डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतीय समाजापुढील तातडीची आव्हाने

दहाव्या विचारवेध संमेलनात ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांनी लोकशाही राज्य, नागरिकत्व, विकास, मानवी समाज व सभ्यतेवर मूलगामी विवेचन केले. त्याबद्दल गंभीरपणे विचारमंथन होणे आवश्यक आहे. त्यांच्या भाषणातील शेवटचा भाग. 

भारतीय लोकशाहीचे वाढते अनारोग्य कोणत्या कारणांनी आहे? तर,

1] 'नागरिकत्वा' ची संकल्पना आणि त्यानुसार व्यवहार येथे रुजला नाही. आपण अजूनही 'प्रजानन' म्हणूनच वागतो. जो सत्ताधारी असतो त्यांच्यापुढे नमून असतो.

2] प्रौढ मताधिकार हा सर्व नागरिक समान असतात, या गृहीतकूत्यावर आधारलेला आहे. पण जातपात व स्पृश्यास्पृश्यता या आपल्या हाडीमाशी मुरलेल्या असल्याने आपले एकमेकांशी वागणे समानत्वाच्या भूमिकेमधून होत नाही.

3] राज्याने केलेले कायदे हे नागरिक या नात्याने आपणच केलेले असतात व त्यांचे पालन करण्यामधून नागरिकत्वाची भूमिका पार पाडण्याचे आपले कर्तव्य असते, ही जाण उत्पन्न झालेली नाही. सरंजामशाही समाजामध्ये 'बळी तो कान पिळी' हा न्याय असतो. जो बलिष्ठ असतो त्याची 'हम करेसो कायदा अशी भूमिका असते. आजचा रूढ  सामान्य व्यवहार पाहिला तर गरीब स्वभावप्रकृतीची माणसे कायद्याचे, नियमांचे पालन करतात. ती जास्त करून 'उगीच भानगड नको' या भीतीने, बरीच माणसे परिस्थिती सुधारली, बळ प्राप्त झाले, की शिरजोर बनून कायदा मोडतात; कायद्याला बगल देण्यात भूषण मानू लागतात. आपण सत्तावान बनल्याची त्यांच्या दृष्टीने ती खूण असते. आता, आपला सार्वत्रिक अनुभव असा की, "सरकारी-निमसरकारी नोकरी, मोठ्या कंपनीतली नोकरी, वड्या धेंडाकडील चाकरी ही त्या त्या व्यक्तींना सत्तावान बनविते. नोकरशाही ही, कुंपणानेच शेत खायला लागावे तशी, कायदा न पाळण्याला प्रोत्साहन देते; भ्रष्टाचार यातून फोफावत जातो. ज्याच्या हाती सत्ता असते तोही वृत्तीने, निष्ठेने नागरिक नसतो. इतरांवर सत्ता गाजविणे, सत्ता मिळविणे व तिच्यात भर टाकीत जाणे आणि सत्तेच्या जोरावर धन प्राप्त करून श्रीमंती थाटात व रुबाबात राहणे हे जवळपास एकमेव जीवन ध्येय बनते. 

कल्याणकारी राज्य नियोजनबद्ध विकास करण्यासाठी हजारो/लक्षावधी कोटी रुपये खर्च करणारे राज्य सर्वदूर पोचणारी नोकरशाही अस्तित्वात आणते. वशिलेबाजी, लाचलुचपत, भ्रष्टाचार सर्वत्र फोफावलेला आपणास आढळत असला तर मग नवल ते काय? पारंपरिक मनोवृत्ती व धारणांमुळे, नात्या गोत्यांतील, जातिजमाती मधील माणसांची कामे कायद्याला, नियमांना धरून नसली तरी, 'आपल्या' माणसांची म्हणून केली जातात; 'आपल्या माणसाला गैर असले तरी झुकते माप दिले जाते, हा अनुभव पण आपणा सर्वांचा आहे. लोकांची ही यावरून तक्रार असत नाही, असे अनुभवाला येते. कायदा-नियम पाळणारे, निष्पक्ष, चोख व कार्यक्षम प्रशासन असले पाहिजे हा आग्रह नसतो;  यासाठी रेटा उत्पन्न होत नाही. कारण नागरिक या नात्याने आपण राज्यसंस्थेशी खरोखर जोडले गेलेलो नाही. 

मूलभूत हक्क व नागरिक स्वातंत्र्ये भारतीय संविधानात आपण दाखल करून घेतली, पण समाधानकारक स्वरूपात व्यवहारात ती कार्यान्वित झाल्याचे आढळत नाही. जनसामान्यांचे हक्क, त्यांची स्वातंत्र्ये जास्त करून पायदळी तुडवली जात असतात. याबाबतचे चित्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये जास्त बटबटीत व निर्घृण बनत चालले आहे. याचे एक महत्त्वाचे कारण असे की. स्वार्थ साधीत असतानाही, सत्ता उपभोगत असतानाही सभ्यतेची, सुसंस्कृततेची पथ्ये सांभाळण्याचे संस्कार धुवून जात आहेत. 'जागतिकीकरण", ' उदारीकरण'  च्या घडामोडीने धुवून जाण्याची प्रक्रिया जास्त गतिमान झाली. कारण, खाजगी अभिक्रमाला, नफाधारित बाजारपेठी व्यवहारांना खुला वाव याचा, स्वार्थ साधायला मोकळे रान असा लहानथोर, सर्वांनाच अर्थ लागला आहे.

प्रातिनिधिक लोकशाहीखाली निवडणुकांना एक विशेष महत्त्व प्राप्त होते. कारण सत्ता कोणी राबवायची या प्रश्नाचे उत्तर त्याआधारे दिले जाते. पक्षपद्धती रूढ झाल्यानंतर, कोणत्या पक्षाच्या हाती राज्यकारभार असावा;  तर ज्या पक्षाला (वा पक्षाच्या आघाडीला ) संसदेत  बहुमत असेल त्या पक्षाच्या या आघाडीच्या हाती, असे उत्तर येते. लोकशाही म्हणजे 'बहूमताचे राज्य'  ही एक व्याख्याच बनल्यासारखी आहे.

वास्तव असे आहे की, निवडून येतात ते एका मर्यादित अर्थानेच  लोकप्रतिनिधी असतान, दोन निवडणुकांच्या दरम्यानच्या कालावधीत राज्यसंस्थे पकड कोणाची राहिल  हेच काय ते निवडणुकांनी ठरते. लोकशाहीमध्ये सत्तास्पर्धा गाभ्याशी असते. इतिहास असे सांगतो को, औपचारिकर दृष्टया घटना लोकशाही असते, निवडणुकाही होतात, आणि निवडणुकांच्या क आधारे निरंकुश हुकूमशाही /पक्षशाही प्रस्थापित होते. हे व्यवहारात पडते.

लोकशाही राज्य व्यवस्थेचे  आरोग्य ही गोष्ट सार्वजनिक जीवनात काही मूल्ये व संकेत, रीतिभाती व वागणू खोलवर रुजलेली असण्यावर,  यांच्या आधारे चालणाऱ्या जीवनाच्या सर्व लेखांत समर्थ स्वायत्त  सार्वजनिक संस्था कार्यरत असण्यावर मुख्येत्वे करून अवलंबून असते. राज्यसत्ता निरंकुश, बेबंद  व निघ्रून  न बनण्यासाठी यांची गरज आसते. हे जाळे राज्यसंस्थेला उखडून न टाकता येऊ नये, इतकी  सार्वजनिक संस्थांची पाळेमुळे जनजीवनात व लोकांच्या मनोधारणां मध्ये रुजलेली असयला लागतात. अशा संस्थांच्या कार्यामधून एक परंपराही निर्माण व्हायला लागते. केवळ  संस्थांची संख्या हे  गमक पुरेसे ठरत नाही. इंग्लंड अमेरिकेसारख्या काही देशांमध्ये स्वायत्त सार्वजनिक संस्थाचे जाडेही आहे. आणि पालाम परंपराही निर्माण झालेल्या आहेत. भारतात ब्रिटिश राजवटीच्या काळात स्वायत्त सार्वजनिक संस्थाची उभारणी अनेक क्षेत्रांमध्ये तत्कालीन नेत्यांनी केल्याचे आपल्याला आढळते. एक निरोगी, सदृढ , परंपराही आकारास येत होती. परकीय ब्रिटिश राजवटीवर अवलंबन नसावे  ही दृष्टी, व आग्रहहीं होता.  दुर्दैवाने, स्वातंत्र्य मिळाल्यावर कल्याणकारी राज्य' व  'नियोजनबद्ध विकास' या दोन घडामोडीमुळे  सरकारीकरणाचा  विस्तार जसा वाढत गेला, तो सार्वजनिक संस्था स्वायत्त पण क्षीण होत गेलं. नव्या  संस्थाची  उभारणी स्वबळावर करण्याकडे दुर्लक्ष झाले आणि 'समानवादा' ची. सर्व गोष्टी सरकारच्या हाती असाव्यात अशी गैर व्याख्या केली गेली.

नागरिकत्व ही इतकी सवंग सोपी गोष्ट नाही. तो एक गंभीरपणे पत्करण्याचा वसा आहे.  हक्क आणिस्वातंत्र्याची भाषा करीत मागण्यांचे संघर्षात्मक-राजकारण करण्यामधून नागरिकत्य व स्वायत्त नागरिक समाज यांची निर्मिती होतेच असे नाही. समाजाच्या योग्य व सुदूर धारणेच्या संदर्भातील आपली  कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी उचलून , आणि त्या  व्यवहारांद्वारा /कारभारात लोकशाहीला आधारभूत मूल्ये, संकेत, रीतिभाती पाळण्यातून  रुजणाऱ्या, बळकट होणाऱ्या  गोष्टी आहेत. राज्यसत्ता काबीज करण्याच्या उद्देशाने केलेले संघर्ष, लोकलढे , क्रांत्या  यांनी प्रसंगी सत्ता हाती येते पण त्यांमधून नागरिकत्व व नागरिक समाज यांची जोपासना क्वचित होते. राजकीय पक्षांना सत्तेत रस नसतो; वरील दोन गोष्टी मध्ये नसतो,  नागरिकत्व व नागरिक समाज यांच्या संवर्धनाचे काम वेगळ्याच प्रक्रियेद्वारे घडवावे लागते. गांधीनी याबाबतीत सैधन्तिक  व कृतीच्या द्वारे केलेले  योगदान अजोड आहे. त्या वाटेवरून वाटचाल करण्याची नितांत गरज आहे. 

संगणक, इंटरनेटचे महाजाल, इ.कॉमर्स आणि एकंदरीत त्या दिशेने आपण आणखी पुष्कळ प्रगती केली तरी मानवी व प्राणीजीवन हे पृथ्वीच्या एकंदर जीवन धारणा क्षेमतेवर नेहमीच  विसंबून राहणार. सर्व गोष्टी 'सिंथेटिक' (म्हणजे) कारखान्यांद्वारा रासायनिक संयुगांच्या स्वरूपात) निर्माण करण्याचे स्वप्न हे मृगजळच आहे. हीच गोष्ट जनुकीय अभियांत्रिकी बायोटेक्नोलॉजी यांच्यावर विंस ण्यात खरी आहे. निसर्ग सृष्टीचा पृथ्वीच्या पर्यावरण व्यवस्थेचा सर्वांगानी ऱ्हास  होत राहील; पण विज्ञान-तंत्रज्ञानामुळे  आपण अधिकाधिक संपन जीवन जगू शकू हा भ्रम  आहे. ही गोष्ट एव्हाना ध्यानात आली आहे. 

माणसाचे पृथ्वीशी व निसर्गसृष्टीशी एकपादरी नाते नाही. केवळ भौतिक गरजा भागविणारी उत्पादने विपुल प्रमाणात निर्माण करण्यासाठी पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा वापर करण्यापलीकडे कशाचा विचार करण्याची गरज नाही, अशा प्रकारे पैसा मिळवण्याच्या मागे लागलेल्या उद्योजकांचे जगभर वागणे होत आहे. पण हीच मंडळी देशो देशी पर्यटनासाठी जाऊन अमाप पैसा खर्च करतात. यांना आकृष्ट करण्यासाठी केली जाणारी जाहिरात बाजी पाहिली तर, निसर्गरम्य नितांत स्थळांची वर्णने करण्यावर, छायाचित्रे  छापण्यावर भर किती असतो हे पाहण्यासारखे आहे. तात्पर्य, माणसाची जडण घडणच अशी आहे की त्याचे, ज्यांना इंद्रियसुखे  म्हणतात तेवढी मिळाल्याने आंतरिक समाधान होत नाही. 

'जागतिकीकरण' 'उदारीकरण' चा सगळ्यांत निर्घृण  आघात पर्यावरणावर होत आहे. कारण सुखोपभोग वाढविण्यासाठी  जगभरची संसाधने ताब्यात येणयासाठी मोठी चढाओढ आहे. या चढाओढीत तळागाळ्याच्या  जनसमूहांची जीवनावश्यक असलेल्या नैसार्गिक  संसाधनांवरील पकड सुटते आहे. साथी पिण्याच्या पाण्याची गोष्ट घ्या, आजच 'स्वच्छ, शुद्ध पाणी' बाटल्यात पॉकबंद करून  विकले जात आहे. व याचा प्रसार सर्वत्र वाढत  आहे. भारतातल्या बहुधा सर्व तालुक्यांच्या गावी दुकानांमध्ये अशा बाटल्या मिळतात. म्हणजे त्यांना खप आहे. नद्या, विहिरी, तळी, ओढे  यांचे पाणी वाहत्या प्रमाणात प्रदुषित होत आहे. हे आपण रोज वर्तमानपत्रां मध्ये वाचतो, स्व:ताचे  आरोग्य जपण्यासाठी शिक्षित मध्यमवर्गीय माणसे घराबाहेर बातम्यातील पाणी पिऊ लागली आहेत. काही वर्षांनी अशी परिस्थिती येऊ  शकते की, भारतीय जनतेची विभागणी बाटल्यांतले पाणी पिणारे लोक  प्रदूषित पाणी पिण्याचा धोका पत्करल्या खेरीज  गत्यंतर  नाही असे लोक, अशी होईल, स्वच्छ पाण्याचे खात्रीलायक स्रोत खाजगी उद्योजक या ना त्या प्रकारे ताब्यात घेतीस ही प्रक्रिया जंगले, शेतजमिनी, पशुधन अशा सर्व नैसर्गिक (खनिजांसह) संसाधनांच्या बाबतीत होऊ शकेल. 

सामान्य लोकांच्या जीवनाचे आधार काढून घेणारी आणि मोठ्या  प्रदेशावरील निसर्ग सृष्टीला  उजाड करून टाकणारी प्रक्रिया विकासाच्या नावे भारतात वेगवान होत असल्याचे अनुभवाता येत आहेच. 

मन उदास व  विषण्ण करणारी पुढची गोष्ट अशी की  आपल्याच बांधवा पैकी  अनेक देशोधडीला लागताना दिसत असले तरी, स्वतःची धन होत असेल तर, बेदरकारपणे त्यापोटी इतरांचे बळी द्ययला –घ्यालला मागेपुढे न पाहणारी माणसे आन थेट खेड्यापाड्यात, लहान-मोठया गावामध्ये वाढताना दिसत आहेत. 

माणसांच्या आटोक्याबाहेर असलेली  भीषण नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, मोठ्या क्षेत्रावर पडणारा काही वर्षे टिकणारा दुष्काळ (अन्नाचे व पाण्याचे दुर्भिक्ष), रोगराईच्या मोठया साथी, महापूर, चक्रीवादळे, पुढे समाजाची नैतिक व्यवस्था  धोक्यात आणतात. व्यक्तिगत आणि सामाजिक, दोनी पायावर मानवी जीवनाचा पाया सतू-असत् विवेक, चांगुलपणा, सौहार्द व सहकार्य हाच  असतो. दैनंदिन  व्यवहारांमधून या मूल्यांचे प्रधान झाले की समाजाची धारणा  करणारी नैतिक व्यवस्था ढासळते. आज विकासवाद,  सुखोपभोगांचा हव्यास यांच्या पोटी एक शोषक विषम अर्थव्यवस्था जगभर इमारती गेली आहे. तिच्या तावडीतून पृथ्वीचा कोनाकोपराही अस्पर्श  राहिलेला  नाही. विज्ञान तंत्रविज्ञान ही शक्ती माकडाच्या  हातात कोलीत म्हणावे अशी विध्वंसक ठरत आहे. 

शंभर कोटींच्या भारतामध्ये जागतिक अर्व्यवस्थेची ही उधळलेली दौड माणसाचे रोजगार, त्यांचे पोटपाणी, त्यांची साध्ये, सुखसमाधान यांच्या बाबतीत घुमाकूळ घालीत आहे. ही व्यवस्था सगळ्याच गोष्टींकडे संसाधने , उत्पादनाघटक म्हणून बघते. माणसेही तिच्या लेखी त्यांची बुद्धी, कौशल्ये व श्रम  यांच्या अंगाने, 'उत्पादन घटक' असतात आणि उपभोक्तं म्हणूनही तो उत्पादित वम्तु विकत घेऊन त्यांचा फडशा पडणारी 'साधने'  व यंत्रेच  असतात. माणसाचे माणूसपण कमी करणारी, त्याला स्वता:च्या आंतरिक माणूस पणापासून परात्म बनविणारी ही व्यवस्था मानवीय ऋणानुबंधाचे पर्यावरण उध्वस्त  करणारीच  आहे. 

मानव जातीच्या इतिहासावर आपण नजर टाकली  तर एक विलक्षण, उदबोधक तथ्य नजरेला पडते. ज्या प्राचीन सभ्यता (सिव्हिलायझेशन्स) नष्ट झाल्या. त्या तत्कालीन अन्य संस्कृतीच्या तुलनेत अत्यंत प्रगल्भ, उच्चभ्रू, वैभवशाली व विकसित होत्या. म्हणजे असे की, त्या संस्कृतीमधील एक वरचा, पातळ सत्ताधारी वर्ग या स्थितीला पोचलेला होता. पण त्याच सभ्यतां मधील बहुसंख्य  लोक हे ' शूद्र-अतिशुद्र'  गणले  जात होते आणि त्यांच्या माणूस पणाला उणेपण यावे  अशा प्रकारचे जीवन त्यांच्या वाटेला होते. या सभ्यता साम्राज्यपादी, शोषक व लुटारू वृत्ती प्रकट करणाऱ्या होत्या. त्यांनी युद्धे उत्पन्ने केली;  हिंसा माजवली; विकारांचा  परिपोष केला आणि त्यांचे प्रदर्शनही मांडले. त्या नष्ट  होण्याचे मुख्य कारण सामाजिक व नैतिक अवस्था ढासळली हे  होते. म्हणून हे महासंकट आहे. 

हे  महासंकट, धर्मसंकट न निवारता आल्याने काही प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या. हे संकट नंतरच्या काळातही मानवी सभ्यतावर कोसळत राहिलेले आहे. समकालीन इतिहासतले एक ठळक उदाहरण सोविएत रशिया आहे. इतरही काही उदाहरणे नजरेसमोर येऊ शकतात,

आज भारतात सामाजिक-राजकीय विघटनाची प्रक्रिया पुष्कळच  पुढे गेली आहे. उच्चनीचभाव, विषमता आणि शोषण, नाना प्रकारची बंधने यांच्याविरुद्ध भारतातील जाती जमाती जागृत व संघटित होत आहेत. आणि लोकशाही राज्यव्यवस्थेच्या चौकटीत लाभ, अधिकार व सत्ता यांमध्ये स्वत :चा रास्त वाटा प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा विधायक अंगाने या सर्व  प्रक्रियेकडे एका मयादे पर्यंत पाहता पेते. 'इंडिया;  ए मिलियन म्युटिनीज  नाऊ' या शीर्षकाचे  पुस्तकच नोबेल पारितोषिक प्राप्त विख्यात कादंबरीकार नायपॉल यांनी लिहिले आहे. याच स्वातंत्र्योत्तर काळात इतरही गोष्टी घडत होत्या. यांपेकी  एका घडामोडीची / प्रक्रियेची मीमांसा या दिवंगत अर्थशास्त्रज्ञ प्रा. वि. म. स दांडेकर  यांनी  'अंतर्गत साम्राज्यवाद  वसाहतवाद यांचा आविष्कार' यां अंगाने केली होती.  ही फार महत्त्वपूर्ण मिमांसा होती. तिचा डाव्या विचारांच्या मंडळींकडूनही प्रतिवाद केला गेला, कारण दांडेकरांनी अर्थव्यवस्थेतीत संपदित कामगार -कर्मचारी वर्गाना, पांढरपेशा व्यावसायिक  वर्गाना, नोकरशाहीला गोषक वर्गात देशांतर्गत साम्राज्यसत्ते मध्ये, समाविष्ट केले होते. आणि त्याला तीन प्रतिक्रिया आली  होती.

आधुनिक समाजाचे व्यवहार हितसंबंधी,संघटना धिष्टीत स्वार्थ साधनाये स्पर्धात्मक स्वरूपाचे असतात,  हा आधुनिकतेच्या गाभ्याशी असलेल्या व्यक्तिवादाचाच सामूहिक आविष्कार म्हणता येईल, या एकंदरीत अटीतटीच्या स्पर्धा  मधून अनेकांची भरभराट व उत्कर्ष साधती  हे खरे, पण इतर कित्येकांना  अस्थैर्याला , परिस्थिती ढासळण्याला सामोरे जावे लागले, यामुळे समाजातला फुटीरपणा  व  अंतर्गत कलह वाढला जातो. त्यातच जर भौतिक जीवनात बेरोजगारी वाढत असेल, उत्पन्न ढासळत असल्यामुळे असुरक्षित व अस्थिर  वाटत असेल, गर्दी-गोंगाटमय जीवनामुळे,स्पर्धा तीव्र झाल्यामुळे  सहनशीलतेवर असह्य ताण उत्पन्न होत असेल, तर हिंस्रता वाढते, माणसे हिंसाचार करण्यासाठी निमित्ताला टेकल्यासारखी होतात. भारतात भाषा, धर्म, यांच्यामुळे उत्पन्न होणारे भेद  ताणतणावही भरीला आहेच.

या सगळ्या कारणांमुळे भारतात एक अत्यंत  स्फोटक व नाजूक स्थिती निर्माण झालेली आहे. यातच आपापले (आर्थिक व सामाजिक) स्वार्थ साधण्यासाठी हिंसेचा वापर करण्याची नीती काही पक्ष बुद्ध्या अवलंबित आहेत, हिंदुत्ववादी, नक्षलवादी, इतरही काही आतंकवादी संघटना यांचे लक्ष्य  त्यांच्या व्यूहरचनेनुसार वेगळी  समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याचे आहे. तसा त्यांचा दावा आहे. पण व्यवहारात त्यामुळे फुटीरपणा वाढत आहे आणि समाजाचे ऐक्य तुटत आहे.

तत्ववेत्ते  चार्लस टेसर यांनी म्हटले आहे की सर्व मोठ्यालोकसंख्या असलेल्या. बहुजिनसी, व्यामिश्र समजामध्ये अनेक कारणांनी फुटीरपणा वाढविणारे भेद, ताणतणाव  व कलह उत्पन्न होत असतात. आणि ही त्यांची स्वाभाविक स्थिती मानायला हवी. यामध्ये आज जातिजमातीच्या लोकसमूहाच्या अस्सल अस्मितांच्या प्रकर्षामुळे भर पडली आहे.   व पडत  राहणार जाहे. यामुळे तो  विघटनाचा धोका उत्पन्न होतो त्यावर मात करण्याचे, ब्रहुत अनेकजिन्सी  समाजांच्या  ऐक्य दृढ राखणाचे विशेष आव्हान कायम  उपस्थित असते. भारताच्या संदर्भात ही गोष्ट फारच  खरी आहे.

भेद, ताणतणाव, कल-संघर्ष यांचे पूर्ण निर्मूलन करणे आणि एकमुखी ऐक्य - उदाहरणार्थ, भारतीय लोकसंख्येला त्यांच्या त्यांच्या विभिन्न भाषा, धर्म टाकायला लावून एकभाषिक,  एकधार्मिक, बनवणे,  प्रस्थापित करणे ही गोष्ट अशक्यही आहे आणि टेलर असे म्हणतील की, अनिष्टही आहे. कारण दडपणूक, हिंसा, अत्याचार यांच्या निघृण  वापरा मधूनच असे निर्मुलन शक्य होणार आहे.  'शत्रू विरुद्ध, प्रसंगी युद्ध  उत्पन्न करून समाजाची एकजूट करू पाहणे हा  प्रयोग काही वेळा केला जातो. पण तो फार काळ परिणामकारक राहात नाही. हे आव्हान झेलायचे  सगळ्या समाजाला, भेद, ताणतणाव व कलह  मर्यादांमध्ये राखत त्याचे ऐक्य दृढ  राखावायला एकत्र आणता यावे लागते,. ब्रिटिश राजवटीच्या काळात स्वातंत्र्य हे असे ध्येय  होते. स्वातंत्र्य, समता, न्याय, आर्थिक ,समृद्धी  सेक्युरिझम अशा मूल्यांच्या पायावर एका नव्या समाजाची उभारणी करण्याचे स्थान (युटोपिया) हे भारतीय समाजाचे ऐक्य दृढ  राखायला  प्रेरक ठरेल, इतके भव्यदिव्य आहे. पण असे पेय या स्वप्न परिणामकारक व प्रेरक ठरण्यासाठी, आपण सगळे एकसमाज आहोत, ही  भावनिक  व पायाभूत भावना समाजात रुजलेली असावी लागते. ती भावनाच पुरून  जाईल आणि आपण कधी एका समाजाचे नव्हतो  व आजही नाही,  ही भावना उत्पन्न होईल, या प्रकारचे अस्मितांचे राजकारण-समाजकारण अस्सलते च्या, 'सच्चेपणा' च्या नावाने जर जोपासले जात राहिले, तर तो भारतीय समाजाचा द्रोह करणे ठरेल.

जगाच्या  अनेकानेक देशांमध्ये भारत त्याचे मानाचे स्थान का घेऊ  शकत नाही? त्याचा पुरुषार्थ दिपवून टाकणारा का होत नाही. आजच्या भारतीय समाजाकडे  पाहिले तर, येथील उच्चशिक्षित पांढरपेशा उच्च -मध्यम वर्गाच्या ठायी  आत्मविश्वासाचा  अभाव,पश्चात्यांसमोर गुडघे टेकवण्याची, गुलामीची व अनुकरणाची वृत्ती यांचा अलीकडच्या काळात प्रकर्ष होत चाललेला आढळतो  त्यामुळे गुणसंपदा, कौशल्य क्षमता,याबाबतीत कोणत्यही प्रकारे कमी नसून  आपली अनेक क्षेत्रांमधील कामगिरी दुय्यम –तिय्यम  स्वरूपाची राहिली आहे. 

या अंगाने पाहिल्यास, भारतीय लोकांच्या आत्मविश्वासाचे व पुरुषायांचे जागरण करणे  आणि समाजाचे उत्थान घडवून  आणणे हे  एक तातडीचे आव्हान  आहे. आपसे मोठे भाग्य असे आहे की, गेल्या दीडदोनशे वर्षांच्या काळात, थोर  व्यक्तींची अशी एक मालिकाच या देशात होऊन गेली. त्यांचे व्यक्तित्व, चरित्र य जीवनकार्यापासून आपणास हे आसान पेलण्याची प्रेरणा व बळ प्राप्त होऊ शकते. आणि त्या अशा थोर व्यक्ती होत्या. ज्या भारतातील सर्व जाति धर्माच्या , भाषांच्या नि स्थानिक संस्कृतीच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची गोष्ट करीत होत्या. ही परंपरा केवळ गेल्या दीड दोनशे वर्षांपुरती मर्यादित नाही. त्यात संत कवीपैकी पण अनेक व्यक्ती आहेत, आणि प्राचीन काळातील ऋषिमुनी व महात्मे पण आहेत.  

दुर्दैव असे की, आपण या थोर व्यक्तीच्या नावांचा उपयोग आपापसांतील फाटाफूट व हेवेदेवे वा वाढ विण्यासाठी करीत आहोत.  बहुविध पण एकात्म असा आपला वारसा आत्मसात करून, व्यक्तिशः आपणास रुचेल  त्या व व्यक्ती पासून  प्रेरणा घेऊन आपण निवैर वृतीने  बंधुभाव  जोपासत, एकजुटीने आपल्या समोरील आव्हाने झेलण्यासाठी  दृढ संकल्प करूया, असे मी आपणा सर्वांना नम्र  आवाहन करतो आणि यासाठी आवश्यक ती  आंतरिक शुद्धता  आणि  अंतः सामर्थ्य  आपणा सर्वांना प्राप्त होवो  अशी प्रार्थना करतो.

Tags: सिव्हिलायझेशन्स उदारीकरण जागतिकीकरण कल्याणकारी राज्य मुलभूत हक्क प्रौढ मताधिकार नागरीकत्व भारतीय समाजा पुढील आव्हाने वसंत पळशीकर Fandametal Rights Proudh Mathadhikar Citizznship Bhrtiy Samaja Somoril Aavhane Vasaant Palshikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके