डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

वनराई बंधारे : पाणी अडवा-मुरवा मोहिमेतील चमत्कार

महाराष्ट्रातील दुष्काळी प्रदेशाची समस्या सोडविण्यासाठी पाणी अडवा - पाणी जिरवा ही घोषणा काही वर्षांपूर्वी दिली गेली. सिमेंटचे बंधारे बांधण्याऐवजी गावकऱ्यांच्या श्रमदानाने सहजासहजी उभारता येतील असे सिमेंटची पोती आणि जाळीच्या साहाय्याने उभारायच्या बंधाऱ्यांचे तंत्र वनराईने विकसित केले आहे. त्याबद्दल माहिती देणारा हा लेख.
 

दुष्काळ आणि पाणीटंचाईने महाराष्ट्राशी किती जवळचे नाते जोडले आहे, हे गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभवावरून आपल्या लक्षात आले आहे. अनिश्चित, अपुरे पर्जन्यमान आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून ते जिरवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा अभाव यांमुळे गेली काही दशके महाराष्ट्रातले पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच गेले आहे.

पावसाळा सुरू झाला की ग्रामीण भागातली विकासासाठी चालणारी सगळी कामे बंद होतात. ही प्रथा वर्षानुवर्षे चालू आहे. पाण्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने या पारंपरिक विचारसरणीत आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे. फळशेती-वनशेती आणि वनीकरणाबरोबरच पाणी अडवा-मुरवा मोहीम ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात राबविणे शक्य आहे आणि वनराईने ही मोहीम यशस्वी करण्याचा चंगच बांधला आहे. वनीकरण, सुधारित शेती, रोजगार निर्मिती, फलोद्यान, कुरणविकास, कुर्‍हाडबंदी, चराईबंदी, बायोगॅस, महिला विकास, साक्षरता, पडीक जमीन विकास यांसारख्या सर्वांगीण ग्रामीण कार्यक्रमांमध्ये वनराईने पाणी अडवा-मुरवा मोहिमेचाही समावेश केला आहे. या मोहिमेअंतर्गत वनराईने विकसित केलेले सिमेंटच्या किंवा खताच्या रिकाम्या पोत्यांचे आणि जाळीचे दगडी बंधारे महाराष्ट्रामध्ये अक्षरशः चमत्कार घडवीत आहेत. या कच्च्या बंधाऱ्यांमुळे ओढ्या-नाल्यांतून वाहून जाणारे पाणी मुरण्यास मदत होते, त्याचप्रमाणे विहिरीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होते.

पावसाळा सुरू झाला की नाले, ओढे आणि नद्यांचे प्रवाह सगळीकडे वाहू लागतात. शेताशेतांमध्ये जिथे  पाऊस पडतो, तिथे पाणी तुडुंब भरते. लहान मोठ्या गावांतून जाणारे छोटे नालेही या प्रवाहात सहभागी होतात. योग्य नियोजन केले तर या प्रकारे वाहून जाणारे पाणी काही प्रमाणात जागेवरच अडविता येते आणि त्याद्वारे ते जमिनीत मुरवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीतही वाढ करता येते.

या दृष्टिकोनातून वनराईने सिमेंटच्या किंवा खतांच्या पोत्यांचे आणि जाळीचे दगडी बंधारे विकसित केले आहेत. स्थानिकरीत्या उपलब्ध असणारे माती, रेती यांसारखे साहित्य रिकाम्या पिशव्यांमध्ये भरून ग्रामस्थांच्या श्रमदानातूनच वाहत्या पाण्यात 'वनराई पोत्यांचे बंधारे' उभारले जातात. माती आणि रेतीचे मिश्रण पिशव्यांमध्ये सैलसर भरल्यास बंधारे अगदी घट्ट होतात आणि वाहते पाणी रोखू शकतात. बंधाऱ्याची पोती रचताना आणखी एक काळजी घ्यावी लागते. पोत्यांचा दुसरा थर रचताना पहिल्या थरातल्या दोन पोत्यांच्या सांध्यावर दुसऱ्या थरातले प्रत्येक पोते रचले तर सांधेजोड होऊन फटीतून येणारे पाणीही अडविले जाते. शिवाय पोत्यांच्या दोन थरांवर मातीचा एक थर दिला तर गिलावा केल्याप्रमाणे सगळ्या फटी बुजून जातात. सप्टेंबर-ऑक्टोबरपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत अशा प्रकारच्या बंधार्‍यांमुळे वाहणारे सरते पाणी अडविले जाऊ शकते.

गावकऱ्यांच्या श्रमदानामुळे सरासरी 1000 पोत्यांच्या बंधाऱ्याला फक्त 1,000/- रुपयांपर्यंत खर्च येतो आणि बंधार्‍याच्या दोन्ही बाजूला 10-20 एकर जमिनीत ज्वारी, गहू, हरभरा, बटाटे, सूर्यफूल, भाजीपाला यांसारखी पिके घेता येतात. 1,000/- रुपये खर्चावर शेतकऱ्याला पिकाला दोन-तीन पाळ्या पाणी देऊन जमिनीच्या मगदुरानुसार 50,000 ते एक लाख रुपये किंमतीचे पीक उत्पादन घेता येते. 

रिकाम्या पिशव्यांच्या बंधार्‍याहून अधिक टिकाऊ असे जाळीचे दगडी बंधारेही वनराईतर्फे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उभारण्यात आले आहेत. यामध्ये लोखंडी जाळीमध्ये नदीच्या-ओढ्याच्या पात्रातलेच दगड-गोटे भरून दगडाचे मोठे गाठोडे तयार केले जाते. हे गाठोडे पात्रामध्ये काटकोनात उभे केले की वाहते पाणी सहजगत्या रोखले जाते. या बंधाऱ्यामुळे साठणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि बंधार्‍याचे आयुष्यही तुलनेने अधिक आहे. एका बंधार्‍यासाठी लागणाऱ्या जाळीला सुमारे अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातूनच हा बंधारा उभारला जातो.

पोत्यांच्या आणि जाळीच्या बंधाऱ्यांचा हा प्रयोग वनराई संस्था महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला, नगर, यवतमाळ, लातूर, रायगड अशा अनेक ठिकाणी यशस्वीरीत्या राबवीत आहे. या दोन्ही प्रकारचे मिळून साडेतीन हजारांहून अधिक बंधारे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात उभे राहिले आहेत. इतर जिल्ह्यांची माहितीही अद्याप जमा होत आहे. शिवाय यापुढील काळातही जेथे सरते पाणी उपलब्ध आहे, तेथे असे बंधारे उभारण्यात येणार आहेत. 1994 या वर्षी महाराष्ट्रामध्ये 25 लाख रिकाम्या पोत्यांचा वापर करून 5000 बंधारे उभे करण्याची महत्वाकांक्षी योजना वनराईने आखली आहे आणि त्या दिशेने कामाला सुरुवातही केली आहे. शासन आणि ग्रामस्थ यांचा भरीव प्रतिसाद मिळाला तर ही योजना अधिक वेगाने पूर्ण करता येईल. वनराईतर्फे आजपर्यंत झालेल्या बंधारे उभारणीच्या कार्यात महाराष्ट्र शासनाच्या प्रशिक्षण व भेट विभागाचे आणि कृषि व मृदसंधारण विभागाचे जसे सहकार्य मिळाले, तसेच यापुढेही सातत्याने मिळत राहिले तर महाराष्ट्रातल्या पाणी अडवा-मुरवा मोहिमेला निश्चित गती मिळेल. 

पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातल्या कोंढणपूरजवळ आर्वी येथे 4,500 पोत्यांचा प्रचंड बंधारा ग्रामस्थांनी वनराईच्या प्रेरणेने केवळ दोन दिवसांतच पूर्ण केला आहे. माती खोदणे, पोत्यांमध्ये माती-रेतीचे मिश्रण भरणे, पोती शिवणे. पाया खोदणे, पोती रचणे ही सर्व कामे 250 ग्रामस्थांनी एकजुटीने पूर्ण केली. ‘ग्रामस्थांचे श्रमाचे हात, वनराईची विकासाला साथ’ असा नारा देत बंधारा दोन दिवसांत पूर्ण झाला आणि आठ-दहा दिवसांत बंधाऱ्यालगतच्या चार विहीरींच्या पाण्याची पातळी चार-चार फुटांनी वाढली. या बंधाऱ्याचा लाभ एकंदर 30 शेतकर्‍यांना मिळणार असून जवळजवळ 50 एकर क्षेत्र या बंधाऱ्यामुळे ओलिताखाली येणार आहे. गहू आणि हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांना याचा खूप फायदा मिळेल, असा विश्वास आता आर्वीच्या ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.

मोरदरी हे सिंहगडच्या पायथ्याचं छोटंसं गाव म्हणजे पाण्याच्या दुर्भिक्ष्यासाठीच प्रसिद्ध असलेलं गाव. पण गेल्या तीन-चार वर्षांपासून दरवर्षी बांधल्या जाणाऱ्या पोत्यांच्या बंधार्‍यांमुळे आणि नुकत्याच पूर्ण झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यामुळे या गावाचा हळूहळू कायापालट होतो आहे. गावातली पाणीटंचाई आता संपली आहे. उलट कल्याण आणि पेठ भिलारवाडीसारख्या आसपासच्या गावांतले लोकच आता पाण्यासाठी मोरदरीत येतात. 

आंबेगाव तालुक्यात गावडेवाडी (3), चांडोली बुद्रुक (3), तांबडे मळा (3), भराडी (1), धुगाव (7) असे जाळीचे दगडी आणि सिमेंटच्या पोत्यांचे मिळून एकूण 17 बंधारे उभे राहिले आहेत. प्रत्येक बंधाऱ्यामुळे सरासरी 10 एकर जमीन ओलिताखाली आली आहे आणि बटाटा, ज्वारी, गहू, हरभरा यांसारख्या पिकांना या सिंचनाचा भरपूर फायदा मिळत आहे.

पुरंदर तालुक्यात हिवरे येथे 5 जाळीचे दगडी बंधारे, 3 पोत्यांचे बंधारे तर जवळच्याच देवडी गावात पोत्यांचे 2 बंधारे ग्रामस्थांनी उभारले आहेत. शिवाय रोटरी क्लबच्या सहकार्याने एक पक्का बंधाराही देवडीत उभा राहिला आहे.

हवेली तालुक्यात सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या मणेरवाडी, खाटपेवाडी, वरपेवाडी आणि किरकटवाडी या छोट्या छोट्या वाड्यांतले ग्रामस्थही पाणी अडवा-मुरवा मोहिमेत मागे नाहीत. जवळजवळ 8,000 पोत्यांच्या वापर करून या चार वाड्यांमध्ये एकंदर 15 बंधारे उभे राहत आहेत. यामुळे सिंचनाचा अधिक फायदा मिळालेल्या एकंदर 100 एकर जमिनीतून गहू, हरभरा ही रब्बी पिके फोफावणार आहेत.

भोर तालुक्यातल्या ससेवाडी आणि थेळू या ठिकाणच्या ग्रामस्थांनीही वनराईच्या प्रेरणेने बंधारे उभारण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या झरी येथे एरवी रब्बी पीक घेणे पाण्याच्या अभावामुळे शक्य नव्हते. सिमेंटच्या पोत्यांच्या पाच बंधार्‍यांमुळे मात्र आता गहू, हरभरा, कांदा या पिकांची लागवड सुरू झाली आहे.

अशा प्रकारचे पोत्यांचे बंधारे घालण्यासाठी गावकरी श्रमदानाला तयार असतील, अशा ठिकाणी लागतील तेवढी पोती वनराईने आजपर्यंत पुरविली आहेत. पाणी अडवा-मुरवा मोहीम गावोगाव न्यायची असेल तर शासनातर्फे ही पोती किंवा गॅबियन बंधाऱ्यासाठी लागणारी जाळी विनामूल्य पुरविण्याची व्यवस्था व्हायला हवी. 

वाहून जाणारे पाणी अशा पद्धतीने अडवून मुरविण्याचा धडक कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने हाती घ्यायला हवा. सर्व गावांनी हे जनआंदोलन उभे केले आणि गावाच्या परिसरात असे पाणी अडविण्याचे छोटे छोटे कार्यक्रम शेकडोंच्या संख्येने राबविले तर डोळ्यांदेखत वाहून जाणारे पाणी आपल्या शिवारात मुरेल आणि विहीरींच्या पाण्याची पातळी निश्चितपणे वाढेल. शिवाय पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली तर या बंधार्‍यांमुळे साठलेले पाणी घेऊन करपणारी उभी पिकेही वाचविता येतील.

वनराईने हाती घेतलेली ही पाणी अडवा-मुरवा मोहीम ग्रामस्थांच्या आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून प्रचंड चळवळीत परावर्तित झाली तर महाराष्ट्रातली पाणी समस्या निश्चित संपुष्टात येईल आणि समृद्ध शेती आणि हिरवी वनश्री यांनी वेढलेला महाराष्ट्र पाणी अडवा-मुरवा मोहिमेची स्फूर्ती उभ्या देशाला देत राहील.

Tags: बंधारा सिंहगढ यवतमाळ लातूर रायगढ पुणे वनराई संस्था पाणी अडवा-पाणी मुरवा मोहीम Bandhara Sinhgadh Yavatmaal Latur Raigarh Pune Vanarai Sanstha Paani Aadawa- Paani Murawa Mohim weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके