डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विचारांच्या क्षेत्रात पाऊल टाकताना मला आत्मविश्वास देणारे साधना साप्ताहिक

आज जगभर धार्मिक उन्मादाचे राजकारण वाढलेले आहे. भारतासारख्या देशात तर त्याने लोकशाहीच्या मार्गानेच सत्तेच्या केंद्रस्थानी जागा मिळवलेली आहे. या पार्श्वभूमीवर धर्मचा बहुप्रवाही अंगाने इतिहास समजून घेणे गरजेचे वाटते आहे. म्हणजे ज्या-त्या धर्माचा सुरुवातीचा संदर्भ काय होता; त्यांचे  धर्मसंस्थेत रूपांतर केव्हा आणि काय संदर्भात झाले- हे सगळे मुळातून समजून घेतले पाहिजे. नव्या पिढीपुढे माझ्या नजरेच्या आवाक्यात नसलेलेही किती तरी प्रश्न असतील. परंतु ही नवी पिढी आधीच्या न सुटलेल्या प्रश्नांसह नव्या प्रश्नांचाही मुकाबला आत्मविश्वासाने करेल अशी खात्री वाटते आणि नव्या पिढीत तसा आत्मविश्वास देण्याचे काम साधनाच्या माध्यमातून या पुढेही घडत राहील, अशी खात्री वाटते आहे.
 

दर वर्षीचा 8 मार्च म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा खजिना असतो. बऱ्याचदा त्या आठवणींमध्ये सलग क्रम नसतो. त्यामुळे हा लेख म्हणजे सलग क्रम नसलेल्या अशा 8 मार्च आणि साप्ताहिक साधना यांच्या संदर्भातील माझ्या निवडक आठवणी आहेत.

1972 मध्ये स्वातंत्र्य मिळून 25 वर्षे झाली होती. साधना या साप्ताहिकाचा एक अंक अनिल अवचट यांनी संपादित केला होता आणि त्यात राजा ढाले यांनी लिहिलेल्या लेखात ‘देशाचा झेंडा म्हणजे काय?’ असा प्रश्न उपस्थित करून त्याची तुलना एका फडक्याशी केली होती. त्यावर बराच गदारोळ झाला. त्याचदरम्यान दलित पँथरमध्ये ढाले विरुद्ध ढसाळ असा वैचारिक वादही सुरू झालेला होता. दलित चळवळीने बौद्ध धर्मांतराच्या दिशेने जावे की जाति-उच्चाटनाच्या क्रांतीची वाट धरावी, हा त्या वादाच्या गाभ्याचा मुद्दा होता. या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाच्या त्या अंकाची खूप चर्चा झाली. त्यानंतरच्या साधनाच्या एका अंकाची अतिथी संपादक (आंतरराष्ट्रीय महिलादिन 1975) म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. आज त्या घटनेकडे मागे वळून पाहताना जाणवते आहे की, त्या निमित्ताने खूप महत्त्वाचे काम माझ्या हातून घडले.

त्या वेळी माझ्या अवती-भोवतीची बहुतेक मित्रमंडळी ही मार्क्सवादी आणि समाजवादी विचारांची होती. सामाजिक परिवर्तनाच्या शक्यता नवी उमेद देत होत्या. युक्रांद., मागोवा, दलित पँथर, आदिवासी चळवळींनी जोरदार आव्हान उभे केले होते. एकूण वातावरणच परिवर्तनमय झालेले होते. कुमार सप्तर्षी यांनी तर थेट शंकराचार्यांची प्रकट मुलाखत घेऊन वर्णाश्रम धर्माच्या विषम विचारांना आव्हान उभे केले होते. मला तेव्हा मार्क्सची मांडणी महत्त्वाची वाटत होती. मार्क्सवादातील वर्गीय आंतर्विरोध समोर आणणारी धारदार मांडणी ही समाजवादापेक्षा महत्त्वाची आहे, असे वाटत होते. अशातच साधनाचे तेव्हाचे संपादक व समाजवादी असलेले यदुनाथ थत्ते यांनी सांगितले की, ‘तू 8 मार्चच्या निमित्ताने साधनाच्या अंकाचे संपादन कर.’ त्यावर मला काहीसे दडपण आले. परंतु त्यांनी आत्मविश्वासही दिला. ते म्हणाले, ‘‘अगं, सहज जमेल तुला ते. मला खात्री आहे.’’ मग मी मोठ्या उत्साहाने अंकाचे काम सुरू केले.

त्यानंतर अंकासाठी जवळच्या मित्र-मंडळींना लिहिते केले. जयंत लेले यांचा लेख त्या अंकात होता. लोहियांच्या मांडणीतील योनिशुचितेच्या मुद्याची चर्चा त्या अंकात केली गेली होती. त्यापूर्वी साधनाच्या अंकात अनिल अवचट यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखामध्ये बिडी वळणाऱ्या, मसाला कुटणाऱ्या अशा कष्टकरी स्त्रियांच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे तपशील नोंदवलेले होते. त्यामुळे मी संपादित केलेल्या अंकात कष्टकरी स्त्रीचे बाईपण आणि मध्यमवर्गीय स्त्रीचे बाईपण यांच्यातील आंतर्विरोध अधोरेखित करता आले.

त्या वेळी मी पुना कॉलेजमध्ये शिकवत होते. पूना कॉलेज हे मुस्लिमबहुल कॉलेज होते. तिथे गाडगीळ नावाचे एक प्राध्यापक होते. ते मला म्हणाले, ‘अहो तुम्ही संपादित केलेला साधनाचा अंक पाहिला. मला वाटलेच की, तुम्ही समाजवादी गटातल्या असणार! तुम्हा समाजवाद्यांचे हे बरे असते, तुम्हाला ब्राह्मण असण्याची भीती नसते. तुम्ही वाट काढता बरोबर त्यातून.’ गाडगीळ यांनी केलेल्या उपहासाने मी गोंधळले होते. त्यातून मला स्वत:लाच काही प्रश्न पडले. समाजवादी ब्राह्मण आणि मार्क्सवादी ब्राह्मण यात काय फरत असतो? त्यातील जातवर्गीय बाईपण कसे घडते? कष्टकरी वर्गजातीतल्या बाईपणाशी त्याचे काही नाते असते का?

साधनाच्या त्या अंकाची उभारणी चालू असताना समाजातील आंतर्विरोधांना समजून घेण्याच्या दिशेने प्रवास गतिमान झाला. विशेषत: स्त्री-प्रश्नाच्या संदर्भात माझे आकलन विकसित होत जाण्यातील तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्या काळात स्त्री-प्रश्नाला हात घालणारे मोजकेच चित्रपट निर्माण झाले होते आणि तेही ‘सुजाता’ सिनेमासारखे एकरेषीय स्वरूपाचे होते. स्त्रियांची अदृश्यता समजून घेण्यासाठी दृष्टिकोन देणारी सैद्धांतिक मांडणीही त्या काळात विकसित झालेली नव्हती आणि थोडीफार झालेली मांडणी कुणापर्यंत फारशी पोहोचलेली नव्हती. त्या काळात साधनाचा स्त्री-प्रश्न हाताळणारा अंक प्रकाशित होणे ही खूप महत्त्वाची बाब होती. तो संपूर्ण अंक स्त्री-प्रश्नावर चर्चा करणारा नव्हता, त्यातील एक भागच स्त्री-प्रश्नाची चर्चा करणारा होता. परंतु तरीही त्या काळाच्या संदर्भात यदुनाथ थत्ते यांनी दाखवलेले धाडस आणि माझ्यावर टाकलेला विश्वास नक्कीच महत्त्वाचा होता.

त्या अंकात फारसे जहाल असे काही नव्हते, परंतु चांगली वैचारिक मांडणी होती. आज आपल्या समोर जे आंतर्विरोध तीव्रपणे दिसत आहेत, त्यांची बीजे त्या अंकात स्पष्टपणे आहेत. त्यातील स्त्रीवादी मांडणी ही त्या वेळेच्या संदर्भात खूप महत्त्वाची होती.

त्यानंतर ताराबाई शिंदे यांच्या स्त्री-पुरुष तुलना या मांडणीतील आशय घेऊन ‘विमेन रायटिंग इन इंडिया’ या प्रकल्पात विभागीय संपादक म्हणून मी काम केले. त्या वेळी नॉर्दन अँथ्रोपोलॉजीची मांडणी समोर आलेली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘विमेन रायटिंग इन इंडिया’चे काम करताना असा पडला की, दक्षिण आशियातील भारतासारख्या विविध प्रांत, भाषा, संस्कृती असलेल्या देशातील स्त्रियांच्या लिखाणातील प्रश्न कसे पाहायचे? त्यांचे एकमेकांशी काही जोडलेपण आहे का? मग त्यातून हाही प्रश्न पडला की, भारत नावाची विविधतेत एकता असलेली नेहरूवादी चौकटीतील कल्पना वास्तवात आहे का?

‘विमेन रायटिंग इन इंडिया’चे दोन खंड न्यूयॉर्क फेमिनिस्ट प्रेसच्या पुढाकाराने निघाले होते. त्यामागेही काही राजकारण होते, असे म्हणता येईल. परंतु त्या प्रकल्पात विभागीय संपादक म्हणून काम करताना असलेले भान आणि साधनाचा अंक संपादित करतानाचे भान यात जोडलेपण होते. या प्रवासातच टोकदार प्रश्न विचारण्याची ताकद येत गेली आणि साधनाच्या त्या अंकापासूनच भान घडण्याचा प्रवास सुरू झाला, हे मी नम्रपणे नोंदवू इच्छिते.

‘न्यूयॉर्क फेमिनिस्ट प्रेस’च्या संपादक मंडळातील सुझी थारू, के. ललिता यांच्याशी भेटी होऊ लागल्या. त्यांच्याशी चर्चा करता येऊ लागल्या. त्यातून फुको, डेरिडा, पोस्टमॉडर्न विचार यांचा परिचय झाला. तेव्हा झेरॉक्स मशीन बाजारात आलेले होते. त्यामुळे प्रकल्पाचा भाग म्हणून वेगवेगळ्या विचारांचे निवडक साहित्य आमच्या हाती पडले. बरीच वाचनालये धुंडाळता आली. दुर्मिळ पुस्तके पाहता आली. त्यातील विविध स्त्रियांचे लिखाण, त्यावरची समीक्षा गोळा करता आली. त्यातून विचारांचा कसदार प्रवाह मला समजून घेता आला.

साधनाचा तो अंक जेव्हा मी संपादित केला, तेव्हा स्त्री-प्रश्नासंदर्भात माझा खूप अभ्यास होता असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्यातून माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यातील एक महत्त्वाची बाब इथे नोंदवणे आजच्या संदर्भात खूप महत्त्वाचे ठरेल. ती बाब अशी की, तेव्हाच्या संदर्भात स्त्री-प्रश्न हा एक नवा विचार होता आणि त्या नव्या विचाराचे साधनाच्या अंकातून स्वागत केले गेले. नवा विचार आला आणि लगेच तो स्वीकारला गेला, असे होत नसते. परंतु नव्या विचाराचे स्वागत करण्याचा लोकशाहीवादी व्यवहार खूप गरजेचा असतो. मुक्तिवादी ज्ञानव्यवहार अशा लोकशाहीवादी भूमिकेतूनच विस्तारत असतो.

त्याचदरम्यान नामदेव ढसाळ यांचा उचकटवणारा ‘स्वातंत्र्य हे कोणत्या गाढवीचं नाव आहे?’ हा प्रश्न गाजत होता. त्याला अत्यंत ब्राह्मणी अशा प्रतिक्रिया येत होत्या. अनिल अवचट यांच्या मांडणीतून ‘डॉक्टर जगवतात की नागवतात?’ अशी वर्णनात्मक, अनुभववादी वाट निर्माण झाली होती. ब्रिटिशांनी उभारलेल्या शिक्षणव्यवस्थेद्वारे निर्माण झालेल्या वासाहतिक प्रभुत्वाला प्रश्न विचारण्याचा तो समृद्ध काळ होता. परंतु हीच पार्श्वभूमी इंदिरा गांधी यांना भयावह वाटली होती आणि त्यातून पुढे घडलेला आणीबाणीचा इतिहास सर्वश्रुत आहेच.

एकीकडे डाव्यांपासून ते उजव्यांपर्यंत आणीबाणीला विरोध करणारी अलायन्स तयार झाली होती, तर दुसरीकडे आपल्याला मजबूत अशा स्टेटची गरज असून आणीबाणी म्हणजेच मजबूत स्टेट अशी मार्क्सवाद्यांकडून मांडणीही समोर येत होती. आंतर्विरोधांची गतिशीलता कमाल पातळीवर पोहोचलेली होती. त्या काळाला कृतीच्या पातळीवर भारावलेला आणि विचारांच्या पातळीवर झपाटलेला काळ असेही म्हणता येऊ शकेल. त्यामुळे माझ्यासारखी लव्हाळी होऊन जगू पाहणारी असंख्य माणसे त्याच काळात नवा विचार करू लागली.

नंतर स्त्री-प्रश्न चर्चेत येऊ लागला. शहरी मुलींच्या छेडछाडीची काही प्रकरणे घडली. त्या पार्श्वभूमीवरच एकदा बाबा आढाव यांनी असा मुद्दा उपस्थित केला की, ‘ग्रामीण भागात अशा फॅशनेबल मुली दिसत नाहीत. मग त्यातून असूया आणि त्याची टिंगल करावीशी वाटणे स्वाभाविक आहे. त्यात आश्चर्य का वाटावे?’ त्याच दरम्यान नीता हेंद्रे खून प्रकरण चर्चेत आले. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या पुढाकारात एक मोर्चा आयोजित केला गेला. त्या वेळी अशीही चर्चा सुरू झाली होती की, ‘कोणत्या जातीच्या मुलीवर अन्याय झाला यावर हे ठरते की कोण प्रतिक्रिया देणार?’ दलित, आदिवासी, ओबीसी मुलींवर अन्याय झाला तर शहरी ब्राह्मणी स्त्रीवादी मंडळी प्रतिक्रिया देत नाहीत, असा आक्षेप त्या वेळी घेतला जात होता. नीता हेंद्रे खून प्रकरणाच्या निमित्ताने निघालेल्या मोर्चात मी सहभागी झाले आणि जात व स्त्रीप्रश्न यांच्यातील गुंतागुंतीला समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले.

एक-एक धक्कादायक घटना घडत होत्या. त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी लोक संघर्ष उभारत होते. परंतु घटना कोणाच्या संदर्भात घडली आहे यावरून त्या संघर्षात कोण भाग घेणार, हे ठरत होते. त्यातून ध्रुवीकरण होत होते. जात प्रश्न आणि स्त्री-प्रश्न हे एकमेकांच्या परिघांना घासू लागले होते. त्यांची गुंतागुंत समोर येऊ लागली होती. त्याचवेळी व्यवहारात स्वमग्नता वाढत चालली होती. जात आणि संघटना यांचे सामुदायिक अहंकार बळावत चालले होते. त्यामुळे आज असे वाटते की, लिंगभावाचा आणि जातीचा प्रश्न त्या-त्या काळात कोणी कसा मांडला, हे तपासायला हवे.

जेव्हा लिंगभावाचा प्रश्न चर्चेत येऊ लागला, तेव्हा सुरुवातीला जातीच्या प्रश्नाला जोडून लिंगभावाचा विचार समजून घेतला गेला नाही. पुढे बराच काळ त्याकडे सोईस्कर दुर्लक्षही केले गेले, तर दुसरीकडे जातीचा प्रश्न हाताळणाऱ्यांनी लिंगभावाच्या प्रश्नाला महत्त्व दिले नाही. लिंगभावाच्या विचारांचा संबंध हा पाश्चात्त्य विचारांशी जोडून त्याला मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. पुढे याच पार्श्वभूमीवर भारतीय संदर्भात स्त्री-प्रश्नाची मांडणी सैद्धांतिक पातळीवर करण्याची गरज असल्याचे मत मांडले गेले.

परिवर्तनाच्या क्षेत्रात लिंगभावाच्या मुद्यांप्रमाणेच संस्कृतीचा मुद्दाही नव्याने चर्चेत येऊ लागला होता. मार्क्सवादी चळवळीत ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ हे मार्क्सवचन जोर देऊन सांगितले गेले. परंतु धर्म हे मासेसचे अंतर्मनात सांत्वनही करते, याकडे दुर्लक्ष केले गेले. मग आसाराम बापू किंवा ‘तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ अशा घोषणांना कष्टकरी आणि मध्यमवर्गीय समूहातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जाऊ लागला. पण त्याच मासेसने पगारवाढ हवी किंवा कायमस्वरूपाच्या नोकऱ्यांसाठी मार्क्सवादी चळवळींना जवळ केले होते. अगदी आठ मार्च साजरा करतानाही कष्टकरी स्त्रियांच्या आर्थिक प्रश्नांवर भर दिला जात होता. दिग्गज मार्क्सवादी मंडळीही आर्थिक प्रश्नाला प्राध्यान्य देत होती, बेरोजगारीचा प्रश्न हाताळत होती. परंतु तेच बेरोजगारांचे लोंढे धार्मिक कार्यक्रमांना का प्रतिसाद देत आहेत याकडे दुर्लक्ष होत होते. महालक्ष्मीच्या मंदिरासमोरील बायकांची गर्दी किंवा त्यांचे अंगात येणे याकडे केवळ ‘व्हिक्टिमहूड’ या चौकटीत पाहिले जात होते.

आज जगभर धार्मिक उन्मादाचे राजकारण वाढलेले आहे. भारतासारख्या देशात तर त्याने लोकशाहीच्या मार्गानेच सत्तेच्या केंद्रस्थानी जागा मिळवलेली आहे. या पार्श्वभूमीवर धर्मचा बहुप्रवाही अंगाने इतिहास समजून घेणे गरजेचे वाटते आहे. म्हणजे ज्या-त्या धर्माचा सुरुवातीचा संदर्भ काय होता; त्यांचे धर्मसंस्थेत रूपांतर केव्हा आणि काय संदर्भात झाले- हे सगळे मुळातून समजून घेतले पाहिजे.

नव्या पिढीपुढे माझ्या नजरेच्या आवाक्यात नसलेलेही किती तरी प्रश्न असतील. परंतु ही नवी पिढी आधीच्या न सुटलेल्या प्रश्नांसह नव्या प्रश्नांचाही मुकाबला आत्मविश्वासाने करेल अशी खात्री वाटते आणि नव्या पिढीत तसा आत्मविश्वास देण्याचे काम साधनाच्या माध्यमातून या पुढेही घडत राहील, अशी खात्री वाटते आहे.

(1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे झाले होते, तेव्हा साधनाच्या एका अंकाचे अतिथी संपादक या नात्याने काम केलेल्या विद्युत भागवत यांचे 46 वर्षांनंतरचे मनोगत मननीय आहे, चिंतनीय आहे. - संपादक)

Tags: लोकशाही अतिथी संपादक आंतरराष्ट्रीय महिला दिन यदुनाथ थत्ते विद्युत भागवत yadunath thatte vidyut bhagwat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विद्युत भागवत,  पुणे

स्त्रीवादी लेखिका, साहित्यिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके