डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

माझी आणि गुरुजींची ओळख झाली. जवळ- जवळ मध्यरात्रीपर्यंत आम्ही बोलत होतो. म्हणजे बहुतांशी  तेच बोलत होते आणि मी ऐकत होतो. त्यातून त्यांची  देशप्रेमाची तळमळ,  माझ्यासारख्या तरुण सहकाऱ्यांविषयी  असलेली आत्मीयताही छान प्रत्ययाला येत होती. त्यानंतर  जवळ-जवळ एक आठवडा आम्ही एकाच खोलीत होतो.  हा काळ माझ्या आयुष्यातला सर्वांत आठवणीत राहील  असा गेला. ती शिदोरी व त्यातील वैचारिक धन पुढे  आयुष्यभर पुरले! त्यातील एक दिवस तर फारच अद्‌भुतरम्य  ठरला. तो दिवस विलक्षण होता,  यात शंकाच नाही.  त्याचे असे की,  आम्हाला पकडण्यात पोलीस इन्स्पेक्टर श्री. रोच हे मुख्य होते. (श्री. रोच हे फार सज्जन गृहस्थ होते.  त्यांना स्वातंत्र्य चळवळीविषयी फार सहानुभूती होती. पुढे  तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी हरिभाऊ लिमये यांच्याबरोबर  जो सतत संपर्क ठेवला यावरून हे समजून येते).   

1942 च्या ऑगस्ट क्रांतीचे ते मंतरलेले दिवस होते.  मी साधारण वीस बावीस वर्षांचा असेन. मला व माझ्या  सहकाऱ्यांना त्यावेळी अटक होऊन आम्ही सर्वजण  येरवड्याच्या मध्यवर्ती तुरुंगात (काही स्थानबध्द व काही अंडर ट्रायल असे) कैदी होतो. त्यानंतर पूज्य साने गुरुजी  यांनासुद्धा अटक होऊन येरवड्याच्या तुरुंगात आणण्यात  आले आहे अशी बातमी आली. त्या वेळी आम्ही सर्वजण  बावरलेल्या मनस्थितीत होतो. एकीकडे गुरुजींबरोबर  राहायला मिळणार म्हणून आनंद वाटत होता,  तर दुसरीकडे  त्यांना पकडल्यामुळे चालू असलेल्या चळवळीचे मोठे  नुकसान होणार म्हणून वाईट वाटत होते. 
        
माझी आणि गुरुजींची थोडीसुद्धा ओळख नव्हती. फक्त  त्यांचे ऐकून होतो व थोड्या फार प्रमाणात त्यांच्या कार्याची  जाणीव होती. त्यांच्या कामाची पध्दत व निरलसपणा यांचा  माझ्या मनावर फार चांगला ठसा उमटला होता. त्यांच्या  स्वभावावरून,  त्यांनी केलेल्या कामावरून व त्यांच्याबद्दल दुसऱ्यांकडून ऐकलेल्या गोष्टींवरून हा माणूस किती मोठा  असला पाहिजे,  याची कल्पना मनात सारखी येत होती.  गुरुजींची व आपली ओळख व्हावी,  त्यांच्याशी  आपल्याला बोलायला मिळावे,  असे सारखे वाटत होते.  याआधीच आपण त्यांच्या परिवारात का आलो नाही,  याची खंत पण वाटत होती.  आमचे तुरुंगातील दिवस थोरा-मोठ्यांच्या सहवासात  चांगले जात होते,  पण माझी व त्यांची ओळख काही  होईना!
          
एके दिवशी (कोणता दिवस होता ते आठवत नाही)  संध्याकाळी आम्ही राहत असलेल्या तीन नंबर बराकीच्या पटांगणात गुरुजींचे भाषण होते. ते ऐकल्यावर तर त्यांच्या  मोठेपणाची कल्पना आली व त्यांच्याबद्दलचा आदर  अजूनच वाढला.  मी आणि माझे सहकारी यांना कॅपिटॉल टॉकीज व  वेस्टएंड टॉकीज बॉम्ब खटला व नंतर महाराष्ट्र कटासंबंधी  अटक झाली होती. पोलिसदल हे खटले चालू करायच्या खटपटीत होते. एके दिवशी मला येरवडा तुरुंगातून परत  कॅन्टॉन्मेंट लॉकअपमध्ये पाठवण्याचा आदेश आला व  त्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट लॉकअपमध्ये एका लॉकअपमध्ये  ठेवले. दुसऱ्या दिवशी आणखी एका गृहस्थांना  संध्याकाळच्या सुमारास मी असलेल्या लॉकअपमध्ये  ठेवण्यात आले. ते गृहस्थ कोण असावेत याची काही  कल्पना नव्हती. अंधारामुळे काही दिसलेही नाही. नंतर काही वेळाने दिवे लागले,  तेव्हा पाहतो तो काय,  माझ्या  लॉकअपमध्ये ज्यांची ओळख व्हावी म्हणून मी तळमळत  होतो ते साक्षात्‌ साने गुरुजी अगदी माझ्या शेजारीच उभे होते. त्यावेळी झालेल्या आनंदाला कसली उपमाच देता येणार नाही.
          
माझी आणि गुरुजींची ओळख झाली. जवळ- जवळ मध्यरात्रीपर्यंत आम्ही बोलत होतो. म्हणजे बहुतांशी  तेच बोलत होते आणि मी ऐकत होतो. त्यातून त्यांची  देशप्रेमाची तळमळ,  माझ्यासारख्या तरुण सहकाऱ्यांविषयी  असलेली आत्मीयताही छान प्रत्ययाला येत होती. त्यानंतर  जवळ-जवळ एक आठवडा आम्ही एकाच खोलीत होतो.  हा काळ माझ्या आयुष्यातला सर्वांत आठवणीत राहील  असा गेला. ती शिदोरी व त्यातील वैचारिक धन पुढे  आयुष्यभर पुरले! त्यातील एक दिवस तर फारच अद्‌भुतरम्य  ठरला. तो दिवस विलक्षण होता,  यात शंकाच नाही.  त्याचे असे की,  आम्हाला पकडण्यात पोलीस इन्स्पेक्टर श्री. रोच हे मुख्य होते. (श्री. रोच हे फार सज्जन गृहस्थ होते.  त्यांना स्वातंत्र्य चळवळीविषयी फार सहानुभूती होती. पुढे  तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी हरिभाऊ लिमये यांच्याबरोबर  जो सतत संपर्क ठेवला यावरून हे समजून येते).   
           
श्री. रोच यांनी मला त्या दिवशी साधारण सकाळी दहा  वाजता त्यांच्या कार्यालयात आणून बसवले. मला वाटले  काही चौकशी करण्याकरता असेल. मी एका कोपऱ्यात  होतो. थोड्या वेळाने एक ख्रिस्ती बाई येऊन श्री. रोच यांच्या  टेबलाजवळील खुर्चीवर बसल्या. (नंतर समजले की त्या  बाई म्हणजे श्री. रोच यांच्या पत्नी होत्या.) नंतर श्री. रोच आपल्या पत्नीला म्हणाले की,  ‘तुला जर महाराष्ट्रातील एक सगळ्यात चांगला देव माणूस बघायचा असेल तर मी तुला  दाखवतो.’  प्रत्यक्ष इंग्लिश शब्द होते,  If you want to see a`saint` of Maharashtra…  असे म्हणून श्री. रोच  स्वतः लॉकअपमध्ये गेले व साने गुरुजींना आपल्या कचेरीत  आणून सन्मानाने आपल्याजवळ बसवले. श्री.  रोच आपल्या  पत्नीला म्हणाले,  ‘हा बघ तुझा Saint त्याला नमस्कार कर.’  तिनेही अगदी खाली वाकून गुरुजींना नमस्कार केला.  या प्रसंगाला मी साक्ष असल्यामुळे माझ्यासाठी तो दिवस  अगदी संस्मरणीय ठरला. 
       
आपल्या वागणुकीने व आचरणामुळे माणूस आपला  प्रभाव आपल्या शत्रूवरसुध्दा कसा पाडू शकतो, याची  मूर्तिमंत प्रचिती साने गुरुजींमुळे त्या दिवशी आली.  साने गुरुजींच्या सहवासाची ही शिदोरी पुढे आयुष्यभर  पुरली व आपले आचरण कसे असावे याचा एक वस्तुपाठच  मिळाला. 

तळटीप :   आमचे वडील वसंतराव आळेकर हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 1920 साली झाला आणि 2000 साली त्यांचे  निधन झाले. 1942 च्या कॅपिटॉल बॉम्ब केसमध्ये ते एक  आरोपी होते. ते येरवडा जेलमध्ये अंडर ट्रायल असताना,  साने गुरुजींच्या सहवासात आले व त्यांनी ही हकीकत लिहून ठेवली होती. दोन वर्षांपूर्वी आमची आई (श्रीमती उषा  आळेकर,  ज्या स्वतःही स्वातंत्र्यसैनिक होत्या) जेव्हा गेली,  तेव्हा त्यांची कागदपत्रे आवरताना हा लेख सापडला. 
- सुधीर आळेकर

Tags: श्री रोच येरवडा तुरूंग १९४२ ऑगस्ट क्रांती साने गुरूजी Shri roch Yerwada turung August kranti 1942 Sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात