डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

बाहेर पावसाने आपली हिरवी माया घाटाच्या दोन्ही पाख्यांवर पसरलेली होती. माझ्या समोर छानपैकी गरम कडवट कॉफी होती. अशा वेळी बहुधा मी कोणाशी कोणत्याही विषयावर बोलायला तयार नसतो, महत्त्वाच्या विषयावर तर मुळीच नाही. पण त्या तरुण मित्रांच्या बोलण्यात आणि वागण्यात आर्जव होतं, तसा एक मनस्वी सच्चा सूर होता. त्यामुळे माझ्याही मनाची कवाडं मी जरा उघडली आणि मग बघता बघता संवादात रंग भरू लागला.

परवा आगगाडीत दोन तरुण भेटले - ते दोघेही विज्ञानाचे विद्यार्थी होते, तंत्रज्ञ होते, आणि आपापल्या कामात ते वाकबगारही असले पाहिजेत. तात्पर्य, आज जे यशस्वी, कर्तबगार तरुण आपल्याला भेटतात त्यांचे ते प्रतिनिधी होते. त्यांचा आणखी विशेष असा की त्यांना साहित्य आणि संगीत यांतही रस होता आणि बऱ्यापैकी समजही होती. त्यांना माझ्याबद्दल कुतूहल होतं, आकर्षण होतं. तसे पुष्कळ चाहते मला अधूनमधून भेटतात. हे त्यांच्यापैकी नव्हते. चाहते सहसा जिज्ञासू असत नाहीत, प्रेमी असतात. पण हे दोघे तरुण मात्र सप्रेम जिज्ञासा बाळगणारे होते. त्यांनी आपण होऊन आपला परिचय करून दिला आणि मग 'काही विशेष बोलायचे आहे' असा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला.

बाहेर पावसाने आपली हिरवी माया घाटाच्या दोन्ही पाख्यांवर पसरलेली होती. माझ्या समोर छानपैकी गरम कडवट कॉफी होती. अशा वेळी बहुधा मी कोणाशी कोणत्याही विषयावर बोलायला तयार नसतो, महत्त्वाच्या विषयावर तर मुळीच नाही. पण त्या तरुण मित्रांच्या बोलण्यात आणि वागण्यात आर्जव होतं, तसा एक मनस्वी सच्चा सूर होता. त्यामुळे माझ्याही मनाची कवाडं मी जरा उघडली आणि मग बघता बघता संवादात रंग भरू लागला.

त्या दोघांच्या हातांत अतिशय सुवाच्य किंबहुना सुंदर अक्षरात केलेली टिपणं होती. त्यांच्यात आणि माझ्यात एकाच नव्हे तर दोन पिढ्यांचं अंतर होतं, पण गंमत अशी की ते मागच्या पिढीविषयीच नितांत आदर बाळगणारे होते आणि आपल्या पिढीविषयी मात्र ते काहीसे साशंकच होते. त्यांचं मुख्य सूत्र होतं ते असं की आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात सन 1880 पासून 1920 पर्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे आणि आपापल्या क्षेत्रात भवितव्याचा पाया घालणारे पुरुषोत्तम होऊन गेले; 1920 ते 40 या काळातही साहित्य, नाटक, संगीत, शिक्षण, समाजकारण, इत्यादी क्षेत्रांत काही खास कामगिरी करणारे नामवंत निश्चितच झालेले आहेत; आणि युद्धोत्तर वा स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तरी 1965-70 पर्यंत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची श्रीमंती 'तुम्ही मंडळींनी' भरपूर वाढवलेली आहे. 'तुमचा' एक विशेष म्हणजे 'तुमच्या पिढीतील' कर्तबगार लोकांजवळ एक स्वयंभू, पृथगात्म, आणि चैतन्यशील व्यक्तिमत्त्व आढळतं. (या दृष्टीने या तरुणांच्या टिपणात जी नामावली होती तिच्यात माझं नाव होतं, त्यामुळे जरा फुशारल्यासारखं वाटलं!) तुलनेने पाहता गेल्या 20-25 वर्षांत अशा कर्तुत्वाला ओहोटी लागलेली आहे असे या तरुणांचं मत होतं. त्यांना पडलेल्या प्रश्नांची त्यांनी आधुनिक पद्धतीने तपशीलवार मांडणी केली होती. आणि कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या आधारे निष्कर्ष काढता येतील का याचा शोध त्यांना घ्यायचा होता.

आगगाडीतल्या वादसंवादात जेवढं आणि जितपत बोलता येतं, सांगता येतं, तेवढं त्या प्रत्यक्ष संभाषणामध्ये झालं ते माझ्या पिढीची आणि मी त्यांच्या पिढीची उजळ बाजू एकमेकांना पटवत होतो! म्हणजे खुदाबक्ष शास्त्रीबुवांना गीतेची महती सांगत होते तर शास्त्रीबुवा खुदाबक्षांना कुराणाची थोरवी पटवत होते! ही परस्पर प्रशंसा नव्हती, तर दुसरी बाजू लक्षात घेण्याचा प्रयत्न होता.

अखेर संभाषण संपलं. गाडी उतारावरून सपाटीवर धावू लागली. मी खिडकीतून शून्यात नजर लावण्याच्या माझ्या आवडत्या कामात चूर झालो. पण या दोन तरुण मित्रांच्या बोलण्यामुळे माझं मन असं काही तळापासून ढवळून निघालं होतं की माझी नजर शून्यात ठरेना, ती आत आत आणि आत वळू लागली, आणि प्रश्नोत्तरांचं एक भिरभिरं असं फिरू लागलं की आता प्रवास संपला तरी त्याचं फिरणं काही थांबत नाही....

प्रत्येक पिढीतच असतात का 
भवितव्याचे शिल्पकार 
कर्तृत्वाचे गगनगामी जयस्तंभ? 
खरोखरच असते का गुणश्रीमंती 
प्रत्येक माणसाच्या ठायी
केवळ संधी मिळण्याची वाट पहात?
किंवा फिरते कालचक्र 
विषमगतीने, संथजलद लयीत 
समेची मात्रा चुकवून आडतालाशी अडखळणारे? 
असते का एक श्रृंखला 
कर्तेपणाची आणि अकर्तेपणाची? 
जमीन तरी कोठे फळते नियमाने? 
तिने भरभरून दान द्यावे म्हणून 
शहाणा शेतकरी ती ठेवतो पडित 
वाट पाहतो तिचा कस वाढण्याची. 
या काळपुरुषाची शेतीही अशीच आहे का? 
शतका-शतकांच्या वर्तुळाकार जिन्यानं 
माणूस चालला आहे उत्तुंग मिनारावर 
कधी खिडकीतून असीम आकाश पहात 
कधी ओल आलेल्या भिंतीतला 
कुबट अंधार निर्धाराने सोसत. 
या विश्वातलं सर्वच आहे चक्राकार 
ऋतूंचा फेर, वृक्षवेलींचा विकास, 
माणसाच्या जन्ममरणातही कौमार-यौवन-जरा, 
सूर्योदय सूर्यास्त, चंद्रोदय चंद्रास्त, 
आणि तारामंडळाची भ्रमणे-सर्वच चक्राकार, 
काळही धावतो का सरळ रेषेत, 
की आहे त्याची गती, ऊर्ध्वगामी वर्तुळाकार? 
भरतीओहोटीप्रमाणे आमच्या चैतन्याचे 
असतात का चढउतार? 
की असतात आमच्या फुटपट्टया, 
केवळ अहंकाराच्या आत्मप्रौढीच्या? 
की असतो हा सगळाच भ्रम- 
कारण एक दिवस 
युगपुरुषांपासून कापुरुषांपर्यंत 
सगळी खेळणी गोळा करून 
काळ झोपवणार आहे अवघ्या अस्तित्वाला 
शून्य शेजघरातल्या निवांत बाजेवर?

Tags: आगगाडी खुदाबक्ष शास्त्रीबुवा कॉम्प्युटर महाराष्ट्र कॉफी train Khudabaksh Shashtribuwa computer Maharashtra coffee weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके