डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जाधवांसारख्या समीक्षकाची समीक्षाही वाचा!

आपल्याकडे राजकारणात, समाजकारणात काम करणारे लोक साहित्य वाचतात की नाही, हा खरोखर प्रश्न आहे. जर ते वाचत असतील तर मला त्यांना अस सांगावेसे वाटते की, नुसतेच ललित साहित्य वाचू नका. जाधवांसारख्या समीक्षकाची समीक्षाही वाचा. म्हणजे ज्या जनतेसाठी आपण काही करतो असा दावा ते करत असतात, ती जनता म्हणजे काय असते ते त्यांना कळेल.

ज्यांची समीक्षा मनापासून वाचावी, जीवनाविषयी नवं काही आकलन प्राप्त व्हावं, अशा प्रकारचं जे थोडं समीक्षालेखन मराठीमध्ये लिहिलं गेलेलं आहे, त्यातलं जाधवांचं लेखन आहे. जाधवांनी केवळ ललितसाहित्यकृतीवरच लिहिलेलं नाही. साहित्याच्या आणि जीवनाच्या संदर्भात वेळोवेळी पडणारे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा वेध घेतलेला आहे. आणि शेवटी या प्रश्नांचा रोख जीवनाकडेच असतो. जाधवांच्या समीक्षेविषयी बोलताना एक मोठी जबाबदारी अशी आहे की, त्यांनी केलेल्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगत असताना सरधोरटपणे काही सांगता येणं शक्य नाही. परंतु एक सूत्र त्यातून मी काढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी असं म्हणून इच्छितो की, जाधव हे साहित्याचा सांस्कृतिक अंगाने विचार करतात. ते संस्कृतिनिष्ठ समीक्षक आहेत. मराठीमध्ये ‘कल्चरल थिअरी ऑफ लिटरेचर’ म्हणून अजून कुणी काही लिहिलेलं नाही. तसा सिद्धान्त अजून कुणी मांडलेला नाही. पण अशा प्रकारचा सिद्धान्त जर मांडायचा झाला, तर त्यात दि. के. बेडेकर आणि त्यानंतर रा. ग. जाधव यांच्या लेखनाचा बारकाईने अभ्यास केल्याशिवाय हा सिद्धान्त मांडता येणार नाही.

साहित्याचा सांस्कृतिक अंगाने अभ्यास म्हणजे काय? तर कुठलीही साहित्यकृती मानवी जीवनाविषयी जे काही भाष्य करीत असते, ते अंतिमत: सांस्कृतिक भाष्यच असते. संस्कृतीतून साहित्याची निर्मिती होते. साहित्यात संस्कृतीचे चित्रण असते, साहित्यकृती संस्कृती समृद्ध करीत असते. संस्कृतीच्या पलीकडे साहित्य असूच शकत नाही. किंबहुना मानवी संस्कृतीच्या शिवाय साहित्यलेखनही शक्य नसतं. या ठिकाणी संस्कृतीचा अर्थ भारतीय संस्कृती, मराठी संस्कृती असा नाही. संस्कृती म्हणजे ज्यायोगे आपण जीवंत राहू शकतो ती गोष्ट. ज्यायोगे आपण जिवंत राहू शकतो, चलनवलन करू शकतो, ज्यायोगे आपला पुढचा आयुष्याचा प्रवास होऊ शकतो, अशा प्रकारच्या मानवाने शोधून काढलेल्या सर्व प्रकारच्या रीती म्हणजेच संस्कृती.

त्याचीही अर्थात दोन अंगं आहेत. भौतिक अंग आहे व आध्यात्मिक अंग आहे. या दोनही अंगांनी संस्कृती ओळखली जात असते. संस्कृतीचीच निष्पत्ती साहित्य असते आणि साहित्यामध्ये संस्कृती असते. जर संस्कृती वगळून साहित्याचा विचार करायचा झाला, तर तो केवळ आपण कलेवर विचार करतो त्या रूपबंधाचा सुद्धा विचार संस्कृतीशिवाय होणं शक्य नाही. थोडक्यात, साहित्याचा सांस्कृतिक अंगाने अभ्यास हीच साहित्याच्या अभ्यासाची सर्वांत उत्तम पद्धती आहे, अशा निष्कर्षापर्यंत मी आता आलेलो आहे. यामुळे या प्रकारचे लेखन जाधवांनी केलेले आहे आणि ते किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव परत एकदा झाली. आपल्याकडे राजकारणात, समाजकारणात काम करणारे लोक साहित्य वाचतात की नाही, हा खरोखर प्रश्न आहे. जर ते वाचत असतील तर मला त्यांना अस सांगावेसे वाटते की, नुसतेच ललित साहित्य वाचू नका. जाधवांसारख्या समीक्षकाची समीक्षाही वाचा. म्हणजे ज्या जनतेसाठी आपण काही करतो असा दावा ते करत असतात, ती जनता म्हणजे काय असते ते त्यांना कळेल.

(साहित्याच्या सांस्कृतिक सिद्धान्ताकडे : संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव)

Tags: Vasant Abaji Dahake वसंत आबाजी डहाके समीक्षक समीक्षा साहित्यिक मराठी साहित्य मृत्युलेख रा ग जाधव Marathi Liturature Obituary R G Jadhav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वसंत आबाजी डहाके
vasantdahake@gmail.com

वसंत आबाजी डहाके  हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. त्यांच्या 'चित्रलिपी' या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके