डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

प्रवाशांना आनंद देणारी निसर्गरम्य स्थळे ऑस्ट्रेलियात आहेत तसे अभिजात सौंदर्य परिपूर्ण ऐश्वर्यसंपन्न राजमहालही आहेत. कुणी म्हणेल पैसा असला म्हणजे सगळे रंगढंग सहज करता येतात, पण हे खरे नाही. सुंदर छंद जिवाला लावून घ्यायचे आणि अनेकांना त्यांचा आनंद लुटू द्यायचा... अशा बुद्धीने आपले धन वेचणारे विरळा! म्हणून तर नॉत्रदामसारखे सौंदर्यतीर्थ निर्माण करणाऱ्याला धन्यवाद दिले पाहिजेत.

सर्व प्रगत देशांप्रमाणे ऑस्ट्रेलियातही प्रत्येक आठवड्यात पाच दिवसच काम करण्याची प्रथा आहे. म्हणजेच शनिवार-रविवार नेहमीच सुट्टी. त्यात पुन्हा शुक्रवारी किंवा सोमवारी काही ना काही निमित्ताने अतिरिक्त सुटी मिळाली की लाँग वीकएन्डचा लॉगर वीकएन्ड होतो! मग तर मजाच. परिवारासह कुठे तरी दूर दूर जलदर्शनाला नाही तर स्थलदर्शनाला जायचं. पण पोट्टेहो, जाऊन जाऊन जाणार कुठे? कुठेही गेलात तरी ते ठिकाणही सहसा सिडनीच्या चतुःसीमांतच असते! पण म्हणून काही नाउमेद व्हायला नको.

ऑस्ट्रेलियातले दाट वस्तीचे प्रदेश पाहिले की लक्षात येते, त्या बेटाला वस्तीचे कंकणाकृती ग्रहण आहे! किनाऱ्याकिनाऱ्याने शहरे वसलेली किंवा वसवलेली आहेत. अगदी उत्तरेला डार्विन नैॠत्येला पर्थ, मग अॅडलेड, दक्षिणेला मेलबर्न किंवा टास्मानियातील होबर्ट. जरा उत्तरेकडे सरकल्यावर कॅनबेरा. पूर्व किनाऱ्याने उत्तरेकडे जाता जाता आधी मायापुरी सिडनी, त्यानंतर ब्रिस्बेन आणि त्याच्याही उत्तरेला पर्यटकांचे लाडके रम्य स्थान केर्न्स. झरकन् नकाशावर छडी फिरवली की सगळी नगरे महानगरे कशी हाताच्या एका मंडलाकार हालचालीने दाखवता येतात. 

पण शहराशहरांतली अंतरे तशी जबरदस्त आहेत. सिडनीहून ब्रिस्बेन आणि ब्रिस्बेनहून केर्न्स म्हणजे दोन हजार किलोमीटर. हे झाले मुंबईहून नागपूरला आणि तिथून कलकत्त्याला जाण्यासारखे! आता बोला! तीन दिवसांची सुटी झाली तरी शंभर शंभर मैल लांबीरुंदीच्या मोठ्या शहरांतून दूर दूर तरी जाणार कसे आणि कुठे?

दूर दूर जायची तशी जरूर नाही. सिडनीच्या परिसरातच प्रेक्षणीय आणि सुखाने कालक्रमणा करण्याजोग्या जागा काही कमी नाहीत. मुख्य म्हणजे महानगरालगतच नील पर्वत, ब्लू माउंटन्स आहेत! उंच उंच कडे, चित्रविचित्र सुळके, भोवळदऱ्या, डोंगरांच्या अंगाखांद्यावर घनगर्द झाडी- निसर्गसौंदर्याची अक्षरशः उधळण! 

या प्रदेशाला आणखी एक वरदान आहे ते अनेकरंगी शुककुळातील पक्ष्यांचे! त्यात रोझेला पक्षी तर अंगावर इंद्रधनुष्याचे रंगच माखून येतात. या रंगीतसंगीत पाखरांना एक अभयदान मिळालेले आहे. येथील आकाशात दुसऱ्या पाखरांचा जीव घ्यायला टपलेल्या ससाणे घारी-गिधाडांसारख्या शिकारी पक्ष्यांचा (प्रेडेटरी बर्डस्) अभाव आहे. सुखाने भराऱ्या मारा बरे रंगयात्रींनो! 

तीन वहिणी नावाचे तीन सुळके शेजारी शेजारी उभे आहेत. त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या समोरील पहाडावर एक खडकमाची तयार झालेली आहे. सुट्टीच्या दिवशी या माचीवर झुंबड उसळते. डफगाणी किंवा गिटारवादन यांचा आवाज घुमतो. जत्रेत कमाई चांगली होते हे जाणून काही (खरे खोटे) आदिवासी नर्तक आपले ओबडधोबड, अक्राळविक्राळ मुद्रांचे विकट नृत्य करून दाखवतात. जमलेल्या परदेशी मुशाफिरांना, विशेषतः श्रीमंत अमेरिकी आणि जपानी प्रवाशांना त्यांचे फार अप्रुप वाटते आणि ते नर्तकांसह आपली रंगीत प्रकाशचित्रे काढून घेतात. 

जवळच रोप-वे आहे, स्मृतिचिन्हे विकणारे दुकान आहे, शीतपेये आणि ̔झटपट मागावे की चटपट मिळावे' असे खाद्यपदार्थ पुरवणारी दुकाने आहेत. हाय गे सिडनी! एवढे असून केरकचरा, कागदबोळे, उष्ट्या अन्नाचे शेषप्रसाद या जत्रेतल्या नेहमीच्या सुंदर दृश्यांचे मात्र दर्शन येथे कोठेही होत नाही! उलट जवळच असलेल्या हरित तृणांच्या मखमालीवर बागडणारी गोंडस बाळे हवी तेवढी दिसतात. कुटुकुल् करीत केसाळ देह झुलवणारे उच्च जातींचे कुत्रेही रुबाबात हिंडून मालकाची ऐपत जगजाहीर करीत असतात, बाबागाड्या आणि वृद्धांसाठी ढकलगाडी अशा सुविधाही साफसुरळीत काम करीत असतात. 

दिवस कलू लागला किंवा आभाळ भरून येण्याची लक्षणे दिसू लागली की नाइलाजाने माणसे आपापल्या वाहनांकडे निघून जातात आणि मग मात्र येताना होता त्यापेक्षा वेग दुपटीत नेऊन घरोघर पसार होतात. 

नीलगिरीच्याच परिसरात शांत निवांत किनारेही पुष्कळ आहेत. एकाकी प्रवाशासारखी एकटी उभी असलेली झाडे फार मोहक दिसतात. भरतीच्या लाटांनी धडका देऊन खडकात एक बोगदा पाडला आहे. त्यातून भरतीचे पाणी आकाशाच्या दिशेने उसळी घेते - ब्लो होल! जणू निसर्गाने निर्माण केलेले प्रचंड कारंजेच! त्याहीपेक्षा एक मोठे आकर्षण म्हणजे थंडीवाऱ्याचा मारा खाऊन डोंगरकपारीत विलक्षण आकारांच्या गुहा तयार झाल्या आहेत. त्या पाहण्याची माझी संधी हुकली याची मला चांगलीच चुटपूट लागलेली आहे.

̔एकविसाव्या शतकातील दुर्ग!̕ असे लोकविलक्षण अभिधान मिरवीत नॉत्रदाम नावाची प्रासादतुल्य वास्तू केवळ एका गुलहौशी श्रीमंताने अभिजात सौंदर्यदृष्टीच्या बळावर निर्माण केलेली आहे. दुनियेतील उत्तमोत्तम फर्निचर, व्याघ्रचर्मे, मृगचर्मे, शिकारीत गवसलेल्या काळवीटांची सशृंग शिरे, नाना तऱ्हांचे शोभिवंत करंडक, भोजनपात्रे आणि चषक, मूर्तिकलेचे अलौकिक नमुने इत्यादी विस्मयकारक वस्तुजातांनी हा राजमहाल खूप ऐश्वर्यसंपन्न केलेला असला तरी त्याची रचना मात्र खूप साधी आहे; तिच्यात उत्तम लाकडाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. दरवाजे आणि गवाक्षे यांनाही एक अभिजात डौल आहे. मागील बाजूस पुष्करिणी असून तिच्यातील रंगीत मासे आणि प्रफुल्ल कमळे यांची अवर्णनीय शोभा आपले मन वेधून घेते. 

नॉत्रदामचा धनी या प्रासादाच्या एका भागात राहत असला तरी त्याच्या वास्तव्याची एकही निशाणी बाहेर दिसू न देण्याची खबरदारी त्याने घेतलेली आहे. प्रासादात देखील सर्वांना प्रवेश नाही; परंतु सभोवार लावलेल्या तावदानांतूनच आपण अंतर्गृहाचे दर्शन घेऊ शकतो. सभोवती सुमारे पाच एकर विस्ताराचे प्रांगण आहे, त्यात मालकाने हौसेने निर्माण केलेले प्राणिसंग्रहालय आहे. ऑस्ट्रेलियातील कोआला नावाचे गोजिरवाणे पण मंद प्राणी तर येथे आहेतच पण बंगाली वाघही, किलकिल्या डोळ्यांनीही, आपला थरकाप उडवायला या संग्रहालयात मौजूद आहेत. 

कोणी म्हणेल, पैसा असला म्हणजे असले रंग-ढंग सहज करता येतात! पण हे खरे नाही. पैसा असला तर रात्रंदिवस तो चैनीत उडवता येतो, रम-रमी-रमा यांच्यावरून ओवाळून टाकता येतो. जुगारात हरता येतो... आणखी कैक प्रकारे त्याची विल्हेवाट लावता येते पण सुंदर छंद जिवाला लावून घ्यायचे आणि शक्य तर अनेकांना त्यांचा आनंद लुटू द्यायचा... अशा बुद्धीने आपले धन वेचणारे विरळा, म्हणून तर नॉँत्रदामसारखे सौंदर्यतीर्थ निर्माण करणाऱ्याला धन्यवाद दिले पाहिजेत.

नॉंत्रदामच्या धन्याची सर्व पूर्वपीठिका समजली नाही. परंतु, त्याच्या जन्मकहाणीत स्पेन आणि फ्रान्स या दोन देशांतील संस्कृतीचा कोठे तरी घनदाट संबंध आलेला असावा, याचा एक ढळढळीत पुरावा म्हणजे याच माणसाने उत्तम घोड्यांची पैदास करण्याची हौस शर्थीने पुरी केली आहे. ऑस्ट्रेलियाना पार्क नावाच्या मोकळ्याझाकळ्या उपवनात एल् कॅवॅलो ब्लांको (शुभ्र अश्वराज) नावाची एक अश्र्वशाळा त्याने निर्माण केली आहे. 

या उपवनात करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तऱ्हेतऱ्हेचे प्राणी आहेत. पक्षी आणि सर्प यांचे नानाविध नमुने येथे पाहता येतात. मेंढ्यांची लोकर कशी कापली जाते याचे प्रात्यक्षिक तर आहेच, पण इच्छा असेल तर मुशाफिरांना लोकर कटाईत भागही घेता येतो. मोकळे मैदान दीडशे एकर एवढे मोठे असल्याने ज्यांना घोड्यावर बसायची हौस असेल, त्यांना ही आपली हौस पुरी करता येते आणि जगप्रसिद्ध अस्त्र बुमरॅंग फेकायचे असेल तर ते शिकायचीही सोय आहे. बागेत फेरफटका करायला छोटेखानी आगिनगाडी आहे. म्हणजे मुलांची चैनच! गमतीशीर बग्गी किंवा घोड्याने ओढलेल्या ट्रॅमगाडीत बसावे, ̔वल्हवा रे नाव' म्हणत हवे तर होडी वल्हवत फिरावे किंवा टम्म फुगलेल्या शिडाच्या होडीतून फिरावे... 

सगळ्या गमतीजमतीचा कळस म्हणजे  ̔नाच रे घोड्या छुमछुम तालात' हा अतिशय सुंदर नाचणाऱ्या घोड्यांचा कार्यक्रम. या नाचासाठी भव्य स्टेडियम बांधलेला असून पडदे, आरसे, हंड्याझुंबरे यांनी तो शोभिवंत केलेला आहे. पण समजा, ही सगळी ऐंट केली असती आणि घोडे मात्र असते लंगडे-सुळे किंवा शामळू बावळे तर आपला केवढा हिरमोड झाला असता! या शामियान्यातला एकेक घोडा जसा काही इंद्राधरचा उचै:श्रवा! मालिश केलेले आणि देहावर तुकतुकीत पॉलिश झळकवणारे दिमाखदार अश्वराज... काय त्यांची उभे राहण्याची ऐट! काय त्यांच्या चालीचा डौल! काय त्यांच्या हालचालीतली लयकारी! यांना म्हणतात उमदे घोडे! एरवी जगात शामभटाच्या तट्टाण्या आणि महाबळभटांची अडेलतट्टे काय कमी असतील का? यांतला एकेक घोडा म्हणजे विश्वविजयी वीराने अभिमानाने ज्यावर आरूढ व्हावे असा- विजयी विश्व तुरंगा प्यारा!

Tags: कॅनबेरा मेलबर्न अ‍ॅडलेड पर्थ सिडनी ऑस्ट्रेलिया Canberra Melbourne Adelaide Perth Sydney Australia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके