डिजिटल अर्काईव्ह

जपानच्या भौगोलिक परिस्थितीचा  त्यांच्या मनोवृत्तीवर परिणाम झालेला आहे. निसर्गाच्या रुद्र स्वरूपाशी वारंवार टक्कर देण्याचे प्रसंग येत असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत अगदी वाकून– अगदी नम्र होऊनहि जपानी मनुष्य पोलादाच्या पात्याप्रमाणे पुन्हा उसळी मारून उभा राहत असतो! जपानविषयी गप्पा मारता मारता आमच्या आगबोटीवर असलेल्या जर्मन माणसाने जपानी सैनिकांनी गेल्या महायुद्धात केलेले अनन्वित अत्याचार सांगून अंगावर शहारे आणल्यासारखे केले!

गेल्या महायुद्धात जपानमधील रेल्वे उध्वस्त झाली होती. कित्येक दिवस सायकली, बैलगाड्या, मोडक्या मोटारी इत्यादि मिळेल त्या साधनांनी आपली वाहतूक चालू ठेवावी लागत होती. पण जपानने इतक्या झपाट्याने आपली रेल्वे पूर्वस्थितीवर आणून ठेवली आहे की अचंबा वाटावा! आपल्याकडे स्वातंत्र्य मिळून बारा वर्षे होऊन गेली तरी कोकण रेल्वेचे भिजत घोंगडे पडले आहे! परंतु ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे’, याचा प्रत्यय जपानमध्ये कुणालाहि येईल. डब्यांतील सुंदर मखमलीच्या व झोपण्यासाठी मागे होणाऱ्या खुर्च्या माणसांच्या डोक्यांनी मखमल खराब होऊ नये म्हणून त्यावर घातलेले परीटघडीचे अभ्रे, स्नानगृहांतील खच्छ टॉवेल व साबण, या सगळ्या सुखसोयी पाहून माझ्या मनात विचार आला की आपल्या देशात अशी एखादी आगगाडी बनवलीच तर ती तशी किती दिवस टिकू शकेल! साबण, टॉवेल, उशीचे अभ्रे हातोहात नाहीसे होतीलच; पण खुर्चीवरची मखमल देखील चाकूने कापून लंपास केली जाईल! प्रामाणिकपणा आणि राष्ट्रीय संपदेची कल्पना नसलेल्या देशात अशा सुखसोयींनी सुधारलेला प्रवास अशक्यच नाही का? भौतिक सुधारणांपेक्षाहि राष्ट्राची उन्नति त्यातील लोकांच्या नीतिमत्तेवरच अवलंबून असते.... विचारांच्या चिमण्या भुर्र उडत होत्या. त्यांनी पंख आवरून माझ्या मस्तकाच्या घरट्यात कधी परत आसरा घेतला ते कळले नाही. डोळे मिटले आणि मन अज्ञातात पळाले!

खिडकीच्या फटीतून येणारी पहाटेची थंडगार झुळूक वात्सल्याने गालांवरून हात फिरवू लागली आणि मी जागा झालो. बाहेर उजाडत होते आणि अस्पष्ट नाजूक रेखांकित जपानी चित्रासारखी सूर्यप्रकाशांत उलगडू पाहणाऱ्या सृष्टीची अस्फुट आकृति द्रुतगतीने पळत होती. एका उंच डोंगरावरून बहुधा याकोहामाच्या जवळपास कुठेतरी गाडी चालली होती. अगदी खालीच सरळ रेषेत उतरत गेलेल्या डोंगराच्या पायथ्याशी समुद्राचे पाणी फेसाळून नाचत होते. विरहातुर प्रेमिकासारखा सागर-पृथ्वीचा तो स्तब्ध प्रणय उगवत्या सूर्यनारायणाच्या रश्मिस्पर्शीनेहि भंग पावला नाही. पोटासाठी पळत सुटलेल्या आमच्या आगगाडीला त्या सुंदर दृश्याकडे पाहत थांबायला कुठे फुरसद होती? ती आपली सरळ पळत पळत टोकियोच्या स्टेशनात जाऊन थांबली!

उगवत्या सूर्याच्या या देशात आपल्या भक्तांसाठी ‘जेथे जाशी तेथे । मी तुझा सांगाती ॥’ असे म्हणत भगवान् बुद्धदेव अनेक ध्यानस्थ रूपांनी प्रकट होतात! त्यांच्या भक्तांनीहि, चिंतनात मग्न होण्यासाठी पुन:पुन्हा विजनवासी होणाऱ्या गुरुदेवांची पावले जणू परत भारताकडे वळू नयेत म्हणून जागजागी कृत्रिम वनस्थली निर्माण करून त्यांच्या विजनवासाची इथे सर्वत्र सोय करून ठेवली आहे! कधी डोंगराच्या उतरत्या पठारावर तर कधी सपाट भूविस्तारावर, कधी अवखळपणे दरीदरी घुमवीत नाचत येणाऱ्या निर्झराच्या जवळ, तर कधी आकाशाचा नीलिमा झेलीत विस्तारलेल्या जलशयाभोवती, सुरुची, बांबूची, पाईनची, चेरीची आणि इतर वृक्षलतांची स्निग्धछायावने बनवून उगवत्या सूर्याच्या सुपुत्रांनी शांत, गंभीर, चित्त प्रसन्न करणारी तपोवने निर्मिली आहेत. सबंध ऋतुचक्रांतून तऱ्हेतऱ्हेच्या फुलांची पखरण झेलणाऱ्या भारतातील वनश्रीची रंगसंपदा किंवा स्वयंस्फूर्त वन्य तरुलतांची रूपसंपदा इथे आढळत नाही. परंतु प्राचीन अभिजात चित्रकाराच्या चित्राची हुबेहूब अनुकृति करताना स्वतःच्या चित्रकौशल्याची कमाल दाखविणाऱ्या आधुनिक चित्रकाराप्रमाणे निसर्गाची हुबेहूब नक्कल करण्यात जपानी कारागिरांनी पराकाष्ठा दाखविली आहे. जवळजवळ एक हजार मुळाक्षरे शिकतानाच नाजूक कुंचल्याने अनेक चित्रविचित्र आकृति निर्माण करण्याची सवय जपानी लोकांना होत असते. मुळाक्षरातील त्याच चित्रविचित्र आकृति, विशाल पाषाणखंडांतून विचित्र शिल्पाकृति निर्माण करण्यात आणि तरुवेलींना चमत्कृतिपूर्ण आकार देण्यात जपानी कलाकार वापरीत असतात. जपानचे राष्ट्रीय फूल क्रिसॅन्सिमस किंवा शेवंती! पण जपान प्रसिद्ध आहे चेरिब्लॉझम्साठी. एप्रिल महिन्याच्या साधारण मध्यावर चेरी वृक्ष गुलाबी फुलांनी मोहरून आपले संपूर्ण सौंदर्य प्रकट करतात. आणि त्यांच्याच हस्ते, अगदी दहा पंधरा दिवसच जपानी कलाकारांनी रचलेल्या वनस्थलींवर मुक्तांजलींनी निसर्ग, गुलाबी रंगाची मुलायम उधळण करतो.

शतकांपूर्वी जपानची भूमि संतप्त मानिनीप्रमाणे सदा थरथरत असे. चार-दोन वृक्षलता तिच्यावर कुठेतरी मूळ धरून आपला हिरवा आयुष्यक्रम व्यतीत करीत क्रोधाने पोराच्या बखोटीला धरून ओढणाऱ्या आईसारखी ही धरणीमाता केव्हातरी आपली दुर्दशा करील अशी सदैव त्यांना भीति असे. जपानातील जनता देखील, कोसळली तरी कपाळमोक्ष करणार नाहीत अशी पातळ लाकडी फळ्यांची आणि कागदांची घरे बांधून राहत असे. भूमीपेक्षाहि समुद्राची मशागत करून पोटाला दोन घास त्यांना मिळवावे लागत. अशा अवस्थेत राज्यधुरा वाहून शिणलेल्या कुणा एका राजाला बुद्धदेवांच्या चरणांचा आसरा घेऊन मनःशांति मिळविण्याची इच्छा झाली. एकान्त ठिकाण पसंत करून तिथे एक छोटासा लाकडी कागदी राजवाडा त्याने बांधला. बुद्धदेवाच्या हृदयातील करुणेसारखे, जवळच्याच विशाल पाषाणखंडाच्या पोटात एका निर्झराचे मृदुसंगीत त्या निस्तब्ध वातावरणात राजाच्या कानी पडले. गुडुप अंधारात शतकानुशतके बंदिवासात पडलेल्या त्या निर्झराला राजाने सूर्यप्रकाश दाखविला. उपकाराची परतफेड म्हणून राजाच्या निवासस्थानासमोरच त्या निर्झराने एक जलाशय निर्माण केला आणि त्याच्या भोवती हिरव्यागार तरुलतांना पोसून एक शांत सुंदर तपोवन निर्माण केले. राजा त्या तपोवनात राहून भगवान् तथागताचे ध्यान करू लागला.

पण एका गोष्टीची मात्र राजाला चिंता लागून राहिली होती. शिलामय धरणीत मूळ धरून राहिलेले तपोवनातले ते वृक्ष भूमीच्या इवल्याशा कंपनानेहि कासावीस होणे शक्य होते. राजा विचार करू लागला. ऐहिक गोष्टीतून मन काढून घेऊ पाहणाऱ्या संतांनाहि वृक्षलतांचे प्रेम सोडवत नाही, त्यांची सोयरिक वाटते. बुद्धचरणी लीन झालेल्या त्या राजालाहि सभोवतालच्या तरुलतांपासून मन ओढून घेणे कठिण होते. त्याने विचार केला : ‘जमिनीच्या कंपनानेहि मुळे तुटणार नाहीत आणि शिलामय भूमीतहि निर्बंध राहू शकतील असे वृक्ष निर्माण केले पाहिजेत.’ सभोवतालच्या महावृक्षांच्या फांद्या कुंड्यात लावून त्यांची वाढ खुंटवून प्रमाणात चिमुकले पण दिसायला मात्र महावृक्षांसारखे असे वृक्ष निर्माण करून सभोवतालची भूमि मंडित करण्याचा प्रयत्न त्याने चालविला. त्याच्याच परिश्रमाचे फळ म्हणजे जपानी घरांतून दृष्टोत्पत्तीस येणारी आजची मिनिएचर वृक्षसृष्टि! ही वृक्षसृष्टि हे जपानचे वैशिष्ट्य आहे. जपानी वृक्षसृष्टीची ही कुळकथा एका म्हाताऱ्या जपानी शेतकऱ्याने सांगितली. त्यात बराचसा सत्यांश असावा असे वाटते. पण मिनिएचर झाडे बनविण्याच्या या जपानी कलेचा अमेरिकनच काय, पण जर्मन, इंग्रज इत्यादि गोरे लोकहि उपहासाने उल्लेख करतात!

उंचीने कमी असलेले जपानी पुरुष, त्यांच्यामागे जवळ पावले टाकीत द्रुतगतीने चालणाऱ्या त्यांच्या प्रमदा, जपानमधील कागदी घरे व त्यांचे ठेंगू दरवाजे; फार काय पण नाजूक रेषांची व फिक्या रंगाची एखाद्या चांदण्या रात्री ताजमहालाच्या फरशीवर उमटलेल्या अस्पष्ट प्रतिबिंबासारखी भासणारी जपानी चित्रे, या सर्वांविषयीच ‘रॉक अँड रोल’च्या गडद रंगात बुचकळून काढलेल्या मनाला एक प्रकारचा सुप्त तिरस्कार वाटत असतो! युरोपातील गोऱ्या लोकांच्या मनावरहि अमेरिकन विचारांचे प्रतिबिंब पडलेले आढळते. आगबोटीवर माझ्याशी ओळख झालेल्या एका जर्मन चित्रकाराने जपानवर सोडलेले टीकास्त्र बराच वेळ ऐकून घेतले. अगदी राहवेना तेव्हा त्याला उलटून मी म्हणालो, ‘’आंगठ्याएवढ्या जपानी माणसाने ताडमाडाच्या अमेरिकन माणसाच्या जी कानशिलात भडकावली, त्याच्या वेदना या तुझ्या टीकेतून स्पष्ट दिसताहेत! पौरस्त्य तुमच्या बरोबरीचे असू शकतात, ही कल्पनाच सहन होत नसते तुम्हाला आणि म्हणूनच पूर्वाकाशातले उषारंग तुम्ही काळ्या चाष्म्यांतून सदैव पाहत असता!’

मनुष्य राहतो तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर त्याच्या मानसिक व शारीरिक धारणा बऱ्याचशा अवलंबून असतात. जपानी माणसाचा बुटकेपणा काय किंवा त्याने मुद्दाम बनविलेल्या उपवन-वृक्षांचा खुरटेपणा काय, मला वाटते जपानच्या भौगोलिक परिस्थितीतूनच निर्माण झाला असावा.

जपानच्या भौगोलिक परिस्थितीचा  त्यांच्या मनोवृत्तीवर परिणाम झालेला आहे. निसर्गाच्या रुद्र स्वरूपाशी वारंवार टक्कर देण्याचे प्रसंग येत असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत अगदी वाकून– अगदी नम्र होऊनहि जपानी मनुष्य पोलादाच्या पात्याप्रमाणे पुन्हा उसळी मारून उभा राहत असतो! जपानविषयी गप्पा मारता मारता आमच्या आगबोटीवर असलेल्या जर्मन माणसाने जपानी सैनिकांनी गेल्या महायुद्धात केलेले अनन्वित अत्याचार सांगून अंगावर शहारे आणल्यासारखे केले! जपानच्या शेतकी पद्धतीच्या अभ्यासासाठी कोलंबोहून कोबेला जाणाऱ्या एका सिंहली विद्यार्थ्याने त्याला पटकन् उत्तर दिले, ‘’इतिहासात हिटलर नावाची एक व्यक्ति होऊन गेली आणि ठार केलेल्या ज्यूंच्या मृतदेहांवरून त्याने नरकात उडी घेतली, हे ठाऊक नाही नाही वाटते तुम्हाला! सिंहली विद्यार्थ्यांच्या त्या वाक्यावर मी तरी खूष झालो! एखाद्या अमेरिकन माणसाने जपानवर टीका केली तर गोष्ट वेगळी. परंतु जर्मन मनुष्य आणि तोहि गेल्या युद्धातील जपानचा साथीदार, तो अशी टीका करतो याचे नवल वाटले! पाश्चात्य माणसाला स्वतःच्या गोऱ्या रंगाविषयी अजूनहि एक तऱ्हेचा अभिमान आहे.

जपानातील धावत्या प्रवासात जे जे जपानी सहवासात आले त्यापैकी जपानातील प्रचलित राजकारणावर आपण होऊन बोलणारा कोणीच मला आढळला नाही! राजकारण हा एक अभ्यासाचा विषय आहे, असे आपल्याकडे कुणीच मानीत नाही. रिकामपणाच्या चकाट्या रंगविण्यासाठी आपल्याकडे राजकारणाचा नेहमीच उपयोग होत असतो. आपण राजकारणाविषयी विचार करतो का, हा खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न आहे. चार मराठी वाक्ये नीट लिहिण्याइतपतच ज्ञान असलेला कुणीहि पोटभरू ‘पिलाई लामा’ आपल्याला आंतरप्रांतीयच काय, पण आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी गप्पा मारतो आणि त्या ऐकून आपणहि आर्य चाणक्याचा आव आणतो! नेमकी याविरुद्ध परिस्थिति जपानमध्ये मला आढळली. जपानातला कामगार किंवा मध्यमवर्गीय मनुष्य राजकारणाविषयी उठल्या-सुटल्या बकवास करणार नाही, राजकीय पुढाऱ्यांविषयी निरर्गल प्रलाप काढणार नाही, इतकेच काय, पण राजकारणात स्वतःला काही विचार आहेत, असेहि दाखविणार नाही. ‘’माझा संबंध दिवस कामात जातो. राजकारणाविषयी विचार करायला मला फुरसदच मिळत नाही. सबब या विषयावर मी अज्ञानी माणूस काय मत देणार!’’ असे मोठ्या नम्रपणे म्हणून तो विषयच टाळावयाचा त्याचा प्रयत्न असतो.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी काही वर्ष ‘टोरा इशिमारू’ नावाच्या एका जपानी सैन्याधिकाऱ्याने पूर्वेच्या रणक्षेत्राविषयी एक पुस्तक लिहिले होते, त्यात प्रशान्त महासागरात कशी लढाई द्यावी लागेल, आरमार कुठे व कसे वापरावे लागेल याविषयी काही कल्पना दिल्या दोत्या. प्रत्यक्ष लढाईत या सैन्याधिकाऱ्याने दिलेल्या कल्पना आणि केलेली भाकिते आचर्यकारक रीतीने खरी ठरली होती! डोरा इशिमारूच्या मूळ जपानी पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर लढाईनंतर प्रसिद्ध करून इंग्लिश व अमेरिकन नौकादलाकडे मुद्दाम प्रसृत करण्यासाठी दिले गेले होते. ज्यांची सूक्ष्म नजर सभोवतालच्या घटनांचे नीट मूल्यमापन करून भविष्यकाळाचे अंतरंग धुंडाळू शकते त्यांनाच राजकारणाच्या खेळात यशस्वी रीतीने डाव टाकता येतात. इंग्लंडसारख्या देशात या दृष्टीने काही विद्यार्थ्यांना मुद्दाम राजकारणाचे शिक्षण दिले जाते. जपानमध्ये देखील सैन्याधिकाऱ्यांना (कारण पूर्वी सैन्याधिकाऱ्यांकडूनच देशाचे बरेचसे राजकारण खेळले जात असे.) राजकारणाच्या पटावरील बुद्धिबळाच्या खेळाचे शिक्षण दिले जात होते. अॅटमबॉम्बची अकल्पनीय आपत्ति आली नसती तर आजहि पूर्वेच्या राजकारणात साम्राज्यवादी जपान व साम्यवादी चीन यांची रस्सीखेच कदाचित् दिसली असती. कदाचित् चीन आजच्या लाल रंगाने रंगलेला आढळला नसता!

जपानमधील चालू राजकीय प्रवृत्तींविषयी माहिती करून घेणे माझ्या धावत्या प्रवासात अतिशयच कठीण होते. कारण त्या दृष्टीने माहिती देण्यासारख्या कुणाहि खरोखरी महत्त्वाच्या व्यक्तीला भेटणे मला शक्य नव्हते. फक्त एकाच ठिकाणी जपानातील सर्वात मोठ्या अशा एका व्यापारी कंपनीच्या मुख्याबरोबर बोलता बोलता मी विचारले, ‘’इथल्या राजकारणातील मतप्रवाह सध्या कुठल्या दिशेने वाहताहेत?’’

त्याने दिलेला जवाब मोठा धूर्तपणाचा होता, तो म्हणाला : ‘’अमेरिका व चीन या दोघांवर आमची नजर आहे. परंतु मला वाटते कठोर अनुभवानंतर आम्ही गांधीविचार शिकलो आहोत!’’ या त्याच्या उत्तरात सत्याचा अंश किती आणि एका हिंदी पाहुण्याला खूश करण्याची वृत्ति किती, ते सांगणे कठीण आहे.

रेल्वे स्टेशनजवळच्याच एका विश्रांतिगृहात आम्ही गेलो होतो. मोडकेतोडके इंग्रजी बोलणाऱ्या तरुण मुली तेथे खाद्यपेये देण्याचे काम करीत होत्या. अतिशुभ्र पाश्चात्य पोषाख केलेल्या या मुली आणखी एक काम इमानाने करताना आढळल्या बाहेरून आलेल्या काही गिऱ्हाइकांच्या चालण्यामुळे मळणारी विश्रांतिगृहाची फरशी त्या मुली चटकन् घासूनपुसून साफ करीत! एखादी ठराविक मुलगीच ते काम करी असे नाही, आलटूनपालटून सर्व मुली फरशीच्या स्वच्छतेकडे लक्ष देत होत्या.
‘’हक्कांपेक्षा कर्तव्याची जाणीवच अधिक दिसत आहे इथल्या स्त्रीकामगारांना.’’ मी माझ्या पत्नीला म्हणालो.
‘’मला नाही तसे वाटत.’’ तिने उत्तर दिले, ‘’जपान हा पूर्वजांची पूजा करणारा, मिकॅडोची आज्ञा शिरोधार्य मानणारा विभूतिपूजक देश आहे. साहजिकच इथल्या कामगारात विशेषतः स्त्री कामगारात अगदी गुलामांचा लाचार मनमानीपणा दिसणे शक्य आहे. हक्कांची कल्पना नसलेल्या या मुलींत कामापेक्षा कर्तव्याची जाणीव अधिक आहे, असे म्हणणे बरोबर नाही.’’

या विश्रांतिगृहाची मुख्य मॅनेजर एक जरानी स्त्री होती तिला इंग्रजी भाषाहि बऱ्यापैकी येत असावी. तिच्याबरोबर गप्पा मारून जपानमधल्या नाहीतरी त्या विश्रांतिगृहातील स्त्रीकामगारांना स्वतःच्या हक्कांची जाणीव किती आहे याची माहिती मिळविणे शक्य होते. पण मी कुठल्याहि प्रतिनिधिमंडळातर्फे प्रवासाला आलो नव्हतो तसा आलो असतो तर असतो तर कदाचित् जपानी जीवनाच्या सगळ्या बाजूचे ओझरते तरी दर्शन घेण्याइतकी मदत व वेळ मला मिळाला असता. माझा प्रवास हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच हिंदी व जपानी मित्रांच्या कृपेवर चालला होता. त्यामुळे कोबेला सोडलेली आगबोट याकोहामाला पुन्हा पकडेपर्यंत फक्त साडे तीन दिवस मध्ये मिळाले, तेवढ्यात त्या मित्रांनी दाखविलेले जपानचे ओझरते दर्शन मला घेता आले. नृत्य, नाटक व त्रिमिति चित्रपट या जपानातील वाखाणलेल्या वैशिष्ट्यांना काट मारून वनस्थली, बुद्धमंदिरे, तपोवने, उद्याने इ. शक्य तितकी पाहून घेण्याचा प्रयत्न मी केला. मोठ्या जपानी शहरातील बाजारपेठांचेहि निरीक्षण मी केले. व्यापाराच्या विकेन्द्रीकरणाविषयी प्रसिद्ध असलेल्या जपानच्या कुटिरोद्योगाविषयीची माहिती हा एका स्वतंत्र प्रबंधाचा विषय ठरू शकेल. महाराष्ट्राचा स्वतंत्र प्रांत झाल्यावर तर मराठी माणसाला जपानचे अनुकरण करूनच आपली आर्थिक परिस्थिति सुधारावी लागले असे काही तज्ज्ञ लोक सांगतात. परंतु या बाजारपेठांतून फिरताना जपानी मनाचे काही आकर्षक पैलू मात्र माझ्या नजरेस पडले.

स्वदेशीची शिकवण जपानच्या रक्तात भिनली आहे हे जपानी माणसाच्या सहवासात येणाऱ्या कुणाहि व्यक्तीच्या चटकन ध्यानात येते. आपल्या दैनंदिन जीवनात जपानी मनुष्य परदेशी वस्तूंचा उपयोग कटाक्षाने टाळीत असतो. परंतु मला नवल वाटले ते दुसऱ्याच एका गोष्टीचे! माझ्याबरोबर बाजारात फिरत असलेल्या जपानी मित्राने एका दुकानातून हाताने बनलेला कागद व त्याच कागदाची पाकिटे खरेदी केली! आपण आपल्या खासगी पत्रव्यवहार नेहमी याच तऱ्हेच्या कागदावर करीत असतो, असे मला त्याने सांगितले, उत्तम प्रतीचा, शुभ्र, सुंदर, गुळगुळीत असा कागद जपानमधून परदेशी निर्यात होतो, असे असताना मुद्दाम कमी प्रतीचा ओबधोबड कागद जराशी अधिक किंमत देऊन त्याने का खरेदी करावा, हे माझ्या लक्षात येईना. मी त्याला त्याविषयी प्रश्न केला, तेव्हा त्याने उत्तर दिले, “माझ्या म्हाताऱ्या देशबांधवांना ही माझी अल्पशी मदत आहे.” जपानी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील निर्बळ म्हातारी माणसे व लहान मुले घरी बसल्या बसल्या हा कागद बनविण्याचा धंदा करतात व त्यांना मदत करण्याच्या हेतूने अनेक शहरी कुटुंबे या कागदाचाच वापर करतात. दानवृत्तीचा ओघ अशा तऱ्हेने आपल्या वृद्ध अथवा दुर्बल, पण उद्योगी कामगारबंधूंकडे वळवलेला आढळतो. जपानात हात बनावटीच्या कागदासारख्याच आणखी अनेक गोष्टी वापरून जपानी मनुष्य देशातील गृहोद्योगांना स्वयंस्फूर्त मदत करीत असतो.

परंतु यंत्रनिर्मित सुंदर आकर्षक वस्तूंना मात्र त्यांचा विरोध नाही. जगाच्या बाजारातली कुठलीहि वस्तु असो, तशीच तितकीच आकर्षक वस्तु माझ्याहि देशात मी निर्माण करू शकतो, या इर्षेने जपानी कारखानदार दिवस-रात्र धडपडत असतो आणि त्याचे प्रत्यंतर जपानच्या बाजारातून फिरताना पदोपदी येते. दुसऱ्याच्या वस्तूला हात लावावयाचा नाही, असे सांगणाऱ्या खानदानी आईप्रमाणे जपानी सरकार व कारखानदार जणू काय, आपल्या लोकांनी परदेशी वस्तूला हात लावू नये, यासाठी सतत जागरूक असलेले दिसतात. अमेरिकेहून आलेल्या अद्ययावत उत्तमोत्तम मालाने जपानी जनता दिपून गेली होती. परंतु केव्हा केव्हा कमी प्रतीच्या का होईनात, परंतु दिसावयाला तितक्याच आकर्षक वस्तु अगदी थोड्याच अवधीत जपानी कारखानदारांनी निर्माण केल्या. आणि त्यादेखील अतिशय स्वस्त किंमतीत साहजिकच स्वदेशी मालाकडे जपानी जनतेचे लक्ष केंद्रित झाले. टूथ-पेस्ट, टूथ पावडर, स्नो, शांपू, डोक्याला लावण्याचे तेल, फण्या, हातरुमाल, इत्यादि रोज लागणाऱ्या वस्तु आकर्षक वेष्टनांतून जपानी दुकानात मांडलेल्या असतात. आणि उत्तम प्रतीच्या अमेरिकन अथवा इंग्रजी मालाइतक्याच त्या आकर्षक असतात.

नवीन नवीन गरजा निर्माण करावयाच्या व त्या पुर्या करण्यासाठी सारखा उद्योग करीत राहावयाचे, अशी मनोवृत्ति जपान्यांत आढळते. आपल्याप्रमाणे उद्याच्या विकासाकडे लक्ष देऊन गरजा शक्य तितक्या कमी करीत संन्यस्त वृत्तीने राहण्याची पाळी जपानवर येत होती, परंतु त्या देशाचे यांत्रीकिकरण आधीच झालेले होते आणि त्यामुळे लढाईत बरीचशी माणसे मारली गेली, तरी यंत्र व यंत्रकुशल कामगार यांची जुळवाजुळव जपानला पटकन् करता आली. त्यामुळे घरच्या गरजा पुऱ्या पाहून जगाच्या बाजारातील शर्यतीत जपानला भाग घेता आला. कॅमेरे, टेपरेकॉर्डर्स, पॉकेट, रोडियोज, विजेवर चालणाऱ्या दाढी करण्याच्या वस्तऱ्यापासून ओले केस वाळविणाऱ्या उष्ण यंत्रापर्यंत अमित वस्तु जपानी बाजारांतून फिरणाऱ्या प्रवाशाच्या नजरेस पडतात. त्या करण्याइतकी कामगार व कारखानदार यांची युति ‘आधी लग्न कोंडाण्याचे मग लगीन रायाजीचे’ अशा वृत्तीने देशाच्या उन्नतीसाठी धडपडताना आढळते. कामगार व कारखानदार यांच्या कटकटी जपानात चालू आहेत, परंतु वर्गयुद्धाची बीजे देशभक्तीच्या कातळावर तिथे फारशी रुजत नाहीत असेहि ऐकले!

बोट जपानचा किनारा सोडून निघाली त्यावेळी रंगीबेरंगी किमोनोसारख्या पंखांचे उषेचे फूलपाखरू रात्रीच्या कोषातून थरथरत बाहेर पडत होते आणि त्याच्या पंखांचे प्रतिबिंब झेलून निळा समुद्र जपानी अक्षरात सोनेरी कविता लिहू लागला होता. जपानची निसर्गसुंदर कलासंपन्न भूमि स्वप्नसृष्टीतील गंधर्वनगरीसारखी क्षितिजाच्या हृदयात लपून जात होती!

[समाप्त]

Tags: Vasant Awasare वसन्त अवसरे Japan जपान Weekly Sadhana साप्ताहिक साधना Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके