डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मेहनती माळ्यांची प्रगती (पूर्वार्ध)

माळी ज्या मेहनतीने मळे पिकवितात, तीच कामाची पद्धत, भाजी-बाजारातील दलाली, राजकारण, आधुनिक उद्योग, संशोधन यात दिसते. के. टी. गिरमे, छगन भुजबळ, ना.स.फरांदे, सुरेश पिंगळे, सुधीर भोंगळे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसे पाहिल्यावर लक्षात येते. भांडवलनिर्मितीमध्ये माळी वेगाने पुढे सरकताना दिसतात. त्यामुळे नव्या भांडवलसंचयाचा राजकारणावर परिणाम होऊ लागेल त्या वेळी माळ्यांच्या राजकीय सहभागाला नवे परिमाण निर्माण झालेले दिसेल.

माळी ही महाराष्ट्रातील आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्टीने लवकर जागृत झालेली जात आहे. संतपरंपरेत मोठे नाव असणारे सावता माळी आणि अव्वल इंग्रजीतील क्रांतिकारी विचाराचे कृतिशील समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले हे माळी जातीचे. त्याखेरीज शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभारण्याची कल्पना सर्वप्रथम मांडणारे आणि प्रत्यक्षात आणणारे हरिभाऊ गिरमे, रावबहादुर नारायणराव बोरावके, सध्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते छगन भुजबळ हे सारे माळी समाजापैकीच.

मूळ व्यवसाय शेती

शेती हा माळ्यांचा मूळ व्यवसाय. शेती करणारे अनेक जातींचे लोक असले तरी माळी हे मोठ्‌या आस्थेवाईकपणे आणि मनापासून शेती करणारे लोक आहेत. "कांदा मुळा भाजी या प्रसिद्ध अभंगात 

‘मोट, नाडा, विहीर, दोरी, अवधी व्यापिली पंढरी।।’ 

अशी एक ओळ आहे. दुसरा एक अभंग असा 

'आमची माळियाची जात शेत लावू बागाईत॥

आम्हां हाती मोट नाडा पाणी जाते फुलझाडा।।

शांती शेवंती फुलली प्रेम जाईजुई व्याली।

सावताने केला मळा विठ्ठल देखियला डोळा।’

सावता महाराजांच्या अभंगातील मोट, नाडा, फुलझाडांना जाणारे पाणी, शेवंती, जाईजुई. मळा हे उल्लेख मोठे लक्षणीय आहेत. मळा, पाण्यावरील बागायत हे शेतीच्या आधुनिक कल्पनेला जवळचे असणारे विषय माळ्यांना शेकडो वर्षांपासून सरावाचे असले पाहिजेत. बागायत म्हणजे त्यात मेहनत, चिकाटी, सातत्य लागते ते माळ्यांच्यात पूर्वीपासून होते आणि आजही आहे. त्यांनी क्षेत्र बदलले तरी हे गुण कायमच राहतात. 

शेती आणि पाणी यांचा संबंध आधीपासून ओळखल्याने माळ्यांनी जमिनी कसल्या. त्या सुपीक आणि ओलिताची व्यवस्था असलेल्या पुण्यात भवानी पेठेत सापिका नावाचा भाग आहे. सध्या तिथे शेती नाही. दाट वस्ती झालेली आहे. मात्र सापिका याचा अर्थ सहा पिके घेता येण्याजोगी शेतजमीन, ही सर्व जमीन माळ्यांकडे होती. सापिका या नावाच्या जमिनी इतरत्रही आहेत आणि तेथे माळी राहतात असेच आढळते. माळ्यांमधील फुलमाळी, जिरेमाळी, हळदमाळी या पोटजाती पाहिल्या तरी ही सारी पिके नगदी उत्पन्नाची, खात्रीच्या पाणी-पुरवठ्याची गरज असलेली आहेत.

पाण्याचा वापर करून करणारा बागायतदार मळेवाला शेतकरी हा जिरायती कोरडवाहू शेतकऱ्यापेक्षा अधिक प्रमाणात शेतीशी बांधलेला असतो. त्यामुळे जिरायती शेतीतील पीक आल्यानंतर मुलुखगिरी  करण्याच्या उद्योगात माळी गेलेले दिसत नाहीत. 'इतर जातीत संस्थानिक राजे झाले तसे माळी जातीत घडले नाही. त्यामुळे धामणसकर, म्हस्के, आवटे यांना राजाश्रय मिळाला तसा भालेकरांना मिळाला नाही' अशी खंत त्यांच्या समग्र वाङ्‌मयाच्या प्रस्तावनेत दिसते. जिरायती कोरडवाहू शेतकऱ्याला सुगीनंतर हत्यारबंद होऊन स्वारी-शिकारीला फुरसद असे. तशी ओलिताची सोय असणाऱ्या, मळा पिकविणाऱ्यांना मिळत नसावी. परिणामतः गावकीच्या कारभारात त्यांना अधिकारपदे मिळाली नाहीत.

माळ्यांमध्ये संस्थानिक, जहागीरदार, इनामदार, देशमुख, पाटील दिसत नाहीत याचे कारण त्यांना कारभारात फारशी गोडी वाटत नसावी. शेती हाच त्यांचा आवडीचा, मनापासून करण्याचा उद्योग असावा असे दिसते. राज्यकारभार आणि राजकारणाविषयी माळ्यांमध्ये असणारे औदासीन्य कमी होण्याला विसाव्या शतकात थोडीशी सुरुवात झाली. अजूनही हे औदासिन्य किंवा अलिप्तता गेली आहे, असे म्हणता येणार नाही. राजकारण हे करिअर करणारे कार्यकर्ते अठरा-विसाव्या वर्षी तसा निर्णय घेतात आणि पुढे पंधरा-वीस वर्षे धीर धरून संधीची वाट पाहतात. संधी मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे राजकारण हा जुगारच असतो. माळ्यांमध्ये अशी जुगारी प्रवृत्ती नाही. त्यामुळे आपण पत्करलेल्या पेशामध्ये स्थिर होणे आणि त्यातून फुरसद मिळाल्यावर राजकारणात किंवा समाजकारणात रस घेणे असा माळ्यांचा प्राधान्यक्रम असतो. मग तो पेशा शेती असो, व्यापार असो, वकिली असो, वैद्यकी असो की प्राध्यापकी असो. त्यात स्थिर आणि यशस्वी होण्यासाठी माळी तरुण आपली शक्ती आणि बुद्धी केंद्रित करीत असतो. त्यामुळे एलएल.बी. झाल्यावर सनद काढली, नावामागे अ‍ॅड, असे लिहायला सुरुवात केली आणि प्रत्यक्ष वकिली न करता राजकारण केले अशी उदाहरणे माळ्यांमध्ये क्वचितच दिसतात.

राजकारणाचा व्यक्तीप्रमाणे कुटुंबाला आणि जातीलाही नाद असावा लागतो. घरातील एक मुलगा पैलवान करतात तसा राजकारणी करावा लागतो. त्याला कुटुंबाने, जातीने सांभाळावे लागते. माळ्यांमध्ये तसा नाद नसल्याने राजकारणात पडू इच्छिणाऱ्या माळ्याला सुरुवातीची बरीच वाटचाल एकट्याने करावी लागते. सार्वजनिक जीवनाच्या दृष्टीने आधुनिक काळात माळी समाजात महात्मा फुले आणि रावबहाद्दर नारायण मेघाजी लोखंडे ही दोन फार मोठी माणसे होऊन गेली. मात्र त्यांनी काही फक्त माळी समाजाचे पुढारीपण केले नाही.

शेतकरी, अशिक्षित, दलित, दीनदुबळ्या अशा साऱ्यांचेच किंवा मजुरांचे प्रश्न त्यांनी मांडले. त्यांना संघटित केले. त्यांच्यासाठी संस्था काढल्या. सत्यशोधक चळवळ किंवा पुढे निघालेला ब्राह्मणेतर पक्ष हा काही फक्त माळ्यांचा नव्हता. बहुजन समाज या व्यापक वर्णनात ज्यांचा समावेश होतो त्या साऱ्यांसाठी या चळवळी चालल्या होत्या. महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्त्व त्यांच्या हयातीत फारच थोड्यांच्या लक्षात आले होते. महात्मा फुले यांच्या अंत्यविधीच्या वेळी सावित्रीबाईना मडके धरण्याची वेळ आली होती, यावरून जातीतून त्यांना किती कडवा विरोध होता हे दिसते. इतकेच नव्हे तर असा धर्मद्रोही माणूस फुल्यांच्या घरात जन्मला महणून आम्हांला लाज वाटते, अशी विधाने फुले कुटुंबातील व्यक्तींनीच केली होती. पुढे अशी विधाने करणाऱ्यानी माफी मागितली ही गोष्ट अलाहिदा.

एकजातीय होण्याची प्रक्रिया

अर्थात या प्रकाराबाबत माळी जातीला दोष देता येणार नाही. समाजाच्या खूप पुढे जाणाऱ्या लोकोत्तर व्यक्तींना सर्वात जास्त त्रास स्वत:व्या जातीकडूनच होतो आणि नंतर जातच त्यांना डोक्यावर घेते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. महात्मा फुले हे विलक्षण लोकोत्तर पुरुष झाले होते. त्यांचे आकलन होण्याइतकी त्या काळात समाजाची प्रगती झाली नव्हती. नारायण मेघाजी लोखंडे, कृष्णराव भालेकर अशी काही मंडळी दिसतात. मात्र त्या काळात जातीचे धुरीणत्व रंगोबा लड़कत, बळवंतराव सातव अशा पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठित असणाऱ्यांकडे होते.

समाजाचे स्वाभाविक पुढारी पारंपरिक प्रतिष्ठित असतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. माळी त्याला अपवाद नव्हते एवढेच. मराठा हा शब्द महाराष्ट्रातील लोक अशा व्यापक अर्थाकडून एकजातीय होण्याची प्रक्रिया विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली. मराठा म्हणजे सर्व ब्राह्मणेतर अशा समजुतीने डेक्कन मराठा असोसिएशनमध्ये गेलेले कृष्णराव भालेकर- तेथे एकजातीय हित पाहिले जाते अशा अनुभवामुळे बाहेर पडले. त्यानंतर माळी शिक्षण परिषद भरविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याच सुमाराला तुकाराम नामदेव गिरमे हे अशाच प्रयत्नांत होते. पुढे 1910मध्ये माळी परिषद झाली त्या वेळी मात्र त्यात कृष्णराव भालेकर नव्हते. कायदेमंडळांच्या निवडणुका सुरू झाल्या त्याच सुमाराला निरनिराळ्या जातिसंस्था स्थापन झाल्या.

जात संघटित होणे याबरोबरच शिक्षणाला उत्तेजन देणे असाही या संस्थांचा हेतू होता. माळी जातीमध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्नशील असणारे तुकाराम नामदेव गिरमे हे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून नावाजलेले के.टी.गिरमे यांचे वडील. तुकाराम नामदेव गिरमे 1904 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक झाले होते. त्यांचे वडील नामदेव संभाजी गिरमे पुण्याचे सिटी सर्व्हेअर होते. माळी समाजातील जुनी सुशिक्षित घराणी आहेत त्यांतील गिरमे घराणे होते व त्यांनीच शिक्षण प्रसारात पुढाकार घेतला होता. या प्रयत्नांचा परिणाम होत होत पुढे 1963 मध्ये अरुण लक्ष्मण कुदळे आणि रंजना यमाजी अभंग हे माळी विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.

1964 मध्ये अशोक निरफराके हा विद्यार्थी सर्वप्रथम आला होता. त्यानंतर आजतागायत शालान्त परीक्षेच्या गुणवत्ता यादीत कुणी ना कुणी माळी विद्यार्थी सातत्याने दिसतात. आजची माळी समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती पाहिली तर शंभर वर्षांपूर्वी माळी अतिशय खडतर अवस्थेत जीवन जगत होते, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. इंग्रजी राजवटीत सावकारीचे थैमान सुरू झाल्याने शेती आणि शेतकऱ्यांची जी दैन्यावस्था झाली तिचा फटका शेती हाच व्यवसाय असणाऱ्या माळ्यांनाही बसला. त्यातच गावगुंडीचीही भर पडली. बहुतेक माळ्यांच्या जमिनी मारवाडी सावकारांनी हडप केल्या होत्या. पाटील-पटवारी त्यांच्या बैलजोड्‌या, गाड्या सरकारी बिगारकामासाठी नेत, सरपण आणि कडबा नेत.

माणसांनाही वेठबिगार करायला लावत. चोपडा तालुक्यात एका लग्नविधीत उशीर होईल म्हणून पाटलाची परवानगी मागितली असता त्याने पंचवीस रुपयांची मागणी केली आणि त्याखेरीज भटजी पाठविणार नाही असेही सांगितले. भटजीशिवाय विधी उरकला गेला. मात्र वऱ्हाड परत जाण्याच्या वेळी पाटलाला पंचवीस आणि महारांना पाच रुपये दिल्याखेरीज वऱ्हाड सोडणार नाही म्हणून दहा दिवस माळ्यांचे वऱ्हाड अडविले. माळ्यांनी फिर्याद केल्यावर त्यांच्यासारखा निकाल झाला, पण पाटलाला शिक्षा झाली नाही.

गावगुंडी

माळी कुटुंबातील विधवा, अज्ञान मूल यांच्या जमिनी पाटील-पटवारी दंडेलीने स्वतःच्या ताब्यात घेत, महाराष्ट्रभर हा त्रास झाला. अनेकांना मळे ओस टाकावे लागले. गावे सोडावी लागली. गावगुंडीच्या या त्रासाला वाचा फुटली ती माळी शिक्षण परिषदेच्या निमित्ताने झालेल्या संघटित प्रयत्नांमुळे. माळ्यांच्या जमिनी हडप करण्याचा आणखी एक चमत्कारिक प्रकार झाला होता. विसापूर (ता.तासगाव) येथे अप्पा रावजी या ऋणकोची जमीन हिराचंद गुजर या सावकाराने विकायला लावली. मात्र अप्पा माळी जामीन राहणार असेल तर विकणार नाही, असे मान्य केले. त्यानुसार अप्पा माळ्याने आपली जमीन व घर तारण म्हणून लिहून दिले.

अप्पा रावजीने त्याला आपली चारशे रुपयांची जमीन देण्याचे कबूल केले होते. प्रत्यक्षात अप्पा रावजीने जमीन देण्याची टाळाटाळ केली आणि हिराचंदने अप्पा माळ्याची जमीन आणि घर जप्त करून ही जमीन कसण्यासाठी अप्पा रावजीला दिली. हा सरळसरळ अप्पा माळ्याची जमीन हडप करण्याचा दोघांमधील कट होता. त्यामुळे बिथरलेल्या अप्पा माळ्याने भर बाजारात हिराचंदचा खून केला. गुन्हा कबूल करून तो फासावर गेला. मात्र साऱ्याच कर्जव्यवहाराची चौकशी करण्याची त्याने मागणी केली. हा प्रकार 1873-74च्या सुमाराला घडला.

Tags: ना. स. फरांदे छगन भुजबळ के. टी. गिरमे जोतिबा फुले राजकारणापासून अलिप्त इतिहास मेहनत माळी जातवास्तव n. s. farande chhagan bhujbal k. t. grime jotiba phule apart from politics history diligence mali reality of caste weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके