डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ऑस्ट्रेलियातले सर्वात मोठे नगर सिडनी... आणि सिडनीमधील सर्वांत मोठे आकर्षण सिडनी ऑपेरा.. जगामधील सर्व रंगकर्मीना, ऑपेराच्या रसिकांना आणि कॉन्सर्टमधील संगीताने धुंद होणाऱ्या कलाप्रेमींना सिडनी ऑपेरा तीर्थक्षेत्रच वाटले तर आश्चर्य नाही. प्रत्येक शहरात एखादी वास्तू त्या शहराचे भूषण असते, प्रतीक असते. कोठे संसद भवन, कोठे गगनभेदी मिनार तर कोठे प्रार्थना मंदिर. सिडनीचे प्रतीक आहे सिडनी ऑपेरा. सिडनी बंदरात सिडनी पुलासमीप संगमरवरी शुभ्र हंसाच्या दिमाखात उभे असणारे नवलपरीचे रंगसंकुल!

सिडनी ऑपेरा हे नाव तसं कोड्यात टाकणारं आहे. वास्तविक हे आहे रंगमंच संकुल! एका म्यानात दोन तलवारी राहोत की न राहोत, पण एका वास्तूत एकाहून अधिक रंगमंच निश्चित नांदू शकतात, इतकेच नव्हे तर आकर्षक प्रपंच मांडू शकतात याचा प्रत्यय या अद्भुतरम्य वास्तुशिल्पात येतो.. 

जगातील अनेक चोखंदळ रसिकांनी या वास्तूवर गौरवाची फुले उधळलेली आहेत. कोणी त्याला ऑस्ट्रेलियाचा ताजमहाल म्हटले आहे, कोणी जगामधील आश्चर्यमालिकेत त्याचे नाव गुंफले आहे. एक गोष्ट निश्चित - सिडनी ऑपेराचे रूप असे देखणे आहे की 'देखते रहना', असे सर्वसामान्य मुशाफिरापासून ते दर्दी जाणकारापर्यंत सर्वांना होऊन जाते.

याची संकल्पना ज्याच्या मनात प्रथम साकारली तो होता एक तरुण डॅनिश वास्तुशिल्पी - यॉर्न उट्झॉन, तसा आरंभी तरी तो वास्तुकलेत अनभिज्ञच होता. पण न्यू साउथ वेल्स प्रदेशात राष्ट्रीय प्रेक्षागृह बांधण्यासाठी जी स्पर्धा झाली ती या पठ्याने जिंकली. त्याच्या डोक्यात कल्पनांना तोटा नव्हता. पण बांधकामाची कंत्राटे देणे आणि गि-हाइकाला संतोष देईल अशा चतुराईने काम पुरे करून घेणे, याचा त्याला अनुभव नव्हता. त्याच्या वडिलांच्यामुळे त्याला गलबतांच्या जहाजांच्या बांधणीचा उत्तम परिचय झालेला होता आणि प्रथम तरी या ऑपेरा हाऊसकडे पाहिल्यावर अनेक गलबते आपली शिडे फुगवून शेजारी शेजारी उभी आहेत असा भास होतो. 

पण या वास्तुशिल्पीच्या मते त्याच्या मनात असलेला आकृतिबंध त्याला सुचला तो नुकत्याच उघडलेल्या नारिंगाच्या मोहक फोडींवरून! पण हे रंगसंकुल उभे आहे सिडनी बंदरात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर. त्यामुळे आम्हां अलबत्यागलबत्यांना ते शुभ्र शिडांच्या गलबतांचीच आठवण करून देते.

ऑस्ट्रेलिया हे तसे नवजात राष्ट्र आहे. तेथे दीर्घकालीन परंपरा नावाची चीज दुर्मिळच, म्हणून राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या वास्तुरचनेसाठी जागतिक स्तरावर स्पर्धा भरवली तर सापेक्षतः अल्प खर्चात अत्युत्कृष्ट नमुना हाती लागण्याची शक्यता चतुर शासकांच्या बुद्धीला जाणवली असली तर नवल नाही. डिझाइन तर उत्तम मिळाले पण प्रत्यक्षात ते उभे करणे हे महादुर्घट काम होते. तीस वर्षे सिडनी ऑपेरा हाऊसची उभारणी चालू राहिली. 

मध्यंतरी मतभेदांनी उग्र रूप धारण केले. वास्तुशिल्पी नाराज होणे आणि त्यांनी काम सोडून जाणे हेही ओघानेच आले. परंतु ई. एच. फार्मर या शासकीय वास्तुशिल्पीने उर्वरित काम संपवण्याची जबाबदारी घेतली. आणि अंतर्गत मांडणी व सजावट तडीस नेली ती हॉल, टॉड आणि लिट्लमोअर या तिघांनी. सिडनी ऑपेराच्या निर्माणावर एक पुस्तकही लिहिले गेले आहे आणि त्यात सर्व परिश्रमांची, अडचणींची आणि त्यांच्यावर मात कशी केली त्याची तपशीलवार हकीकत दिलेली आहे.

समुद्रसपाटीच्या खाली 40 फूट खोल उभ्या केलेल्या 550 भक्कम स्तंभांवर अपरा हाऊसचा मूलाधार सुस्थिर केलेला आहे. रंगसंकुलात कॉन्सर्ट थिएटर, ऑपेरा हाऊस, म्युझिक चेंबर, नाट्यगृह, प्रदर्शन कक्ष, तीन उपाहारगृहे, सहा मधुशाला, एक ग्रंथशाला यांचा विशाल संसार थाटलेला आहे. कलाकारांचे रंगपट, कपडेपट यांसाठी साठ खोल्या बांधलेल्या आहेत. सर्वत्र ऐसपैसपणाची जाणीव आपल्याला होते. पण हे रंगसंकुल अतिशय भव्य आहे. याचा प्रत्यय येतो तो मात्र पाकळ्या पाकळ्यांच्या आकृतींनी उभारलेल्या विशाल आणि उत्तुंग छतामुळे. त्यांतली एक पाकळी तर आहे 221 फूट उंच. तिच्या तळाशी उभा राहिलेला माणूस म्हाताऱ्याच्या हातातल्या काठीएवढा दिसतो!

किती प्रेक्षक या प्रेक्षागृहात मावतात? ध्वनिक्षेपकाशिवाय छोट्या नाट्यगृहात खेळ होतात तेव्हा तेथे आहेत फक्त 360 आसने. ऑपेरा विएटरमध्ये 1500 तर मोठ्या कॉन्सर्ट विएटरमध्ये 2679. येणाऱ्या प्रेक्षकांच्या हजारो मोटरी मावतील एवढी मोकळी जागा संकुलाभोवती हवी. ती मिळणे अशक्यच! म्हणून आता रंगसंकुलापासून जवळ एक सात मजली प्रचंड कारपार्क बांधण्यात आला आहे. सगळे काम कसं भव्य आणि शिस्तीत.

एवढ्या आलिशान प्रेक्षागृहात खेळ बघायला तिकीट जरा भारीच असणे स्वाभाविक आहे. त्यातच आपण एक डॉलर म्हणजे 27- 28 रुपये असं गणित मनाशी मांडले तर आपण कुठले या थेटरात फिरकणार! 35 डॉलर्स म्हणजे झाले का जवळजवळ हजार रुपये. आपण बहुतेक जन्मात कधी नाटक पाहणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणार. पण गुणाकार विसरल्यास एखाद्या वेळी जायला हरकत नाही!

सिडनी ऑपेराचा आसमंत विशाल आहे. मोकळा आहे. अंगघसणीची गर्दी येथे क्वचितच. उपर गगन विशाल! समोर सतत भूमीवर धाव घेणारे महासागराचे तुडुंब पाणी. त्यावर डौलाने डुलत जाणाऱ्या छोट्यामोठ्या होड्या. अधूनमधून सुसाट वेगाने दुतर्फा फुर्रर फुर्रर पाणी उडवीत भिन्नाट फिरणाऱ्या मोटरबोटी, जरा अंतरावर महाकाय आगबोटी. खाडीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर पाण्याशी लगट करणारे बंगले इमले. ऑपेरा हाऊसच्या निकट असलेल्या फरसबंदी रुंद चौपाटीवरून फेरफटका करताना जादुई दुनियेत आपण आलो आहोत हे वेगळे सांगावे लागत नाही. सिडनी बंदरात 'माझी आगबोट चालली दर्यात ग' असं आपल्याशीच गुणगुणत मजेत फिरावं, खावं-प्यावं पण सगळे कसं स्वच्छ आणि नीटनेटकं चुरगळलेल्या कागदातले कळकट पदार्थ भले चटकदार असतील - ते तुमच्या देशातच चाखा. इथे कसलीही घाण खपवून घेतली जाणार नाही. स्वच्छतेचा एक धाकच निर्माण झाला की माणसं कशी आपोआप शिस्तीत वागायला लागतात.

ही जागा किती सुंदर असली तरी हा केवळ शुभारंभ आहे. सिडनीमधली सौंदर्ययात्रा मुशाफिराला त्याच्या मर्जीप्रमाणे घडवण्यासाठी 'सिडनी एक्स्प्लोरर' नावाची बस आरामशीर असते, केव्हाही सज्ज असते आणि ऑपेरा हाऊसच्या जवळच तिचा थांबा आहे. मी निघतोच आता फेरफटका करायला!

Tags: म्युझिक चेंबर कॉन्सर्ट थिएटर ऑपेरा हाऊस सिडनी Music Chamber Concert Theater Opera House Sydney weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके