जिभेवर, गालावर, दातांवर क्वचित् लाल रंगाचा शिडकाव करून ही शुभ्र मूर्ति रक्तरंजित दाखविली आहे. नेमकी ध्यानस्थ बुद्धाच्या मागे ही अशी रौद्रमूर्ति ठेवण्यात काय औचित्य साधले आहे ते समजले नाही! पश्चातापदग्ध अंतःकरणाने अमिताभ बुद्धाच्या चरणांशी विनम्र होण्यापूर्वी कलिंगाच्या रणक्षेत्रांवर शत्रूंचा निःपात करीत नाचणाऱ्या सम्राट अशोकाच्या चंडमूर्तीचे आलेखन तर हे नसेल!
‘’ते पाहा नारा येथील बुद्ध मंदिर!” आमच्या जपानी मित्राने बोट दाखवून म्हटले, हे मंदिर जगातील फक्त लाकडाने बांधलेल्या वास्तुशिल्पात प्रचंड आणि अद्वितीय आहे, असे त्याने सांगितले. प्रत्यक्ष जपानातील जुनी देवळे किंवा इमारती पाहिल्या की एक गोष्ट चटकन नजरेत भरते. ती म्हणजे त्या इमारतीचे छप्पर, बहुतेक घरांच्या छपरांवर पटाशीपासून पागोळीपर्यंत प्रवेशद्वाराला काटकोनात असलेले उभे बांबू किंवा सुंदर गोल वासे टाकलेले असतात. त्यामुळे दुरून छप्पर एकदम उठावदार दिसते. शिवाय, घराच्या दर्शनी अथवा मागील भागाकडील छपराचे उतरते कोपरे सरळ रेषेत न ठेवता जरा वक्रगोल करून आकाशाकडे वळविलेले असतात. आज देखील जपानातील बहुतेक घरे लाकडी व आतील भिंती जाड कागदाच्या आहेत. त्यांच्यावरील ही अशी उठावदार व वळवलेली छपरे उडत्या पक्ष्यांच्या पंखांप्रमाणे मनोहर वाटतात. घरांची भूकंपप्रतिबंधक रचना होऊ लागल्यापासून सिमेंट काँक्रिटची घरे जपानात बांधली जाऊ लागली आहेत. तरीसुद्धा लाकडी घरावर सिमेंटचा पातळ थर देऊन सिमेंटची दिसणारी, पण खरोखर आतून लाकडी असणारी घरेच, स्वतंत्र बंगले बांधून राहणारे शहरातील श्रीमंत लोक पसंत करतात. बुद्ध मंदिराचे प्रचंड लाकडी गुळगुळीत वाटोळे खांब– विशेषतः दर्शनी भागाकडच्या लाकडी बांधकामात किती भव्यता आणता येते त्याचा प्रत्यय देतात. मंदिराच्या आतील धातूच्या दिव्यावरील व लाकडी छपरावरील किंवा खिडक्यांवरील कोरीव काम अद्वितीय आहे. जपानी अक्षराप्रमाणे त्यांच्या आकारात स्वतंत्रता असली तरी नक्षीकामावर मात्र भारतीय छाप बरीचशी दिसून येते. अजिंठा येथील कमळे आणि कमलपत्र यांच्या रेषासौंदर्यांची सहीसही नक्कल करून बनवलेली प्रचंड कमळे आणि कमळाची पाने, ब्रॉन्झ किंवा पितळ या धातूंनी बनविलेली पाहिल्यावर ज्या बौद्ध कलाकरांनी अजिंठा किंवा वेरुळ येथील नक्षीकाम केले, त्यांच्यापैकीच काहीजण येथे येऊन राहिले असले पाहिजेत, याची साक्ष पटते. बुद्धमंदिराचे वास्तुशिल्प अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणीय आहे, यात शंका नाही परंतु ‘रत्नजडित’ मुकुटात चमकणाऱ्या कोहिनूर हिऱ्याप्रमाणे आतील मूर्तीवरच लक्ष केंद्रित होते.
मंदिरात शिरल्याबरोबर समोरच ब्रॉन्झ धातुची ध्यानस्थ बुद्धाची प्रचंड मूर्ति नजरेस पडते. चौकटीची जाळी असलेल्या मंदिराच्या छताच्या आतून उतरत्या रचनेमुळे आधीच भव्य असलेल्या मूर्तीच्या उंचीत दुरून पाहणाऱ्याला थोडीशी भर पडल्याचा भास होतो. तल्लीन होऊन आदराने मस्तक लवावे आणि आश्चर्याने मन स्तिमित व्हावे असे भव्य शिल्प आहे! याची केवळ योजना करण्यासाठी कलावंताच्या श्रद्धाशील मनाला दीर्घकाल समाधि लावावी लागली असेल आणि त्याच्या मनात प्रकट झालेले भगवान् बुद्धाचे करुणामय अमूर्त स्वरूप प्रत्यक्षात आणण्यासाठी कित्येक कारागिरांना अनेक वर्षे खपावे लागले असेल! भारतीय कलेच्या संकेताप्रमाणे या मूर्तीचा चेहरा शरीराच्या प्रमाणात किंचित् मोठा वाटतो. चेहऱ्यावरील भावरेषातून दयामय बुद्धाचे विशाल हृदय प्रकट करण्यात कलाकाराने आपले सर्व कौशल्य खर्च केले आहे.
शंखाकृति वलये घेत भुरभुरणाऱ्या बटांनी सुशोभित होणारा मस्तकावरील विपुल जटाभार, सृष्टीचे सदैव निरीक्षण करीत असलेली धनुष्याकृति खालील अर्धोन्मीलित दृष्टि, कपाळावरून सरळ खाली उतरणारे सुबक नाक, चिरस्मितामध्ये स्थिरावलेले आटळ ओष्टद्वय, षड्रिपूंवर विजय मिळविताना किंचित् आत ओढल्या गेलेल्या हनुवटीची दृढता आणि चेहरा थोडासा पुढे आणि खाली वळल्यामुळे हनुवटी खाली दिसणारा किंचित् फुगवटा पाहणाऱ्याचे मन संपूर्णतया आकर्षित करून घेणाऱ्या या चेहऱ्यावरील रेषा इतक्या जिवंत व भावदर्शी वाटतात की, मूर्तिकलेचा ओनामाहि ठाऊक नसलेल्या व्यक्तीची नजर खिळून राहवी त्याच्यावर! अनिमिष नेत्रांनी त्या मूर्तीकडे पाहता पाहता मला तर वाटले की, हे ध्यानस्थ अर्धोन्मिलित नेत्रद्वय आता उघडतील. हे सस्मित ओठ आता बोलतील. म्हणतील, ‘’उगवत्या सूर्याच्या बाळांनो, साम्राज्यतृष्णने वेडावून पाशवी शक्तीची उपासना तुम्ही करीत होता. परंतु त्यामुळे हतप्रभ झालात आता तरी समजून घ्या, अंतिम विजय स्वतःला जिंकण्यात आहे. जगावर निर्वैर प्रेम करण्यात आहे.’’
भगवान् बुद्धाच्या शांत, सुंदर, भव्य मूर्तीमागेच एक प्रचंड मूर्ति उभी आहे. शिल्पकलेतून रौद्ररसाचा साक्षात्कार घडविण्यासाठी कुणा कारागिराने या मूर्तीची घटण केली आहे कुणास ठाऊक! पण मूर्ति म्हणजे जपानी कलेचा एक अप्रतिम नमुना आहे. युद्धाचा चिलखती पोषाख करून हातात नग्न तलवार घेतलेल्या या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव इतके सुरेख साधले आहेत की नजर ठरत नाही. रागाने सर्व रक्त गोळा होऊन चेहरा फुलला आहे. विस्फारलेल्या नाकपुड्या थरथरतात. आकर्ण ताणलेल्या धनुष्यांप्रमाणे वक्राकार होऊन कुटीवर गेल्या आहेत. वटारलेल्या डोळ्यांतून वेष उतू जात आहे. ओठांतून नुकत्याच बाहेर पडलेल्या आरोळीमुळे जीभ किंचित् बाहेर आली आहे आणि डोक्यावरील पिंजारलेले केस अग्निशिखांप्रमाणे वर उफाळत आहेत. जणू डिवचलेला नागराज त्वेषाने, क्रोधाने फूंफाट करीत मनुष्यरूपाने प्रकट झाला आहे! मूर्तीच्या डाव्या हाताच्या पंजाची बोटेसुद्धा अभावितपणे इसकी ताणून वक्रगति झाली आहेत की, आता विळखा घालून समोरच्या माणसाच्या नरडीचा घोट घेतील असे वाटते! जिभेवर, गालावर, दातांवर क्वचित् लाल रंगाचा शिडकाव करून ही शुभ्र मूर्ति रक्तरंजित दाखविली आहे. नेमकी ध्यानस्थ बुद्धाच्या मागे ही अशी रौद्रमूर्ति ठेवण्यात काय औचित्य साधले आहे ते समजले नाही! पश्चातापदग्ध अंतःकरणाने अमिताभ बुद्धाच्या चरणांशी विनम्र होण्यापूर्वी कलिंगाच्या रणक्षेत्रांवर शत्रूंचा निःपात करीत नाचणाऱ्या सम्राट अशोकाच्या चंडमूर्तीचे आलेखन तर हे नसेल!
अपरंपार श्रद्धा आणि अप्रतिहत कलोपासना यातून निर्माण झालेल्या त्या देवाच्या दुनियेतून पाऊल काढणे कष्टाचे वाटले पण सगळा प्रवास वेळेवर संपवावयाचा होता. मनगटावरील घड्याळाचे काटे तबकडीतून बाहेर पडून डोळ्यात जणु खुपू लागले. घड्याळ खिशात टाकता येते तसा वेळह खिशांत टाकता आला असता तर काय बहार झाली असती! पण स्थलकालाच्या बंधनात अडकलेल्या पामराला गतिमान् राहावेच लागते.
मंदिराच्या परिसरात एक मृगवन आहे. अगदी नैसर्गिक वातावरणात पुष्कळशी हरणं वावरत असतात, मृग-मृदु-हृदय बुद्धाच्या सभोवार हरणांचे कळप सोडून आणि झाडे– फुलझाडे लावून जपानी सरकारने इथे मुद्दाम तपोवनाचे वातावरण निर्माण करण्यात फार औचित्य दाखविले आहे. वेड्यावाकड्या दगडांची कुशल रचना करून बनविलेले रस्ते, त्याच्या बाजुला दगडात कोरलेले स्तूपाकृति दिवे, जागजागी चित्रविचित्र तऱ्हेने कापून रंगविलेले मार्गदर्शक व माहितीपूर्ण फलक आणि स्थानाची पौराणिक, ऐतिहासिक भौगोलिक इत्यादि माहिती देणारी पत्रके इत्यादि सोयी करून इथेच काय, पण इतरत्रहि आपल्या पूर्वजांच्या कलामंदिरांची किंवा धर्मस्थानांची सौंदर्यशोभा वाढविण्याचा सतत प्रयत्न सरकार करीत असते. विशेष म्हणजे या स्थानांशी विसंवादी असे वर्तन परदेशी पाहुणेहि करणार नाहीत, त्यांच्याकडून या स्थानांची जरा देखील अप्रतिष्ठा होणार नाही, याबद्दल इथले अधिकारी फार जागरूक असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्वतः जपानी लोक इतक्या शिस्तीने वागतात की, त्यांच्याकडे पाहूनच गैरशिस्तपणा करण्याचा परकीयांना धीर होऊ नये! आपल्याकडे शिक्षकांबरोबर सहलीला निघालेल्या शाळकरी मुलांपासून तो सुशिक्षित सुसंस्कृत नागरजनांपर्यंत सर्वांचीच मनोवृत्ति देवळे आणि लेणी यांचे पिकनिक-स्पॉट्स बनविण्याची असते!
धामापूरच्या भगवतीच्या देवळाच्या नवीन सभामंडपावर कोळशाने लिहिलेली आणि चाकूने कोरलेली मुलांची नावे मी पाहिली तेव्हा त्यांच्या बरोबर आलेल्या शिक्षकांविषयी विलक्षण चीड आली मला. तिथल्या सौंदर्याचा आस्वाद देण्याने तर राहू दे, पण निदान शिस्तीने वागण्याची सूचनाहि मुलांना न देणाऱ्या शिक्षकांना काय म्हणावे?
सूर्य मावळला नव्हता, पण मावळण्याच्या बेतात होता. मंदिराच्या परिसरात ‘’मृगाध्यासित– शाद्वलानि श्यामायमानानि बनानि’’ असे चित्र रंगत होते. आमच्या जपानी मित्राने ‘जपानी पद्धतीचे जेवण घ्यावयास येणार का?’ असे विचारले, त्याच्या विचारशील आतिथ्याचे मनातल्या मनात कौतुक करीत मी होकार दिला, ‘सात पावले बरोबर चालले तर सज्जनांशी मैत्री जमते’ असे म्हणतात. सकाळी नुसती तोंडओळख असलेला हा जपानी गृहस्थ आपल्या नम्रपणाने आणि प्रेमळ वर्तणुकीने आमचा खराखुरा मित्र झाला होता.
राजपथावरून डाव्या बाजूला नर्तिकेच्या सहजतेने गर्रकन् वळण घेऊन मोटार शहराच्या पोटात शिरली आणि हुतूतू खेळणाऱ्या खेळाडूप्रमाणे गर्दीतून अंग चुकवीत वेडीवाकडी वळणे घेऊन एका निरुंद रस्त्यावर थांबली. रस्त्याच्या दोन्ही अंगाला जपानी लोकांसारखीच बुटकी बैठी लाकडी घरे होती. प्रत्येक ठिकाणी कलात्मक सौंदर्यदृष्टि दाखविणाऱ्या जपानमध्ये एक गोष्ट पाहणाऱ्याच्या नजरेत खुपते. ती म्हणजे रस्त्यावरील दोन्ही अंगाची खोल उघडी गटारे! अगदी मथुरानगरीत वावरल्यासारखे वाटते कित्येक ठिकाणी! एका घराबाहेर मात्र वाकवलेल्या बांबूची सुंदर पेळ करून गटार झाकून टाकले होते. त्याच घरात जावयाचे होते आम्हाला. आतबाहेर उघटणारे दरवाजे नसतात जपानी घरांना, भिंतीशी समांतर उघडणारे सरक-दरवाजे असतात, त्यामुळे जागेचा जास्तीत जास्त वापर करता येतो. अत्यंत पातळ, जरा दात लावल्याबरोबर भर्रकन् बाजूला सरकणारा दरवाजा उघडून आम्ही आत शिरलो, तोच ‘किमोनो’ घालून कमरेला ‘ओबी’ बांधलेला जपानी पद्धतीचा पोषाख केलेल्या दोन तीन मुरेख मुली नम्रपणे कमरेत वाकून अभिवादन करीत चटकन गुडघे टेकून आमच्या पायाशी येऊन बसल्या.
पुरुषांपेक्षा स्त्रियांची अभिवादन करण्याची पद्धत काही वेगळी आहे की काय असा विचार माझ्या मनात येतो तोच, प्रवेशद्वाराशीच असलेल्या कपाटातून फुलांचे नक्षीकाम केलेला एक सपातांचा जोड काढून माझ्या समोर ठेवला एका मुलीने. बाहेर वापरलेली पादत्राणे घालून जपानी घरात कधीच जावयाचे नसते. तसे करणे म्हणजे निव्वळ जंगलीपणा समजला जातो इथे! जपानी घर आतून इतके स्वच्छ असते की, मळकी पादत्राणे बाहेर ठेऊन नव्या स्वच्छ सपाता घालून आत जावयाला हवे. जपानात राहणाऱ्या भारतीयांहि आपल्या घरी ही पद्धत उचलली आहे. बहुतेक जपानी घरातली जमीन गुळगुळीत चकचकीत लाकडी फळ्यांनी झाकलेली असते. आणि मुख्य दालनात तिच्यावर मृदु मुलायम ‘तातामी’ म्हणजे चटया अंथरलेल्या असतात. त्यावरच गुडघे टेकून मोगल चित्रातील माणसांप्रमाणे खाली बसावयाचे असते, कोणी आमच्यासारखे परकीय पाहूणे आले तर त्यांना बसण्यासाठी मऊ रेशमी उशा अंथरतात. पण पाश्चात्य पद्धतीच्या खुर्च्या टेबलाना मात्र जपानी घरात संपूर्णपणे मनाव असतो!
आम्ही बसलो होतो ते दालन मोठे प्रशस्त होते, तिन्ही बाजूंना लाकडी चौकटीत बसविलेले कागदी सरकदरवाजे होते. ते पूर्णपणे उघडले तेव्हा दालनाची लांबी-रुंदी आणखीच वाढली, त्याच्या एका बाजूला मात्र एकापुढे एक अशा उतरत्या जिन्याचा आभास निर्माण करणाऱ्या अरुंद लाकडी फळ्या ठोकल्या होत्या व त्याच्या मागे पिवळसर कागदाची भिंत होती. सबंध दालनात एका कोपऱ्यात फुलांची सुबक रचना केलेले एकच पुष्पपात्र होते. बस्स! सबंध दालनाची फक्त इतकीच सजावट! बसण्याच्या दालनात एखादे टेबल किंवा आणखी एखादे पुष्पपात्र असताना तुम्ही गेलात तर जपानी स्त्री शरमेने लाल होऊन घरात सामानाची गर्दी केल्याबद्दल तुमची क्षमा मागेल! सुंदर पण कमीत कमी सजावटीत घर शृंगारणे जपानात खानदानीचे लक्षण समजले जाते. अव्यवस्थित रचलेल्या वस्तुसंग्रहाप्रमाणे दिसणारे श्रीमंत भारतीयाचे घर पाहिल्यावर जपानी स्त्रीची काय स्थिति होईल कोण जाणे!
चौरंगाच्या उंचीच्या एका वर्तुळाकार टेबलाभोवती जेवावयास बसलो. प्रथम वेताच्या लहानशा बशांतून अत्तर शिंपडलेले, गरम पाण्यात भिजवून पिळलेले लहान टॉवेल आले! सुगंधी, गरम ओल्या टॉवेलने जेवणानाआधी हाततोंड पुसावयाची जपानी पद्धत आकर्षक असली तरी माझ्यासारख्या डॉक्टरी पेशाच्या व्यक्तीला भरपूर साबू व पाणी वापरून हात स्वच्छ करणे पसत पडते. उर्दू किंवा पर्शियन भाषेत साकी म्हणजे ‘मद्य देणारी’, जपानी भाषेत साकी म्हणजे दारू, तांदळापासून बनविलेली असते ही. जेवणाआधी प्यावयाची ही जपानी दारू. टीचभर उंचीच्या काचेच्या सुंदर सुरईत ठेवलेली ही गरम गरम साकी स्वतःच घेऊन नसते प्यावयाची! शेजारी अगदी जवळ बसलेली जपानी ललना नैवेद्याच्या वाटीएवढा पेला तुम्ही उचललात की तत्परतेने त्यात साकी ओतील. प्रत्येक वेळी चहाचे तीन चार चमचे भरतील इतकीच, मिटक्या मारीत मारीत दहा पंधरा वेळा पुनःपुन्हा पेला भरून घेऊन ती प्यावयाची. असे केले तरच करीत असलेल्या नाजुक ‘स्वागताला’ पाहुण्यांकडून प्रतिसाद मिळाल्याचे समाधान त्या प्रमदेच्या चेहेऱ्यावर दिसू शकेल. वाग्भटाच्या आयुर्वेदावरील पुस्तकात मद्य देण्यात कुशल असलेल्या ‘स्त्रीमिः सुशिक्षितामि:’ सह मद्यपान करावे म्हणून सांगितले आहे. मदिराक्षीच्या सहवासाने अतिमदिरापानाला काटशह देण्याची त्याची कल्पना यावेळी मला समजली. साकी चढली नाही, परंतु सहनशील सेवेची कमाल करणाऱ्या जपानी महिलेच्या आदरातिथ्याने मात्र थोडीशी गुंगी आल्यासारखे वाटले.
साकी पिताना बरोबर खाण्यासाठी म्हणून एका चौरस बशीवर सुकवलेल्या माशांचे लाल तुकडे, आल्याचे कोंब व काथिंबीरीसारखी पाने ठेवली होती. आणि जवळच खेळातील चिमुकल्या अशा काचेच्या हरणांच्या मानेवर टेकून पातळ कागदाच्या लांबट पिशवीत ‘ओहाशी’ म्हणजे चॉपस्टिक्स ठेवल्या होत्या. जपानी लोक आपल्यासारखे हाताने जेवत नाहीत. पश्चात्यांसारखे सहज वापरता येतात असे काटे-चमचेही वापरीत नाहीत. लाकडाच्या दोन लांबट निमूळत्या कड्यांमध्ये धरून सगळे जिन्नस पट पट जेऊ शकतो जपानी माणूस. पण आपल्यासारख्यांना मात्र या ओहाशीत वस्तू पकडून जेवणे म्हणजे तारेवरची कतरत होते! आधी या कड्यांमध्ये वस्तु धरता येत नाही आणि धरलीच तर तोंडात घालण्यापूर्वीच ती अंगावर सांडते. काड्यांनी माशाचा तुकडा धरताना माझी उडालेली त्रेधा पाहून जवळच बसलेल्या जपानी रमणीच्या चेहऱ्यावर पहाटेच्या चांदण्यासारखे मंदस्मित उमटले! परस्परांना भाषा समजत नसल्यामुळे बोलणे अशक्य होते. परंतु नेत्रपल्लवी आणि करपल्लवी वापरून वस्तु दोन काड्यांत कशी धरावी ते मला शिकविण्याचा खूप प्रयत्न तिने केला. तरीहि परंतु मला काही ते जमेना आणि तिच्या चेहऱ्यावरील संयमी मृदुस्मित काही मावळेना. शेवटी ओहाशीने वस्तु उचलायच्याऐवजी हातानेच बशीवरील माशाचा तुकडा मी तोंडात टाकला. तेव्हा मात्र घरात जाऊन ती इंग्रजी पद्धतीचा काटा चमचा हळूच घेऊन आली.
उत्तम प्रतीच्या जपानी जेवणात आठ दहा तरी वेगवेगळी पक्वान्ने असतात पण ती वाढण्यापूर्वी आणि जेवणानंतरहि चहा घेण्याची पद्धत आहे. चहा कसला, जपानातच होणारी चहाची पाने कडकडीत पाण्यात टाकून दूध साखर न टाकता केलेला हा उकाळा काश्मीरच्या डाल तलावाच्या शेवाळलेल्या पाण्यात कॉडलिव्हर ऑइलचा थेंब टाकल्यासारखा लागतो! ही एकच वस्तु वगळली तर जपानी जेवण दिसायला सुरेख आणि चवीला बरेचसे स्वादिष्ट असते. कच्या व शिजवलेल्या रंगीबेरंगी भाज्या, माशांचे व मटणाचे पदार्थ, भात व शेवटी सूप अशा पुष्कळ वस्तु आकर्षक तऱ्हेने विविधाकृति अशा काचेच्या भांडयातून वाढल्या जातात.
इंग्लंड, झेकोस्लोव्हाकिया वगैरे देशाप्रमाणेच कविच्या सुंदर सुंदर वस्तू बनविण्यात जपानचा हातखंडा आहे. रोजच्या व्यवहारात वापरता येतील अशी पाने-फुले किंवा भूमितीतील विविध आकृति घेऊन बनविलेली काचेची सुंदर भांडी जपानइतकी कुठल्याच देशात बनत नाहीत, जेवताना फक्त ठराविक पद्धतीची आणि ठराविक आकाराचीच भांडी इंग्लंडसारख्या देशात वापरतात. जपानमध्ये मात्र नित्य नव-नव्या तऱ्हेची मनोहर चित्ररेषांनी सुशोभित केलेली भांडी वापरून जेवणात आकर्षकता आणली जाते. नुसती ‘माकुरा’ म्हणजे कड्या टेकून ठेवण्यासाठी वापरलेली काचेची उशी हरीण, ससा, समुद्रपक्षी, इत्यादि अनेक पशुपक्षांच्या आकाराची बनविलेली असते. जेवणासाठी वापरात येणाऱ्या बशा किंवा सूप घेण्यासाठी उपयोगात आणलेले पेले व चमचे देखील विविध आकृतीचे असतात. सगळे जेवण जवळ जवळ पावणदोन तास-दोन तास चालले होते आणि ते संपेपर्यंत शेजारी बसून प्रत्येक वस्तूचा आग्रह करीत त्या जपानी ललना आपल्या अखंड स्मिताचा आल्हाद आम्हाला देत होत्या! जेवण संपवून हात धुवून निघालो.
मोटारीत बसल्यावर माझ्या जपानी मित्राला मी विचारले, “जेवण तर झकास झाले कोणाच्या घरी नेलं होतंस तू आम्हाला! तुझ्या कुणा मित्राच्या घरी का?’’
ओठांवरचे हसू दाबीत त्याने गंभीरपणे म्हटले, “छे छे गैशांच्या घरी नेले होते मी तुम्हांला.’’
“अरे बापरे!’’ माझ्या पत्नीकडे पहात मी उद्गारलो.
तिने हसत हसत विचारले, “काय खुळे आहात का हो तुम्ही! तुम्हाला काय वाटले, तुम्ही कुणा गृहस्थाच्या घरी गेलो होतो म्हणून? अहो, पाहुण्याची अशी लाडिक सेवा गरतीला कधीतरी जमेल का? घरात शिरल्याबरोबरच मी ओळखले की हे गैशाचे घर आहे म्हणून. पुरुषाला प्रथमदर्शनी सगळ्याच स्त्रिया चांगल्या वाटतात. पण कोण स्त्री कशी आहे, हे बायकांच्या मात्र चटकन लक्षात येते’’
आपल्याकडील कलावंतिणीप्रमाणेच जपानातल्या गैशा या देखील प्रियंवदा, प्रियदर्शिनी असतात. कदाचित् सुसंस्कृत, सुशिक्षित, चतुर, रसज्ञहि असू शकतील. पुरुषांची मनधरणी करून त्याला सुखविण्याची कला त्यांना अवगत असते. त्यांच्याकडे जाणे जपानात निषिद्ध समजत नाहीत. जपानी बायका वेळी अवेळी चार चौघांदेखत नवऱ्याचा नक्षा उतरवीत असतील म्हणूनहि कदाचित आमच्यासारख्या सहकुटुंब आलेल्या पाहुण्यांनाहि गैशाच्या घरी नेऊन पाहुणचार देण्याचे पसंत करीत असतील जपानी गृहस्थ कृणी सांगावे? राष्ट्राराष्ट्रांच्या नीतिमतेच्या कल्पनेत फार फरक असतो खरे. चिमणीलाहि पुरणार नाही असा पोहण्याचा पोषाख करून इतर पुरुषांदेखत ज्यांच्या बायका वावरतात अशा पाश्चात्य लेखकांनी जपानच्या नीतिमत्तेवर कोरडे ओढावे आणि बायकोला सांगून सवरून करमणूक म्हणून गैशाच्या घरी जाणाऱ्या जपानी लेखकांनी युरोपियन लोकांच्या नीतिमत्तेविषयी कुत्सितपणे टीका करावी हे प्रत्येकाच्या दृष्टीने योग्य असे असले, तरी ‘नृपुरेत्वभिजानामि नित्यं पादाभिवंदनात्’ असे संयमशील मन ठेऊन स्त्रीचा मान ठेवण्यास सांगणारी भारतीय संस्कृतीच भारतीयांना अधिक भली वाटते.
रात्रीचे साडे नऊ वाजून गेले होते. पोटातल्या जेवणाने आणि खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याने डोळे निद्राधीन होऊ पहात होते. तोच मोटार कोइटो स्टेशनसमोर उभी राहिली. वेळ नसल्याने जपानातील बाग-बगीचे दाखवावयाचे राहून गेल्याबद्दल खेद प्रदर्शित करून आमच्या मित्राने कोइटोहून टोकियोला जाणाऱ्या आगगाडीत आम्हाला बसविले आणि पुनःपुन्हा नम्र अभिवादन करून आमचा निरोप घेतला. ‘’आपल्या दुसऱ्या एका मित्राच्या मदतीने टोकियो, याकोहामा वगैरे ठिकाणी फिरून घ्या’’ असे सांगण्यास मात्र तो विसरला नाही.
Tags: Travelogue प्रवासवर्णन Vasant Awasare वसन्त अवसरे Japan जपान Weekly Sadhana साप्ताहिक साधना Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या