डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उत्क्रांतीची उकल कशी केली जाते याचाही ऊहापोह लेखिकेने या पुस्तकात केला आहे. त्यासाठी वैज्ञानिक कोणते पुरावे देतात त्याचीही उदाहरणे दिली आहेत. सर्व उच्च पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हृदयाचे दोन, तीन वा चार कप्पे असतात. भिन्न पृष्ठवंशीय प्राण्यांच्या प्रारंभिक गर्भावस्थेत खूप साम्य आहे. मानवी गर्भावस्थेत थोडा काळ असलेले शेपूट गर्भाशयातील विकसनाच्या काळात कण्यांत विरघळून ‘माकड हाड’ बनते. अशा प्रकारचे वनस्पतीमधीलही दाखले पुस्तकात दिले आहेत. ते मूळ पुस्तकातून जिज्ञासूंनी वाचावेत. काही प्राण्यांमध्ये अवशेषांगे म्हणजेच निरुपयोगी अवयव असतात. उदा.मानवामधील अक्कलदाढ. कालौघात अन्नप्रकार बदलले तेव्हा मोठ्या जबड्याची गरज उरली नाही. जबडा लहान होत गेला. अक्कलदाढेला जागा उरली नाही. (अर्थात ह्या बाबी घडून यायलाही लक्षावधी वर्षांचा काळ जावा लागतो.)

गोत्र म्हणजे आपले पूर्वज. ते पूर्वज अथवा मूळ पुरुष की स्त्री? मानवी उत्क्रांतीचा इतिहास सांगतो- आपले म्हणजे होमो सेपियन्सचे पूर्वज आणि चिंपांझींचे पूर्वज यांची आजी एक होती. 50 दशलक्ष वर्षांपूर्वी होमोनिनी या महावानरीला दोन मुली झाल्या. एकीचे वंशज म्हणजे चिंपांझी व दुसरीचे वंशज म्हणजे आपल्या पूर्वजांची आजी. नंतर या दोन वंशावळी भिन्न मार्गांनी विकसित होत गेल्या. ‘मानवाचे अंती एक गोत्र’ ही विंदा करंदीकरांच्या कवितेतील ओळ हे या पुस्तकाचं शीर्षक आहे व ते आतील मजकुरासाठी अगदी चपखल आहे. आज आपल्यासमोर पसरलेला मानव समाज देश, धर्म, जात, प्रदेश इत्यादींमुळे वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी त्याची जनुकीय सामग्री (जिला जीनोम म्हणतात) 99.90 टक्के सारखी आहे हे ‘मानव जीनोम प्रकल्पा’तून 2003 या वर्षातच सिद्ध झाले आहे.

उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन होय. आज आपण सहजपणे उत्क्रांतीबद्दल बोलतो; पण डार्विनला त्याच्या काळात या शोधाबद्दल टीकेचं धनी व्हावं लागलं. धर्मग्रंथापलीकडे कोणतीही बाब तत्कालीन समाज खरी मानत नसे. मानवी उत्क्रांतीबद्दल बहुतेकांना जिज्ञासा असते. डॉ. सुनीती धारवाडकरांनी या पुस्तकात योग्य ती माहिती पुरवून ही जिज्ञासा शमविली आहे. विविध विज्ञानशाखांच्या साहाय्याने उत्क्रांतीच्या अभ्यास करता येतो. त्यांमध्ये मानववंशविज्ञान (अँथ्रोपोलॉजी), पुरातत्त्वविज्ञान (आर्किओलॉजी), अनुवंशविज्ञान (जेनेटिक्स) इत्यादी विज्ञानशाखांचा समावेश आहे.

पृथ्वीचा जन्म 4.8 अब्ज वर्षांपूर्वी झाला. प्रारंभी पृथ्वी म्हणजे तप्त गोळा होता. तिला थंड व्हायलाच 85 कोटी वर्षे लागली. त्यानंतर कित्येक शतके सलग पाऊस पडल्यामुळे नद्या तयार झाल्या. समुद्र निर्माण झाले. नंतर कित्येक कोटींच्या रासायनिक व जीवरासायनिक उत्क्रांतीनंतर काही अब्ज वर्षांनंतर प्राथमिक जीव सागरी पाण्यात निर्माण झाला. आदिपेशी, एकपेशीय, पृष्ठवंशीय, खंडपर,  भूजलचर, सरिसृप, भूचर, होमो हाबिलस, होमो इरेक्टस आणि निअँडरथाल व होमो सेपियन्स म्हणजे आपण

सगळे - असा उत्क्रांतीचा ढोबळ क्रम सांगता येईल. या पृथ्वीवर सर्वत्र तो अगदी त्याच क्रमाने- त्याच वेळी झाला असेल असे निश्चितपणे सांगता येत नाही.

मानवाचा अंतर्भाव नर-वानरगणात होतो. आजचा मानव ज्या नैसर्गिक अवस्थेला पोहोचला आहे ती अवस्था गाठण्यापूर्वी त्याला अगणित नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले आहे. प्रारंभी पृथ्वीवर प्रथम केवळ मिथेन, अमोनिया इत्यादी वायू होते. नील-हरित शैवालाच्या रूपाने पहिली आदिपेशी निर्माण झाली. परिणामी वातावरणात प्राणवायू आला. त्याच वेळी ओझोनचाही थर तयार होत होता. प्रकाश संश्लेषण करणारे जीवाणू जमिनीवर वास्तव्य करू लागले. नरवानर (प्रायमेटस) भूतलावर साधारण 6.5 ते 5.5 कोटी वर्षांपूर्वी होते. कपी- महावानर (एप्स) 3 ते 2.5 कोटी वर्षांपूर्वी होते. त्यापासूनच उत्क्रांत होत 2 लाख वर्षांपूर्वी आजच्या मानवसदृश असणारा मानव उत्क्रांत झाला. पण त्या अगोदर विविध मानव जाती एकाच वेळी भूतलावर विविध प्रदेशांत व वातावरणात उत्क्रांत होत होत्या.

नर-वानरगणाचे वैशिष्ट्य म्हणजे डोळे पुढच्या बाजूला, तीक्ष्ण नजर, रंग ओळखण्याची क्षमता आणि हाताने वस्तू पकडण्याचे कौशल्य. ते झाडांवर राहत असत. झाडांवर चढू शकत आणि लीलया उड्या मारू शकत असत. कधी चार पायांवर तर कधी दोन पायांवरही चालू शकत होते. त्यांच्या जवळपास 300 जाती असाव्यात. कालौघात त्यातील बऱ्याच नष्ट झाल्या. 6 ते 6.5 कोटी वर्षांपूर्वी आशियामध्येच नर-वानर दुकुलाचे दोन शाखांत विभाजन झाले. एक शाखा आद्य माकडे म्हणून ओळखली जाते. दुसरी शाखा 4 कोटी वर्षांपूर्वी महावानर जातीत विकसित झाली. (यात माकडे आणि कपी ़यांचा समावेश होतो. हे प्रारंभी युरेशियात राहत होते.)

काही दशलक्ष वर्षांच्या अंतराने कपीच्या मूळ वंशकुळाला शाखा फुटत गेल्या. प्रथम गिबन, उरंगउटान (जंगलातील रानटी माणूस), मग गोरिला, बोनोबो, चिंपांझी आणि शेवटी मानववंशाची शाखा वेगळी होत गेली. या विकासक्रमात मेंदूचे आकारमान वाढत होते व चर्वणाचे दात दिसून येऊ लागले होते. मात्र लवकरच ते आफ्रिकेत स्थलांतरित झाले व तिथेच त्यांचा होमो प्रजातीपर्यंतचा विकास झाला. या आदिमानवाच्या काही जाती आफ्रिकेतून बाहेर व पुन्हा आफ्रिकेत अशी ये-जा करीत राहिल्या. त्यातील काही आदिमानव जाती युरेशियात गेल्या व तिथे उत्क्रांत होत गेल्या. काही आफ्रिकेतच विकसित होत गेल्या.

70 लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेत चिंपांझी आणि माणूस यांच्या वंशावळीच्या दुफळीच्या रेषेवर असणाऱ्या साहेलांथ्रोपस या आदिपूर्वजामध्ये चिंपांझी व मानवाची मिश्र लक्षणे होती. पूर्व आफ्रिकेतील टांझानियामध्ये एका घळीतील खडकात ऑस्ट्रॅलोपिथॅक्सपासून उत्क्रांत झालेल्या होमो हाबीलीस या मानवप्राण्याचे 20 ते 30 दशलक्ष वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. हा कपी आणि आधुनिक मानव यांतील दुवा मानला जातो. त्याचे बरेच गुणविशेष कपीसारखेच होते. मात्र हा आदिमानव दगडी हत्यारे बनवण्यास शिकला होता. याच्याशीच साम्य असलेल्या होमो रुडोल्फसीन्सचे वास्तव्य आफ्रिकेतील रुडाल्फ तळ्याकाठी होते. हे आदिमानव भटकंती करण्यात व हत्यारे बनवण्यात वाकबगार होते. यानंतरच्या टप्प्यात वीस लक्ष वर्षांपूर्वी होमो इरेक्टस अरगेस्टर राहत होता. या नावाचा अर्थ होतो ‘कामसू माणूस’. याचे वास्तव्य पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत होते. इरेक्टसने नंतर आशियात स्थलांतर केले. होमो इरेक्टस कपीपणापासून मानवाकडे झुकू लागला होता. त्याचे अस्तित्व अठरा लाख ते दोन लाख वर्षांपूर्वीपर्यंत होते. तो ‘शिकारी अन्नसंकलक’ झाला होता. तो अग्नीचा यशस्वी वापर करीत होता आणि सामूहिकरीत्या शिकार करीत होता. ताठ उभे राहून मागील दोन पायांवर चालण्याची सवय पूर्णपणे आत्मसात केल्यामुळे या नरवानराचे हात अनेक कामांसाठी मोकळे राहू लागले. परिणामी त्याच्या हाताच्या रचनेत अनेक महत्त्वाचे बदल झाले (अर्थात हळूहळू).

नंतरच्या टप्प्यावर होमो इरेक्टसने आफ्रिकेत होमोहेेडलबर्गला जन्म दिला. ह्या मानवजातीने मृतांना पुरण्यास सुरुवात केली. थंड हवामानाशी जुळवून घेऊन स्वतःचा निवारा बांधण्यास सुरूवात केली. एकाच वेळी इरेक्टस मानवाच्या अनेक जाती वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांत राहत होत्या. त्यांचे अवशेष चीन, जावा, इंडोनेशिया येथे सापडले आहेत. जिथे अवशेष सापडले त्यावरून त्यांना नावे दिली आहेत. 3 ते 2 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या या मानवजाती दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत लुप्त झाल्या. त्यांचा अन्य जातींशी संघर्ष झाला असेल किंवा बदलत्या पर्यावरणाशी त्यांना जुळवून घेता आले नसेल.

होमो सेपियन्सच्या अस्तित्वाबरोबरच जर्मनीतील निअँडरथालच्या खोऱ्यात आणि युरोप व आशियाच्या काही भागात निअँडरथालच्या सांगाड्याचे अवशेष सापडले आहेत. सेपियन्स व निअँडरथाल युरोपमध्ये काही काळ एकत्रितपणे अस्तित्वात होते. मात्र सेपियन्सच्या आगमनानंतर सुमारे 20 ते 30 हजार वर्षांपूर्वीच्या काळात निअँडरथाल नष्ट झाले. मात्र याचे निश्चित कारण सांगता येत नाही. आजच्या माणसात निअँडरथालच्या डीएनएचे अंश आढळतात. वातावरण व भूरचनांच्या उलथापालथीत निसर्गानुसार जुळवून घेण्याची क्षमता असलेली प्राणिजात जिवंत राहते. सेपियन्सना तसे करता आले.

होमो इरेक्टस 6 लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत होता तसाच तो भारतातही ‘नर्मदा मनुष्या’च्या रूपाने वास करीत होता. इरेक्टसचे जे गट आफ्रिकेतून बाहेर पडले त्यांपैकी काही अरबस्तान, पाकिस्तान, हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यांपाशी पोहोचले. काही भारताच्या अन्य भागांत जाऊन स्थिरावले. होमो इरेक्टस 20 लाख ते सत्तर हजार वर्षे या कालखंडात आफ्रिकेत आणि अन्यत्र तग धरून होता. तो जिथे जिथे गेला तेथील होमो सेपियन्सशी व अन्य जातींशी संघर्ष झाला असावा किंवा तेथील पर्यावरणाशी जुळवून घेण्यात तो कमी पडला असावा. सेपियन्सशी मुकाबला करताना त्याची तगून राहण्याची कौशल्ये कमी पडली असावीत. नेमकी कारणे सांगता येत नाहीत. फक्त अंदाज करता येतो. काही ठिकाणी  त्याचा सेपियनशी संकरही घडून आला असेल. कारण या सर्व मानवजातींचे अंश आजच्या मानवात काही प्रमाणात आढळतात.

एका गृहीतकानुसार अंदाजे 65 हजार वर्षांपूर्वी सेपियन्सचा एक समूह आफ्रिकेतून आशियात आला. तेथून तो अंदमान आणि नंतर ऑस्ट्रेलियाला पोहोचला असावा. दुसरा गट मध्य आशिया व युरोपात गेला. भारतीय उपखंडात स्थलांतराच्या अनेक लाटा आल्या आणि हे आलेले समूह येथील लोकांत मिसळून गेले. विशेष म्हणजे वीस हजार वर्षांपूर्वीही भारतीय उपखंडात जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या होती. (म्हणजे हे भारताचे पुरातन दुखणे आहे.) पाच हजार वर्षांपूर्वी वायव्य भारतात आलेले स्थलांतरित व येथील आधीचे सेपियन्स या समूहांनी मोहेंडोदडो-हडप्पा या संस्कृतीचा विकास केला. तसेच या सेपियन्सच्या मिश्र वंशातून दक्षिण भारतीय संस्कृती उदयास आली.

एकूणच मानवाच्या उत्क्रांतीमध्ये सेपियन्सची अन्य मानवजातींबरोबरच्या आंतर-प्रजननाची भूमिकाही महत्त्वाची ठरते. यावरून मानवी उत्क्रांती ही एका सरळ रेषेत झाली नाही. ती वंशवेलींच्या शाखाशाखांनी बनलेल्या एखाद्या जाळ्याप्रमाणे झाली असावी. तिने अनेक वळणेवळणेही घेतली. प्रथम बोधात्मक क्रांती ज्यामुळे मानवाला विचार करण्याची, कल्पना करण्याची, भाषा निर्माण करण्याची कुवत प्राप्त झाली. तसेच भावनाही निर्माण झाल्या. मेंदूतील चेतापेशींची संख्या वाढल्यामुळे हे घडून आले. नंतर कृषिक्रांती झाल्यावरवर मानव स्थिर आयुष्य जगू लागला. नंतरच्या काळात औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती  आणि अगदी अलीकडची डिजिटल क्रांती यांनी मानवी जीवनावर खूपच प्रभाव टाकला आहे. तसेच निसर्गाचाही विध्वंस केला आहे.

उत्क्रांतीची उकल कशी केली जाते याचाही ऊहापोह लेखिकेने केला आहे. त्यासाठी वैज्ञानिक कोणते पुरावे देतात त्याचीही उदाहरणे दिली आहेत. सर्व उच्च पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हृदयाचे दोन, तीन वा चार कप्पे असतात. भिन्न पृष्ठवंशीय प्राण्यांच्या प्रारंभिक गर्भावस्थेत खूप साम्य आहे. मानवी गर्भावस्थेत थोडा काळ असलेले शेपूट गर्भाशयातील विकसनाच्या काळात कण्यात विरघळून ‘माकड हाड’ बनते. अशा प्रकारचे वनस्पतीमधीलही दाखले पुस्तकात दिले आहेत. ते मूळ पुस्तकातून जिज्ञासूंनी वाचावेत. काही प्राण्यांमध्ये अवशेषांगे म्हणजेच निरुपयोगी अवयव असतात. उदा. मानवामधील अक्कलदाढ. कालौघात अन्न प्रकार बदलले तेव्हा मोठ्या जबड्याची गरज उरली नाही. जबडा लहान होत गेला. अक्कलदाढेला जागा उरली नाही. (अर्थात ह्या बाबी घडून यायलाही लक्षावधी वर्षांचा काळ जावा लागतो. म्हणून अक्कलदाढ आणि टॉन्सिल्सना अनाहुत त्रासदायक पाहुणा म्हटलं जातं. पूर्वीच्या मानवाला कानातील एका स्नायूमुळे आवाजाच्या दिशेने कान वळवता येत होते. आज तो स्नायू नाही. आज आपण आपली मान पूर्णपणे आवाजाच्या दिशेने वळवतो.)

बहुतेकांना कधी ना कधी आपण पलंगावरून खाली पडतो आहोत असे वाटून दचकून जाग येते. याला ‘अल्फा जर्क’ म्हणतात. या दचकण्यामुळे वेळीच जाग येऊन आपले पूर्वज स्वतःला सावरत असावेत. अशा प्रकारचे विविध पुरावे लेखिकेने दिले आहेत, तसेच वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या काही शंकांचे निरसनही केले आहे. मनुष्यप्राण्याने उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा गाठला असून त्याची उत्क्रांती आता थांबली आहे, या गैरसमजाबाबत लेखिका स्पष्ट करते की उत्क्रांती आजही चालू आहे. नवीन जीवजाती निर्माण होण्यास वा त्यात बदल होण्यासाठी लाखो वर्षांचा कालावधी जावा लागतो. लहान प्राण्यांत तुलनेने बदल लवकर घडून येतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात तो बदल आपल्याला दिसून येत नाही. पण लाखो वर्षांपूर्वी काय घडलं याच्या नोंदी जीवाश्मात साठवलेल्या सापडतात. मानवी हाडे व दातही उपयोगी ठरतात. कार्बन डेटिंग व इतर आधुनिक साधनांच्या साहाय्याने त्यांचा काळ निश्चित करता येतो. आपल्या भूतकाळाच्या नोंदी आपल्या जनुकांमध्ये कोरल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या संशोधक त्या वाचू शकतात आणि अनेक गोष्टींचा उलगडा करू शकतात.

जगात आज अंदाजे 17 टक्के लोकांचे डोळे निळे आहेत. पण लेखिकेच्या म्हणण्यानुसार 6 ते 10 हजार वर्षांपूर्वीपर्यंत निळ्या डोळ्यांची माणसे अस्तित्वातच नव्हती. काहींच्या मते निळ्या डोळ्यांनी अस्थिर वस्तूपेक्षा स्थिर वस्तू स्पष्ट दिसतात. केवळ एका निळ्या डोळ्यांच्या पूर्वजांमुळे निळ्या डोळ्यांची माणसे निपजली आहेत. उत्क्रांतीय दृष्टीने त्याचे फायदे अद्याप ठोस स्वरूपात पुढे आलेले नाहीत.

उत्क्रांती तत्त्व निरुपयोगी आहे असाही अनेकांचा गैरसमज असतो. या तत्त्वाचा उपयोग कर्करोगावरच्या उपाययोजनेपासून तो जीवाणूंच्या अभ्यासापर्यंत केला जातो. शिवाय नवीन परिस्थितीमध्ये काय घडेल याचाही अंदाज बांधण्यास त्याचा उपयोग होतो. काविड-19 वरील लस शोधण्यातही ह्या तत्त्वाचा उपयोग झाल्याचे लेखिकेने म्हटले आहे. अशा अनेक गैरसमजांना लेखिकेने उत्तरे दिली आहेत.

संपूर्ण पुस्तकात लेखिकेने चित्रे, आराखडे, तक्ते भरपूर दिल्यामुळे विषयाचे आकलन सर्वसामान्यांनाही सुलभ होण्यास नक्कीच मदत होईल. शिवाय, सोपी भाषा वापरल्यामुळे वाचकाला नक्कीच गोडी वाटेल इतके ते वाचनीय झाले आहे. विद्यार्थी, शिक्षक व जिज्ञासूंना उपयुक्त आहे.

मानवाचे अंती एक गोत्र!
लेखिका : सुनीती धारवाडकर
प्रकाशक : लोकवाङ्‌मय गृह, मुंबई
पृष्ठे : 200, किंमत : रु. 250/   

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके