. देवगिरी हे स्थान निवडणे आणि समस्त दिल्लीकरांना देवगिरीला हलवणे हे दोनही निर्णय शहाणपणाचे नव्हते, असेच सर्व इतिहासकारांचे मत राहिले. स्टॅनले लेन याने तर ‘दौलताबाद हे चुकीच्या दिशेने वळवलेल्या ऊर्जेचे स्मारक आहे’ असा उल्लेख केला आहे.

मुहम्मद-बिन-तुघलकाचा आणखी एक धडाकेबाज व वादग्रस्त प्रयोग म्हणजे त्याने चलनात केलेला बदल. आजच्या काळात कागदी नोटांमुळे चलनाची फार मोठी गरज भागवली जाते. पण मुहम्मदाच्या काळात सोने व चांदी यांच्यापासून बनवलेली नाणी हेच चलन होते. त्यामुळे ती नाणी खूप जास्त प्रमाणात तयार करावी लागत. पण तुघलकाने ज्या धडाकेबाज पद्धतीने विविध प्रयोग आरंभले होते, त्यासाठी चलनाची देवाणघेवाण जास्त होऊ लागली. शिवाय, अनेक प्रयोगांसाठी खर्चही अतोनात होत होता. त्यामुळे सोने व चांदी यांचा तुटवडा निर्माण होऊ लागला. त्यावर उपाय म्हणून मुहम्मदाने सोने व चांदी यांची नाणी रद्द केली आणि ब्रॉन्झची (कासे) व तांब्याची (कॉपर) नाणी चलनात आणली. (चीनचा कबलाई खान आणि पर्शियाचा चंगीज खान या दोघांनी चलनबदल यशस्वीपणे त्यांच्या राज्यात राबवला होता, त्यामुळे तुघलकाला ही कल्पना सुचली.) ब्रॉन्झच्या नाण्यांची तीच किंमत असेल जी चांदीच्या व सोन्याच्या नाण्याची होती, असे त्याने जाहीर केले. या निर्णयाचा भलताच उलटा परिणाम झाला. फारच थोड्या काळात ब्रॉन्झची नकली नाणी बाजारात आली आणि लोकांनी चांदी व सोने यांची जुनी नाणी घरात दडवून ठेवायला सुरुवात केली. हे थोपवण्यासाठी सरकार काहीच करू शकले नाही. सरकारची संपूर्ण तिजोरी ब्रॉन्झच्या व तांब्याच्या नाण्यांनी ओसंडून वाहू लागली. या नव्या नाण्यांचे बाजारातील मूल्य खूपच कमी झाले. नवीन बनावट नाणी देशभर सर्वत्र तयार होऊ लागली, ते थांबवण्यात मुहम्मदाला यश आले असते तर कदाचित त्याचा चलनबदलाचा निर्णय यशस्वी झाला असता. अखेरीस, चलनबदलाचा निर्णय मागे घेतला गेला. ब्राँझची नाणी सरकारजमा करून चांदीची नाणी मिळतील असे मुहम्मदाने जाहीर केले. त्यामुळे ब्रॉन्झची नाणी बदलून घेण्यासाठी झुंबड उडत राहिली. मात्र त्यावेळी एक झाले, जी नाणी नकली आहेत हे उघडकीस आले, ती बदलून मिळाली नाहीत. बरानी हा इतिहासकार नोंदवतो, ‘खूप मोठ्या प्रमाणात जमा झालेली नकली नाणी किल्ल्याच्या बाहेर बरीच वर्षे राशींच्या स्वरूपात पडून होती.’ या चलनबदलाच्या प्रयोगामुळे अतोनात पैसा वाया तर गेलाच, पण सुलतानाची जी काही प्रतिष्ठा होती तिच्यावरही प्रतिकूल परिणाम झाला. 

मुहम्मद-बिन-तुघलकाचे असे अफलातून प्रयोग केवळ देशांतर्गत होत होते असे नाही. परराष्ट्रीय धोरणासंबंधातही त्याने असेच काही प्रयोग केले. त्यातील सर्वांत पहिला प्रयोग म्हणजे खुरासन प्रकल्प. महान योद्धा/विजेता अशी आपली ख्याती व्हावी अशी मुहम्मदाची महत्त्वाकांक्षा होती. ती पूर्ण करण्यासाठी त्याने त्यावेळी इराकची वसाहत असलेले खुरासन राज्य काबीज करायचे ठरवले. त्यासाठी त्याने एक लाख नव्या सैनिकांची भरती केली आणि त्या सर्वांना एक वर्षांचे वेतन ॲडव्हान्स म्हणून देऊन टाकले. शिवाय, त्या मोहिमेच्या तयारीसाठी तीन लाख रुपये खर्च केले. पण तो प्रयोग अर्ध्यातच सोडून देण्यात आला. कारण पर्शियाच्या सम्राटाने या मोहिमेला मदत करीन असे आश्वासन दिले होते, पण वेळ येताच तशी मदत करण्यास त्याने नकार दिला. अंतिमत: या प्रकल्पात सुलतानाला प्रचंड मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि ‘विजेता’ म्हणून त्याची जी प्रतिमा होती तिला मोठा धक्का बसला. कराजलची मोहिम हासुद्धा तुघलकाचा फसलेला प्रयोग म्हणूनच ओळखला जातो. भारत आणि चीन या दोन देशांच्या सीमेनजिक कराजल हे हिंदू राज्य होते. इ.स.१३३७मध्ये मुहम्मदाने प्रचंड मोठे सैन्य कराजल जिंकण्यासाठी पाठवले होते, सुरुवातीला त्या मोहिमेला यशही मिळाले. पण मुळात ते युद्ध हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये होत असल्याने लांबत गेले आणि धुवाँधार पावसाळा सुरू झाला, तेव्हा तुघलकाच्या सैन्याची वाताहत झाली. बरानीने नोंदवले आहे, ‘दहा हजार सैनिकांपैकी जेमतेम दहाच घोडेस्वार दिल्लीला परतू शकले आणि त्यांच्यामुळेच तुघलकाला आपल्या सैन्याच्या वाताहतीची कहाणी कळली.’ मनुष्यबळ आणि पैसा या दोन्ही आघाड्यांवर त्या मोहिमेत सुलतानाचे खूप नुकसान झाले. नंतर कराजलच्या हिंदू राजाने तुघलकाचे अधिराज्य मान्य केले, तह केला. पण झालेल्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेता, तुघलकाचा आणखी एक अयशस्वी प्रयोग म्हणूनच कराजलच्या साहसी मोहिमेचा उल्लेख करावा लागतो. तुघलकाने आपल्या राज्याची वायव्य सरहद्द भक्कम ठेवण्याकडे दुर्लक्ष केले होते, त्यामुळे त्या बाजूने मंगोल आक्रमकांच्या टोळ्या चाल करून दिल्लीच्या रोखाने आल्या, तेव्हा काय करायचे हे तुघलकाला कळले नाही. (तर्मा शिरीन खान या सेनापतीच्या नेतृत्वाखाली मंगोलियन सैन्य आले तेव्हा मुलतान व लाहोरपर्यंत त्यांना प्रतिकारच झाला नाही.) म्हणून मग त्याने त्या आक्रमकांना लाच म्हणून खूप मोठ्या प्रमाणात सोने व चांदी दिली आणि परतवून लावले. सुलतानाच्या या कचखाऊपणामुळे जनतेला असुरक्षित वाटू लागले. लष्करी तयारी नव्हती आणि मंगोल आक्रमकांचा सामना करता आला नाही, यामुळे तुघलक अप्रिय ठरू लागला.

अशा या मुहम्मद-बिन-तुघलकाच्या कर्तृत्वाचे मोजमाप कसे करावे याबाबत ज्ञानी माणसांच्या मनात कायम द्विधा परिस्थिती राहिली आहे. इतिहासकारांमध्येही अगदी टोकाची भिन्न मते मांडणारे आहेत. एलफिन्स्टन, एडवर्ड थॉमस्‌, हॉवेल, स्मिथ वगैरे इतिहासकार हे मान्य करतात की, ‘सुलतान मुहम्मद बिन तुघलक याच्यामध्ये एक प्रकारचा विक्षिप्तपणा/वेडसरपणा होता.’ पण दुसऱ्या बाजूच्या म्हणजे गार्डिनर, ब्राऊन, ईश्वरी प्रसाद इत्यादी इतिहासकारांच्या मते, ‘सुलतान तुघलकामध्ये वेडेपणाची झाक अशी काही नव्हती, उलट त्याच्यात अलौकिक शक्ती होती.’ एवढेच कशाला, तुघलकाचे समकालीन इतिहासकार बरानी आणि बटुटा यांनीसुद्धा सुलतानाचे चारित्र्य व त्याचे पराक्रम याबाबत पूर्णत: भिन्न निष्कर्ष मांडले आहेत. त्यामुळे पूर्वग्रहरहित मनाने आणि सर्वमान्य होईल असा निष्कर्ष काढणे खूपच अवघड आहे. मात्र बहुतेक सर्व इतिहासकारांचे यावर एकमत आहे की, मुहम्मद-बिनतुघलक हा त्याच्या समकालीन राजे-महाराजांपेक्षा अधिक हुशार व अधिक कर्तबगार होता. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र आणि शारीरिक विज्ञान या विद्याशाखांमध्ये त्याचे ज्ञान गहन होते. अरबी व पर्शियन भाषांचा तो चांगला जाणकार होता, साहित्यातही त्याला गती होती. संगीत आणि चित्र-शिल्प कला यांचा तो चाहता होता. समकालीन इतिहासकार बरानीने तर नोंदवूनच ठेवले आहे, ‘‘मुहम्मद-बिन-तुघलक ही विधात्याची अशी आश्चर्यकारक निर्मिती होती, ज्याच्या क्षमतांचे आश्चर्य ॲरिस्टॉटल आणि असफ यांनाही वाटले असते.’’ मात्र राज्यकर्ता म्हणून त्याच्या फसलेल्या प्रयोगांमुळे तो मोठ्या अपयशांचा स्वामी मानला गेला. अशा अपयशामुळे परस्परविरोधी गुणांचा समुच्चय असलेला वेडा सुलतान अशी त्याची संभावना झाली. त्याच्याकडे भव्यदिव्य कल्पना जरूर होत्या, पण त्यांची अंमलबजावणी घडवून आणण्याची क्षमता नव्हती. असो. झाले ते झाले. तो एक असामान्य राजा होता हे तर खरे!

(History Discussion) या वेबसाईटवरील आनंद यांच्या इंग्रजी लेखाचा हा अनुवाद आहे.

(अनुवाद : विनोद शिरसाठ )

Tags: हिस्ट्री डिस्कशन अल्लाउद्दीन खिलजी आनंद मुहम्मद बिन तुघलक विनोद शिरसाठ vinod shirsath असामान्य राजा कराजलची मोहिम खुरासन प्रकल्प तांब्याची नाणी ब्राँझची नाणी चलनबदल सुलतान दिल्ली देवगिरी कृषिक्षेत्र दोआब asmanya raja karajalchi mohim khurasan prakalp copper coin bronzechi coin chalanbadal sultaan delhi devgiri krushikshetra doaaab Allauddin khilaji Aanand muhammad bin tughalaq weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके