डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

उत्तर ऑस्ट्रेलियात केर्न्सला मात्र आपण निश्चित जायचेच. खरे म्हणजे क्वीन्सलँडपासून उत्तरेचा सर्वच मुलूख म्हणजे अनोख्या निसर्गसौंदर्याची लयलूट आहे. आधी आपण प्रवेश करावा ब्रिस्वेन या अत्याधुनिक शहरात आणि मग किनाऱ्याकिनाऱ्याने घरंगळत जावे केर्न्सला. किनारा असातसा नाही, त्याचे नावच आहे, सोनकिनारा - गोल्ड कोस्ट.

ऑस्ट्रेलियातली सगळे नगरे किनाऱ्याकिनाऱ्याने वसली आहेत ही गोष्ट खरी, पण अगदी खरी नाही. म्हणजे सर्व खंडाला लोकवस्तीचे कंकणाकृती ग्रहण लागले आहे, त्यामुळे मोठमोठ्या शहरांच्या शेजारी प्रशांत महासागराची सोबत हटकून असतेच. आणि तरीही उंच उंच डोंगरमाथीही आपले अस्तित्व भरपूर जाणवून देतात. त्यामुळे सिडनी काय आणि मेलबर्न काय सागर आणि डोंगर यांना खेळीमेळीनेच राहणे भाग आहे. 

हिंस्त्र श्वापदांच्या प्रचंड कळपांसारख्या समुद्राच्या लाटा शेपट्या आपटत जमिनीकडे चाल करून आल्या तरी डोंगरावर आपटल्यावर कशा शाहाण्या मुलांसारख्या शिस्तीत माघार घेतात. उलट, निळाशार समुद्र तसेच वनराईच्या ठिपक्यांनी आणि घरांच्या छपरांनी सजवलेले देखणे भूभाग यांचे विहंगम दर्शन घडवण्यासाठीच आपली योजना झाली आहे, अशी डोंगर पठारांची पक्की समजूत झाली आहे.

निसर्ग आणि नागरी जीवन यांनी जसे सहजपणे सहजीवन स्वीकारले आहे, त्याप्रमाणेच मूळचे वस्तीकर आणि नव्याने डेरेदाखल झालेले अँग्लो-सॅक्सन यांनीही आपल्याला एकत्र नांदावे लागणार आहे याची खूणगाठ मनाशी बांधली आहे. ऑस्ट्रेलियाने कितीही आधुनिकता स्वीकारली, मिनी अमेरिका असल्याचा आविर्भाव आणला तरी जुन्या वस्तीकरांच्या खाणाखुणा त्यांना पुसून टाकता आलेल्या नाहीत. कधी गावांची नावे, कधी रस्त्यांची, कधी नद्यांची वा धबधब्यांची - वाचताना मुशाफिरांच्या मुखांवर एखादी तरी स्मितरेषा उमटल्याशिवाय राहत नाही. 

पॅरामेट्टा हे सिडनीतल्या- मद्रासमधल्या नव्हे- हमरस्त्याचे नाव आहे! एका उपनगराचे नाव आहे, बोलानगाँग. वाटते की 15-20 हजार वर्षापूर्वी जगाच्या या भागात द्राविड भाषा नक्की नांदून गेलेल्या असाव्यात. मेलबर्नजवळ एका पर्वतावर उंचच उंच वृक्षांनी निर्माण केलेले एक विराट उद्यान आहे. त्याचे नाव आहे डॅंडीमॉंग हिल्स. 

प्रत्येक देशात कलंदर कलावंत असतातच की! तसा एक कलंदर सृष्टीशी एकरूपता साधत जनलोकांना टाळून एकांडेपणाने वनातच येऊन राहिला. उपेक्षित आदिवासींच्या पोराबाळांचा चाचा बनला आणि एकाकी जीवनात भरपूर सगेसोयरे भेटल्याप्रमाणे आनंदात कालक्रमणा करून शांतपणे काळाच्या स्वाधीन झाला. त्याला एक मुलखावेगळा छंद होता. झाडांच्या भल्यामोठ्या खोडांवर त्याने शिल्पाकृती कोरल्या. कधी आपल्या शिल्पांना अकणमाती-चिकणमातीची जोड दिली. 

मेलबर्न शहर तसे पाहण्यासारखे आहे. पार्कच पार्क, तलावच तलाव, आटपाट रस्ते, धनंतर बाजारपेठ. लोकसंख्या मात्र एकूण चारच लाख हं! एका दृष्टीने पृथ्वीच्या पाठीवरल्या अनेक मोठया शहरांसारखे एक शहर. पण आपण काय करावे? शहरापासून गाडी जरा बाहेर काढावी. फार दूर नाही, तशी पन्नास मैलांच्या आतच डॅंडीमॉग हिल्ससारखी ठिकाणे आहेत. इथे रिकेट्स सँक्युअरीसारखी मजेदार शिल्पशाळा आहे. जंगल मंगल केलेले आहे. मनुष्यप्राण्याची कशी गंमत असते पहा. 'आपली' मुले- माणसे सोडून, 'आपली वाडी वस्ती' विसरून दूर दूर एकांतवास पत्करायचा आणि तिथल्या वेडयावगड्या माणसांशी रेशमी अनुबंध जोडायचे - काय असेल अशा वागण्यामागचे रहस्य? 'गर्दीत माणसांच्या' माणूस शोधण्याचा हा प्रयत्न होता का? की 'जनांचा प्रवाहो' ओलांडून नव्या जनांच्या प्रवाहात मिसळण्याची ही हौस होती? 

सिडनी, कॅनबेरा, मेलबर्न या त्रिकोणात मुशाफिर गुरफटून गेला तर त्याने योजलेला प्रवासाचा अवधी तिथेच संपून जाईल की! प्रेक्षणीय आणि अनुभवलेच पाहिजे असे या प्रदेशात कमी नाही - पण फारच आहे, म्हणून काढता पाय घेणे कठीण असते. शेकडो एकर पसरलेल्या सफरचंदांच्या सुंदर बागा, तिथले रसरशीत फळांचे सुगंधी वैपुल्य - सर्व फळे आणि फळांचे रस यांच्यावर चालणाऱ्या शास्त्रशुद्ध स्वच्छ प्रक्रिया आणि कोणीही मोहात पडावे असा त्या त्या फळांचा रस, हीच केवढी अपूर्वाई आहे. 

निसर्गाने ऑस्ट्रेलियाला इतका भरभरून फलसंभार दिलेला आहे; संत्री सफरचंद, द्राक्षे, कलिंगडे, पेअर - म्हणाल ते - सारे उत्तमच मिळते आणि कमतरता कशाचीच नाही. पण आम्ही माणसे एवढ्यावरच खूष नसतो. द्राक्षे म्हणजे अवघ्या दुनियेला मोहात पाडणारी अक्षरशः अमृततुल्य फळे. पण ही द्राक्षे आंबवून त्यांचे मद्य तयार केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. युरोपमध्ये दक्षिण युरोप, ऑस्ट्रिया फ्रान्स या सर्व देशांत माफक मादक वाइन्स उत्तमोत्तम तयार होतात (असे म्हणतात!). फ्रान्समधील उत्कृष्ट वाइनचे नाव आहे कोनॅक. युगोस्लाव्हियाने तेच नाव आपल्या मद्याला दिले. लगेच फ्रेन्च लोकांनी गहजब केला. कोनॅक हे फक्त फ्रेंच मद्याचेच नाव असू शकते, असा त्यांनी घोशा लावला. मग बिचाऱ्या युगोस्लाव्ह लोकांनी आपल्या मद्याचे नाव बदलून विनॅक केले. 

अलीकडे सर्व युरोपियन देश, अमेरिका यांना ऑस्ट्रेलिया हा नवा प्रतिस्पर्धी निर्माण झाला आहे. उत्तम वाइन्स करण्याबद्दल ऑस्ट्रेलियाची ख्याती पंचखंड पृथ्वीवर पसरली आहे. आता आँस्ट्रेलियात ठायीठायी द्राक्षमळे बहरतात आणि त्यांना जोडून मदिरोद्योगही (वायनरी)! तऱ्हेतऱ्हेच्या मद्याची विनामूल्य चव तर चाखून पहा असे आमिष हे मदिरोद्योजक दाखवीत असल्यामुळे असेल कदाचित, जरा सवड मिळाली की शेकडो लोकांचे लोंढे मदिरोद्योगांचे दर्शन घेण्यासाठी तिकडे रवाना होतात. हंटर्स व्हॅली या भागात तर मदिरानिर्मितीचे अनेक उद्योग भरभराटीला आले आहेत. त्यांना उदार आश्रय देण्यासाठी षौकीन लोकांची झिम्मड उडते. आणि त्यांची गंमत पाहायला आमच्यासारखे बिगर षौकीनही तिकडे लोटतातच. नमुने चाखताचाखता झिंगणाराचा नमुना मात्र कुठे दिसला नाही.

हिंदुस्थान सोडून निघालो तेव्हाच मनात एक नोंद केली होती बाकी प्रेक्षणीय स्थळे पाहायला गेलो नाही तरी चालेल, पण उत्तर ऑस्ट्रेलियात केर्न्सला मात्र निश्चित जायचेच. खरे म्हणजे क्वीन्सलॅंन्डपासून उत्तरेचा सर्वच मुलूख म्हणजे अनोख्या निसर्गसौंदर्याची लयलूट आहे. आधी आपण प्रवेश करावा ब्रिस्बेन या अत्याधुनिक शहरात आणि मग किनाऱ्याकिनाऱ्याने घरंगळत जावे केर्न्सला. किनारा असातसा नाही, त्याचे नावच आहे सोनकिनारा- गोल्ड कोस्ट. 

शुभ्र रेतीने झाकलेल्या विस्तीर्ण पुळणीवरून मनसोक्त विहार करणारे बेबंद तारुण्य हे गोल्ड कोस्टचे वैभव आहे. उन्हात तापून तप्त सुवर्णाची कांती देहावर चढवलेले स्त्रीपुरुष इथे मोकळेपणाने विहरतात, म्हणून हा सोनकिनारा आहे. प्रशांत सागरातून उदयाला आलेला सूर्य आपली सोनकिरणे ऑस्ट्रेलियाच्या ज्या रेतीवर प्रथम पिळून टाकतो, तो हा सोनकिनारा. संपूर्ण आग्नेय आणि दक्षिण ऑस्ट्रेलियातले हवामान म्हणजे इंग्लिश हवामानाची नक्कल. वातावरण कधी ढगाळ होईल आणि पाऊस येईल, सांगता येत नाही. पण क्वीन्सलँडचा किनारा मात्र सदैव उन्हात न्हाहणारा. केवळ एवढ्यासाठी त्याला सोनकिनारा म्हणतात का? की ऑस्ट्रेलियात सोने मिळणार यावी ग्वाही प्रथम इथे मिळाली म्हणून हा सोनकिनारा!

ऑस्ट्रेलियातल्या बाकी महानगरांपेक्षा उंच इमारतींची अधिक आवड आहे ती ब्रिस्बेनला. ब्रिस्बेन नदी सुतासारख्या सरळ पात्रातून वाहणारी. दुतर्फा चिरेबंद विस्तृत घाट. नदीत कुठे साचलेल्या पाण्याची डबकी नाहीत की घाण मारणाऱ्या शेवाळाची बेटे नाहीत. प्रसन्न नदी, प्रशस्त काठ आणि त्यावर माणसांनी निर्माण केलेली शोभिवंत बागशाही. का कोणास ठाऊक, बागेतल्या गुंफांना नावे देताना कोणा कल्पकाला गौतम बुद्धाचे चरित्र आठवले आहे! एक देऊळ आहे ते चक्क नेपाळेश्वराने बांधले आहे. नदीकाठचा हा पार्क म्हणजे ब्रिस्बेनचे फुफ्फुस आहे. या फुफ्फुसाचा पंप सदैव चालू असतो. त्यामुळे नागरिकही सायंकाळी हवा खायला इकडेच फिरकतात आणि इकडे आल्यावर भेळपुरी, पकोडे असले चटकमटक त्यांना आठवतही नाही.

ब्रिस्बेनमधे, ते आवडले म्हणून अधिक रमता येणार नव्हते, कारण वेध लागले होते केर्न्सचे. केर्न्सजवळच्या समुद्रात जगातल्या विख्यात आश्चर्यापैकी एक आश्चर्य - आणि तेही नैसर्गिक- पाहायला जगातून प्रवासी येत असतात. द ग्रेट बॅरिअर रीफ. समुद्राच्या अंतरंगात असलेला अजस्र पाषाणसेतू हा किती खडकांचा बनलेला आहे कोणास ठाऊक? वा सेतूत एकूण किती बेटे आहेत त्यांना गणती नाही. काही हिरवीगार-घनगर्द झाडीने झाकलेली. काही प्रवालवेष्टित. निसर्गाचे नानाविध चमत्कार दाखवून थक्क करणारी. तिळा उघड म्हणताच आपल्यासमोर खुली होणारी अलिबाबाची एक रत्नगुंफाच जशी!

समाजजीवनाला सगळ्यांत आवश्यक गुण कोणता? स्वयंअनुशासन. ऑस्ट्रेलियाचे नेमके हेच वैशिष्ट्य आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रत्येक गोष्ट कशी सुनियोजित, सुविहित आणि सुव्यवस्थित. वाहतूक नियंत्रण असो, व्यवसायाचे अथवा व्यापाराचे संचालन असो, सहल असो की जगप्रवास असो - काळजीपूर्वक आखणी करून सर्व साधकबाधक शक्यतांचा आधीच पूर्ण विचार करायचा, मग योग्य वेळी योग्य ती पावले टाकायची, हे अशा सुसंघटित समाजाच्या अंगवळणीच पडलेले असते. 

केर्न्सला मोटेलमध्ये मेहमान म्हणून तुमचे स्वागत झाले की पुढील सर्व गोष्टी आपोआप सुरळीतपणे पार पडतात. सचित्र पुस्तिकांसह माहिती मिळते, वाहनव्यवस्थेचे तपशील सांगण्यात येतात. ठरलेल्या वेळी तुमची आरामशीर गाडी तुम्हाला बोटीच्या धक्क्यावर घेऊन जाते, तिथले सोपस्कार गोंधळ गडबड न होता पार पडतात आणि तुम्ही अगदी सराइतासारखे मार्गस्थ होता. 

ग्रेट बॅरिअर रीफवर आम्हांला जायचे होते एका छोट्याशा गावी. त्याचे नाव होते कुरुंदा. आपल्या कुरुंदवाडचेच लाडिक नाव वाटले ते. पण प्रवास असा मजेशीर की जाताना जायचे आकाशातून आणि परत येताना प्रवास करायचा जमिनीवरून. आकाशातून जायचे ते स्काय रेलने. स्काय रेल म्हणण्यापेक्षा याला स्काय बॅगन म्हणायला हरकत नाही. कुरुंदाला पोचायला चांगला तास-दीड तास लागतो. पण आपल्या 'डब्यात' इनमीन साडेतीन माणसे. फार तर चार. म्हणजे आपण आपले, आपले आपण! 

अतिशय गर्द जंगलावरून आपला प्रवास होतो. या जंगलाला म्हणतात रेन फॉरेस्ट. पावसाने रुजवलेले, पावसाने जोपासलेले, पावसाने राखलेले. पावसाने वाढवून दाट दाट आणि उंच उंच केलेले. शेजारची झाडे उंच झाली की नव्या झाडांना उंच झाल्याशिवाय जगणेच अशक्य होते. मग तीही उंच होतात, अवघे अरण्य उंच होते आणि आपण त्याच्याहूनही उंचावरून प्रवास करतो. अशी अनेक जंगले पार केल्यानंतर गाव येणार असते. 

इथेदेखील माणसे जंगलतोड करू शकतातच, त्यामुळे अधूनमधून हिरव्या वृक्षराजीत खणल्यासारखी विवरे पडतात. पुष्कळ झाडे दिसतात फणसाच्या झाडांसारखी, जांभळासारखी. थोडक्यात ओळखीची वाटतात, पण ती असतात मात्र अगदी वेगळीच. आपल्याला नावेही माहीत नाहीत अशी. आपल्याकडे डोंगरदऱ्यांतून फर्नची झाडे वाढतात पण फांद्या फुटलेली झाडे क्वचित दिसतात. ती दिसतात इकडे ऑस्ट्रेलियात आणि न्यूझीलंडमधे. कुंदाला जाताना तर खूप दिसतात. आपल्याला कुतूहल कमी असते का? या झाडाचे नाव काय, त्या झाडाचे नाव काय? झाडाच्या फांद्यांवर शेवाळ धरते आहे का, सुगंधी आर्किडस् वाढताहेत का? एक ना दोन. 

स्काय रेलमधून जाताना प्रवाशांना झाडांशी सलगी कशी करता येईल? ही अडचण ओळखून साहेबाने वाटेत स्टेशने उभी केली आहेत, एकेक फलाटाची. तुम्हांला फलाटावरच सोडून सोडणारा डबा पुढे निघून जातो. काही बिघडले नाही, पुढचा येणारा डबा तुम्हांला पुढे घेऊन जाईल. अमुक नंबरचा डबा माझा, हे लक्षात ठेवायची गरज नाही. स्काय रेल ही अखंड फिरणाऱ्या डब्यांची एक मालिका असते. वजनाचा तोल सांभाळणे या तत्त्वावर ती चालते - खिडक्या मोठमोठ्या असतात. मला खिडकी, मला खिडकी असे भांडण करण्याची जरूर नाही. 

कुरुंदाला जाताना स्काय रेलने जावे आणि येताना घाट-बोगदे पार करणारी झुकझुक गाडी घ्यावी. म्हणजे वा भूमीचे दर्शन एकदा आकाशातून घ्यावे आणि एकदा जमिनीवरून. कोकण रेल्वेने प्रवास करताना कसे वाटेल याची चुणूकच इथे आपल्याला पाहायला मिळते.

थोडक्यात मिनी रेल्वेने मिनी कोकणातून प्रवास केल्याचे सुख मिळते. प्रवासाचे ठीक आहे. कुरुंदात गेल्यावर करायचे काय, पाहायचे काय, खायचे काय, असे प्रश्न एकामागोमाग एक कोणाच्याही मनात येतील. हो हो, जरा सबूर!

Tags: कुरुंद ब्रिस्बेन क्वीन्सलॅंन्ड केर्न्स ऑस्ट्रेलिया Kurund Brisbane Queensland Cairns Australia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके