डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विसंगती व सुसंगती समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक

या पुस्तकाचे प्रयोजन सांगताना संपादक सन 2000 मधील एक प्रसंग उल्लेखतात. तेव्हापासून हा विषय त्यांच्या मनात घोळत होता. हे पुस्तक करायला घेईपर्यंत मराठीत नवमध्यमवर्गाची चिकित्सा करणारे एकत्रित लेखन प्रसिद्ध झाले नव्हते. मध्यमवर्गाची व्याख्या कशी करायची याचा ऊहापोहही प्रस्तावनेत केला आहे. म्हणजे उत्पादनाची साधने ज्यांच्यापाशी आहेत असा कारागीरवर्ग, डॉक्टर, वकील असे व्यावसायिक व शिक्षक, सरकारी किंवा खासगी आस्थापनांत नोकरी करणारे नोकरपेशा लोक- हे सर्वसाधारणपणे मध्यमवर्गात मोडतात.  अर्थात मुख्य निकष आर्थिक आहे आणि किती उत्पन्न असले म्हणजे मध्यमवर्गीय मानावे, हे निकष वेळोवेळी बदलत असतात. तसेच आजचा मध्यमवर्गीय अनेक स्तरांवर विभागला गेला आहे. म्हणजेच त्याचे स्वरूप आणखी व्यामिश्र झाले आहे. म्हणूनच या पुस्तकाची विभागणी त्यांनी पाच भागांत केली आहे.

अवाढव्य वाढलेल्या भारतातील मध्यमवर्गाला समजून घेण्यासाठी ‘मध्यमवर्ग : उभा, आडवा, तिरपा’ या राम जगताप यांनी संपादित केलेल्या पुस्तकात खरोखरच उभी, आडवी व तिरपी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. ही चिकित्सा वाचताना कधी कधी हा मध्यमवर्ग समजल्यासारखा वाटतो, तर कधी कधी तो समजण्यापलीकडील वाटत रहातो. हेही लक्षात घेतले पाहिजे की, मुख्यत: महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचे चित्रण व विश्लेषण या पुस्तकात आहे. 

भारतात मध्यमवर्गाचा उगम ब्रिटिशराज सुरू झाल्यानंतरच झाला आहे. नव्या राज्यकर्त्यांना एवढ्या मोठ्या देशावर आपले राज्य चालवण्यासाठी त्यांचे कायदेकानून, पद्धत, तसेच त्यांची भाषा जाणणारे काही चाकरमानी स्थानिक रयतेपैकीच असणे गरजेचे होते. म्हणून राज्यकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन पाश्चिमात्य शिक्षणपद्धतीचा अंगीकार केला गेला. त्यातून कारकून, युद्धात इंग्रजांच्या वतीने लढण्यासाठी फौजी आदी तयार झाले. 

भारतीय समाजातील जातवास्तव असे होते की, उच्च जातींची आकांक्षा उच्च स्थाने भूषवण्याचीच होती. त्यामुळे नव्या व्यवस्थेत आवश्यक असणारे वकील, डॉक्टर्स हे व्यवसाय उच्च जातींनी पटापट अंगीकारले. भारतात औद्योगिक प्रशाला काढण्यास इंग्रजांचा कट्टर विरोध होता. पण स्थानिक जनतेची मागणी म्हणून काही थोड्या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालये निघाली. तिथेही उच्च जातींनी शिक्षण घेऊन त्याही क्षेत्रात नोकऱ्या पटकावल्या होत्या.

स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा एक छोटासा मध्यमवर्ग होता; जो बराचसा उच्च जातीय होता. मुंबईवासी इतर जाती, जसे की- पाठारेप्रभू, पाचकळशी, चौकळशी वगैरे- जातींतही उच्चशिक्षित मध्यमवर्गीय समाज निर्माण झाला होता. पण त्यांची संख्या अल्प होती. उच्च जातीय मध्यमवर्गाचे नातेवाईक खेडोपाडी होते, पण त्यांची आकांक्षा उच्चशिक्षण घेण्याचीच होती. त्यासाठी शहरात येऊन, आपल्या मध्यमवर्गीय नातेवाइकांकडे वाराने जेवून आपले शिक्षण पूर्ण करण्याची एका अर्थाने चळवळच सुरू होती. गांधीहत्येनंतर झालेल्या जाळपोळीनंतर व ‘कसेल त्याची जमीन’ या जमीन सुधारणेनंतर या चळवळीने वेग पकडला. शहरातील निम्नवर्गीय उच्च जातीयही या ‘विद्याभिलाषी’ मुलांना निदान आठवड्यातून एकदा जेवू घालणे आपले कर्तव्य समजत होता. 

अशा तऱ्हेने उच्च जातीय मध्यमवर्गाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत गेली. भारताच्या बाबतीत आणखी एक बाब जाणवते. ती म्हणजे, मध्यमवर्ग किंवा कामगारवर्ग शहरात जरी आला तरी त्याचे आपल्या कुटुंबाशी व पर्यायाने जातीशी संबंध कधीही तुटले नाहीत. म्हणूनच आज कोरोनाच्या साथीतही अनेक लोकांनी गावी धाव घेतली. हळूहळू ज्यांच्यासाठी गावी काहीच नव्हते, उदा.- ब्राह्मण किंवा सीकेपी- त्यांना शहरात येऊन समाजसुधारणेत अग्रभाग घेणे सुलभ गेले. मध्यमवर्गावर त्यांची सांस्कृतिक पकड घट्ट होती. ऐंशीच्या दशकापर्यंत ही साधी, सरळ मध्यमवर्गीय संस्कृती महाराष्ट्रात होती. याचा विस्तृत आढावा राम जगताप यांनी त्यांच्या प्रस्तावनेत घेतला आहे. कौतुक वाटले ते म्हणजे- त्यांनी हा आढावा हिंदी, इंग्रजी व अर्थात मराठीत कवितांसग्रह, आजवर काय लिहिले गेले आहे, त्या सर्व लिखाणाचा घेतला आहे. 

नव्वदच्या आर्थिक सुधारणांनंतर सगळेच बदलले. पुस्तकात घेतले गेलेले लेख मुख्यतः या नवमध्यमवर्गावर आहेत. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे फक्त शेजवलकरांचा लेख जुना आहे. त्याचे कारणही संपादकाने दिले आहे. ते म्हणजे, शेजवलकरांनी पुराव्यांसहित केलेली सविस्तर मांडणी की, समाजाचे नेतृत्व करण्याची कुवत मध्यमवर्गात असते म्हणून त्यांची सामाजिक नीतिमत्ता तपासण्याची गरज असते, ही होय. त्यांची संख्या जरी शेजवलकरांच्या वेळेस आठ-नऊ टक्के व आज 20 टक्क्यांच्या वर असली तरी त्यांचे सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रांत अनुकरण समाजात मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यांच्या या मताशी ज्ञानदा देशपांडे व अभय टिळक सहमत होताना दिसतात. 

या पुस्तकाचे प्रयोजन सांगताना संपादक सन 2000 मधील एक प्रसंग उल्लेखतात. तेव्हापासून हा विषय त्यांच्या मनात घोळत होता. हे पुस्तक करायला घेईपर्यंत मराठीत नवमध्यमवर्गाची चिकित्सा करणारे एकत्रित लेखन प्रसिद्ध झाले नव्हते. मध्यमवर्गाची व्याख्या कशी करायची याचा ऊहापोहही प्रस्तावनेत केला आहे. म्हणजे उत्पादनाची साधने ज्यांच्यापाशी आहेत असा कारागीरवर्ग, डॉक्टर, वकील असे व्यावसायिक व शिक्षक, सरकारी किंवा खासगी आस्थापनांत नोकरी करणारे नोकरपेशा लोक- हे सर्वसाधारणपणे मध्यमवर्गात मोडतात. 

अर्थात मुख्य निकष आर्थिक आहे आणि किती उत्पन्न असले म्हणजे मध्यमवर्गीय मानावे, हे निकष वेळोवेळी बदलत असतात. तसेच आजचा मध्यमवर्गीय अनेक स्तरांवर विभागला गेला आहे. म्हणजेच त्याचे स्वरूप आणखी व्यामिश्र झाले आहे. म्हणूनच या पुस्तकाची विभागणी त्यांनी पाच भागांत केली आहे - 1. उदय, वाढ आणि विस्तार, 2. जीवनशैली आणि मूल्यबदल, 3. आव्हाने व आवाहने, 4. राजकीय जाणीवजागृती आणि 5. नवमध्यमवर्ग व त्याचे राजकारण. या प्रत्येक विभागात प्रत्येकी साधारणपणे पाच-सहा लेख आहेत. 

‘उदय, वाढ आणि विस्तार’ हा पहिला विभाग वाचताना स्पष्ट होत जाते की, मूलतः छोटा व आकांक्षांनीही छोटा असणारा मध्यमवर्ग मनात मात्र अनेक गंड ठेवून जगत होता. नव्वदच्या दशकापर्यंत महाराष्ट्रातील मध्यमवर्गात भ्रष्टाचार करण्याबद्दल मनात एक प्रकारची भीड असायची. ज्या प्रकारे उत्तरेत ‘उपर की आमदनी’विषयी उघड चर्चा असायची, तशी इकडे असली तरी ती दबक्या आवाजात असायची. आकर्षण असावे, कारण महाराष्ट्रातील समाज अगदी झपाट्याने उत्तरेच्या खांद्याला खांदा भिडवू शकेल, इतका भ्रष्टाचारी झाला. 

दुसरा गंड होता, तो इंग्रजी फाडफाड बोलता न येण्याचा! तोही मराठी शाळांकडे पाठ फिरवून, कुठल्याही इंग्रजी शाळेत घालून आणि त्यामुळे ना मराठी संस्कृतीशी नाळ जोडलेली, ना उत्तम इंग्रजी वाचणारी पिढी निर्माण करून साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र संगणकशास्त्राने मराठी मध्यमवर्गाला चांगली साथ दिली. पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाने सरकारी नोकरीत असणाऱ्या मध्यमवर्गाच्या आवाक्यात अनेक गोष्टी आल्या. जशा की- परदेशप्रवास, सहजगत्या विमानप्रवास, घरात चारचाकी येणे, तरुण वयातच कमीत कमी ‘टू-बेडरूम किचन’ची सदनिका खरेदी करणे शक्य होणे इत्यादी. 

नीरज हातेकर व राजन पडवळ म्हणतात की, ‘यूपीए सरकारच्या आर्थिक यशाने त्या सरकारचा बळी घेतला.’ त्याची त्यांनी अनेक कारणे दिली आहेत. त्यातील महत्त्वाचे वाटले ते म्हणजे- आर्थिक वाढीला काबूत ठेवण्यासाठी जी संस्थात्मक बांधणी किंवा बदल होणे आवश्यक होते, ते बदल यूपीए सरकार करू शकले नाही किंवा त्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. याच विभागात विनोद शिरसाठ, सुहास पळशीकर व पवन वर्मा यांचा अनुवादित, हेही लेख आहेत. 

या तिन्ही लेखांची मांडणी मध्यमवर्गावर टीका करणारी आहे. सर्वसाधारणपणे या तिघांचे म्हणणे थोडक्यात सांगायचे तर, उदारीकरणाचे लाभ उठवून या मध्यमवर्गाकडे समृद्धी आली आहे. समाजातील इतर सुधारणा आपोआप व्हाव्यात, अशी अपेक्षा असल्यासारखी त्यांची वर्तणूक आहे. म्हणजे थोडक्यात, इथून पुढे भारताला प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणावरील बजेट वाढवायला हवे, तरच दर्जेदार शिक्षण मिळून प्रशिक्षित कामगार किंवा तज्ज्ञ समाजाला मिळतील. एकीकडे त्यागाचे आकर्षण, जुन्या मूल्यांचे आकर्षण बाळगायचे, पण आपलीच मुलेबाळे जुन्या पिढीच्या त्यागाबद्दल अज्ञानी असून त्याची खंतही बाळगायची नाही; चंगळवादाला नावे ठेवत आपणही तोच मार्ग अनुसरायचा- अशी दुटप्पी जीवनपद्धती या मध्यमवर्गाची झाली आहे. 

पवन वर्मा म्हणतात की, सामाजिक कार्यासाठी यांच्याकडे पैसा नसतो. पण हे सर्वस्वी खरे नाही. कारण समाजातील श्रीमंतवर्ग सगळ्याच राज्यकर्त्यांना वर्गणी देऊन खूश ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण मध्यमवर्गाला जर आपला पैसा योग्य ठिकाणी व योग्य कार्यासाठी पोचेल याची खात्री असली, तरच तो पैसा देतो. या नवमध्यमवर्गातील हा सुब्रह्मण्यम, हा नायर, हा माथुर, तर हा मल्होत्रा- हे भेद आजच्या घडीला मिटले आहेत. 

शिरसाठ म्हणतात की- पन्नास-साठीची पिढी अनेक गोष्टी फार विश्वासाने नाही, तरी स्वेच्छेने, वाडवडील करत म्हणून करत असे. पळशीकर यांचा लेख 2003 मधला आहे. त्यांनी मध्यमवर्गाच्या राजकीय जाणिवांचा वेध अचूक घेतला आहे. त्यांच्या मते, ‘आपल्या पारंपरिक वर्चस्वाला उभी राहणारी आधुनिक आव्हाने परतवताना हे समाज (ब्राह्मण व इतर उच्चवर्णीय) वारंवार इतिहास, धर्म, भाषा यांच्या सोईस्कर रणभूमीवर जाऊन थडकलेले दिसतात.’ त्यांचे म्हणणे- यातूनच भाजपचा मतदार निर्माण होणार आहे. हा वेध अचूकपणे त्यांनी 2003मध्ये घेतला आहे. त्यांचा आणखी एक लेख पुस्तकात आहे, त्यात या संबंधी सविस्तर विश्लेषण आहे.   

‘जीवनशैली आणि मूल्यबदल’ या दुसऱ्या विभागात लिहिताना, सुरुवातीलाच अभय टिळक मध्यमवर्गावर टीकेची झोड उठवतात. ते म्हणतात तसा मध्यमवर्ग कातडीबचाऊ आहे, पण त्याच वेळेस जगातील सगळ्या क्रांत्यांचे पुढारपण मध्यमवर्गानेच केले आहे. त्यात नवलही काही नाही, कारण निम्नस्तरावरील लोकांची ताकद जिवंत राहण्याच्या झगड्यातच संपून जाते. आहे ती व्यवस्था चालू ठेवण्यातच वरच्या वर्गाचे हित असते. समाजसुधारणेच्या सगळ्या चळवळी मध्यमवर्गच चालवतो. त्यांची संख्या अल्प असेल, पण त्यातील सच्चेपणा त्याच्या मनाला भिडला तर तो मोठ्या प्रमाणावर त्याच्या पाठीशीही उभा राहतो. 

अरुण टिकेकरांचा छोटासा लेख मध्यमवर्गाच्या बचतीच्या अतिरेकावर टीका करतो. बचत केली म्हणजे आपला वृद्धापकाळ चांगला जाईल, या विचारातील फोलपणा ते दाखवतात. मध्यमवर्गाला ‘बुद्धिजीवी’ म्हणणे कसे अयोग्य आहे, हे मुकुंद टाकसाळे उलगडून सांगतात. त्यांच्या मते, शारीरिक श्रमांपासून फारकत घेतलेला हा वर्ग याला ‘मसिजीवी’ म्हणजे शाईवर जगणारा वर्ग असे म्हणणे योग्य ठरेल. ज्ञानदा देशपांडे यांना ‘अमेरिकन हावरटपणा व भारतीय दुटप्पीपणा यांच्या उथळ मिश्रणातून’ नव्या मध्यमवर्गाची मूल्ये उलगडताना दिसतात. 

तिसरा विभाग ‘आव्हाने व आवाहने’ याची चर्चा करतो. यातील त्र्यं. शं. शेजवलकर यांचा 1962 चा लेख त्यातील दृष्टिकोनामुळे उद्‌बोधक आहे. ते म्हणतात की, लोकहितवादींनी संपूर्ण समाजहिताचा विचार केला होता. पण पुढे चिपळूणकर, रानडे, भांडारकर, टिळक, आगरकर यांनी इंग्लंडमधील व्यक्तिवादी संप्रदायाची भलावण करत वैयक्तिक सुधारणेकडे जास्त लक्ष दिले. यामुळे त्यांच्या विचारक्रांतीचा फायदा त्यांची कुटुंबे व त्यांचा समाज यांनाच झाला. याला 95 टक्के बहुजन समाज पारखाच राहिला. यामुळे ब्राह्मण समाजाचा जात्याभिमान तसाच राहिला. ‘आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय?’ या वादामुळे व त्यात टिळक-चिपळूणकर पंथीयांची सरशी झाल्यामुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले, असे शेजवलकर म्हणतात. प्रस्तुत लेखिकेचेही हेच मत आहे. 

राजकीय व सामाजिक सुधारणा या नेहमीच हातात हात घालून चालल्या पाहिजेत, कारण सामाजिक कुप्रथांवर सतत बोलून व सुधारणा करत राहिल्याशिवाय आपोआप त्या घडतील असे नाही. यावर भाष्य सुहास पळशीकर यांनी पुढे केले आहे. भा.ल. भोळे, अरुण टिकेकर व पळशीकर या तिघांनीही मध्यमवर्गाच्या संकुचितपणावर भाष्य केले आहे. आजची परिस्थिती समजून घेण्यास ते उपयुक्त ठरते. 

भारत ही इंग्लंडची वसाहत असल्याने व त्यांना त्यांचे राज्य चालवण्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्यामुळे; तिथे सोळाव्या-सतराव्या शतकापासून विकसित झालेले वैज्ञानिक ज्ञान व सामाजिक मूल्यव्यवस्था आपल्याकडे इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या उच्चवर्णीय व उच्चवर्गीय पुरुषांनी आत्मसात केली. स्त्रीला स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे निर्णय-प्रक्रियेत काहीही स्थान नव्हते. यातील काही पुरुष उदात्त भावनेने, मानवी समानतेच्या भावनांनी प्रेरित झाले असले तरी, बहुसंख्य सुशिक्षित मध्यमवर्ग राज्यकर्त्यांच्या जवळ जाऊन आपला लाभ जास्तीत जास्त कसा करून घेता येईल याच्याच मागे होता. मात्र प्रस्थापित हितसंबंध व शिक्षणामुळे झालेला आधुनिक मूल्यांचा परिचय यामुळे हा वर्ग साम्राज्यशाहीविरोधी झाला. त्यामुळे राष्ट्रीय चळवळीत त्याने पुढाकार घेत सर्वसामान्य लोकांपर्यंत स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्ट पोचवली. परंतु सामाजिक चळवळीत भाग घेऊन स्वतःचे उच्च स्थान गमावण्याची तयारी बहुसंख्य उच्च जातीय मध्यमवर्गाची नव्हती. म्हणूनच कदाचित टिळक-चिपळूणकरांचा विचार यशस्वी झाला असावा. त्यामुळे सामाजिक सुधारणा करणारे काही व या सुधारणांना विरोध करणारे बहुसंख्य- अशी स्थिती स्वातंत्र्यानंतर बराच काळ राहिली. म्हणूनच ‘हिंदू कोड बिला’ला त्या काळी मोठा विरोध झाला. फक्त नेहरूंचा ठाम पाठिंबा व विश्वास आणि त्यांच्या सहकाऱ्यांची साथ, यामुळे ‘हिंदू कोड बिल’ तुकड्या-तुकड्याने का होईना, पास झाले. 

पळशीकरांचे पुढील विश्लेषणही सध्याची स्थिती समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. हा उच्चवर्णीय-उच्चवर्गीय मध्यमवर्ग शिक्षणामुळे व स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे राज्यकर्त्या वर्गाजवळ, तसेच भांडवलशाही वर्गाजवळही होता. स्वतःची प्रागतिक प्रतिमा जपण्यासाठी सार्वजनिक अवकाशात समतेचा पुरस्कार करणे त्याला आवश्यक होते आणि गुणवत्तेचा आग्रहही धरणे सोईचे होते. कारण या तत्त्वामुळे ‘मागे’ राहणाऱ्यासाठी फार काही करण्याची जबाबदारी येत नाही. 

मध्यमवर्गाचे दुसरे लाडके तत्त्व व्यक्तिस्वातंत्र्याचे! त्यामुळे जीवनशैली, नीतिमूल्ये, सामाजिक जबाबदारीचे भान, कर्तव्याची कल्पना यांचा समावेश सोईस्करपणे ‘खासगी अवकाशात’ करता येतो. धर्म, जात, अंधश्रद्धा यांचाशी निगडित प्रश्न मग ‘खासगी’ ठरवता येतात. मध्यमवर्गात उच्चजातींचे बराच काळ प्रभुत्व होते. आता हळूहळू इतर जातींचे प्रमाण मध्यमवर्गात वाढू लागले असले तरी, पळशीकरांच्या मते मध्यमवर्गाची जडण-घडण ब्राह्मणी आहे व त्यांची जीवनदृष्टी ब्राह्मणी-हिंदू आहे. 

या मध्यमवर्गाची 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणांमुळे भरभराट झाली व ‘नाही रे’ वर्गातील लोकांसाठी काही करण्याची तोंडदेखली गरजही त्याला वाटेनाशी झाली. या मध्यमवर्गाच्या ढोंगीपणामुळे आधीही दारिद्य्रनिर्मूलनाचे प्रयत्न मनापासून झाले नव्हते, आता तर खासगीकरणाच्या नावाखाली सगळेच सामाजिक सुरक्षा कायदे मोडीत काढणे त्याला वावगे वाटत नाही. या अवधीतच 80 टक्के असणारा हिंदू धर्म धोक्यात असल्याची जाणीव त्याला झाली आणि लालू-मुलायमसिंह यांच्या गावठी उच्चारांना हसणारा मध्यमवर्ग साध्वी ऋतंभराची असंस्कृत भाषणे मजा घेत ऐकू लागला. याच काळात या मध्यमवर्गाची महत्त्वाकांक्षा आपल्या मुलांनी ‘अमेरिकेला’ जाऊन स्थाईक व्हावे, अशी झाली. तिथून याच मध्यमवर्गाची माणसे देशभक्त हिंदू होऊन, देशातील हिंदुत्ववादी शक्तींना बळ पुरवत असतात. आता यांची संख्याही मोठी आहे व देशातही हिंदुत्ववादी शक्ती सत्तेवर आहे. 

‘मध्यमवर्ग आणि जाणीवजागृती’ हा पुस्तकाचा पुढील भाग आहे. यात राजा दीक्षित यांनी 19व्या शतकातील मध्यमवर्गाच्या जाणिवा कशा विकसित होत गेल्या याचा आढावा घेतला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यावर 1888 मध्ये सर सय्यद अहमद यांनी विचारलेला प्रश्न की- बंगाली लोक व महाराष्ट्रीय ब्राह्मण याखेरीज या सभेत पारित केलेल्या ठरावाचा फायदा अन्य कोणाला होणार आहे?; फुले यांचा विरोध व भालेकरांनी काँग्रेससमोर जाळलेला शेतकऱ्याचा पुतळा, या गोष्टी काँग्रेसचे वर्गीय चरित्र स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. काँग्रेसच पुढे मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिबिंब करणारी संस्था ठरली. राजेंद्र वोरा, हर्षद भोसले व सुहास कुलकर्णी हे नव्वदीनंतर उदयास आलेल्या नवमध्यमवर्गाची परखडपणे चिरफाड करतात. 

या सर्व विवेचनात मला मोठी त्रुटी जाणवली. ती म्हणजे, डाव्या चळवळींची इथे काहीच चिकित्सा नाही वा एकही लेख या चळवळींवर समाविष्ट झालेला नाही. डावी चळवळ सामान्य लोकांचे हित, कामगारवर्गाचे हित, स्त्रियांचे प्रश्न, यावर बोलत असली तरी ती मुख्यतः मध्यमवर्गीय लोकांनीच चालवलेली, मध्यमवर्गात प्रतिष्ठा असलेली होती. तिचा प्रभाव काँग्रेसवर मोठ्या प्रमाणावर पडला होता. संविधान सभेत त्यांची संख्या मर्यादित असेल, पण त्यांनी प्रपादिलेल्या मूल्यव्यवस्थेचा प्रभाव भारतीय समाजमनावर पडलेला होता. म्हणूनच संविधानात या मूल्यांचे प्रतिबिंब दिसते. आणि आजही गरिबांचा कळवळा दाखवल्याशिवाय कुठलाही पक्ष निवडून येत नाही. यात दुटप्पीपणा आहे, तरीही तो करण्याची आवश्यकता आतापर्यंत भासत होती. सध्याच्या कोविड-19च्या काळात मात्र सरकारच्या लेखी ही संवेदनशीलता अनावश्यक आहे की काय, असा प्रश्न पडू लागला आहे. 

शेवटचा विभाग ‘नवमध्यमवर्ग व त्याचे राजकारण’ यावर आहे. कुमार केतकर, एकनाथ साखळकर, प्रकाश बाळ, अजित नरदे व राजेश्वरी देशपांडे यांचे लेख या विभागात आहेत. केतकर वर्णन करतात त्याप्रमाणे जमीन किंवा कारखान्यांचे मालक नसले तरी, नोकरशहांच्याच हातात खरी सत्ता असते. म्हणजे या नोकरशाहीकडे अधिकार होते, परंतु उत्तरदायित्व नव्हते. तो शेती व औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनयंत्रणेचा भाग नव्हता, पण त्या उत्पादनावर व वितरणव्यवस्थेवर त्याचे नियंत्रण होते. भांडवलदार व शेतकरी, शेतमजूर व कामगार या नोकरशाहीपुढे लाचार होते. थोडक्यात, मालक नसून सर्व अधिकार काबीज करणे व त्यामुळे भ्रष्टाचार करून मोठी साधनसंपत्ती स्वतःच्या अधीन करून घेणे या मध्यमवर्गाला साध्य झाले. याच वर्गात केतकर म्हणतात की, भाजपचे पाठीराखे पूर्वापार होते आणि मध्यमवर्ग जसा मोठा होत गेला तसे ते वाढत गेले. या 2004 मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, या मध्यमवर्गाच्या गढीला गरीब व वंचित लोकांच्या उठावामुळे खिंडार पडू शकते. 

साखळकर म्हणतात की, मध्यमवर्गात तालुका व गावस्तरावरील मध्यम नोकरशहासुद्धा सामील आहेत. हे पांढरपेशा नाहीत, पण विधायक वृत्तीचे आहेत. यात उदा.- दूध संघ व सहकारी संघ चालवणारे, रिक्षाचालक संघटना चालवणारे, तसेच धार्मिक समारंभ, गावातील सण-समारंभाचे आयोजक येतात. साखळकरांच्या म्हणण्यानुसार ते धर्मातीत आहेत. परंतु त्यांना धर्माचे वावडे नसावे, त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून भाजप त्यांना आपल्याकडे वळवू शकला आहे.

राजेश्वरी देशपांडे यांनी नवमध्यमवर्गाच्या सक्रिय राजकारणाचे मॉडेल म्हणून दिल्लीतील आम आदमी पक्षाचा व्यवहार पुढे मांडला आहे. केजरीवाल यांच्या पक्षांतर्गत लोकशाहीविषयी मतभेद असले तरी एक बाब मान्य करावीच लागेल की- दिल्लीत गरीबवर्ग तसेच मध्यमवर्गही आपच्या मागे उभा आहे. केंद्रीय सत्तेच्या असहकारामुळे ‘आप’ला माराव्या लागलेल्या कोलांटउड्यांना मध्यमवर्ग समजून घेतो, कारण बहुसंख्य मध्यमवर्गाला आपल्या घरी किंवा कचेरीत कामाला येणाऱ्या गरीब कामगारांना केजरीवालांनी केलेल्या ‘मोहल्ला क्लिनिक’ व सरकारी शाळांच्या सुधारणांचे कौतुक आहे. परंतु हे मॉडेल अजून दिल्लीबाहेर जाऊ शकलेले नाही. 

अशा तऱ्हेने आजच्या मध्यमवर्गाचे चित्रण या जवळजवळ 270 पानी पुस्तकात आले आहे. वेगवेगळ्या काळांत लिहिलेल्या लेखांमुळे तसे एकसंध स्वरूप या पुस्तकाला नसले तरी लेखाच्या शेवटी कुठल्या वर्षात हा लेख लिहिला गेला आहे त्याची नोंद असल्याने, त्यातील तर्क-वितर्क लक्षात घेणे सोपे जाते. आजच्या समाजातील विसंगती व सुसंगती समजून घेता येते. या दृष्टीने हे पुस्तक वाचनीय ठरते.

मध्यमवर्ग : उभा, आडवा, तिरपा
संपादक : राम जगताप
राजहंस प्रकाशन, पुणे 
पाने : 272, मूल्य : 350 रुपये

Tags: राजहंस प्रकाशन लोकशाही पुस्तक परिचय मराठी पुस्तक मध्यमवर्ग संपादक राम जगताप तिरपा आडवा मध्यमवर्ग : उभा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Ram Jagtap- 08 Jan 2021

    ‘मध्यमवर्ग : उभा, आडवा, तिरपा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा - https://www.booksnama.com/.../Madhyamvarg---ubha-adva-tirpa

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके