डिजिटल अर्काईव्ह

पंडित भीमसेन जोशी यांचे 4 फेब्रुवारीला अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. एवढ्या महान प्रतिभावंताचे अभिष्टचिंतन नुसत्या कोरड्या उपचाराच्या शब्दांनी होऊच शकत नाही. नवे नवे उन्मेष प्रकट करणाऱ्या त्यांच्या संगीत प्रतिभेला फुटलेला एक अनोखा सुगंधी मोहोर आहे संतवाणीचा. ‘हे सुख कुणि वर्णावे’ या अभिप्रायानेच ज्याचे वर्णन होऊ शकते अशा त्या संगीतानंदाचा गौरव करावा तेवढा थोडाच!

भागवत धर्माच्या परंपरेत जे महान संतकवी होऊन गेले त्यांच्या जीवनात आणि त्यांनी केलेल्या भक्तिमार्गाच्या विकासात संगीताला उत्तरोत्तर अधिकाधिक स्थान प्राप्त होत गेले हे निःसंशय. उत्तर भारतात सूर, तुलसी, मीरा यांच्या मधुर रचना संगीताची लेणी सहजपणे अंगी धारण करूनच प्रकट झाल्या आणि त्यांनी जनमानसाला वेड लावलं. पूर्वेला झालेले वैष्णव कवी आणि दूर पश्चिमेला नरसी यांचे पदसंग्रहही लय-तालांचे विभ्रम प्रकट करीत असल्यामुळे जनसामान्यांच्या मनावर अपरंपार मोहिनी घालतात. 

भक्ती - विशेषतः मधुराभक्ती आणि संगीत यांचे अगदी स्वाभाविकपणे ‘मैत्र जीवाचे’ जडलेले आहे. इये मराठीचिये नगरीदेखील भक्तिमार्गाच्या विस्ताराबरोबर संगीतही बहराला येत गेले. भीमेच्या वाळवंटात सुंभाचा करगोटा आणि रकट्याची लंगोटी लावून भक्तीच्या बेहोषीत कीर्तन करणारा संत नामदेव कसा उन्मन होऊन गात असेल, नाचत असेल, कीर्तन ऐकणारांनाही खुलवीत असेल, डोलवीत असेल याची आपण कल्पना करू शकतो. एवढा मोठा ज्ञानियांचा राजा पण तोही केवढी मधुर पदे रचतो, विराण्या गातो.

घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा 
भवतारकु तो कान्हा, वेगी भेटवा का ॥ 
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी 
कान्हो वनमाळी मज वेगी भेटवा का॥ 

अशी आपल्या र्हदयाची तार नाचऱ्या छंदावर आणि झारदार सुरात छेडू लागतो तेव्हा संगीत तिथे माहेराला येणारच की! 

ऐसपैस ओवी आणि बेतशीर अभंग यांचीच केवळ वहिवाट न सांभाळता संतकवीदेखील आनंदाचा कंद असलेल्या हरीची गाणी छंदात रचू लागतात तेव्हा ती गाणी लयीचे बोट धरून ठुमकणार आणि स्वरांच्या आंदोलनांवर झोके घेणार हे ओघानेच आले. म्हणून तर पुढे मध्ययुगीन मराठीत भाष्यपर भाषणासाठी ओवी अभंगांचे स्वाभाविकपणे अवलंबन करणारे संतकवी विविध रस आणि भाव - विशेषतः भक्ती, करुण, वत्सल यांच्या उत्कट उद्गारांसाठी परोपरीची गीतरचना करू लागले. 

कधी कधी ओव्यांना आणि अभंगांनाही माधुर्य आणि गेयता लाभू लागली. संत एकनाथांनी संतगीतभांडार रंजक नाट्याने रंगवले आणि मराठी कवितेच्या विविधतेत फार मोठी भर घातली. रोखठोक बोलणाऱ्या तुकोबांच्या भाषेला पाषाणाचे कठोर सामर्थ्य असले तरी त्याच्या अंतर्यामी दाटलेले माधुर्य आणि सबंध कारुण्य त्यांच्या अभंगवाणीत संगीतानुकूल कोमल शब्दकळेचे पाझरही खेळवून गेले. संतांची जर ही कहाणी तर संतजीवनाने ज्यांची मने आणि जीवने पुनीत झालेली होती, ज्यांचे ज्ञानविज्ञान भक्तीच्या ओलाव्याने चिंब भिजलेले होते, टीका चिकित्सेऐवजी रसरंगांनी सुंदर केलेल्या गीतरचनेत ज्यांचे चित्त गुंतलेले होते त्या गीतकार कवींची तर महती काय वर्णावी? मध्ययुगाच्या उत्तरार्धात अमृतराय, मध्वमुनींसारखे गीतकार कवी आणि कृष्णाबाईसारख्या कवयित्री यांनी मराठीचे गीतभांडार किती श्रीमंत केले आहे!

समर्थ रामदास म्हणजे एक महान विरोधाभास! तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रपंचाकडे पाठ फिरवणारा हा संत प्रपंच नेटका करावा याचा प्रापंचिकांना उपदेश करतो. दया दरकुटे धुंडाळत दाही दिशा भ्रमण करीत राहणारा हा फटिंग जोगी संगीत कला ही किती श्रेष्ठ आहे याची समजदारीने शिकवण देतो. रागरागिण्या, वाघे यांची समर्थांना जाणकारी असावी असे दिसते. त्यांच्या कवितेचा अंतःस्वर तर खणखणीत आहेच पण प्रबोधनासाठी जरबदार आवाजात जेव्हा ते आणि त्यांचे शिष्य चव्हाट्यावर, मठांच्या ओसऱ्यांतून, देवळांच्या सभामंडपांतून लोक गर्जत असतील तेव्हा बेसूर ओरडण्याचे पाप ते करीत असतील काय? की धीरगंभीर, ढाल्या आवाजात वीणाझंकारात डफदिंडीच्या तालावर पहाडी रागात आणि धुमाळी तालात त्यांचा उपदेश झोकात प्रकट होत असेल?

स्वराज्याचे साम्राज्य झाले, त्या काळात कीर्तनरंगालाही नवे बळ आणि नवे रूप आले. कवी आणि समाज यांच्यामधे कीर्तनकार हे दुवे ठरले. समाज आणि कविता यांच्यातला संबंध दृढ केला तो दोन मौखिक परंपरांनी. एक शाहिरी आणि दुसरी कीर्तनकारी. कीर्तन म्हणजे नारदीय कीर्तन. गोड गळ्याचे कीर्तनकार भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या कथा रंगवताना रागदारी गायनाचाही मोकळ्या गळ्याने उपयोग करू लागले. संगीत केवळ कोठीवरची चैनबाजी नव्हे, केवळ धनिकांचा शौकीनपणा नव्हे; भगवद्भक्तीची चवदेखील अपार माधुर्याने भरण्याची शक्ती त्यात आहे, याचा अनुभव लहानथोरांना, स्त्री-पुरुषांना कीर्तनामधून भरपूर घेता येऊ लागला. 

पुढे अव्वल इंग्रजीत जुने कायदे अगदी मोडले हे खरे पण म्हणजे काही जुने ते सर्व जळून गेले असे नाही. उलट जुन्याला नवे धुमारे फुटू लागले. कीर्तनपरंपरेने मुरवलेले संगीत महाराष्ट्रातील नाट्यसंगीतात सहजपणे मिसळून गेले. भक्तिसंगीताला दीर्घ परंपरा असूनही आणि या संगीताच्या नाना कळा प्रकट झालेल्या असूनही केवळ संपूर्ण मैफलीसाठी भक्तिगीते, भजने, अभंगवाणी यांचा उपयोग तसा क्वचितच कोणी करीत असत. अगदी विसाव्या शतकातला पहिला नजरेत भरणारा ठसठशीत अपवाद म्हणजे नारायणराव राजहंस - बालगंधर्व. आपल्या गंधर्वगायकीने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारा आणि लाडिक, शृंगारिक अभिनयाने रसिकांना घायाळ करणारा हा रंगभूमीवरचा राजहंस केवळ भजनगायनासाठी जेव्हा मैफल करी तेव्हाही अमृताच्या कल्लोळात बुडाल्यासारखे श्रोते देहभान विसरत. 

‘विठ्ठला मायबापा’ हा आर्त टाहो त्यांच्या कंठातून बाहेर पडला की तो ऐकून श्रोत्यांची अंत:करणे त्या उत्कट आर्ततेने हेलावून जात. भीमपलास, पिलू यांसारखे साधे सरळ राग जी उत्कट भाववृत्ती निर्माण करीत ती अजोड असे. आजही भजने गाताना काही जागा अशा येऊन जातात की त्या ऐकताना गायक आणि श्रोते बालगंधर्वांच्या आठवणीने सदगदित होऊन आदराने स्वतःचे कान पकडतात. बालगंधर्व युगात आणि त्यालगतच्या कालखंडात भक्तिगीते फार समर्थपणे गाणारे अनेक गायक उदयाला आले. त्यांच्या आठवणी बुजुर्ग श्रोत्यांना अर्थातच अनेकदा येतात. मास्तर कृष्णरावांनी गायलेल्या गौळणी, रंगवलेल्या कुष्णलीला, अब्दुल करीम खाँसाहेबांनी अजरामर केलेल्या ‘गोपाला मेरी करुणा क्यों नहिं आवे’, ‘जमुना के तीर’ यांसारख्या अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या चिजा, पलुसकरांच्या डौलदार रामभक्तिपर बंदिशी - अशा किती आठवणी काढाव्या? 

धुन रागांचा अक्षय निधी आणि निर्गुणी भजनांचा सगुणसाकार साक्षात्कार - कुमारगंधर्व म्हणजे अलौकिक गायन आणि अवर्णनीय अनुभूती यांचा अपूर्व संगमच. शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर अशा महान गुणी गायिकांनाही आवर्जून भक्तिसंगीत गावेसे वाटते आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे ठसे उमटविल्यामुळे त्यांच्या स्वतंत्र राजमुद्रा त्यांच्या भक्तिसंगीतावरही उमटतात. या सर्व परंपरेच्या माथ्यावर आज सोन्याचा किरीट झळकतो आहे तो मात्र पंडित भीमसेन जोशी यांच्या ‘जोशील्या’ गायनाने बळ दिलेल्या ‘संतवाणी’चा. संतवाणीचे आजवर कोठे कोठे आणि किती कार्यक्रम झाले याची मोजदाद करण्यात स्वारस्य नाही. किती हजार श्रोत्यांनी तल्लीन होऊन ते ऐकले याची मिती करता येईल कदाचित, पण तीही महत्त्वाची नाही. महत्व आहे ते समीकरणांचे. भक्तिसंगीत म्हणजे संतवाणी, संतवाणी म्हणजे पंडित भीमसेन ही समीकरणे आता महाराष्ट्रात पक्की रुजली आहेत.

कसे योग असतात पहा. कानडा विठ्ठलु पंढरीला आला, पंढरीचा राणा झाला. मऱ्हाटियांचा देवाधिदेव झाला. योगियांच्या राजाने ज्ञानदेवाने – ‘बापरखुमादेवीवरु’ हे आपणा सर्वांसाठी एकमेवाद्वितीय दैवत योजले. तिथून पुढे तुकोबांपर्यंत सर्व संतांनी या सावळ्या पांडुरंगाची ‘न भूतो न भविष्यति’ अशी पूजा बांधली. राज्ये येतात आणि जातात. शतकांचे उदयास्त होतात. अठ्ठावीस युगे म्हणजे किती वर्षे कोणास ठाऊक! पण तेवढी होईपर्यंत तरी विठ्ठल कटीवर हात ठेवून उभा राहणार आहे आणि तोही अंतर्धान पावला तरी परब्रह्म निष्काम रहस्य आपणासाठी बाकी उरणारच आहे. धरणी दुर्भाग्य, महापूर येवोत. सारे अग्निसात होवो की आणखी काही अस्मानी सुलतानी कोसळो- ज्ञानोबा माऊलीचे आश्वासक पसायदान आणि तुकोबाची अभंगगाथा काळारुपी कालियाच्या फण्यावर पाय रोवून उभीच राहणार आहे. ही धारणा आहे, श्रद्धा आहे महाराष्ट्राची आणि ती मनात बाणवूनच संतांची वाणी स्वरसुंदर करायला सज्ज झालेला आहे कानडा भीमसेनु!

आमचा देव आणि त्याचा हा भक्त दोघेही आले कर्नाटकातून, संतांच्या किमयेने रखुमादेवीवरु केव्हाच मऱ्हाटियांचा बाप म्हणून भीमातीरी नांदू लागला. संगीताच्या अपार सामर्थ्याने विठ्ठलाचे गुणगान करणारा भीमसेनही आता अगदी आपलाच झाला आहे ही खूणगाठ महाराष्ट्राने पक्की बांधली पाहिजे. आम्ही बाकी काही गमावू पण शेक्सपियर गमावणार नाही म्हणणाऱ्या इंग्रजांची जिद्द बाळगून आपण सांगितले पाहिजे की विठ्ठल आणि भीमसेन दोघे आमचेच आहेत, आमवेच राहतील. आम्ही त्यांना बिलकुल गमावणार नाही.

पंडित भीमसेन जोशी म्हणजे हिंदुस्तानी संगीताचा अनभिषिक्त सम्राटच. अवघ्या देशातच त्यांच्या गायनावर जान कुर्बान करणारे असंख्य रसिक श्रोते आहेत. अर्धशतकाहून अधिक काळ संगीत विश्वातल्या भीमपराक्रमाचा अनाहत नाद अखंड दुमदुमत आहे. भारतीय संगीताच्या प्राचीन आणि मध्ययुगीन परंपरेत ज्यांच्या नावाने महद्ख्यायिका प्रचलित झाल्या अशा महान स्वर्गवासी संगीतकारांची नावे सर्व कलावंतांना आणि कलाप्रेमींना प्रातःस्मरणीय वाटतात हे खरे, परंतु जित्याजागत्या आयुष्यातच अद्भुत कथेचा नायक ठरलेले पंडित भीमसेन एकमेवाद्वितीयच! कारंज्याच्या उसळण्याप्रमाणे असंख्य श्रोत्यांवर स्वरांची बरसात एवढ्या दमदारपणे करणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या कलाकाराची आयुष्यभराची चढती आणि चढतीच कमान पाहिल्यावर म्हणावेसे वाटते –

‘झाले बहु, असतिल बहु, होतिलही बहु। परंतु यासम हा’॥ 

एवढ्या तोलाचा गायक जेव्हा आपली गायनी कळा संतवचनांचे सौंदर्य खुलवण्यासाठी कारणी लावतो, त्यावेळी संतांच्या उत्कट आणि आशयगर्भ शब्दांना स्वरांचे पंख फुटतात आणि ऐकणाऱ्यांच्या सर्व शक्ती कानामनांत येऊन सुखनिमग्न होतात. ‘कवणे कवणा अलंकारिले’ हे समजेनासे होते. संतांना टाळकुटे म्हणणाऱ्यांच्या कुटाळकीची कीव वाटते. एकसुरी म्हणून संतकवितेची हेटाळणी करणाऱ्यांना मधुर आणि उजळ सुरांच्या अमृतवर्षावात चिंब भिजल्यावर तरी आपल्या टीकेबद्दल पश्चात्ताप होईल अशी आशा पल्लवित होते. 

मुख्य म्हणजे सूर सात असले आणि श्रुती बावीस असल्या तरी एरवी मोजता येत नाहीत असे सुरांचे परांसारखे नाजुक पदर किती असतात आणि श्रुतीश्रुतींतील अंतर ओलांडताना अंतःश्रुतीचे कण कसे विद्युतभारित झाल्यासारखे आपल्या मनात कंप निर्माण करतात याचे नवल वाटते आणि मग विचार करू लागल्यावर समजते की, ही किमया सहज किंवा अपघाताने झालेली नाही; संतांच्या उद्गारांतील आशयाची सर्व सूक्ष्मता, संवेदनांची तरल आंदोलने पंडित भीमसेन यांच्या गानप्रतिभेने अचूक टिपून घेतली आहेत. शब्दांत झाकलेली सौंदर्याची आणि उदात्त भावनांची सूक्ष्म स्पंदने तरल स्वरांच्या आणि अपार्थिव श्रुतींच्या माध्यमातून ते लीलया व्यक्त करीत असतात. ‘जोहार मायबाप जोहार’ मध्ये उमटलेली निर्वाणीची हाळी ऐकावी, ‘विठ्ठला मायबापा’ म्हणताना घातलेली कळकळीची गळ अनुभवावी, ‘सख्या पांडुरंगा’ या संबोधनाला दिलेले लडिवाळ सख्य लक्षात घ्यावे... हे आणि असेच खूप! 

देवाला आवाहन करतानासुद्धा ते आवाहन कोण करते आहे, ते करतेवेळची मनःस्थिती काय असावी, हा उमाळा आहे की कृतज्ञता आहे, ही विप्रलंब-भक्ती आहे स्वाधीन देवत्व आहे - अशा नानाविध छटा गायनातून जिवंत करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. पंडितजींच्या गाण्याचे बरेचसे बळ आलापीत असते, जोरकस तानक्रियेत असते. परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी या वाणीच्या मूलस्थानांना यथायोग्य स्पर्श करीत त्यांचा स्वर अर्थवाही स्वरक्रीडा प्रकट करतो. कधी शिवमंदिरातल्या गाभाऱ्यात घुमणाऱ्या ॐकारासारखा असंलक्ष्य लयीत दरवळतो, कधी चक्राकार वावटळीसारखा आकाशमध्याकडे झेपावतो, कधी नाना विचित्रे एकत्र करीत हरकती मुरक्यांच्या वाटेने इच्छित लक्ष्याला जाऊन भिडतो. 

हे सगळे कसब केवळ प्रदर्शनासाठी म्हणून संतवाणीच्या गायनात पंडितजी दाखवीत नाहीत. ते कसबही आशयाच्याच अनुषंगाने उमटत राहते. ‘अणुरेणीया थोकडा, तुका आकाशाएवढा’ हा तुकोबांचा अभंग गाताना पंडितजींचा ढाला आवाज आणि गगनगंभीर आशय यांची एक अनोखी जुगलबंदीच असते. उलट, ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ ही ज्ञानेश्वरांची रचना गाताना मित्रामित्रांतली खट्याळ छेडछाड, दुडक्या दुडक्या स्वरबंधांनी रंगवीत, वेदान्तपर उद्बोधनाच्या दीर्घ पंक्ती जलद लयीत उच्चारून पंडितजी असे काही अवसानात समेवर येतात की रसिक श्रोत्यांच्या वाट्याला काही वेगळाच आनंद येतो. कान्होबा-ज्ञानोबांतली अवखळ थट्टामस्करी आणि शाश्वत-नश्वर यांच्यातील प्रकृतिभेदाचे तत्त्वज्ञान दोहोंचे मर्म सुरेलपणे पंडितजींनी श्रोत्यांच्या मनावर बिंबवलेले असते. 

भागवतधर्माचे मंदिर कसे उभे राहिले याचे किती मार्मिक वर्णन बहिणाबाईंनी केले आहे. ज्ञानदेवांनी पाया घातला, नामदेवांनी विस्तार केला. नाथांनी बळकट आधाराचे स्तंभ दिले आणि तुका या मंदिराचा कळस झाला. पंडित भीमसेन जोशी यांच्या संतवाणीत या चौघांच्याही अभंगवाणीचे रेशमी पदर मोठ्या कौशल्याने गुंफलेले असतात. पण त्यातही नामदेवांची सख्यभक्ती त्यांच्या विशेष आवडीची आहे. ‘पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा’मध्ये व्यक्त झालेला रुसवा आणि ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ मधली उन्मनी अवस्था रंगवताना भीमसेन आशयाशी तद्रूप होतात, संगीत शब्दबंधांना साखरमिठी घालते आणि परिणामी श्रोतेही उन्मन झाल्यासारखे सावधानपणे ऐकत असूनही भान विसरून जातात. एकनाथ एरवी नाट्यमय कविता रंगवण्यात चतुर पण ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगात त्यांनी घेतलेली, छळ सोसणाऱ्या सासुरवासिनीची भूमिका मोठी संमिश्र आहे. 

माहेर आणि माहेरचा गोतावळा यांबद्दलचा अभिमान, सासरचा अवमान न करता व्यक्त करणे ही मोठी कसरत असते. या अभंगातील माहेराचे समग्र रूपक चित्त झुलवणारे आहे हे ओळखून पंडितजींचे स्वर श्रोत्यांना डुलवणारे होऊन नाचू लागतात. संतवाणीची जेव्हा संतगाणी होतात तेव्हा दाद अभंगांच्या काव्यसौंदर्याला द्यावी की तल्लीन होऊन प्रकट झालेल्या गायनी कलेला द्यावी याचा संभ्रम पडू लागतो. भागवत संप्रदायातल्या प्रतिभावंत संतकवींच्या अभंगांतून प्रकटणारे भाववैभव आपल्याला स्तिमित करणारे असले तर नवल नाही, पण समाजात ज्यांचा सहसा तिरस्कारच होई त्या जनाबाई, कान्होपात्रा, सोयरा यांच्यासारख्या कवयित्री किंवा चोखामेळ्यासारखे गावकुसाबाहेर ठेवलेले  ‘तुमच्या महाराचा मी महार’ म्हणवून घेणारे कवी जेव्हा आपल्या मनाची आर्तता प्रकट होऊ देतात तेव्हा त्यांच्या धारदार किंवा सकंप उद्गारांत हृदयाचे कंद गदगदा हलविण्याची शक्ती येते. 

पंडितजी अनेक अभंग भैरवीच्या स्वरात चिंब भिजवून सादर करतात. पण त्यातही ‘अगा वैकुंठीच्या राया’ ही कान्होपात्रेने मारलेली हाक ऐकताना मन, केळीचे पान आडवे फाटावे तसे फाटून जाते. तीच गोष्ट ‘तुमविन मेरी कौन खबर ले’ या मीरेच्या कैफियतीची. खरोखर साहित्यसोनियाच्या खाणीतील बहुमोल संपत्तीची झळाळी सहसा डोळे दिपवते आणि मन स्तिमित करते, मात्र संतवाणी ऐकताना ऐकणारांचे डोळे पाणावतात आणि मनही पाझरते. पंडित भीमसेन जोशी यांचे अनेक चाहते आहेत. संतवाणी हा त्यांचा दुय्यम महत्त्वाचा कार्यक्रम आहे. भारदस्त रागदारी संगीताची मैफल त्यांनी मांडली तर आम्हांला जो अलौकिक आनंद मिळतो तो शब्दप्रधान गायकीवर आधारलेल्या ‘संतवाणी’ मध्ये मिळत नाही, अशी त्यांची तक्रार असते. ही तक्रार अगदीच अनाठायी म्हणता येणार नाही. पण रुळलेली वाट सोडून किंवा मोडून वळणाच्या वाटा धुंडाळण्यातही काही निराळा आनंद नसतो काय? 

साहित्य आणि संगीत यांचा एकवट आनंद देणारी कलाकृती म्हणून संतवाणीचा मोकळेपणाने आस्वाद घ्यायला काय हरकत आहे? पंडित भीमसेन जोशी पंचाहत्तरीत प्रवेश केल्यानंतरही पंचविशीतल्या ताकदीनेच जेव्हा स्वर लावतात तेव्हा श्रोत्यांच्या काळजातही अननुभूत आनंदाचा झरा उसळतो. मग त्याच्या प्रवाहावर ख्यालांचे वृक्ष डोलोत, ठुमऱ्यांच्या वेली ठुमकोत, नाटकांतील पदे झिळमिळोत की भक्तीचे मळे प्रसन्न हिरवेपणी भराला येवोत, संगीतकलेचा आनंद अत्युच्च कोटीचाच लाभणार ही रसिकांच्या मनीमानसी कायम कोरलेली विश्वासमुद्रा आहे. भाव, स्वर आणि लयकारी तिन्ही प्रवाह अमृताचेच आहेत. संतवाणीचा समरसून अनुभव घेणे म्हणजे या अमृतमय त्रिवेणीसंगमात मनाला न्हाऊ घालणे आहे.

पंडितजी, साक्षात्कारी संतांचे प्रतीतीचे बोल आम्हांला पुरतेपणी कधीच उलगडत नाहीत. ‘आनंदाचे डोहीं आनंदतरंग। आनंदची अंग आनंदाचे…’ या शब्दांचा आशय आमच्या धुकट मनात पुसट पुसट उमटतो. पण जेव्हा संतांची वाणी तुमच्या स्वरांतून आमच्या मनात रुजू लागते तेव्हा मात्र ‘अमृताचे डोहीं अमृततरंग’ याचा अर्थ आम्हांला पुरेपूर समजतो. तो पुन्हा पुन्हा समजावा म्हणून नियतीने तुमच्या प्रतिभेला अमृतसिद्धीचे वरदान द्यावे हीच आमची शुभकामना!

[सौजन्य: लोकसत्ता]

Tags: भजन  भावगीतं जनाबाई चोखामेळा सोयराबाई शास्त्रीय संगीत तुकाराम संत ज्ञानेश्वर वसंत बापट पंडित भीमसेन जोशी Janabai Chokhamela Soyarabai Classical Music Tukaram Sant Dnyaneshwa Vasant Bapat Pandit Bhimsen Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वसंत बापट ( 196 लेख )

(25 जुलै इ.स. 1922- 17 सप्टेंबर इ.स. 2002)

विश्‍वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट हे मराठी कवी होते.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके