डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

केवळ शंख आणि शिंपले घेतले, चुनखड़ी चित्र आणि समुद्रफेसापासून घडलेली फुले घेतली तरी त्यांची अपरंपार विविधता आणि मनाच्या वर्तुळात न मावणारी सुंदरता - किती विलक्षण गोष्टी आहेत या!  सागरातली खरी संपत्ती आहे ती मात्र जिवंत जित्या- जागत्या जीवसृष्टीची, प्रचंड आकाराचे जलचर आणि चारोळ्या-लवंगा यांच्याहूनही बारीक असे जिजीविषू जीव, कठीण पाषाणांत सुरक्षित राहणारी कालवे आणि चक्रव्यूहासारख्या गुप्त भुयारी विवरांत लपून राहणाऱ्या चिंचोऱ्या, भस्सकन् रेतीत बीळ पाडून अदृश्य होणारे खेकडे आणि सर्वांत अलौकिक सुंदर म्हणजे नाना आकारांचे, नाना परींचे, शेकडो रंगांचे छटेल चढ्या पट्ट्यांचे, उभ्या-आडव्या तिरक्या-उंच खोल, सतत सुळकांडया मारून हुलकावण्या देणारे मासे!

कुरुंदा हे बोलूनचालून पर्यटकांसाठी बसवलेले गमतीजमतीचे गाव आहे. आपण जाणार एखादाच दिवस, पण या गावाला वर्षाचे बारा महिने आणि महिन्याचे तीसही दिवस जशी काही जत्रा भरलेली असते. जत्रा म्हणवत नाही कारण अव्यवस्था नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. ताशे नगारे, ढोल पिपाण्या असला कसलाही गोंगाट नाही. नवलाईच्या विजा विकणारी दुकाने मात्र हारीने लागलेली आहेत. खाण्यापिण्याची लहानमोठी ठिकाणे अर्थात भरपूर आहेत. 

डोंगरकुशीत वसलेले गाव. त्यामुळे वाटा वळणाच्या, सर्वत्र चढ आणि उतार. बूमरॅंग आणि तीरकमठे, आदिवासींच्या टोप्या अथवा जाकिटे असला माल तर मिळेलच. पण सर्व गिरि-विहाराच्या ठिकाणी मिळतो तसला फॅशनेबल मालही कमी मिळत नाही. सर्पोद्यान आहे आणि अजबखानेही आहेत, पण दोन जागा विशेष मनात भरतात. 

एक आहे विहंगवन. खरे म्हणजे याला शुक-बहात्तरी म्हणायला हरकत नाही. हिरव्यागार अंगाच्या आणि लाल चोचीच्या आपल्या ओळखीच्या पोपटांपासून ते पंचरंगी काकाकुवांपर्यंत सर्व जातींची शुक-कुले इथे आनंदाने बागडतात, कोणाला छोटेखानी पिंजऱ्यात बंदिस्त केलेले नाही. सर्कसच्या तंबूंसारखे मोठे जाळीचे पक्षी-घर असते. आत झाडे आणि वेली, झरे आणि ओढे अशी पक्ष्यांना अगदी घरच्यासारखी वाटायला लावणारी सजावट असते. त्यावर मनसोक्त कुजन करीत, माना वाकड्या करून शीळ घालीत त्यांनी हवे तसे दुडदुडावे, बांगडावे. प्रेक्षकांनी त्यांना बघावे आणि त्यांनी प्रेक्षकांना बघावे. त्यांनी आपल्याशी आणि आपण त्यांच्याशी खुशाल सलगी करावी. हवेहवेसे वाटणारे एखादे गुबगुबीत गिरेवाज पाखरू आपल्या मनगटावर येऊन बसते आणि लाड करून घेते. त्याला आपले भय नाही आणि आपल्याला त्याचे भय नाही. 

काही पक्षी एकटे, एकांडे. बरेचसे दुकटे दुकटे म्हणजे जोडीजोडीने. काही छोटे मोठे मेळावे करून किलबिलाट करणारे. ते आपल्या जवळ येतात. आपल्या ओंजळीतून खाऊ दिला तरी खातात आणि काही तर फोटोसाठी चक्क पोज देतात.

तिथे आणखी एक जगावेगळे अजबघर आहे ते म्हणजे फुलपाखरांचे उद्यान. मुळात कल्पनाच मनोहर आणि त्यात चित्रविचित्र छटा पंखांवर मिरवणारी फुलपाखरे एकत्र पाहाता येणार ही केवढी मोठी आनंदपर्वणी. पण व्यापारी वृत्ती कशी बेरकी असते. म्हणून इवलीशी फुलपाखरे पाहायला छोट्या मुशाफिराची मोठी गर्दी होणार हे ओळखून या उद्यानात प्रवेश फी जरा मोठीच ठेवलेली आहे. म्हणून तिकडे वळण्यापेक्षा निसर्गाची शोभा पाहणेच अधिक श्रेयस्कर असे बहुधा मुशाफिर ठरवीत असावेत. कुरुंदाला वङ-औदुंबरांच्या जातीचे एक झाड आहे. त्याच्या अंगाखांद्यावरून जमिनीपावत लोंबलेल्या पारंब्या आता अशा दाट वाढलेल्या आहेत की, वृक्षाच्या बुंध्याभोवती त्याचाच एक पडदा लावल्याचा भास होतो.

दुपार ओसरली. सूर्य कलला. थोडीफार पावसाची लक्षणे दिसू लागली. तेव्हा कुरुंदा नामक कुरुंद वाडीवरून झुकझुक गाडी पकडून पहाडापहाडांतून बोगदे आणि पूल पार करीत केर्न्स नामक नेरळला जाण्यासाठी प्रस्थान ठेवणे योग्य असा निर्णय घेणे ओघाने आले. फरक एवढाच की, माथेरान नेरळच्या प्रवासापेक्षा हा प्रवास निदान पाचपट दीर्घ आणि गाडी चित्रमय प्रदेशातून जाणारी. 

ढग आले होते हे खरेच, थोडाफार पाऊसही होता. झाडामाडांवर सतेज हिरवी झिलई चढली होती. नजरेला निववणारे धवधवे चाटेत भेटत होते. इंजनेर लोकांची कमाल वाटणारे पूलही वाटेत भेटत होते झुकझुक गाडी मात्र स्वच्छ होती, आरामशीर होती, साफसुरळीत चालत होती. कोकण रेल्वे झाल्यावर प्रवास कसा होईल याचा ट्रेलरच इथे अनुभवायला मिळतो.

समुद्रसेतूवरचे खेडे पाहणे मजेदार असले तरी त्याचे खरे आकर्षण अगदी वेगळे आहे. या सेतूवरच्या एखाद्या बेटावर जाऊन समुद्राच्या तळाशी असलेल्या संपत्तीचे दर्शन मुशाफिरांना घडते, ही या प्रवासाची खासियत आहे. ग्रेट अॅडव्हेंचरर नावाचे वाफोर अशा वेटांवर प्रवाशांना झोकात घेऊन जातात. 

या बेटांत एक मोठे बेट आहे हरितद्वीप - ग्रीन आयलंड, आपण काय करायचे? रामपारी निघायचे. बोटीमधे शिरायचे. सोयिस्कर आसन धरायचे. नावाप्रमाणे शांत असलेल्या प्रशांत महासागराच्या छाताडावरुन ग्रीन आयलंडचा भाऊचा धका आला की, लहान मुलाच्या उत्साहाने उतरायचे आणि काहीशा अरुंद जेटीवरून बेटाकडे मोर्चा न्यायचा. 

या जेटीच्या दोन्ही बाजूला पाण्याकडे नजर गेली तर मात्र पाय लवकर उचलणे कठीण जाईल. तेथे समुद्राचे पाणी गुडघाभर खोल असेल नसेल, पण नाना रंगांचे मोठमोठे मासे झुंडीने फिरताना दिसतात. निवळशंख पाण्याच्या स्फटिकभूमीखाली त्यांचे दर्शन अक्षरशः मनोहर असते. त्यात भर घालण्यासाठी त्या उथळ पाण्यात बुचकळ्या मारण्यासाठी उतरलेल्या कमनीय किशोरी आणि युवती आपले लक्ष वेधून घेतात तो भाग अलाहिदा !

ग्रीन आयलंड हरित द्वीप, स्वच्छ मराठीत सांगायचे तर हिरवाळीचे बेट - म्हणजे निळ्या समुद्राच्या मखमालीवर ठेवलेला प्रचंड हिरव्या पाचूंचा लांब आकाराचा ढिगारा आहे जसा! हिरवाळीच्या बेटावर नावाप्रमाणेच गर्द हिरवी झाडी आहे, वाट चुकायला आमंत्रण देणाऱ्या वाटा आहेत. अर्थात मुशाफिराने वाट चुकली तरी बावरून जाऊ नये म्हणून त्याला मार्गदर्शन करणाऱ्या पाट्या ठायीठायी लावलेल्या आहेत. 

येथे जलविहाराच्या सर्व सोयी प्रवाशांच्या सुखासाठी पुरवल्या जातात. पाणबुड्यांसारखे वेष, वल्ह्यासारखे हातमोजे पायमोजे, या सामग्रीसह समुद्रस्नानाचा आनंद अनुभवा किंवा सर्फरायरडिंगसाठी जा किंवा एखादे सुरक्षित लगून पाहून पोहायची हौस भागवून घ्या. बेटावर क्षुधाशांती, तृषाशांती यांची वाण नाही. हवे तर द्यूताची हौसही पुरवून घेता येईल. किंवा हे काहीच करायचे नसेल तर 'आकाश मंडप प्रिथिवी आसन' अशा उदात्त वातावरणात वृक्षवल्ली आणि वनचरें या सोयऱ्यांशीही जवळीक करता येईल. 

बाकी ऑस्ट्रेलियातील वनचरेंही मुलखावेगळी आणि गोंडस आहेत. विशेषतः जन्म झाल्यावरही आपल्या अपत्याला अक्षरशः पोटात घेऊन हिंडणारे कांगारू आणि आपल्या गोजिरवाणेपणाने स्वतःचे लाड करायला लावणारे कोआला हे ऑस्ट्रेलियन प्राणिसृष्टीतील दोन खास नमुने आहेत. कांगारू नजरेत भरतो त्याच्या विचित्रपणाने आणि कोआला गोंडसपणाने! जलचरघर नेहमीच अद्भुत असते, तसे येथेही आहे. सर्पही हवे तर स्नेहबंधन जोडू शकतील. पण मकरउद्यानात मात्र सावधान!

दुरून पाहिले तर एखादा खडबडीत काळा खडक पडला आहे, असे वाटते. अशा दोन तीन खडकांना डावी किंवा उजवी घालून पुढे गेले आणि जरा मागे राहिलेल्या सोबत्यांसाठी म्हणून आपण काही अंतर पुन्हा माघारी आलो तर त्या खडकांनी जागा तरी बदललेली असते किंवा तोंड दुसरीकडे वळवलेले असते किंवा इंच इंच लढवीत ते दोनचार इंच पुढे सरकलेले असतात. केवढाल्या मगरी! 

मगरी कसल्या, काळ-मगरीच या. मकरोद्यानात ठेवल्या आहेत म्हणून सुस्त आणि निरागस वाटतात, पण घनदाट जंगलातल्या पाणथळीत चुकून कोणाचा पाय लागला तरी तो अपमान या मगरी अपमान करणाऱ्यासकट गिळून टाकत असतील. प्राचीन दुनियेचे महाकाय अवशेष अजूनही कुठे कुठे सापडतात आणि त्या अवशेषांची फेरजुळवणी करून इतिहासपूर्वकालीन महाभयंकर दिनासुरांची कल्पना आपण आता थोडीफार करू शकतो. 

पण कलियुगातल्या या मगरीचे दर्शन काय कमी भयावह आहे? यांच्या कुळातील पूर्वज यांच्यापेक्षा दोनचार पट मोठे असतील असे मानले तर त्यांच्या संभाव्य स्वरूपाच्या कल्पनेनेच अंगावर काटा उभा राहतो. अर्थात माणसाच्या मनाची मोठी गंमत आहे. आता तसले महाकाय प्राणी पृथ्वीवरून अंतर्धान पावले आणि मनुष्यप्राण्याजवळ आत्मसंरक्षणाची आणि अन्य विनाशाची अनेक साधने आता उपलब्ध झाली याची जाणीव दुनियेतील सर्वांना झाल्याबरोबर राक्षसी आकाराच्या प्राण्यांचे भय कोणालाच वाटेनासे झाले. आता भय उरले आहे ते अणुपरमाणूंहून लहान असलेल्या जीवजंतूंचे!

ज्या नौकेत बसून हिरवाळीच्या बेटावर यायचे तिचे नाव महान साहसी, 'द ग्रेट अॅडव्हेंचरर'! समुद्रसेतूच्या सफरीत साहस असते ते समुद्राच्या पोटात शिरण्यात! पृथ्वी वसुंधरा आहे आणि तिच्या पोटात असंख्य तेजस्वी रत्ने आहेत. आकाशात अगणित तारका आहेत, नक्षत्रे आहेत आणि अजून आकाराला न आलेल्या तेज:पुंज तारकाकणांच्या असंख्य राशीही आहेत. पण पृथ्वी आणि आकाश यांचे वैभव अदृश्य तरी किंवा आपल्या आटोक्याच्या पलीकडे तरी. सागरसंपत्तीची गोष्ट वेगळी. ती दृश्य आहे पण कष्टसाध्य आहे. ती लाभेल असे वाटते पण सुळकन् हातांतून निसटून जाते. मोती आणि पोवळी यांसारख्या बहुमोल मानल्या गेलेल्या संपदेची गोष्ट सोडा पण केवळ शंख आणि शिंपले घेतले, चुनखडी चित्रे आणि समुद्रफेसापासून घडलेली फुले घेतली तरी त्यांची अपरंपार विविधता आणि मनाच्या वर्तुळात न मावणारी सुंदरता - किती विलक्षण गोष्टी आहेत या! 

सागरातली खरी संपत्ती आहे ती मात्र जिवंत जित्या-जागत्या जीवसृष्टीची. प्रचंड आकाराचे जलचर आणि चारोळ्या-लवंगा यांच्याहूनही बारीक असे जिजीविषू जीव, कठीण पाषाणांत सुरक्षित राहणारी कालवे आणि चक्रव्यूहासारख्या गुप्त भुयारी विवरांत लपून राहणाऱ्या चिंबोऱ्या, भस्सकन् रेतीत बीळ पाडून अदृश्य होणारे खेकडे आणि सर्वांत अलौकिक सुंदर म्हणजे नाना आकारांचे, नाना परींचे, शेकडो रंगांचे छटेल चट्ट्या पट्ट्यांचे, उभ्या-आडव्या-तिरक्या-उंच-खोल, सतत सुळकांड्या मारून हुलकावण्या देणारे मासे! 

फुले आणि फुलपाखरे दोहोंचे जसे असंख्य रंग, अगणित आकार, परोपरीचे प्रकार - तसे जातिनाम तेवढे मत्स्य पण प्रत्येकाचा ठसा वेगळा! लक्ष चौऱ्यांशीच काय पण मासे मासे म्हणजे कोट्यवधी ठसे! मात्र हे सगळे वैभव जलावगुंठित! पाण्याची बुंथी बाजूला झाली तर मत्स्यकन्येचे रुपडे नजरेत भरणार!

हिरवाळीच्या बेटावरची गोष्ट वेगळी. अगदी पाणबुडी नव्हे पण पाणडुबी बोट घ्यायची इथे. तिला तिरप्या तावदानांच्या खिडक्या चौफेर लावलेल्या असतात. तिची भ्रमंती सुरू होते सागराच्या पृष्ठभागाखाली. वाटते, बिचाऱ्या मासोळ्यांना हा नवा दांडगा मासा कोण आला आहे, तो मित्र आहे का शत्रू आहे हे काही म्हणता काही कळत नसावे. 

माशांचे थवेच्या थवे बोटीला बिलगून हिंडू लागतात. कोणी उताणे पाताणे पोहतात आणि वदनोदर दर्शन देतात. कोणी लांबुटके सडसडीत, कोणी बुटके धष्टपुष्ट, रुपेरी-सोनेरी, जांभळे- पिवळे, वर्ख लावल्यासारखे, कोणी काळ्यापांढऱ्या चट्टयापट्टयांच्या वेषात, कोणी अंमळ अचपळ मासोळ्या, कोणी वल्ह्यासारखी शेपटे मारीत पाणी कापणारे बडेमियाँ - मासे मंडळींशी इतकी जवळीक, परस्परांबद्दल इतका विश्वास- मुख्य म्हणजे माणसांबद्दल त्यांच्या मनांत इतका विश्वास, इथल्यासारखा आणखी कोठे दिसणार? 

या चलत्मस्य दर्शनाला निसर्गाने जी पार्श्वभूमी बहाल केली आहे तीही सप्तरंगी आहे. यांना म्हणायचे पोवळी किंवा कॉरल्स. पण रत्ने म्हणून माणसे ओरबाडून काढतात ती ही कॉरल्स नव्हेत. या समुद्रफेनात रुजलेल्या म्हणा किंवा फेनाच्या बनलेल्या म्हणा किंवा फेनाचे रूपांतर झालेल्या वनस्पतीच आहेत. त्यांना नारिंगी, पिवळे, भगवे, केशरी, लाल, जांभळे, निळे, कवरे अशा रंगांनी कोणी न्हाऊ घातले असेल? समुद्राच्या तळाशी किंचित किंचित हलता झुलता रंगबहार गालिचा निर्माण करणाऱ्या या कॉरल्सची सुंदरता लक्षद्वीपला, मॉरिशसला - थोडक्यात अन्य द्वीपांजवळही आपण पाहू शकतो. पण सागरसेतूजवळच्या समुद्रात एवढ्या विस्तृत प्रदेशावर आणि विपुल प्रमाणात ही पोवळ्यांची जादू आपण पाहातो की केवळ या एका वैशिष्ट्यासाठीसुद्धा या महान सागरसेतूला जगातले अद्भुत आश्चर्य मानावयास हरकत नाही. 'अहो लब्धं नेत्रनिर्वाणम्' असा चक्क संस्कृत धन्योद्गार काढून मुशाफिराने कष्टाने घराची वाट धरावी एवढेच बाकी उरते.

Tags: मगर सर्प मासे कोआला कांगारू ऑस्ट्रेलिया crocodile snake fish koala kangaroo Australia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके