डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गुप्त धनाचा हंडा सापडल्याचे मधून मधून वाचायला मिळते. (भितीत खिळा ठोकताना मला तर हटकून याची आठवण येते आणि ठोका माझ्या हातावर बसतो!) रशियातल्या मेलितोपोल गावी एका घरासाठी पाया खणताना एक वस्तू सापडली. 400 स्वयंसेवक व 2000 शिपायांनी ती वाजत-गाजत शहराबाहेर नेली आणि दणक्यात दिवाळी साजरी केली. 1000 किलो वजनाचा तो 'हवाई बाँब' होता आणि 1943 सालापासून तो तेथे छुप्या हेरासारखा दडलेला होता!

* नेत्रदान *

मुंबईतल्या एका हिंदी 'सुपरस्टार'ला एका समाजकार्यकर्त्यानी गाठले. मृत्यूनंतर नेत्रदानाची व्यवस्था करण्यास विनंती केली. बड्या नटाने डोळे विस्फारले. घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला, 'आँख देने के बाद जन्नतमे क्या देखूंगा?'-'डोळे दिले, तर स्वर्गात मला कसे दिसणार?' सौ. कस्तुर हिरालाल ट्रस्टचे श्री हिरालाल किराड यांनी सांगितलेली ही अजब हकीगत. असल्या असंख्य गैरसमजुतीमुळे लोक नेत्रदानास तयार होत नाहीत, असे ते म्हणाले. तरी 20 कलमी कार्यक्रमाचा नेत्रदान मोहीम हा एक भाग आहे! गेल्या 12 वर्षांत पुण्यात फक्त 288 नेत्रदाते नोंदले गेले. हजारो गरजू मात्र दृष्टीची वाट पहात खोळंबून आहेत. श्री. किराड यांनी, नेत्रदाते घालीत असलेल्या काही अटींचीही माहिती दिली. ते एप्रिलमध्ये हाती घेत असलेल्या 'नेत्रदान-मोहिमे'ला सर्व शुभेच्छा! त्यांना शुभच्छा!

* संशोधन नवे *

डॉनियरच्या जर्मन एअरोस्पेस कंपनीने व म्युनिच विद्यापीठाने बनविलेले एक साधन, किडनीतील खडे यामुळे नष्ट केले जातात. क्ष किरणांनी खडे हेरून विजेच्या धक्क्याने त्यांचा नाश करण्याच्या या वेदनारहित उपायाने आतापर्यंत 1000 रुग्ण (ऑपरेशानच्या तडाख्यातून) सुटले आहेत.

* सुरांचा जिद्दी जोसेफ *

बेळगावचा जोसेफ जॉन सुतार. लहानपणी अपंग झालेला. पण पायाऐवजी त्याचा गळाच चालतो, जवळजवळ उडतो! कितीतरी ख्यातनाम गायकांच्या गाण्यांची नजाकत त्याच्या स्वरात ऐकावी. तो ऑर्केस्ट्रा काढीत नाही, कारण कोणावरही अवलंबून राहण्याची त्याची आता इच्छा नाही! स्टेट बँकेचे 5हजार रुपयांचे कर्ज घेऊन ध्वनिवर्धक वगैरे संच त्याने जमविला आहे. अनेक ठिकाणी त्याचे कौतूक झाले असून आकाशवाणीसारख्या मान्य संस्थेनेही त्याच्या कलेचा स्वीकार केला आहे. प्रोत्साहन मिळाल्यास अधिक मोठ्या प्रमाणावर आपल्या कलेचे चीज करीन, अशी त्याची जिद्द.

* चल, फेक! फोड! *

आपल्याकडे 'आय्. एस्.आय्.' शिक्का म्हणजे त्या वस्तूच्या दर्जेदारपणाची हमी असते, तशी अमेरिकेची 'अंडररायटर्स लॅबोरेटरीज' ही संस्था 'यूएल' शिक्का देते. 1018 एंजिनीअर्स व तंत्रज्ञ तेथे काम करतात. 88 वर्षांपूर्वीची तिची स्थापना. ना नफा ना तोटा अशी ती चालते. गेल्या वर्षी 59,621 वस्तूंची त्यांनी फोड, तोड, बुडव, फेक, जाळ, करून परीक्षा पाहिली. 9 कोटी 50 लाख डॉलर्स फी घेतली व 2 कोटी 'यू एल्' लेबल्स दिली. 'वाईट बघू नका, ऐकू नका ' असा आपल्याकडे संदेश आहे ना, तसा अमेरिकेच्या वस्तूंमधले दोष हुडकणाऱ्या एका कंपनीचा त्यांच्याकडे काम करणारांना दिलेला संदेश परवा वाचला. 'तुम्ही वाईट बघत, ऐकत नाही?-तर तुम्ही कामचुकार आहात!'

* साइकिलकी सवारी *

भारतीय सायकल कंपन्यांनी गुदस्ता प. जर्मनीतल्या प्रदर्शनात दीड कोटी रुपयांच्या ऑर्डसं मिळविल्या. आफ्रिकी व पूर्वेकडच्या देशांनी जास्त मागणी केली. 36 देशातल्या 1200 कारखानदारांनी या प्रदर्शनात भाग घेतला, सायकल बनावटीत आता प्लास्टिकचाही वापर होतो. चीनलाच 1 लाख सायकली आपण पुरवीत आहोत. इराणला 1 लाख हव्यात, तर युगांडाला 76 हजार, इंधन टंचाईवर सायकल हे एक काही मर्यादेपर्यंत वरदानच आहे खरे!

* रशियन च्यूइंगम *

स्वतःच्या धूम्रपानाला वैतागलेल्या मंडळीसाठी बातमी! रशियाने त्यांच्यासाठी एक खास च्यूइंगम तयार केले आहे. वा!-ते तोंडात टाकावे, आणि डोळे मिटावे : सिगारेट ओढल्यासारखे वाटते! हळूहळू सिगारेटची सवय सुटेल, असा अंदाज. (अर्थात या रणगाडा टाईप च्यूइंगमचेच व्यसन पुढे लागले, तर ते कमी व्हायला सिगारेट ओढावी लागते काय, हे रशियन शास्त्रज्ञांनाच विचारावे. त्यांना सरकारी परवानगी मिळाली, तर ते उत्तर देतीलही.)

* चुपके चुपके *

गुप्त धनाचा हंडा सापडल्याचे मधून मधून वाचायला मिळते. (भितीत खिळा ठोकताना मला तर हटकून याची आठवण येते आणि ठोका माझ्या हातावर बसतो!) रशियातल्या मेलितोपोल गावी एका घरासाठी पाया खणताना एक वस्तू सापडली. 400 स्वयंसेवक व 2000 शिपायांनी ती वाजत-गाजत शहराबाहेर नेली आणि दणक्यात दिवाळी साजरी केली. 1000 किलो वजनाचा तो 'हवाई बाँब' होता आणि 1943 सालापासून तो तेथे छुप्या हेरासारखा दडलेला होता!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके