डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बीजभाषण
साधना साहित्य संमेलन : ‘कविता’

गेल्या वर्षी ‘कादंबरी’या वाङ्‌मय प्रकाराला केंद्र मानून पहिले ‘साधना साहित्य संमेलन’ पुणे येथे पारपडले. दुसरे साधना साहित्य संमेलन ‘कविता’ मावाङ्‌म या प्रकाराला केंद्रमानून, पणजी(गोवा) मेथे 19 व 20 डिसेंबर 2009 रोजी होत आहे.
मा संमेलनाच्या उद्‌घाटन सत्रात
वसंत आबाजी डहाके करणार असलेले ‘बीजभाषण’ प्रसिद्ध
करीत आहोत.
- संपादक

- 1 -
बाहेरचा प्रवास असतो, तसा आतलाही प्रवास असतो. बाहेर रस्ते असतात तसे आतही असतात. सगळे रस्ते सरळच असतात असेही नाही, वाटा असतात, आडवाटा असतात, भलतीकडेच घेऊन जाणाऱ्या असतात. गांधारदेशी जायचे असले तर मगधला पोचवणाऱ्या असतात. आता अस्तित्वात नसलेल्या एका गावापासून मी इथपर्यंत पोचलो, तो माझा प्रवास आहे, त्याच वेळी आतलाही प्रवास सुरूच आहे. बाहेर अगणित कविता होत्या, आतही पुष्कळ होत्या. त्या सगळ्याच बाहेर आलेल्या नाहीत. कित्येक येणारही नाहीत.
आधी मी कविता वाचू लागलो, नंतर कविता लिहायचे सुचले. आमच्या वडिलांचे एक कपाट होते. त्याला कुलूप लावून ते बंद करून ठेवत असत. त्यात एवढे काय आहे, म्हणून एकदा किल्ली पळवून ते उघडले. त्यात सटरफटर सामानाखेरीज सुबक आकाराच्या दौती होत्या, टाक होते. काही लिहिलेली एक वही होती. त्यात त्यांनी सुंदर अक्षरांत अभंग, ओव्या, पदे लिहून ठेवलेली होती. या रचना त्यांच्या नव्हत्या. त्यांना आवडलेल्या ओळी त्यांनी लिहून ठेवल्या होत्या. कपाट बंद करून ठेवावे असे खरे तर त्यात काहीच नव्हते. नव्हे, होते. हा त्यांचा आतला रस्ता होता. त्या कपाटातून घराच्या तळघरात जाण्याची गुप्तवाट नव्हती. त्यांच्या आतल्या प्रवासाची ती वाट होती. पुढे मी कविता लिहू लागल्यावर आणि त्या संपूर्ण नावाने छापून येऊ लागल्यावर त्या कपाटाला कुलूप राहिले नाही. जणूकाही त्या कपाटात काही जडजवाहीर होते आणि ते सांभाळण्याची जबाबदारी आता माझ्याकडे आली होती! ती मी कितपत सांभाळू शकलो हे मला सांगता येणार नाही.

बाहेर खूप कविता होत्या, आहेत. चंद्रपूरच्या महाविद्यालयात शिकायला गेल्यानंतर एकेका कवीच्या कवितांचे संग्रह असतात हे कळले. आकर्षक मुखपृष्ठ असलेले, चांगले मुद्रण असलेले ते संग्रह मी वाचू शकतो याचाच मला अधिक आनंद होत असे. ते विकत घेण्याची क्षमता आमच्यात नव्हती. पाच रुपये ही किंमत त्यावेळी, 1958 साली जास्त वाटायची आणि ती होती ही. 1972 साली ‘योगभ्रष्ट’ हा संग्रह निघाला, त्यावेळी त्याची किंमत दहा रुपये ठेवल्याचे पाहून मी भागवतांना म्हणालो, एवढा महाग संग्रह कोण विकत घेणार? शिवाय त्याचे मुखपृष्ठ काळे-पांढरे, दात विचकणाऱ्या चेहऱ्यांचे! ते असो.
त्यावेळी माझ्या आसपास खूप कविता होत्या. कुरणात उड्या मारणाऱ्या वासरासारखी माझी त्यावेळची मानसिक स्थिती होती. यालाच तोंड लाव, ते चाव, हे ओरबाड, ते तुडव. आपल्या आसपास उदंड लसलशीत हिरवे गवत आहे या कल्पनेनेच त्या वासराचे पोट भरत असावे! मला वासराच्या मानसिक स्थिती विषयीकाही सांगता येणार नाही. मला इतक्या वेगवेगळ्या कविता वाचायला मिळत की त्याने माझे मन भरून येत असे. कडू गवत असले की वासरू तोंड फिरवते तसे माझेही होत असे, ही गोष्ट वेगळी. परंतु अद्यापही कित्येक चांगल्या कवितांची गावे माझ्या वाटेवर आहेत. ‘अंतरात पाहत जा, भास तू तुझेच, शांततेत ऐकत जा, श्वास तू तुझेच’ या ना.घ.देशपांडे यांच्या ओळी माझ्यासाठीच आहेत असे वाटायचे. ‘लिलीची फुले, तिने एकदा, चुंबिता, डोळां, पाणी मी पाहिले, लिलीची फुले, आता कधीहि, पाहता, डोळां, पाणी हे सांकळे’ या पुरुषोत्तम शिवराम रेगे यांच्या कवितेने तर कोणत्या ना कोणत्या वळणावर भेटायचेच असे ठरवून टाकले आहे. ‘भिजले घुंगुर तसे वाजले काही तरि अंधारी, आंसवांतले ध्वनि निजलेले नाचत आले दारी’ बोरकरांच्या या अशा अनेक ओळींनी कवितेतही काही नाद असतो, ताल असतो हे मला कळले. पुढे मी बोरकरांची सगळी कविता वाचली आणि त्यांच्या कवितेच्या बाजाहून अगदी वेगळी, काहीशी का, बरीचशी विरुद्ध जाणारी कविता लिहिली! आधीच्या पिढीच्या विरोधात जायचे हे पुढच्या पिढीच्या कुंडलीत लिहिलेलेच असते. नवी पिढी नवी संवेदनशीलता घेऊन येते असे म्हणायला हरकत नाही. ‘आज अंधारी रात आहे, चंदेरीदरिया नसे, तारांची बरसात आहे-’ अनिलांच्या या ओळींचे मी काय केले हे आपणास ठाऊकच आहे. ‘अहा, नई नवेली दुलहन जैसी रात, तारोंकि बरसात.’ या ओळींखाली एक गद्यपद्यात्मक वास्तवाशी परिच्छेद.
तिथेही आधीच्या पिढीतल्या एका बापाविषयी लिहिलेले होते. रात्र सुंदर असली तरी ती जागे राहण्याची होती. कवितेतील बाप मध्यरात्री कुठेतरी जायला निघतो. त्याच्या डोळ्यांतल्या मोतीबिंदूने त्याला दिसत नाही. चंद्रप्रकाश असला तरी इमारतींच्या सावल्यांनी अंधार केलेला असतो. वाटेत कुत्री झोपलेली असतात. अंधार डोळ्यांत घेऊन निघालेला तो माणूस हातातली काठी अंधारावरच फिरवतो.

या परिच्छेदाची शेवटची ओळ आहे :

‘मी उभा चिरलो.’
‘तारांची बरसात आहे, विश्व सारे स्तब्ध आहे’ या अनिलांच्या ओळी माझ्यापर्यंत पोचता पोचता बिघडून गेल्या!
मग सर्वत्र, सर्वदूर सर्व अंगांनी कवितांचा वर्षाव होत असताना मी बिघडलेल्या कविता लिहीत राहिलो.
एकीकडे सकल संतगाथेतील संतांच्या रचनांचे वाचन, मर्ढेकर-मुक्तिबोध यांच्या कवितांचा अभ्यास आणि दुसरीकडे भोवतीचे न उलगडणारे अस्ताव्यस्त वास्तव. ‘प्रेमाचे लव्हाळे, सौंदर्य नव्हाळे, शोधू ?- आसपास, मुडद्यांची रास; नाही कोणीका कुणाचा, बाप-लेक, मामा-भाचा, मग अर्थ काय बेंबीचा, विश्वचक्री; जगायची पण सक्ती आहे, मारायची पण सक्ती आहे; काळ्यावरती जरा पांढरे, ह्या पाप्याच्या हातून व्हावे; भयाणतेच्या बुरुजावरुनी, येइल केव्हा शीळ अनामिक; कधी लागेल गा नख, तुझे माझिया गळ्याला...’ अशा मर्ढेकरांच्या कित्येक ओळी मनात भिरभिरत असत. मर्ढेकरांच्या कवितांनी माझी कविते विषयीची धारणा बदलून टाकली आणि मुक्तिबोधांच्या कवितांनीही. मर्ढेकर आणि मुक्तिबोध हे दोन ध्रुव आहेत असे मानले जाते. एक निराश मानवतावादी, तर दुसरे आशावादी मानवतावादी असे वर्गीकरणही केले जाते. दोघांच्या कवितेची प्रकृती भिन्न आहे. परंतु अद्यापही मला दोघांचीही कविता महत्त्वाची वाटते. ‘जीवाची प्रचंड फेक, माझ्या पीडेला अर्थ येईल, अंत आहे तसा आरंभ आहे, हिऱ्यासम लखाखते डोळे, जेव्हा स्नेहाचे दिवे मिणमिण करू लागतात, वर्दळीत जगताना, जेव्हा आत्मा फोडासम दुखतो’ यांसारख्या त्यांच्या कवितांनी माझी कवितेविषयीची जाणीव समृद्ध केली. ‘वर्दळीत जगताना हृदय खिन्न होते, ओसरता अवचित ती, हृदय शून्य होते, आत्म्याचा डोह ऐल, पैल जगत- कोलाहल, ना इथले... ना तिथले... दिशाहीन मन बनते’ अशा अनेक ओळी लक्षात राहून गेलेल्या आहेत. मुक्तिबोधांच्या कवितेत साम्राज्यवादी-भांडवलशाहीचे विश्लेषण आहे. मर्ढेकरांच्या कवितेत नकारात्मक पद्धतीने भांडवलशाहीतील, साम्राज्यवादी व्यवस्थेतील अंतर्विरोध व्यक्त झालेले आहेत. केवळ यांमुळे या दोघांच्या कविता भावत असत असे नाही. कवितेच्या संपूर्ण रूपबंधाच्या दृष्टीने त्यांची कविता आधीच्या कवितेहून निराळी होती.
त्याच दिवसांत, नागपुरात एम.ए. करीत असताना मी माझ्या तोपर्यंतच्या लिहिलेल्या, छापलेल्या कविता जाळून टाकल्या. नाद मधुर शब्द, भावविवशता, कल्पनाच यत्कृती, उथळ अनुभव अशा गोष्टी नको आहेत असे मला वाटायला लागले. चंद्रपूरच्या, अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हासारखे काहीतरी आत चाललेले होते. मग काळे आवरण घातलेल्या एका वहीत काहीतरी लिहून ठेवायला लागलो. ती ‘योगभ्रष्ट’ ही दीर्घ कविता होती.

- 2 -
त्यावेळी आणि नंतरच्या काही काळात आमच्या पिढीतले अतिशय महत्त्वाचे कवी लिहीत होते. नारायण सुर्वे, आरती प्रभू, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, ग्रेस, महानोर, सुरेश भट, मनोहर ओक, नेमाडे, वसंत दत्तात्रय गुर्जर, तुलसी परब, गुरुनाथ धुरी, प्रभा गणोरकर, रजनी परुळेकर, चंद्रकांत पाटील, सतीश काळसेकर, नामदेव ढसाळ अशा कितीतरी कवींच्या रचना त्या काळात सत्यकथा, छंद, शब्द, अथर्व, रहस्यरंजन, असो इत्यादी नियत-अनियत कालिकांतून प्रकाशित होत असत. काहींचे संग्रह ही निघाले होते. त्यावेळची एक महत्त्वाची घटना इथे नोंदवली पाहिजे. सत्य कथेच्या 1963-64 च्या अंकांमधून दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी बोदलेअर, रँबो, जिरार्ड मॅनली हॉपकिन्स, राइनर मारिया रिल्के, इझरा पाउंड, वॉलेस स्टीव्हन्स अशा मातब्बर कवींच्या कवितांचे अपभ्रंश भाष्यासह सादर केले. अनुवादरूपात असलेल्या त्या कवितांमुळे कवितेचेच विलक्षण अनोखे रूप पहायला मिळाले. पुढे सदानंद रेगे, मनोहर ओक, विलास सारंग आदींनी विदेशी कविता मराठीत आणली. ‘असो’ मध्मे बंगाली कविता होती. चंद्रकांत पाटील, बलवंत जेऊरकर, जयप्रकाश सावंत यांनी हिंदी कविता मराठीत आणली. ही सगळी पिढी कवितेने भारलेली होती. साठच्या दशकातली ही मांदियाळी पाहून चाळीसच्या दशकातल्या पुरुषोत्तम शिवराम रेगे, अनिल, बा.भ.बोरकर, इंदिरा, कान्त, कुसुमाग्रज, मर्ढेकर, मुक्तिबोध, सदानंद रेगे, विंदा करंदीकर इत्यादी भिन्न प्रकृतीच्या कवींची आठवण होते आणि आताही नव्वदीच्या दशकात कवितेने झपाटलेल्या कवींची पिढी आलेली दिसते. विशिष्ट काळाचा आणि कवितेचा काही संबंध आहे का हे पाहिले पाहिजे. ज्यावेळी राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रांत घुसळण सुरू असते, तेव्हा सांस्कृतिक क्षेत्रात, कलाक्षेत्रातही स्थित्यंतरे होत असतात असे सामान्यत: म्हणता येईल. कविता लिहिण्याची हीच वेळ आहे असे नागरिकांना वाटत असावे, त्यातले काही नागरिक कविता लिहू लागतात. त्यातले काही नागरिक आधी जे लिहिले गेले आहे तसेच हुबेहूब लिहायचे नाही या वृत्तीचे असतात.

- 3 -
मी आजपर्यंतच्या अनेक कवींची कविता वाचत आलो आहे. कधी कधी त्यांच्याविषयी लिहीतही आलो आहे.
मराठी कवितेचेच नव्हे, तर त्या अनुषंगाने एकंदरीत कवितेचे रूप काय आहे याचा शोध घेत राहिलो आहे.
सातशे वर्षांतल्या मराठा कवितेने, भारतातल्या इतर भाषांमधल्या कवितेने, जगातल्या इंग्रजीत, हिंदीत, मराठीत भाषांतरित झालेल्या कवितेने आपली कविते विषयीची काय कल्पना झालेली आहे? कविता काय असते? तिचे रूप कसे असते? या प्रश्नांची निश्चित उत्तरे देता येतील असे नाही. तथापि केवळ मराठी कवितेकडे जरी वळून पाहिले तरी कवितेचे नानाविध विभ्रम दिसू लागतात. भाष्यकाव्य, धवळे, गौळण, भारूड, पद, आरती, विराणी, धावा, भूपाळी, पाळणा, कटाव, फटका, पोवाडा, लावणी, सुंबरान, भाव कविता, कथाकाव्य, खंडकाव्य, दीर्घ कविता, नाट्यकाव्य, नाट्यगीत, गीत, सुनीत, गझल, रुबाई, हायकू, मूर्त कविता असे अनेक बंध आपल्याला मराठी कवितेत आढळतात. या सगळ्यांचा आपण काव्यात, कविता या साहित्य प्रकारात समावेश करतो. त्यातून कवितेचा एक रूपबंध आढळतो का? माझे उत्तर नाही असे आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत कवितेची आकृती म्हणून पद्यबंधच आपल्या नजरे समोर येतो. पद्यबंध म्हणजे कोणत्या तरी छंदात वा वृत्तात असलेल्या ओळींचा गट. सर्वांत लहान गट दोन ओळींचा असू शकतो. यमक हा पद्य बंधातला, पद्याची बांधणी करणारा, अनिवार्य घटक आहे असे दिसते. वृत्तात वा छंदात नसलेल्या ओळींचाही पद्यबंध असू शकतो. यमक हे अनिवार्यपणे दुसऱ्या ओळीतच साधले पाहिजे असेही नाही. मराठीत यमक रचनेचे विविध प्रकार आढळतात आणि त्यानुसार पद्यबंधांचे वेगवेगळे आकृतिबंधही. तीन उदाहरणे देत आहे.
‘लाजण झाली धरती ग
साजण काठावरती ग
उन्हात पान
मनांत मान
ओलावुन थरथरतें ग (बोरकर)
आकाश निळें तो हरि
अन्‌ एक चांदणी राधा
बावरी
युगानुयुगिंची मनबाधा (पु.शि.रेगे)
कंठात दिशांचे हार / निळा अभिसार /
वेळुच्या रानी /
झाडीत दडे / देऊळ गडे /
येतसे जिथुन मुल्तानी / (ग्रेस)
ही तीनही पद्यबंधाची भिन्न प्रकारांतली उदाहरणे आहेत. दृश्यरूपात यमक नसलेला हा एक पद्यबंध पाहा. (इथे मी उभ्या रेषा टाकलेल्या आहेत.)
ते बघ ते बघ
दोन खेकडे बघ / ते
कसे टपलेत
कुणावर टपलेत / म्हणून काय विचारतोस
अरे तुझ्यावर
बघतायत बघ कसे
तुझ्याकडं बघतायत
आणखी कुणाकडं
कसे एकटक बसलेत (अरुण कोलटकर)
छंद, वृत्त, यमक इत्यादींची अपरिहार्यता अमान्य झाल्यानंतरही कवितेचा काही एक पद्यबंध असतो हे दिसते. उदाहरणार्थ...
आयुष्य करकर/त बंद होताना ऐकले तिन्ही सांजा, तेव्हा प्रथमच
आसपास किलबिलणारी स्वप्ने उडून गेली भरभर/ नि अचानक
सुटलेल्या वाऱ्याने खाली आली वाळलेली पाने, सुरकुत्यांची जाळी
स्पष्ट होऊ लागलेली. एकान्त पुन्हा वाजला करकर. (गुरुनाथ धुरी)
आणखी एक वेगळे उदाहरण.
दुर्योधन म्हटलं तर नावय नुस्तं
तरी अदमास येतोच येतो
येणाऱ्या पावलांचा
रावण म्हटलं तर नावय नुस्तं
तरी अदमास येतोच येतो
लंकेतल्या युद्धपर्वाचा
एकलव्य म्हटलं तर नावंय नुस्तं
तरी अदमास येतोच येतो
अंगठा तुटल्याचा.. (मंगेश नारायणराव काळे)
‘तरी अदमास येतोच येतो’ या ओळीच्या पुनरावृत्तीने या पद्यबंधाची बांधणी झालेली आहे.
कवितेला श्राव्य रूप असते, तसेच दृश्य रूपही असते. दृश्यरूपाला आपण फारसे महत्त्व देत नाही. कविता कशी छापली गेली आहे हा मुद्रण कौशल्याचा भाग आहे असे आपण समजतो. मुद्रणाचा, सुलेखनाचा उपयोग करून लिहिली गेलेली मूर्त कविता दृष्टीचा विषय असते. चित्रकलेतल्या प्रयोगात तिचा समावेश करता येईल. सरी कोसळत असल्याप्रमाणे पृष्ठावर शब्दांची रचना केल्याने ‘सरिंवर सरी आल्या ग। सचैल गोपी न्हाल्या ग’ असा प्रत्यय येतो असे नाही. कवितेच्या श्राव्य रूपाचे, नादाचे, तालाचे कवितेत काही स्थान असते का? उच्चारताना, गायन करताना कानाला गोड लागणे याशिवाय शब्दांच्या नादांचा दुसरा काही उपयोग होतो का? उदाहरणार्थ...
कंठांत दिशांचे हार। निळा अभिसार।
वेळुच्या रानी।
झाडीत दडे। देऊळ गडे।
येतसे जिथुन मुल्तानी। (ग्रेस)
या कवितेतील नादाचे कवितेतील कार्य काय? नाद आहे, ताल आहे, लय आहे. ‘मल्हार महुडे गगनी दाटले। विजु खळे गर्जिन्नले गे माये’ या ओळींतील नादांचे कार्य काय? निव्वळ नाद म्हणून काहीही कार्य नाही. मर्ढेकर म्हणतात त्याप्रमाणे काव्यात नादांना प्रतीकात्मक मूल्य असते, संगीतातल्याप्रमाणे त्यांना स्वयंभू मूल्य नसते. उच्चारताना किंवा मनात वाचताना नादांच्या प्रतिमा उमटतात, त्या शब्दांचे कमी-अधिक वजन जाणवते, तसे ते अधोरेखित होत जातात किंवा त्यांच्या खुणा उमटतात आणि त्यांच्या अर्थवत्तेत भर पडते. शब्दांना नाद असला तरी कवितेत नादांहून त्यांच्या अर्थांना महत्त्व असते. अर्थवाहक शब्दांची विशिष्ट क्रमाने केलेली रचना असे कवितेचे रूप असते. रचनेतील विशिष्ट क्रमामुळे ओळींमध्ये लय उत्पन्न होते. जसे...
स्वच्छ कोवळे ऊन लहरते
ऊन,
घरे गोपुरे कुणाकुणाची
जाती की बिलगून (ग्रेस)
कवितेच्या ओळी ओळी छंदात, वृत्तात असोत की मुक्तछंदात असोत, छंदमुक्त, मुक्त शैलीतील रचनेतही लय असते. उदाहरणार्थ.
अंधारी घरे
वाहत्या जखमे सारखे आहेत तांबडे ठिपके
आतील आगीचे (मुक्तिबोध)
मी मोरासारखा उघडतो
एका शतकाच्या दु:खाचा पिसारा
आणि थै थै नाचतो
माझ्या टाहोएवढ्या निळेपणात
आनंदाने झळझळून (दिलीप पुरुषोत्तम चित्रे)
कात टाकून सुटलंय वादळ
ढग सैरावैरा पळत
टाकताहेत ग्लोबल पाऊस सर्वदूर (प्रफु शिलेदार)
शब्दांतील नाद, ओळींमधील नादांचे आंदोलन, ताल, लय,यमक-अनुप्रासांचा वापर, छंद वा वृत्त यांची योजना, या गोष्टी कवितेच्या आजतागायतच्या वाचकांना आणि कवींना ही भावत आलेल्या आहेत यात शंका नाही. पद्य म्हणजे कविता आणि कविता म्हणजे पद्य अशी समजूत बराच काळ होती आणि अद्यापही आहे. मात्र कवितेतील शब्दांच्या अर्थांना अधिक महत्त्व असते. अर्थ असलेल्या शब्दांच्या ओळींमधून कवितेचे आंतररूप साकार होते. कवितेतील शब्द हे केवळ शब्द नसतात. त्यांना अर्थ असतो. हा अर्थ एकरेषीय नसतो. ते शब्द अर्थांची पुष्कळता व्यक्त करणारे असतात. अलंकार, प्रतिमा, प्रतीक यांच्या योजनेमुळे अर्थांची पुष्कळता जाणवते. पारिभाषिक शब्दांचा वापर न करता आपण असे म्हणू की एका शब्दापुढे दुसरा कोणता शब्द येतो यावरून त्या ओळीत अर्थाची सरलता अथवा व्यामिश्रता निर्माण होते. प्रत्येक शब्दाची स्वत:ची एक प्रतिमा असते. ती तिहेरी असते. ध्वनिप्रतिमा, अक्षरप्रतिमा आणि अर्थप्रतिमा. एखाद्या शब्दापुढे दुसरा शब्द ठेवला की दोनही शब्दांच्या एकेरी प्रतिमा सरमिसळून एक तिसरी प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे ती सबंध ओळ वाच्य अर्थाच्या पलीकडचा अर्थव्यक्त करते. उदाहरणार्थ,
फांदीसारखी झुकते सांज, जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होऊन पेंगुळ पांगळे होते जग
गगनभरल्या आठवणीचे गर्द झाडीत शिरती थवे
ओला काळोख आळत येतो उकत्या झाकत्या काजव्यांसवे (बा.भ.बोरकर)
पहिल्या दोन ओळींतल्या उपमा आणि तिसऱ्या ओळीतले रूपक अर्थचमत्कृती निर्माण करतो.
या तुमच्या दैवतांचे मीही धरले होते पाय,
मीही होत्या ओवाळल्या आरत्या आशाळभूत भक्तीने,
चौतीस वर्षे पडले नव्हते माझेही दुधाचे दात,
नव्हती एकही अक्कलदाढ माझ्याही भाबड्या जबड्यात (मंगेश पाडगावकर)
यातील तिसरी आणि चौथी ओळ केवळ वाच्यार्थाने घेता येत नाही.
हुकूमशहा गावा येणाराय
म्हणून ही मुलं खुडून आणल्येत (सदानंद रेगे)
यातील खुडून हा शब्द अतिशय प्रसरणशील आहे.
टेकड्या पहाट संथ वल्हवत असताना
उबदार बिछान्यात मांसल मायेत लोळू इच्छितं शहर (भालचंद्र नेमाडे)
पहिल्या ओळीतील वल्हवत या शब्दाने अर्थविलक्षणता निर्माण झाली आहे.
बहात्तराच्या मुडद्यावर घोंगडी एवढं कफन पांघरून
पुढं चालू... (चंद्रकांत पाटील)

या ओळीतली रूपकात्मता लक्षात घेण्यासारखी आहे.
सर्व सामान्यत: भाषेची एक नियम व्यवस्था असते. आपल्या मनात वामरचनेविषयी काही संकेत असतात. यासंकेत व्यवस्थेच्या अतिक्रमणाला विचलन म्हटले जाते. असे विचलन वरील ओळींमध्ये झालेले आहे. एकंदरीत कवितेत वामरचनेतील विचलनाने अर्थांची पुष्कळता निर्माण होत असते. ती एखाद्या ओळीपुरती मर्यादित राहत नाही. संबंध कविताच पुष्कळ अर्थांनी मुक्त असते. ही अर्थपूर्ण विधाने काय व्यक्त करीत असतात?
कविता म्हणजे केवळ वाक्ये किंवा विधाने नव्हेत. या वाक्यांतून सौंदर्याची निर्मिती होते, भावनांची, विचारांची, अनुभूतींची अभिव्यक्ती होते, कवीच्या जीवनदृष्टीचा ती आविष्कार करते. त्याचे चिंतन कवितेतून उलगडते. कवितेतून आपल्या भोवतीच्या जगाचे आकलन होते. कवितेतून कवी आत्मशोध घेतो. गावे, शहरे, वस्त्या, माणसे, घटना, प्रसंग, इतर ललित कला, पुस्तके यांचे संस्कार कवीवर होत असतात. तो स्वत:च आपल्या भोवतीच्या जगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असतो. कधीकधी संशोधक, इतिहासकार, समीक्षक कवितांचा कवि चरित्राचा, तर कधी विशिष्ट काळाचा वेध घेण्यासाठी उपयोग करत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींचा आणि विशिष्ट काळातील कवितांचा संबंध काय हे शोधण्यासाठीही कवितांचा अभ्यास केला जातो. त्या ठिकाणी कवितेचा दस्तऐवजासारखा उपयोग केला जातो. कविता ही केवळ दस्तऐवज असत नाही, कलाकृती असते.
कवितेचा आणि वास्तवाचा काय संबंध असतो? कवितेतून वास्तव व्यक्त होते, ते वास्तवाचे केवळ प्रतिबिंब असत नाही, ती वास्तवाची निर्मितीही करते. कल्पित वास्तवाच्या निर्मितीतून आपले वास्तवाचे आकलन समृद्ध करते. वास्तवाचे कवी कसे आकलन करतो यावर त्याच्या कवितेतील वास्तवाचे रूप निर्धारित असते. बाह्य जगात घडणाऱ्या गोष्टी जशाच्या तशा कवितेत येत नसतात. कवितेचे प्रेमविषयक, निसर्गपर, सामाजिक असे वर्गीकरण केले जाते. समाजवास्तव, सामाजिक जाणीव व्यक्त करणाऱ्या कवितेला अधिक महत्त्वही दिले जाते. वास्तविक पाहता कविता ही कवीच्या शारीरिक आणि मानसिक अनुभवांची अभिव्यक्ती असते. समाजवास्तव ही त्याची मानसिक अनुभूती असेल तर ती कवितेत व्यक्त होईलच, त्याचबरोबर त्याच्याकडे काही एक सामाजिक, राजकीय दृष्टिकोनही असला पाहिजे. परंतु प्रत्येक कवीने सामाजिक जाणीव व्यक्त केली पाहिजे आणि प्रत्येक कवितेत समाज वास्तव आलेच पाहिजे असा आग्रह धरणे योग्य ठरणार नाही. व्हिन्सेंट वॉन गॉगचे बटाटे खाणारे हे चित्र जसे महत्त्वाचे आहे, तसेच त्याचे गव्हाच्या शेतावरील कावळे हे चित्र ही महत्त्वाचे आहे. मराठी कवितेच्या क्षेत्रात एकाच काळात बा.भ.बोरकर, पुरुषोत्तम शिवराम रेगे होते आणि त्याच काळात मर्ढेकर आणि मुक्तिबोध हेही होते. एकीकडे चित्रे, ग्रेस आहेत, तर त्याच वेळी सुर्वे, ढसाळ हेही आहेत.
कोणत्याही काळात उथळ प्रेम कविता, वर्णनपर निसर्ग कविता आणि बटबटीत सामाजिक कविता निर्माण होतात. कधी कधी संग्राम कविता असतात, गाऊन म्हणायच्या कविता आणि हास्य कविता ही असतात. त्यामुळे लोकांचे चांगले मनोरंजन होते. अशा वेळी कवितेच्या रसिकाची कविते विषमयीची जाणीव अधिक खोल होत जाते. मंचावरून येणाऱ्या कवितेत जनतेच्या काळजाला हात घालणारे तत्त्वही असले पाहिजे, मग तो प्रेम विषयक असो, निसर्ग विषयक असो की राजकीय, सामाजिक असो. अशा कोणत्याही दृष्टिकोनाच्या अभावी बरीचशी मराठी कविता नि:सत्व निपजली आहे. कवीला कोणत्याही दृष्टिकोनाची गरज नाही, इतकेच नव्हे तर त्याला कवितेच्या बाह्य आकृतीबंधाची समज असण्याचीही गरज नाही अशी एकंदरीत कवींची आणि वाचकांचीही समजूत दिसते. गझल म्हणून म्हटल्या जाणाऱ्या रचनांकडे पाहावे. ज्याप्रमाणे कागदावरच्या अक्षरांच्या आकृतींना कविता म्हणता येत नाही, त्याप्रयाणे निव्वळ नादमधुर शब्दांचा भरणा असलेल्या ओळींनाही कविता म्हणता येत नाही, अथवा मोठा आवाज करणाऱ्या घोषणावजा विधानांना. कवितेच्या रूपाची पक्की जाणीव कवीला असावीच लागते. तशीच मूल्यदृष्टी असणेही आवश्यक असते.
कवितेचा, साहित्याचा, ललित कलांमध्ये समावेश केला जातो. कोणत्याही कलाकृतीच्या आस्वादात जसा विशिष्ट अनुभूतीचा प्रत्यय रसिकाला येतो, तसाच विशिष्ट अनुभूतीचा प्रत्यय कवितेच्या आस्वादकाला ही येतो असे म्हणता येईल. प्रत्येक कलाकृती वेगळी असते, तशीच प्रत्येक कविताही भिन्न असते. व्हिन्सेंट वॉन गॉगची ‘बटाटे खाणारे’ ही चित्रकृती पाहताना जो अनुभव मला येतो, हुबेहूब तोच अनुभव एखादी कविता वाचून येईल असे नाही. मात्र एखादी चित्रकृती पाहून जो आनंद मिळतो त्याहून कमी प्रतीचा आनंद कवितेकडून मिळतो असे मला वाटत नाही. मर्ढेकरांच्या मताशी मी याबाबत सहमत नाही. इतर कलांच्या बाबतीत अर्थनिरपेक्ष असणे/होणे कदाचित शक्य असेल, अर्थ हे कवितेचे प्राणतत्त्व आहे.

- 4 -
आपण एखाद्या कवीविषयी बोलतो, त्या कवीच्या एकंदर कवितेविषयी बोलतो. खरेतर आपण एक कविता वाचतो, अनुभवतो. प्रत्येक कविता अनन्य असते. तिचे दुसरे रूप असत नाही. परिष्कृत कविता दुसरी कविता असते. अर्थात एका कवीच्या कवितां विषयी, एका काळातल्या एकंदर कवितां विषयी बोलू नये असेही काही नाही. आपण एक वाचक असताना एकेका कवितेचा आस्वाद घेतो, आपण समीक्षक असतो तेव्हा अनेक कवितांविषयी बोलणे आपल्याला शक्य होते असे म्हणूया! एखाद्या काळातल्या कवितेविषयी लिहिताना मला राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी असे वाटते. साठ-सत्तरची दशके आंतरिक आणि बाह्य कोलाहलाची दशके होती. नव्वदचे दशक जागतिकीकरणाचे आहे. साठ-सत्तरच्या दशकात लोकशाही विषयी चिंता करावी असे वातावरण होते. आता कार्पोरेट भांडवलशाहीच्या विळख्यातून व्यक्तींना आणि समूहांना सोडवायचे कसे ही चिंता भेडसावत आहे.
माझ्या बाबतीत असे झाले आहे की मला एकेक कविता आस्वादकाळात आणि आस्वादोत्तर काळात महत्त्वाची वाटलेली आहे. उदाहरणार्थ- वामांगी (अरुण कोलटकर), महामंत्रोच्चार (दिलीप पुरुषोत्तम चित्रे), माझे विद्यापीठ (नारायण सुर्वे), पांढरे हत्ती (ग्रेस), प्रार्थना दयाघना (ना.धों.महानोर), मात्रा (संभाजी कदम), हे लांब लांब रस्ते (भालचंद्र नेमाडे), रानवट माणसांचं आगमन (विलास सारंग), धरण (दया पवार), ॲपथी (चंद्रकांत पाटील), गांधी मला भेटला (वसंत दत्तात्रेय गुर्जर), सूर्यसूक्त (सतीश काळसेकर), पोल्ट्री फार्म (गुरुनाथ धुरी), आईच्या समजुतीसाठी (नामदेव ढसाळ), मी- आत्ताच स्लिट केलेलं चिकन (हेमंत दिवटे), आत्यहत्या (मंगेश नारायणराव काळे), उंदीर (वर्जेश ईश्वरलाल सोलंकी), महापूर (प्रफु शिलेदार), टांगा पलटी घोडे फरार (सलील वाघ), मी गवताचे भारे बांधतो त्याच्या कविता (भुजंग मेश्राम), बारकोडिंगवाल्या मुली (अरुण काळे), खेळखंडोबाच्या नावानं (प्रवीण दशरथ बांदेकर), भ्रमिष्टाचा जाहीरनामा (संतोष पद्माकर पवार), गिरोबा (वीरधवल परब), श्रीपाद दत्तात्रय मांडे (मनोज सुरेंद्र पाठक), ते पाणी अस्तं (दिनकर मनवर)... इत्यादी...
ही यादी आणखी वाढवता येईल. मला या कवींच्या इतरही कविता महत्त्वाच्या वाटलेल्या आहेत. इथे ही यादी देण्याचा उद्देश असा की यांसारख्या कवितांनी माझे मन व्यापलेले असते. आणि या किती भिन्न प्रकारच्या कविता आहेत हे आपण जाणताच.
मी साठ-पासष्टच्या दशकात लिहीत होतो. आता पंच्याऐंशी-नव्वदच्या दशकात लिहिणारे कवी आहेत. एका मुलाखतीत मी बरीच नावे घेतलेली होती आणि त्याचे समर्थनही केले होते! अनेक कवी चांगले लिहीत असतात ही वस्तुस्थिती असते. साठच्या दशकात अनेक कवींनी चांगली कविता लिहिली. नव्वदच्या दशकातही चांगली कविता लिहिण्याची क्षमता असलेले अनेक कवी आहेत. ‘रक पडतो तो एवढाच की सातत्याने चांगले लिहिणारे आणि मधूनमधून लिहिणारे. मग अशावेळी अशी क्षमता असलेल्यांची नावे आपोआपच समोर येतात. याचा अर्थ इतर कवी चांगले लिहीत नाहीत असा होत नाही. त्यांची कविता आपल्या नजरेसमोर आलेली नसते एवढाच याचा अर्थ असतो.
मी बहुवचनी दृष्टिकोनाचा पुरस्कर्ता असल्यामुळे सर्व प्रकारच्या कवितेला सामोरा जातो. कोणता कवी श्रेष्ठ आहे नि कोणता कनिष्ठ हा माझा प्रश्न नसतो. हा कदाचित कवितेच्या इतिहासकाराचा असू शकेल. एक रसिक वाचक म्हणून एखाद्या कवितेने मला एक कलाकृती म्हणून काही आनंद दिला की नाही याचाच मी विचार करतो. मग त्या कवीला रसिकांनी, समीक्षकांनी काही महत्त्व दिलेले आहे की नाही हा गौण भाग ठरतो. खरे तर कवीपेक्षा कवितेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. आपली दृष्टी कवितेवर केंद्रित असली पाहिजे, कवीवर आणि त्याच्या लौकिकावर नाही.
त्यामुळेच कोणीही एकेका कवितेविषयी लिहितात तेव्हा ते खरे आस्वादन, आकलन असते. ती समीक्षा असते. याच पातळीवरून एखाद्या कवीची, एखाद्या काळातल्या कवितेची समीक्षा केली जाते, ती पुष्कळशी अधिकृत असते. एकाच काळातल्या अनेक कवींविषयी लिहायचे असते तेव्हा एकेका कवितेच्या अनुभवाचे संस्कार लक्षात घेऊनच लिहिले पाहिजे असे मला वाटते. मराठीत कवितेला समांतर जाणारी समीक्षाफारशी नाही. बरेच समीक्षक आधीच्या पिढीतल्या कवींविषयी लिहीत असतात.

- 5 -
शेवटी, आजच्या समाजात कवितेला काही स्थान आहे का हा प्रश्न समोर येतो. घराची भिंत सुशोभित करण्यासाठी पेंटिंगचा उपयोग होतो, तेवढाही कवितेचा उपयोग नाही. कवितेचा काहीही उपयोग नाही. अशी अनुपयुक्त वस्तू अद्याप टिकून आहे याचेच आश्चर्य वाटते. मी एका कवितेत म्हटलेले होते.
कवितेचा उपयोग मारण्यासाठी होत नाही की मारा चुकवण्यासाठी
स्वतंत्र, स्वत:चं बोलणाऱ्या जिभाच काढून टाकण्याच्या या युगात
कविता म्हणजे विसरून जाण्याची एक वस्तू बनते.
सुदैवाने कविता अद्याप विसरून जाण्याची वस्तू झालेली नाही. आजच्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यांच्या काळात आपल्या संवेदना, भावना, जाणीवा लखलखीत ठेवायच्या असतील तर कविते शिवाय दुसरा उपाय नाही. मल्टी लुटालुटीचा झिंग लपालपा (अरुण काळे) या अवस्थेतून, खेळखंडोबाला अनुभवाच्या खेळातून (प्रवीण बांदेकर) बाहेर पडायचे असेल, समकालीनतेच्या समद्विभुज त्रिकोणी मचाणावर बसलेल्या महावीला महापुरात (प्रफु शिलेदार) वाहून जायचे नसेल, तर रक्तात सोडलेले कविता लिहिण्याएवढे गट्‌स (वर्जेश सोलंकी) शाबूत ठेवले पाहिजेत.
काळ तर मोठा कठीण आलेला आहे. आपल्या आजच्या काळाने आपल्या समोर बरीच आव्हाने उभी केलेली आहेत. त्यात संवेदना बोथट करून टाकणारे उपक्रम आहेत. एकीकडे महाकाय वस्तुभांडारे आहेत, तर दुसरीकडे प्राथमिक गोष्टींचा अभाव असलेले बहुसंख्य लोक आहेत. उच्चभ्रूंच्या जगात कलाक्रम विक्रमाचे साधन बनली आहे. राजकीय क्षेत्रात दिशाभ्रम झालेले लोक वावरताहेत. विचारवंतांचा दुष्काळ पडलेला आहे. उद्योगपती महासत्तेच्या मृगजळाकडे धाव घेत आहेत. मध्यमवर्गाला ‘मेड इन चायना’ छाप चंगळ उपलब्ध झाली आहे. अशा आजच्याही काळात आधी म्हटल्याप्रमाणे कवीजवळ स्वत:चा असा निश्चित दृष्टिकोन असेल तर उत्तम कविता लिहिली जाईल आणि ती वाचकांच्या बोथटलेल्या संवेदनांना धारदार बनवील. किंबहुना कविता लिहिण्याची हीच खरी वेळ आहे.
बाहेरच्या जगात अनेक रस्ते आहेत, वाटा-पळवाटा-चोरवाटाही आहेत. आपल्याजवळ रस्ता आहे. हा रस्ता व्यावहारिक जगाच्या राजधानीकडे जाणारा नाही, तो शब्दांच्यापलीकडच्या मोकळ्या प्रदेशाकडे घेऊन जाणारा आहे. जिथे मोकळा श्वास घेता येईल अशी कविता ही एक जागा आहे. ही जागा उद्‌ध्वस्त करून टाकण्याचे, श्वास अवरुद्ध करून टाकण्याचे मनसुबे कधीकधी जाहीर होतात. तरी देखील कवीने आपल्या आत कविता घेऊन वाट चालत राहिले पाहिजे.
कारण कवीजवळ कवितेशिवाय दुसरे काय आहे?
 

Tags: साधन साहित्य संमेलन कविता वसंत आबाजी डहाके weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वसंत आबाजी डहाके
vasantdahake@gmail.com

वसंत आबाजी डहाके  हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. त्यांच्या 'चित्रलिपी' या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके