डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सातारचे प्रतिसरकार इतिहासातील गळलेले पान

आज अमृतमहोत्सवी वर्षात या प्रतिसरकारचा इतिहास नव्या पिढीपुढे मांडणारा एकही कार्यक्रम सरकारदरबारी होत नाही. लोकांच्या आश्रयानेही होत नाही. ज्या शिक्षणसंस्था इतिहासातून प्रेरणा घेऊन शिक्षण देण्याचा दावा करतात, त्याही याची नोंद घेत नाहीत. सातारा हे प्रतिसरकारचे मुख्य केंद्र होते, कारण आताचा सातारा आणि सांगली जिल्ह्याचा एकच जिल्हा होता. त्याचा कारभार सातारा येथील जिल्हा प्रशासनामार्फत हाकला जात होता. त्याला आव्हान देणारे हे प्रतिसरकार सातारचे म्हणून ओळखले जात होते. या प्रतिसरकारचा इतिहास सांगणारे भव्य स्मारक नाही. त्याची सर्व नोंद ठेवणारी ग्रंथालये नाहीत. आपण इतिहासाबाबत इतके दुराभिमानी का झालो आहोत? महाराष्ट्राच्या इतिहासात प्रतिसरकारची नोंद घ्यावी, इतके ते महान नव्हते का?

‘‘स्वातंत्र्य आंदोलनासाठी देशातील प्रत्येक भागाने काही ना काही केले होते; परंतु सातारा जिल्ह्याच्या कामगिरीला भारताच्या इतिहासात तोड नाही. शेवटी सातारा हा शिवाजीचा मुलूख आहे.’’- स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी अरुणा असफअली यांनी 20 फेबुवारी 1946 रोजी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना हे उद्‌गार काढले होते. याच अरुणा असफअली यांच्या हाती तिरंगा झेंडा होता. मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’चा नारा दिला होता. त्यात मध्यभागी उभे राहून अरुणाजी तिरंगा ध्वज फडकावीत होत्या. त्यांनी साताऱ्याच्या प्रतिसरकारचे केलेले वर्णन अंगावर शहारे आणणारे आहे. शिवाय साताऱ्याच्या भूमीत लढा देणारे प्रतिसरकारचे सर्व सैनिक शिवाजीराजाच्या मुलुखातील आहेत. त्यांची कामगिरी ऐतिहासिक असणारच, ही त्यामागची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील साताऱ्याच्या प्रतिसरकारचा लढा हा एक देदीप्यमान इतिहास आहे, ते एक सोनेरी पान आहे. त्याच्यामागे 300 वर्षांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे- असेच त्यांना अधोरेखित करायचे होते, हे स्पष्ट दिसते.

अरुणा असफअली यांच्या विधानाचा संदर्भ घेऊन ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.डॉ.जयसिंगराव पवार यांच्याशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनी म्हटले- याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात अभिमानाने करायला हवी, तो शिवाजीचा मुलूख होताच; पण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या प्रतिसरकारच्या आंदोलनाची तुलना शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर जो मराठ्यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला त्याच्याशी नेमकेपणाने होते. शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होतीच. सर्व बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावून स्वत:च्या सव्वीस गडांसह स्वराज्य उभे केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीमहाराज यांची कैद आणि त्यानंतरचा मराठा इतिहासातील कालखंड फारच निराशाजनक होता. छत्रपती राजाराममहाराज आणि रणरागिणी ताराराणी यांनी स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी दिलेला लढा हा फार महत्त्वाचा कालखंड आहे. प्रा.पवार यांच्या मतानुसार, हा जो पडझड झालेला कालखंड आणि त्यात मराठ्यांनी दिलेला लढा याच्याशी प्रतिसरकारची तुलना करता येऊ शकते. शेवटी प्रतिसरकारच्या लढ्याची प्रेरणा शिवाजीमहाराजांच्या लढ्यातून आलेली होती.  

हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण असे की, प्रतिसरकारच्या स्थापनेला या वर्षीच्या 3 ऑगस्टला 75 वर्षे झाली. प्रतिसरकारचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. अखंड भारतवर्षामध्ये अशा प्रकारचे केवळ सहाच लढे उभारले गेले. ज्या भागात ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देऊन ‘चालते व्हा,’ असे सांगून टाकले, त्या भागात ब्रिटिशांच्या प्रशासनाचे जाळे उद्‌ध्वस्त करण्यात आले. गावोगावी संपूर्ण प्रशासन ठप्प करून टाकले. महसूलवसुली बंद करून टाकली. पर्यायी न्यायव्यवस्था उभी केली गेली. लोकांना संरक्षण देणारी सक्षम यंत्रणा उभी करण्यात आली, त्याच वेळी ब्रिटिश प्रशासनाकडून होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकारही करण्यात आला. उत्तर प्रदेशातील बलिया आणि पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील दोन प्रतिसरकार चळवळींची साताऱ्याच्या प्रतिसरकारशी तुलना करता येऊ शकते. कारण अशा प्रकारच्या सहा आंदोलनांपैकी केवळ ही तीन विभागांतील आंदोलनेच एक वर्षाहून अधिक काळ चालली. त्यात साताऱ्याचे प्रतिसरकार सर्वाधिक तीन वर्षे टिकले होते. स्वातंत्र्याची पहाट दिसतानाच ते समाप्त करण्याची घोषणा करण्यात आली. अन्यथा, प्रतिसरकारची चळवळ लोकचळवळ झालीच होती. तिला उखडून टाकणे ब्रिटिशांना अशक्यप्राय झाले होते.

दि.9 ऑगस्टच्या क्रांतिदिनी महात्मा गांधी यांनी मुंबईत गोवालिया टँकवरून ‘चले जाव’चा नारा दिला. प्रतिसरकारची चळवळ उभारण्यांमध्ये पुढाकार घेतलेल्या युवकांपैकी अनेक जण तिथे उपस्थित होते. हे सर्व युवक थोडे जहाल विचारांचे होते. त्यांनी महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित होऊन स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याच वेळी हिंसक मार्गाने ब्रिटिश व्यवस्थेवर हल्ले करण्याचाही त्यांचा निर्धार होता. त्यासाठी युवकांना संघटित करण्याची मोहीम आखली. महात्मा गांधी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांची धरपकड झाल्याने प्रचंड असंतोष पसरत होता. त्याचा परिणाम सातारा परिसरातही जाणवू लागला होता. याचा नेमका वेध घेत अनेक युवक एकत्र आले.

साताऱ्याच्या उत्तरेकडील नीरा नदीपासून कोल्हापूर संस्थानच्या सीमेवरील वारणा नदीपर्यंतच्या परिसरातील असंख्य युवक एकत्र येऊ लागले. त्यांनी संघटितपणे घातपाती कारवाया सुरू केल्या. रेल्वे लुटणे, स्टेशन लुटणे, मालगाडीवर हल्ला करणे, मोर्चे आयोजित करणे, प्रभातफेऱ्या काढणे आदी प्रकारांनी या आंदोलनाने जोर धरला होता. पाटण, इस्लामपूर, तासगाव, वडूज आदी ठिकाणांचे मोर्चे गाजले होते. वडूजच्या मोर्चावर ब्रिटिशांनी गोळीबार केला. त्यात आठ काँग्रेस कार्यकर्ते ठार झाले आणि तेवीस जण जखमी झाले. मात्र, आंदोलनाला पाठिंबा वाढतच होता. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी आंदोलन दडपून टाकण्यासाठी गावकामगार पोलीस पाटील, तलाठी, आणि गुंडांना हाताशी धरून लोकांना छळण्याचा एक नवा मार्ग शोधून काढला होता. लोकांची या आंदोलनातील कार्यकर्त्यांशी फारकत करण्याचा तो डाव होता.

लोकांशी फारकत होऊ लागल्याने भूमिगतांचे धाबे दणाणले. ब्रिटिशांचा मोठ्या धैर्याने आणि संघटितपणे मुकाबला करण्यासाठी ताकद उभारण्याचा निर्णय घेणे आवश्यक वाटू लागले. त्यांनी पहिली बैठक कामेरी (जि. सांगली) येथे 1 जून 1943 रोजी घेतली. प्रतिसरकार स्थापन करण्याची पहिली व्यूहरचना येथेच ठरली. त्यामुळे या बैठकीला प्रतिसरकारच्या इतिहासात महत्त्व आहे. जवळपास पंचवीस प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. लोकांना आपल्याबरोबर घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. कारण ब्रिटिशांबरोबरच गावगुंडापासून लोकांना खूप त्रास होत होता. या गावगुंडांना हाताशी धरूनच भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांवार हल्ले करण्याचे धोरण ब्रिटिशांनी आखले होते. याचे कारण त्यांना गावात कोणी मदत करण्यास पुढे येत नव्हते, कारण भूमिगत आंदोंलकांचा बडगा होता.

ब्रिटिशांनी गावगुडांना हाताशी धरल्याने त्यांची मुजोरी वाढली. त्यांनी आपले अत्याचार वाढविले. पैसा गोळा करणे, स्त्रियांची अब्रू लुटणे, धान्य, सोनेनाणे लुटणे आदी प्रकार वाढू लागले. या गावगुंडांना अटकाव केला तर लोक आपल्याबरोबर येतील, हा मार्ग भूमिगत आंदोलकांनी शोधला. त्यांच्या मदतीने गावोगावच्या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेताच लोकांचा पाठिंबा वाढू लागला. त्यासाठी गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी अवलंबले. शस्त्रे जमवून, भूमिगत राहून सरकारची यंत्रणा खिळखिळी करण्याचा सपाटाच लावला. गावगुंडांना हाताशी धरण्याचा ब्रिटिशांचा डाव त्यांच्याच अंगलट आला. ब्रिटिशांनी अभय दिल्याने त्यांचे अत्याचार वाढले होते. अनेकांना त्यांनी आपण भूमिगत स्वातंत्र्यसैनिकच आहोत असे भासवून आंदोलन बदनाम करण्याचे कटकारस्थान रचून पाहिले.

या सर्वांवर गनिमी काव्यानेच मात करण्याचा निर्णय 3 ऑगस्टला घेण्यात आला. त्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली.  शिवाजीच्या मुलुखात त्यांच्याच युद्धनीतीने, गनिमी काव्याने उभारलेले हे आंदोलन होते. याचा पाडाव करण्याचे ब्रिटिशांचे सर्व डावपेच उधळून लावण्यात आले. लोकांचा आश्रयही त्यांनी मिळविला. गावोगावी न्यायदानाची व्यवस्था केली. दागदागिने, पैसा-अडका, पशुधन, पिके, धान्यांची पोती आणि स्त्रिया, आदींना कोणी हात लावणार नाही. जो कोणी याचा विचार करेल आणि गुंडगिरी करेल, त्याला पत्र्या ठोकण्याचा कार्यक्रम हाती घेतला. सातारा जिल्ह्याच्या परिसरात एका नव्या व्यवस्थेची गरज होती, ती या प्रतिसरकारने निर्माण केली. परिणामी, लोकाश्रय मिळाला. लोकाश्रयामुळेच ब्रिटिशांना प्रतिसरकारचा पाडाव करता येऊ शकला नाही. प्रतिसरकारच्या वरिष्ठ समितीने सप्टेंबर 1945 मध्ये नागनाथ नायकवडी यांना सशस्त्र सैनिकांची संघटना उभारण्यास मान्यता दिली. शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि पैसा यांची जमवाजमव झाली होती. वरिष्ठांच्या मान्यतेने आता सैनिकी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करायची होती.

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या परिसरातून अनेक तरुण या सैन्यदलात सामील होण्यासाठी उत्सुक होते. सातारा हा सैनिकांचा जिल्हा होता; पण स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्यासाठी, सैनिक संघटना उभारण्यासाठी प्रशिक्षण देण्यास कोणी पुढे येईना. त्याच दरम्यान आझाद हिंद फौजेतील काही सैनिकांची भारत सरकारतर्फे चौकशी चालू होती. नवी दिल्लीतील दरियागंजमध्ये या सैनिकांना मदत करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांनी काम करण्यास कार्यालय काढले होते. या कार्यालयाचे कामकाज त्यांच्या कन्या मणिबेन पाहत होत्या. आझाद हिंद फौजेतील सैनिकांची मदत घेण्याचा विचार नागनाथ नायकवडी यांच्या मनात आला आणि काही सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी पर्यटकांच्या वेषात दिल्ली गाठली. त्या वेळी त्यांना पकडून देणाऱ्यांसाठी ब्रिटिशांनी बक्षीस जाहीर केले होते.

दि.28 जुलै 1944 ला त्यांना पकडून साताऱ्याच्या तुरुंगात ठेवले होते. दि.10 सप्टेंबर 1944 रोजी त्यांनी तो तुरुंग फोडला होता आणि पलायन केले होते. तेव्हापासून ते ब्रिटिशांना सापडत नव्हते. दरियागंजच्या कार्यालयात जाऊन श्रीमती मणिबेन यांच्याकडे सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी एखादा फौजी द्यावा, अशी मागणी केली. 22 वर्षांच्या नागनाथ नायकवडी यांचे ते धाडसच म्हणायचे. श्रीमती मणिबेन यांनी स्पष्ट शब्दांत नकार देत महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्त्वात सैनिकांची संघटना उभारणे बसत नाही; तेव्हा असे करू नका, असे स्पष्टपणे बजावले. त्याच वेळी दोन शीख सैनिक तरुण त्यांना भेटायला आले. शीख रेजिमेंटमध्ये त्यांनी काम केले होते. म्यानमारच्या सीमेवरून प्रवेश करणाऱ्या आझाद हिंद फौजेवर कारवाई  करण्यास धाडण्यात आलेल्या शीख रेजिमेंटचे ते शिपाई होते. आझाद हिंद फौजेवर कारवाई करण्याऐवजी शीख रेजिमेंटचे जवान त्यांच्यातच सामील झाले. तेव्हा ब्रिटिशांनी इतर सैनिकांच्या मदतीने ते बंड मोडून काढले आणि त्यांना पकडून कलकत्त्याच्या तुरुंगात ठेवले. त्यातील सहा जवानांनी पलायन केले होते. त्यापैकी हे दोघे जवान होते आणि त्यांची नावे होती, मन्सा सिंग आणि नानक सिंग!

लुधियानाजवळचे हे दोन जवान श्रीमती मणिबेन यांची भेट घेऊन सशस्त्र लढा देण्यासाठी संघटना उभारण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करीत होते. ज्या मागणीसाठी नागनाथ नायकवडी दिल्लीपर्यंत आले होते, तीच मागणी होती. श्रीमती मणिबेन यांचे त्यांनाही तेच उत्तर मिळाले. ते दोन शीख जवान बाहेर पडले. नायकवडी यांनीही तातडीने निरोप घेऊन या जवानांना बाहेर येऊन गाठले आणि तुमच्या मनातील कल्पना घेऊनच आम्ही प्रतिसरकारतर्फे काम करणार आहोत; पण आम्हाला सैनिकी प्रशिक्षण नाही, ते देण्यासाठी सातारा भागात या, अशी विनंती केली. त्या जवानांनी ती मान्य केली. नागनाथ नायकवडी यांच्याबरोबर मन्सासिंग आणि नानकसिंग वारणा खोऱ्यात आले. ऐतवडे बुद्रुकजवळ तरुणांचा तळ उभारला होता. तिथे सैनिकी प्रशिक्षण चालू झाले.

थोड्याच दिवसांत ही माहिती बाहेर जाताच शिराळा पेठातील वारणा नदीच्या उगमाजवळच्या दाट जंगलात थाबड गावाजवळ हा तळ हलविण्यात आला. तिथे प्रशिक्षण चालले होते. त्याची माहिती सातारा जिल्हा प्रशासनाला लागली. पोलिसांनी माग काढत या ठिकाणी धाड टाकण्याचा प्रयत्न केला. नानकसिंग आणि किसन अहिर यांचा एक गट होता, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व नागनाथ नायकवडी आणि मन्सासिंग करीत होते. पोलिसांची नानकसिंग आणि किसन अहिर गटाशी गाठ पडली. गोळीबार झाला. यामध्ये नानकसिंग आणि किसन अहिर यांना गोळ्या लागल्या. तो दिवस 25 फेब्रुवारी 1945 होता. आपला पाडाव होणार असे इतर सहकाऱ्यांना वाटू लागले. त्यांनी प्रतिकार करीतच या दोघा क्रांतिकारकांचे मृतदेह घेऊन जंगलात पलायन केले. त्यांच्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये, म्हणून सैनिकी परंपरेप्रमाणे मानवंदना देऊन दहन केले.

सांगली जिल्ह्यातील वाळव्याचे किसन अहिर केवळ वीस-बावीस वर्षांचे शेतकऱ्याचे पुत्र! नानकसिंग तर कोठून, कोठे आलेले! लुधियानाजवळच्या खेड्यातील हा तरुण. नागनाथ नायकवडींशी चर्चा झाल्यावर आपला पंजाब हा मुलूख सोडून सातारा परिसरात आला. वारणा खोऱ्यात जन्मलेल्या लढवय्या तरुणांना सैनिकी प्रशिक्षण देऊ लागला. या वेळी झालेल्या हल्ल्यात लढता-लढता ‘भारतमाता की जय’, ‘महात्मा गांधी की जय’, ‘जय हिंद’ अशा घोषणा देत अखेरचा श्वास घेतला. प्रतिसरकारची चळवळ उभी करणारी ही सर्व तरुण मुले कोण होती? सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होती. स्वातंत्र्य कधी मिळेल, त्यातून आपला देश कसा उभा राहील याची सुस्पष्ट कल्पनाही त्यांना नसावी. मात्र, आपली भूमी पारतंत्र्यात आहे, हेच त्यांना मान्य नव्हते. याच विचाराने ती पेटून उठलेली सामान्य कुटुंबातील तरणीबांड पोरं होती.

नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंत बंडू पाटील (वसंतदादा), धोंडिबा माळी, नागनाथ नायकवडी, जी.डी. लाड, नाथाजी लाड, बर्डेगुरुजी, बाबूजी पाटणकर, कासेगावकर वैद्य, पांडू मास्तर, किसन वीर, किसन अहिर, पांडू बोराडे, बाबूराव चरणकर (कुलकर्णी), खाशाबा उंडाळकर, व्यंकटराव पवार, शेखकाका, काशीनाथ देशमुख, विनायक थोरात, बापूसाहेब देशमुख, आत्माराम पाटील, श्रीधर कुलकर्णी, बाबू सातपुते, श्रीमती राजक्का पाटील, इंदुमती पाटणकर, विष्णू एकनाथ कान्हेरे, यशवंतराव पुनदीकर, रंगराव पाटील, के.डी. पाटील, निवृत्ती पाटील... अशी किती तरी नावे नोंदविली गेली. ही सर्व तरुण मंडळी 20 ते 40 च्या वयोगटातील होती. घरात कष्ट करून शेती करणारी परिस्थिती होती. कोणीही सुखवस्तू कुटुंबातील नव्हते. अशी पार्श्वभूमी असलेल्या या तरुणांनी प्रतिसरकारचा ऐतिहासिक लढा उभारला. तो ‘सातारचा प्रतिसरकारचा लढा’ म्हणून नावारूपास आला. 

एवढेच नव्हे, तर देशात तीन प्रमुख प्रतिसरकारे स्थापन झाली; ती उत्तर प्रदेशातील बलिया, पश्चिम बंगालमधील मिदनापूर आणि महाराष्ट्रातील सातारा ही होत. यात केवळ सातारच्या प्रतिसरकारचा पाडाव ब्रिटिशांना करता आला नाही. तीन वर्षे हे प्रतिसरकार चालले. दि.15 ऑगस्ट 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांतच भारतातील प्रांतीय विधीमंडळाच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस प्रचंड मताधिक्याने विजयी झाली. त्याबरोबरच ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार सुरू केला. मुंबई प्रांतात  सत्तेवर आलेल्या काँग्रेसने आंदोलकांविरुद्धची मोहीम थांबविली आणि गुन्हे मागे घेण्याची तयारी दर्शविली. त्याचबरोबर सरकारने माफी मागून कारवाया थांबविण्यात येत असल्याचे जाहीर केले.

साताऱ्याजवील कोणेगाव येथे 5 मे 1946 ला सर्व भूमिगत बाहेर आले. त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच दिवशी कऱ्हाड येथे सायंकाळी साठ हजार लोकांच्या उपस्थितीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. नाना पाटील, किसन वीर, यशवंतराव चव्हाण, कासेगावकर वैद्य, रामानंद स्वामी, सेनापती बापट, पांडू मास्तर, व्यंकटराव पवार आदींनी भाषणे करून लोकांचे आभार मानले, असा देदीप्यमान इतिहास आहे. त्याचे तपशील खूप आहेत. प्राचार्य आबासाहेब शिंदे यांनी अथक बारा वर्षे संशोधन करून ‘सातारचे प्रतितसरकार’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात असंख्य नोंदी आढळतात. तेव्हा कळते की, शिवाजींच्या मुलुखातील त्यांच्याच गनिमी काव्याच्या तंत्राने लढलेला हा प्रतिसरकारचा लढा किती महान होता. त्याचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रतिबिंब उमटत राहिले.

प्रतिसरकार ही केवळ जाळपोळ करणारी, घातपात करणारी चळवळ नव्हती, तर नवी व्यवस्था निर्माण करणारीदेखील होती. ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी त्यांनी जेवढे कष्ट घेतले, त्याहून अधिक गावोगावी न्यायव्यवस्था निर्माण करण्यासाठी घेतले. गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि विशेष करून स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना ठोकून काढले होते. त्यांना पत्र्या मारल्या होत्या. म्हणून या सरकारला ‘पत्री सरकार’ही म्हटले जाते. अशा देदीप्यमान प्रतिसरकारचा जाज्वल्य इतिहास आपण किती जपतो आहोत, तो किती मांडतो आहोत?

या स्वातंत्र्यसैनिकांपैकी काही थोडेच काँग्रेसमध्ये कायम राहिले, सत्तेचे राजकारण केले, सत्तेत गेले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील आघाडीवर होते. काहींनी शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी संघर्ष करीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ते सत्तेच्या वळचणीला कधी गेले नाहीत. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपले सामान्य कुटुंबातील जीवन जगणे पसंत केले. शेखकाका, बाबूराव चरणकर, पांडू मास्तर किंवा धोंडिराम माळी, हिंदूराव पाटील आदींची नोंद कोण घेणार आहे? काही स्वातंत्र्यसैनिकांनी सहकार, शिक्षणसंस्था काढण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या समर्थकांनी तेवढी त्यांची स्मृती जपण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वसंतदादा, जी.डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवडी, किसन अहिर आदींचा समावेश आहे.

पंजाबहून खास सातारच्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मुलुखात येऊन अखेरचा श्वास असेपर्यंत लढत राहिलेल्या नानकसिंग यांना काय मिळाले? महाराष्ट्राने त्यांची नोंद कितपत घेतली? नागनाथ नायकवडी यांना त्यांचा इतिहास माहिती होता, म्हणून त्यांनी नानकसिंग यांच्या स्मरणार्थ शिराळा तालुक्यातील सोनवडे येथे एक विद्यालय स्थापन केले आहे. त्यास नानकसिंग यांचे नाव दिले आहे. महाराष्ट्राला वाटत असेल का किंवा मराठी माणसांच्या मनात प्रश्न उपस्थित होत असेल का- कोण हे नानकसिंग असावेत? त्यांचा कोणी एक धडाही लिहिला असेल का?

आज अमृतमहोत्सवी वर्षात या प्रतिसरकारचा इतिहास नव्या पिढीपुढे मांडणारा एकही कार्यक्रम सरकारदरबारी होत नाही. लोकांच्या आश्रयानेही होत नाही. ज्या शिक्षणसंस्था इतिहासातून प्रेरणा घेऊन शिक्षण देण्याचा दावा करतात, त्याही याची नोंद घेत नाहीत. सातारा हे प्रतिसरकारचे मुख्य केंद्र होते, कारण आताचा सातारा आणि सांगली जिल्ह्याचा एकच जिल्हा होता. त्याचा कारभार सातारा येथील जिल्हा प्रशासनामार्फत हाकला जात होता. त्याला आव्हान देणारे हे प्रतिसरकार सातारचे म्हणून ओळखले जात होते. या प्रतिसरकारचा इतिहास सांगणारे भव्य स्मारक नाही. त्याची सर्व नोंद ठेवणारी ग्रंथालये नाहीत. आपण इतिहासाबाबत इतके दुराभिमानी का झालो आहोत? महाराष्ट्राच्या इतिहासात प्रतिसरकारची नोंद घ्यावी, इतके ते महान नव्हते का?

ते शिवाजीच्या मुलुखात लढले गेले आणि त्याची तुलना औरंगजेबाविरुद्धच्या मराठ्यांच्या युद्धाशी करता येईल, असा गौरव जयसिंगराव पवार करतात; त्याची अरुणा असफअली म्हणतात त्याप्रमाणे साताऱ्यात काय स्मृती आपण ठेवली आहे? त्याचा इतिहास तरी भावी पिढीला कसा सांगायचा? ते महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानातून गळलेले पान आहे का? आपण इतके निष्ठुर का झालो आहोत? या देदीप्यमान इतिहासाचे भव्य रूप भावी पिढीला सांगण्याचा अभिमान आपणास का बाळगू नये?

 (‘दै.लोकमत’मध्ये सप्टेंबरअखेरीस दोन अंकात प्रसिद्ध झालेला लेख येथे पुनर्मुद्रित केला आहे.)  

Tags: संपादक लोकमत साताऱ्याचे प्रतिसरकार स्वातंत्र्य लढा प्रतिसरकार swatantrya ladha freedom struggle editor lokmat lokmat sataryache pratisarkar pratisarkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वसंत भोसले

संपादक - लोकमत, कोल्हापूर 


Comments

  1. Dayanand Jagnnath Salunkhe- 25 Mar 2021

    माझे आजोबा तुफान सेनेत होते. माझे कडे आजूनही त्या वेळची कागद पत्र आहेत. मोबाईल नंबर 7709457925

    saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके