डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

लग्न हा सामाजिक सोहळा आहे हे खरंच आहे. समाजाच्या मान्यतेचा प्रश्न नसतो तो, तो असतो समाजाला विश्वासात घेण्याचा आणि त्याला आपण जोडलेलं नवं नातं सांगण्याचा सोहळा. तो खरोखरच समाजाला आपला वाटेल असा होऊ द्या... मोठ्यांना आवर्जून तसं पटवून द्या, एवढंच!

नात्यातल्या एका लग्नात नवऱ्या मुलाने इतर नातेवाईकांच्या मदतीने, पण एकट्याच्या बळावर लग्नाची संपूर्ण तयारी केली आणि लग्न अगदी थाटात केलं. सर्वांनी त्याला अगदी मनापासून मदत केली. लग्न अगदी मस्त पार पडलं. 'वेल मॅनेज्ड इव्हेंट' म्हणावं असं... साधा पदवीधर असलेला हा मुलगा हे 'मॅनेजमेंट' कुणाकडून शिकला असेल, याचं मला मात्र आश्चर्य वाटत राहिलं...

लग्न पार पडल्यावर नातेवाईकांच्या कौतुकात मुलगा न्हाऊन निघाला आणि माझ्या मनात एक प्रश्न रुंजी घालायला लागला...

या मुलाने 'सर्व खर्च टाळून रजिस्टर लग्न करतो आणि आहे ती पुंजी मोठं घर घेण्यासाठी किंवा भविष्यात वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांची तरतूद म्हणून वापरतो', असं म्हटलं असतं तरी नातेवाईकांची मदत एवढीच राहिली असती का? त्यांच्या कौतुकभरल्या नजरा तशाच राहिल्या असत्या का?

हे लग्न नुकतंच पार पडलेलं म्हणून त्याचा संदर्भ. एरवी अशी अनेक लग्न होतातच की... मध्यमवर्गीय घरातली आणि (म्हणूनच) कित्येक लाखांच्या घरातली! हे लग्न झालं त्याच्या पाठोपाठच दुसरं एक लग्न होतं. बड... कित्येक लाखांचं. मुंबईतल्या एका प्रतिष्ठित हॉलमध्ये सकाळी विधिवत लग्न आणि संध्याकाळी एका मैदानात थाटात रिसेप्शन…

नवरानवरीचे कपडे प्रत्येकी किमान पन्नास हजारांचे. इतर थाटही त्याला साजेसा. पन्नासेक पदार्थ असलेलं बुफे जेवण; भारी साड्यांनी सजलेल्या, दागिन्यांनी मढलेल्या बायका आणि आल्यागेल्याशी धड न बोलता प्रत्येकाच्या हातात आवर्जून लग्नाचं गिफ्ट' कोंबणारी वरमाय...

या सगळ्यात मुलीचे साधेसे आई- वडील 'बिच्यारे' होऊन गेलेले... 'काय करणार आता पुन्हा संध्याकाळी? आमची सगळी माणसं सकाळीच येऊन गेली... अक्षता टाकून आशीर्वाद देणंच महत्त्वाचं ना शेवटी... हे रिसेप्शन वगैरे...' असं म्हणणारे.

काय चूक होतं त्यांचं? धार्मिक संस्कार हवेत म्हणून त्यांना विधिवत लग्न हवं होतं; पण पुढचा भपका त्यांना ऑकवर्ड वाटत होता... अगदी मिटून गेले होते दोघंही. मुलीच्या रुखवताच्या वस्तूंपासून सगळे त्यांनी हौसेने घरी केलेलं होतं. तिथली एकही वस्तू विकतची नव्हती. 'एकदाच तर करायचं असतं हे सगळं... दमायला झालं. पण समाधानही मिळालं.' मुलीच्या आई सांगत होत्या आणि खरंच, थकवा असला, तरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होतं...

लग्न समारंभ हा आपल्याकडे सतत वादाचा विषय रहात आला आहे. कुणी तो थाटात करतं, तर कुणी थोडक्यात. जो तो आपल्या आवडीप्रमाणे आणि आर्थिक स्थितीप्रमाणे तो करतो. मग साधा समारंभ आवडणारे, बडा समारंभ करणाऱ्यांना नावं ठेवत असतात आणि छान मस्त थाटात लग्न करणारे 'काय भिका लागल्या का...' म्हणून साधं लग्न करणार्यांना हसत असतात. त्यातून साधी लग्नं होतात ती नेहमी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असतात, त्यांना घरून विरोध असतो, असा एक समज आहे. त्यामुळे ज्यांची लग्नं अशी असत नाहीत, ते साधं लग्न करायला तयारच होत नाहीत. एकूण, लग्न थाटात होवो की साधं, आपल्याकडे त्याचेही 'स्टिरिओटाइप्स च झालेले आहेत.

प्रत्यक्ष जे लग्न करतात, त्या तरुणांना काय वाटतं?

आजची पिढी प्रॅक्टिकल आहे. आयुष्यात एकदाच लग्न करायचं ना, मग ते का चोरीछुपे करावं ? करावं की दणक्यात... असंच बहुतेकांना वाटत असतं. त्यालाही एक कारण आहे. लग्न ही दोन माणसांची खाजगी बाब आहे, ती त्यांनी पहावी, असं आपल्याकडचे विचार करणारे लोक समजतात. लग्न कुणाशी करावं आणि कसं करावं हे ठरवेपर्यंत ते ठीक आहे, कारण ते आपल्याला हवं तसं ठरवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण म्हणून एखाद्याला उधळपट्टी न करता, पण तरीही आपल्या सर्व परिचितांना बोलावून, आपल्या आनंदात त्यांना सामील करून घ्यायचं असलं, तर काय हरकत आहे? लग्नाचा जाहीर समारंभ वाईटच असतो, असं कुठे आहे? लग्न ही बाब फक्त दोन माणसांची नसते, ते दोन कुटुंबांनी एकमेकांशी जोडलेलं नातं असतं. आम्ही सर्वांनी या दोघांच्या निमित्ताने नातं जोडलंय... 

या दोघांना आशीर्वाद द्या आणि आम्हाला शुभेच्छा... असं कुणी म्हणालं तर त्यांच्या आनंदात आपण सामील होणार की नाही? की लग्नाचा समारंभ म्हणजे उधळपट्टी, असंच समजायचं? लग्न ही खाजगी बाब नाही, ती सामाजिक बाब आहे, हे एकदा मान्य केलं की थोडक्यात केला जाणार लग्नाचा समारंभ स्वीकारायला आपल्याला फार ब्रास होत नाही. आणि एकदाच करणार ना लग्न... मग हौस का करू नये? असं म्हणणाऱ्यांच्या भावना समजून घेणं सोपं जातं. इथपर्यंत सगळे सोपंच असतं. प्रश्न येतो तो पुढेच. लग्न हे दोन कुटुंबांचे नातं असतं. तो सामाजिक सोहळा असतो. म्हणूनच लग्नाच्या बैठका बसतात. सगळे देणंघेणं, खर्च यांचे तपशील ठरवले जातात आणि ते लेखी स्वरूपात ठेवले जातात... आणि मग ते शब्द काहीही करून फिरवले जात नाहीत...

माझ्या पहाण्यातलं अगदी अलीकडचं हे एक उदाहरण, नेहमीप्रमाणे एक लग्न ठरलं. बैठक झाली, तपशील लेखी ठरले. मुलीकडच्यांनी एकुलती मुलगी म्हणून लग्नाचा सर्व खर्च करू, असं सांगितलं... इथपर्यंत सगळे छान-छान झालं. लग्नाची तारीख ठरली, हॉल पाहिला आणि जेवणाचा मेनू ठरवण्याची वेळ आली. मुलीकडच्यांनी साधासा मेनू ठरवला. मुलाकडच्यांना तो पसंत पडला नाही. त्यांना अधिक महागडा मेनू हवा होता. लग्नाला काय हल्ली जिलेबी देतात? रसमलाई हवी... वगैरे. मुलीकडच्यांना खरंच परवडत नव्हतं. बजेट वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं, पण मुलाकडचे ऐकायला तयार नाहीत... 

पंचविशीच्या मागच्यापुढच्या मुलाच्या दोघी बहिणी मेनू बदलायचाच, म्हणून हटून बसल्या... आपली बाजू मुलाची असून आई 'ते लोक' सांगतील ते ऐकते म्हणून या दोघींनी स्वतः मुलीच्या घरी फोन केला आणि मेनू बदलायला लावला... जोपर्यंत हौस ही हौस असते, तोपर्यंत प्रश्न नसतो; मात्र ती संपून अडवणूक व्हायला सुरुवात होते आणि मग मजेची सजा होते... आणि ही हौस तरी फक्त हौस कुठे राहते? त्यात लगेचच आर्थिक गणितं, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी येतात. परवडतंय ना... मग करा... हेही एक कारण असतं. हे कारण तर कशाच्याही संदर्भात दिलं जातं. मला आठवतंय, एका मैत्रिणीला ती दहावीत असताना धाकटी बहीण झाली. ती अगदी कानकोंडी झालेली. तिच्या आईला एका शेजारणीने विचारलं, 'अगं पण का एवढा अट्टहास या वयात...?' नवी आई उत्तरली होती, 'मुलगा हवाय... आपल्याला परवडतंय ना आणखी एक मूल पोसणं, मग काय हरकत आहे चान्स घ्यायला?' तर हे असं परवडणंही खूप घातक असतं. आणि लग्नाच्या बाबतीत या परवडण्यालाच चिकटून येतात त्या प्रतिष्ठेच्या झुली. 

त्यांना बळी पडून लग्नं गाजवली जातात आणि मग आपल्या शेजारच्या साध्या घरातलं लग्न कोटीच्या घरात गेलेलं असलं, तरी आपण राणेंच्या मुलाच्या लग्नाच्या आणि जेवणावळीच्या बातम्या मिटक्या मारत वाचत रहातो... आपल्या बाबतीत नाही बुवा असं होऊ द्यायचं, असं ठरवत रहातो आणि मग… लग्नाच्या संदर्भात सगळे ठरवणारे असतात ते मोठे. ज्यांचं लग्न आहे, त्यांनी काही बोलायचं नसतं, काही ठरवायचं नसतं. त्यांना कुठे काय कळतं...?

पण एरवी मुलं किती ऐकतात हो मोठ्यांचं? रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहू नको म्हटलं तर ऐकतात? अमुक मित्राबरोबर फार जाऊ नको म्हटलं तर ऐकतात? पालेभाज्या खात जा म्हटलं तर ऐकतात? काय म्हणणं असतं त्यांचं?... आम्ही आता मोठे झालोय. प्रत्येक गोष्ट सांगू नका, आमचं आम्हांला कळतं... मग लग्नाच्या बाबतीत का बरं असं होतं ? मोठेच सगळे ठरवून बसतात आणि आपल्याला काही 'से' रहात नाही... की मनातून आपल्यालाही हे सगळं हवंच असतं? त्या माझ्या नात्यातल्या मुलाला हवं होतं तसं?

आपलं लग्न करताना आपण आपला विचार का नाही करायचा? लग्न झोकात करणं महत्त्वाचं की भविष्याचा वेध घेणं महत्त्वाचं? भविष्यासाठी तरतूद करणं आता या कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्यांमुळे आवश्यकच झालं आहे. मग का नाही करायची त्याची सुरुवात लग्नापासूनच?

लग्न हा एक सामाजिक सोहळा आहे असं आपण म्हणतो. मग समाजाला दबल्यासारखं वाटेल असं वातावरण का असावं लग्नसोहळ्याच्या ठिकाणी? तुम्हांला परवडत असेल, तुमची ऐपतही असेल, पण लोक लग्नाच्या तुमच्या आनंदात सामील होण्याऐवजी अवाकच होणार असतील, तर काय उपयोग त्यांना बोलावल्याचा?

लग्न हा सामाजिक सोहळा आहे हे खरंच आहे. समाजाच्या मान्यतेचा प्रश्न नसतो तो, तो असतो समाजाला विश्वासात घेण्याचा आणि त्याला आपण जोडलेलं नवं नातं सांगण्याचा सोहळा. तो खरोखरच समाजाला आपला वाटेल असा होऊ द्या... मोठ्यांना आवर्जून तसं पटवून द्या, एवढंच!

Tags: वैशाली रोडे परिघावरून… पिढी प्रॅक्टिकल सामाजिक सोहळा लग्न weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके