डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मेलबर्नला पोचल्यावर प्रथम धाव घ्यावी ती शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या फिलिप |आयलंडकडे. आधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन प्रशांत महासागराचे डोळे भरून दर्शन घ्यावे. मग यावे! तिथल्या जलचर-अजबखान्याकडे. मोठमोठ्या  काचपेट्यांत प्रेक्षकांना दर्शनसुख देण्यासाठी हुबेहूब चित्रसज्जा केली आहे, मत्स्य-सर्प आणि समुद्रपक्ष्यांची. आपले लक्ष्य मात्र असावे मावळतीच्या मुहूर्ताकडे.

छावणी कॅनबेरा! छावणीच नाही तर काय! शहर इतके नवे कोरे की नवेपणाच्या वासाशिवाय त्याला दुसरा कसलाच गंध नाही. मुळात ऑस्ट्रेलिया म्हणजे नव्या दमाच्या नव्या शिपायांनी बसवलेले राष्ट्र. राष्ट्राला राजधानी तर हवीच. ती कुठे वसवावी, कोणती असावी, याची थोडीफार धुमशान घातल्यानी आणि त्यांनी ठरवल्यानी की कॅनबेराचा माळ राजधानी वसवायला बेस आहे. बेत ठरला म्हणजे ठरला. सगळी कामे शिस्तीत होऊ लागली. अन् हां हां म्हणता ही मोठी राजधानी उभी राहिली. 

सुरेख, आखीव रेखीव विशाल रस्ते. व्यवस्थित कोन साधून आणि कामकाजाचे अंदाज बांधून उठवलेले भव्य इमले. सर्वत्र वृक्षराजींची खड़ी सलामी. जिथे नसेल पाणी तिचे कुठली गाणी! हे ओळखून कृत्रिमरीत्या निर्माण केलेला नैसर्गिक तलाव. आणि हे सारे दृश्य पाहून बघणाऱ्यांची मने कशी उंच उसळी घेतील याची चुणूक दाखवण्यासाठी सरोवराच्या पाण्यातच उंच उसळत राहणारे गगनस्पर्शी कारंजे. रंगीबेरंगी ध्वज फडकत ठेवण्यापेक्षा स्फटिकशुभ्र कारंजे थुईथुई उडत ठेवणे ही कल्पनाच किती उदात्त आणि सुंदर आहे! 

या सरोवराच्या मागे उभे आहे ऑस्ट्रेलियाचे मंत्रालय, विधानसौध म्हणा हवे तर. मात्र त्याचा कळस न सोनेरी, न मंदिरासारखा शोभिवंत आकाराचा. तो आहे, भूमितीतील खांबट उंच त्रिकोणाच्या सांगाड्यासारखा. याला म्हणतात मॉडर्निटी! थोडक्यात, कळस म्हणजे विरस करण्याचा कळस! रंग कसा? रंगाचा बेरंग करणारा!

एकूणच ऑस्ट्रेलियात 'उंच उंच माड्या नाहित कामाच्या... त्याहुनी घरे चिमुकली बरी' असे व्रत जनतेला प्रिय असावे. त्यामुळे राजधानीमध्येही उत्तुंग इमारतींचा सोस नाही. शिकागो-न्यूयॉर्कसारखे ढगात घुसवलेले मिनार नाहीत, राहती घरे तर एकदम घरेलू. वाटा आटोपशीर मापाच्या. त्यात पुन्हा राजधानीची लोकवस्ती एकदम माफक. भपका नाही, भव्यता नाही, मारून टाकण्याची ईर्ष्या नाही... सारे कसे शांत शांत! 

...आणि तरी कॅनबेरा । तद्दन रुखासूखा. अनाकर्षक. स्वच्छ साफसुथरा पण सुंदर नाही. वेगळा पण  व्यक्तित्वशून्य. कार्बूझिएने निर्माण केलेल्या चंडीगढला जशा अनेक सोयी सुविधा आहेत. नगररचना तंत्राची नवलाई आहे आणि तरीदेखील त्याचे कोरेपणच टोचत राहते.. करकरीत घडी जशी शरीराला पीडा देते तशी ही अतिव्यवस्थित नगरे, कितीही जवळीक झाली तरी दूरस्थ, तटस्थ वाटत राहतात.

अशा प्रदेशात आपण काय करावे? अधिकृत राजधानीकडे पाठ फिरवावी आणि अनधिकृत राजधानीकडे मोहरा वळवावा. म्हणून तर सिडनीच्या महाप्रमाण परिसराचा निरोप घेऊन निघालेल्या मुशाफिराने पुढे आपला पडाव करावा तो मेलबर्नला. तिथे आपल्या स्वागताला कॅनबेरासारखी नीरव शांतता येत नाही. तिथे फुललेली असतात बहुरंगी फुले. रस्त्यांच्या दुतर्फा असतात हिरव्यागार दूर्वांनी झाकलेली अंगणे. तेथे फुलत असतात प्रसन्न हसरी फुले, पुष्कळ दिवसांनी भेटतात भारतीय चिमण्या.  क्वचित कावळेसूद्धा. जरा समुद्रकिनाऱ्याशी लगट केली तर सी- गल्स् भंडावू लागतात, त्यांचेही अप्रूप वाटते. मेलबर्नजवळ आहे जगातील एक नामांकित पर्यटन स्थळ - फिलिप आयलंड!

भगवान सहस्ररश्मी का कोण तो, अस्ताचलाकडे निघाला की शेकडो माणसे नि:स्तब्ध होऊन समुद्राच्या लाटांवर नजर लावून बसतात. वेळ असावी खास करून भरतीची. फार मोठे उधाण नको - हळुहळु चुळबुळ करीत लाटा, येउन पुळणीवर ओसरती... आणि त्या लाटांवर स्वार होऊन येतात फिलिप आयलंडचे नवलाचे पक्षी, पेंग्विन! पक्षी खरे, मात्र माणसासारखे फेंगड्या पायांनी लुटूलुटू चालत येणारे द्विपाद प्राणीच म्हणायचे. पक्षी खरे, मात्र त्यांची घरे न झाडांवर न झुडुपांवर. ती असतात समुद्रकिनाऱ्यावरच्या लव्हाळ्यांच्या किजबिज गर्दीतल्या बिळांत! ते समुद्रपक्षी असतात, मात्र सायंकाळी निवाऱ्याला येतात भूमीवर आणि पहाटेच्यावेळी ओहोटीच्या ओघात सरमिसळ होऊन स्वतःला समुद्रात झोकून देतात. छोट्या छोट्या माशांवर ताव मारतात आणि अगदी बिच्चारेपणाचा आव आणून गरीबडेपणाने लपतछपत बिळांत जाऊन गुडुप होतात.

एके काळी असे पेंग्विन यायचे ते काही शेकड्यांच्या घोळक्याने. पण शिकारी पेंग्विनांची शिकार करण्याची संधी घेणारे दुष्ट माणसे काही कमी असतात का? जीवो जीवस्य जीवनम् या वचनाचा चालताबोलता वस्तुपाठ फिलिप आयलंडच्या किनाऱ्यावर सतत चालू असायचा. परिणामी पेंग्विन-संख्या विरळ झाली आहे. तरीही रोज सायंकाळी साठ-सत्तर पेंग्विन तरी हजेरी लावतातच. अंटार्क्टिकावरच्या त्यांच्या भाईबंदांचे आकार जरा आडमाप असतात. तुलनेने फिलिप आयलंडचे पेंग्विन छोटुकले आहेत. 

या छोटुकल्यांची पलटण सायंकाळी परेड निघाल्यासारखी चालत आली की 'तो दिसे सोहळा अनुपम्य!' तशात मी गेलो तो काळ होता त्यांचा मिलनमोसमाचा. म्हणजे थोड्याच दिवसांत लोकसंख्येचा विस्फोट होईल, हे आलेच! कावळे, चिमण्या, पारवे, बदके नित्याचेच दिसतात. पोपट, कोकिळ आणि कंपनी देखील ठायी ठावी दर्शन देऊ शकते. पण पेंग्विनांच्या पलटणींची परेड पाहून घेतलीच पाहिजे कारण 'न मिळे अशि मौज पुन्हा पाहण्या नरां। ती बघण्या जावे हो मेलबर्नपुरा॥

फिलिप आयलंडची मौज पाहून परत फिरताना मन थोडे उदास होते. नाविलाजाला इलाज नाही! म्हणून परत फिरायचे. मग दुसऱ्या एखाद्या दिवशी मेलबर्न नावाच्या नव्या दुनियेतल्या जुन्या शहरात चक्क ट्रॅममधून भटकायला जावे. राणी सरकारच्या काळातल्या भरपूर वास्तु पाहाव्या. म्युझियमला भेट द्यावी. चित्रशाळा दिसली की ऑस्ट्रलियन आदिवासींची चित्रकला आणि त्यांचे विणकाम, भरतकाम पाहून, हे सगळे किती भारतीय आदिवासींच्या कलेसारखे आहे असा अचंबा खुशाल वाटू द्यावा. 

मग दूर अंतरावर मेलबनर्नचा उंचचउंच मनोरा दिसतो त्याच्या दिशेने चालू पडावे आणि वाटेत लागणारे समरभूमीच्या मानकऱ्यांचे स्मारक आधी दुरून आणि मग जवळून पाहावे. अशी ठिकाणे किती स्वच्छ परिसरात हटकून येतो. साध्या पण प्रशस्त पायऱ्यांनी निर्माण केलेली अनेकस्तरीय वास्तू, सूर्यकिरणांचा भर माध्यान्ही कवडसा झेलेल असे टिपण साधून रचना केलेले प्रमुख समाधिस्थान आणि मुख्य म्हणजे अवडंबर आणि आविर्भाव टाळून केलेली नितांत साधेपणाची योजना ही या स्मारकाची वैशिष्ट्येच म्हटली पाहिजेत.

जवळच असलेल्या फिट्झेरॉय उद्यानात फेरफटका मारल्याशिवाय विसावा घ्यायला जाऊ नये की जेवणखाणाची घाई करू नये. हरत-हेची हिरवी सोयरीधायरी इथे दिमाखात उभी आहेत. शंभर फूट उंची म्हणजे खुजेपणाच म्हणायचा! उंचउंच वृक्षराज वल्कलधारी ऋषिमुनींच्या आश्रमात वस्तीला असल्याप्रमाणे विश्रब्धपणे उभे असतात पण आपल्या वयाचाही अहंकार मिरवत नाहीत. जीर्ण वयही जीर्ण सालीप्रमाणे कसे झोकात धारण करतात! 

याच उद्यानात आणखी एक आक्रीत भेटेल दक्षिण गोलार्धातील सात नभांखाली फिरून नवक्षितिजे निर्माण करणान्या जिम् कुकचे घर- कॅप्टन कुकचे घर तुमची वाट पाहात उभे आहे. खरे म्हणजे कुक होता ब्रिटिश आणि त्याचे घरही होते ब्रिटनमध्येच. पण नवजात ऑस्ट्रेलियाने त्याचे घर आपल्या महानगरात असले पाहिजे असे ठरवले. म्हणून भिंती खिडक्यादारांसकट घर उचलून आणले इंग्लंडमधून आणि उभे केले मेलबर्नच्या या पार्कात. घर अतिशय छोटे आहे. छोटे म्हणजे टुमदार. माळ्यावर शयनगृह. शयनगृहात जुजबी खाटा. साध्या गाद्या. सैंपाकघरात जुनीपानी भांडीकुंडी. कढई-पातेली-ओगराळी चिमटे. कुकसाहेब, हाऊ डिड यू कुक? व्हॉट डिड यू कुक?- ते कोणास ठाऊक? पण तुम्ही तुमच्या कुतूहलाच्या कालव्याने हा गोलार्ध उलथापालथा परतला तेव्हा आम्हाला मिळाले हे नवे जग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका! थँक यू कॅप्टन, थँक यू व्हेरी मच!

Tags: फिलिप आयलंड सिडनी कॅनबेरा पेंग्विन कॅप्टन कुक ऑस्ट्रेलिया Philip Island Sydney Canberra Penguin Captain Cook Australia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके