डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सेनापती बापटांची आठवण होते. नेहरूंनंतर कोण, असा प्रश्र अनेक चिंतातुर माणसं भयभीत स्वरात विचारीत असत. तसा प्रश्न एका चिंतातुरानं सेनापतींनाही केला. नेहमीप्रमाणे सेनापती एखाद्या बालकासारखं खट्याळपणे हसले आणि म्हणाले, ‘नेहरूंनंतर कोण? नेहरूंनंतर नाथ पै.'

भल्या पहाटे फोन खणखणला तर माझ्या छातीत धस्स होतं.

23 वर्ष झाली. असाच भलत्या वेळी फोन खणखणला होता आणि अंधारात धडपडत, ठेचकाळात रिसीव्हर उचलल्यावर ती दुष्ट वार्ता माझ्या कानावर आदळली होती- आपला नाथ गेला रे! 

तेव्हापासून भलत्या वेळी फोन आला आणि कितीही वेळा आला तरी अजूनही मी दचकतो. कोण गेलं असेल, असं पुटपुटत फोन उचलतो. 

बहुतेक वेळा तो राँग नंबर निघतो. म्हणजे कळवणार्‍याला असंच काही कळवायचं असतं, पण ते मला नव्हे.

मृत्यूचे खरंच कधी दूत असतात का? त्यांना त्यांच्या हेड ऑफिसकडून निरोप येत असतील का? त्या निरोपातही गफलती होतच असतील की!

मला वाटतं नाथच्या बाबतीत अशीच काही तरी गफलत झाली असणार. एरवी त्याला असा अकाली मृत्यू आला नसता. अजून त्याला किती तरी कामं करायची होती. बेळगाववर आणि एकूणच सीमाभागावर झालेला अन्याय त्याला दूर करायचा होता. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या नसानसांत धगधगती देशभक्ती आणि उदात्त मानवता या दोन्ही गोष्टींना वज्रलेप करायचं होतं. लोकशाहीचे बुरुज ढासळत होते, त्यांना आपल्या बाहूंचे अडसर घालणाऱ्या शांतिप्रिय सैनिकांच्या फौजा उभ्या करायच्या होत्या. राजकारण म्हणजे बदमाशांचा बालेकिल्ला ही प्रतिमा पुसून टाकून पुन्हा एकदा राष्ट्रकारण आणि राजकारण यांच्यात एकरूपता आणण्यासाठी आसेतुहिमाचल झंझावात प्रवर्तमान करायचा होता.

सेनापती बापटांची आठवण होते. नेहरूंनंतर कोण, असा प्रश्र अनेक चिंतातुर माणसं भयभीत स्वरात विचारीत असत. तसा प्रश्न एका चिंतातुरानं सेनापतींनाही केला. नेहमीप्रमाणे सेनापती एखाद्या बालकासारखं खट्याळपणे हसले आणि म्हणाले, ‘नेहरूंनंतर कोण? नेहरूंनंतर नाथ पै.’

ऋषिमुनी जे शब्द उच्चारतात त्या शब्दांचा अर्थ शब्दांमागोमाग धावत येतो, हे वचन खोटं ठरलं!

नेहरूंनंतर लाल बहादुर आले, मग इंदिराजी आल्या आणि मग त्यांच्याशी लढता लढता दमछाक झालेला नाथ पै 1971 च्या 18 जानेवारीला बेळगावच्या रणमैदानावर कामी आला.

अर्थात राजकारणात केवळ माणसांची व्यक्तित्वं पाहून चालत नाही. त्यांच्या गुणश्रीमंतीचे हिशेब मांडून काही फायदा नसतो, हे न समजण्याइतके आपण दूधखुळे नाही. राजकारणात पक्ष असतात, पक्षांना पदहित पाहावं लागतं, तिथे आपल्यासारख्या लोकांच्या भोळसट भावनेला काही अर्थ नसतो.

भारतीय राजकारणाला पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर जी अधोगती मिळाली तिचा शेवट कुठे होणार हे सांगायला आज कोणीही धजावणार नाही. आता 30 वर्षानंतर चित्र दिसतं ते असं की- कॉंग्रेस नावाच्या महाकाय पक्षाचा आता भेसूर अस्थिपंजर सांगाडा कसाबसा उभा आहे. त्याला ठिकठिकाणी टेकणं लावलेली आहेत. साम्यवादी विचारप्रणाली अवघ्या दुनियेत दुर्बळ होऊन स्मृतिशेष झाली असताना भारतात तिचे क्वचित अवशेष दिसतात हे खरे पण त्यांची उसनी शिदोरीसुद्धा वर्षानुवर्ष टिकेल, हे अशक्यप्राय आहे. आपापल्या समाजांचे रथ भूतकाळाच्या किंवा काल्पनिक मध्ययुगीन वैभवाच्या दिशेने खेचू पाहणारे धर्मवेडे अधूनमधून उसळी घेतात आणि ते बाजी मारतील अशी चिन्हेही दिसू लागतात. पण त्यांच्यातही खपष्टी गेलेल्या पोटांना खाऊ घालण्याची हिंमत नाही आणि अर्धनग्न टिर्र्‍या झाकण्याचीही कुवत नाही. पुन्हा सगळ्यांचा समान विशेष असा आहे की कोणीही झाले तरी ते धनदांडगाई, तनमाजोरी आणि प्रचंड भ्रष्टाचार यांच्या बळावरच राज्य करतील. अशा युगात काय अर्थ राहील नेहरूंचं स्मरण करण्याला? गांधी-जयप्रकाशचं नामोच्चारण करण्याला? रवींद्रनाथांची सुंदर गीतं ओठांवर खेळवण्याला? आता काय किंमत उरणार आहे कोमलतेला आणि पावित्र्याला? जीवनातलं काव्य आता हरवत चाललं आहे. निरागस हास्य मावळत चाललं आहे. जगाच्या रंगभूमीवरच्या सगळ्या उदात्त आणि उदारचरित भूमिकांनी एक्झिट घेतल्यावर उरणार आहेत ती कापुरुषांची कपटनाटकं आणि क्षुद्र भुतावळीची भेसूर छायानाट्यं.

तरीही अजून वाटतं, नेहरूंच्या कोटावरच्या गुलाबाच्या फुलाचा सुगंध अनंतामधून तरळत आपल्यापर्यंत यावा आणि दूर निळ्या आकाशात नाथ पै सारख्या राजबिंड्या युवकनेत्याने शुभ्र घोड्यावरून आपल्याला अंधुक दर्शन देत तरी म्हणावे- दोस्त हो, धीर धरा. उठा. तुमच्या सत्वपरीक्षेत अशी कच खाऊ नका!

Tags: कॉंग्रेस सेनापती बापट बेळगाव वसंत बापट इंदिरा गांधी पंडित नेहरू नाथ पै Congress Senapati Bapat Belgaav Vasant Bapat Indira Gandhi Pandit Neharu Naath Pai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके