डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

अण्णा भाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 या दिवसाचा, असं गृहीत धरण्यात आलं आहे. त्यांच्या जन्माच्या कागदोपत्री नोंदी कुठं कुणाला अद्याप सापडलेल्या नाहीत. शूद्रांच्या जन्माची नोंदणी त्या काळात पद्धतशीरपणे होत असेल, असं मानता येत नाही. अण्णा भाऊंचं गाव वाटेगाव त्या वेळी कुरुंदवाडच्या पटवर्धन संस्थानात होतं. भालचंद्रराव अण्णासाहेब संस्थानिक होते. नंतर ते सातारा जिल्ह्यात आणि सध्या सांगली जिल्ह्यात आहे. अण्णा भाऊंच्या जन्माची आणि दिवस यांची आठवण त्यांच्या मातोश्री वालुबाई (माहेर तळसंदे, तालुका हातकणंगले, जि.कोल्हापूर) यांनी सांगितली. अण्णा भाऊंचा जन्म ज्या दिवशी झाला, त्याच दिवशी देशातील एका खूप मोठ्या माणसाचं निधन झालं, असं वालुबार्इंनी सांगितलं. तो मोठा माणूस म्हणजे लोकमान्य टिळक. ही सर्व माहिती पडताळून जन्मतारीख सर्वमान्य करण्यात आली.

 

कोणताही महान माणूस परिस्थितीचं अपत्य असतो. परिस्थितीच त्याला जन्माला घालते, त्याला घडवते आणि महान माणूस स्वत:ला हवी तशी परिस्थिती घडवतो  किंवा त्यासाठी अथकपणे प्रयत्न करतो. संघर्ष करतो. बदलासाठी हा संघर्ष असतो. काय बदलायचं आहे आणि काय नवं निर्माण करायचं, ते कोठून आणायचं आणि रुजवायचं, यासाठी हा माणूस संघर्ष करतो. त्यासाठी तो वेगवेगळी आयुधं वापरत असतो. रस्त्यावरच्या संघर्षापासून ते लेखनापर्यंत, नव्या परंपरा व नव्या विचारांपासून ते प्रबोधनापर्यंत अनेक आयुधं असतात. ती तो वापरतो. या माणसाला समजावून घ्यायचं असेल; तर तो ज्या परिस्थितीत, ज्या समाजात, ज्या पर्यावरणात जन्माला आला- ते सर्व पाहावं लागतं. साहित्याच्या बाबतीत तर ते पाहावंच लागतं. संबंधित माणसाची नाळ कोठे पुरली ती जागा, तेथील माती, तेथील समाजव्यवस्था, तेथील धर्मव्यवस्था इथपर्यंत धांडोळा करावा लागतो. साहित्य हे समाजाचं, माणसाच्या जगण्याचं, त्यानं पाहिलेल्या स्वप्नांचं प्रतिबिंब असतं- हे मान्य केल्यास या सर्व गोष्टी ओघानंच येतात. त्यांना चकवा देऊन पुढं गेल्यास महामाणूस, महान लेखक समजावून घेण्यात अडचणी येतात. त्याचं कर्तृत्व पाहता येतं, त्याचा फोटो काढता येतो; पण त्याच्या कर्तृत्वाला कोणत्या मुळांनी कोणतं खतपाणी दिलं, कोणती जीवनसत्त्वं आणि कोणती संघर्षतत्त्वं का आणि कशी दिली, हे पाहायचं राहूनच जातं. एकूणच माणूस आणि त्याचं कर्तृत्वही समजून घेण्यात अडचणी येतात. म्हणजे, एका अर्थानं आपण त्याच्यावर अन्याय करतो. दृश्याचं आकलन-अध्ययन करणं जसं महत्त्वाचं असतं, तसं दृश्य जन्माला घालणाऱ्या गर्भाशयाचं आकलनही महत्त्वाचं ठरतं.

Every secrets of a writer's soul, every exeperience of life, every quality of his mind is written large in his work-असं ब्रिटनमधील  एक प्रसिद्ध लेखिका व्हर्जिनिया वुल्फ (25 जानेवारी 1882 ते 28 मार्च 1941) यांनी म्हटलं आहे. लेखक आपल्या लेखनात या साऱ्याच गोष्टी आणत असतो. प्रसंगी आपल्या आत्म्याच्या (म्हणजे स्वत:च्या, धर्मातील आत्मा नव्हे) गोष्टीही तो लेखनात आणत असतो. हे सारं लक्षात ठेवून प्रसिद्ध बंडखोर, विद्रोही व मार्क्सवादी लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाकडं, जीवनाकडं आणि त्यांनी घडवलेल्या संघर्षाकडे पाहायचं आहे.

अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा जीवनसंघर्ष आणि त्यांच्या साहित्यावर पुन्हा एकदा गांभीर्याने सखोल नजर टाकायची आहे. जे अव्वल साहित्य असतं, त्यातून काळ बदलेल तसं काही तरी नवं घावत असतं आणि भावतही असतं. हे साहित्य नव्या जीवनाशी मैत्री करण्यासाठी आणि त्याला संघर्षाचा पाठ देण्यासाठीही पुढं येत असतं. अण्णा भाऊंचा जन्म एक ऑगस्ट 1920 या दिवसाचा, असं गृहीत धरण्यात आलं आहे. त्यांच्या जन्माच्या कागदोपत्री नोंदी कुठं कुणाला अद्याप सापडलेल्या नाहीत. शूद्रांच्या जन्माची नोंदणी त्या काळात पद्धतशीरपणे होत असेल, असं मानता येत नाही. अण्णा भाऊंचं गाव वाटेगाव त्या वेळी कुरुंदवाडच्या पटवर्धन संस्थानात होतं. भालचंद्रराव अण्णासाहेब संस्थानिक होते. नंतर ते सातारा जिल्ह्यात आणि सध्या सांगली जिल्ह्यात आहे. अण्णा भाऊंच्या जन्माची आणि दिवस यांची आठवण त्यांच्या मातोश्री वालुबाई (माहेर तळसंदे, तालुका हातकणंगले, जि.कोल्हापूर) यांनी सांगितली. अण्णा भाऊंचा जन्म ज्या दिवशी झाला, त्याच दिवशी देशातील एका खूप मोठ्या माणसाचं निधन झालं, असं वालुबार्इंनी सांगितलं. तो मोठा माणूस म्हणजे लोकमान्य टिळक. ही सर्व माहिती पडताळून जन्मतारीख सर्वमान्य करण्यात आली. अण्णा भाऊ मूळचे वाटेगावचे, असे सांगण्यात येत असलं आणि तेही मान्य करण्यात येत असलं, तरी वाटेगावपासून जवळच टाकळी या छोट्याशा खेड्यात साठे कुटुंबीयांचं काही काळ वास्तव्य होतं, असंही म्हटलं जातं. साठे कुटुंब कर्नाटकातून वाटेगावला आलं, असं सांगणारे आजही आहेत. मग प्रश्न असा येतो की- हे कुटुंब कर्नाटकात का गेलं आणि तिथून वाटेगावात का परतलं? वाटेगावातून हे कुटुंब कर्नाटकात गेलं की महाराष्ट्रातून अन्य ठिकाणाहून गेलं? संशोधक या प्रश्नाचं उत्तर शोधून काढतील, याविषयी मला आशा आहे. अण्णा भाऊंच्या कुटुंबाचा भूगोल नेमका कोणता होता, हे तपासण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.

आता दिसणाऱ्या वाटेगावचा भूगोलही आगळावेगळा आहे. भोगावती नदी गावाच्या मधोमध वाहत जाते. जणू काही वाटेगावचे दोन तुकडे करते. वाटेगाव सध्या वाळवा तालुक्यात पेठच्या वायव्येला इस्लामपूरपासून पावणेदहा मैलांवर आणि राष्ट्रीय महामार्ग-4 वर आहे. तसं ते अनेक गावांना मध्यवर्ती वाटतं. ब्रिटिशांनीच तिथे बाजारपेठ वसवली. पूर्वेला काळम्मावाडी देवी म्हणजे काळम्मावाडीची हद्द आहे. तिला चिकटून सुळकीचा डोंगर आहे. या डोंगरावरच इंग्रजांनी अण्णा भाऊंच्या कादंबरीतील फकिरा गायब केला. वाटेगावच्या पश्चिमेला शिराळा पेठेची हद्द, दक्षिणेला सुरुल हद्द आणि राजारामबापू साखर कारखाना आहे. या भागातच अण्णा भाऊंची ‘माकडीचा माळ’ ही कादंबरी जन्माला आली, असं म्हणतात. उत्तरेला कासेगावची हद्द, कऱ्हाड कासार हद्द आहे. वाटेगावसाठी गंगा झालेली भोगावती पुढं कृष्णेत विलीन होते.

वाटेगावचा गावगाडा खूप समृद्ध होता. समृद्ध गावाभोवती भटक्या जाती-जमातींचा वावर असतो. वाटेगावात खूप जाती राहत होत्या, राहतात. गावगाड्यात स्थान नसलेल्या भटक्या-विमुक्त आणि पूर्वी इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलेल्या जातींचा वावर आजही येथे मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व जाती अण्णा भाऊंच्या सामाजिक आणि भौगोलिक पर्यावरणात होत्या. त्यांचं जगणं-मरणं अण्णा भाऊ पाहत आले होते. या बहुतेक जातींना अण्णा भाऊंच्या साहित्यात स्थान मिळालं आहे. काही जाती तर मराठी साहित्यात प्रथमच अवतीर्ण झाल्या, त्या अण्णा भाऊंमुळेच. त्यांचा विचार आपण पुढं करणार आहोत. 2012 च्या जनगणनेनुसार वाटेगावचे लोकसंख्याविषयक आणि जातवार लोकसंख्याविषयक चित्र पुढीलप्रमाणे मांडता येईल. गेल्या आठ-दहा वर्षांत त्याच्यात थोडाफार फरक झालेला असू शकतो. एकूण लोकसंख्या- 9,485, महिला- 4,580, पुरुष- 4,905. वाटेगावला बागायती आणि जिरायती क्षेत्रही मोठे म्हणजे 1,696 हेक्टर इतकं आहे. अनुसूचित जातींतील लोकसंख्या मोठी म्हणजे 1,175 इतकी आहे. त्यात महार, मांग, चांभार आदी जाती आल्या. गावात अठरापगड जाती (अठरा पगड म्हणजे वेगवेगळ्या अठरा पगड्या घालणाऱ्या जाती) आहेत. ब्राह्मण, मराठा, मुस्लिम, नाभिक, रामोशी, सुतार, लोहार, नवबौद्ध (पूर्वीचे महार), मातंग, चर्मकार, लिंगायत, वाणी, जैन, तेली, मारवाडी, वडार, धनगर, ढोर आणि जंगम या त्या अठरा जाती. यातील अनेक जातींचा प्रत्यक्षात पगडीशी संबंध नाही. व्यवस्थेनं ती त्यांना दिलेली नाही. व्यवस्थेनं सर्वांनाच पगड्या दिलेल्या नाहीत आणि पूर्ण पोषाख नेसण्याचा अधिकारही सर्वांनाच दिलेला नाही. मनुबाबाच्या मनात जसं आलं आणि जे त्याच्या मनुस्मृतीत अवतरलं, तसंच घडलं आहे. जातींच्या संख्या अजूनही खूप आहे. बारा बलुतेदार, पंधरा आलुतेदार म्हणजे कारू-नारू असतात.

वाटेगाव व परिसरात गावगाड्यातल्या आणि त्याच्या परिघात हंगामी ये-जा करणाऱ्या अनेक जाती आहेत. त्यांना फिरस्ते, फिरस्तीही म्हणतात. वाटेगाव जसा गावगाड्याच्या दृष्टीनं समृद्ध आहे, तसा तो देव-धर्माच्या बाबतीतही आहे. वाटेगावात दोन-अडीच डझन भरतील एवढे देव आणि देवता आहेत. त्यातील बरेच अण्णा भाऊंच्या साहित्यात डोकावतात. काही देव-देवता सामुदायिक, तर काही त्या-त्या जातीच्या आहेत. अस्पृश्यांच्या काही देवता असतात आणि त्या बहुतेक उग्र देवता असतात. अस्पृश्य आणि भटक्या जाती या सामान्यपणे मातृप्रधान, देवताप्रधान असतात. ज्या जातीचा जेवढा छळ आणि पिळवणूक होते, त्यावरूनही त्यांची देवता कमी उग्र की अधिक उग्र- हे ठरत असते. इथं आपण प्रामुख्यानं मातंग (मांग) जातीचा विचार करणार असल्यानं त्यांच्या देवताच पाहणार आहोत. या देवतांची यादी वेगवेगळी आहे.

वेगवेगळ्या संशोधकांनी ती वेगवेगळ्या संख्येत सांगितली आहे. अण्णा भाऊंच्या साहित्यात सणवार, व्रतवैकल्ये, वीर आदींचा जो उल्लेख येतो; तो समजून घेण्यासाठीही या देव-देवतांची माहिती निदान नावापुरती तरी करून घेणं आवश्यक आहे. ‘द ट्राइब्ज ॲण्ड कास्ट्‌स ऑफ बॉम्बे’ या प्रसिद्ध संशोधनपर ग्रंथात लेखक आर.ई. इन्थोवन यांनी अनेक जातींची माहिती दिली आहे. खरं तर हा जाती-जमातींची माहिती देणारा सर्व्हे ग्रंथ आहे. इंग्रजांनी 1901 मध्ये असा व्यापक सर्व्हे करण्याचा आदेश दिला आणि 1920 मध्ये तीन खंडांत हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. यातील माहिती खूपच विश्वासार्ह मानली जाते. तिला आव्हान देऊ नये, इतकी ती विश्वासार्ह मानली जाते. या ग्रंथांच्या दुसऱ्या खंडात मांग (संशोधकांनी हाच शब्द वापरला आहे) पान 434 वर मांग जातीतील देवांची नावे दिली आहेत. त्यात महादेव (मांग शैवपंथीयही आहेत), मरिआई (पटकी देवता), भैरोबा, खंडोबा, म्हसोबा, अंबाबाई, बहिरी, जनाई, ताई, विठोबा, यमाई यांचा उल्लेख आहे. प्र.कृ. सरदेसाई यांनी ‘आदिशक्तीचे विश्वस्वरूप’ (देवीकोश) भाग तीनमध्ये अंबाबाई, मरिअम्मा, यल्लमा, बहिरी, जनाई, मरिआई, तुर्की, यमाई, खंडोबा, जोतिबा आदी मांग जातीच्या देव-देवता असल्याचं म्हटलं आहे. कारू-नारू किंवा फिरस्त्यांमधील देव-देवता पाहिल्यास बहुतेक हीच नावे येतील. उग्र देवता, मातृदेवता वगैरे विशेषणे त्यांच्यासाठी आहेत. फिरस्त्यांना गाव नसतं म्हणून अनेक ठिकाणी त्यांना ग्रामदेवता नसतात. या देवता प्रसन्न व्हाव्यात, म्हणून मांगांमध्ये काही देवतांना मुली-मुले वाहण्याची प्रथा आहे. त्यांना मुरळी, जोगनी, वाघ्या, भावीण वगैरे म्हटलं जातं. मांगांमध्ये देवदासी सोडण्याचं प्रमाण अधिक आहे. मुलांमध्ये पोतराज, वाघे जन्माला घातले जातात. अण्णा भाऊंच्या वाटेगावपासून जवळच कुंडलला पोतराजाची जत्रा भरते.

माणूस ज्या प्रकारचं जीवन जगतो, ज्या प्रकारच्या पर्यावरणात राहतो, ज्या प्रकारे त्याची पिळवणूक होते- तसा त्याचा स्वभावही थोड्या प्रमाणात घडत असतो. माणसाचं व्यक्तिमत्त्व घडण्यास एवढीच कारणं असतात, असं मात्र नाही. अजूनही असतात. मातंगांच्या बहुतेक देवी जशा उग्र आहेत, तशी त्यांची आराधनाही उग्र आहे, हे आपण पुढे पाहणार आहोत. वाटेगावात ताईबाईचे मंदिर अण्णा भाऊंच्या घराच्या दक्षिणेलाच पूर्वीपासून आहे. घरापासून थोड्या अंतरावरच लक्ष्मीचे मंदिर आहे. याशिवाय गावातील आणि बाहेरील अन्य मंदिरांचा उल्लेख अगोदर आलाच आहे. मराठवाड्यात मांगीरबाबा, रेणुका, यल्लमा, हनुमान, काही ठिकाणी मंगेश यांचीही पूजा मातंगांकडून केली जाते.

मांग आणि मातंग असा भेद करणारे काही संशोधक आता तयार झाले आहेत. मातंग शब्दाची फोड करून ते वेगळे काही तरी सांगतात. ते तार्किक दृष्ट्या योग्य असले- मातंगापासून मांग की मांगापासून मातंग हा शब्द यावर यापुढेही चर्चा झडत राहणार आहेत- अशा चर्चा होणे अर्थातच चांगलं असतं. महाराष्ट्रात मांग, कर्नाटकात मादिगा आणि गुजरातमध्ये मांगेल हा शब्द रुढ आहे. प्रत्येक जातीतून पोटजातींची सातत्यानं निर्मिती होणे, हेही आपल्या जातव्यवस्थेचं एक अतूट वैशिष्ट्य आहे. आपण सांगितलेल्या जातींमध्ये पोटजातींचं एवढं उदंड पीक येईल याचा अंदाज मनूला पण आला नसावा. तो ज्या जातीचा होता, तिथेच शंभराहून अधिक पोटजाती जन्माला आल्या आहेत; अन्य पोटजातींबद्दल तर विचारायलाच नको! मातंगांचं तसंच आहे. ज्याचा सुरवातीला उल्लेख केला तो इन्थोवन मातंगामधील 25 पोटजातींची यादी देतो आहे. प्रा.शरद गायकवाड यांनी ‘मातंग समाज : साहित्य आणि संस्कृती’ या आपल्या ग्रंथात प्रा.सोमवंशी यांच्या संशोधनाचा हवाला देऊन व्यवसायावरून मातंगांच्या तीन पोटजाती आहेत असं म्हटलं आहे. तसेच कुळावरून 47 पोटजाती असल्याचं म्हटलं आहे. डॉ. प्रभाकर मांडे यांचा हवाला देऊन 24 जाती असल्याचं म्हटलं आहे. कुणामध्येही एकमत नाही. प्रदेशनिहाय पोटजातींची संख्या कमी-जास्त असू शकते.

इन्थोवेन, मांडे आणि संस्कृतिकोश यांच्यामध्ये मात्र सव्वीसच पोटजातींचा उल्लेख आढळतो. मांडे आणि संस्कृतिकोशानेही इन्थोवेन याचा मुबलक वापर केला आहे. 

अनेक संशोधकांनी मांग/मातंग हे दोन्हीही शब्द वापरले आहेत. महाराष्ट्रामध्ये 26 पोटजाती असतील, तर त्यापैकी वाटेगावमध्ये किती होत्या आणि यापैकी अण्णा भाऊंची पोटजात कोणती होती, याचा शोध कोणीही घेतलेला नाही. काही ठिकाणी मातंग स्वत:ला अंबुज, तर काही ठिकाणी चुंग म्हणतात. काही ठिकाणी त्यांची गुप्त भाषाही आहे. याचा अर्थ भाषेच्या बाबतीत ही जात समृद्ध आहे. वेगवेगळे व्यवसाय, स्थलांतर, गुन्हे, सेवा या सर्वांतून ही भाषा समृद्ध झाली आहे. मातंगांमध्ये अस्सल, कमअस्सल, कडू वगैरेही पोटजाती आहेत. जो स्वत:ला एकदम अस्सल समजतो, तो स्वत:ची पोटजात अस्सल किंवा मराठा सांगतो. मराठा ते मुसलमान असाही पोटजातींचा प्रवास आहे. पण काही संशोधक मुसलमान उच्चारत नाहीत. अन्य काही जातींबरोबरच मातंगांचेही वेगवेगळ्या कालखंडांत इस्लाम, ख्रिस्ती आणि अलीकडे बौद्ध असं धर्मांतर झालं आहे. महात्मा बसवण्णांच्या लिंगायत धर्मातही त्यांचा सहभाग मोठा आहे. त्यांनी तिथे सुंदर वचनेही जन्माला घातली आहेत. नावारूपास आलेले बसवशरणही तेथे आहेत. जलजंबू हा मातंगांचा पहिला पुरुष असला तरी यमऋषी, आदिवासी यांच्यापर्यंत मातंगांचा विचार केल्याचेही दाखले देण्यात येतात.

आता आपण पोटजातींकडे वळू. अस्सल मराठा, बाले बुरुड, चपकसंदे, उळूर, देलूर, उकुलवार, वाजंत्री, ढोर, घडशी, होलार, जिनगर, जिराईत, मोची, नाडे, परिट, शिवते, तेलंगी, टोकर, फोडे, झारे, मुसलमान मांग या काही पोटजाती आहेत. त्यांच्या नावावरून लक्षात येईल की, त्यांनी स्वीकारलेला व्यवसाय किंवा तो व्यवसाय करणारी मूळ जातही आडनावात येते. मातंगांना तसा ठोस व्यवसाय नव्हता. दोरखंड आणि दोरापासून अन्य वस्तू तयार करणे, वाजंत्री वाजवणे, चोऱ्या करणे, मरिआईचा गाडा ओढणे, पोतराज होणे, रंजन आणि सेवा देणे, म्हशी भादरणे, गुन्हेगाराला फाशी देण्याचे काम करणे आदी पडेल ते व्यवसाय त्यांनी केले आहेत. बलुतेदारांत त्यांचा समावेश असला तरी सर्वच ठिकाणी त्यांना वतनं नाहीत. काही ठिकाणी त्यांनी पाटीलकी मिळवली होती. काही ठिकाणी महारांसारखी, काही ठिकाणी ढोर-चांभारांसारखी कामं स्वीकारली होती. काही धार्मिक कामं त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासारखी दिसत असली तरी प्रत्यक्षात त्यांची त्यात पिळवणूकच आहे. कॉलऱ्याची साथ मोठ्या प्रमाणात आली तेव्हा समाजानं कॉलरा, पटकीचंच रूपांतर देवीत केलं. मारणारी आई असं तिला नाव दिलं. मग हीच देवी म्हणजे मरिआई झाली. मातंगांनी तिला गाड्यात घालून गावाबाहेर सोडायचं आणि गाव रोगमुक्त करायचं. म्हणजे मातंगाने स्वत:च रोग वाहून न्यायचा. रोगी बनायचं. प्रसंगी प्राण द्यायचा. पोतराज बनून त्यानं स्वत:चा चावा घेऊन स्वत:चंच रक्त काढायचं, स्वत:च स्वत:च्या अंगावर कोरडा ओढून घ्यायचा, आपल्या मुली देवदासी बनवायच्या, कापलेल्या रेड्याचे मुंडके डोक्यावर घेऊन गावाभोवती फेरी मारायची किंवा रेड्याच्या आतड्यातील घाण गावाच्या सीमेभोवती शिंपडत जायची. तसं झाल्यानं गावाला बाधा होत नाही, ते सुरक्षित राहतं. पण दुसरीकडे मातंग असुरक्षित होतो किंवा मरतो. दोराचं काम त्याच्याकडे आणि गळा आवळण्याचं म्हणजे फाशीचं कामही त्याच्याकडेच. तुम्ही ज्या पद्धतीचं आणि जेवढ्या म्हणून पिळवणुकीचं, अन्याय-अत्याचार सहन करण्याचं आयुष्य जगत असता; तसं तुमचं व्यक्तिमत्त्व घडत असतं. ते वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्तही होत असतं. त्यात विचारव्यवहार, वर्तनव्यवहार आणि साहित्यव्यवहारही आलाच.

मातंग समाजाचे आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक जीवन पोटजातीनिहाय आणि प्रदेशनिहाय बदलले दिसते. खरं तर हे सर्वच खालच्या जातींबाबत घडत आलं आहे. कर्नाटकात काही जण मादिग हा शब्द म्हणजे ‘मातंग’ या शब्दाचा अपभ्रंश मानतात. कर्नाटकात असादरू, चन्नहोलिय, डकलेरू, ढोर, मोची पेड, सनादी (वाजंत्री) हे पोटजातीचे प्रकार आहेत. एक वैशिष्ट्य म्हणजे, पूर्वी या जातीत ब्राह्मण पुरोहित लग्न लावण्यास उपलब्ध झाला नाही तर लग्न लावण्याचा मान किंवा अधिकार जातीतील वृद्ध महिलेस असे. यल्लम्मा, दुर्गण्वा, धामण्वा, मर्गाई या देवतांचा कानडी मातंगावर खूप परिणाम आहे. जोडीला महाराष्ट्रात नसणारे पण कर्नाटकात प्रसिद्ध असणारे वेंकटराम व मारुती हेही देव तिथे आहेत. गुजरातमधील मांग सटवीचीही पूजा करतात. सटवी भविष्य लिहिणारी देवता मानली जाते. गुजरातमधील मांगांचे वैशिष्ट्य म्हणजे मृत्यूनंतर चौथ्या दिवशी अंत्यसंस्कार म्हणजे मृताला पुरण्याचा विधी होत असे.

मांग गारुड्यांच्या वाट्याला तर मोठ्या प्रमाणात चोरी आली होती. मध्य प्रदेशातील मांग गारुडी बेवारस प्रेते वाहून नेणे, फाशी देणे इत्यादी कामे करत. एखाद्याचं निधन झालं की, त्याला पुरलं जातं असे. तीन दिवस प्रचंड दारू प्यायली जाते. तिसऱ्या दिवशी मृताच्या घरासमोर कडुलिंबाची पानं खाऊन थुंकलं की, मृताशी असलेला संबंध संपला, असं मानलं जातं. विचित्र वाटाव्यात अशा ज्या प्रथा-परंपरा-अंधश्रद्धा तयार झाल्या; त्या त्यांच्या अज्ञानातून, दारिद्र्यातून, जगण्याच्या विवंचनेतून होय. व्यवस्था हे सारं घडवत होती. महाराष्ट्रातील मातंगांमध्ये खूप पूर्वी लग्नाच्या वेळी दोन टोपल्यांत चामडे आणि दोर ठेवून वधू-वरांना समोरासमोर बसवलं जात असे आणि मधे अंतरपाट धरला जात असे (भारतीय संस्कृतिकोश खंड सातवा-पान 267). दारिद्र्य संपवण्यासाठी ‘दे दान सुटे गिरान’ किंवा ‘आवस वाढ गं बाई’ असं म्हणत भीक मागितली जाई; याचा अर्थ ‘अंधार वाढ’ असाच होतो. म्हणजे आहे रे वर्गाने भाकरीच्या मोबदल्यात मातंगांना अंधार द्यायचा आणि स्वत: उजेड टिकवून ठेवायचा. जगण्याच्या विवंचनेतूनच त्यांना मंत्र, जादूटोणा, पिशाच, भूत यावर विश्वास ठेवावा लागला. या साऱ्यांचं एक स्वतंत्र जग तयार झालं आणि मुख्य जग (समाज) त्यांची पिळवणूक करतच राहिलं. मातंगांनी आपली-आपली सर्व प्रकारची संस्कृती तयार केली. मुख्य समाजातील दोन लोक परस्परांना भेटले की राम राम, नमस्कार म्हणतात. महार जोहार म्हणायचे आणि जोहार घालायचेही. मातंग परस्परांना भेटले की, ‘फर्मान’ म्हणायचे आणि अन्य जातीतला कोणी भेटला की, त्याला महाराजा म्हणायचे. फर्मान म्हणण्यामागे अर्थ आहे. मातंगांना जेव्हा गुन्हेगार जातीच्या यादीत घातलं गेलं, तेव्हापासून गाव आणि सरकार त्यांना छळण्यासाठी रोज काही तरी (आदेश) काढायचे. त्यामुळे गुन्हेगार ठरवल्या गेलेल्या सर्वच जातींचं जीवन भयप्रद आणि असुरक्षित बनायचं. फर्मान कधीही आणि कोणतंही निघणार याविषयी खात्री झाली होती. त्यातूनच दोन लोक परस्परांना भेटले की उत्सुकतेने म्हणायचे- फर्मान! म्हणजे आणखी काय निघालं आहे काय? विशेष म्हणजे, मातंगांमधील टोळीचा नायकही फर्मान काढायचा किंवा सोडायचा.

भारतीय धर्मव्यवस्था, जातव्यवस्था अनेक अस्पृश्य जातींना तर छळतच होती, पण इंग्रजांनीही काही जातींना गुन्हेगार ठरवून 1871 मध्ये गुन्हेगार जमाती कायदा केला. (Criminal Tribes Act  म्हणजेच CTA) या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवल्या गेलेल्या जातीतील कुणीही जन्माला येणारा हा गुन्हेगार म्हणजे जन्मजात गुन्हेगारच असतो. आयुष्यभर त्याला गुन्हेगार म्हणूनच राहावं लागतं. अशा व्यक्तीला गावचा कारभारी सांगेल तेव्हा हजेरी देण्यास जायचं असतं. एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतर करताना दोन्ही गावच्या कारभाऱ्यांची परवानगी आवश्यक ठरवली गेली. नियमांचं पालन न केल्यास दंड व तुरुंगवास अशी शिक्षा होती. तीन वर्षं तुरुंगवास आणि पाचशे रुपये दंड अशी ती शिक्षा होती. एकशे चाळीस वर्षांपूर्वी पाचशे रुपयांची किंमत किती असेल आणि एवढा पैसा जमवण्यासाठी काय आणि कसं करावं लागत असेल याची कल्पना केलेली बरी. गुन्हेगार वसाहत कायदा 1908 मध्ये झाला. दहा वर्षांवरील सर्व व्यक्ती गुन्हेगार म्हणून 1911 मध्ये नोंदवण्यात आल्या. मग तारांच्या कुंपणाची निर्मिती झाली. मातंगासह बेरड, राजपूत भामटा, टकारी भामटा, बावरी, भट पाशी, भिल्ल, छप्परबंद, कोळी, लमाणी, मारवाड बावरी, मीना, उधिया, पावरी, रामोशी, सॉसिया, तडवी, वंजारी, वडार, बागडी वाघरी यांचा समावेश आहे. या कायद्याविरुद्ध दीर्घ काळ लढा दिला तो कम्युनिस्टांनी आणि तो तमिळनाडूत. कम्युनिस्ट पक्ष भारतात 1925 ला आला आणि 1929 पासून पी.राममूर्ती आणि पी. जीवनानंदम यांनी आंदोलन केले. फॉरवर्ड ब्लॉकचे नेते यू.मथुरालिंगम थेवरही त्यात होते. मातंगासह एकूणच गुन्हेगार जातींच्या मुक्ततेसाठी पहिली लढाई कम्युनिस्टांनी केली, हे मान्य करणे इतरांना अवघड जात असलं, तरी ते वास्तव आहे. या साऱ्यांची या कायद्यातून 1952 मध्ये मुक्तता झाली. या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्यांची लोकसंख्या होती 22 लाख 68 हजार (विमुक्तायण-लक्ष्मण माने). कायदा संपला, पण त्यानं निर्माण केलेली गडद छाया संपण्यास अजून किती कालावधी लागणार आहे, हे ठाऊक नाही.

अण्णा भाऊंचा जन्म 1920 चा. त्या अगोदर दहाच वर्षे गुन्हेगार कायद्यात बदल होऊन तो 1911 मध्ये अधिक कडक करण्यात आला होता. याचा एक अर्थ असाही होतो की, अण्णा भाऊंचे पणजोबा (1818-1872) राघोबा साठे यांच्या हयातीत हा कायदा आला. अण्णा भाऊंचे आजोबा सिंधोजी साठे (1841 ते 1899) यांच्या काळात तो अधिक कडक झाला. भाऊ साठे (1872 ते 1939) म्हणजे तुकाराम ऊर्फ अण्णांच्या वडिलांच्या काळात तो चालूच राहिला आणि अण्णा भाऊ (1920 ते 1969) यांच्या निधनाच्या फक्त 17 वर्षं अगोदर तो संपला. (अण्णा भाऊंची वंशावळ- डॉ.विमलकुमार देशमुख) याचा आणखी एक अर्थ असा होतो की, जन्मजात गुन्हेगार असा जो शिक्का इंग्रजांनी अन्य काही जातींसह मातंग समाजाच्या कपाळावर कोरला, तो अण्णा भाऊंच्या तीन पिढ्यांपर्यंत राहिला. अण्णा भाऊंचे प्रारंभिक आयुष्यही याच शिक्क्याच्या सावलीत गेलं असणार. एक अखंड वाहणारी, भळभळणारी वेदनायुक्त जखम अनेक जातींच्या वाट्याला आली. शिक्का मारला जात असताना माणसाचं भविष्य त्याच्या कपाळावर कोरणारी आणि मातंगाकडून पुजली जाणारी सटवाई कुठं होती अन्‌ काय करत होती, कुणाला ठाऊक! करवीरच्या राजर्षी शाहूमहाराजांनी एक ऑगस्ट 1918 ला हजेरी बंद केली होती. माणगावमधील बहिष्कृत वर्गाच्या परिषदेअगोदर दोन वर्षे हजेरी बंद करणे किती महत्त्वाचे होते आणि त्याचे चांगले परिणाम काय झाले, हेही महाराजांनी परिषदेत केलेल्या भाषणात सांगितले होते. इतरत्र मात्र वीस लाखांहून अधिक लोक जन्मजात गुन्हेगार या कायद्याच्या प्रभावाखाली होते. स्वअस्तित्व, ओळख, प्रतिष्ठा, माणूस म्हणून असणारी मान्यता, आत्मसन्मान.. सारं-सारं काही यांनी गमावलं होतं. जे कायद्याच्या बाहेर पण अस्पृश्य जातीत होते, त्यांच्याही या साऱ्या गोष्टी जातव्यवस्थेनं आणि तिचा जन्मदाता मनूनं हिसकावून घेतल्या होत्या. म्हणजे हा सगळा नंगा केलेला, नाही रे बनलेला, बहिष्कृत, अस्पृश्य, दलित वगैरे बनवला गेलेला समाज प्रथमच मोठ्या प्रमाणात अण्णा भाऊंच्या साहित्यात नायक बनला. त्यांचं साहित्य भरून तो पावला.

अण्णा भाऊंच्या साहित्याकडं, चळवळीतील त्यांच्या कर्तृत्वाकडे आणि त्यांच्या अन्य चळवळीकडे जाण्यापूर्वी हे सारं सांगण्याचं कारण आपल्याला दि.के. बेडेकर यांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्येतही सापडतं. कोणतीही कलाकृती (अर्थात अस्सल) कलावंताच्या (सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या आणि माणूसकेंद्री असणाऱ्या) व्यक्तिमत्त्वातून (जे जीवनानुभवातून घडते) निघाली (जन्माला आली) असल्यामुळे कलावंतांच्या सभोवारच्या सामाजिक वास्तवाच्या व त्याच्या वर्गीय भूमिकेच्या गुण-दोषांपासून ती अलिप्त नसते (कंसातील शब्द माझे). अर्थात ही मार्क्सवादी व्याख्या आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. बेडेकरांनी अण्णा भाऊंच्या साहित्याचं विश्लेषण करतानाही ही व्याख्या वापरली असती, तर ती तंतोतंत खरी ठरली असती.

तर, अण्णा भाऊंचा जन्म झाला तो अशा एका जातीत आणि अशा एका परिस्थितीत. अण्णा भाऊ वाटेगाव सोडून मुंबईकडं जगण्यासाठी निघाले होते. ते  वयाच्या कोणत्या वर्षी मुंबईला निघाले आणि किती दिवसांत पोहोचले, याविषयी अनेकांनी दंतकथा रचण्याचा प्रयत्न चालवला असला तरी अण्णा भाऊंनीच त्याचं उत्तर ‘माझा रशियाचा प्रवास’ या लेखात देऊन ठेवलं आहे. त्यांच्या मते, ते वयाच्या 11 व्या वर्षी म्हणजे 1931 ला निघाले. कुटुंबासोबत ते निघाले. वाटेगाव ते मुंबई हा त्यांचा प्रवासही अनेकांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून भरलेला आहे. 227 मैलांचा प्रवास करण्यास आणि मुंबई गाठण्यास मला दोन महिने लागले होते, असे अण्णा भाऊंनीच लिहून ठेवलं आहे. अण्णा भाऊ दीड-दोन दिवसच शाळेत गेले आणि परत त्यांनी शाळेचं तोंडच पाहिलं नाही, हे खरं मानलं तरी, त्याबाबतचे ठोस पुरावे आणि कागदपत्रे कोणी उपलब्ध करून देत नाही. कदाचित पुढे ती उपलब्ध होतील, अशी आशा बाळगायला जागा आहे. पण दरम्यानच्या काळात तयार होणाऱ्या मिथकांपासून थोडे सावधच राहायला हवं. अण्णा भाऊ म्हणतात की- मी दोन दिवस शाळेत गेलो; तर काही जण म्हणतात की, ते दुसरीपर्यंत शिकले (म्हणजे दोन वर्षे शिकले). आणखी काही जण म्हणतात की, ते सातवीपर्यंत (व्हर्नाक्युलर) शिकले. संशोधकांत आणि चाहत्यांमध्ये अजून तरी ताळमेळ नाही. असाच वाद अण्णा भाऊंच्या साहित्यविषयक प्रेरणांविषयीही आहे. साहित्याच्या गाभातत्त्वाविषयीही आहे. काही जण त्यांना मानवतावादी साहित्यिक म्हणतात; काही जण बहुजनवादी, काही जण ग्रामीण, काही जण कामगार, काही जण तिसऱ्या जगाचे. तर काही जण (डॉ.बाबूराव अंभोरे) दलित साहित्याचं नायकत्व अण्णा भाऊंकडे जातं, असं म्हणतात. पण पॉइंट  मिळवण्यासाठी होणाऱ्या यांच्या-यांच्याच चर्चा हाच आधार मानला जातो.

अण्णा भाऊंचे साहित्य मार्क्सवादी की आंबेडकरवादी, असा खडा सवाल तयार झाल्यास ‘मार्क्सवादी’ असंच उत्तर द्यायला हवं. ते मान्य होईल की नाही, याचा विचार करू नये. कारण कोणी तरी मान्य करावं यासाठी हे उत्तर नाहीये, तर ते वास्तव आहे. पण या वास्तवापासून दूर जाण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. गम्मत म्हणजे, अण्णा भाऊ स्वतःच्या साहित्याच्या प्रेरणा काय सांगतात, साहित्याचे प्रयोजन काय सांगतात, वरील मार्क्सवादाचा परिणाम कोणत्या शब्दांत सांगतात- हेही अण्णा भाऊंना या ना त्या तंबूत ओढणारे पाहत नाहीत. अण्णा भाऊ आज असते तर हे सारं पाहून हसले असते आणि ‘काही करा पण मला माणसाबाहेर काढू नका, मार्क्सवादाबाहेर काढू नका’ असं त्यांनी म्हटलं असतं. बरं झालं मी सारं काही लिहिलं, ‘पण पेपर वाचला नाही’ असंही सांगितलं असतं. तर अण्णा भाऊ साहित्याविषयी, त्यांच्या भूमिकेविषयी, त्यांनी स्वीकारलेल्या वादाविषयी (इझमविषयी) काय म्हणतात- हे सर्वप्रथम पाहू.

1) मी आणि माझा पिंड (व्यक्तिमत्त्व) कामगार-वर्गानं घडवला आहे. सांचा (यंत्रमागातला) सोडून मी आता साहित्याकडे वळलो आहे. म्हणजे मी माझ्या वर्गाशी (साम्यवादी वर्ग) जे जुळेल ते लिहिणार, हे आता क्रमप्राप्त आहे. आता लिहिणं हा माझा धर्म आहे आणि तेच माझं कर्म झालं आहे. (‘युगांतर’मधील अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, पान 33).

2) मी माझ्या जनतेचा उपमर्द होऊ नये याची काळजी घेऊन लिहितो. जनतेच्या संघर्षावर माझा विश्वास आहे. ती जनता अमर आणि तिचा ध्वज अजय आहे. (उपरोक्त ग्रंथ, पान 34).

3) अनुभूतीनं लिहितेवेळी ज्याच्याविषयी लिहितो त्याच्याविषयी दृढ सहानुभूती हवी, नाही तर तुमचं साहित्य विसंगतीच्या डोहात बुडेल. (उपरोक्त, पान 34).

4) प्रचलित वास्तवतेचा (आणि पूर्व वास्तवतेचाही) डोळे झाकून वापर करता येणार नाही. कामगारवर्गीय लेखकाला तर तसं मुळीच करता येणार नाही. (उपरोक्त, पान 34).

5) माझे साहित्यिक मित्र विचारतात की, कसं लिहावं? कसं पुढं जावं? मी म्हणतो, त्या लेकरांच्या अंतरंगात जा आणि त्याच्या आत्म्याला विचारा, त्यांच्याशी तद्रूप (तादाम्य) होऊन लिहा. (उपरोक्त, 35).

6) जे सगुण आणि साकार आहे. तेच मी लिहितो. (उपरोक्त, 35).

7) अज्ञान, अत्याचार नि दारिद्र्य यांच्याद्वारे अंधकारातही श्रमजीवी जनता जगण्यासाठी शिकस्तीने प्रयत्न करत आहे, हे मी जवळून पाहतो. निरीक्षण करतो आणि मग लिहितो. (उपरोक्त, 36)

8) जनता अमर आहे. तिचा विजय अंतिम आहे. हे सारे विश्व तिच्या हातावर तरले आहे याची स्पष्ट कल्पना मला माझ्या कम्युनिस्ट पक्षानं दिली आहे. ती माझ्या जनतेला लागणारी सामग्री पुरवते. (उपरोक्त, 38)

9) जर ध्येयवादी कल्पकतेची काठी वास्तवतेच्या हातात नसेल, तर ही आंधळी वास्तवता लेखकाला खेड्याकडे (वेगळीकडे) नेल्याशिवाय राहणार आहे. (उपरोक्त, 38).

10) काही साहित्यिक माझ्यावर प्रचारकी असा आरोप करतात. त्यांच्या मते, कला प्रचारकी नसावी, ती वर्गातील आणि राजकारणातील सर्वोदयवादी असावी. परंतु जेव्हा कलेसाठी कला या मताचा बोजवारा उडाला, तेव्हा त्या मताच्या रक्षणकर्त्यांनी आपल्या जुन्याच मालाला वरील लेबले लावली आहेत. कलेत प्रचार नसतो आणि प्रचारकी कला कलापूर्ण नसते, हे त्यांचे म्हणणे मला पटत नाही. आजपर्यंतच्या सर्व वाङ्‌मयाने कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा प्रचारच केला आहे आणि ही गोष्ट ते दडवत आहेत. देवल, खाडिलकर, वरेरकर आणि आचार्य अत्रे यांच्या प्रभितेनं प्रचारच केला आहे. (उपरोक्त, 39)

11) सामान्य वाचक हाच लेखकाची कसोटी ठरवतो, कारण तो क्रियाशील समाजात राहतो. लेखक जे चित्र चित्रित करतो ते त्याच्या परिचयाचे नसेल, तर तो तसे स्पष्ट सांगून टाकतो. (उपरोक्त, 40).

12) मी आजपर्यंत आपल्या (माझ्या) ज्या व्यक्ती राबवल्या, त्यापैकी जवळजवळ सर्व हयात आहेत. त्यांना मी फार भितो, कारण ती जिवंत माणसं आहेत. जेव्हा मी आपल्या (माझ्या) गावी जातो, तेव्हा ‘कोंबडीचोर’चा नायक भेटतो. नातलगाप्रमाणे तो माझी विचारपूस करतो. ‘माझ्या आईचा गाडा’ या कथेचा नायक आज महाराष्ट्राचा आत्मा झाला आहे. (उपरोक्त, 39).

13) प्रतिभेला जशी वास्तवाची गरज भासते, तसेच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते. अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागत नाही. (उपरोक्त, 40).

14) जे पाहिलं, अनुभवलं आणि ऐकलं तेच मी लिहिलं आहे. त्यातून हा ‘फकिरा’ निर्माण झाला आहे. डोंगरात नि त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकिराचं कर्तृत्व एकत्र करून मी इमला उभारला, एवढेच. (उपरोक्त, 41).

15) फकिरा माझा होता. (काही संशोधक खुशाल म्हणतात की, तो अण्णा भाऊंचा मामा होता. असो) त्याच्या कर्तृत्वाचा पसारा आवरून मी कादंबरी लिहिली. (उपरोक्त, 41).

‘हवं ते लिहितो’, ‘मी कथा कशा लिहितो’ आणि ‘अण्णा भाऊंची कैफियत’ या तीन छोटेखानी लेखांतून अण्णा भाऊंनी स्वतःच स्वतःच्या लेखनाच्या प्रेरणा, साहित्याचे प्रयोजन, परिणाम सांगितला आहे. भोवतालचं वास्तव, त्यातील घुसमट, त्यातील विचारव्यवहार, वर्तन-व्यवहार हेच अण्णा भाऊंच्या साहित्याचं गाभातत्त्व बनलं आहे. या सर्व भोवतालाला बदलायचं आहे, तेही मार्क्स आणि तेही कम्युनिस्ट पक्ष घेऊन- हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

अण्णा भाऊंच्या पूर्वी असलेला किंवा उगवतीचा एकूण भोवताल अतिशय तप्त होता. त्याला कारणंही होती. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा अनेक कारणांनी भोवताल ढवळून निघत होता. 1920-30 च्या दरम्यान स्वातंत्र्यलढ्याची चळवळ खूपच तापली. अण्णा भाऊंच्या अगोदर दहा वर्षे (1910 मध्ये) जन्मास आलेले क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढे चालू होते. कायदेभंग चळवळ 1930 ला सुरू झाली. त्या वेळी अण्णा भाऊ दहा वर्षांचे होते. ते बावीस वर्षांचे झाल्यावर लिहू लागले, तेव्हा सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार (पत्री सरकार) कॉ.नाना पाटलांनी स्थापन केले. नाना पाटील जणू काही सातारा जिल्ह्याच घेऊन कम्युनिस्ट झाले होते. 1500 गावांत हे सरकार होते. नाना पाटील भूमिगत होते. या काळातच आगे-मागे क्रांतिकारकांची एक फौजच तयार झाली. महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार आणि शाहूमहाराज यांचे क्रांतिकारी कायदे यांचाही या चळवळीवर परिणाम होता. हुतात्मा किसन आहेर, नागनाथ नायकवडी, रामचंद्र सकाराम पवार, तुफान सेनेचे जी.डी.बापू लाड, लाड गुरुजी, नाथाजी लाड, हौसाबाई लाड, निवृत्ती कुंभार, विजयाताई लाड, खाशाबा पवार, आत्माराम पवार, विष्णू बाळा (त्या वेळचा एक फकिरा मानला जाणारा) असे अनेक नेते-कार्यकर्ते पेटून उठले होते. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच समाजबदलाचा विचार जो मार्क्स, फुले, शाहू यांच्याकडून आला होता, तोही अनेकांनी स्वीकारला होता. मार्क्स घेऊनच शेतकरी कामगार पक्ष जन्माला आला होता.

1920 ते 1930 या काळात म्हणजे 1925 नंतर अण्णा भाऊंच्या राजकीय पर्यावरणातील अनेक जण लाल बावटेवाले झाले होते. सत्यशोधकही झाले होते. कलाक्षेत्रालाही असाच बहर आला होता. विशेषतः तमाशे, जलसे यांनीही हा काळ भारावलेला होता. सत्यशोधक जलसे, शाहू जलसे यांच्या विरोधात 1920 पूर्वी पुण्यात टिळक जलसेही सुरू होते. रामा कुंभार वर्धनगडकर, भाऊ बापू मांग, नंतर आलेले काळू-बाळू कवलापूरकर (सध्या सांगली जिल्ह्यात), पवळाबाई, यल्लाप्पा कदम, गुलाब बोरगावकर, जयवंत साळसेकर, अमर शेख अशी एक मोठी साखळी तयार झाली होती. ग्रामीण भागातील माणसाला (ज्या माणसाचा अण्णा भाऊ सातत्याने उल्लेख करतात) जागं करणं म्हणजे त्याचा स्वाभिमान व आत्मसन्मान जागा करून त्याला चळवळीत आणणं हे सूत्र वापरलं जात होतं. नाना पाटलांना आयुष्यही खूप लाभले. त्यांच्या सर्व क्रांतिकारी चळवळी अण्णा भाऊ पाहत होते. नाना पाटील यांचे निधन अण्णा भाऊंनंतर सात वर्षांनी म्हणजे 1976 ला झालं आहे. आपल्या समकालीन आणि पूर्वी जन्माला आलेल्या कलावंताशी या ना त्या कारणाने अण्णा भाऊंचाही संबंध आलेला होता. धगधगत्या पर्यावरणातून आलेले धगधगते लोक, धगधगते विचार यांनी अण्णा भाऊंचे साहित्य भरून गेलं. ‘मला केवळ कल्पना करून लिहिण्याची गरज कधीच भासली नाही’ असे अण्णा भाऊ वारंवार म्हणतात ते याच कारणामुळे. परिस्थिती केवळ माणसालाच नव्हे तर त्याच्या कल्पनांनाही घडवत असते, संघर्षतत्त्व देत असते- असे पुन्हा एकदा आपल्याला म्हणता येईल.

अण्णा भाऊंनी स्वतःतील मार्क्स, कम्युनिस्ट, साम्यवाद स्वतःच अनेक वेळा लिहून-बोलून मोठ्या आनंदानं आणि आत्मविश्वासानं व्यक्त केला आहे. त्यांचे कम्युनिस्ट होणे हा काही अपघात नसावा. त्यांच्या पर्यावरणातल्या साम्यवादानंच त्यांना कम्युनिस्ट पक्षाकडे नेलेलं असावं. अण्णा भाऊ मुंबईत गेले तेव्हा मुंबई लाल बावट्यांनी भरली होती. जगण्यासाठी आलेले सर्व श्रमिक लाल बावटा घेऊनच जगत होते. कामगार नेता म्हणून डॉ. बाबासाहेबांचा उदय होईपर्यंत हे असेच चित्र राहिले. नंतरही ते असेच दिसत होते. एखादा श्रमिक कम्युनिस्ट झाला, यात आश्चर्य कसले? या पक्षाशी व त्यांच्या नेत्यांशी कसे घनिष्ठ आणि एका अर्थाने जैविक संबंध तयार झाले होते, हे ‘धुरंदर डांगे’ या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यावरील लेखात अण्णा भाऊ म्हणतात की, मी माझ्या आयुष्यात प्रथमतः ज्या दिवशी कॉम्रेड डांगे यांचे नाव ऐकलं, त्या दिवशी कामगारवर्गासाठी सर्वस्व पणाला लावून कसं लढावं याचा साक्षात्कार घडला आणि त्यानंतर किती तरी वर्षांनी मी प्रत्यक्षात कॉम्रेड डांगे यांना पाहिलं. परंतु त्याही वेळेला मी विस्मयचकित झालो. कामगारवर्गाची रणनीती, जनतेचा झुंजार अग्रणी, त्यामागचे धडधडते कुंड, पोलादी निर्धार या साऱ्यांचं दर्शन होऊन माझ्या जीवनाला भर्रकन एक वेगळं वळण लागलं. त्यांच्या एका भाषणात मी ऐकलं. ते म्हणाले होते : तुम्ही जनतेशी एकनिष्ठ राहा, तिच्या भावना समजून घ्या आणि मग लिहा. तिला (जनतेला) विद्रूप करू नका. जो कलावंत जनतेकडं पाठ फिरवतो, त्याच्याकडं कला पाठ फिरवते.

कॉम्रेड डांगे यांचे हे भाषण 1942 मधलं आहे आणि अण्णा भाऊ तेव्हा बावीस वर्षांचे असावेत. त्यांच्या लेखनप्रवासाला थोड्याफार प्रमाणात प्रारंभ झाला होता. ‘जनतेला विद्रूप करू नका’ हे कॉम्रेड डांगे यांचे वाक्य माझ्या मनात खोलवर रुजलं. जनता सर्वशक्तिमान आहे. ती आपले कलावंत निर्माण करेल, असे सांगतच कॉम्रेड डांगे यांनी स्टालिनग्राडच्या लढ्याचा उल्लेख केला. तो एका कामगाराला (म्हणजे अण्णा भाऊंना) स्फूर्ती देऊ शकला. सतराव्या शतकात लुप्त झालेला पोवाडा आता पुन्हा अवतरला आहे.

अण्णा भाऊंनी हा स्टालिनग्राडवरचा पोवाडा लिहिला होता, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण अण्णा भाऊ त्यापुढे जे म्हणतात, ते आणखी महत्त्वाचं आहे. कॉम्रेड डांगे यांच्या भाषणामुळे महाराष्ट्रातील जनतानिष्ठ शाहिरांचं भरघोस पीक आलं. नवे शाहीर निर्माण झाले. त्यांनी महाराष्ट्राला नवी शाहिरी ऐकवली. कॉम्रेड डांगे यांची भविष्यवाणी खरी ठरली. आता या सर्व गोष्टींचा अर्थ कसा समजावून घ्यायचा? साहित्यलेखनावर कशाकशाचा परिणाम होतो, हे नीट समजून घ्यायचं की नाही? जीवनाच्या सर्वच वाटा-वळणांवर अण्णा भाऊ स्वतःतील साम्यवाद, कम्युनिस्ट जागा करतात. तो अभिमानानं मांडतात. हे सर्व  अमान्य करून की काय, काही जण अण्णा भाऊंचे जहाज बदलण्याचा प्रयत्न करतात.

आता आणखी एक प्रश्न आहे, पण तो अभ्यासकांनीच उपस्थित करायला हवा. भारतीय समाज वर्षानुवर्षे जातीत अडकला आहे. तो जगतो जातीत आणि लिहितोही जातीत. भारतीय साहित्य लिहिणाऱ्या बहुसंख्य लेखकांच्या साहित्यात त्यांच्या-त्यांच्या जातीचेच नायक-नायिका येतात. अर्थात याला काही सन्माननीय अपवाद आहेत. ते नामवंत आहेत. पण सामान्यपणे घडतं ते असं. काही वेळेला उच्चवर्णीय लेखक आपल्या साहित्यात अस्पृश्यांचं अस्तित्व दाखवतात, नाही असं नाही. पण ते कशा स्वरूपाचं असतं? कोणी तरी एक मजूर, बलुतेदार, सहानुभूतीचा हकदार किंवा खलनायक- अशा स्वरूपाचं ते असतं. आपल्या जातीबाहेरचा नायक भारतीय साहित्यात खूप कमी येतो, हेही एक वास्तव आहे. यालाही अपवाद वगळता बहुतेक सर्व जाती-लेखकांचं असंच घडत आलं आहे. अण्णा भाऊंच्या काळात आगे-मागे असे मोजकेच लेखक होते की, त्यांच्या साहित्यातले नायक त्यांच्या जातीपलीकडचे होते. तेही पिळवणुकीचे धनी होते. जातीनं तयार केलेल्या विषमतेचेही धनी होते.

या साहित्यिकांमध्ये आपल्याला बाबूराव बागुल, शंकरराव खरात, नारायण सुर्वे पुढे नामदेव ढसाळ आणि अण्णा भाऊ यांची नावे घेता येतात. जाती तोडून हे पुढं का गेले, आणि आपले नायक त्यांनी अन्य जातींतूनही का उभे केले? याचा अर्थ असा नव्हे की, या लेखकाच्या साहित्यात स्वजातीय नायक आलाच नाही. तो आला, पण कमी प्रमाणात. अण्णा भाऊंनी स्वतःच उल्लेख केल्यानं तो माटे गुरुजींच्या लेखनात आला, पण त्यामागचं कारण वेगळं होतं. विचारसंघर्ष याऐवजी ते सहानुभूतीत होते. तर या चौघांबरोबरच अन्य काही नावं घेता येणे शक्य आहे, पण ती मर्यादित आहेत. हे असं का घडतं याचं उत्तर म्हणजे, साम्यवादी विचारधारेचीच माणसेच असे करू शकतात. ती जातीऐवजी वर्गाचा आणि त्यातील दुःखाचा अधिक विचार करतात. दुःख आपल्या जातीत जसं आहे तसं ते मोठ्या वर्गातही आहे, असे ते मानतात. बाबूराव बागूल बरीच वर्षे मार्क्सवादी होते, हे लपवण्यात काही अर्थ नाही. सुर्वे शेवटपर्यंत मार्क्सवादी होते हे त्यांनी आणि इतरांनीही लपवलेलं नाही. नामदेव ढसाळांवरही साम्यवादाचा- समाजवादाचा परिणाम होता, हे त्यांनीही लपवलेले नाही आणि अण्णा भाऊंनी तर नाहीच नाही. जो कामगार असतो तो विश्वव्यापी असतो, असं बाबूराव बागुल यांनीही म्हटलं आहे.

कॉम्रेड डांगे यांनी तर ‘शाहीर’ या अण्णा भाऊंच्या पुस्तकासाठीच्या प्रस्तावनेत बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. खरं तर या गोष्टी अण्णा भाऊंनीही स्पष्ट केल्या होत्या, हे आलंच आहे. तर कॉम्रेड डांगे म्हणतात : आमच्या लेखकांची कृती प्रचारकी आहे व तिच्यात वर्गीय दृष्टिकोन आहे. हे खरे आहे, आणि हा जर आरोप असेल, तर आम्ही ‘गुन्हेगार’ आहोत. पण कुणाच्या दृष्टीने गुन्हेगार? कोणाचा गुन्हा आम्ही करतो? आमच्या काव्यावर व साहित्यावर एका बाजूने पोलिसी हल्ले होऊ लागले, तर दुसऱ्या बाजूने केवळ कलात्मक चर्चेचा आविर्भाव करून टीकाकार सूक्ष्म व मानसिक हल्ले करू लागले. त्यांच्याकडूनच वरील आरोप येतात.

कॉम्रेड डांगे पुढे म्हणतात की, आमच्या कलावंतांची वर्गीय दृष्टी वर्गीय असते व असली पाहिजे.

ते आणखी म्हणतात, अण्णा भाऊंच्या काव्यामध्ये कामगार-शेतकरी वर्गाची दृष्टी असते. त्यांचे लढे, त्यांची सुख-दुःखे आहेत. मुंबईचा गिरणी कामगार, तेलंगणाचा शेतकरी वगैरे पोवाड्यांमध्ये ही वर्गदृष्टी तर अगदी उघड आणि स्पष्ट आहे. आमच्या कविता आपल्या वर्गाचा, मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा, हिंदुस्थानचाही अभिमान आहे. अण्णा भाऊंच्या काव्यात हे स्पष्ट दिसते.

अण्णा भाऊंचे एक अभ्यासक आणि चाहते डॉ.एस.एस. भोसले मात्र अण्णा भाऊंमधील साम्यवाद आणि त्यांचे साहित्य या दोन वेगळ्या गोष्टी ठरवतात. प्रातिनिधिक कथा या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, अण्णा भाऊंच्या मनात साम्यवादाची जाज्वल्य निष्ठा होती. पण त्याचा अर्थ लेखनात धूळ, लाल टापा, लाल माती असे सारे लालेलाल नव्हते. उरात सदैव समाजवादाची आच होती. पण  त्यात सारखे साम्यवादी बाळबोध धडेच भरविले गेले, असे नाही. कलात्म आणि प्रचारात्मक असे अण्णा भाऊंनी लेखनाचे दोन प्रांत केले. शक्यतो सीमारेषा जपल्या. एस.एस. भोसले येथे दोन्ही दरडींवर दोन्ही हातांत दोन लेखण्या घेऊन उभे असलेले दिसतात. साम्यवादाविषयी ते प्रेमही व्यक्त करतात आणि त्याला बाळबोध धडेही म्हणतात. वि.स. खांडेकर यांनी ‘फकिरा’विषयी लिहिताना अण्णा भाऊंना भूतकाळाला चिकटून न राहण्याचा सल्ला दिलेला आहे. आता भूतकाळ सोडून दिल्यावर मार्क्सवादात काय शिल्लक राहिलं, हे मात्र ते सांगत नाहीत.

‘हे जग, ही पृथ्वी शेषाच्या  मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरली आहे’, असे 1958 मध्ये दलित साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी अण्णा भाऊंनी सांगितले आहे. अनेक वर्षे ही पृथ्वी देवाच्या मालकीची होती. खरं तर हाही एक बनावच होता. पृथ्वी कोणा सापाच्या मस्तकावर असत नाही, तर ती कष्ट करणाऱ्यांच्या हातावर असते. हे हातच तेथे विकास घडवत असतात. मार्क्सवादाचे हेही एक मूलतत्त्व आहे. आता प्रश्न आहे तो हे अण्णा भाऊंचे विवेचन कोणत्या वादात बसवायचं? इथेही त्यांनी कोण काय लिहितं आणि लिहावं, याविषयी विवेचन केले आहे. ‘जो कलावंत जनतेबरोबर नसतो, त्यांची बंद खोलीतील कला मांडीवरच्या खुणा मोजते. मांडीवरच्या खुणा मोजणारी दलितांची कला नसते. डमडम गोळीच्या खुणा मोजते, ती आमची कला. कला वर्गातीत-प्रचारातीत असावी, असा त्यांचा दावा असतो आणि अशा या कलावंतांचा आज बोलबालाही कमी नाही. परंतु जो जनतेला जाणत नाही, तो तिला विद्रूप करतो याचे नमुने मराठी साहित्यात मुबलक मिळतात. शब्दाला नुसता आकार देणे सोपे असते, पण आकाराला आत्मा देणे अवघड असते- असे सांगत अण्णा भाऊंनी गॉर्कीच्या एका विचारावर आपले भाषण पूर्ण केले होते. माणसाला सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करून ‘तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस’ असा साक्षात्कार त्याला करून देणे, हे साहित्याचं खरे वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङ्‌मय सदैव क्रांतिकारक असते.

आता पुन्हा तो प्रश्न निर्माण होतो की, हे वाक्य कोणत्या वादात (इझममध्ये) बसवायचं?

एक विषय मधेच राहिला, तो म्हणजे साहित्यातील नायकाचा. साम्यवादी माणूस सर्वप्रथम डी-कास्ट म्हणजे जातिहीन होतो. जाती फेकून देतो. देव-धर्माच्या कल्पनाही फेकून देतो. त्याच्यासमोर राहतो तो माणूस! अण्णा भाऊंच्या स्वतंत्र लेखनात, भाषणात आणि साहित्यात हा शब्द एक लाखापेक्षा अधिक वेळा आला आहे. जाती-धर्माच्या गराड्याखाली अडकलेला माणूस मुक्त करून अण्णा भाऊ त्याला वर्गात नेऊ पाहतात. त्यांच्यातला माणूसच पाहतात. मातंगापेक्षा अधिक वाईट जिणे असलेल्या अनेक जातींतल्या माणसांना ते मोकळे करून त्यांना माणूसपदाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आपल्या लेखनाचा पट (कॅनव्हास) खूप म्हणजे खूप मोठा करतात. जगातल्या माणसाच्या चळवळींना तर तिथे जागा देतातच; पण चेहरा गमावलेल्या किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे ब्रोकन मॅनला म्हणजे तुकड्या-तुकड्यांत उद्‌ध्वस्त झालेल्या अनेक जातींनाही या पटावर नायकाचे, नायिकेचे, लढाऊ, कर्तबगार, प्रश्नकर्त्याचे स्थान देतात. ‘अण्णा भाऊंच्या साहित्यात किती जाती झळकल्या?’ या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे सांगता येईल. तर, या जाती अशा : मांग, महार, चांभार, रामोशी, भिल्ल, कोळी, माळी, साळी, गुरव, मराठा, माकडवाला, डवरी, डोंबारी, कैकाडी, मुसलमान, नाभिक, गोंधळी, सुतार, लोहार, बेलदार, ब्राह्मण, ख्रिश्चन, कुंभार, तेली, गारुडी, नंदीवाले, गोसावी, कंजारी, जंगम, फासेपारधी, वडार, कोल्हाटी, खावटी, हटकर, धनगर, चित्रकर्ता, बेलदार, वेश्या, फकीर इत्यादी. यात मराठा, ब्राह्मण अशा काही उच्च जातीही आहेत. अण्णा भाऊंच्या साहित्यात या जाती वर्ग-प्रतिनिधी बनतात, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

जग बदलण्याचा आणि जगातला माणूस गुलाममुक्त करण्याचा हा ध्यास आभाळाएवढा आहे. स्वाभाविकच लढायाही आभाळाएवढ्या आहेत. हे सारं बदलायचं आणि त्यासाठीचं एक साधन म्हणजे साहित्य, कला आणि बुलंद आत्मविश्वास. पूजापाठ करून जग बदलणार नाहीये, म्हणून तर त्यांना भीमटोला मारायचा आहे. आता कचकड्याचा खेळ करून चालणार नाही, तर जग बदलणारं तत्त्वज्ञान जगून आणि ते आपल्या साहित्यातही मांडून हल्लाबोल करायचा आहे. म्हणून तर ते म्हणतात, ‘जग बदल घालुनि घाव । सांगूनि गेले मला भीमराव।’ हे घाव घालण्याचं तंत्र म्हणजे त्यांचं साहित्य. (घाव शब्दाचं मूल्य चारित्र्य काय आहे, हे संशोधकांनी अवश्य तपासावे. तसं न करता अण्णा भाऊंची मैना म्हणजे त्यांची वाटेगावात राहणारी पत्नी- असं सांगू नये.) ते माणसाशी, त्याच्या मुक्तीशी व साम्यवादाशी इनाम राखते आणि म.फुले, शाहू व आंबेडकर यांच्याशी आदर ठेवते. साम्यवाद्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या सावलीत राहू नये, असं कुठं मार्क्सनं सांगितलेलं नाही. सबब- अण्णा भाऊंची ओढाओढ आता थांबली पाहिजे.

(दैनिक सकाळ या दैनिकात तब्बल पस्तीस वर्षे कार्यरत राहून प्रशिक्षित पत्रकार ते मुख्य संपादक असा प्रवास उत्तम कांबळे यांनी केला आहे आणि विपुल म्हणावे असे ललित व वैचारिक लेखन केले आहे. ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

उत्तम कांबळे
uttamkamble56@gmail.com

संपादक, पत्रकार आणि साहित्यिक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात