डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

विडीची गोष्ट : एक महत्त्वाचा दस्तावेज

एक शतकभर ‘विडीचे गाव’ म्हणून भारत व भारताबाहेर ओळख असलेल्या गावात कालौघात औद्योगिक वसाहत काढावी अशी प्रेरणा तत्कालीन विधी मंडळातील लोकप्रतिनिधींना मिळणे याला कारण शतकभराचा हा विडी उद्योग आहे. विडी उद्योगावर औद्योगिक वसाहतीचे आक्रमण झाले असे न म्हणता उद्योगधंद्याचा हा कालोचित विस्तार झाला, असे म्हणायला हवे. औद्योगिक वसाहतीतला कामगार हा विशिष्ट तांत्रिक शैक्षणिक अर्हता धारण केलेला व प्रगत कौशल्ये आत्मसात केलेला असतो. आणि मुख्य म्हणजे हे अवजड उद्योग पुरुषप्रधान असतात. विडी उद्योग हा स्थानिक, कमीतकमी कौशल्य धारण करणाऱ्या व प्राधान्याने महिला कामगारांना रोजगार देणारा उद्योग आहे. आपल्या गावाचा व परिसराचा विकास विडी उद्योगामुळे झाला हा इतिहास आबालवृद्ध जाणतात.

‘विडीची गोष्ट’ हे डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे पुस्तक प्राय: सिन्नर येथील विडी उद्योगाच्या एका शतकाचा इतिहास उलगडून दाखवणारे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. डॉ. बोऱ्हाडे हे स्वत: सिन्नरवासीय व त्यांचे आईवडील हे विडी कामगार असल्यामुळे तसेच बोऱ्हाडे यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक गतिविधींमध्ये रस असल्यामुळे त्यांनी एक महत्त्वाचा विखुरलेला दस्तऐवज लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. लोकवाङ्‌मय गृह या बांधिलकी जपणाऱ्या नामवंत प्रकाशन संस्थेने प्रस्तुत पुस्तक देखण्या स्वरूपात निर्मितिमूल्य काटेकोरपणे जपत प्रसिद्ध केले आहे.

या पुस्तकात एकूण तेरा प्रकरणे आहेत. ‘विडीच्या गोष्टीमागील गोष्ट’ हे लेखकाचे मनोगत आहे. साथी नारायण आडणे आणि सिन्नर तालुका विडी कामगार संघाचे अध्यक्ष म्हाळू खंडू पवार यांनी हातात संघटनेचा लाल बावटा धरून बोऱ्हाडे यांच्या घरासमोर विडीचा इतिहास कथन करणारे पुस्तक लिहावे म्हणून आंदोलन केले. डॉ. बोऱ्हाडे घरी नव्हते. घरी परतल्यावर या अभिनव आंदोलनाची माहिती मिळाली. परिणामत: त्यांना पुस्तक लेखनाचा संकल्प सोडावा लागला. अर्थात याआधी याच कामाचा श्रीगणेशा त्यांनी केला होता. पण काही कारणांमुळे काम रेंगाळले होते. ही हकिकत त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केली आहे.

पहिले प्रकरण ‘समग्र समृद्ध सिन्नर’ या शीर्षकाचे असून सिन्नर शहराला भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अंगांनी परिचय करून देण्याबरोबरच स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती दिली आहे. या पुस्तकाचे आशयविश्व कळण्यासाठी ही पार्श्वभूमी उभी करणे आवश्यक होते. ‘ऐतिहासिक दुष्काळ आणि प्लेगची साथ’ या दुसऱ्या प्रकरणात तत्कालीन दुष्काळ, प्लेगची महामारी यांचा आढावा घेतला आहे. त्यात शत्रूच्या सैन्याच्या धाडी पडून प्रजेचे जे हाल होत, त्याचा उल्लेख केला आहे. ‘विडी तंबाखू पुराण’ या प्रकरणात तंबाखूचे मूळ दक्षिण अमेरिका असून पोर्तुगिजांनी तंबाखू भारतात आणल्याचे म्हटले आहे.  तंबाखू उत्पादक देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. अमेरिका व चीन हे अनुक्रमे पहिले व दुसरे तंबाखू उत्पादक देश आहेत. भारतातून सुमारे पन्नास देशांमध्ये तंबाखू निर्यात होते. सिन्नर तालुका हा पर्जन्यछायेखाली येणारा भाग असल्यामुळे इथे प्राधान्याने जिरायची शेती होती. सर्वस्वी पावसाच्या लहरीवर अवलंबून असणारी जिरायती शेती ही सतत दारिद्र्याला आमंत्रण देणारी ठरत असल्याचा सार्वजनिक व सार्वकालिक अनुभव गणला गेला आहे. अशा भागात किमान कौशल्यावर आधारित, विशेषत: महिलावर्गाला सहजपणे करता येणाऱ्या उद्योगाची गरज होती. या गरजेतून सिन्नर शहरात विडी उद्योगाचे बीजारोपण झाले.

‘महात्मा गांधी आणि विडी उद्योग’ हे प्रकरण संशयास्पद आहे. म. गांधी यांनी मद्यपान आणि धूम्रपान निषिद्ध मानले होते, असे लेखकाने या प्रकरणात नमूद केले आहे. पण सामान्यांचे सुलभ धूम्रपानाचे साधन असणाऱ्या विडी उद्योगाच्या विकासाला म. गांधी यांच्या सत्याग्रह आणि स्वदेशी चळवळीचा फायदा झाल्याचे दिसून येते, हा उघड उघड विरोधी निष्कर्ष म्हणून अनाकलनीय आहे. विडीपासून मिळणाऱ्या विरंगुळ्याचे महत्त्व म. गांधीजींना पटले होते, याची आठवण देवकिसन सारडा यांनी रामकृष्ण बजाजांच्या हवाल्याने सांगितली, असे लेखकाने लिहिले आहे. (पृ. 55) देवकिसनजी हे अभ्यासक व्यक्तिमत्त्व आहे. पण याबद्दलचा लिखित पुरावा देवकिसनजींपाशी नसेल, तर जरी रामकृष्ण बजाजांचा हवाला दिला असेल तरी ती केवळ सांगोवांगी अविश्वनीय हकिकत ठरते. एक तर कुठल्याही परिस्थितीत म. गांधी विरंगुळ्याचे साधन म्हणून विडीकाडीचे समर्थन करणार नाहीत. यामुळे म. गांधींना अधिक्षेप होतो. इतकेच नव्हे, तर रामकृष्ण बजाज व दस्तुरखुद्द देवकिसनजी सारडा यांचाही अधिक्षेप होतो. वास्तव काय असावे, या बाबत डॉ. अभय बंग यांनी वारंवार आपल्या भाषणातून व केव्हा केव्हा आपल्या लेखनात उद्‌धृत केलेली एक घटना लक्षात घेणे उद्‌बोधक ठरेल. खादी बनवण्यासाठी सूतकताई करणाऱ्या लोकांनी वेतन फारच अपुरे पडते, अशी म. गांधी यांच्याकडे तक्रार केली. खादी ही मशीनवर बनवली जात नसल्यामुळे त्यांची तक्रार स्वाभाविक होती. सूतकताई व विणणे या शरीरश्रमाने करायच्या गोष्टी असल्यामुळे उत्पादन हे फारच कमी असायचे. तशात सर्वांना कापड खरेदी करणे परवडायला हवे, यासाठी कापडाची किंमत ठेवली जात असे. यामुळे त्यांना रोजगार नाममात्र मिळत असे. महात्माजींनी विनोबांना याचा अभ्यास करायला सांगितले. विनोबाजींनी त्यांना हवा तो वेळ मागून घेतला. सहा महिन्यांनी विनोबाजी म. गांधींना भेटले. गांधीजींनी विनाबाजींना पाहताच प्रकृती एवढी का खालावली, हे आश्चर्यचकित होऊन विचारले. विनोबाजींचे तीस पौंड वजन घटले होते. सूतकर्म व विणकाम यांचा मोबदला दिवसाला एक आणा होता. विनोबाजींनी सहा महिने ही कामे करून एक आण्यावर गुजराण केली. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे विनोबाजींचे घटलेले तीस पौंड वजन. नंतर मग खादी विणणारे व सूतकताई करणारे यांच्या रोजगारात वाढ करण्यात आली. विनोबाजींसारखी व्यक्तीच असा प्रायोगिक दृष्टिकोन ठेवून व त्याची अंमलबजावणी करीत निष्कर्ष काढू शकते. (पाहा : Gandhi was misunderstood concerning Science, Frontiers of Humanity, Indian Academay of Science यांच्या विद्यमाने डॉ. अभय बंग यांनी दिलेले भाषण  या पोर्टलवर उपलब्ध. दि. 21 ऑक्टोबर 2021).

‘उद्यमशील विडी कारखानदार’ या विभागात आद्य विडी कारखानदार बाळाजी गणपत वाजे यांच्यापासून सुरुवात करीत भिकुसा यमासा क्षत्रिय, रामभाऊ निंबाळकर, बस्तीराम नारायणदास सारडा, किसनलालजी सारडा, शंकर भिलाजी चोथवे, रामनाथशेठ चांडक, चंपालाल चोरडिया प्रभृतींच्या उद्योगव्यवसायाच्या वाटचालीचा उत्तम परिचय करून दिला आहे. बाळाजी गणपत वाजे यांना भिवंडी परिसरात जनावरे चारत असताना विडी उद्योग पाहायला मिळाला. अतिशय कमी कौशल्यात आणि श्रमात तयार होणारे विडीकाम ते एका गृहिणीकडून शिकले. त्या गृहिणीला सिन्नरला आणून त्यांनी अन्य स्त्रियांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. सन 1922 मध्ये बस्तीराम नारायणदास सारडा (महेश्री) यांनी फक्त तीन कामगारांना घेऊन विडी व्यवसायाला सुरुवात केली ती अवघ्या एकोणतीस रुपये भांडवलावर. ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे. पण जवळपास सर्वच कारखानदारांनी स्वतंत्रपणे अगर भागीदारी करीत शून्यातून आपले उद्योगजगत उभे केले असल्याचे लेखकाने लक्षात आणून दिले आहे. पुढच्या काही प्रकरणांमध्ये विड्यांची व्यापारचिन्हे, पशू-पक्ष्यांच्या चित्रांचा वापर केलेली, संख्यादर्शक, मालकांच्या छायाचित्रांचा वापर केलेल्या व्यापारचिन्हांच्या हकिकती नोंदवल्या आहेत. विडी कामगार हे बहुश: निरक्षर. त्यांचे काम प्राय: हाताने चालणारे. त्यांना काही चांगले ऐकायला मिळण्याची संधी उपलब्ध करून त्यांना बहुश्रुत करावे यासाठी काही पोथ्यापुराणे, कादंबऱ्या यांच्या वाचनाचे कार्यक्रम योजून कामगारांना श्रवणानंद मिळवून देण्याचे काम काही कारखानदार करीत असत, अशी माहिती लेखकाने पुरवली आहे. विडी कारखानदार व कामगार यांचे शैक्षणिक व सांस्कृतिक योगदान उल्लेखनीय आहे. शाळा, महाविद्यालये, वाचनालय यांना जागा मिळवून देऊन वास्तू उभ्या करण्यापर्यंत आर्थिक मदत केली आहे, ती वाखाणण्यासारखी आहे. या बाबत वाजे, सारडा, क्षत्रिय, चांडकादी परिवार व कामगार यांची नावे किंवा त्यांनी सुचवलेली नावे अजरामर झाली आहेत. राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या विडी कामगारांनी व नेत्यांनी सिन्नर तालुक्यातील विधानसभा निवडणुका, दुष्काळ निवारणार्थ झालेली आंदोलने, मोर्चे, शहर विकास, शैक्षणिक सुविधानिर्मिती यात योगदान दिलेले दिसते. 1972च्या दुष्काळात शक्ती विडी कामगार सेवा संघाची स्थापना करून कामगारांना अन्नधान्याचा पुरवठा माफक दरात करण्यात आला होता. या कामी शंकरशेठ वाजे यांनी घेतलेल्या पुढाकाराची नोंद महत्त्वपूर्ण आहे. शक्ती विडी कामगार सेवा संघाच्या नफ्यातून जागा घेऊन पुढे ती सिन्नर सहकारी वाचनालयाला हस्तांतरित केली. वाचनसंस्कृतीची जोपासना करण्याच्या या कार्याला लावलेला हातभार कोण विसरेल?

उद्योग म्हटला की, तो कामगारांच्या सांघिक श्रमावर बहरतो. याच संघशक्तीचा वापर करून त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना योग्य ते वेतन मिळावे, त्यांचे सकारण-अकारण शोषण होऊ नये, यासाठी कामगार संघटना स्थापन केल्या जातात. या संघटना पक्षीय विचारसरणींशी निगडित असतात. इंटक, आयटक, विडी कामगार युनियन वगैरे संघटना काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष वगैरेंशी निगडित असून त्यांचे स्वरूप व त्यांच्या नेत्यांचे कार्य परिचित करून दिले आहे. शंकर सीताराम देशमुख, बहिरू लक्ष्मण खताळ, काशिनाथ भागुजी गोळेसर, निवृत्ती शिवाजी आंबेकर, श्रीमती इंदूबाई जाधव, पांडुरंग दगडू तिकोणे, नारायण शंकर आडणे, कॉ. गोपीनाथ म्हसाळ, दुर्वे दादा आणि दुर्वे नाना हे बंधुवर्य, सायन्न एनगंदुल, कॉ. दत्ता देशमुख, कॉ. गुलाबराव देशमुख, कॉ. राजू देसले व अन्य नेत्यांचा यथायोग्य त्यांच्या कार्यकर्तृत्वासह परिचय करून दिला आहे.

एक शतकभर ‘विडीचे गाव’ म्हणून भारत व भारताबाहेर ओळख असलेल्या गावात कालौघात औद्योगिक वसाहत काढावी अशी प्रेरणा तत्कालीन विधी मंडळातील लोकप्रतिनिधींना मिळणे याला कारण शतकभराचा हा विडी उद्योग आहे. विडी उद्योगावर औद्योगिक वसाहतीचे आक्रमण झाले असे न म्हणता उद्योगधंद्याचा हा कालोचित विस्तार झाला, असे म्हणायला हवे. औद्योगिक वसाहतीतला कामगार हा विशिष्ट तांत्रिक शैक्षणिक अर्हता धारण केलेला व प्रगत कौशल्ये आत्मसात केलेला असतो. आणि मुख्य म्हणजे हे अवजड उद्योग पुरुषप्रधान असतात. विडी उद्योग हा स्थानिक, कमीतकमी कौशल्य धारण करणाऱ्या व प्राधान्याने महिला कामगारांना रोजगार देणारा उद्योग आहे. आपल्या गावाचा व परिसराचा विकास विडी उद्योगामुळे झाला हा इतिहास आबालवृद्ध जाणतात. कालबाह्य होऊ घातलेल्या उद्योगाऐवजी कालोचित नव्या उद्यमनगरीची गरज पूर्ण करण्याचे काम सिन्नर मतदारसंघातील विधी मंडळ सदस्यांनी केले. त्यांनी त्यांचे लोकप्रतिनिधित्व सार्थ केले असे म्हटले पाहिजे.

डॉ. बोऱ्हाडे यांनी प्रस्तुत पुस्तक सिद्ध करण्यासाठी प्रस्थान ठेवले ते संशोधनाचे. ते आपल्या मनोगतात लिहिताना म्हणतात, ‘‘विद्याशाखीय संशोधनाची सवय लागलेली असल्याने, मी उद्योगाच्या स्थितिगतीविषयी संशोधन करावे, असा विचार करू लागलो... त्याविषयी विचार करीत असताना कामगार नेते बहिरू लक्ष्मण खताळ यांची दीर्घ मुलाखत मी घेतली. त्या अनुषंगाने काही संदर्भसाधने जमवत राहिलो. विडी उद्योगाविषयी काही उद्योजकांनी स्वत:च्या आत्मकथा लिहिलेल्या आहेत. त्याचे वाचन या काळात केले.’’ (पृ. 7). पण बोऱ्हाडे पोहोचले ते ‘या पुस्तकाच्या लेखनासाठी ललितगद्य शैलीचा वापर केला असून विद्याशाखीय संशोधन पद्धतीचा अल्प वापर केला आहे,’ या विधानापर्यंत. प्रस्तुत विधान हे ग्रंथाच्या शेवटच्या पानावर संदर्भ व टिपा या शीर्षकाखाली 17 वी टीप आहे. वस्तुत: एवढा उत्कृष्ट ऐवज हाताशी असताना व बोऱ्हाडे यांच्यापाशी क्षमता असताना विद्याशाखीय संशोधन पद्धतीचा घेतलेला वसा त्यांना टाकायला नको होता. यामुळे लेखनातील काही दोष टाळता आले असते. उदाहरणार्थ- ‘तेव्हा नगराध्यक्षाचे मानधन एक रुपया घेणारे काका (रामनाथकाका चांडक) हे वेगळे व्यक्तिमत्त्व होते.’ (पृ. 102), ‘रामनाथकाका चांडक यांनी नगरपालिकेकडून एक रुपयाही मानधन न घेता शहर विकासाच्या योजना राबविल्या.’ (पृ. 1). यातले कोणते विधान ग्राह्य धरायचे हा वाचकांपुढे प्रश्न पडू शकतो. शैक्षणिक संस्थांची स्थापनावर्षे नोंदवताना इतर संस्थांच्या स्थापनावर्षांच्या नोंदीबरोबर गोखले एज्युकेशन सोसायटीचे स्थापनावर्ष नोंदवायला हवे होते. पुस्तकभर माहितीची पुनरावृत्ती फार झाली आहे. याचे कारण डॉ. बोऱ्हाड्यांनी प्रसंगोपात लिहिलेले लेख (त्यांच्या म्हणण्यानुसार) पुस्तकासाठी अनुरूप करून घेतले नाहीत. असो.

प्रस्तुत पुस्तक सिद्ध करून डॉ. बोऱ्हाडे मातृभूमीच्या, मातापित्यांच्या, ज्या थोरामोठ्यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले त्यांच्या, ज्या विद्यालय-महाविद्यालयात ते शिकले त्यांच्या व इतर काही- ज्यांचा त्यांना कृपाप्रसाद लाभला त्या व्यक्ती व संस्था यांच्या ऋणातून ते मुक्त झाले आहेत. प्रस्तुत पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा लवकरच योग येणार असल्यामुळे काही बाबी सूचित केल्या. डॉ. बोऱ्हाडे यांनी विडीउद्योगाचा इतिहास सिद्ध करण्यासाठी जो उद्योग केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके