डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

अनेक उपनगरांचे मिळून तयार झालेले एक महानगर. सहा पदरी रस्ते, भन्नाट धावणाऱ्या असंख्य मोटरगाड्या. मात्र एवढ्या प्रचंड वेगाने धावतानाही स्वयंअनुशासनाची कमाल! बाजारपेठा टाळून जरा दूरच्या वाटेने निघालात की, एकापेक्षा एक आक्रीत नजरेपुढे येऊ लागते. त्यातच आहे एक प्रचंड बुद्धमंदिर. आपल्या लढाऊपणाची अहंता मिरवणाऱ्या ऑस्ट्रेलियन बहादुरांना कधी तरी बुद्धं सरणं गच्छामि म्हणण्याची प्रेरणा होईल का!

लोकसंख्या आणि विस्तार दोन्ही दृष्टींनी ऑस्ट्रेलियातले सर्वांत मोठे शहर सिडनी. पण लोकसंख्या किती? तर अवधी तेहतीस लाख! म्हणजे मुंबईच्या एक तृतीयांश. आणि विस्तार? तो अंदाजे सांगायचा झाला तर शे सव्वाशे किलोमीटर लांब आणि शे सव्वाशे किलोमीटर रुंद. (चूकभूल द्यायी-घ्यावी.) बिनचूक विधान एवढेच की सिडनी शहर अवाढव्य आहे, उभे आडवे पसरलेले आहे. 

खरे म्हणजे एकमेकांत गुंतलेल्या अनेक उपनगरांचे मिळून तयार झालेले ते एक महानगर आहे. नगर आटपाट. चढउतारांचे घाट. जावे तिथे ऐसपैस सहापदरी वाट. अशा प्रासांच्या मालिकेत, वस्ती कशी दाट दाट, हा प्रास चपखल बसण्याजोगा होता. पण नाही. आपल्या देशाच्या परिमाणानुसार पाहिले तर एवढ्या विशाल भूमिभागावर फक्त 33 लाख माणसे राहतात, याचा अर्थ बस्ती विरळ आहे असाच होऊ शकतो. 

बस्ती विरळ असली तरी मोटरगाड्यांचे प्रमाण मात्र तद्दन व्यस्त आहे. बहुधा 33 लाख स्त्रीपुरुषांना 20 लाख तरी मोटरगाड्या हव्यातच असे गृहीत धरलेले असावे. त्यामुळे दिवस उजाडला रे उजाडला की रुंदरुंद रस्त्यांवरून हजारो मोटरी वेगवेड्या होऊन धावत सुटतात. राहत्या घरापासून लोकांच्या कामधंदा करायच्या जागा 50 मैल दूर असल्या तर, 'भाग्यवान आहेत लेकाचे, त्यांना अगदी जवळ घर मिळालेलं आहे' असे शेरे गंभीरपणे मारले जातात. 

गोंगाट आणि गजबज, गर्दी आणि गोंधळ यांना टाळून जरा दूर निवांत जागी राहिलेले बरे असा विचार करणारे हौशी लोक आपखुशीने 80 मैल, 100 मैल अंतरावर टुमदार उपनगरांत ठेंगणाठुसका बंगला बांधून तेथून दररोज सकाळ संध्याकाळ चाकांवरून शहराची चक्कर मारतात. बाजारपेठांत खरेदीची झिम्मड उडवायला (शॉपिंग स्प्री) जाताना माणसे रस्त्याने चालतात किंवा अफाट विस्तारलेल्या पार्कात मोकळेपणाने हवा खायला जायचे तर पायी हिंडतात... 

एरवी झपकन् इकडे मग सपकन् तिकडे जायचे तर चकाचक मोटरगाडीशिवाय भागणार कसे? मला तर वाटते की, जगात अनेक शहरे सिडनीपेक्षा मोठाली आहेत. त्यांची श्रीमंती सिडनीच्या सवाई असेल, तिथेही मोटरगाड्या झुंडीने धावत असतीलच पण सिडनी ती सिडनी! महा मोटरबाज! जगातल्या उत्तमोत्तम मॉडेल्सच्या मोटर गाडयाचा अथकपणे चाललेला पासिंग शो. होंडा, टोयोटा, मित्सुबिशी, निस्सानसारख्या जपानी जहांबाज फटाकडया असोत की मर्सिडीजसारख्या जर्मन महामाया असोत, अहमहमिकेने दिमाखात दौडत असतात. त्यांचा वेग आणि आवेग, त्यांची तंदुरुस्ती आणि तडफ, अंतरंग आणि बहिरंग, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भन्नाट धावत असतानाही शिस्तीत सांभाळलेली शिष्ट शालीनता!

या प्रचंड वाहतुकीचे नियंत्रण कोण करते? अदृश्य राहणारे पोलीस. त्यांची अबोलपणे कामगिरी करणारी रडार यंत्रणा. त्यांचे टिपणासाठी टपलेले कॅमेरे, बिनचूकपणे लाल-हिरव्या डोळ्यांची उघडमीट करणारे इशारेबाज दिवे. पण या सर्वाहून या वाहतुकीच्या निर्वेध आणि बिनबोभाट चलनवलनाचे श्रेय दिले पाहिजे ते स्वयंअनुशासनाचे व्रत घेणाऱ्या सिडनीच्या सभ्य, सुसंस्कृत सर्व चक्रधरांना! 

एकाही चौकात आडवे उभे हात करणारा सखाराम नाही, शिट्या फुंकणारे, दंडावर दोनचार पट्ट्या डकवलेले हवालदार नाहीत, कुठे कमरेला पिस्तुले सटकावलेले दमबाजी करणारे इनिस्पेक्टर नाहीत आणि तरीही प्रत्येक वाहन आपापली रेषा सांभाळून धावते, कोणीही धटिंगण धसमुसळेपणा करीत नाही, घुसाघूस नाही, 'आयला, रस्ता तुझ्या बापाचा आहे का असली प्रेमळ भांडणे नाहीत... काय आहे काय हे? आपण स्वप्नात तरी एवढी शिस्त आपल्या वाहतुकीने सांभाळलेली पाहू का? 

पुन्हा हा सगळा चलचक्रपट मूक असतो हे विशेष! फुस्सकन धूर सोडणारे एक्झॉस्ट पाइप नाहीत, धडधड खडखड करीत जाणाऱ्या मोडक्या तुटक्या अवजड ट्रकगाड्या नाहीत, कचाकच ब्रेक लावून धाडधाड आवाज करीत थांबणाऱ्या बसगाड्या नाहीत आणि या सर्वावर कडी म्हणजे पॉमपॉम सारेगम, बाजूला व्हा. भुर्रभुर्र, पोंपों, भोभों करणारे शिंग-कर्णे कोणीही वाजवीत नाही! केवळ गाड्यांतच उत्तम तेलपाणी केलेले असते असे नव्हे तर संपूर्ण गतिमानतेमध्येच कोण बरे असे वंगण घालून ठेवत असते? 

कधी कधी तर असे वाटते की, या दुनियेतील मोटरगाड्यांना हॉर्नच बसवीत नसावेत. क्वचित कोणी आडमुठेपणा केला तर बारीकसा बीप बीप एवढा हॉर्न एखादे वेळी ऐकू येतो. पण हा इशारा ज्याला केलेला असतो तो डोळे वटारून या बारीकशा इशाऱ्याचाही निषेध करतो. उगीच नाही आम्ही म्हणत की सिडनी नगरी बडी बांका, आवाज न करता मोटर हाका!

समजा, तुमच्याजवळ मोटर नसली तर? गुमान आणि वेळेवर धावणाऱ्या बसगाड्या आहेत ना! मोटरींचा सुळसुळाट असल्यामुळे असेल, बसमध्ये फार गर्दी नसते. प्रत्येक बस-थांब्यावर बस कुठून आली, कुठे कुठे थांबणार, कुठे आणि किती वाजता पोचणार याचा तपशील दिलेला असतो. एक्स्प्लोररसारख्या सिडनीदर्शन घडवणाऱ्या बसचे तिकीट काढले की ते दिवसभर चालते. ते फलाण्या गाडीसाठी असते असे नाही तर त्या सुविधेसाठी असलेल्या कोणत्याही बससाठी ते चालते. याशिवाय संपूर्ण एका दिवसासाठी तिकीट, दहा दिवसांसाठी तिकीट, एक महिन्यासाठी तिकीट असल्यामुळे मुशाफिराची केवढी तरी सोय होते. अग अग म्हशी, मला कुठे नेशी, उगाच नका अशी, करू चौकशी! वाट्टेल तेवढे फिरा.

सिडनीत फिरता फिरता पाहायची ती भव्य बोटॅनिकल गार्डन, म्युझियम आणि दुनियेतील एक नामांकित जलचरघर (अंकेरियम) या जलचरघरात अक्राळविक्राळ जलचर आपण जवळून पाहू शकतो, आणि तरी मन भयचकित झाल्याशिवाय राहत नाही. शार्कसारखे मासे, जिवे मारणारे महाकाय अष्टभुज (ऑक्टोपस) केव्हा आपला ग्रास घेतील याचा भरंवसा नसलेले मगर-सुसर आणि चटेरीपटेरी कॅप्टनसारखे किंवा उलटसुलट उड्या मारून करमणूक करणारे डॉल्फिनसारखे निरुपद्रवी मासे - खरोखर समुद्राच्या तळाशी अचपळपणे वावरणाऱ्या अवघ्या जीवसृष्टीचे चित्तचक्षुचमत्कारिक दर्शन या अ‍ॅकेरियममध्ये होऊ शकते. ते पाहताना आपले वय मागे मागे सरकत जाते आणि आपण एकदम कुमारदशेत प्रवेश करतो.

आधुनिक स्थापत्याची सिडनीत रेलचेल असली तरी, व्हिक्टोरियन काळातल्या कलापूर्ण वास्तूंनाही कसोशीने संरक्षण देण्यात आले आहे. त्यात सिटी सेंटरला असलेल्या भव्य सात तालांच्या इमारतीचा समावेश आहे. आत आधुनिक, आकर्षक चिजांचा मायाबाजार भरगच्च भरलेला आहे. खालून वर, वरून खाली जाण्यासाठी विजेच्या सरक-जिन्यांची भरपूर सोय आहे. पण कुठेही मूळ वास्तूच्या शतकपूर्व सौंदर्याला धक्का लावलेला नाही. 

मधोमध असलेल्या घुमटाखाली एक प्रचंड घड्याळ बसवलेले असून राजवाड्याभोवतालचे पहारेकरी बदलावेत तसे घड्याळासभोवतीच्या चौथऱ्यावर खडी ताजीम देणारे शिपाई ठराविक घटकेला तालबद्ध हालचाल करून अंतर्धान पावतात. त्यातून दिवस असावा इंग्लंडच्या राणीच्या वाढदिवसासारखा, महोत्सवाचा. मग तर सगळी शान जरा जादाच असते. ती पाहायला मुहूर्त साधून बघे जमतात. त्यांतील निम्म्याशिम्म्या प्रेक्षकांना तरी फक्त घड्याळाची गंमत तेवढी पाहायची असावी. व्हिक्टोरियन वास्तुकला म्हणजे काय याचा थांगपत्ता असणारे थोडेच!

सर्व शहरे सारखीच असतात का? अरळविरळ उपनगरे आणि भाऊगर्दी उसळणारे डाऊन टाऊन. 'बंगला नवा नवकोनी, फुलबाग बगीचा भवती' अशी निवासस्थाने बाजारपेठेपासून फटकून असणारी; तर हारीने लागलेली भरगच दुकाने आणि त्यांत लोटलेली गर्दी यांनी गजबजलेले बाजारी संकुल म्हणजेच डाऊन टाऊन, अशी दोन परस्परविरोधी चित्रे प्रत्येक महानगराच्या चौकटीत चपखल वसवलेली असतात. सकाळी मुंग्यांची रांग निवासी पेठांतून बाजारपेठांकडे धावत येते आणि सायंकाळी हीच रांग उलट दिशेने तुरुतुरू परत फिरते. आता जगातल्या सर्वच महानगरांना एकच प्रकारची कळा चढलेली आहे. सिडनीत फरक एवढाच की शहराचा विस्तार अफाटलेला असल्यामुळे एक नूर डाऊन टाऊन तर दस नूर निवासी पेठा!

पूर्वी ऑस्ट्रेलियात कायम बस्तीसाठी स्थलांतर करणारी माणसे कमी असत. ऑस्ट्रेलियाही आपले दरवाजे किलकिले करायला तयार नसे. अलीकडे ही परिस्थिती बदलली आहे. ऑस्ट्रेलियाचे मूळ वस्तीकर अधिक इंग्लंडमधून तडीपार केलेले अँग्लो सॅक्सन बंद्यांचे कुटुंबकबिले एवढीच लोकसंख्या आता ऑस्ट्रेलियात नांदत नाही. चिनी, जपानी, थायी, मलेशियन, इंडोनेशियन, सामोअन, फिजीयन भारतीय, पाकिस्तानी, श्रीलंकन, अरब, आफ्रिकन, लेबनान, मेक्सिकन, क्यूबन - किती तरी प्रकारची माणसे देशांतर करून कायमची ऑस्ट्रेलियात रुजू पाहत आहेत. संपत्तीच्या बळावर जापान्यांनी तर भूखंड लाटण्याचा सपाटा चालवला आहे. 

सर्व प्रकारची उपाहारगृहे, सिडनीसकट सर्व शहरांत उत्तम धंदा करीत आहेत. म्हणाल त्या प्रकारचे अन्न आता इकडे मिळू शकते. सांस्कृतिक कार्य करण्यासाठी प्रत्येक समाजाच्या संस्था निघाल्या आहेत. इतकेच नव्हे तर बेत्ताबेताने, कोणाच्या डोळ्यांत खुपू न देता आपापली प्रार्थना मंदिरे उभारण्यासाठीही खटपटी चालू असतात. मशिदी उभ्या राहिल्या आहेत. तशी गोपुरांसह मंदिरेही बांधली जात आहेत. 

त्यांत सिडनीच्या परिसरातील एक अतिविशाल बुद्धमंदिर पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे. एका टेकाडावर, सभोवतीच्या आक्षितिज भूमीवर दृष्टी लावून उभ्या असणाऱ्या या मंदिराच्या प्रांगणातले वातावरण निवांत आहे. सारे कसे शांत शांत आहे. खरे तर थोडे उदास उदास आहे. पण नेटका आणि स्वच्छ परिसर आणि किंचित बेढब का होईना पण मंदिराचे रंगीत नक्षीकाम यांमुळे हे बुद्ध मंदिर ऑस्ट्रेलियन भूमीवर उठून दिसते, वेगळे दिसते हे निश्चित.

माझ्या मनात आले की सिडनी, कॅनबेरा, मेलबर्न - सर्व ऑस्ट्रेलियन शहरांत दोन जागतिक महायुद्धांत धारातीर्थी पडलेल्या झुंजार सैनिकांची स्मारके बांधलेली आहेत. आपल्या युद्धकौशल्याचा अभिमान ऑस्ट्रेलियनांना भरमसाट आहे. ऑस्ट्रेलिया बसवताना हजारो आदिवासींचे शिरकाण टास्मानियात गोऱ्या लोकांनी केलेले आहे. 

नुकतेच टास्मानियातच एक भयानक हत्याकांड झाले. त्यात एका माथेफिरूने एकाच फटक्यांत 35 जणांना गोळया घालून ठार केले. त्यानंतर पंतप्रधान हॉवर्ड यांनी सरसकट पिस्तुलांना परवाने देऊ नयेत, असा पार्लमेंटमध्ये ठराव आणला असता, 'शस्त्र बाळगण्याचा आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहे,' अशी चळवळ करणारी 'गन् लॉबी' निर्माण झाली आहे. अशा या ऑस्ट्रेलियात बुद्धाच्या प्रचंड मंदिराचे दर्शन घेता घेता त्या परमकारुणिकाच्या शिकवणुकीचा काही अंश जर मान्यता पावला तर बुद्धमंदिराच्या निर्मितीचे चीज झाले असे म्हणता येईल. खरे तर हा सवाल आज अवघ्या दुनियेपुढेच आहे!

Tags: मेलबर्न कॅनबेरा सिडनी बुद्ध ऑस्ट्रेलिया Melbourne Canberra Sydney Buddha Australia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके