डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

3002 लोकसंख्या असलेल्या ह्या गावात 57.1 टक्के लोक सुशिक्षित आहेत आणि कामगार वर्गाची टक्केवारी 53.1 टक्के आहे. त्यातही जास्तीतजास्त कामगार दुसऱ्यांच्या शेतावर काम करतात, त्यांना स्वतःची शेती नाही. पाण्याचा ज्वलंत प्रश्न आणि त्याच्या अनुषंगाने येणारे दारिद्र्य हे बाकीच्या खेड्यांत दिसणारे चित्र येथेही ठळकपणे जाणवते. असे असले तरी येथील रहिवासी मनाने मात्र खूपच श्रीमंत आहेत, हे आम्हांला पदोपदी जाणवत होते. शहरात ऐषोआरामात राहणारी ही मुले थंडीची आणि बाकी कोणत्याही त्रासाची तमा न बाळगता आपल्या गावासाठी काही करताहेत ह्याचे त्यांना मनापासून कौतुक वाटत होते. आणि मग येता-जाता, प्रश्नावली भरून घ्यायला घरी गेल्यावर अशा प्रत्येक वेळी त्यांच्या प्रेमात आमचे विद्यार्थी आणि आम्हीही न्हाऊन निघत होतो.

देखणी खेडी’ ही संकल्पनाच किती सुरेख आहे! सध्या 'Smart Cities' चा बराच बोलबाला आहे, परंतु हेही तितकेच खरे आहे की, आजूबाजूची खेडी समृद्ध, सुंदर, आरोग्यसंपन्न आणि देखणी झाल्याशिवाय तेथून शहरांकडे वाढत जाणारा लोकांचा ओढा कमी होणार नाही. आणि त्या अनुषंगाने त्याशिवाय आपली शहरेही 'smart'  होणार नाहीत! भारत देशात एकूण लोकवस्तीच्या 68.84 टक्के लोकवस्ती खेड्यांत आणि 31.16 टक्के लोकवस्ती शहरात वास करते. देशाचा एकात्मिक विकास म्हणजे जास्तीतजास्त लोकसंख्येचा विकास! म्हणूनच खेड्यांकडे दुर्लक्ष करून फक्त शहरांच्या प्रगतीकडे लक्ष देऊन कसे चालेल? त्यात वाढतच जाणाऱ्या लोकसंख्येमुळे आधीच विद्रूप असणारी शहरे दिवसेंदिवस जास्तच बकाल आणि बेताल होत चालली आहेत. एकूणच भारतात खेड्यांची संख्याही शहरांपेक्षा जास्त असल्यामुळे खेड्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले तर त्या अनुषंगाने शहरेही जास्त प्रगत होण्यास मदत होईल.

खेड्यांमध्ये मुबलक उपलब्ध असलेली जागा, आरोग्यदायक हवा, अजून तरी प्रदूषित न झालेले स्वच्छ आणि नितळ पाणी ह्या सर्व बाबी लक्षात घेता समस्यांप्रमाणे काही उपाययोजना करायच्या ठरवल्यास, शहरांमध्ये ज्या मूलभूत अडचणी येतात त्या येथे येत नाहीत. फक्त सरकारी यंत्रणांचा तुटवडा आणि सरकारी अधिकाऱ्यांची खेड्यांत काम करताना होणारी ओढाताण- ह्या सर्व बाबींमुळे बऱ्याच सरकारी योजना गावांपर्यंत पोहोचतच नाहीत.  खेड्यांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे सर्व ठिकाणी शेती हा प्रमुख उद्योग आहे; त्यामुळे जिथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तेथे परिस्थिती भयानक आहे. आणि म्हणूनच पाण्याच्या व्यवस्थापनाचा विचार करून उपाययोजना केल्या, तर सर्व समस्या क्रमाक्रमाने सुटतील आणि समस्याग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन त्यासाठी होणे गरजेचे आहे. राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार ही दोन ठिकाणे त्याची उत्तम उदाहरणे आहेत. पाऊस उत्तम असेल तर खूप छान, परंतु कमी पाऊस असतानाही काही जलव्यवस्थापनाचे प्रयोग यशस्वीरीत्या राबवले तर नक्कीच चांगला परिणाम दिसतो. पण ह्याच गोष्टीचे प्रशिक्षण शेतकऱ्याला मिळत नसल्याने, पाऊस कमी पडला, की तो मानसिकरीत्या खचून जातो आणि आत्महत्येला सामोरा जातो. गावातील ओढ्या-नाल्यांवर छोटे मोठे बांध, उतारांवर समतल चर, प्रत्येक शेतामध्ये शेततळे आणि विहिरी व बोअरवेल पुनर्भरण ही सर्वच कामे लोकसहभागातून एकत्रितपणे केली तर त्याला फारसा खर्चही येत नाही आणि ही छोटी छोटीच कामे, जर साखळी-रचनेने योग्य पद्धतीने केली तर पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडतो तिथेच मुरायला मदत होते. तो प्रत्येक थेंब गावाच्या उपयोगी पडतो. अर्थात तो जमिनीत मुरल्यामुळे संभाव्य पुराचा धोकाही टळतो. ह्यालाच पाणलोट व्यवस्थापन म्हणतात. पूर आणि अवर्षण ह्या दोन्ही संकटांसाठी हे वरदान आहे. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्व कामांसाठी लोकांची मान्यता आणि त्यांचा सहभाग हे दोन्हीही आवश्यक आहेत.

- ही कामे ‘माथा ते पायथा’ करावी लागतात. प्रथम उंचावरच्या कामांना सुरुवात करून उताराकडे कामे वाढवावी लागतात. ह्याचा एक फायदा असा होतो की माथ्याकडे पाण्याचा ओघ आणि प्रवाहाची रुंदी व खोली कमी असते, तिथे साधे साधे बांध म्हणजे झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचे, दगड-गोट्यांचे असे कसलेही बांध उपयोगी पडतात आणि पाणी अडवण्याचे काम उत्तम रीतीने करतात. आणि तिथे उपाययोजना केल्यामुळे खाली वाहत येणारे पाणी कमी होऊन खाली बांधाव्या लागणाऱ्या structures  किंमतही कमी होते.

- प्रत्येक भागाला वेगळ्या जलसंवर्धन कामाची आवश्यकता असते. तेथील माती, उतार, हवामान, हरित आच्छादन, तेथे पडणाऱ्या पावसाचा जोर ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करणे जरुरीचे असते.

- सरकारी योजनांमधून ही कामे होतील म्हणून वाट पाहत बसण्यापेक्षा लोकसहभागातून आधी ही कामे केली आणि नंतर त्याच्या जोरावर सरकारी अनुदानाचा लाभ घेतला तर जास्त लवकर व योग्य वेळेत होतात.

- कामांची सुरुवात करण्यापूर्वी लोकांशी सर्व योजनांसंदर्भात चर्चा, संवाद होणे आवश्यक असते. त्यांना विश्वासात घेऊन ‘हे आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत आणि तुमचा सहभाग ह्यात महत्वाचा आहे,’ हे त्यांना पटवून देता आले पाहिजे.

-  शेतांमध्ये जलसंवर्धनाची कामे करायची असल्यास शेतकऱ्याला विश्वासात घेऊन त्या कामामुळे किती पाणी संवर्धित होणार आहे आणि त्याचा त्याला आत्ता आणि भविष्यातही कसा फायदा आहे, हे नीट समजावून सांगायला हवे.

बऱ्याच ठिकाणी लोकसहभागातून अशी कामे खूप यशस्वी झाली आहेत. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यातील गोडसेवाडी, दिवडी, पांढरवाडी आणि कोळेवाडी ह्या चार गावांमध्ये सयाजी शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या सहभागातून ‘सह्याद्री देवराई’चे चांगले काम गेल्या पाच-एक वर्षांत झाले आहे. सर्व नाले-ओढे, विहिरी ह्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहिली आहेत. ग्रामस्थांनी लक्षावधी बियांचे आणि हजारो झाडांचे रोपण करून देवराई फुलवली आहे. ह्याचाच अर्थ ग्रामस्थांनी मनात आणले आणि त्यांच्या इच्छेला उत्तम नेतृत्वाची साथ मिळाली तर काहीही अवघड नाही.

या सर्व बाबींचा विचार करून 2016 मध्ये के.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या (अंतिम वर्ष) विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचा विषयच ‘जलसंवर्धनातून ग्रामीण प्रगती’ हा निवडला. त्यासाठी आम्ही तीन शिक्षक आणि 15 विद्यार्थ्यांची टीम करगाव ह्या खेड्यात सर्वेक्षणासाठी दाखल झालो. आठवडाभराच्या सर्वेक्षणातून अनेक गोष्टींचे परीक्षण करता आले. मुळात खूप समृद्ध असलेले कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात वसलेले करगाव हे खेडे केवळ पावसाच्या कमतरतेमुळे खूपच समस्याग्रस्त बनले होते. एकूण आठवड्याभराच्या सर्वेक्षणानंतर आम्ही जो अभ्यास केला त्यातून बऱ्याच गोष्टी नव्याने निदर्शनास आल्या.

3002 लोकसंख्या असलेल्या ह्या गावात 57.1 टक्के लोक सुशिक्षित आहेत आणि कामगार वर्गाची टक्केवारी 53.1 टक्के आहे. त्यातही जास्तीतजास्त कामगार दुसऱ्यांच्या शेतावर काम करतात, त्यांना स्वतःची शेती नाही. पाण्याचा ज्वलंत प्रश्न आणि त्याच्या अनुषंगाने येणारे दारिद्र्य हे बाकीच्या खेड्यांत दिसणारे चित्र येथेही ठळकपणे जाणवते. असे असले तरी येथील रहिवासी मनाने मात्र खूपच श्रीमंत आहेत, हे आम्हांला पदोपदी जाणवत होते. शहरात ऐषोआरामात राहणारी ही मुले थंडीची आणि बाकी कोणत्याही त्रासाची तमा न बाळगता आपल्या गावासाठी काही करताहेत ह्याचे त्यांना मनापासून कौतुक वाटत होते. आणि मग येता-जाता, प्रश्नावली भरून घ्यायला घरी गेल्यावर अशा प्रत्येक वेळी त्यांच्या प्रेमात आमचे विद्यार्थी आणि आम्हीही न्हाऊन निघत होतो.

कोणत्याही प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी त्यातील लोकसहभाग फार महत्त्वाचा असतो, हे लक्षात घेऊन आम्ही सुरुवातच वैद्यकीय तपासणी शिबिराने केली. पुण्यातील नामवंत तज्ज्ञ डॉ. शुभांगी म्हेत्रे आणि डॉ.अमितराज म्हेत्रे, तसेच तेथील ग्रामीण आरोग्य केंद्राचे कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टर यांच्या मदतीने जवळजवळ 200 बालरुग्ण व 150 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रामुख्याने महिलांमध्ये ॲनिमिया आणि मुलांमध्ये कुपोषण दिसून आले. कार्यक्रमाचे उद्‌घाटन ग्रामीण रुग्णालयाच्या दारात रोप लावून केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी 250 घरांमधून प्रश्नावलींच्या साहाय्याने माहिती गोळा केली.

1100 हेक्टर जमिनीवर पसरलेले हे खेडे जैव-विविधता, पक्षी, झाडे-झुडुपे, वेली, ओढे-नाले आणि प्राणी ह्यांनी अगदी समृद्ध आहे. श्री. सुहास वायंगणकर ह्या पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने आम्ही शिवारफेरी मारली. गावात पोपट, गणिदास, टिटवी, पाकोळी, वेडा राघू, बुलबुल, चिमणी, सुगरण पक्षी, मोर, लांडोर, spotted dove  हे पक्षी, पांढरी सावर, विलायती चिंच, आंबा, रामफळ, सीताफळ, चिंच, बेल, पांढरी सावर, करंज, चंदन, पांढरा शिरीष, आपटा, सागरगोटा, बिट्‌ट्या, कॅशिया, सुबाभूळ, पपई, बोर, निलगिरी अशी झाडे आणि वाघाटी, आघाडा, कोरफड, निवडुंग, पिवळा धोतरा, अडुळसा, शेर, जट्रोफा अशा वेली आणि झुडुपे,  विविध प्रकारच्या नैसर्गिक संपत्ती असलेले हे खेडे अजूनही पूर्वीच्या समृद्धीच्या पाऊलखुणा जपून आहे. प्रामुख्याने मका, सोयाबीन, कापूस, तंबाखू आणि भुईमूग ही येथील पिके. एकूण 1020 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असले तरी त्यातील फक्त 120 हेक्टर जमीन बागायत आहे. म्हणजे जवळजवळ 90 टक्के शेतजमीन ही हिवाळा आणि उन्हाळ्यात पडीक राहते. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे सधन शेतकऱ्यांनी 700-800 फूट खोलपर्यंत बोअरवेल खणल्यामुळे पाण्याची पातळी आणखी खाली-खालीच जात आहे. सरकारी अनुदानातून बांधलेली 50,000 लिटर पाण्याची मोठी टाकी आणि ठिकठिकाणी बांधलेल्या 2,500 लिटरच्या लहान 36 टाक्या केवळ पाणी नसल्यामुळे निरुपयोगी आहेत.

कर्नाटक सरकारने जलसंवर्धनाची अफाट कामे सर्वत्र केली आहेत. करगावमध्येही प्रत्येक शेताच्या उताराच्या शेवटी बांधाजवळ दोन फूट रुंद, दोन फूट खोल सलग समतल चर काढून कोट्यवधी लिटर पाण्याच्या संवर्धनाची सोय करून ठेवली आहे. गावात एक मोठा बंधारा आणि एक मोठा percolation tank  बांधला आहे जो पावसाळ्यात जरी फक्त एकदा पूर्ण भरला तरी गावात पाण्याची अडचण भविष्यात कधीच भासणार नाही. ओढ्यावर तर अगणित बंधारे आहेतच, त्यामुळे

चार-पाच मोठे पाऊस झाले तर पाण्याचा प्रत्येक थेंब नि थेंब ह्या बंधाऱ्यांमध्ये अडेल आणि कोट्यवधी लिटर पाणी भूगर्भाला जाऊन मिळेल; पण दुर्दैव असे की गेल्या दहा वर्षांत गावात धो धो पाऊस झालाच नाही. आल्याच तर पावसाळ्यात आठवड्यात दोन-चार सरी येतात आणि माती भिजवून तेवढीच खरीप पिकाची देणगी देऊन जातात! मोजक्याच लोकांना रब्बी पिकाचे वरदान आहे. केवळ पाण्याचे दुर्भिक्ष हीच मोठी समस्या!

वसुंधरा लवंगारे मॅडमच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी 250 घरांचे सर्वेक्षण केले. त्यातूनच एक प्रयत्न म्हणून एका घरासमोर 4 फूट बाय 4 फूट बाय 4 फूट आकारमानाचा शोषखड्डा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी हा खड्डा स्वतः श्रमदानातून केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे कौतुक होतेच! सुदाम, रोहन, प्राजक्ता, धीरज, मकरंद, अनिकेत, सुकन्या, स्नेहल ह्या सर्वांनी हे काम खूप उत्साहाने केले. खड्‌ड्यामध्ये फिल्टरचे थर घालून पावसाचे पाणी, न्हाणीघरातील पाणी त्यात सोडण्याची व्यवस्था केली. मानसिंग, अमोल, ऋषिकेश, प्रसाद, तन्मय, सुहास आणि रियाझ यांनी फिल्टरचे थर घालण्याचे काम हसतखेळत केले.  एका शोषखड्‌ड्यात एका वेळी 1200 लिटर पाणी जमिनीत मुरू शकते. म्हणजेच वर्षभरात पावसाच्या पाण्याचा आणि सर्व वाया जाणाऱ्या पाण्याचा निचरा होऊन जवळजवळ 10 लक्ष लिटर पाणी फक्त एका शोषखड्‌ड्यामुळे मुरते. अशा दहा ठिकाणी शोषखड्डे पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचा भाग म्हणून खणून दिले आहेत. तसेच प्रत्येक शेतात एक 12 मी. बाय 12 मी. बाय 3 मी. आकारमानाचे शेततळे केले, तर एका मोठ्या पावसात 4 लक्ष लिटर पाणी जमिनीत मुरते. अशी पाच शेततळी तिथे शेतकऱ्यांच्या खर्चाने करून दिली आहेत. असे कमीतकमी पाच तरी मोठे पाऊस ह्या गावात होतात असे गावकऱ्यांनी सांगितले. म्हणजे एका शेततळ्यातून 20 लक्ष लिटर पाणी दर वर्षी भूजलाला जाऊन मिळते. प्रत्यक्षातही ह्याचे फायदे खूप झाले आहेत. खालील बाजूला असलेल्या विहिरींना बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. माती वाहून जाऊन वाया जाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. ज्या शेतात शेततळे घेतले आहे तेथील पिकांचा दर्जा आणि एकूण प्रमाण वाढले आहे. असे प्रत्येक ठिकाणी पाणी शेततळी आणि शोष खड्‌ड्यांच्या मदतीने जलसंवर्धन केले तर मग करगावच काय, सगळीच खेडी ह्या अशा उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे समृद्ध होतीलच ह्यात शंकाच नाही! यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न मात्र हवेत!

महिला व विद्यार्थी यांच्याशी जवळीक साधण्यासाठी आम्ही शिक्षकांनी मी आणि गुरुराज कट्टी सरांनी शाळेच्या पटांगणात रोज सकाळी 6 ते 7.30 योगवर्ग घ्यायला सुरुवात केली. प्रतिसाद खूप छान मिळाला. त्यांना आमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. शेवटच्या दिवशी वर्गाला 45 विद्यार्थी आणि 10 महिला होत्या.  प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना रोपांना मल्चिंग करून रोज पाणी घालण्याचे धडे दिले. उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना 10 वी नंतर पुढील शिक्षणाच्या वाटांसंदर्भात श्री. उमेश माळी यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रोजच्या व्यायामासाठी सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे, हे सूर्याची 12 नावे त्यांच्याकडून म्हणवून घेऊन पटवून दिले.

सध्या गावात 32 बचत गट कार्यरत आहेत. त्या माध्यमातून येथील महिला कापड व्यवसाय, शिलाई, शेवया, शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय करून आर्थिक भार उचलत आहेत. परंतु त्यात काही सुधारणा करून नव्या विचाराने काही आधुनिक शेतीपूरक उद्योग केले, तर येथील सामाजिक व आर्थिक भरभराटीला मदत होईल असे प्रतिपादन कोल्हापूरच्या उद्योजिका सौ. वृषाली खोत यांनी बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन करताना केले. जमलेल्या पैशाचा विनियोग महिलांनी बीजनिर्मिती, सेंद्रिय खतनिर्मिती आणि नर्सरी उद्योग ह्यांसाठी केला तर जल अवर्षणाच्या संकटाला तोंड देण्यास मदतही होईल आणि महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीही होतील. तसेच शेताचा किंवा घरासमोरच जमिनीचा छोटासा तुकडा जरी कोरफड, तुळस, गवती चहा, अडुळसा ह्यांच्या शेतीसाठी वापरला आणि ते उत्पादन आयुर्वेदिक कंपन्यांना उपलब्ध करून दिले तरी बचत गट स्वावलंबी व्हायला मदत होईल. मोठ्या प्रमाणावर पिकत असलेल्या मका, शेंगा आणि सोयाबीन यांचे पदार्थ तयार करून घरात वापरून उरलेले विकले तर महिलांचे आरोग्य आणि आर्थिक घडी दोन्हीही सुधारेल. वृषालीतार्इंनी असे बरेच मार्ग महिलांना सांगितले.

श्री.कृष्णराव माळी यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण उद्योगांच्या प्रगतीचे महत्त्व काही उदाहरणे देऊन पटवून सांगितले. गावातील आधुनिक ‘कमते डेअरी’ला आम्ही भेट दिली. तेथे शेतकऱ्याच्या आधुनिकतेचे दर्शन घडले. 20 गायी, 5 म्हशी यांचे रोज 200 लिटर दूध गोकुळ डेअरीला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रवाना होते. सर्व प्रक्रिया संगणकाद्वारे केली जाते. त्यांनी सर्वच गोष्टींना आधुनिकतेची जोड दिली आहे. कडबा कापण्याचे मशीन, बीजारोपण यंत्र आणि स्वयंचलित दूध काढण्याची व भरण्याची यंत्रणा, हे सर्वच आश्चर्यचकित करणारे होते. एवढेच नव्हे, तर hydro fracturing  चे अत्याधुनिक शास्त्र, जे अजून शहरांमध्येही प्रगत झाले नाही ते कमते सरांनी आपल्या शेतात वापरले आहे. शहराच्या आधुनिकतेची भुरळ पडून स्वतःची गावे सोडून शहराकडे पळणाऱ्या तरुणांना हे खरेच एक छान प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे 20-25 कमते सर प्रत्येक खेड्यात निर्माण झाले तरी प्रत्येक खेडे नक्कीच स्मार्ट होईल.

असे म्हणतात की, एखादे काम जिद्दीने आणि धडाडीने केले तर त्याला नशिबाचीसुद्धा साथ मिळते. आम्ही हे सर्वेक्षण डिसेंबर 2016 मध्ये केले आणि लगेचच्या जून महिन्यात ‘न भूतो न भविष्यति’ असा मनसोक्त पाऊस तेथे झाला. 30 वर्षांच्या भयाण दुष्काळाच्या इतिहासानंतर तेथील ग्रामस्थांना हा खूपच सुखद अनुभव होता. आम्ही केलेल्या प्रयत्नांना निसर्गाची अशी साथ लाभली. आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत तेथे राहून सर्वेक्षण केल्यामुळे तेथील स्थानिकांना कौतुक वाटलेच; पण स्वत:ही स्व-ग्रामासाठी नवे काहीतरी करावे अशी ऊर्मी त्यांच्यात निर्माण झाली. त्याचाच एक भाग म्हणून दर सोमवारी गावात बाजार भरू लागला, ज्यामुळे तेथील स्थानिक पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही उत्पन्नाचे साधन मिळाले.

एकूणच ‘करगाव’ हे समृद्ध आहेच; पण फक्त पाण्याच्या उपस्थितीविना त्याची रया गेली होती. शेतांमधील माती उत्कृष्ट आहे, विहिरींचे पाणी चविष्ट आहे, जैव विविधता भरभरून आहे, गाव स्वतःची नैसर्गिक ओळख अजून टिकवून आहे - फक्त गरज आहे पावसाच्या वरदानाची! वरुणदेवाने साथ दिली तर करगावसारखी बरीच खेडी ‘सुजलाम सुफलाम’ होतील आणि आपला भारत देश ‘स्मार्ट’ व्हायला वेळ लागणार नाही. गावांमध्ये अमर्याद निसर्ग उपलब्ध आहे. तसेच इथे शहरांप्रमाणे गर्दी नसून अमर्याद जागा उपलब्ध आहे - गावांमध्ये आणि येथील माणसांच्या मनांमध्येही! दोन्हींचा उपयोग करून आपली खेडी नक्कीच ‘स्मार्ट’ करू शकू हा एक दृढ आत्मविश्वास आम्हांला ह्या आठवड्याभराच्या सर्वेक्षणाने दिला.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विदुला स्वामी,  कोल्हापूर
vidulaswami@gmail.com

प्राध्यापक, के.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर
 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके