डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कसाबसा वकिली पास झालेला आणि अनेक सामान्य वकिलांप्रमाणे काम मिळावं म्हणून वणवणणारा लिंकन- आणि तरीही लबाडी करून खटले जिंकण्याचं अव्हेरणारा, लुच्चेपणाची वकीलपत्रं घेण्याचं नाकारणारा लिंकन, आपल्या मार्मिक भाषणांनी निवडणुका जिंकणारा लिंकन आणि आपली तत्त्वनिष्ठा व स्पष्टवक्तेपणा यांमुळे निवडणुका हरणारा लिंकन. गावंढ्या गावातून बाहेर पडून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालेला.

आपल्या देशात विमानप्रवास म्हणजे कपिलाषष्टीचा योग. सटीसामासी घडून येणारी अविस्मरणीय घटना आणि अमेरिकेत? 

तुझी माझी धाव आहे विमानातून विमानात, हा अगदी नित्याचा खाक्या. कधी कधी या विमानप्रवासाचा माणसाला कंटाळा येतो. आता असं म्हणणे म्हणजे कुणाला तरी ढोंग वाटेल. पण हे अगदी खरं आहे. मला तर वाटतं, आपण जेव्हा विमानातून जातो तेव्हा प्रवास म्हणजे आपलं गाठुडं इकडून तिकडे नेऊन टाकायचं, मालवाहू मोटारीनं पाठवलेल्या बोजासारखं. आपण जेव्हा आगगाडीतून जातो तेव्हा गाडी जर एकदम फास्टम् फास्ट असेल तर जवळजवळ असाच प्रकार असतो, पण जमिनीवरून सरपटत असल्यामुळे वृक्षवेली, खेडीपाडी, माणसंकाणसं यांची ओझरती तरी दर्शनं होतात. गाडी जर धीमी असली- म्हणजे स्टॉपिंग अॅट ऑल स्टेशन्स अँड ऑल्सो इन् द मिड्ल- आणि आपल्याला जर वेळ भरपूर असला तर अधिक मजा येते. मात्र कोणत्या स्टेशनवर काय खावं, काय प्यावं याची माहिती पक्की असली पाहिजे. सगळ्यात छान म्हणजे चाकावरून जगाची चक्कर! हवं तेव्हा निघावं, हवं तेव्हा पोचावं. कधी सुसाट सुटावं, कधी डकाव् डकाव् रमतगमत जावं, कधी हे पाहण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी वाट वळणाची पत्करावी. कधी गावकरी मंडळीशी गप्पाटप्पा कराव्या- तात्पर्य, संपूर्ण यात्रा सुख घेतघेत जावं.

पण हे जमावं कसं? कारण आमचा कार्यक्रम असा की आज पश्चिम किनार्‍यावर कॅलिफोर्नियात तर उद्या दक्षिणमध्य अमेरिकेत. मग परवा एकदम उत्तर दिग्विजय. आयुर्विम्याला जसा पर्याय नसतो तसा विमानप्रवासाला तिथे पर्याय नाही. पण अचानक कधी कधी वेगळा योग येतो. सेंट लुईसहून ग्रे हाउंड बसने मी निघालो गेल्सबर्गला. ग्रे हाउंड ही अमेरिकन एष्टी- पण जरा कमी कष्टी. पोचेपोचेपर्यंत रात्र झाली. गेल्सबर्गला माझं हक्काचं घर होतं. के. नारायण काळ्यांचा मुलगा अशोक आणि त्याची बायको अजिता, मुंबईच्या डॉ. दिवेकरांची मुलगी- दोघेही साधनाचे लेखक. अजिता तर छोटी असल्यापासून आपली दोस्तच. मुख्य म्हणजे मला अत्यंत आवडणारं असं एक प्रलोभन त्यांनी माझ्यापुढे ठेवलं होतं. परतीचा प्रवास ती दोघंही आपल्या मोटरनं घडवणार होती. गेल्सबर्ग ते सेंट लुईस. या रस्त्यावरच आहे स्प्रिंग फील्ड. 

लक्षात आलं ना, स्प्रिंग फील्ड. साधंसुधं नव्हे. अब्राहम लिंकनचं गाव. आयुष्यभर ज्यांच्याकडे खास आवडीचे नायक म्हणून पाहिलं त्यांत अर्थातच अब्राहम लिंकनचं स्थान आहे. लिंकनच्या गावी आपण जाणार या कल्पनेनंच मनातल्या मनात पुलकित का काय ते, झालो होतो.

अब्राहम लिंकन. आम्ही त्याला प्रेमानं अ‍ॅब लिंकन म्हणतो, हा मोठा अमेरिकन नेता होता. अमेरिकेचा मोठ्या कठीण काळातला राष्ट्राध्यक्ष होता. अमेरिकेची छकलं उडू न देता यादवीचा निर्धारानं सामना करणारा आणि 'मानवाचे अंती एक गोत्र' असे मानणारा महान मानवतावादी होता ही त्याची ख्याती सर्वश्रुतच आहे. पण मला लिंकनच्या दुसऱ्याच काही गुणांमुळे त्याच्याबद्दल प्रेम वाटतं. त्याला वशिलेबाजीचा तिटकारा होता. त्याच्या ठायी निखळ प्रामाणिकपणा होता. तो अतिशय साधा होता आणि राजकारण्यांमध्ये क्वचित् आढळणारी मर्मग्राही विनोदबुद्धी त्याच्यापाशी होती. लिंकनची आणखी एक थोरवी म्हणजे मनुष्यमात्राच्या सर्वांगीण विकासाचा तो सतत विचार करीत असे. आपल्या मुलाच्या शाळेच्या हेडमास्तरांना महात्मा लिंकनने जे पत्र लिहिलं आहे त्यात जीवनाच्या समग्रतेचं त्याला सतत घडत असणारं दर्शन स्पष्टपणे आपण पाहू शकतो.

मला साहजिकच विलक्षण उत्सुकता होती- लिंकन कुठे कसा राहत होता? त्याचं घर कसं असेल? केवढं असेल? प्रासादतुल्य असेल का? सामर्थ्यसंपन्न अमेरिकेच्या वैभवाची खूणगाठ ते घर पटवीत असेल का? आदल्या दिवसापर्यंत गेल्सबर्गमधलेच बाकीचे कार्यक्रम पार पडले. रात्री झोपतेवेळीही मी मनातल्या मनात लिंकनच्या घराचाच जसा काही धोशा घेतला होता. त्याच्या पायी मी एक मूर्खपणा करून बसलो. गेल्सबर्गच्या जवळच जागतिक कीर्तीचा अमेरिकन कवी कार्ल सॅंडबर्ग याचंही घर राष्ट्रीय स्मारकारारखं जपून ठेवलेलं आहे, ते मी पाहायला हवं होतं. पण माझं मन लहान मुलासारखं एकच हट्ट घेऊन बसलं होतं- मला लिंकनकडे जायचंय!

गाडीने एक सफाईदार वळण घेतलं आणि ती स्प्रिंग फील्डमध्ये शिरली. स्प्रिंग फील्ड नावाप्रमाणेच हिरवळीच्या मैदानांनी व्यापलेलं आहे. गाव नेटकं आणि टुमदार आहे. हेच गाव लिंकननं आपल्या निवासासाठी का पसंत केलं याला काही तर्कसमर्थ कारण असेलही. हे न बाजाराचं गाव, न जादा गजबजलेलं, न राजरस्त्यावर मिरवणारं, पण न शुद्ध अज्ञातवासात राहणारं. साध्यासीध्या लिंकनला शिकागो फार जवळ नव्हे, फार लांब नव्हे अशी जागा हवी असावी. म्हणून त्यानं निवडलं असावं हे स्प्रिंग फील्ड.

अनेक एकर क्षेत्रफळाच्या विस्तृत हिरवळीवर लिंकनचं सार्वजनिक स्मारक उभं आहे. त्याच्यासारख्याच शेलाट्या बांध्याचा आणि ताठ मानेचा अग्रदार स्तंभ आपल्या अनलंकृत दिमाखात उभा आहे. तेच त्याच्या उत्तुंग व्यक्तित्वाचं स्मारक. जनसामान्यांच्या समजुतीसाठी स्तंभाच्या पायथ्याशी लिंकनचा पंचरसी पुतळा बसवलेला आहे. या स्मारकाच्या मागे एक बेतशीर स्मृतिगृह बांधलेलं आहे. त्यात लिंकनच्या आठवणी जपणारी चित्रं आहेत आणि ऐतिहासिक महत्त्वाचे शब्दही कोरून ठेवलेले आहेत. हे सारं पाहून झाल्यावर मात्र पुन्हा बाहेर यावं, हवं तर स्मृतिगृहाच्या सौधावर जावं, हवं तर प्रांगणातच थांबावं. उंच उंच वृक्ष अंतराअंतरावर आब राखून उभे दिसतील. पायतळी हिरवी मखमल आणि माथ्यावर निळा चांदवा. ऊन सौम्य आणि सुखकर. हवा चंद्रशील थंडाव्याची. ही जागा माणसांना म्हणते, 

या बांधवांनो, चहूदिशांनी या. 
कुबट तटभिंतींनी कोंझ्या केलेल्या 
बंदिस्त बंदिशाळा फोडून टाका. 
मोकळ्या हवेच्या वारूवर 
आपल्याच आकांक्षांची अदृश्य निशाणे 
फडकवीत या. 
मनुष्यमात्राच्या स्वातंत्र्याची गाणी 
मुक्तकंठ आळवीत या. 
मानवाच्या विशाल गोत्रामध्ये 
ज्याला जे मिळायला हवे ते मिळो. 
अन्यायाने कोणाला काही नाकारले गेले 
तर मात्र शस्त्र उपसावे लागेल. 
माणूस गोरा आहे की काळा, तांबूस की पिवळा, 
त्याचे आपले नाते असते हे विसरू नका. 

जागा बोलतात का? त्या झपाटलेल्या असतात का? गेलेला माणूस आपल्या स्पर्शाने आणि श्वासाने वास्तू भारून ठेवतो का? कोणास ठाऊक! पण काही ठिकाणी तरी प्रथम भेटीत ज्या व्यक्तीच्या नावाने ते ठिकाण तीर्थक्षेत्रासारखं झालेलं असतं, त्याने सारे आसमंत झपाटलेलं आहे असं वाटतं. असाच अनुभव पूर्वी शांतिनिकेतनाच्या प्रथमदर्शनात आला होता. आणि वाटलं होतं, 

ओळखीचे वृक्ष इथे का धरतात चित्राकार? 
इथल्या अंधारात हलतात आभास 
कृतार्थ होतो इथे तीर्थाचा प्रवास 
इथे तो होता, तो आहे, तो असेल 
केवढे हे आश्चर्य? 
एक मृत्युवश माणूस
भारून ठेवतो या वास्तूचा आकार 
वर्तमान त्याचेच, भविष्यकाळात
त्याचे झणझणतील अनाहत झंकार 
पिढ्यांच्या गुढ्यांवर त्याची किरणे 
येतच राहणार आहेत 
अज्ञात उगमातून 
आपल्या मनाची तार न् तार 
तो छेड़त राहील आतून 

स्मारकाच्या परिसरात हिंडताना लिंकनविषयी आपल्याला वाटणारं आकर्षण कसं वाढत गेलं याचा शोध माझं मन घेऊ लागलं. कसाबसा वकिली पास झालेला आणि अनेक सामान्य वकिलांप्रमाणे काम मिळावं म्हणून वणवणणारा लिंकन- आणि तरीही लबाडी करून खटले जिंकण्याचं अव्हेरणारा, लुच्चेपणाची वकीलपत्रं घेण्याचं नाकारणारा लिंकन, आपल्या मार्मिक भाषणांनी निवडणुका जिंकणारा लिंकन आणि आपली तत्त्वनिष्ठा व स्पष्टवक्तेपणा यांमुळे निवडणुका हरणारा लिंकन. गावंढ्या गावातून बाहेर पडून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालेला. राष्ट्र दुभंगवू पाहणार्‍या यादवीला खंबीरपणे तोड देणारा लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टनसारखा खंदा आणि उमदा सहकारी मिळाल्यामुळे संघराज्याचा विजयध्वज अभिमानाने उंच धरू शकणारा लिंकन. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना न्याय मिळाला पाहिजे असं म्हणणारा त्यांचा कैवारी लिंकन. अशी लिंकन या महामानवाची कर्तुकी तर मला आठवत होतीच पण अशा महामानवांच्या ठिकाणी दुर्मिळ असणारी लिंकनची विनोदप्रियताही आठवून आठवून मला हसू येत होतं.

एकदा लिंकन आपल्या बुटांना पॉलिश करीत बसला असता एक घमेंडखोर ब्रिटिश वकील तिथे आला आणि त्याने तुच्छतेने लिंकनला विचारलं- 'काय प्रेसिडेंटसाहेब, तुम्ही तुमच्या बुटांना पॉलिश करता?' त्याची टवाळखोरी आपल्या लक्षात न आल्याचा बहाणा करुन लिंकन म्हणाला, 'होय महाराज, मी माझ्या बुटांना पॉलिश करतो. आपण कुणाच्या बुटांना पॉलिश करता?

लिंकनला भांजा-भतीजांना चिकटवून वशिलेबाजी करणे अगदी नापसंत असे. तरी त्याचे नातेवाईक, गाववाले अनेकदा त्याला गराडा घालीत आणि आपली वर्णी लावण्यासाठी तगादे लावीत. त्या सर्वांना थोडा वेळ बसायला सांगून एकदा लिंकन म्हणाला, 'मी तुम्हाला आधी एक गोष्ट सांगतो. कोणे एके काळी सगळे प्राणी आळीपाळीने एकेकाला आपला राजा करीत. होता होता गाढवाची पाळी आली. गाढवाचे भाईबंद आपल्याला अधिकार मिळावा म्हणून एकच हाकाटी करू लागले. तेव्हापासून जगात तीच पद्धत पडली. आजही त्याचेच भाईबंद हक्कानं वशिला लावायला येतात.’ 

लिंकन, गुरू आहेस बाबा! माणसाच्या जीवनाच्या किती क्षेत्रांवर तू प्रकाश टाकला आहेस! मानवसमाज तुझ्या नेहमी ऋणात राहील. 

लिंकनला मनातल्या मनात लाख प्रणाम करीत आम्ही ते स्मारकाचं उद्यान सोडायचं ठरवलं, पण त्या उद्यानाच्या कोपऱ्यात आणखी एक स्मारक आमची वाट पाहत होते. व्हिएतनामच्या युद्धात हजारो अमेरिकन नवयुवक ठार झाले. एखाद्या तुघलकाप्रमाणे अमेरिकन शासनानं त्यांची आहुती देण्यासाठी त्यांना लढाईवर पाठवलं, ही एक लहर झाली. दुसरी लहर येताच युद्धबंदी पुकारून आणि जगात सर्वत्र उठलेल्या निषेधाच्या आवाजापुढे मान तुकवून व्हिएतनाममधून लष्कर परत घेतलं. साराच पोरखेळ. त्यांचा खेळ झाला पण असंख्यात निरागसांचा त्यात जीव गेला.

युद्धात मरण पावलेल्या सर्व सैनिकांची स्मारके उभारणार तरी कशी? नुसते क्रूस उभारले तरी ते शेकडो एकर जमीन व्यापतील. त्यामुळे कोणा चतुर शिल्पकाराच्या कल्पकतेने 'अनाम सैनिक' ही संकल्पना काढली आणि या अनाम सैनिकाचे स्मारक म्हणजे सर्वच हुतात्मा सैनिकांचे स्मारक असं मानण्याचा जगभर प्रघात पडला. पण कल्पक बुद्धी कधी एका निर्मितीवर पूर्णविराम घेत नाही. म्हणून अलीकडच्या काळात अमेरिकेत वॉशिंग्टनजवळ काळ्या कुळकुळीत ग्रॅनाईट्सचे त्रिकोण अथवा शंकू रचून त्यांचा एक अमूर्त आकृतिबंध उभवण्यात आला आणि ग्रॅनाईटवर रणांगणात पडलेल्या सर्वांची नावं कोरण्यात आली. हे मोठे स्मारक आहे वॉशिंग्टनजवळ तर स्प्रिंग फील्डला असंच छोटं स्मारक उभारून सभोवतालच्या प्रदेशातील मृत सैनिकांची नावं त्यावर कोरण्यात आली आहेत. आम्ही पोचलो त्याच वेळी शालेय विद्यार्थिविद्यार्थिनी बसेसमधून स्मारकाला भेट देण्यासाठी आली होती. आपल्या प्रिय व्यक्तीच्या कोरलेल्या नावावरून हात फिरवताना किंवा ग्रॅनाईटच्या पायथ्याशी फुलं ठेवताना त्यांचे डोळे पाणावत होते. तशी सगळ्यांची दृष्टी शाबूत होती हे खरं पण डोळे पाण्याने भरल्यामुळे सारे जसे काही आंधळे झाले होते. ग्रॅनाईटवर नावं कोरलेली असल्यानं त्यांनी ती नावं एका अभिनव ब्रेल लिपीतच वाचली असं मला वाटलं.

स्मारकाच्या विशाल परिसरातून आमचा मोर्चा वळला आता लिंकनच्या घराकडे. लिंकनचं निवासस्थान एक राष्ट्रीय महत्त्वाची वास्तू म्हणून अवघ्या अमेरिकन राष्ट्रानं प्रेमादरानं जपलेलं आहे. हे घर तसं इतरेजनांच्या वस्तीतच बांधलेलं आहे. ते प्रासादतुल्य नाही, राष्ट्राध्यक्षाच्या वैभवाची मिजास मिरवणारं नाही. 'फुलबाग बगीचा भवती' घेऊन उभा असलेला 'बंगला नवा नवकोनी' नाही. पुढे मागे सज्जे काढलेलं ते एक दुमजली नीटनेटकं पण साधं घर आहे. त्याच्या संरक्षणाच्या दृष्टीनं आता कडीकोयंडे आणि साखळ्या-कठडे यांत वाढ करण्यात आली आहे. आत फिरण्यासाठी प्रदक्षिणामार्ग निश्चित करून देखभाल करायला माणसं नेमलेली आहेत, हेच त्याचं वेगळेपण आहे. गर्दी होऊ नये म्हणून मोजून मोजून ठराविक संख्येनं समुदाय आत सोडले जातात आणि ते बरोबर आहे. घर बघायला आलेल्या सर्वांचं वर्तन अगदी आदर्श असतं. आखून दिलेले मार्ग सोडून कोणी स्वैर भटकत नाहीत, घरातील वस्तूंना हात लावत नाहीत. लिंकनच्या स्मृतीच्या पावित्र्याला कोणीही थोडासुद्धा ढळ पोचू देत नाहीत.

लिंकनचं घर. घरंदाज गृहस्थाचं घर. बैठकीची खोली. छोटीशी अभ्यासिका. वाद्य वाजवायची आणि गायची कौटुंबिक संगीतशाळा. अगदी गरजेपुरती शवनगृहं. भक्कम साधं फर्निचर. डामडौलाला फाटा देणार्‍या गाद्यागिरद्या. भली मोठी स्वयंपाकाची भांडी. चुल्हाण. गंमत म्हणजे संडास चक्क घरापासून वेगळा- परसदारी! आर्किटेक्ट बहुधा भारतातून नेलेला असावा!!

लिंकनचं फर्निचर पाहताना मला लिंकनची उंची आठवून मनातल्या मनात हसू येत होतं. त्याच्या उंचीच्या मानाने पलंगाची लांबी जरा कमी वाटली. बिच्चारा! पोटाशी पाय घेऊन झोपत असावा. स्वारीने पलंग रेडिमेड आणला होता की काय कुणास ठाऊक! पण घरासारखं घर होतं म्हटल्यावर त्यात सोयीप्रमाणे गैरसोयीही असणारच. 

मला उगीचच हो चि मिन्हची आठवण झाली. आपल्या राष्ट्राचा प्रमुख झाल्यानंतर देखील त्याने तीन खोल्यांचा आपला फ्लॅट सोडला नव्हता म्हणे!

अहो दिल्लीमधील लहानथोर, पण बहुधा थोरच शहेनशाहा हो! तुम्ही यांच्यापासून काहीही शिकू नका. तुमच्यापैकी प्रत्येकाला दहा-वीस शयनकक्षं असणारा बंगला मिळालाच पाहिजे. तुमच्यापुढे आदर्श असावा तो लिंकनचा नव्हे आणि हो चि मिन्हचाही नव्हे. तुमच्यापुढे आदर्श हवा चौदाव्या लुईचा. रशियाच्या झारचा. अकबर शहाजहानचा. अलीकडच्या काळातला हवा असेल तर सातशे बिव्यांसह नांदणार्‍या निजामाचा. लिंकनची भिकारडी लक्षणं त्याची त्यालाच लखलाभ असोत. तशी लक्षणं धारण करून महत्पदी चढणं लालबहादुर शास्त्रींना जमलं असतं, पण गेले बिचारे! लिंकनसारखीच शरीरयष्टी आणि विनोदबुद्धी असलेल्या आमच्या एसेमना ही लक्षणं शोभली असती. पण नशिबात पाहिजे ना!

Tags: अमेरिका जॉर्ज वॉशिंग्टन अब्राहम लिंकन स्प्रिंग फील्ड सेंट लुईस गेल्सबर्ग कॅलिफोर्निया America George Washington Abraham Lincoln Spring Field St. Louis Galesburg California weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके