डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सुरुवातीला असलेला वाऱ्याचा जोर मंदावला होता. पण पावसाच्या धारा वाढल्या होत्या. ओल्या मातीवर पाउस पडून सुरेख असा सुगंध आसमंतात पसरला होता. थोडा वेळ अपूला मजा वाटली. पण पावसाचा जोर अधिकच वाढला व वाराही जोराने वाहू लागला तेव्हा तो घाबरला. दुर्गाच्या जवळ जाऊन तो तिला बिलगला. दुर्गा म्हणाली, ‘‘घाबरू नकोस. ये, माझ्या पदराखाली मी तुला घेते म्हणजे पाऊस लागणार नाही. हा पाऊस काही फार वेळ पडणार नाही. मी पावसाचे गाणे म्हणते, तूही माझ्याबरोबर म्हण. म्हणजे पाऊस थांबेल.’’

‘लिंबाच्या झाडावर करवंदे आलीत...

पावसा, पावसा, निघून जा, निघून जा...’

तेवढ्यात दूर कोठेतरी वीज चमकली आणि काळ्या आभाळात काही क्षण भक्क  प्रकाश झाला. अपू अधिकच घाबरून दुर्गाला चिकटला. पावसाचे थेंब त्यांना भिजवीत होते.

आणखी काही दिवसांनंतरची गोष्ट.

त्या दिवशी ‘पवित्र तळ्या’चा सण होता. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या सुखी जीवनासाठी परमेश्वराची आळवणी करतात. दुर्गा सकाळीच स्नान करून मागच्या अंगणात गेली होती. तेथे तिने एक चौकोन तयार करून त्यांत काही हरभरे, वाटाणे पेरले होते. आता तेथे लहान लहान रोपे उगवली होती. दुर्गाने त्यांच्याभोवती रांगोळी काढली होती आणि ती काहीतरी पुटपुटत होती. अपू म्हणाला,

‘‘हे काय करते आहेस दीदी?’’

‘‘चूप. बोलू नकोस. मला पूजा करू दे. मग आपण एका ठिकाणी जाऊ.’’

‘‘कोठे?’’

‘‘त्याच्याशी तुला काय करायचे आहे?’’

दुर्गा पुन्हा आपल्या पूजेकडे वळली. ती काहीतरी म्हणत होती. अपूला त्यांतील शेवटचे शब्दच कळाले. ‘माझा भाऊ पाठीराखा आहे आणि मी भाग्यवान आहे...’

ऐकताना अपूला हसू आले. दुर्गा म्हणाली, ‘‘का हसतो आहेस? ही हसायची गोष्ट नाही. तू स्वत:ला फार शहाणा समजतोस की काय? थांब, मी आईलाच सांगते.’’

अपू गप्प बसला. दुर्गाने शांतपणे पूजा आटोपली व ती त्याला म्हणाली, ‘‘चल, आपण तळ्यामधील शिंगाडे  शोधायला जाऊ.’’

तेथे गेल्यावर दोघांना दिसले की तळ्यात शिंगाडे बरेच असले तरी ते पाण्यात, दूरवर होते. दुर्गा म्हणाली, ‘‘अपू, एखादी लांब काठी शोध बरे. शिंगाडे हाताला येत नाहीत.’’

अपू काठी शोधू लागला, तोपर्यंत दुर्गाला एक रानफळ दिसले. ती ते तोडून खाऊ लागली तेव्हा अपू म्हणाला, ‘‘दीदी, फेक, फेक ते. ते फळ माणसे खात नसतात, फक्त पक्षी खातात.’’

दुर्गा फळाचे बी काढून टाकून म्हणाली, ‘‘कोण म्हणते खात नसतात? तू खाऊ बघ किती गोड आहे ते! मी तर नेहमीच खाते.’’

अपूने एक तुकडा तोंडात टाकला व तोंड वेडेवाकडे करीत तो म्हणाला ‘‘किती आंबट आहे!’’

‘‘थोडे आंबट आहे, पण चांगले लागते.’’

मात्र खूप प्रयत्न करूनही त्यांना शिंगाडे मिळाले नाहीत.

परत येताना अपूला एका झाडाखाली काही तरी पडलेले दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले. तो कसलातरी चमकणारा पदार्थ होता. त्याने तो उचलून साफसूफ केला व दुर्गाला दाखवीत तो म्हणाला, ‘‘दीदी, मला हे काय सापडले बघ.’’

दुर्गाने ती गोल आकाराची, अनेक कंगोरे असणारी, पारदर्शक  वस्तू हातात घेऊन पाहिली. तिने कुठेतरी अशाच एका वस्तूचे चित्र पाहिले होते. ते रत्नाचे चित्र होते. नक्कीच हे रत्नच असले पाहिजे. ती इकडेतिकडे पाहत हलक्या आवाजात अपूला म्हणाली, ‘‘जोराने ओरडू नकोस. हा बहुतेक एखादा हिरा आहे.’’

अपूने हिरा हा शब्द अनेक गोष्टींत ऐकला होता. त्याला आई ज्या गोष्टी सांगत असे तिच्यात जे राजे, राण्या, राजकन्या असत त्या हिऱ्याचे दागिने घालीत हे त्याला ठाऊक होते.

दोन्हीही मुले या शोधामुळे इतकी चकित झाली की काय करावे हे त्यांना सुचेना. शेवटी त्यांनी ती वस्तू घरी नेऊन आईला दाखविण्याचे ठरविले. घरी आल्यावर दुर्गाने आपल्या पदरात बांधलेली ती वस्तू काढली व आईला दाखविली. ‘‘आई, बघ आम्हांला काय सापडले आहे!’’

‘‘मी ते प्रथम पाहिले.’’ अपू म्हणाला. या शोधाचे श्रेय त्याला एकट्यालाच घ्यायचे होते.  मात्र सर्वजयालाही रत्न किंवा हिऱ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिने ती वस्तू निरखून पाहिली. सूर्याच्या प्रकाशात ती धरली असता तिच्यातून वेगवेगळ्या रंगांची किरणे निघत होती. नक्कीच ही साधी काच नव्हती. तिला वाटले, खरेच हा एखादा हिरा असेल तर? आपली ही हलाखीची परिस्थिती, आपले दैन्य, क्षणात दूर होऊन जाईल. आपण श्रीमंत होऊन जाऊ. तिच्या मनात एक सुंदर स्वप्न जन्मले. सुखी भविष्याच्या कल्पनेत ती गुंग होऊन गेली.

थोड्या वेळाने हरिहर घरी आला. आल्याबरोबर सर्वजयाने त्याला ती वस्तू  दाखविली आणि म्हणाली, ‘‘पहा, मुलांना काय सापडले आहे ते! हा एखादा हिरा असेल तर...’’

हरिहर अनेक गावे फिरलेला सुशिक्षित ब्राह्मण होता. ही वस्तू हिरा असेल असे त्याला मुळीच वाटले नाही. मात्र काही वेळानंतर त्याच्या मनातही विचार आला, कुणी सांगावे? ही एखादी मौल्यवान वस्तू असेल तर? एके काळी त्या भागात मुजुमदारांचे श्रीमंत कुटुंब राहत होते. त्यांच्या जवळचा एखादा हिरा हरवला असेल व तो जमिनीत पुरला गेला असेल. असे म्हणतात की ज्याला धन सापडते, पण त्या धनाची किंमत कळत नाही तो खरा दुर्दैवी असतो. तो गावाच्या सोनाराकडे जाऊन आला. आल्यावर तो म्हणाला, ‘‘मी काय म्हणत होतो? हा हिरा नाही, हा लोलक आहे. काचेच्या झुंबरात असे अनेक लोलक असतात. हिरे जर असे जमिनीवर सापडले असते तर कुणाला काही काम करायची गरजच नाही! तुम्ही सगळे वेडेच आहात.’’

*

अपू आता आठ वर्षांचा झाला होता. मात्र अजून त्याला आईबरोबर लपाछपी खेळायला आवडे. तो अंगणात जाऊन लपून बसे व तेथून आईला आवाज देई,

‘‘आई, मी कुठे आहे?’’

खरे तर तो कुठे लपला आहे हे आंधळ्या माणसाला-देखील सहज कळले असते. पण त्याची आई तो दिसत नसल्याचे नाटक करी. दुसरीकडेच त्याला शोधत फिरे. अधूनमधून ती अपूला आवाज देई, ‘‘अपू, कोठे आहेस तू?’’

पण त्या दिवशी तिला अपूबरोबर खेळण्यास मुळीच वेळ नव्हता. त्यामुळे त्याने हाका मारण्यास सुरुवात केल्यावर ती ओरडून म्हणाली, ‘‘ठीक आहे. मी तुला शोधत फिरते, आणि माझा स्वयंपाक तसाच राहू देते. भूक लागल्यावर मात्र माझ्या नावाने ओरडू नकोस.’’

संध्याकाळी अचानक आभाळ भरून आले. क्षितिजापाशी काळे ढग जमा झाले आणि पाहता पाहता ते सगळीकडे पसरले. सोसाट्याचा वारा सुटला. इतका मोठा की त्याच्या वेगामुळे मोठमोठी झाडेदेखील वाकू लागली. वारा साऱ्या गावभर धिंगाणा घालू लागला. वाळलेली पानेफुले आणि धूळ त्याने सारीकडे उडवली. दुर्गाच्या ध्यानात आले की, या वादळामुळे आंब्यांच्या झाडावरील कितीतरी कैऱ्या खाली पडतील. त्या वेचण्यासाठी ती बाहेर पळाली. तिच्या मागोमाग अपूदेखील धावला.

थोडे दूर गेल्यावर त्यांना आमराई लागली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झाडांच्या खाली कैऱ्यांचा खच पडला होता. त्या पाहून अपूला तर किती वेचू किती नाही असे झाले. ‘‘दीदी, ती पहा तिकडे केवढी मोठी कैरी पडली आहे! ती पहा, आणखी एक पडली.’’ कैऱ्या वेचत वेचत ते बरेच दूर गेले. या नादात वादळ अधिक अधिक जोराने घोंघावत आहे हे त्यांना समजलेच नाही. दुर्गाने आपल्या साडीच्या ओच्यात आठनऊ कैऱ्या  गुंडाळल्या. अपूला मात्र दोनतीनच घेता आल्या. पण  इतक्या मोठ्या कैऱ्या पाहूनच त्याला खूप आनंद झाला होता.

मात्र तेवढ्यात त्यांना शेजारच्या मुखर्जी मावशींची पोरे येताना दिसली. ती मुलेसुद्धा आंबे वेचण्यासाठी आली होती. त्यांना पाहून मावशीचा मुलगा शोतू म्हणाला, ‘‘ही आमची आमराई आहे. तुम्ही कोणाला विचारून आमच्या बागेत घुसलात? पाहू, किती कैऱ्या घेतल्यात तुम्ही?’’

त्याची बहीण राणू फार समजदार होती. तिला अपू आवडत असे, आणि दुर्गा तर तिची मैत्रीण होती. ती म्हणाली, ‘‘त्यांनी चार कैऱ्या घेतल्या तर काय झाले? घेऊ दे.’’

पण शोतू हट्टाने म्हणाला, ‘‘त्यांना सवलत दिली तर ते सगळे आंबे घेऊन जातील. ते काही नाही. दुर्गा, आमच्या कैऱ्या देऊन टाक.’’

एरवी दुर्गा त्याला मुळीच घाबरली नसती. पण काही दिवसांपूर्वी आईने तिला दिलेला मार तिच्या चांगल्याच आठवणीत होता. त्यामुळे माघार घेत ती म्हणाली, ‘‘अपू, आपण त्या पलीकडल्या आमराईत जाऊ. तेथे आणखी मोठे आंबे आहेत.’’

सुमारे पंधरा मिनिटे चालल्यानंतर त्यांना आंब्याची व फणसाची बरीच झाडे दिसली. आंब्याच्या झाडांना खूप कैऱ्या होत्या. पण त्यांच्या बुंध्यापाशी असंख्य काटेरी झुडुपे उगवलेली होती. त्यांच्यापर्यंत जाणे फार कठीण होते. अनेक कैऱ्या वाऱ्याने पडल्या होत्या, पण खालच्या गवतात त्यांना शोधणे अवघड होते. तरी दुर्गाने साताठ कैऱ्या शोधून आपल्या ओच्यात भरून घेतल्याच.

काही वेळाने पावसाचे थेंब पडावयास सुरुवात झाली. लवकरच त्या थेंबांचा जोर आणि आकार वाढला. दुर्गा म्हणाली, ‘‘अपू, पाऊस सुरू झाला आहे. आपण त्या झाडाखाली जाऊन उभे राहू.’’

दुर्गा आणि अपू एक मोठे झाड पाहून त्याखाली जाऊन उभे राहिले. सुरुवातीला असलेला वाऱ्याचा जोर मंदावला होता. पण पावसाच्या धारा वाढल्या होत्या. ओल्या मातीवर पाउस पडून सुरेख असा सुगंध आसमंतात पसरला होता. थोडा वेळ अपूला मजा वाटली. पण पावसाचा जोर अधिकच वाढला व वाराही जोराने वाहू लागला तेव्हा तो घाबरला. दुर्गाच्या जवळ जाऊन तो तिला बिलगला. दुर्गा म्हणाली, ‘‘घाबरू नकोस. ये, माझ्या पदराखाली मी तुला घेते म्हणजे पाऊस लागणार नाही. हा पाऊस काही फार वेळ पडणार नाही. मी पावसाचे गाणे म्हणते, तूही माझ्याबरोबर म्हण. म्हणजे पाऊस थांबेल.’’

‘लिंबाच्या झाडावर करवंदे आलीत...

पावसा, पावसा, निघून जा, निघून जा...’

तेवढ्यात दूर कोठेतरी वीज चमकली आणि काळ्या आभाळात काही क्षण भक्क  प्रकाश झाला. अपू अधिकच घाबरून दुर्गाला चिकटला. पावसाचे थेंब फांद्यामधून, पानांतून खाली येऊन त्यांना भिजवीत होते.

त्यांचे डोके तर ओले झालेच होते, कपडेही भिजून अंगाला चिकटले होते. पुन्हा एकदा वीज चमकली. या वेळी तिने आकाशात केवढातरी मोठा आवाज केला. अपू तर घाबरलाच- पण दुर्गालादेखील भीती वाटू लागली. पण तिने तसे दाखविले नाही. ती अपूला धीर देत पुटपुटली,

‘लिंबाच्या झाडावर करवंदे आलीत...

पावसा, पावसा, निघून जा निघून जा...’

पावसाचा जोर वाढला तशा विजादेखील पुन्हा पुन्हा चमकू लागल्या. अपू घाबरून म्हणाला, ‘‘दीदी, पाऊस थांबलाच नाही तर?’’

दुर्गाजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तिने त्याला अधिकच जवळ घेतले. आता काय करावे हे तिला सुचेना. ती पुन्हा पुन्हा ते गाणे म्हणू लागली.

‘लिंबाच्या झाडावर करवंदे आलीत...

पावसा, पावसा, निघून जा निघून जा...’

इकडे, घराच्या दारात उभी राहून सर्वजया दोघा मुलांची काळजी करीत होती. या पावसात, वादळवाऱ्यात मुले कोठे गेली असतील? कशी असतील? त्यांना कोठे आसरा मिळाला असेल का? अनेक प्रश्न तिच्या मनात उमटत होते. पण ती काय करू शकणार होती? त्यांना कोठे शोधणार होती?

तेवढ्यात तिला मागचे फाटक उघडल्याचा आवाज आला. तिने पाहिले, दुर्गा आणि अपू त्या फाटकातून आत येत होते. दोघेही नखशिखान्त भिजले होते.

‘‘अरे देवा!’’ ती म्हणाली. ‘‘किती भिजला आहात तुम्ही! इतक्या वेळ कोठे होतात?’’

तेवढ्यात तिला  दुर्गाच्या हातात एक पिकलेले नारळ दिसले. ‘‘हे कोठून आणलेस?’’

‘‘मावशीच्या झाडाखाली पडले होते. आणि आम्हांला एक मोठी फांदीसुद्धा सापडली. तुला झाडू तयार करायचा होता ना?’’

अपू म्हणाला, ‘‘आई, किती दिवसांपासून तू नारळ आणायचा असे म्हणत होतीस. आज आम्हांला सापडला आहे तर याच्या वड्या कर. खूप दिवस झाले काही गोड खाल्लेच नाही.’’

‘‘बरे. पण आधी हे ओले कपडे बदलून टाका. डोके पुसा.’’

थोड्या वेळाने सर्वजया विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेली तेव्हा तिने ऐकले, तिची शेजारीण मोठमोठ्याने ओरडून दुर्गा आणि अपूला शिव्याशाप देत होती. मुलांनी तिच्या बागेतले नारळ उचलल्याचे तिने पाहिले होते. ती म्हणत होती, ‘‘काय चोरटी मुले आहेत! माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी एवढा मोठा नारळ उचलला आणि ती तो घेऊन पळाली. पोरे चोर आहेत आणि त्यांना आईची फूस आहे. ती तर त्यांच्याहून मोठी चोर आहे. देवाने त्यांना याबद्दल चांगली शिक्षा करायला हवी. मी या तिन्हीसांजेच्या वेळी त्यांना शाप देते. त्यांनी जर ते नारळ खाल्ले तर ते लगेच मरून जातील.’’

सर्वजया स्तंभित होऊन ते शिव्याशाप ऐकत होती. तिच्या अंगावर काटा आला. या बाईची जीभ एखाद्या सापासारखी आहे. ती मनाशी म्हणाली. ‘‘जर तिचे बोलणे खरे झाले तर? नको. तिचे शाप माझ्या लेकरांना लागायला नकोत.’’

ती घरी परत आली व दुर्गाला म्हणाली, ‘‘ते त्या बाईचे नारळ तिला परत करून ये.’’

‘‘आत्ता?’’

‘‘हो. ताबडतोब.’’

मुले नारळ घेऊन गेल्यावर सर्वजया देवाच्या फोटोला नमस्कार करून म्हणाली, ‘‘परमेश्वरा, माझ्या मुलांना क्षमा कर. त्यांच्यावर त्या बाईचा शाप पडू देऊ नकोस. देवा, तू क्षमाशील आहेस. त्यांच्यावर दया कर.’’

अनुवाद : विजय पाडळकर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विभूतीभूषण बंद्योपाध्याय

बंगाली साहित्यिक, कादंबरीकार


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके