डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

6 जानेवारी 2011 पासून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मद्विशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचणाऱ्या बाळशास्त्रींच्या कार्याचे स्मरण औचित्यपूर्ण ठरेल. हा लेख. श्री.गंधर्ववेद प्रकाशनामार्फत पुढील महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या महाराष्ट्र चरित्रग्रंथमाला संच प्रकल्पातील बाळशास्त्रींवरील चरित्रग्रंथातील दुसऱ्या व तिसऱ्या प्रकरणांमधून संपादित करून घेतला आहे. - संपादक

मुंबई इलाख्यात इंग्रजी सत्ता स्थापन झाल्यावर अनेक लोकोत्तर माणसे स्वकर्तृत्वावर मोठी झाली. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये मोठी भर घातली त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर अग्रणी होते. त्यांना ‘पश्चिम भारतातील नवयुगप्रवर्तक आणि आधुनिक महाराष्ट्राचे जनक’ असे संबोधले जाते. बंगालमध्ये समाजप्रबोधनाची सुरुवात करण्याचा मान राजा राममोहन रॉय यांना दिला जातो, तोच मान महाराष्ट्राच्या बाबतीत बाळशास्त्रींना द्यावा लागेल. 1812 ते 1846 या अल्पकाळातील बाळशास्त्रींचे अनेक क्षेत्रांमधील कार्य थक्क करणारे होते.

हा मुलगा एकपाठी होता आणि त्याची ग्रहणशक्ती अपार होती. त्याला त्याची अध्यापक मंडळी कौतुकाने ‘बाळबृहस्पती’ म्हणून संबोधत. मराठी लेखन, वाचन, व्यावहारिक गणित, तोंडी हिशेब, रामदास, तुकाराम, वामन, मोरोपंत इत्यादी प्रसिद्ध कवींच्या निवडक कविता, रामायण, महाभारत आणि इतिहासामधील महापुरुषांच्या चरित्रकथा, मराठ्यांच्या इतिहासातील काही बखरी इत्यादी अभ्यासात ते आठव्या वर्षीच पारंगत झाले होते. वेदपठण, संस्कृत स्तोत्रे आणि भगवद्‌गीता यांच्या पाठांतराबरोबरच अमरकोश, लघुकौमुदी, पंचमहाकाव्ये इत्यादी संस्कृत अध्ययन त्यांनी बाराव्या वर्षापर्यंत पूर्ण केले. अभ्यासाबरोबरच नियमित व्यायाम व सूर्यनमस्कार यामुळे त्यांची शरीरसंपदा चांगली होती.

बाळशास्त्री यांचे वडील गंगाधरशास्त्री त्या काळचे एक नावाजलेले पुराणिक होते. त्यांची धर्मनिष्ठा, उदारपणा आणि संस्कृत पांडित्य यामुळे लोक त्यांचा खूप आदर करत असत. सावंतवाडीमध्ये त्यांचे अनेक भाऊबंद होते. उतारवयात त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने पोंभुर्ले- राजापूर येथे असे. ‘भारत-भागवत’ इत्यादी ग्रंथांचे पुराण सांगण्यासाठी त्यांची परिसरात कीर्ती होती. बाळशास्त्रींची आई सगुणाबाई यासुद्धा अतिशय दयाळू, धर्मनिष्ठ, आणि पतिपरायण निसर्गाविषयी प्रेम असणाऱ्या होत्या.

बाळशास्त्री वयाच्या बाराव्या वर्षानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. ते कोकणातच राहिले असते, तर तेथीलच एक प्रकांड संस्कृत पंडित व विद्वान पुराणिक एवढ्या प्रसिद्धीपुरतेच मर्यादित राहिले असते. बाळशास्त्रींचे मुंबईला प्रयाण होण्याअगोदरचा काळ म्हणजे 1818 चा काळ हा पेशवाईच्या अस्ताचा होता. मुंबईचा हा काळही परिवर्तनाचा होता. मुंबई इलाख्याची सर्व प्रशासकीय सूत्रे पहिला ब्रिटिश गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्याकडे आली होती. अतिशय दूरदर्शी, ब्रिटिश साम्राज्यवादाबरोबरच स्थानिक प्रजेचे हित जपणारा इत्यादी विविध गुणांचे मिश्रण अशीच त्याची ओळख होती. पेशवाईचा अस्त झाल्यामुळे राजधानी म्हणून पुण्याचे महत्त्व संपुष्टात आले होते आणि मुंबईचे महत्त्व वाढू लागले होते. परिणामी पुण्यातील अनेक विद्वान व महत्त्वाकांक्षी तरुण मुंबईकडे स्थलांतर करू लागले होते. ब्रिटिश राजवटीशी संबंध ठेवायचे असतील तर इंग्रजीतून शिक्षण घेतले पाहिजे, याची जाणीव स्थानिक तरुणांना होऊ लागली होती आणि इंग्रजांनाही दुय्यम दर्जाच्या; पण इंग्रजी जाणणाऱ्या नोकरवर्गाची गरज होती.

बाळशास्त्री यांच्या स्मरणशक्तीविषयी एक मनोरंजक गोष्ट सांगितली जाते. ‘‘बाळशास्त्री ज्या वेळी मुंबईला आले त्या वेळी ते 13 वर्षांचे होते. मुंबईत आल्यानंतर ते एका रस्त्याच्या कोपऱ्यात उभे असताना त्यांच्या निदर्शनास आले की, दोन ब्रिटिश सैनिक मारामारी करत एकमेकांना जोरजोराने ठोसे लगावत होते. त्यांची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद केली होती आणि  बाळशास्त्री हे त्या घटनेचे साक्षीदार होते. त्या वेळी ते इंग्रजी शब्दउच्चाराविषयी अनभिज्ञ होते, परंतु त्यांची स्मरणशक्ती इतकी तीव्र होती की, जे अवघड शब्द त्या दोन सैनिकांनी भांडणावेळी वापरले होते ते शब्द त्यांनी कोर्टासमोर जसेच्या तसे सांगितले होते आणि त्या केसचा निकाल लागण्यासाठी ही साक्ष अतिशय उपयुक्त ठरली होती.

इंग्रजी भाषेचा अभ्यास करत असतानाच त्यांनी स्वप्रयत्नाने गणित विषयाची तयारी उत्तम प्रकारे केली. त्यामुळे विद्यार्थिदशेत असतानाच गणिताचे अध्यापक म्हणूनही दरमहा रुपये 15 मानधनावर ते काम करू लागले. अवघ्या चार वर्षांतच त्यांचे या इंग्रजी शाळेतील शिक्षण संपले; परंतु एवढ्या अल्पावधीतच त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास आत्मसात केला होता. बाळची ही हुषारी पाहून बापू छत्रे यांना वाटले की, आता आपण निवृत्त होऊन त्या जागी बाळची नेमणूक करण्यास सांगावे. बाळलाही आत्मविश्वास आला होता. अशा प्रकारे नेटिव्ह सेक्रेटरीच्या पदासाठी 15 वर्षांच्या तरुण बाळशास्त्रीने सोसायटीचे सेक्रेटरी कॅप्टन जर्व्हिस यांच्या नावे 20 फेब्रुवारी 1830 रोजी सुरेख इंग्रजीमध्ये पत्र लिहिले. त्यामध्ये त्याने स्वत:ची तयारी कोणत्या विषयात किती झाली, हे स्पष्ट सांगितले. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांचे त्यांचे अध्ययन तर चांगले झाले होतेच, त्याचबरोबर गुजराती, बंगाली व फार्सी या भाषांचेही काही प्रमाणात ज्ञान प्राप्त झाले होते. मराठी व इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा व उच्च गणित हे विषय शाळेत शिकवले जात नसतानाही अंकगणित, बीजगणित, भूमिती, महत्त्वमापन, लॉगरिथम्स इत्यादी विषयांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवले होते. या अर्जात आपली ही सारी गुणवत्ता त्यांनी लिहिली होती आणि आत्मविश्वासाने नमूद केले होते की, मला मुलाखतीस बोलवाल तर ही सारी गुणवत्ता सिद्ध करण्यास मी तयार आहे.

वरील अर्जाचा लागलीच विचार होऊन सोसायटीचे नवीन सेक्रेटरी रॉबर्ट कॉटन मनी (मुंबई सरकारचे पर्शियन सेक्रेटरी) यांनी बाळशास्त्री अल्पवयीन असल्याने, त्यांची मार्च 1830 पासून प्रथम ‘डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी’ म्हणून दरमहा 50 रुपयांवर नेमणूक केली. परंतु त्यांची हुषारी व कर्तृत्व लक्षात येताच दोन वर्षांनी मार्च 1832 पासून एकदम 100 रुपये मासिक वेतनावर बापू छत्रे यांच्या जागी ‘नेटिव्ह सेक्रेटरी’ म्हणून नेमणूक करण्यात आली. त्या काळी हे वेतन खूपच होते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या त्या काळातील कारभारी (कार्यकारी) मंडळामध्ये मुंबईतील उच्च युरोपीय अधिकारी, विद्वान पारशी, हिंदू, मुसलमान इत्यादी सद्‌गृहस्थांचा समावेश होता. ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे अवघ्या विशीच्याही पूर्वी बाळशास्त्री यांना किती प्रतिष्ठा प्राप्त झाली होती, हे लक्षात येते.

युवराजाचे शिक्षक

1832 मध्ये बाळशास्त्री यांच्या जीवनात एक महत्त्वाची घटना घडली. अक्कलकोटचे राजे-भोसले हे सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे मांडलिक होते. राजे भोसले यांचे अल्पवयीन राजपुत्र शहाजी भोसले यांना चांगले शिक्षण देण्याकरता छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपल्या रेसिडेंटार्फत मुंबई सरकारकडे एका हुषार शिक्षकाची मागणी केली होती. मुंबई सरकारने त्या जागी दरमहा 120 रुपये वेतनावर बाळशास्त्रींची नेमणूक केली. त्यानुसार आपल्या मूळ पदावर परत येण्याचा हक्क राखून बाळशास्त्री 13 डिसेंबर 1832 रोजी साताऱ्यास श्रीमंत प्रतापसिंहांच्या पुढे रुजू झाले. त्या वेळी दरबारचे रेसिडेंट कर्नल लॉडविक यांनी बाळशास्त्री यांना श्रीमंतांच्या समक्ष जी स्वकर्तव्याची जाणीव करून दिली, तिची नोंद महाराजांच्या खास रोजनिशीमध्ये पुढीलप्रमाणे केलेली आढळते

‘‘रसिदटानी सरकार समक्ष त्यास सांगितले की तुम्ही अक्कलकोटी शहाजीस फक्त विद्याभ्यास सिकवावा, बाकी राजकारणात पडू नये व तेथील लोक वाईट आहेत त्याचे ऐकून इकडील तिकडे व तिकडील इकडे आसे काही करू नये व शहाजीस कोणी काही गैर सिकविले आसता ते त्याचे मनात येऊ नये येविसी तजवीज शाहाजीस सिकवून त्याचे चित्त फीसांदी लोकांकडे लागू नये आसे करावे इत्यादी.’’

यानंतर बाळशास्त्री महाराजांच्या स्वारीबरोबरच दिनांक 8 जानेवारी 1833 च्या सुमारास अक्कलकोटला पोहोचले. या वेळी त्यांचे वय 20 वर्षांचे होते. त्यानंतरच्या 20 महिन्यांच्या तेथील वास्तव्यात युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांनी उत्तम काम केले. कारण ते जसे अतिशय बुद्धिमान होते तसे आपल्या सौजन्यपूर्ण व विनयी स्वभावामुळे सर्वांना प्रिय झाले होते, असा उल्लेख अक्कलकोटचे पोलिटिकल एजंट कॅप्टन जेम्सन यांनी ऑक्टोबर 1833 मध्ये मुंबईत बदलून आल्यानंतर बाळशास्त्री यांच्याशी जो पत्रव्यवहार केला आहे, त्यामध्ये आढळून येते.

असिस्टंट प्रोफेसर

1827 मध्ये गव्हर्नर लॉर्ड माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन सेवानिवृत्त होऊन, विलायतेस गेले. त्या वेळी त्यांच्या स्मरणार्थ मुंबई शिक्षा मंडळीने अडीच लाख रुपये गोळा करून सार्वजनिक स्मारक म्हणून ‘एल्फिन्स्टन स्कूल’ सुरू केले होते. (1835) एल्फिन्स्टन कॉलेजची मुंबईमध्ये स्थापना झाल्यानंतर अधिव्याख्यात्यांची सोय टाऊन हॉलच्या इमारतीमध्ये केली होती. 1835च्या मध्यावर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी प्रो.ए.बी.ऑर्लेबर (एम.ए.) यांची गणित व विज्ञान शाखेचे मुख्य अध्यापक म्हणून, तर जॉन हॉर्कनेस (एम.ए.) यांची इंग्रजी वाङ्‌मय आणि तत्त्वज्ञान या विषयासाठी प्रोफेसर म्हणून, विलायतेतून नियुक्ती केली होती. नेटिव्ह सोसायटीचे अतिशय बुद्धिमान सेक्रेटरी म्हणून अगोदरच स्वत:ला सिद्ध केलेल्या, बाळशास्त्री यांची 1834 मध्ये साहजिकच पहिले साहाय्यक प्रोफेसर या पदावर मासिक 150 रुपये पगारावर नियुक्ती झाली. नवीन पदावर हजर होण्यासाठी लवकरच ते अक्कलकोटहून मुंबईला रवाना झाले.

भारतामधील त्या काळातील गणित आणि भविष्यशास्त्राचे नामवंत प्रोफेसर ऑर्लेबर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे भाग्य त्यांना लाभले. 1841 पर्यंत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदावर काम करणारे बाळशास्त्री हे पहिलेच व एकमेव भारतीय होते.  कला आणि विज्ञान शाखेधील विद्यार्थ्यांना शिकवण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या प्रोफेसरपदाच्या कार्यकाळात त्यांना मुंबई प्रांताचे सुपरिंटेंडंट म्हणून मराठी शाळांची तपासणी करण्याचे कामही देण्यात आले होते. त्यामुळे 1841 ते 1845 या काळात दक्षिण मराठी राज्ये आणि कोकण प्रांतातील मराठी शाळा त्यांच्या आधिपत्याखाली होत्या. एप्रिल 1842 पासून प्रोफेसर ऑर्लेबर यांच्या अनुपस्थितीत बाळशास्त्री यांनी गणिताचे पूर्ण वेळ प्रोफेसर म्हणून काम केले. प्रोफेसर बाळशास्त्री यांचे गणितातील प्रभुत्व आणि कौशल्य त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांइतकेच उच्च दर्जाचे होते. 1844 च्या शिक्षा मंडळाच्या अहवालामध्ये बाळशास्त्री यांच्या एकूणच अध्यापनाबद्दल गौरवोद्‌गार काढण्यात आले आहेत-

‘‘आमच्या सोसायटीचा भोगीलाल प्राणवल्लभदास हा सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी फलज्योतिष शास्त्राची अतिशय अनिश्चितता असलेली परीक्षा उत्तीर्ण झाला. हायमरच्या म्हणण्याप्रमाणे ही फक्त दुसरी घटना होती की आपले विद्यार्थी गणितशास्त्रामध्ये फार पुढे आहेत. आणखी दोन विद्यार्थी आहेत ते म्हणजे आत्माराम पांडुरंग आणि दादाभाई नवरोजी जे ‘इंटिग्रल कॅलक्युलस’ आणि ‘ॲनालिटिकल जॉमेट्री’ या विषयांची परीक्षा समाधानकारकरीत्या उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांनी बाळशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यास केला होता. ‘डिफ्रन्शियल कॅलक्युलस’ या विषयाच्या वर्गामध्ये सात विद्यार्थी होते आणि त्यांची प्रगतीसुद्धा चांगली होती. ट्रिग्नॉमेट्री (त्रिकोणमिती) या विषयाचे नऊ विद्यार्थी होते. त्या सर्वांना भूमितीय सूत्रांचा उपयोग करता येत होता. प्रोफेसर ऑर्लेबर म्हणतात की, यापूर्वी असा कधीही प्रसंग आला नाही किंवा असे घडले नाही की मी भारतात नसताना (भारत सोडल्यानंतर) इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण होतील आणि आम्हाला आशा आहे की, आता गणितीय शास्त्राचा पाया भक्कम होत आहे. प्रोफेसर ऑर्लेबर पुढे म्हणाले की, मी इंग्लंडध्ये असताना माझ्या अनुपस्थितीत बाळशास्त्री यांनी ज्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांची प्रगती केली त्याबद्दल, मी पूर्ण समाधानी आहे.’’ उत्कृष्ट आणि व्यासंगी शिक्षक म्हणून बाळशास्त्री यांना मिळालेली ही शाबासकीच होती.

बहुभाषी, विख्यात आचार्य

सखोल पांडित्य आणि यशस्वी, अध्यापकत्व यांचे साहचर्य क्वचितच एखाद्यामध्ये आढळते. परंतु बाळशास्त्री यांच्या ठिकाणी हे सर्व गुण होते. अष्टपैलू विद्वत्ता व अध्यापनपटुत्व यांचा सुरेख मेळ त्यांनी साधला होता. संस्कृत, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, बंगाली, गुजराथी, हिंदुस्थानी, कन्नड, तेलगू आणि पारशी इत्यादी विविध भाषांचे ज्ञान तसेच गणित, ज्योतिष, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र आणि न्यायशास्त्र या विषयांचीही बाळशास्त्री यांना चांगली माहिती होती. तसेच ते उत्तम भाषातज्ज्ञही होते.

बाळशास्त्री साहित्य आणि विज्ञान या विषयांध्ये पारंगत असल्यामुळे, मुंबई प्रांतातील विद्वान मंडळींशी त्यांचा संपर्क आला. मुंबईमध्ये ‘बॉम्बे जिऑग्राफिकल सोसायटी’ची स्थापना झाली. ती लंडनमधील रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीची शाखा होती. 1840 मध्ये बाळशास्त्री यांची त्या सोसायटीचे सदस्य म्हणून नेमणूक झाली. सोसायटीच्या कायम 12 सदस्यांपैकी ते एक होते. 1842 ते 1846 या काळात त्यांची प्रत्येक वर्षी सोसायटीचे अधिकारी म्हणून निवड झाली होती. 1845 मध्ये स्थापन झालेल्या ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’चे ते एक संस्थापक सदस्य होते. त्यांनी नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली आणि ते स्वत: संस्थेचे अध्यक्ष झाले. 1834 मध्ये मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या स्थापनेच्या कार्यात या सोसायटीचे सदस्य नसतानाही त्यांनी खूप मदत केली. त्या वेळी एक चमत्कारिक गोष्ट अशी होती की, भारतीय विद्वानांना या सोसायटीचे सदस्य होता येत नव्हते. 1841 मध्ये सोसायटीचे नियतकालिक प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आणि त्यामध्ये उल्लेखनीय गोष्ट अशी की, या नियतकालिकाच्या एकूण अकरा अंकांपैकी त्यांच्या आयुष्याच्या कालावधीतील आठ अंकांमध्ये त्यांनी संशोधनपर लेख प्रसिद्ध केले आहेत. बाळशास्त्री यांनी या जर्नलमधून भारतीय कोरीव लेखांविषयी मौलिक लेखन केले आणि बोधवाक्यावरील संशोधन पेपरचे वाचनही केले. काही वेळा बाळशास्त्री यांच्या शोधनिबंधांचे वाचन सोसायटीच्या सभेमध्ये इतर सदस्यांनी केले. त्या काळात अखिल भारतात अशा प्रकारचे लेख लिहून प्रसिद्ध करणारे ते एकटे एतद्देशीय पंडित होते. परिणामी खऱ्या अर्थाने बाळशास्त्री यांना ‘भारतीय ऐतिहासिक संशोधनाचे’ जनक संबोधणे उचित होईल. त्यांच्या मृत्यूमुळे या संशोधनशाखेची अतिशय हानी झाल्याचा निर्देश पत्रिकेचे तत्कालीन संपादक ऑर्लेबर यांनी केला आहे.

बाळशास्त्री यांनी स्वत:ची प्रतिमा त्या काळातील प्रमुख भारतीय विद्वान आणि समाजसुधारक अशी निर्माण केली. त्यामुळे साहजिकच स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन सरकार बाळशास्त्री यांच्याकडे अधिकारवाणीने पाहू लागले. 28 सप्टेंबर 1840 मध्ये त्यांची ‘जस्टीस ऑफ द पीस’ या पदावर नेमणूक करून, त्यांचा उचित गौरव करण्यात आला. त्या काळात हा मान मिळवणारे ते एकमेव होते. कारण हा मान गव्हर्नर इन कौन्सिल हे बहाल करत असत. आणि समाजातील फक्त श्रीमंत व ठराविक वर्गातील लोकांचाच त्यामध्ये समावेश असे. अशा प्रकारे नेमण्यात आलेल्या जे.पी. ना सुप्रीम कोर्टाच्या ग्रँड ज्युरींमध्ये बसण्याचा अधिकार प्राप्त होत असे. बाळशास्त्री हे एकटे मध्यम वर्गांतील अग्रगण्य विद्वान अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी या बहुानास पात्र गणले गेले होते. साहजिकच दादोबा पांडुरंग यासंबंधी पुढील सार्थ उद्‌गार आत्मचरित्रात काढतात, ‘‘आता बाळशास्त्री यांची मुंबईत बडे लोकांत व मानकरी लोकांत गणना झाली... आणि त्यांचा मुंबईत सरकारदरबारी व इतर ठिकाणी फार मोठा मान होता. आताप्रमाणे म्हणजे सन 1870 पासून जो उठला तो आणि ज्याची थोडी सरकारशी वट बसली तो, असे भाराभर जस्टिस ऑफ दि पीस होत नव्हते.’’ 

अशा प्रकारे नेमण्यात आलेल्या ‘जस्टिस ऑफ दि पीस’ला सुप्रीम(हाय) कोर्टाच्या कामकाजामध्ये नियुक्त केलेल्या ‘ग्रॅण्ड ज्युरीं’मध्ये बसण्याचा अधिकार प्राप्त होत असे, आणि त्या नात्यानेही बाळशास्त्री यांनी जे प्रशंसनीय कार्य केले त्याचा अत्यंत हार्दिक व गौरवास्पद निर्देश त्या कोर्टाचे न्यायमूर्ती सर अर्स्किन पेरी यांनी त्यांच्या निधनानंतर भर कोर्टात केलेला आढळतो.

त्यांच्या अध्यापकीविषयी आद्य चरित्रकार बा.ना.देव म्हणतात, ‘‘विद्यालयात गणित विषयाचे अध्यापकत्व होते म्हणून तोच विषय शास्त्रीबावांस उत्तम रीतीने शिकविता येत होता असे नाही. कोणताही विषय शिकविण्याचा प्रसंग आला तरी त्यांनी मागे म्हणून कधी घेतले नाही. उलट प्रत्येक विषय सुगम करून विद्यार्थ्यांच्या मनात उतरवून देण्याची अपूर्व हातोटी पाहून त्यांची जिकडे-तिकडे वाहवा झाली.’’

बाळशास्त्री यांची विद्वत्ता आणि व्यासंगी अध्यापन यांची छाप सर्व विद्यार्थ्यांवर पडत असे. त्यांचे शिष्य आणि नंतर भारताचे ग्रँडफादर म्हणून ज्यांची ख्याती होती त्या डॉ. दादाभाई नवरोजी यांनी वेसावा (मुंबई) येथून दिनांक 22 मे 1909 रोजी लिहिलेल्या एका पत्रामध्ये सुमारे 70 वर्षांनंतर आपल्या थोर गुरुजींसंबंधीची स्मृती अविस्मरणीय शब्दांमध्ये व्यक्त केली आहे. ‘‘आपले गुरू म्हणूनच काय तो मी त्यांस ओळखतो आणि खरोखरच ते अतिशय बुद्धिमान, चतुर, सालस व सुज्ञ गुरू होते. आपल्या शिष्यांवर त्यांचे प्रेम असून त्यांच्याविषयी त्यांना कळकळ होती. आम्हांला त्यांच्या अष्टपैलू विद्वत्तेइतकाच त्यांच्या एकंदर चारित्र्याविषयी थोर आदर व कौतुक वाटे. व्यक्तिश: माझ्यावर त्यांचा अधिक लोभ असे.

सार्वजनिक स्मारक

आधुनिक महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शिल्पकार असलेल्या बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्याची स्मृती कायमस्वरूपात व्हावी, असे महाराष्ट्रातील अनेकांना वाटत होते. बाळशास्त्रींच्या मृत्यूनंतर लगेचच म्हणजे 16 जुलै 1846 रोजी बाळ गंगाधरशास्त्री यांचा इष्टमित्र या नावाने ‘मुंबईचा चाबूक’ या वृत्तपत्रात बाळशास्त्री यांच्या चिरकालीन स्मारकासंबंधी सर्वप्रथम मागणी करण्यात आली... पत्रलेखक लिहितो, ‘‘एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशनच्या शाळागृहांतील दिवाणखान्यामध्ये ज्याप्रमाणे, माल्कम व एल्फिन्स्टन यांचा पुतळा आहे, त्याप्रमाणे बाळ गंगाधरशास्त्री यांचा एक पुतळा मागवून घेऊन उभा करावा, की ज्यामुळे दोन्ही शाळांना शोभा येईल. वाटल्यास बाळशास्त्रींच्या नावाने शिष्यवृत्त्या ठेवाव्यात, त्यांच्या नावे ह्या टापूतील प्रसिद्ध जागी एक स्मारक मंदिर बांधावे, त्यांच्या नावे एक पुस्तकालय उभारावे; पण वाटेल त्या रीतीने बाळ गंगाधरशास्त्री यांची कीर्ती व त्यांचे भगीरथ उद्योग यांची स्मृती मुंबई प्रांतात चिरकाल राहील, अशी काही तरी व्यवस्था करण्याची अत्यंत जरुरी आहे.’’

विशेषत: बाळशास्त्री जांभेकरांचे चरित्रकार, लोकशिक्षणकार ग. ग. जांभेकर यांनी मुंबई विद्यापीठाकडे स्मारकासंबंधी ठोस मागणी केली. त्यानुसार विद्यापीठाच्या सिंडिकेटमध्ये 3 नोव्हेंबर 1962 रोजी ठराव होऊन ‘‘आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’’ या नावाने गणित अध्यासन स्थापन करण्यात आले. 

महाराष्ट्रामधील पत्रकारांमार्फत बाळशास्त्री यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे 1985 मध्ये पहिल्यांदाच पत्रकारदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याणनिधी’ या संस्थेमार्फत 6 जानेवारी 1993 पासून पोंभुर्ल्यातच प्रत्येक वर्षी पत्रकार दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यास प्रारंभ झाला. या संघटनेार्फत पोंभुर्ले येथे बाळशास्त्री यांचा अर्धपुतळा, ग्रंथालय व छोटेसे सभागृह उभारण्यात आले आहे. हे महाराष्ट्रातील पहिलेच स्मारक आहे. या स्मारकाचे अनावरण 6 जानेवारी 1994 रोजी करण्यात आले. या ठिकाणी 17 मे रोजी जांभेकर पुण्यतिथीही साजरी करण्यात येते. पत्रकार कल्याण निधीमार्फत बाळशास्त्री यांचे कायम सार्वजनिक स्मारक कार्यरत राहावे, यासाठी उपरिनिर्दिष्ट कार्याशिवाय महाराष्ट्रातील गरजू आणि आपदग्रस्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करणे, वृद्धावस्थेतील निराधार पत्रकारांना विशेष आर्थिक साहाय्य देणे, मराठी पत्रकारितेध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय महसूल विभागामध्ये 6 आणि राज्याबाहेरील मराठी पत्रकारास 1 असे 7 दर्पण पुरस्कार देणे, महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ,  वयोवृद्ध अशा एका संपादकास दर वर्षी बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार देणे, मराठी पत्रकारांसाठी दर वर्षी राज्यस्तरीय खुली निबंधस्पर्धा आयोजित करून, त्यातील विजेत्यांना बाळशास्त्री जांभेकर निबंध पुरस्कार, मराठी पत्रकारितेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्याच्या विविध भागांध्ये चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, मराठी पत्रकारितेचा अभ्यास व संशोधन, संवर्धन यासाठी शिष्यवृत्ती इत्यादी विविध उपक्रम राबवले जातात. मात्र महाराष्ट्र शासनस्तरावर बाळशास्त्री यांच्या स्मारकासाठी अद्यापपर्यंत काहीही करण्यात आलेले नाही.

बाळशास्त्री यांची पत्रकारिता

बाळशास्त्री जांभेकरांनी पश्चिम भारतात ‘बॉम्बे दर्पण’ हे सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारे वृत्तपत्र सुरू केले. ‘बॉम्बे दर्पण’ हे मराठी माणसांच्या भाव-भावनांना तसेच दैनंदिन जीवनातील घडामोडी, ज्ञान, विज्ञान, शिक्षण त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक विकासास अडथळा आणणाऱ्या घटकांवर कडाडून टीका करणारे पहिले मुखपत्र ठरले.

बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 पासून 26 जून 1840 पर्यंत म्हणजे जवळपास साडेआठ वर्षे साप्ताहिक ‘दर्पण’चे संपादन केले. देशभक्तीने भारावलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता नि:स्वार्थीपणे दर्पणच्या माध्यमातून समाजसेवा केली. वृत्तपत्र माध्यम हे माणसाच्या मनातील चुका, अज्ञानाचा अंधकार घालवून ज्ञानाचा आणि आशेचा किरण समाजजीवनात टाकू शकते, यावर त्यांचा ठाम विेशास होता. म्हणूनच त्यांना वाटले की, हे साप्ताहिक क्रियाशील आणि जिज्ञासू व्यक्तींना संशोधनास प्रवृत्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल. शिक्षणाने जागृत झालेल्या लोकांच्या जीवनात बौद्धिक, नैतिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणू शकेल.

जानेवारी 1832 मध्ये जांभेकरांनी ‘द बॉम्बे दर्पण’ या नावाचे पश्चिम भारतात पहिले अँग्लो-मराठी नियतकालिक सुरू केले. ही आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. पाश्चिमात्य ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी, देशाची प्रगती व्हावी यासाठी एखादा खुला विचारमंच असावा या उद्देशाने जांभेकरांनी ‘दर्पण’चा एक साधन म्हणून उपयोग केला.

दर्पणचा पहिला अंक शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 1832 मध्ये प्रकाशित झाला. दर्पणच्या पहिल्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रस्ताव 12 नोव्हेंबर 1831 मध्ये त्यांनी स्वत: लिहिला होता. यावरून ‘दर्पण’ सुरू करण्यामागील त्याची भूमिका स्पष्ट होते. सदर मूळ प्रस्ताव खालीलप्रमाणे होता.

प्रस्ताव

‘‘स्वदेशीय लोकांध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा, आणि या देशाची समृद्धी व एथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करायास स्थल व्हावे, या इच्छेने कित्येक मुंबईत राहणारे लोकांचे मनात आहे की दर्पण या नावाचे एक न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र छापून प्रसिद्ध करावे. त्याचा पहिला नंबर तारीख 6 शुक्रवार माहे जान्युआरी सन 1832 ते दिवशी छापला जाईल. या देशचे लोकांत विलायती विद्यांचा अभ्यास वाढावा आणि तेथील ज्ञान प्रसिद्ध व्हावे अशे नात्याने या वर्तमानपत्राचा उद्योग मुख्यत्वे आरंभिला आहे खरा; परंतु जांस इंग्रेजी भाषा येत्ये त्यांस मात्र याचा उपयोग असे न व्हावे म्हणोन योजिले आहे की, एकबाजूस इंग्रेजी आणि एकबाजूस मराठी असावे; म्हणजे जे मराठी मात्र जाणतात त्या सर्वांसही त्याचा उपयोग होईल. इंग्रेजीत कोणी काही विषय लिहून पाठवला तर त्याचे मराठीत भाषांतर केले जाईल, आणि मराठी भाषेत पाठविलेले विषयांचे इंग्रेजी केले जाईल, व मूळ विषय आणि भाषांतर ही समोरासमोर छापली जातील.

दर्पणांत जाहीर खबरा आणि विलायतचे व बंगालचे पत्रांचे काही अंश लिहिले जातील. तसेच या देशांतील, विलायतेंतील व दुसरे देशांतील मोठोठी वर्तानेंही लिहिली जातील. कोणी साहेब लोकांनी व यादेशचे लोकांनी हिंदुस्थानातील लोक, धर्म आणि विद्या यासंबंधी काही लिहून पाठविलें असतां तेही दर्पणांत छापले जाईल. तसेच विलायतेतील विद्या, कला-कौशल्ये याविषयीचे व त्यातील ज्या भागांचा उपयोग या देशात झाल्यास फार हित आहे त्यांविषयीचे लहान लहान ग्रंथ लिहिले जातील. अशे गोष्टींपासून पुरुषांस शोध करायास आणि विद्येत परिश्रम करणारांस विचार करायास विषय मिळतील; परंतु जे शुद्ध मनोरंजन मात्र इच्छितात, त्यांचीही हृदये दर्पणामध्ये लहान लहान चमत्कारिक ज्या गोष्टी असतील त्यापासून संतुष्ट होतील. मनोरंजन करणे, चालते काळची वर्तमाने कळवणे आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखवणे, या गोष्टींची दर्पण छापणारांस मोठी उत्कंठा आहे; म्हणोन या गोष्टी साध्य होण्याविषयी जितका प्रयत्न करवेल तितका ते करितील. कोणा एकाचा पक्षपात किंवा नीचपणा या दोषांचा मळ दर्पणास लागणार नाही; कारण की दर्पण छापणारांचे लक्ष्य निष्कृत्रिम आहे, म्हणोन हे वर्तमानपत्र ज्या रीतीने भले आणि गुणी पुरुषांस मान्य होईल, त्या रीतीनें करण्यास ते दृढ निश्चयाने उद्योग करितील.’’

सुरुवातीचा काही काळ ‘दर्पण’ हे एक पाक्षिक म्हणून प्रकाशित होत असे. परंतु वाचकांची मागणी आणि विनंतीवरून ते साप्ताहिक करण्यात आले. कारण पंधरा दिवसांच्या काळामध्ये काही विषयांची, लेखांची उपयुक्तता कमी होत असे. याच कारणामुळे ‘दर्पण’ हे 4 मे 1832 पासून साप्ताहिक म्हणून प्रकाशित होऊ लागले. या संदर्भामध्ये बाळशास्त्री 27 एप्रिलच्या अंकामध्ये अग्रलेखात लिहितात, ‘‘दर्पणच्या प्रकाशनामध्ये होणाऱ्या बदलांविषयी आमचा हेतू नम्रपणे जाहीर करतो. आमची खात्री आहे की, हा बदल आमच्या वाचकांचे समाधान करेल व त्यासाठी त्यांचे सहकार्य सातत्याने मिळेल अशी अपेक्षा करतो. दर्पण पंधरा दिवसातून एकदा प्रकाशित होत असल्यामुळे वाचकांची गैरसोय होत होती. ती टाळण्यासाठी वरील बदल केला आहे.’’

कोणत्याही विलंबाशिवाय संपादकीय आणि इतर लिखाण प्रकाशित झाले पाहिजे याची जाणीव बाळशास्त्रींना असल्याचे त्यांच्या लेखावरून दिसून येते. संपादकांनासुद्धा दर्पण आठवड्यातून प्रकाशित होण्याची गरज आहे, असे वाटत होते आणि वाचकसुद्धा तशी मागणी करत. बाळशास्त्री यांनीदेखील वाचकांना वचन दिले होते की, ते दर्पणच्या अंकांची किंमत वाढवणार नाहीत. दर्पणच्या अंकातील मजकूर इंग्रजी आणि मराठी अशा दोन रकान्यात विभागून प्रकाशित होत असे. वृत्तपत्राचा आकार 19*11.5 होता. दर्पणचे पहिले तीन अंक मेसेंजर प्रेसमधून प्रकाशित झाले. परंतु 17 फेब्रुवारी 1832 पासून ते ‘कुरिअर’ प्रेसमधूनच छापून प्रकाशित होत होते. ही व्यवस्था पाच वर्षांपर्यंत सुरू होती. नंतर बाळशास्त्री यांनी स्वत:चा प्रेस काढला आणि तिथून दर्पण प्रकाशित होऊ लागले. दर्पणच्या प्रकाशनामुळे स्थानिक लोकांमध्ये सुधारणा होईल, या हेतूने तत्कालीन मुंबई सरकारने या नियतकालिकाच्या प्रकाशनास 50 रुपये करामध्ये सवलत दिली होती. दर्पणची तिमाही वर्गणी 6 रुपये होती.

‘नियतकालिक लेखांपासून जे स्वार्थ होतात त्याविषयी’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखामध्ये बाळशास्त्रींनी म्हटले आहे की, ‘‘जो उद्योग आम्ही योजला आहे त्याचा प्रारंभ करते वेळेस नियतकालिक लेखांपासून जे स्वार्थ होतात त्याविषयीच्या काही गोष्टी या स्थळी लिहिणे हे अयोग्य नव्हे. या नियतकालिक लेखांची पद्धती आणि उपयोग हे वर्तमानपत्र वाचणाऱ्या एतद्देशीय लोकांमधून बहुतांचे समजण्यात बहुधा आले नसतील आणि मुंबई बाहेरचे मुलुखांत तर ही गोष्ट विचारांत आलीच नसेल. हिंदुस्थानचे विद्यांत या लेखांस दृष्टांत देण्याजोगे सांप्रत काही नाही, आणि सांप्रतचे राजांचा अमल व्हायचे पूर्वी या देशांत या जातीचे लेख होते, असे कोठे प्राचीन बखरांतही आढळत नाही. ज्या देशांतून आपले सांप्रतचे शककर्ते इथे आले, त्या देशांत ते इथे आल्याचे पूर्वी फार दिवसांपासून या आश्चर्यकारक छापयंत्राची कृत्ये चालू होती. त्यापासून मनुष्यांचे मनातील अज्ञानरूप अंधकार जाऊन त्यावर ज्ञानरूप प्रकाश पडला. या सज्ञानदशेस येण्याचे साधनांमध्ये इतर सर्व देशांपेक्षा युरोप देश वरचढ आहे.

नियतकालिक लेखांपासून जे स्वार्थ होतात, ते आम्हांस सांप्रतचे राजांचे द्वारे माहीत झाले. ज्या ज्या देशांमध्ये अशा लेखांचा प्रचार झाला आहे, तेथील लोकांचे आंतरव्यवहारांमध्ये तसेच बाह्य व्यवहारांमध्ये शाश्वत हित झाले आहे. यापासून बहुत वेळ विद्यांची वृद्धि झाली आहे. लोकांध्ये नीती रूपास आली आहे. केव्हा केव्हा प्रजेने राजाचे आज्ञेत वर्तावे आणि राजानेही त्यांवर जुलू करू नये अशा गोष्टी यापासून घडल्या आहेत. अलीकडे कित्येक देशांमध्ये धर्मरीती आणि राज्यरीती यांत जे चांगले आणि उपयोगी फेरफार झाले आहेत त्यांसही थोडे बहुत हे लेख उपयोगी पडले आहेत.

‘‘यद्यपि या लेखांची फळे संसारातील सामान्य व्यवहारात उपयोगी नव्हती आणि लाभ नसतानाही केवळ सुरूपतेस येण्याचे साधनाचा विचार करणारे जे विद्वान त्यास मात्र संतोषकारक होत, म्हणोन अशा फळांपासूनच या लेखांचा थोरपणा वर्णावा असे नाही, तथापि लोकांस लाभ देणाऱ्या गोष्टीही यापासून घडतात ते असे. त्यांपासून अतिशय दूरचे देशांतील वर्ताने कळतात. बुद्धिमानाची बुद्धिमत्ता त्यांचे द्वारे सर्व लोकांत प्रसिद्ध होते. उपयोगी बातमी समजण्यात येते. आणि श्रमसाध्य विद्यादिकांचे विचारांकडे जे चित्त देत नाहीत त्यांचे मनोरंजनही होते. अशा लेखांचा प्रचार ज्या देशांत निर्विघ्नपणे होऊन, लोकांच्या मनात त्यातील गोष्टी ठसतात ते देश धन्य होत! अशा चांगले कामाविषयी लोकांस स्वतंत्रता पृथ्वीचे इतर भागांपेक्षा युरोपखंडांत फार आहे आणि तेथे असे आहे म्हणूनच सज्ञानता, सर्व लोकांमध्ये विद्यांची प्रवृत्ती आणि अनेक विद्यांचा शोध, या गोष्टी तेथे झाल्या.

‘‘या विस्तृत देशामध्ये इंग्रजांचे राज्य आल्यापासून लोकांची नीती आणि ज्ञान वाढण्याविषयी प्रयत्न होत गेले आणि या सुज्ञ राजांचे लोकोपयोगी उद्योग इतक्या थोड्या काळांत असे सफल होतील असे वाटत नव्हते. बंगालप्रांत इंग्रजांचे हाती येऊन साठ-सत्तर वर्षे झाली; परंतु इतक्यांतच त्या देशाचे स्थितीत जे अंतर पडले ते पाहिले असता विस्मय होतो. जो देश सुमारे शंभर वर्षांपूर्वी बलात्कार, जुलूम आणि कुनीती यांचे केवळ घर होता, तो आता  निर्भयपण आणि स्वतंत्रता भोगतो, आणि तेथील लोकांस युरोपखंडांतील विद्या आणि कलांचे विशेष ज्ञान होत आहे, हे पाहून चांगला राजा आज्ञेत वागणाऱ्या प्रजांचे कल्याण करायास इच्छितो तर त्याचे हातून काय काय घडेल यास योग्य दृष्टांत सापडतो.’’

बाळशास्त्री दर्पणमध्ये विविध विषयांवर लिहिण्याबरोबरच नीतिमत्ता, हिंदू धर्माविषयीचे तत्त्वज्ञान, स्त्री-पुरुष समानता, नागरी सेवांचे भारतीयीकरण यांसारख्या विषयांवरील माहितीही लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी झगडत असत. ते भौतिकशास्त्र आणि निसर्गासंबंधी विषयांवरदेखील लिहीत असत. बाळशास्त्री यांनी मुस्लिम राज्यकारभार आणि ब्रिटिश राज्यकारभार यांच्यामधील फरकसुद्धा दाखवून दिला. मुस्लिम राज्यकर्ते हे भारतीयांना त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचे म्हणजे हलके काम करणाऱ्या गड्याच्या योग्यतेची जागा देत असत. कायदा हा शासक आणि जनता या दोहोंसाठी फायदेशीर असला पाहिजे. बाळशास्त्री या लेखाच्या शेवटी म्हणतात की, बुद्धिमान माणसे देशाच्या प्रशासनात नेहमीच आपले योगदान देत असतात आणि तेच लोकांकडे सोपवतात. सरकारच्या ‘शेतकरी वर्गाला प्रोत्साहन आणि साहाय्य’ या कार्यक्रमाचे बाळशास्त्री यांनी जोरदार स्वागत केले होते.

त्यांनी भारतातील पारंपरिक शेतीच्या मर्यादा लक्षात आणून दिल्या होत्या. स्थानिक शेतकरी, शेती ‘व्यवसाय’ म्हणून कधीच करत नव्हते. त्यांचा शेतीविषयक दृष्टिकोन अतिशय निराशाजनक होता. ते शेतीच्या बाबतीत अतिशय निष्क्रिय आणि परंपरावादी होते. ते फक्त स्थानिक पिके पारंपरिक तंत्रज्ञान वापरून घेत असत. सरकारने भारतीय शेतीविकासविषयक घेतलेल्या धोरणाविषयी बाळशास्त्री यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सरकार स्थानिक शेतकऱ्यांना नवनवीन बी-बियाणे, नवीन तंत्रज्ञान त्यांच्या बोलीभाषेत पुरवत असत. बाळशास्त्री यांना खात्री होती की, सरकारचे भारतीय शेतीविकासाविषयक धोरण शेती आणि शेतकऱ्यांचा दर्जा बदलण्यास साहाय्यभूत ठरेल. याबरोबरच देशवासीयांची समानता ही युरोपीय लोकांच्या सभ्यतेबरोबरची हवी. तांत्रिक शिक्षणाची गरज, सत्तेचे ज्ञान, मुक्त शिक्षण, प्रसार माध्यम, स्थानिक राज्यांविषयी ब्रिटिश सरकारचे धोरण इत्यादी आणि या विषयांबरोबरच इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य आणि इतर विषयांनासुद्धा दर्पणमध्ये स्थान दिले जात असे.

दर्पण हे फक्त वर्तानपत्र नव्हते तर ते एक अवलोकनपत्र होते. ते लोकांच्या मनाचा ठाव घेणारे वर्तानपत्र होते. त्यामुळे दर्पणने लोकांचे प्रश्न मांडताना कोणत्याही दबावाखाली काम केले नाही. न्यायाधीशांची नेमणूक करत असताना नेमणूक होणाऱ्या न्यायाधीशांना हिंदू कायद्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे असे दर्पणने सरकारला सुचवले होते. दर्पणने हेही दाखवून दिले की, स्थानिक लोकांपैकी कोणाही व्यक्तीची उच्च पदावर नेमणूक होत नाही. या संदर्भात ‘दर्पण’ने ‘या देशाच्या लोकांमधून मोठ्या सरकारी जागांवर नेमणुका’ या शीर्षकाने लेख लिहिला. त्यामध्ये ते म्हणतात, ‘‘या देशाचे सर्व लोकांत बुद्धी, प्रामाणिकपणा आणि मोठमोठे जोखिमाचे व आबरूचे जागांवर जे गुण पाहिजेत ते नाहीत असे जे कित्येक म्हणतात, ते अज्ञानपणामुळे, हलकेपणामुळे आणि द्वेषामुळे. असे जर त्यांचे वर्तणुकीवरून दिसले नाही तर त्यांस यापेक्षे मोठे उद्योग मिळतील अशी जी आशा आहे ती धरून फळ नाही असे होईल. या हिंदुस्थानातील राहणारे नाना प्रकारचे लोकांत कित्येक असे असतील खरे की जे बाहेरून योग्य दिसतात आणि वास्तविक पाहिले असता मोठी विश्वासाची कामे करावयास योग्य नव्हेत, परंतु ही गोष्ट ज्या लोकांत नाही असे लोक कोठे आहेत?

इकडे देशाच्या बखरा आणि लोकांची स्थिती पाहिली असता या देशाचे लोकांत बुद्धी आणि नीती यांचे दाखले बहुत आढळतात. नेटिव लोकांमध्ये मोठी कामे व जस्टिस ऑफ द पीस याचे काम करण्याजोगे बुद्धिमान, बहुश्रुत आणि प्रामाणिक लोक संपणार नाहीत असा जो कित्येकांचा सिद्धान्त आहे तो ज्या दाखल्यावरून खोटा करता येतो असे लोकांस आम्ही विचारू की जी जड्‌जाचे जागेवर सांप्रत या देशाचे लोकांस ठेवतात आणि खालचे अंमलदारांनी केलेले न्यायाची पुन्हा चौकशी करण्याचा अखत्यार देतात त्या जागेवर किंवा तालुक्याचे जमाबंदीचे किंवा दुसरे कोणते कारभार खात्यातील काम चालवायास जे गुण पाहिजेत, त्यापेक्षा जस्टिस ऑफ द पीस यांचे काम चालवावयास अधिक पाहिजेत की काय? असे लोकांचे मनात काय असेल ते असो, परंतु इतके एक समजून मनास संतोष वाटतो की आमचे राजांचे... चांगले लक्ष आहे आणि आम्हास एक वेळ तपासून पाहावे असे त्यांचे मनात आहे. जर त्यामध्ये आमचे देशाचे लोक प्रतिष्ठेने आणि योग्यतेने निभावले, तर लवकरच त्यांस योग्य असे यापेक्षा मोठे रोजगार त्यांस सांगून त्यांचे कल्याण करायची आपली इच्छा सरकार प्रगट करेल अशी त्यांनी आशा धरावी. अशी ही उत्साहाची मोठी गोष्ट मनात आल्याने जे कित्येक लोक मुलांस विद्या शिकवण्यामध्ये आपला मोठा स्वार्थ असता त्याविषयी उदासीनपणा धरतात, तो त्यांचा उदासीनपणा जाईल. विद्येची फळे कित्येकांचे इतकी ध्यानात येत नाही की, ते आपणास जितके सामर्थ्य आहे तितकाही विद्याभ्यास मुलांकडून करवीत नाही. त्यांस वाटते की सांप्रतचे वहिवाटीचे रीतीप्रमाणे ज्या हलक्या आणि पराधीन जागांची मुलांस आशा असते, त्यात जितकी विद्या पाहिजे त्यापेक्षा अधिक शिकवणे हा व्यर्थ श्रम आणि यांत फुकट पैसा खर्च होतो. आता सांप्रतची आमचे देशाचे लोकांस मोठ्या जागा न देण्याची रीत जाऊन त्यापेक्षा उदार पद्धती पडत आहे. असा उदासीनपणा सांगितला खरा; परंतु अलीकडे थोडे वर्षांत या देशाचे लोकांत विद्येचा प्रसार त्वरेने होत चालला आहे आणि आता नवे तरणे लोक बहुत तयार होत चालले आहेत, असे पाहून आम्हास गर्व आणि संतोष होतो.ज्यांची इंग्रजी भाषेत प्रवीणता, युरोपीय विद्यांची माहीतगारी आणि बहुश्रुतपणा पाहून वाटते की त्यांस जितका योग्य तितका राज्यकारभार प्रतिष्ठा आणि आबरू ही मिळायचा दिवस लवकरच येईल.’’ बाळशास्त्री यांच्या या लिखाणावरून असे म्हणावेसे वाटते की, त्यांनी जर सरकारमध्ये सल्लागार म्हणून काम केले असते तर सरकारच्या धोरणामध्ये नक्कीच सुधारणा झाली असती.

राजा राममोहन रॉय यांनी ब्रिटिश संसदेसमोर साक्ष दिली आहे त्या संदर्भात बाळशास्त्री लिहितात, ‘‘खरोखरच भारतासारख्या विशाल अशा भूप्रदेशात राजा राममोहन रॉय यांच्यासारखीच अनेक कर्तबगार माणसे आहेत. राजा राममोहन रॉय यांना इंग्लंडमध्ये जशी वागणूक दिली जाते तशी वागणूक येथील कर्तबगार व्यक्तींना दिली तर त्यांच्याकडून मिळालेल्या सूचना, माहितीला राजा राममोहन रॉय यांनी ब्रिटिश संसदेसमोर ठेवलेल्या माहितीइतकेच महत्त्व आहे.’’ देशातील सर्वसामान्य घटकांच्या मताचा आदर ब्रिटिश शासनाने करावा, हेच दर्पणने सुचवले यावरून त्यांची सामाजिक बांधिलकी आणि देशवासीयांप्रती असलेले प्रेम स्पष्ट होते. बाळशास्त्री देशवासीयांना ब्रिटिशांइतकेच हुशार आणि बुद्धिमान समजत, त्यांचा आदर करत. बाळशास्त्री यांनी ब्रिटिशांना आपल्यापेक्षा उच्च कधीही मानले नाही.

दर्पणमध्ये त्यांनी फक्त जागतिक आणि आर्थिक मते मांडली नाहीत, तर ब्रिटिश पार्लमेंटच्या हालचालींविषयीदेखील नोंद घेतली. ‘इंग्लंड देशातील राजनीतीत बदल करण्यासंबंधी यत्न’ या लेखामध्ये त्यांनी इंग्लंडधील लोकांच्या मागणीनुसार प्रशासकीय सुधारणांची मागणी केली आहे. ते लिहितात-

‘‘मोठमोठी वर्तमाने घडत आहेत अशा या समयी आम्ही या उद्योगाचा प्रारंभ करत आहोत. जरवे ताबेखाली हा आमचा देश आहे, त्या इंग्लंड देशात सरकार व बहुत करून लोक हे राज्यरीतीत बदल करायचा यत्न करीत आहेत म्हणोन लोकांची चित्ते उद्विग्न झाली आहेत. त्या राज्यरीतींत बदल झाल्यापासून सामान्य लोकांची सत्ता वाढेल, जी सांप्रत मोठे पदवीचे लोकांकडे मात्र आहे ती कमी होईल त्या फेरफारापासून ज्या लोकांची सत्ता कमी होईल ते तो होण्यास प्रबळ विघ्ने करत आहेत. राज्यरीतींत बदल झाल्यापासून बरे होईल किंवा वाईट होईल याविषयी आम्ही आपले मत लिहावे हे वाचणारास प्रयोजन नाही; परंतु आम्हास इतके मात्र बोलायास आज्ञा असावी की द्रव्यवान आणि बुद्धिवान लोकांस दारिद्र्य आणि अज्ञान याही करून पीडित असे लोकांपेक्षे राज्यामध्ये अधिक सत्ता असावी आणि त्यांची ती अधिक होईलच. तसेच ज्या व्यवस्थांपासून एके काळी देशाचे हित होते त्याच कित्येक काळानंतर लोकांचे स्थितीत अंतर पडल्यामुळे उपयोगी नाही अशा होतात. आणि पाहिले असता इंग्लंडांतील लोकांचे दशेत फार अंतर पडले आहे खरे. या गोष्टींचा विचार करून आम्हास वाटते की लोकांचे भेद पावलेले स्थितीस योग्य अशी राज्यनीती करायास जे इच्छितात त्यांनी हे कृत्य चांगले आरंभिले आहे.’’

बाळशास्त्री यांनी पुढे अशीही आशा व्यक्त केली की, या राजनीतीचा एकंदर परिणाम भारतातदेखील होईल. ड्यूक ऑफ वेलिंग्टन याचा पराजय झाल्यानंतर तेथील सारी सत्ता ही सर्वसामान्य लोकांच्या हाती आली. या गोष्टीचे त्यांनी स्वागत केले आणि सांगितले की, हा बदल ब्रिटिश आणि काही प्रमाणात भारतासाठीसुद्धा फायदेशीर ठरेल.

दर्पण हे मुख्यत: लोकांना शिक्षित करण्यासाठी काढले होते आणि जनतेला त्यांची मते मोकळेपणाने मांडण्याची मुभा देण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांची, समस्यांची उत्तरे त्यांना ताबडतोब दिली जात. ‘इन्क्यूरर’या टोपण नावाच्या एका वाचकाने स्टिम इंजीनसंदर्भात एक पत्र लिहिले. ते पत्र आणि त्याचे उत्तर हे दर्पणच्या एका अंकात प्रसिद्ध झाले. बाळशास्त्री त्या संदर्भात लिहितात की, त्या भारतवासीयांकडून आम्हाला पत्र मिळाले. त्यांनी दिलेल्या सदिच्छेबद्दल आम्ही आपले आभार मानतो. आपल्या पत्राचा आशय आम्हाला समजला, आम्हाला खात्री आहे की, आमचा हा पत्रव्यवहार वाया जाणार नाही. आपण आमच्यावरील स्तुतिसुने उधळलेला मजकूर आम्ही एका जिव्हाळ्याच्या विषयाला जागा मिळण्यासाठी गाळला आहे. या व यासारख्या लेखांशिवाय दर्पणमध्ये जातिसंस्था आणि हिंदू धर्म या विषयासंदर्भात प्रश्नोत्तरे प्रसिद्ध झाली. दर्पणची स्तुती गाणारी पत्रे प्रकाशित झाली नाहीत.

बाळशास्त्री यांनी काही आधुनिक कविता प्रकाशित केल्या त्याबरोबरच मुलींचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि उच्च न्यायालयाचे काही महत्त्वाचे निर्णय प्रकाशित केले. याशिवाय त्यांनी न्यायसंस्थांधील अधिकाऱ्यांच्या सुट्‌ट्या, त्यांच्या नियुक्त्या या संदर्भातील माहितीदेखील दर्पणमध्ये प्रकाशित केली. बाळशास्त्री यांनी इंग्लंडमधून येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांविषयी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्यांविषयी दर्पणमधून लिहिले. वि.कृ.जोशी आणि एस.एम. सहस्रबुद्धे म्हणतात की, बाळशास्त्री यांनी दर्पणचे व्यवस्थापन अगदी व्यवस्थित ठेवले आहे.

त्या काळी बातमी मिळवण्याची अतिशय तुटपुंजी साधने उपलब्ध होती. त्यामुळे दर्पणने बातम्या प्रकाशित करण्यापेक्षा माहिती देण्यावरच अधिक भर दिला होता. त्यांनी एका बाजूने जनतेला शिक्षित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले होते तर दुसऱ्या बाजूने काय बरोबर आहे, हे सरकारला सांगण्याचे काम हाती घेतले होते. या प्रेरणेनेच बाळशास्त्री यांनी पत्रकारितेचा पाया रोवला.

एम.जी. माडखोलकर म्हणतात की, दर्पणमधील इंग्रजी भाषा ही अतिशय उच्च दर्जाची होती तर मराठी भाषा ही सर्वसामान्य अशी होती. माडखोलकरांचे हे म्हणणे काही प्रमाणात बरोबर आहे. कारण त्या काळी इंग्रजी भाषा प्रगत झाली होती. बाळशास्त्री यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले होते, म्हणून दर्पणमधील इंग्रजी भाषा ही उच्च दर्जाची होती. मराठी भाषा त्या काळी एवढी प्रगत झाली नव्हती. ब्रिटिश राजवटीखाली मराठी भाषेची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली होती. नवनवीन विषय प्रथमच मराठीमध्ये उपलब्ध होत होते. याचा परिणाम म्हणजे त्या काळी मराठी भाषेचा दर्जा हा तुलनात्मकदृष्ट्या कमकुवत होता. मराठी गद्य लिखाणाचा हा पहिलाच प्रयोग होता. म्हणूनच आपण त्या काळच्या मराठीच्या दर्जाबद्दल जादा अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. त्यापेक्षा वर्तमानपत्रातील मराठी लिखाण हे सर्वसामान्य लोकांसाठी होते, हे महत्त्वाचे आहे.

जॉन विल्सन यांनी मुंबईत ख्रिश्चन धर्मप्रसार करण्यासाठी ‘ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेटर’ हे नियतकालिक सुरू केले. 1833 च्या स्पेक्टेटरच्या अंकामध्ये ते दर्पणविषयी लिहितात, ‘‘दर्पण हे मराठी आणि इंग्रजीमधून प्रकाशित होणारे आणि जनाधार असलेले उपयुक्त वृत्तपत्र आहे. त्यामधून प्रकाशित होणारे काही निवडक लेख हे लोकांसाठी माहिती देणारे व त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. काही वेळेला संपादकीयामधून होणाऱ्या शेरेबाजीविषयी आपण जरी सहमत नसलो तरीही ज्या भावनेने आणि निर्भीडपणे जी शेरेबाजी केलेली असते, ती पाहता वेगवेगळ्या योद्‌ध्यांमधील प्रामाणिक असल्याप्रमाणेच ती गरजेचे असल्याचे वाटते. त्यामधील अनावश्यक वाटणारा मजकूर हा अतिशय गरजेचा असल्याचा वाटण्याची आपली संभावना झाल्याशिवाय राहात नाही. त्या वेळी या वृत्तपत्राचे 280 सभासद होते. बहुतेक जण हिंदू होते. त्यापैकी एका व्यक्तीला आम्ही भेटलो. त्यांनी खात्रीलायक सांगितले की, जो दर्पणचा अंक ते नियमितपणे घेतात, तो अंक जवळजवळ पन्नास लोक नियमितपणे त्याचा पाठपुरावा करतात व वाचतात. यावरून आपल्याला या वर्तानपत्राची लोकप्रियता लक्षात येईल.’’

दर्पणची मासिक वर्गणी दोन रुपये होती आणि दोन रुपये ही वर्गणी त्या काळी जादा असूनदेखील दर्पणला वाचकांचा चांगला प्रतिसाद होता. ही गोष्ट खरोखरच कौतुकास्पद होती. ‘बॉम्बे टाइम्स’ हे वृत्तपत्र दर्पणनंतर सहा वर्षांनी सुरू झाले. परंतु त्यांची वाचकसंख्या ही 500-600च्या पुढे गेली नाही. यावरून दर्पणची लोकप्रियता आपल्या लक्षात येते. दर्पणला एवढी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती की, मुंबईमध्ये प्रसिद्ध होणारी बंगाली, गुजराती आणि इंग्रजी वर्तमानपत्रे आपल्या अंकात दर्पणमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या पुनर्प्रकाशित करत. र. के. लेले या संदर्भात सांगतात की, ‘‘मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे एकमेव वृत्तपत्र आहे जे त्या काळी प्रकाशित होणाऱ्या त्याच प्रकारच्या वृत्तपत्रांना मार्गदर्शक ठरेल आणि त्यांचे नेतृत्व करण्यास सक्षम असे वृत्तपत्र आहे.’’

दर्पण हे अतिशय लोकप्रिय आणि प्रतिष्ठित वृत्तपत्र असले, तरीही 1840 पासून त्याचे प्रकाशन का थांबले याबाबत आपण निश्चित कारण सांगू शकत नाही. 1840च्या अंकातील संपादकीयामध्ये ‘द लास्ट फेअरवेल’ या मथळ्याखाली आलेल्या लेखात या वर्तमानपत्राचे प्रकाशन थांबवल्याचे सांगण्यात आले. त्या संपादकीय लेखामध्ये खालीलप्रमाणे मजकूर होता.

‘‘आठ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दर्पणचे संचालक, सर्व वर्गणीदारांना कळवू इच्छितात की, वाचकांची वर्तमान संख्या, त्यांची सर्वसाधारण वाढ थांबल्यामुळे या वृत्तपत्राचे ‘युनायटेड सर्व्हिस गॅझेट’मध्ये विलीनीकरण करण्यास प्रथम पसंती आहे. आमचे पांडित्यप्रचुर लिखाण आणि मराठीतील वृत्तपत्रदेखील हिंदू समाज व संस्कृतीविषयी अनभिज्ञ राहिले. त्यांची अभिरुची वाढवण्यासाठी आणि त्यांच्या धार्मिक व राजकीय भावना मुक्तपणे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि कदाचित त्यामुळे देशवासीयांच्या जीवनात सुधारणा होईल यासारखा उदात्त हेतू हे वृत्तपत्र सुरू होण्यास कारणीभूत ठरला. आम्हाला मिळालेल्या आपल्या सहकार्य आणि आधाराबद्दल आम्ही आभारी आहोत. आमच्या या उपक्रमाचा परिणाम कितपत झाला हे ठरवण्याचे काम आम्ही जनतेच्या विवेकावर सोडत आहोत; परंतु आनंदी आणि जागृत होऊन जयघोष करणाऱ्या परोपकारी वर्गापैकी एकही मित्र आमच्या पूर्ण कार्यकालात आम्ही गमावलेला नाही हे नाकारू शकत नाही.’’

Tags: महाराष्ट्र चरित्रग्रंथमाला संच व्ही. ए. पाटील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण बाळशास्त्री जांभेकर maharashtra charitragranthamala sanch v.a. patil first marathi newspaper darpan balshastri jambhekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Amol Dighe- 06 Jan 2022

    खूपच मार्गदर्शक लेख.

    saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके