डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नशेसाठी दारू, तंबाखू, ब्राऊन शुगरच लागते असं कुठेय?ती तर कसलीही असते...कुणाला वेगाची, कुणाला पैशाची, कुणाला स्त्रीची, कुणाला आणखी कसली!! या नशेचाच मग कैफ होतो आणि तो मात्र कुणाची पर्वा न करता आपल्याला बेपर्वा करतो!!

31 डिसेंबरच्या रात्री नवं वर्ष साजरं करत असताना मुंबईत दोन अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या, चीड आणणाऱ्या घटना घडल्या. एक होती दोन तरुणींच्या भर रस्त्यावर झालेल्या छेडाछेडीची आणि दुसरी होती 1 जानेवारीच्या पहाटे मरीन ड्राइव्हवर डंपरवर गाडी धडकून झालेल्या अपघाताची. दोन्ही घटना सामान्य माणूस आजही किती असुरक्षित आहे, यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या...

रस्त्यावर होणारी छेडछाड मुलींना, स्त्रियांना नवी नसते. त्यात ती 31 डिसेंबरला, जेव्हा फक्त आणि फक्त एन्जॉयमेंटचा, सेलिब्रेशनचा मूड असतो, तेव्हा तर ती माफच करते!! हो, मुंबई पोलिसांतल्या अत्यंत जबाबदार अधिकाऱ्यांची मुक्ताफळं ऐकली तर असंच वाटावं; ते पटावं, पटवून घ्यावे!

झालं असं - 31 डिसेंबरच्या रात्री दोन तरुण जोडपी जुहूच्या जे.डब्ल्यू.मेरियट या हॉटेलमधून 31ची रात्र एन्जॉय करायला बाहेर पडली. जवळच जुहू समुद्रकिनारा; साहजिकच त्यांचे पाय तिकडे वळले. रस्त्यावरून चालताना त्यांच्या लक्षात आलं, की 50 ते 60 जणांच्या एका जमावाने आपल्याला घेरलंय आणि ते सर्वजण आपल्या जवळजवळ येत आहेत. लक्षात येऊन त्यांनी काही करेपर्यंत जमाव चेकाळला, त्याने त्या दोन तरुणींच्या गुप्तांगांना हात लावायला, चिमटे काढायला सुरुवात केली. दोघी ओरडायला लागल्या आणि त्यांच्या भोवती गर्दी जमा झाली. दोघींबरोबर असणारे तरुण त्यांना वाचवायचा प्रयत्न करायला लागले. पण बघे फक्त बघतच राहिले, त्यांनी या तरुणांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. जमावाने या दोघी तरुणींना खाली पाडलं, त्यांच्या कपड्यांना हात घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली. एकीचा स्कर्ट त्यांनी फाडला...

एक छायाचित्रकार तिथे होता, त्याने पोलिसांना बोलावलं. ते आले तेव्हा जमाव पांगला. कोणालाही ताब्यात न घेता पोलिसांनी या चौघांना पोलिस स्टेशनला नेलं, आणि काहीतरी कारण सांगून तक्रार दाखल न करता परत पाठवलं...दुसऱ्या दिवशी एका इंग्रजी सायंदैनिकाने तपशीलवार, छायाचित्रांसह छापलं; इतर सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला आणि मुंबई चिडली...

माध्यमं या प्रकरणाच्या मागे लागली आहेत, हे पाहून खुद्द पोलिस आयुक्तांनी ‘पत्रकारांनी नको तिथे नाकं खुपसण्याची गरज नाही’, अशी मुक्ताफळं उधळली. हो, त्या तरुणींना तक्रार दाखल करायची नव्हती आणि पोलिसांना ती दाखल करून घ्यायची नव्हती; तर मग पत्रकारांचं काय काम? अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती...

त्यांचीच काय, इतर अनेकांची ती तशी असू शकते आणि आहेही! नाहीतर मग त्यांचं काय ते चालू दे, आपल्याला काय त्याचं? अशा भावनेने हा सगळा तमाशा बघत राहणाऱ्या, किंबहुना त्याचा विकृत आनंद लुटणाऱ्या गर्दीचा अर्थ कसा लावायचा? ‘या मुली रात्रीबेरात्री घराबाहेर पडतात, तंग कपडे घालतात आणि आम्हांला उद्युक्त करतात..’ या एका तरुणानेच दिलेल्या प्रतिक्रियेचा अर्थ कसा लावायचा?

यात काय नवीन? हे तर नेहमीचं होतं... तेव्हा तो फोटोग्राफर तिथे होता म्हणून हे आपल्यासमोर आलं, नाहीतर एरवीही अशा कित्येक घटना घडत असतील आणि कुणासमोरही न येता आपला घाव मागे ठेवून विरूनही जात असतील... एक मैत्रीण म्हणाली, तेव्हा अशा कित्येक घटना डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. लहानपणापासूनच गर्दीतून जाताना कुठेकुठे लागलेले हात, त्यांचा तेव्हा न कळलेला अर्थ, थोडं मोठं झाल्यावर अशा स्पर्शांबद्दलची वाटलेली भीती आणि त्यानंतर...

फक्त एकदा हिंमत करून छेड काढणाऱ्या पुरुषाला दिलेली चपराक, त्याचं मान खाली घालून मुकाट गाणं आणि छेड काढणाऱ्यांत हिंमतच नसते, हे कळल्यामुळे आलेलं धैर्य.. त्यानंतर कित्येकांना दिलेला मार...

एकदा ऐन गर्दीच्या वेळी स्टेशनजवळच्या रस्त्यावरून जात होते. समोरून कॉलेजमधल्या दोन मुली येत होत्या. त्यांच्या मागून एक माणूस आला आणि एकीच्या अंगाला नको तिथे हात लावून झर्रकन पुढे आला. मी समोरच होते. सगळं पाहिलं होतं. तो माणूस पुढे गेला तसं मागे वळून त्याच्या पाठीत जोरदार बुक्का घातला. त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. ‘का मारताय?’वगैरे विचारणं तर खूप दूर राहिलं... समोरून येणाऱ्या मुली खूश झाल्या. ‘असंच करायला पाहिजे या लोकांना...’ त्या म्हणाल्या. पण त्यांनी स्वतः मात्र ही हिंमत केली नव्हती. आपल्या समाजानेच ती त्यांना दिली नव्हती...

तुझी कुणी छेड काढतंय...? दोष तुझाच! तुझ्याकडे बघून कुणी अश्लिल हावभाव करतात...? दोष तुझाच! तुझ्यावर बलात्कार झालाय...? दोष तुझाच! या सगळ्यात मुलींचा, स्त्रियांचा दोष असतो, हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं गृहीतक. त्याचा पगडा अर्थात स्त्रियांवरही. मग कुणी रस्त्यात छेड काढली तर... कसं ओरडणार? आपल्यालाच लोक हसतील... असं समजायचं आणि गप्प बसायचं. अशानेच समाज सोकावत गेला. काहीही केलं तरी इथून प्रतिकारच होत नाही, हे त्याला कळलं आणि मग त्याचे अत्याचार वाढतच गेले...

हे होत असतानाच दुसरीकडे जमाना बदलला. जागतिकीकरण आलं, चंगळवाद फोफावला. मजेच्या, मस्तीच्या कल्पना बदलल्या. फिरायला आता कुणाला चौपाटी आवडेनाशी झाली; आवडायला लागला तो अट्रिया मॉल...खायला कुणाला कोपऱ्यावरचा इराणी चालेनासा झाला; आवडलं ते बरिस्ता किंवा सीसीडी... मला आवडते ती मजा मी करणार... मग मजा आणणारा खाण्याचा एखादा पदार्थ, एखादी चैनीची वस्तू यांसारखीच स्त्रीही एक चैनीची वस्तू बनली. तिचा एकच ‘उपयोग!’ भोग घेणं! त्यातच मजा! आपण नुसती मजा करायची! आपल्या मजेची कुणाला किती किंमत चुकवावी लागते, याची पर्वा करण्याची गरज नाही... भाड में गए सब... मुझे क्या करना है..

31 डिसेंबरच्या रात्री घडलेल्या दोन्ही घटना याच बेपर्वा वृत्तीच्या द्योतक आहेत; आणि म्हणूनच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. नेमकं काय घडलंय, कसं घडलंय, हे इथे फार महत्त्वाचं नाहीच. महत्त्वाची आहे ती त्यातून दिसलेली वृत्ती.

चर्नीरोडजवळचा अपघातही पहा...रस्त्यावर एक डंपर अगदी डाव्या टोकाला पार्क केलेला आहे... उजवीकडून एक टॅक्सी जाते आहे... तिच्या मागून भरधाव वेगाने एक कार येते. कारवाल्याला धीर नसतो किंवा गाडी वेगात चालवण्याची नशा त्याला अनुभवायची असते... तो डाव्या बाजूने टॅक्सीला ओव्हरटेक करतो... पण पुढे डंपर असतो. 125च्या वेगात असलेली कार डंपरला धडकते. डंपरच्या मागे काहीतरी करत उभा असलेला त्याचा ड्रायव्हर आणि कारमध्ये असलेल्या सहा तरुणांपैकी चार जणांचा बळी घेऊनच थांबते!

वेगाची नशा कार चालवणाऱ्याला तर घेऊन गेलीच; पण त्याचे इतर मित्र आणि काहीच दोष नसलेला त्या डंपरचा चालक यांनाही जीव गमवावा लागला... ही मुलं दारू प्यायलेली नव्हती! त्यांना फक्त वेगाची नशा होती!!

ही नशाच तर बाधक ठरत नाही ना? नशेसाठी दारू, तंबाखू, ब्राऊन शुगरच लागते असं कुठेय? ती तर कसलीही असते...

कुणाला वेगाची, कुणाला पैशाची, कुणाला स्त्रीची, कुणाला आणखी कसली!!या नशेचाच मग कैफ होतो आणि तो मात्र कुणाची पर्वा न करता आपल्याला बेपर्वा करतो!!

मग कुणाला वाटतं - मुलींची छेड काढली तर काय झालं? आपल्याला तर मजा येते…

कुणाला वाटतं - मुलींवर, स्त्रियांवर बलात्कारही केला तर काय झालं?आपल्याला तर मजा येते...

कुणाला वाटतं - जुगारात प्रचंड पैसे उडवले तर काय झालं? आपल्याला तर मजा येते...

कुणाला वाटतं - फिरवलं अनेक वर्ष अनेक मुलींना आणि मग सोडून दिलं तर काय झालं? आपल्याला तर मजा येते...

कुणाला वाटतं - चढली आपली गाडी फुटपाथवर आणि गेले दोन-चार गरिबांचे जीव, तर काय झालं? आपल्याला तर मजा येते...

कुणाला वाटतं - वाहतुकीचे साधे नियमही न पाळता वेगात गाडी चालवली तर काय झालं? आपल्याला तर मजा येते...

पण इथे मात्र गडबड होते...

आपल्याला आधी मजा येते, पण नंतर आपल्या जीवावरच बेततं, कधी जीवही जातो...

पण तेव्हा मात्र ‘मग काय झालं?’असं म्हणता येत नाही, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
आता ‘मग काय झालं?’असं म्हणण्याची पाळी इतरांची असते!!

Tags: समाज सदर जागतिकीकरण वैशाली रोडे परिघावरून weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके