डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विद्रोहाची कविता : कवितेचा विद्रोह

1960 नंतरच्या साहित्याचे वाचन आणि अध्ययन या दोन्ही गोष्टींसाठी समाजभान आणि समाजशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. ते वाचकांसाठी आवश्यक आहे. लेखक-कवींसाठी, टीकाकारांसाठीही आवश्यक आहे. वर्तमान भारतीय समाज, त्या समाजाचा इतिहास आणि त्या समाजाचे साहित्य यात काही अनुबंध असला पाहिजे याची जाणीव या साहित्यामुळे झालेली आहे. यातून पीडितांचे साहित्यशास्त्र उदयाला येईल. ते सगळ्या शोषित समाजाचे असेल. आणि ती परंपराही मोठी आहे. खरे तर सगळी कविता मुळात विद्रोहातून आलेली आहे. आणि एतद्देशीयांनी लिहिलेली कविता हा कायमचा विद्रोह ठरलेला आहे. म्हणून आपल्या परंपरेत कविता लिहिणे हाच मुळात विद्रोह ठरला आहे. एरवी तुकारामाचे अभंग बुडवावयाचे काही कारण नव्हते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या साहित्याच्या संदर्भात साठ आणि सत्तरची दशके विशेष महत्त्वाची आहेत. या दशकांमध्ये भारतीय राज्यघटनेचा स्वीकार, सार्वत्रिक निवडणुका, डॉ. आंबेडकरांचे धम्मचक्रप्रवर्तन, राज्यांची भाषावार पुनर्रचना, देशातल्या प्रमुख विद्यापीठांतल्या विद्यार्थ्यांच्या असंतोषाचे प्रकटीकरण, नक्षलवादी आंदोलन, फ्रान्स-जर्मनी इत्यादी देशांतल्या विद्यार्थ्यांची बंडे, व्हिएतनाम युद्ध, चीनमधल्या युवकांची लाल क्रांती, अमेरिकेतील बीट पिढी, ब्रिटनमधील संतप्त युवकांची पिढी, प्लॉवर पॉवर, नेहरू-नासेर-चे गेवारा, हो चि मिन्ह, मार्टिन ल्यूथर किंग इत्यादी महापुरुषांचे मृत्यू, देशव्यापी दुष्काळ, महागाई-भ्रष्टाचार-लाल फीतशाही इत्यादी घटितांनी युवकांच्या मस्तकांना घेरलेले होते. 1960च्या आसपासची पिढी असंतुष्ट होती. या देशातल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक-धार्मिक स्थितीमुळे ती अशांत होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दहा वर्षांत प्रजासत्ताकाचा मूलाधार अशी समता प्रस्थापित झालेली नव्हती. सर्वच स्तरांवरधी विषमता अधिकच वाढलेली होती. ज्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने पाहिलेली होती आणि ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले होते त्यांना बाजूला उचलून अवसरवादी तत्त्वे सत्तासंपादनाच्या कार्यात सक्रिय झाली होती, साध्य-साधनविवेक नष्ट झाला होता. मूल्य ऱ्हास आणि समाज-विघटन हे एक कटू सत्य होते. सांसदीय राजकारणाचे वर्चस्व आणि दबाव वाढत चालला होता. राज्यात आणि केंद्रात सत्तेच्या आसपास वावरणाऱ्यांच्या व्यवहारातून अत्यंत आत्मकेंद्री आणि स्वार्थी मनोवृत्ती व्यक्त होऊ लागली होती.

गरिबी, महागाई, बेकारी, दुष्काळ, जातीयता इत्यादींच्या संदर्भात अक्षम्य उदासीनता आणि परिवर्तनाच्या पोकळ घोषणा यांतून त्यांच्या कथनातील आणि वर्तनातील विसंगतीचे दर्शन होऊ लागले होते. सत्तालालसेमुळे अस्थिर बनलेले शासन, भांडवलदार आणि बागायतदार यांच्या बोटांवर नाचणारे प्रशासन, मिश्र अर्थव्यवस्था आणि सामंतवादी समाजव्यवस्था, सवर्ण आणि दलित यांच्यातील तेढ, शहर आणि खेडे यांच्यातील वाढत चाललेली दरी, मूल्यहीनता, भय, असुरक्षितता, एकाकीपण हे तत्कालीन वास्तवाचे विविध पैलू होते. पन्नासच्या दशकाच्या शेवटच्या चरणात लिहिलेल्या एका लेखात नीरद चौधुरी यांनी तत्कालीन सांस्कृतिक स्थितीविषयी 'निश्चल स्थिती' असा शब्दप्रयोग केला होता. (सेमिनार, सप्टेंबर 1994) त्या वेळच्या सांस्कृतिक क्षेत्रात भाई-भतीजावाद आणि भ्रष्ट तत्त्वांचा प्रभाव वाढत चाललेला होता. भ्रष्टाचार तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पसरलेला होता. पुढे एन.जे.नानपोरिया यांनी म्हटल्याप्रमाणे गोऱ्या हातामधून मेकॉलेच्या काळ्या पुत्रांच्या हातात सत्तेची सूत्रे आली खरी, पण सामाजिक, प्रशासनिक आणि राजकीय स्वातंत्र्यासंदर्भात काहीही घडले नाही. (आउटलुक, 18 ऑगस्ट 1997) नेहरूयुगातील अंतर्गत विसंगती उघड झाल्या होत्या आणि त्या वेळच्या एका जाहिरातीतील प्लुटो नावाचा कुत्रा जसा गोंधळून गेलेला होता, तसा काही काळ सगळा देशच संभ्रमाच्या अवस्थेत होता. 

याच काळात देशातल्या भिन्नभिन्न भाषांच्या साहित्याच्या जगात एका नव्या पिढीचा उदय झाला होता. तेलगूत दिगंबर पिढी, मराठीत असो पिढी, हिंदीत अ-कवितावादी पिढी. लघुनियतकालिके निघाली, साम्यवादाचा आणि नक्षलवादाचा प्रभाव असलेले लेखन आले. पुढे सत्तरच्या दशकात दलित साहित्याचे आणि त्यानंतरच्या काळात स्त्रीवादी साहित्याचे आंदोलन आले. वर्गभेद, जातिभेद आणि लिंगभेदजन्य शोषणाच्या विरोधात कविता लिहिल्या गेल्या. साठोत्तरी पिढीच्या साहित्यात निषेध, विरोध, प्रतिवाद, प्रतिरोध, सामना आणि विद्रोह यांच्या विविध मुद्रा उमटलेल्या दिसतात. हा साहित्य, समाज, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांतील निश्चल स्थितीच्या संदर्भातला असंमतीचा उच्चार होता. हा असंमतीचा उच्चार म्हणजे विद्रोहाचा उच्चार होता. विद्रोह हा एक भारलेला शब्द आहे.

आपला काळ आणि विचारप्रणाली यांनी तो अर्थसंपन्न बनलेला आहे. विद्रोह हे एक नैतिक मूल्य आहे, तसेच ती जागृतीची जाणीवही आहे. निषेधापासून विद्रोहापर्यंतच्या, अत्यंत जोखीम असलेल्या या वाटचालीत आपल्या काळाला आणि आपल्यातील वर्ग-जात-लिंगभेदाच्या स्वरूपाला समजून घेणे निहित आहे. 2 विद्रोह ही एक संकल्पना आहे. असंतोषाच्या आणि अव्यवस्थेच्या स्थितीतून विद्रोहाचा जन्म होतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक कारणांतून असंतोष उत्पन्न होतो. विद्रोह ही एक मानसिक स्थिती आहे, तशीच ती सामाजिक-राजकीय स्थितीदेखील आहे. विद्रोहाच्या समाजशास्त्राची आणि सौंदर्यशास्त्राची कल्पना आपण करू शकतो. विद्रोह हा शब्द राजकीय, सामाजिक, धार्मिक अथवा आर्थिक सत्तेच्या संदर्भात वापरला जातो. सत्तेच्या विरुद्ध म्हणजे विद्रोह. सर्व प्रकारच्या सत्ता राजकीय सत्तेचीच रूपे असतात आणि सारे विद्रोह राजकीय सत्तेच्या विरोधात असतात. त्यामुळे विद्रोह ही एक राजकीय संकल्पना ठरते, तशीच ती व्यक्तींची अथवा समूहाची विशिष्ट स्थितीही असते. डॉ. हरदयाल यांनी विद्रोहाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे; "किसी व्यक्ति या व्यक्ति-समूह के द्वारा किसी सत्ता, व्यवस्था, परंपरा, रूढी आदि का अस्वीकार और उसे समाप्त करने का प्रयत्न विद्रोह 

है । व्यवस्था आदि का संबंध राजनीति, समाज, नैतिकता, धर्म आदि किसी से भी हो सकता है । केवल राजनैतिक सत्ता या व्यवस्था का अस्वीकार, विरोध और उसे समाप्त करने का प्रयत्न मात्र ही विद्रोह नहीं है । विद्रोह का केवल एक प्रकार विशेष है । विद्रोह राजनैतिकतेतर सत्ताओं एवं व्यवस्थाओं के खिलाफ भी हो सकता है ।’’ (विद्रोह और साहित्य : नरेंद्र मोहन, देवेन्द्र दूस्सर). 

मी या निबंधात 'राजकीय' या शब्दाचा वापर केवळ राजकीय सत्ता या अर्थाने करीत नसून सर्व प्रकारच्या सत्तेचे राजकारण मला अभिप्रेत आहे. साहित्यातील विद्रोहाची अभिव्यक्त आणि साहित्याचे विद्रोहात्मक कृतीत होणारे रूपांतर या दोन भिन्न गोष्टी असल्या तरी त्यातील एकरूपता आपण पाहू शकतो. 'विश्वाच्या विनाशाच्या विरोधातील रक्षणाचे एकमेव साधन म्हणजे सर्जनशील कृती’ - केनेथ रेक्सरोंथच्या या विधानात (प्रोटेस्ट : जीन फेल्डमन, मॅक्स गार्टनबर्ग) ‘के’ला किंवा कवितेला किंवा कोणत्याही सर्जनशील कृतीला विद्रोहाचे रूप म्हणून पाहिलेले आहे. सर्जनात्मक कृतीचे राजकीय कृतीत होणारे रूपांतर येथे अभिप्रेत आहे. 'आलोचना’च्या एका संपादकीयात (जुलै-सप्टेंबर 1968) लिहिलेले आहे - निस्संदेह एक अर्थ में सभी कविताएँ राजनीतिक होती हैं- वे भी जिनमें कवि अपने राजनीतिक संदर्भ के प्रति सचेत नहीं होता, इस रुख की दंद्वात्मकता को बर्टोल्ट ब्रेख्ट ने इन प्रसिद्ध पंक्तियों में जैसे हमेशा के लिए व्यक्त कर दिया है : यह कैसा जमाना है कि पेडों के बारे में बातचीत भी लगभग जुर्म है क्यों कि इसमें बहुत सारे कुकर्मों के बारे में चुप्पी शामिल है। जब एक चुप्पी भी संदर्भ के द्वारा अर्थ पा जाती है तो फिर किसी भी कविता का राजनीतिक अर्थ प्राप्त कर लेना स्वयंसिद्ध  है। जागरूक कवि अपने कवि-कर्म के दौरान सतर्कता के साथ इस राजनीतिक संदर्भ को परिभाषित करते चलते हैं और इस प्रकार सीधे-सीधे राजनीतिक विषयोंपर कविता न लिखते हुए भी अपनी प्रत्येक रचना को एक निश्चित राजनीतिक अर्थ देते हैं। महत्त्वपूर्ण है राजनीतिक संदर्भ का गहरा और सही बोध। - नामदेव ढसाळ यांनी ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’च्या भूमिकेत म्हटले आहे; ‘‘माझ्या वर्गीय हिताच्या दृष्टीने कविता आणि राजकारण या दोन परस्पर विभिन्न गोष्टी राहिलेल्या नाहीत.

मी एखादी कविता लिहितो म्हणजे एखादी राजकीय कृतीच करत असतो. कविता लिहिणे हे स्वतःच एक राजकीय कृत्य आहे, विद्रोह आहे. उपभोक्तावृत्तिप्रधान समाज, झुंडशाही, अंधकारमय वर्तमान काळ, भूतकाळाशी तुटलेले नाते, भविष्याविषयी अशाश्वती, अस्तित्वाविषयी निरर्थकतेचा अनुभव, आत्म-परकीयता, दहशत, भय, विनाशक तत्त्वांचा साक्षात्कार, खंडिततेचा-मुळे उखडलेली असण्याचा प्रत्यय, वर्ग-जाति-लिंगभेदजन्य शोषण : कविता या सगळ्या गोष्टींना नकार देते. स्वस्थ, सुंदर, चैतन्यमय जीवनाची ओढ आणि विनाशक-मृत्युमय प्रत्यक्ष वास्तव या जात्यात कविता भरडली जाते आणि पुनःपुन्हा रचली जाते. मराठीत डाव्या विचारांच्या आणि दलित साहित्याच्या संदर्भात विद्रोह या शब्दाचा उपयोग विशेषतः झालेला दिसतो. त्याआधी ‘बंड’ अथवा 'बंडखोरी' हे शब्द वापरले जात. उदाहरणार्थ, 'प्रस्थापितांच्या विरोधात बंड, 'बंडखोर पिढी', वगैरे... 

जनार्दन वाघमारे यांनी दलित साहित्याच्या संदर्भात लिहिलेल्या एका लेखात (दलित साहित्य चर्चा आणि चिंतन - गंगाधर पानतावणे) 'बंडखोरी' आणि 'विद्रोह' हे दोन्ही शब्द वापरलेले आहेत. त्यांच्या मते दलित साहित्याचे कार्य शोषक संस्कृतीच्या विरोधात विद्रोह आणि शोषित, पीडित लोकांशी संवाद असे दोन्ही प्रकारचे आहे. या लढाईच्या पहिल्या चरणात विद्रोह, तर शेवटच्या चरणात संवाद असेल. 'विद्रोह कविता' या दलित कवितेच्या संकलनाच्या प्रस्तावनेत केशव मेश्राम यांनी 'लढाऊ', 'झुंजार', 'संघर्षरत', 'बंडखोर' इत्यादी शब्द सीमित अर्थाचे असल्याचे म्हटले असून ‘विद्रोह’ या शब्दाचा स्वीकार केलेला आहे. ते म्हणतात; ‘‘द्रोहामध्ये माणसाला लांच्छन असणारा विश्वासघात येतो. विद्रोहात स्वाभाविकता असते. स्वीकाराच्या आधी परिपूर्ण विचार करून उद्भवलेला नकार असतो.

आणि नकारामागे विचार असतो. आत्मबंधनाचा क्लेशकारक व नगण्य तरवणारा दूरगामी विचार म्हणून विद्रोह हा ठाम विचाराचा गतिमान शब्द ठरतो. योग्य दिशेला नेणारी कृति-उक्तींची कलात्मक आविष्कृती ठरते. सुरुवातीला परंपराशरण साहित्याच्या विरोधात विद्रोहाची अभिव्यक्ती झाली. नव्या पिढीने ‘आवां गार्द’ची मुद्रा धारण केली आणि साहित्याची भाषा आणि सांकेतिकता यांच्या विरोधात विद्रोह केला. ‘साठोत्तरी पीढी का अधिकांश साहित्य एक भिन्न स्तर का नहीं, सर्वथा भिन्न परिवेश और भिन्न संदर्भ का साहित्य है । कथ्य, तथ्य और मूल्यों की दृष्टि से यह नयी कविता से सर्वथा भिन्न आंदोलन है. गोविंद रजनीश यांनी (आलोचना, जुलाई-सितंबर 1978) समकालीन हिंदी कवितेच्या संदर्भात व्यक्त केलेला हा विचार साठोत्तरी मराठी कवितेलाही लागू पडतो. समकालीन राजनीती आणि लोकतंत्र हेदेखील समकालीन तरुण कवींच्या अस्वस्थतेचे कारण होते. लीलाधर जगूडी यांच्या कवितेविषयी लिहिताना परमानंद श्रीवास्तव यांनी म्हटले आहे, "आश्चर्य नहीं कि युवा कवियों के लिए पहली बेचैनी इस देश की आजादी को लेकर है, जिसके पच्चीस-तीस साल भ्रष्टाचार, सत्तालोलुपता, तात्कालिक स्वार्थ, क्षेत्रीयता, जातिवाद, पूँजीवादी सामंतवादी रुझान, हिंसा आदि असंगत तालमेल से घिरे रहे हैं और इस प्रकार समकालीन राजनीति के परिचय-प्रसंग को केवल व्यर्थता बोध में बदलते आये हैं।’’ (आलोचना, जुलाई-सितम्बर, 1978) या काळात नव्या पिढीतील काही कवींनी लिहिले होते :

"मी नाकारतो
सात च्यूतिये मेल्यानंतर जन्मणाऱ्या
 भैय्यासारखं मुर्दाड जगणं 
मी भिडवतो डोळा 
आणि पाहतो, नकाशातील सर्वदूर 
काळोखात 
सर्वभर भूक, हाहाकार, दंगली, कर्फ्यू, प्रेतं
सर्वभर रक्त
एक अशांत आसमंत’’ 

(प्रकाश जाधव)

‘‘जातीची पैरण लटकवू
पैरण लटकवू
 देशधर्माच्या गुंड्या लावू
 बाई गुंड्या लावू 
संस्कृतीची नक्षी रेखू 
बाई नक्षी रेखू 
तत्त्वांची झूल झुलू
 बाई झूल झुलू

(मनोहर ओक)

‘‘आयात
नियंत्रणात कुजत मरा
जनावरांचे खाणे खाऊन 
पेंड मिळणार माणशी
व्हिटॅमिन 
गंजणारे लोखंड
स्क्रॅप’’

(वसंत दत्तात्रेय गुर्जर)

‘पंधरा ऑगस्ट
एक संशयास्पद महाकाय भगोष्ठ
 स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे  
रामराज्याच्या कितव्या घरात आपण ऱ्हातोत 
उद्गम विकास उची संस्कार संस्कृती 
कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा.’

(नामदेव ढसाळ)

या ओळींमधून कवींनी आपल्या काळाचे यथार्थ चित्रण केलेले आहे. 'स्वातंत्र्य' हा शब्द मंत्रशक्तिविहीन झालेला होता. तो आतून पोकळ झालेला होता. साठ आणि सत्तरच्या दशकातील स्थितीचे विश्लेषण करताना गेल ओमवेट यांनी म्हटले आहे : साठच्या मध्यात, स्वातंत्र्याची पहिली मस्ती उतरल्यानंतर विकासाचे प्रयत्न संकटाच्या अवस्थेत होते. उद्योग आणि कृषी या दोन्ही आघाड्यांवर गतिरोध उत्पन्न झाला होता. अन्नाची आयात आणि अमेरिकेचा दबाव या दोन गोष्टींमधून विकासाच्या मार्गाने आपण आश्वासित आत्मनिर्भरता प्राप्त करू शकत नाही हे स्पष्ट झाले होते. कामगार, शेतकरी, शेतीवरील मजुरांची आंदोलने होऊ लागली होती, 1968 मधल्या नक्षलबाडी विद्रोहाने क्रांतीच्या नव्या युगाचे चिन्ह रेखले होते. सत्तरच्या दशकाच्या पहिल्या चरणातच महाराष्ट्रात लढाऊ दलित पँथर्स समोर येऊ लागले. भारतीय राजकीय रणभूमीवर नवी सामाजिक आंदोलने उभी राहू लागली होती (दलित व्हिजन्स), या काळातल्या स्थितीचे अंकन मराठी कवितेत झालेले आपण पाहतो, भारतातल्या अन्य भाषांमधल्या कवितांतही ते दृष्टीस पडते हे पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होईल.

‘सूचना विभागाच्या प्रत्येक पोस्टवर खुशाली आहे. चारही बाजूंना कंगालीच्या आसपास. कणीक नाही शिवीगाळी आहे
आणि ज्यात कुणीही नाही खाऊ इच्छीत अशी स्वतंत्रता एक उष्टी थाळी आहे.’ 
(लीलाधर जगूडी: इस व्यवस्था में) 
'तुझा खिन्नपणा असा 
की जो सांत्वन करू शकत नाही 
तुझ्या शुष्क स्तनांवर 
सरपटणाऱ्या तुझ्या मुलाचे 
तुझा सर्व झगमगाट उसन्या आणलेल्या नखऱ्याचा 
ठुमकत असतो रस्त्यावरून 
जरी आहेस तू उपाशी आई भारती! 
कुठे आहे तुझा अंतिम मुक्काम? 
कुठे गं जाणार तू आई? 
वंदे मातरम् वंदे मातरम्’

(चेराबंडाराजू : वन्देमातरम्)

‘भारतवर्ष, धानाच्या शेतावरून
धारा 144 काढून टाक, 
नाही तर या वर्षी काय खाशील? 
भारतवर्ष, उद्या नक्षलबाडी 
पाकिस्तानच्या संस्कृतीत 
आणि परंपरेत सामावली जाईल, 
आपला भविष्यकाळ कदाचित आपण 
आता आणखी सांभाळू शकणार नाही, 
चष्म्याची काच बदलून टाका, 
पृथ्वीवरचे सगळे महत्त्वाचे ग्रंथ 
व्हिएतनाममध्ये पाठवून द्या. 
हो, हो, पहा पहा, 
युद्ध थांबतं की नाही!’

(मलय रायचौधुरी : दंशन)

राजकीय संदर्भ आणि काव्यसंहिता यांच्यातला सरळसरळ संबंध येथे आपल्याला दिसतो. कवितेत समकालीन स्थितीचे चित्रण आणि समकालीन समाजाच्या रूपाची समीक्षा निश्चितच होत असते; कवीची भूमिका आणि विचारप्रणालीही व्यक्त होत असते. विद्रोहाची काव्यसंहिता सामाजिक-राजकीय संहितेच्या विरोधाचा उचार करीत असते हे पुढील उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. नवारुण भट्टाचार्य यांनी आपल्या 'ही मृत्यु-उपत्यका माझा देश नाही आहे या कवितेत लिहिले आहे : 
‘कविता लिहिण्याची हीच वेळ आहे 
जाहिरातीवर, भिंतीवर, स्टेंसिलवर 
आपल्या रक्ताने, आसवांनी, हाडांनी- 
कोलाज पद्धतीप्रमाणे हीच कविता लिहिण्याची वेळ आहे 
आत्यंतिक छळाने छिन्न-भिन्न झालेल्या चेहऱ्यावर 
दहशतीसमोर- व्हॅनच्या घाबरून टाकणाऱ्या उजेडावर
उघड्या टक्क डोळयांनी 
कविता उमजून देण्याची हीच वेळ आहे 
अडतीस बोअर पिस्तुल अथवा जे काही आहे 
हत्या करणाऱ्यांच्या जवळ 
त्या सगळ्यांना नाकारून 
हीच कविता वाचण्याची वेळ आहे.’ 
या कवितेत लिहिल्या-वाचल्या जाणाऱ्या कवितेविषयी तर लिहिलेले आहेच, कविता स्वतःच विद्रोहाची संहिता बनलेली आहे. कविता लिहिणे म्हणजे विद्रोहाची कृती करणे हा अर्थ येथे प्राप्त झालेला आहे. कवीने पुढे म्हटलेले आहे. ‘‘कवितेच्या गावांनी, कवितेच्या शहरांना घेरणे आवश्यक झालेले आहे. विचारधारा आणि युद्धनीती या दोन्ही गोष्टी या ओळीतून व्यक्त झालेल्या आहेत. व्यवस्था अथवा सत्ता एखाद्या संहितेसारखीच असते. तिचे स्वतःचे असे कथनरूप असते. तिचे स्वतःचे असे वाक्प्रचार असतात. कविता व्यवस्थेच्या संहितेच्या विरोधातकी संहिता असते. भट्टाचार्य यांच्या या कवितेत कविता आणि विद्रोह यांची एकात्मता आपल्याला दिसते. 
'बारकाईने पहा : मायाकोवस्की, हिकमत, नेरुदा, आरागाँ, एलुआर तुमच्या कवितेला आम्ही हरू दिलं नाही  
उलट एक देशव्यापी महाकाव्य लिहिण्याची योजना सुरू आहे 
गेरिला छंदात रचले जात आहेत सारे अलंकार. 
कविता लिहिणे म्हणजे व्यवस्थेत बदल घडवून आणणे होय. व्यवस्थेच्या प्रधान कथनरूपाच्या जागी कवितेच्या कथनरूपाला प्रस्थापित करायचे आहे. व्यवस्थेच्या कथनरूपातील ‘देशाहून विद्रोहाच्या कवितेतील देश' वेगळा असतो. 
‘ही मृत्यु-उपत्यका माझा देश नाही 
आहे हे खाटकांचे मनोरंजन स्थळ 
माझा देश नाही 
आहे हे विस्तीर्ण स्मशान माझा देश नाही 
आहे हा रक्तलांच्छित कत्तलखाना माझा देश नाही 
मी आपल्या देशाला पुन्हा धरून ठेवीन,’ 

राजकीय संहितेचे विरेचन करणे हे विद्रोही कवितेचे एक उद्दिष्ट असते. राजकीय संहिता उक्ती आणि कृर्तीनी विणलेली असते. त्या उक्तींना आणि कृतींना उसवून टाकल्यानंतर त्यांचा वास्तविक अर्थ कवितेतून व्यक्त होत असतो. व्यवस्थेने रचलेल्या देशाच्या संहितेची विरचना करून कवी आपल्या कवितेत आपल्या देशाच्या संहितेची संरचना करू इच्छितो. 'हा देश माझा नाही आहे' या ओळीचा अर्थ आम्ही रचलेला, वसलेला, मनाशी बाळगलेला हा देश नव्हे. ‘आपल्या’ देशाच्या संदर्भात कवीने म्हटले आहे; 'पुन्हा धरून ठेवीन. हा देश फुलांचा, पहाडांवर होणाऱ्या शेतीचा, हिरवळीचा, स्त्रियांचा, नदीचा देश आहे आणि व्यवस्थेने त्याला आमच्यापासून तोडले आहे. धूमिल, लीलाधर जगूडी, आलोकनंदा, गोरख पांडेय, पाश, नामदेव ढसाळ, प्रकाश जाधव, तुलसी परब, चेराबंडाराजू, इत्यादीच्या कवितांतून आपल्या देशाची रचना करण्याची जाणीव व्यक्त झालेली आहे. कवितेच्या संहितेत इतिहास, सुधारणा, संस्कृती, राजनीती इत्यादींच्या संहिता विघटित होतात आणि पुन्हा रचल्या जातात. नामदेव ढसाळ यांनी म्हटले आहे : प्रकाश आणि स्वातंत्र्य ही आहे जगाची शक्ती आणि कविता आहे. जगाचे हृदय ती जाणिवेला सखोलता देते ती भावनेला व्यापकता देते. ती रक्तातून उमललेल्या संवेदनाफुलांवर मोहित होते ती पूर्वजांच्या चुकांचा कर्तृत्वाचा, वैगुण्याचा, ऱ्हासाचा, विजयाचा, छळाचा इतिहास अधोरेखित करते. विद्रोहाच्या कवितेत समाजाच्या चेतन आणि अचेतन मनाचे सर्व स्तर उघडले जातात.

1960 आणि 70 ची दशके ही लघुनियतकालिकाची दशके होती. देशातल्या बहुतेक सगळ्या प्रमुख भाषांमध्ये लघुनियतकालिकांचे प्रकाशन होऊ लागले होते. ‘इंडियन रायटिंग टुडे'च्या एका अंकात (ऑक्टोबर-डिसेंबर 1969) लघुनियतकालिकाविषयी लेख छापलेले होते. संपादकीयात म्हटले होते; ‘‘ही (लघुनियतकालिके) व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह प्रकट करण्यासाठी निघाली. या विद्रोहात विवेकाच्या तुलनेत क्रोध अधिक मात्रेने व्यक्त झाला आहे. परंतु हा क्रोध उचित आहे असेच वाटते. काही रचनांवर बीट पिढीचा प्रभाव आहे आणि अधिक गंभीर रचनांवर युरोपातील अस्तित्ववादी साहित्याचे संस्कार आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर, भारतीय स्वातंत्र्याचा झगमगाट मंद झाल्यानंतर भारतीय साहित्य आघातजन्य स्थितीतून जात आहे. जे आदर्श मागील पिढीच्या साहित्याच्या समोर होते ते आता निष्प्रभ झालेले आहेत. विज्ञानात आणि सभ्यतेत प्रगती होऊनदेखील विश्वाच्या अस्ताव्यस्ततेचा प्रत्यय येऊ लागला होता. हा एक प्रकारचा मानसिक आघातच होता. भारतीय साहित्य आता मानवाचे मन आणि मानवाची स्थिती यांत अधिक खोलवर उतरू लागलेले दिसते.’’ 

लघुनियतकालिके ही आपल्या काळाची आणि आपल्या समाजाच्या भौतिक व मानसिक अवस्थांची अभिव्यक्ती होती. मराठीत 1955 पासून 1985 पर्यंत सुमारे 65 लघुनियतकालिके निघाली. 1961 पासून 1975 पर्यंत त्यांचा विशेष असा भर होता. सगळ्याच लघुनियतकालिकांमध्ये कवितेला प्रमुख स्थान दिले गेले होते, अशोक शहाणे यांची 'अथर्व', 'असो’, शशी प्रधान यांचे 'भारूड', 'राजा ढाले यांची 'आता’, 'येरू, 'दैनिक चक्रवर्ती' सतीश काळसेकर यांची 'हेमा', 'फक्त', 'तापसी' भालचंद्र नेमाडे यांचे 'वाचा', नामदेव ढसाळ यांचे 'विद्रोह’- ही लघुनियतकालिके विशेष प्रसिद्ध होती. नेमाडे 'असो’चे प्रकाशकही होते. नवी पिढी नवी संवेदनशीलता घेऊन येत असते. मराठीत 1960च्या आसपास नव्या पिढीचा उदय झाला. 1963मध्ये प्रसिद्ध झालेला अशोक शहाणे यांचा 'वाङ्मय आणि बांधिलकी' हा निबंध (मनोहर मासिक, नोव्हेंबर, डिसेंबर 1963) चर्चेचा विषय झालेला होता. या निबंधात पिढीची व्याख्या करताना शहाणे म्हणतात. "पिढी म्हणजे विशिष्ट कालखंडातली एकाच वयोमानाची माणसे नाहीत.

निव्वळच समकालीनांची पिढी बनत नाही... ते समवृत्तीचे असावे लागतात. त्या त्या काळच्या एकत्रित आयुष्यक्रमात समवृत्तीने जगणाऱ्यांचीच फक्त पिढी बनते. लघुनियतकालिके अशा समवृत्तीने जगणाऱ्या नव्या पिढीच्या अभिव्यक्तीचे माध्यम होती. त्यामुळेच एका भाषेतील लघुनियतकालिके चालवणाऱ्यांचा, त्यात लिहिणाऱ्यांचा दुसऱ्या भाषांतील लघुनियतकालिकांशी संबंध होता. ‘असो’मध्ये बंगालमधल्या क्षुधित पिढीचे लेखन अनुवादरूपाने छापले गेले. मराठीतील नवी पिढी हिंदीमधल्या गजानन माधव मुक्तिबोध, धूमिल, जगूडी, चंद्रकांत देवताले आदींच्या कवितेशी परिचित होती. मुंबईतल्या इंग्रजी लघुनियतकालिकाशीही त्यांचा संबंध होता. या देशात कदाचित पहिल्यांदाच समवृत्तीच्या साहित्याचा शोध सुरू झाला होता. 

लघुनियतकालिके स्थापित व्यवस्थेच्या विरोधात होती. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील व्यवस्थेच्या नियंत्रणाविषयी त्यांचा विरोध होता. न्यायसंस्था, प्रशासन, राज्यसंस्था, विद्यापीठे, प्रसारमाध्यमे ही सारी प्रस्थापित व्यवस्थेचीच अंगे आहेत याची जाणीव त्यांना होती. मात्र आरंभीच्या या लघुनियतकालिकांतील लिहिणाऱ्यांची लढाई साहित्याच्या व्यवस्थेपुरती सीमित राहिली आणि त्याविषयीचा खेदही त्यांनी व्यक्त केला, 'अबकडइ’ च्या पाचव्या अंकातील मुलाखतीमधूनही ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. परंतु लघुनियतकालिकांतल्या लेखनातून लैंगिक दडपणुकीचा व्रात्य आविष्कार झाला आहे असे समजणे चुकीचे होईल. या पत्रिकामधल्या कवितांतून निराशा, परकेपण, तुटलेपण, एकटेपण जरूर व्यक्त झालेले आहे, आणि या कवितांतून अश्लील आणि ऑगल समजल्या जाणाऱ्या शब्दांचाही हेतुपुरस्सर वापरही अवश्य आढळतो, तथापि ते नकारात्मक विद्रोहाचेच अस्वस्थ करणारे रूप होते असेच म्हटले पाहिजे. ही पिढी अंधाराशी लढत होती. 

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या एका कवितेत म्हटले आहे : ‘अंधार... आर्थिक.. शारीरिक... मानसिक... अंधार... समाजवादी... भांडवलवादी... धर्मवादी... कलमवादी... फुटीरतावादी.. आयावादी... गयावादी... सर्वोदयी... हा अंधार... सर्वपक्षीय.. सर्वसाक्षी... हा हा हा अंधार... आम्हां सर्वांचा... लोकमान्य... राजमान्य... विश्वमान्य... राष्ट्रव्यापी... अंधार...’ हा अंधार सामाजिक, राजकीय होता, तसाच तो अस्तित्वविषयक चिंतेतून उत्पन्न झाला होता यात काही शंका नाही. कोणताही प्रश्न बाहेरून आत येतो, तिथेच तो धुमसत राहतो, या ओळींमध्ये बांधिलकी आहे: ती आपल्या भोवतीच्या समाजाशी, त्याहून अधिक ‘स्व’शी आहे. अशोक शहाणे यांनी वर उल्लेखिलेल्या निबंधात म्हटले होते; "स्वातंत्र्य ही ज्याची त्याची स्वतःचीच एक स्थिती असते; ती वाढवल्याने वाढते आणि गमावल्याने जाते. सत्य नावाची चीज तर स्वतःच्या बाहेर धुंडाळून मिळत नाही.... म्हणजे आपण कसेही गेलो तरी शेवटी ह्या ‘स्व’ च्या, किंवा ‘स्वत्व’च्या मुद्यावरच येणार, हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत राहणे हीच वाङ्मयीन किंवा कोणत्याही कलावंताची सर्वांत मोठी बांधिलकी आहे. दिगंबर कवींनीदेखील याच प्रकारचे कथन केले आहे. 'आपण स्वतःशी सामना केला आहे? आपल्या स्वतःशिवाय अन्य कुणावर विश्वास ठेवू नका. आविर्भाव, आचार व्यवहार, चेहरे, सोंग या सर्वांच्या पलीकडे खराखुरा आत्मन् असतो. स्वतःवर.. आपला आपल्यावरच विश्वास ठेवा’ (इडियन रायटिंग टुडे, एप्रिल-जून 1970, दिगंबर कविता : सी. सुब्बा राव). लघुनियतकालिकांतील कवितांतून प्रामुख्याने महानगरी वास्तवतेची अभिव्यक्ती झालेली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात खेड्यात व शहरांत राहणारी नवी पिढी शिक्षण, रोजगार यांच्या निमित्ताने महानगराकडे वळलेली होती. महानगर म्हणजे केवळ अस्ताव्यस्त पसरलेली वस्ती एवढीच गोष्ट नव्हती, ते व्यवस्थेचेच एक कराल रूप होते. नव्या पिढीला त्याची जसजशी जाणीव होत गेली तसतशी कवितेतून त्याची अभिव्यक्ती होऊ लागली. अरुण कोलटकर, मनोहर ओक, वसंत गुर्जर, नामदेव ढसाळ इत्यादी सगळ्यांच कवींनी महानगराचे विरूप दर्शन घडवले आहे. मनोहर ओक यांनी म्हटले होते : 

‘‘मी गुदमरतोय या मुंबईत 
दारू पिऊन पावलं नीट पडतात 
उघडा दरवाजे मोकळ्या खिडक्या 
सुटी हवा द्या खुली मोकळी 
उभाराआधीच शब्द रसदमार्ग 
उद्ध्वस्त होतात 
कुठून? सगळेच कान गुडूप कसे? 
या मुंबईच्या मुडद्यात मी चाललोय 
पाय डोक्याच शॉर्ट सर्किट घेऊन.' 
लघुनियतकालिकांमधल्या कवितांमध्ये हा जो श्वासावरोध आहे, त्याचे कारण केवळ महानगर नाही, तर महानगराला असे रूप देणारी व्यवस्था आहे. तरुण पिढी ‘अॅनॉमी’चा (प्रमाणकहीनतेचा, मूल्यहीनतेचा) अनुभव घेत होती. स्वतःत आणि आपल्या भोवतीच्या समाजात व्यापून असलेला अंधार हटविणे आपल्या क्षमतेच्या बाहेरचे आहे असे या पिढीला वाटत होते. त्यामुळेच या पिढीने स्वतःला अकर्मण्य, नपुंसक म्हणून घोषित केले.

1960 आणि 70ची दशके जन आंदोलनांनी प्रभावीत झालेली दशके होती. 1960 पूर्वी काही वर्षे सुरू असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची परिणती महाराष्ट्र राज्यात झाली. 1965च्या आसपास शिवसेनेचा उदय झाला. या दशकांमध्ये मार्क्सवाद प्रभावीत संघटनाही कार्य करीत होत्या. ग्रामीण, आदिवासी, दलित, शेतमजूर यांनी आपल्या हक्कांसाठी दिलेले लढेही या काळात आढळतात. सत्तरच्या दशकात शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत न घेणाऱ्या बऱ्याच संघटना उदयाला आल्या आणि त्या ग्रामीण पातळीवर काम करू  लागल्या, 1972च्या आसपास दलित पँथरचा जन्म झाला. श्रमिक संघटना, कष्टकरी संघटना, श्रमिक मुक्तिसंघटना, श्रमिक क्रांती संघटना इत्यार्दीसारख्या संघटना शोषित आणि हक्कांना वंचित अशा लोकांसाठी कामे करू लागल्या होत्या.

बंगाल, बिहार, आंध्र, ओरिसा या भागांत नक्षलवादाचा प्रभाव होता. सर्वोदय आंदोलन आणि त्यानंतरचे जयप्रकाश नारायण यांचे संपूर्ण क्रांतीचे आंदोलन याच काळातले होते. दलित-आदिवासी आणि शेतमजुरांच्या आदोलनानंतर स्त्रियांच्या हक्कांची लढाई सुरू झालेली होती. शरद पाटील आणि शरद जोशी यांनी लढाईला राजकीय रूप दिले. वंदना शिवा यांच्या गांधीवाद-सर्वादयवाद, संस्कारित पर्यावरण विचाराचाही प्रभाव या काळात पडू लागला होता. वर्ग, जाती आणि लिंगभेद आणि या भेदाच्या राजकारणाचा खोल विचार होऊ लागला होता. जन-आंदोलन आणि साहित्य यांच्या परस्पर संबंधातून एकमेकांना बळ मिळत असते ही धारणा या काळात विकसित झाल्याचे दिसते. या संदर्भात महाश्वेता देवी यांची पुढील वाक्ये लक्षात घेण्यासारखी आहेत; ‘‘या (नक्षलवादी) आंदोलनामुळेच लेखक-कलावंत-सांस्कृतिक कार्यकर्ता यांच्या मनात आणि कामात, संग्रामशील माणसाच्या बाबतीत वचनबद्ध असण्याची आवश्यकता महत्त्वाची ठरली. साहित्याच्या क्षेत्रात एका नव्या क्रांतिकारक जाणिवेची परंपरा निर्माण झाली, सूक्ष्म सामाजिक जाणीव आणि वर्गसंघर्ष यांच्या बाबतीत साहित्यात योग्य दिशादर्शन असेल अशी लेखकांविषयीची उमेद या काळातील, राजकारण वगळून साहित्याची निर्मिती होऊ शकत नाही असे मानणाऱ्या वाचकांना वाटत होती, झाडाची मुळे जशी जमिनीत खोल गेलेली असतात, तशीच साहित्याची मुळेदेखील जीवनात रुतलेली पाहिजेत. शेतकरी, मजूर, भूमिहीन मनुष्य यांचे जीवन आणि संघर्ष हा साहित्याचा विषय असण्याची गरज याच काळात प्रबळ झाली.’’ (आमुख, जनवरी 1993) 

साहित्य आणि संस्कृतीच्या बाबतीत जो नकारात्मक विद्रोह लघुनियतकालिकांतून व्यक्त झालेला होता, त्याची जागा आता सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय विद्रोहाने घेतली होती. नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्या लघुनियतकालिकाचे नाव ‘विद्रोह’ हे होते. 'बंड' अथवा 'बंडखोरी' हे शब्द मागे पडून आता 'विद्रोह' हा शब्द आलेला होता. सत्तरच्या दशकातील दलित साहित्याच्या आणि स्त्रीवादी साहित्याच्या चळवळींनी मध्यमवर्गीय साहित्याच्या सीमा स्पष्ट केल्या. साठ व सत्तरच्या दशकातील जन-आंदोलनांनी साहित्यासाठी एक आधारभूमी तयार केलेली होती. दलित पँथरच्या संस्थापकांत अनेक कवी आणि लेखक होते. स्त्रियांच्या चळवळीसोबत देखील अनेक कवयित्री आणि लेखिका होत्या. साहित्य मध्यमवर्गाच्या वर्तुळाबाहेर येऊन जन आदोलनाशी संबंध जुळवू लागले किंवा त्यांपासून प्रेरणा घेऊ लागले. या साहित्यात विद्रोहाचा स्वर अधिक प्रखर झालेला दिसतो.

नव्या पिढीतल्या कोलटकर, चित्रे यांच्याबरोबरच नारायण सुर्वे कवी म्हणून पुढे आले. सुर्वे यांच्या कवितेतदेखील महानगरी संवेदनशीलता व्यक्त झालेली आहे. मात्र कोलटकर-ओक यांच्या कवितांतील नकारात्मकता येथे नाही. सुर्व्यांच्या कवितेत गिरण्या-कारखान्यांत काम करणाऱ्या मजुरांच्या आशाआकांक्षांचे, स्वप्नांचे आणि संघर्षाचे अंकन झालेले आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटकाबाहेर कधी फाटकाआत आहे. ‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे.’ या शब्दांतून सुर्व्यांच्या कवितेची श्रमिकांच्या, पीडितांच्या जगाशी असलेली बांधिलकी व्यक्त झालेली आहे. मार्क्सवाद-साम्यवाद यांच्या संस्कारांतून सुर्वे यांच्या कवितेने परिवर्तनवादी रूप घेतले आहे. मात्र त्यांच्या कवितेतील विद्रोहाची मुद्रा उग्र, प्रक्षुब्ध अशी नाही.

मात्र प्रस्थापित व्यवस्थेला त्यांच्या कवितेतून इशारा अवश्य दिलेला आहे. तडजोडीत जगणे, स्वतःचे अस्तित्व नाकारत, स्वतःला धीर देत जगणे जेव्हा कठीण होते तेव्हा सुर्व्यांच्या कवितेत ‘कोठारावर काडी कधी पडेल' हे सांगता येणे कठीण असल्याचे सांगितले जाते. खुंटीवर स्वप्ने टांगून मान मोडून काम करणाऱ्या वास्तवाच्या पोलाद वितळवून मनासारखा आकार देणाऱ्या झोतभट्ट्याच्या चहाव्या मळ्यातील पत्ती खुडून शिणलेल्या दळदार बोटांच्या भार पेलून मोकळी होऊन पाहणाच्या गर्भवती कवितेच्या नावाने - सुर्वे यांनी जाहीरनामा लिहिला आहे. सुर्वे, त्यानंतरच्या काळात ढसाळ, प्रकाश जाधव या कवींनी मजुरांच्या जीवनाखेरीज ज्यांना 'लुपेन प्रोलेतारी' म्हटले जाते, जो असंघटित समूह समाजाच्या अगदी खालच्या तळाशी असतो, त्या समूहाच्या जीवनाचेही चित्रण केलेले आहे. ढसाळांनी लिहिले आहे : ‘‘मी त्यांना इतिहासातली सर्वहारा वर्गाची भूमिका सांगतो लुपेन कसा चिरीमिरीला विकला जातो ते सांगतो. फेनानची थिअरीही सांगतो, दोषांच्या फांद्यांची काटछाट केली तर लुपेन सर्वहाराचा मित्र होतो हेही सांगतो.’  

प्रकाश जाधव यांच्या कवितेतही क्रांतीसाठी चिंधीचोरांना, कत्तलखोरांना म्हणजे लुपेनला आवाहन केलेले आहे. मनोहर किसन वाकोडे यांच्या कवितेतही लुपेन कसे स्टेशनांच्या फलाटांवरून, गटारांतून, पायपंपातून, दारूच्या अड्ड्यातून निघतात हे सांगितले आहे. तुलसी परब यांच्या कवितेतही क्रिमिनल कसा हळूहळू राजकीय जाणीव प्राप्त करून घेत असतो हे भान आढळते. 1960 पूर्वीच्या कवितेत लुपेन आणि त्याच्याकडून व्हावयाचे राजकीय कार्य याविषयीची नोंद अगदी अपवादात्मक रीतीने मुक्तिबोधांच्याच कवितेत आढळते. परंतु तेथेही ढसाळ, जाधव, वाकोडे यांना आलेले भान आहे असे म्हणता येत नाही. 

वर उल्लेखिलेल्या कवितांमध्ये ज्या लुपेन प्रोलेतारीचा (आणि ढसाळांच्या कवितेत ज्या फेनानचा) उल्लेख आलेला आहे त्याविषयी फ्रांझ फैना यांनी म्हटले आहे : ‘‘लुपेन-प्रोलितरिएत, उपाशी लोकांचा समूह, ही एक अत्यंत उत्स्फूर्त आणि क्रांतिकारक शक्ती असते. या लुपेन-प्रोलितरिएतचे स्वतःचे असे एक तर्कशास्त्र असते. ती उदरांची एक झुंड असते. त्यांना हाकलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते झाडांची मुळे कुरतडण्याचे थांबत नाहीत. हे भडवे, मवाली, बेकार व मामुली गुन्हेगार मजुरांप्रमाणे मुक्तीच्या संघर्षात स्वतःला झोकून देत असतात. ढसाळांच्या ‘अभ्यासवर्ग’ या कवितेत पुढे म्हटले आहे :  
'ते पेटतात, पेटत राहतात, 
कस्टडीच्या भिंतीला बुकलून काढतात, 
आनंदाने नाचत राहतात, 
शोषकवर्गाचा उद्धार करतात.’
त्यांच्या असंतोषाचा दावानल पेटलेला असतो. त्यातून हिंसा उद्भवत असते. ही हिंसा संघटित आणि प्रशिक्षित स्वरूपाची असली तर तिच्यामुळे जनसमूहांना सामाजिक सत्य समजून घेण्याची संधी प्राप्त होते. हिंसेला येथे सर्जनात्मक रूप प्राप्त होते. 'व्हायलन्सचे झाड' या कवितेत ढसाळांनी म्हटले आहे : 
‘ज्या परिस्थितीने झाड जन्मास घातले गेले 
ती जोपर्यंत तोडली जात नाही तोपर्यंत झाडास मरण नाही. 
परिस्थितीवर घाव न घालणारं शासन मोडलं जाईल, 
जनतेकडून राजरोस मारलं जाईल, 
पार्लमेंट भात-खेचरात भरून जाईल, 
मांगवाड्यातून मेहतरवाड्यातून महारवाड्यातूनं चाभारवाड्यातूनं, 
शेतकारखान्यातनं तोरणं गुंफली जातील
नव्या देशाच्या वेशीसाठी आणि व्हायलन्सचं झाड 
देशाच्या आयुष्यात कल्पतरूची भूमिका बजावेल.' 

या कवितेत कष्टकरी, मजूर, सभ्य समजल्या जाणाऱ्या समाजाबाहेरचा समूह यांच्या उल्लेखाबरोबरच जातीचाही उल्लेख आहे. भारतातील सामाजिक परिवर्तनाचा विचार, जातिप्रथेचा विचार केल्याशिवाय अपुरा राहतो. ढसाळ, दया पवार, वामन निंबाळकर, यशवंत मनोहर इत्यादी कवींनी जातिप्रथेच्या संदर्भात विद्रोहाची भूमिका घेतलेली आहे. या कवितेत जातिप्रथामुक्त समाजाचीही कल्पना आढळते. नवारुण भट्टाचार्य यांचा 'आपला देश' आणि ढसाळ यांचा 'नवा देश' एकच आहे. हा देश हिंसेच्या सर्जनात्मक रूपातून व्यक्त होईल असे या कवींना वाटलेले आहे. दमनशील समाज राज्ययंत्रणेला या काळातल्या कवितेने नाकारले होते.

व्यवस्थानिर्मित लिंगभेद आणि तद्जन्य शोषण यांना ओळखून स्त्री आपली 'ओळख’ पटवून घेते आहे. ज्या व्यवस्थेत स्त्रीच्या संदर्भात प्रेम, बलात्कार अथवा शोषण या संदर्भात 'शय्या’ केंद्रवर्ती आहे, त्याविषयीचा विद्रोह स्त्री-कवितेतून दिसतो. पुरुष-निर्मित व्यवस्थेत स्त्रीच्या शरीराच्या संदर्भात सारे नियम आणि रूढी रचल्या गेल्या आहेत; याची जाणीव नव्या पिढीतल्या कवयित्रींना झालेली दिसते. वर्गभेद, वर्णभेद आणि लिंगभेद ही शोषणाची माध्यमे होती. दलित स्त्रीच्या संदर्भात ही तीनही माध्यमे एकाच वेळी आढळतात. तिला शरीराशिवाय दुसरे कोणते अस्तित्वच नाही. स्त्रियांच्या कवितेत व्यवस्थानिर्मित संहितेला, त्या संहितेतील स्त्री-देहसंहितेला वाचले गेले आणि विश्लेषणही झाले, परंतु भारतात ‘स्त्री’ असण्याचा वास्तविक अर्थ त्यात आला नाही. प्रभा गणोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे सर्जनशक्ती आणि प्रतिकूलतेवर मात करणारी ‘अंतःप्रेरणा' याचा अर्थ स्त्रियांच्या कवितेत हळूहळू उमगलेला दिसतो. प्रभा गणोरकर यांच्या ‘प्रिय आई' या कवितेत स्त्री-कवितेचे स्त्री-जीवनाच्या रूपात वाचन केले आहे.

स्त्रीची कविता तिच्या देहाहून, अस्तित्वाहून, जीवनाहून वेगळी नाही, स्त्री जेव्हा लिहीत असते तेव्हा ती समाज-संरचित देहाला व्यक्त करीत असते आणि आपल्या देहाची ओळखही करून घेत असते. त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे वाचकाची स्थिती त्या ओळींतून भटकताना, एखाद्या स्त्रीची प्रदीर्घ यात्रा आपणच करीत आहोत अशी होते आणि वाचक थकून जातो. तरीही तो या कवितांमध्ये लपलेल्या मनाला ओळखण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याचाही तो थकवा असतो. विद्रोहाचे हेही एक रूप आहे आणि ते अधिक खोल जाणारे आहे. वर्ग, वर्ण किवा जातिप्रथा आणि लिंगभेदजन्य विद्रोह ही साठोत्तरी कवितेतील एक मौलिकता आहे. विद्रोही कवितेतच 'ते' आणि 'आम्ही' यांच्यातील विरोध दाखवून ‘आपण’ची आस व्यक्त झालेली आहे. 1960 नंतरच्या साहित्याचे वाचन आणि अध्ययन या दोन्ही गोष्टींसाठी समाजभान आणि समाजशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. ते वाचकांसाठी आवश्यक आहे. लेखक-कवींसाठी, टीकाकारांसाठीही आवश्यक आहे. वर्तमान भारतीय समाज, त्या समाजाचा इतिहास आणि त्या समाजाचे साहित्य यांत काहीएक अनुबंध असला पाहिजे याची जाणीव या साहित्यामुळे झालेली आहे. यातून पीडितांचे साहित्यशास्त्र उदयाला येईल. ते ब्राह्मणेतरांचे, शेतकरी-कामगारांचे, स्त्रियांचे नसेल, ते सगळ्याच शोषित समाजाचे असेल. आणि ती परंपराही मोठी आहे. खरे तर सगळी देशी कविता मुळात विद्रोहातून आलेली आहे. आणि एतद्देशीयांनी लिहिलेली कविता हा कायमच विद्रोह ठरलेला आहे. म्हणून आपल्या परंपरेत कविता लिहिणे हाच मुळात एक विद्रोह ठरला आहे. एरवी तुकारामांचे अभंग बुडवायचे काही कारण नव्हते.

Tags: शरदकुमार लिंबाळे लक्ष्मण माने ज. वि. पवार नामदेव ढसाळ समाजभान देशी कविता पीडितांचे साहित्यशास्त्र sharadkumar limbale ट विद्रोही साहित्य laxman mane j. v. pawar namdev dhasal social consciosness native poetry literature of victims rebel literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वसंत आबाजी डहाके
vasantdahake@gmail.com

वसंत आबाजी डहाके  हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. त्यांच्या 'चित्रलिपी' या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके