डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड! विषुववृत्ताच्या दक्षिणेला असलेल्या या प्रदेशांत मुशाफिरी करणारे भटके तसे आपल्याकडे तुलनेने कमीच. या वर्षी एप्रिल आणि मे जूनच्या मोसमात वसंत बापट यांनी या दोन देशांत भन्नाट भ्रमंती केली. अशा प्रमाणात शरीर आज इथे आणि उद्या तिथे असतेच; पण मनही असे अचपळ की त्याची स्थितीही 'नावरे आवरीता' अशी होऊन जाते. दृष्टीला आणि त्याबरोबर अंतञ्चक्षुंनाही जी चित्रेविचित्रे दिसतात, त्यापैकी काहींना शब्दरूप द्यावेसे वाटते, तेच वसंत बापट करणार आहेत.

जगात सर्वात लहान आणि सर्वात महान् काय, या कोड्याचे उत्तर अगदी सोपं आहे. पंचखंड पृथ्वीवरचं सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया: आणि चहूबाजूंनी समुद्रवलयांकित असलेलं पृथ्वीवरचं सर्वांत मोठे बेट ऑस्ट्रेलिया! आपलीदेखील कमाल असते. स्वदेशाची सीमा ओलांडून परदेशात जायची ओढ आपल्यापैकी पुष्कळांना असते. पण पाहावं तर ज्याची त्याची धाव, पूर्वी असायची इंग्लंडकडे आणि अलीकडे पाहावं तर अमेरिकेकडे. काही विशेष कारणासाठी युरोप खंडातील जर्मनी, फ्रान्स, रशिया यांची यात्रा करणारे कोणी कोणी असत तर कोणी आशिया खंडाची शान आणि अभिमान असणाऱ्या जपानकडे आपली पावले वळवीत. चित्तयरारक अनुभव घेण्यासाठी कोणाकोणाला आफ्रिकन सफारी हवी असते. तर कोणाला झगझगीत रोषणाई मधील चैनबाजीसाठी सिंगापुर बैंकॉक, हाँगकाँग या चैनीच्या माहेरघरांचे आकर्षण वाटते. 'पोटासाठी भटकत कुणी वाळवंटात जाती', म्हणून आखाती देशांत जातात. पण वाटली हौस म्हणून केली बांधाबांध आणि निघाले ऑस्ट्रेलियाला, असे कलंदर मुशाफीर एकंदर कमीच.

कदाचित असंही असेल की विषुववृत्ताच्या दक्षिणेला आणि दक्षिण ध्रुवाशी लगट करायला जायचा योग फार थोड्यांच्या कुंडलीत वर्तवलेला असतो. पृथ्वीगोलाच्या नकाशाकडे पाहताना नेहमी एक गंमत वाटते की जसजसे वर (म्हणजे उत्तरेला!) पाहावे तसतसे प्रदेश विस्तृत होत गेलेले रुंदावत गेलेले दिसतात. उलट दृष्टी खाली (म्हणजे दक्षिणेला!) वळवावी तर प्रदेश चिंचोळे होत समुद्रात पाय बुडवून बसलेले दिसू लागतात. म्हणूनच की काय कोणास ठाऊक सुरक्षितपणाची हमी वाटून आपले दळणवळण, चलनवलन, वियोगमिलन उत्तरगोलार्धात जास्त आणि दक्षिण गोलार्धात कमी. 

ऑस्ट्रेलियाची स्थिती जरा वेगळी आहे. स्वारीने आसनमांडी घालून प्रशांत महासागरात बैठक मांडली आहे. आणि त्याच्या जरा पुढे पाण्याबाहेर केवळ पावले दिसावीत तशी न्यूझीलंडची दक्षिणद्वीप आणि उत्तरद्वीप अशी दोन बेटे आपल्या गोंडसपणानं आपली नजर खेचून घेत असतात. अर्थात ऑस्ट्रेलिया काय न्यूझीलंड काय, आणि दुनियेच्या राजकीय भूगोलात या नावांना स्थान मिळालं आहे केवळ गेल्या दोन शतकांत..

युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यलालसेला सीमा नव्हती आणि ती लालसा पुरी करण्यासाठी आवश्यक ती बेफाम जिद्द, साहसी वृत्ती आणि मरणावर मात करण्याची विजिगीषा ज्यांच्या ठायी आहे, अशा पुरुषार्थी आणि पराक्रमी बहाद्दरांची युरोपमध्ये वाण नव्हती. वास्को द गामा, कोलंबस यांच्या परंपरेतला नव्हे पण नव्या भूमीच्या शोधासाठी प्राणांची बाजी लावणारा कॅप्टन कुक हा एक अचाट साहसी दर्यासारंग इंग्रजांचा झेंडा मिरवीत दक्षिण महासागराच्या छाताडावर आपले जहाज हाकारीत राहिला. नित्य नव्या संकटांशी झुंजत त्याने दक्षिण ध्रुवाच्या नजीकच्या भूमिभागावर मानवी महत्त्वाकांक्षांचे बीजारोपण केले. 

या भूमीचा शोध लागला तेव्हा देखील या भूमीवर संस्कृतीची नवी दालने थाटली जातील अशी कोणाला सुतराम कल्पना आली नसेल. उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही करून टाकणाऱ्या झळा आणि हिवाळ्यात रक्त गोठवून टाकणारी थंडी, जीवनाला आवश्यक असणाऱ्या अन्न-वस्त्र-निवाऱ्याची वानवा, व्यापाराच्या आणि इतरही व्यवहारांच्या वर्तुळापासून फटकून दूरच दूर असलेले कष्टप्राप्य स्थळ - अशा ठिकाणी जावे कोणी, राहावे कोणी आणि कुटुंबकबिल्यासह नांदावे कोणी? 

दयाळू मायबाप इंग्रज सरकारने याचे उत्तर बरोबर शोधून काढले. उद्दाम गुन्हेगारांना, भगोड्या कैद्यांना, खतरनाक गुंडांना जेरबंद करून जन्मठेप भोगण्यासाठी, निदान आठदहा वर्षे छळछळ करून झिजवण्यासाठी ऑस्ट्रेलियात पाठवण्याचा सपाटा इंग्रजांनी सुरू केला. पण धन्य आहे या बंद्यांची आणि त्यांच्या वंशजांची, त्यांनी राखेतून गगनभरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे या त्यक्त बहिष्कृत मानवसमूहातून एक उद्यमशील, संपन्न राष्ट्र निर्माण केले. आजही ऑस्ट्रेलिया एका परीने इंग्लिश लोकांची एक वसाहत असण्यात धन्यता मानीत असेल; पण तेवढ्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाच्या चित्रावर कलंक पडलेला आहे असे वाटत नाही.

आपण नाही का भारतात एखाद्या क्षेत्राला दक्षिणकाशी म्हणत? दक्षिण ध्रुवाजवळील निवाऱ्यालाही पवित्र मानून आपण नाही का त्याला गंगोत्री हे अभिधान देत? याच न्यायाने ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड म्हणजे दक्षिण गोलार्धातील ग्रेट ब्रिटनच आहे. ग्रेट ब्रिटनच्या बऱ्याच गुणांचे आणि दोघांचेही दर्शन या नवजात राष्ट्रांत घडू शकते. इथली गोरी माणसे आपण अँग्लो सॅक्सन असल्याचा अभिमान बाळगतात आणि त्यांचा हा दर्प ऑस्ट्रेलियाच्या वातावरणात सर्व इतरेजनांना जाणवतो. या अँग्लो सॅक्सनांनी आपल्या अहंकारापोटी आणि निखळ स्वार्थासाठी ऑस्ट्रेलियाच्या मूळ वसतीकरांचे आरंभी आरंभी निर्दालन केले. टास्मानियात चक्क नरमेध केला. चेंगीजखानाला देखील लाजवतील अशा कत्तली करून तेथील आदिवासींना शरण आणले. तरस आणि लांडगे यांच्यापेक्षा कैक पटींनी हिंस होऊन अनन्वित अत्याचार केले. 

ही सर्व कहाणी अंगावर शहारे आणणारीच आहे, कधी ना कधी नियती त्या क्रूरकर्माचा प्रतिशोध घेईल असे वाटायला लावणारी आहे. पण हे सर्व खरे असले तरी ऑस्ट्रेलियन राष्ट्राच्या जडणघडणीत गोऱ्या लोकांनी दाखवलेल्या बुद्धिचातुर्याचा, परिश्रमशीलतेचा आणि त्यांच्या अपराजित जिद्दीचा गौरव आपल्याला करावाच लागेल.

हे सर्व विचार मनात गर्दी करीत असताना सिडनी विमानतळाकडे प्रचंड जम्बो विमानाने झेप घेतली आणि एकाच सफाईदार हालचालीत विमान आणि मी योग्य त्या पातळीवर आलो! सिडनी महानगर आले तर! मघा अस्ताव्यस्त पसरलेल्या मनुष्यवस्तीच्या सीमेवर आणि प्रशांत महासागराच्याही सीमेवर मधोमध उभा राहिलेला तो अवाढव्य राजहंस पक्षी मला दिसला. तो कुठल्या अद्भुत जगातला होता बरे? कोणत्या सम्राटाच्या स्वप्नाची ती कमनीय संगमरवरी प्रतिमा मी पाहिली? ती होती सिडनीच्या वैभवाची पंचखंडांत वाखाणली गेलेली अलौकिक निशाणी. सिडनी ऑपेरा, तो अवाढव्य राजहंस म्हणजे जगातील रंगभूमीवरील राजहंसांचे परम पवित्र तीर्थक्षेत्र - सिडनी ऑपेरा. इथून पुढे मला सौंदर्याचे जे असंख्य आविष्कार दिसणार होते त्यांची ग्वाही देणारा हा विसार - सिडनी ऑपेरा!

Tags: ऑपेरा सिडनी न्यूझीलंड प्रशांत महासागर ऑस्ट्रेलिया Opera Sydney New Zealand Pacific Ocean Australia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके