डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

यजमानांच्या घरी आल्यानंतर सगळ्यांनी अपूचं खूप कौतुक केलं. इतक्या कौतुकाची अपूला सवय नव्हती. अपूसाठी अनेक गोष्टी नवीन होत्या, पण त्याला सर्वांत आवडलं ते त्या घरचं जेवण. अपू प्रथमच आला होता म्हणून त्यांनी त्याच्यासाठी तिखट, गोड, चमचमीत असे नाना तऱ्हेचे पदार्थ बनविले. इथं त्यानं आयुष्यात प्रथमच ‘खरा’ मोहन भोग चाखून पाहिला. आई त्याला कधीतरी ‘मोहन भोग’ म्हणून जो काही पदार्थ बनवून देत असे त्यापेक्षा हा कितीतरी वेगळा आणि अप्रतिम होता. मात्र आयुष्यात प्रथमच आपण गरीब आहो म्हणजे काय आहो, आणि आपल्यात व ज्यांना श्रीमंत म्हणतात त्यांच्यात किती फरक आहे हेही त्याला समजलं.

काही दिवसांनंतरची गोष्ट.

एके दिवशी सकाळी अपू अंथरुणात लोळतच पडलेला असताना आई तेथे आली आणि त्याला म्हणाली, ‘‘अपू, ऊठ. आज तुला शाळेला जायचं आहे.’’

आपल्याला शाळेला का पाठविलं जात आहे हे अपूला कळेना. त्याची अशी कल्पना होती की खोडकर आणि द्वाड मुलांनाच फक्त शाळेत पाठविलं जातं. पण आईनं जेव्हा त्याला बळजबरीनं उठविलं आणि तयार केलं तेव्हा मात्र त्याला रडू आवरेना. तो म्हणाला, ‘‘बघ तू. मी शाळेतून परत येणारच नाही.’’

आई म्हणाली, ‘‘असं म्हणू नये बाळा. शाळेत गेलं पाहिजे. तू खूप शिकलास म्हणजे मोठा झाल्यावर तुला चांगली नोकरी लागेल. खूप पैसे मिळतील.’’

मग हरिहरकडे वळून ती म्हणाली, ‘‘गुरुजींना सांगा बरं का, म्हणावं- अपू अजून लहान आहे. त्याला मारूबिरू नका.’’

हरिहरनं अपूला शाळेत नेलं. गुरुजींचं नाव प्रसन्न, ते एकाच वेळी त्यांचं किराणा दुकान चालवीत आणि मुलांचे वर्गदेखील घेत. त्यांच्याजवळ सतत एक छडी ठेवलेली असे, तिचा प्रसाद अधून मधून मुलांना दिल्याशिवाय त्यांना करमत नसे. अपूला त्याच्या मित्रांनी हे सांगितलं होतं, म्हणून तो शाळेत जायला घाबरत होता. त्याला शाळेत सोडल्यावर बाबा म्हणाले, ‘‘अपू, गुरुजी जे सांगतील ते ऐकायचं. खोड्या करायच्या नाहीत. मग ते मुळीच शिक्षा करणार नाहीत.’

अपूनं पाहिलं. तेल-तूप, मीठ, साखर यांचे डबे भोवती घेऊन गुरुजी एका उंच खोक्यावर बसले होते. पलीकडं जमिनीवर चटया टाकून पंधरावीस मुलं बसली होती. ती सगळी वेगवेगळ्या वयांची होती आणि सगळीच अपूपेक्षा मोठी होती. कुणाला गुरुजी पाढे लिहायला सांगत, कुणाला शुद्धलेखन. कुणाला गणित करायला सांगत. दुकानात कुणी गिऱ्हाईक आलं की गुरुजी त्याला माल देत, त्याचे पैसे मोजून घेत. पण त्या वेळीही त्यांचा एक डोळा, कोणता मुलगा कसली खोडी करतो यावर असे. अपूच्या शेजारची दोन मुलं त्यांच्या पाटीवर ‘फुली’ आणि ‘गोल’ खेळत होती. ‘‘ही माझी फुली’’ एक जण म्हणायचा, मग दुसरा त्या शेजारी गोल काढायचा, ‘‘हे माझे गोल’’. ते अगदी हळू बोलत होते. पण गुरुजींच्या कानांवर ते गेलेच. ते म्हणाले, ‘‘सतीश, पहा बरे ते दोघे काय करीत आहेत?’’

सतीश नावाचा तो मुलगा त्यांच्याकडं गेला, त्यांची पाटी आणून ती त्यानं गुरुजींना दाखविली. ते पाहून गुरुजी प्रचंड चिडले. त्यांनी सतीशला दोन मोठ्या विटा  घेऊन येण्यास सांगितलं. मग ते त्या पोरांना म्हणाले, ‘‘या विटा डोक्यावर धरून कोपऱ्यात उभे राहा.’’

त्या पोरांचे भेदरलेले चेहरे पाहून अपूला हसू आलं. आता गुरुजींनी त्याच्याकडं मोर्चा वळविला. ते म्हणाले, ‘‘कोण आहे रे तो? हसतोय. शाळा म्हणजे काय खेळ वाटला का?’’

अपू खूप घाबरला. पण सुदैवानं त्याला गुरुजींनी काही शिक्षा केली नाही. कदाचित त्याचा शाळेतील पहिलाच दिवस म्हणून त्यांनी त्याला माफ केलं असावं.

हळूहळू अपू शाळेत चांगलाच रमला. त्याला अभ्यासाची गोडी लागली. त्याच्या बाबांचंही त्याच्या प्रगतीवर बारीक लक्ष होतं. ते त्याला शाळेत काय शिकविलं ते विचारीत. लवकरच त्यांच्या ध्यानात आलं की, शाळेतील अभ्यासावर विसंबून राहण्यात काही अर्थ नाही. मग त्यांनी स्वत:च त्याच्या शिक्षणाकडं लक्ष द्यायला सुरुवात केली. लवकरच त्याला तीसपर्यंतचे पाढे म्हणता येऊ लागले. सारी मुळाक्षरं तर त्याला पाठ झालीच; पण पुस्तकातला धडाही वाचता येऊ लागला.

या शाळेतील आणखी एक गोष्ट अपूला फार आवडली. दुपारच्या वेळी गावातील अनेक माणसं गुरुजींच्या दुकानात गप्पा मारण्यासाठी येत. ती माणसं आली की शिकविणं बाजूला पडत असे. मुलांनाही ठाऊक असे की, आता गुरुजी आपल्याकडं लक्ष देणार नाहीत. ती आपल्या खेळत रंगून जात. मात्र ती माणसं एकमेकांना ज्या गोष्टी सांगत त्या अपूला फार आवडत. त्यांच्यापैकी संन्याल नावाचे एक गृहस्थ फारच गप्पिष्ट होते. त्यांना गोष्ट सांगण्याची कला अवगत होती. लहानशी घटनादेखील ते अशी काही रंगवून सांगत की, ऐकणाऱ्याला आपण काहीतरी वेगळं ऐकलं असं वाटे. संन्यालला दूरदूरच्या प्रदेशांत प्रवास करण्याचीही फार आवड होती. ते अगदी द्वारकेपर्यंत जाऊन आले होते. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते एकटे फिरत नसत. कितीही लांबचा प्रवास का असेना ते आपल्या बायकोला व मुलांना सोबत घेऊन जात.

गावाहून परत आले की संन्याल बाबू दुसऱ्या दिवशी प्रसन्न गुरुजींच्या शाळेत येत. आपले अनुभव केव्हा इतरांना सांगतो याची त्यांना ओढ लागलेली असे. ते आले की मुलांना कळे, आता शाळा सुटली. ते आपापल्या खेळात गर्क होत. मात्र अपूला त्यांच्या गोष्टीत रस असे. तो कान देऊन संन्याल बाबू सांगत असलेल्या गोष्टी ऐकत असे. ऐकताना त्याच्या डोळ्यांसमोर ते न पाहिलेले प्रदेश स्पष्ट उभे राहत. मोठे झाल्यावर आपणदेखील या काकांसारखं अनेक देश हिंडू, असं अपूनं मनाशी ठरवून टाकलं होतं.    

या शाळेतला एक प्रसंग अपू पुढं कधीच विसरला नाही. एके दिवशी गुरुजींनी मुलांना शुद्धलेखन सांगण्यास सुरुवात केली. अपूच्या लक्षात आलं की हे शब्द गुरुजींच्या रोजच्या बोलण्यातील नाहीत, काही वेगळेच आहेत. गुरुजी कोणत्यातरी पुस्तकातील कविता म्हणून दाखवीत आहेत.

‘‘जनस्थानाच्या हृदयात प्रश्रावन नावाचा एक हिमगिरी उभा आहे. त्याच्या शिखरावर निळ्या प्रकाशाचा मुकुट झगमगत आहे. हवेतील मार्गाने प्रवास करणाऱ्या शुभ्र मेघांचे वस्त्र त्याने आपल्या बलशाली खांद्यावर पांघरले आहे. त्याच्या भोवती अरण्यातली फुलपाखरे थव्याथव्याने उडत आहेत, आणि त्याच्या पायाशी गोदावरीचे स्फटिकशुभ्र पाणी खळखळ करीत वाहते आहे.’’

अपूला नीटसं समजलं नाही. पण त्याला जाणवलं की, या पर्वताकडं जाणारा रस्ता आपल्या चांगलाच ओळखीचा आहे. दोन वर्षांपूर्वी बाबांबरोबर तो फिरायला गेला असता त्यानं हाच रस्ता पाहिला होता. हाच रस्ता पुढं जाऊन नक्की रामायण आणि महाभारतात जात असेल. याच रस्त्यावर कुठंतरी प्रश्रावन पर्वत असेल. त्यानं मनाशी ठरवलं, मोठे झाल्यावर आपण नक्कीच तो पर्वत पाहण्यास जाऊ.

प्रश्रावन पर्वत भूगोलाच्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. पण त्या दिवशी तो अपूच्या मनात कायमचा जाऊन बसला.

***

काही दिवसांनी हरिहरला शेजारच्या एका गावी पूजा सांगण्यासाठी जायचं होतं. या वेळी त्यानं अपूला आपल्या सोबत न्यायचं ठरविलं होतं. एक तर आता अपू पायी प्रवास करण्याइतपत मोठा झाला होता. दुसरं कारण अधिक महत्त्वाचं होतं. पूजापाठ झाल्यावर त्या घरी उत्तम भोजन मिळत असे. जेव्हा जेव्हा हरिहर असं भोजन घेत असे तेव्हा त्याला वाटे की, अशा प्रकारचं सुग्रास अन्न आपल्या मुलाला घरी कधीच मिळत नाही. त्याला सोबत नेल्यास त्याला चांगल्या अन्नाची चव तरी कळेल. म्हणून या वेळी त्यानं अपूला सोबत नेण्याचं ठरवलं.

गावाच्या सीमा ओलांडून परगावाला जाण्याची अपूची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळं आपल्याला गावाला जायचं आहे या विचारानं त्याला रात्रभर झोप आली नव्हती. सकाळी गावाबाहेर आल्यावर त्याला सर्वत्र मोकळा प्रदेश दिसू लागला तेव्हा त्याला फार मजा वाटली. ते दोघे आता एक मोठ्या रस्त्यावरून चालत होते. अपूनं बाबांना विचारलं, ‘‘बाबा, तुम्ही म्हणाला होतात ना की, आपल्याला रेल्वे रूळ दिसतील म्हणून.’’

‘‘हो. पण अजून थोडं दूर जावं लागेल.’’

अपूला आठवलं, काही दिवसांपूर्वी त्यांच्या गायीचं वासरू हरवलं होतं तेव्हा त्याला शोधण्यासाठी तो आणि दुर्गा दूर दूर भटकले होते. त्या वेळी ते या भागातदेखील आले होते. येथे आल्यावर दुर्गा त्याला म्हणाली होती, ‘‘अपू, आपण रेल्वेचे रूळ बघायचे का?’’

अपू आश्चर्यानं म्हणाला होता, ‘‘रेल्वेचे रूळ? पण ते खूप दूर आहेत ना?’’

‘‘खूप दूर? कोण म्हणतो? तो विटांचा रस्ता आहे ना, त्याच्या पलीकडंच ते रूळ आहेत.’’

‘‘तसं असेल तर मग आपण जाऊन पाहू.’’

मात्र बरंच दूर गेल्यावरही त्यांना ते रूळ दिसले नव्हते. दुर्गा म्हणाली होती, ‘‘खरेच ते दूर आहेत असं दिसतं. आपण आता तितक्या दूर गेलो तर आपल्याला परत येण्यासाठी रस्ता सापडेल का?’’

मात्र तिच्या मनातील रूळ पाहण्याची तीव्र इच्छा तिला परतही जाऊ देत नव्हती. शेवटी काहीएक निश्चय करून ती म्हणाली होती, ‘‘आपण जाऊ. जे होईल ते होईल. दुपारपर्यंत आपल्याला परत येता येईल. आपण आईला सांगू की आम्ही वासराला शोधत होतो. कुणी सांगावं, एखादे वेळी आपल्याला रेल्वेसुद्धा दिसेल.’’

मात्र बराच वेळ झाला तरी रूळ दिसले नव्हते, त्यामुळं दोघेही थकून गेले होते. एक तर डोक्यावरचं ऊन तापलं होतं, आजूबाजूला कुठं सावलीही नव्हती. अधून मधून पायात घुसणाऱ्या काट्यांमुळं अपू वैतागला होता. काही वेळानंतर समोर जेव्हा दलदलीचा प्रदेश सुरू झाला तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की रूळ शोधण्याचा नाद आता सोडला पाहिजे. मात्र एक नवाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. रूळ शोधण्याच्या नादात आपण कोणत्या रस्त्यानं इथवर आलो इकडं त्यांचं लक्षच गेलं नव्हतं. आता त्यांना घरी जावं वाटू लागलं होतं. पण परत कसं जायचं याचा अंदाज त्यांना येत नव्हता. अंदाजाने गावाची दिशा धरून ते चालू लागले आणि कितीतरी वेळानं जेव्हा त्यांना ओळखीचा रस्ता दिसला तेव्हा त्यांच्या पायातील त्राण जवळजवळ संपत आलं होतं. कसेबसे ते घरी पोहोचले होते.

बाबांबरोबर आज पुन्हा या भागात आल्यावर अपूला ते सारं आठवलं. अर्थात आज रस्ता चुकण्याचा काही संभव नव्हता. काही वेळानं रेल्वेचे रूळ आडवे आले तेव्हा अपूच्या आश्चर्याला सीमाच उरली नाही. हा जणू लोखंडाचा केलेला लांबलचक रस्ताच होता! त्या रस्त्याकडं जाणारं गेट उघडंच होतं. अपू ते उघडून रुळांच्या अगदी जवळ गेला. या रुळांवरून रेल्वे कशी धावत असेल बरे? आणि हे खांब कशासाठी उभे केले असतील? त्यावरच्या या तारा कशासाठी आहेत? त्या तारांतून हा आवाज कसला येत आहे? असंख्य प्रश्न त्याच्या मनात निर्माण होत होते. तो बाबांना म्हणाला, ‘‘या रुळांवरून गाडी जाताना मला पहायची आहे.’’

‘‘अरे गाडी येण्याला अजून खूप वेळ आहे. किमान दोन तीन तास तरी.’’

‘‘मग तोपर्यंत आपण थांबू ना.’’

‘‘वेडा आहेस की काय? इतका वेळ इथं उन्हात का उभं राहायचं? मग गावाला कधी पोेचणार? आपण येताना रेल्वे बघू.’’

अपू रडवेला झाला, पण बाबा पुढं निघाल्यावर त्याला त्यांच्या मागं जावंच लागलं.

काही वेळानं ते खोलसेमारी तळ्याजवळ आले. या तळ्यात चांगल्या प्रतीचे खोलसे मासे मिळत म्हणून त्याचं हे नाव ठेवलं होतं. तळ्याच्या आजूबाजूला हिरवीगार भातशेती होती. ती शेतं आणि त्या तळ्यावर निळंशार आकाश वाकलेलं होतं. निळ्या आकाशात विहरणारे पांढरे शुभ्र ढग क्षणोक्षणी आपला आकार बदलत होते. सूर्य पश्चिमेकडं कलला आणि त्याचा प्रकाश ढगांवर पडून त्यांचे रंगही बदलले. रंगांचं हे कौतुक अपू प्रथमच पाहत होता. त्याची नजर त्या दृश्यावरून हलत नव्हती.

हरिहर म्हणाला, ‘‘काय चमत्कारिक मुलगा आहेस तू? प्रत्येक गोष्टीकडं उभं राहून पाहत बसलास तर कसं होईल? चल लवकर लवकर...’’

यजमानांच्या घरी आल्यानंतर सगळ्यांनी अपूचं खूप कौतुक केलं. इतक्या कौतुकाची अपूला सवय नव्हती. अपूसाठी अनेक गोष्टी नवीन होत्या, पण त्याला सर्वांत आवडलं ते त्या घरचं जेवण. अपू प्रथमच आला होता म्हणून त्यांनी त्याच्यासाठी तिखट, गोड, चमचमीत असे नाना तऱ्हेचे पदार्थ बनविले. इथं त्यानं आयुष्यात प्रथमच ‘खरा’ मोहन भोग चाखून पाहिला. आई त्याला कधीतरी ‘मोहन भोग’ म्हणून जो काही पदार्थ बनवून देत असे त्यापेक्षा हा कितीतरी वेगळा आणि अप्रतिम होता. मात्र आयुष्यात प्रथमच आपण गरीब आहो म्हणजे काय आहो, आणि आपल्यात व ज्यांना श्रीमंत म्हणतात त्यांच्यात किती फरक आहे हेही त्याला समजलं. त्यानंतर गावातील अमला नावाच्या एका मुलीची व त्याची ओळख झाली. ती दुर्गाएवढीच मोठी होती. पण तिच्याजवळ इतकी खेळणी होती की, तितकी अपूच्या गावातील साऱ्या मुलींजवळ मिळूनही नव्हती. त्यानं ठरविलं, जेव्हा त्याच्याजवळ पैसे येतील तेव्हा तो दीदीला तिच्या आवडीची भरपूर खेळणी नक्कीच घेऊन देईल.

 घरी परत आल्यावर कितीतरी दिवस अपू त्या गावाच्या कहाण्या आईला आणि दुर्गाला सांगत होता. त्यानं ज्या वेळी रेल्वेच्या रुळाबद्दल सांगितलं तेव्हा दुर्गानं त्याला अचंब्यानं विचारलं, ‘‘तू रेल्वे पाहिलीस?’’

अपूचा चेहरा लहान झाला. या प्रवासातली तेवढीच एक गोष्ट त्याला खटकत होती. त्याला रेल्वे पाहायला मिळाली नाही हा दोष त्याच्या बाबांचा होता. काय झालं असतं ते थोडा वेळ रेल्वे रुळापाशी उभे राहिले असते तर?

***

एके दिवशी दुर्गाने ठरवलं की, मागच्या अंगणात विटांचं एक लहानसं घर बांधायचं आणि त्यात अनेक वस्तू ‘विकायला’ ठेवायच्या. ते आपलं दुकान असेल. दोघांनी मिळून जवळपासचे दगड-विटांचे तुकडे गोळा करून एक छोटं घर तयार केलं. आता त्यात वस्तू ठेवायच्या होत्या. त्या शोधण्यासाठी ते शेजारच्या झाडीत शिरले. त्यांनी काही रानफुलं, वेगवेगळ्या झाडांची पानं, सहज तोडता येणारी फळं गोळा केली. दुर्गानं बांबूच्या वनातून पांढरी शुभ्र वाळू आणली. ही वाळू म्हणजे त्यांच्या खेळातली ‘लुटुपुटुची साखर’ होती. तीन मोठी, लालभडक फळंदेखील तिला सापडली, ती तिननं आपल्या दुकानाची शोभा वाढविण्यासाठी ठेवली.

खेळ सुरू झाला. तेवढ्यात शेजारच्या मावशीचा मुलगा सतू आला. त्याला पाहून अपू म्हणाला, ‘‘सतुदा, बरं झालं तू आलास. हे पहा आम्ही काय तयार केलं आहे!’’

सतूला खेळण्यात काही रस नव्हता. तरी थोडा वेळ त्यानं त्यांच्यात सामील झाल्याचं नाटक केलं. मग अचानक, दुर्गाचं लक्ष नाही असं पाहून त्यानं तीन फळांपैकी एक मोठं फळ उचललं व ते घेऊन तो धावत त्याच्या घराकडं निघाला. अपूनं ते पाहिलं. तो वेगानं त्याच्या मागं धावला. सतू अपूपेक्षा दोन वर्षांनी मोठा होता आणि सशक्तदेखील होता. पण अपू आपली वस्तू परत घेण्यासाठी जीव खाऊन त्याच्या मागं धावत होता. आता तो अगदी त्या चोराला पकडण्याच्या बेतात होता. तेवढ्यात सतू अचानक थांबला. खाली वाकून त्यानं जमिनीवरची मूठभर माती उचलून अपूच्या तोंडावर फेकली. या हल्ल्यामुळं अपू क्षणभर थांबला, तेवढ्यात सतू दूर पळून गेला आणि दिसेनासा झाला. माती डोळ्यांत गेल्यामुळं अपूला काही दिसेना, त्याचे डोळेही चुरचुरू लागले.

‘‘काय झालं अपू?’’ मागून धावत आलेल्या दुर्गानं विचारलं.

‘‘त्यानं माझ्या डोळ्यांत माती टाकली. मला काहीच दिसत नाही. डोळे दुखताहेत.’’ अपू रडवेल्या स्वरात म्हणाला.

‘‘थांब. डोळे चोळू नकोस.’’ दुर्गा म्हणाली. मग तिनं साडीचं एक टोक तोंडात घालून ओलं केलं आणि अपूचे डोळे हळूहळू पुसले. नंतर तिनं त्याच्या पापण्या हातानं मागं वळवून डोळ्यांवर फुंकर मारण्यास सुरुवात केली. थोड्या वेळानं त्याला दिसू लागलं.

‘‘आता तू घरी जा. मी मावशीच्या घरी जाऊन तिला सतूनं काय केलं ते सांगते.’’

दुर्गा मावशीच्या घरापर्यंत गेली. पण घरात जाण्याचं तिचं धैर्य होईना. ती त्या मावशीला खूप घाबरत होती. मावशी आपली तक्रार ऐकून तर घेणारच नाही, उलट आपल्याला नाना प्रश्न विचारील अशी तिला भीती वाटली. म्हणून ती मुकाट्यानं आपल्या घरी परतली. तिनं पाहिलं, अपू दाराबाहेरच्या भिंतीजवळ उभा राहून रडत होता. आपला भाऊ रडताना पाहून दुर्गाला फार वाईट वाटलं. ‘‘अपू, रडू नको. मी तुला माझ्या जवळच्या सगळ्या कवड्या देईन. मग तर झालं!’’

***

काही दिवसांनंतरची गोष्ट. अपू घरात एकटाच होता. आई व दुर्गा कुठंतरी बाहेर गेल्या होत्या. तो आतल्या कोठीच्या खोलीत आला. ही खोली अंधारी होती आणि तिच्यात खूप जुनं सामान ठेवलेलं होतं. त्या खोलीत एका फळीवर काही जुन्या पोथ्या ठेवलेल्या त्याला दिसल्या. त्या पोथ्या आजोबांच्या आहेत हे त्याला माहीत होतं. त्यात काशीदास यांनी लिहिलेली महाभारताची जीर्ण प्रत होती. कधीकधी तो खिडकीत बसून ती पोथी वाचण्याचा प्रयत्न करी. आता त्याला खूप चांगलं वाचता येऊ लागलं होतं. तो हुशार तर होताच; पण त्याला वाचनाविषयी प्रेमही होतं. कधीकधी गावातील प्रतिष्ठित माणसांच्या घरी पोथीवाचन असे. अशा वेळी हरिहर त्याला जुन्या काळाच्या कविता वाचायला सांगे. या कवितांना ‘पांचाली’ म्हणतात असंही हरिहरनं त्याला सांगितलं होतं. या कवितांत पुराणांतील कथा सांगितल्या असून गायक त्या गात गात गावोगाव हिंडत. अपूला अनेकदा वाचून त्यापैकी काही पाठदेखील झाल्या होत्या.

अपू एक पुस्तक हातात घेऊन खिडकीशेजारी बसून वाचू लागला. या खिडकीच्या थोडं पलीकडंच घराची भिंत होती आणि तिच्यानंतर जंगल सुरू होत होतं. वाचता वाचता अपूचं लक्ष तिकडं गेलं. या जंगलाचं त्याला फार आकर्षण वाटे. हातातलं पुस्तक बाजूला ठेवून तो दूरवर पसरलेल्या झाडांच्या त्या हिरव्या समुद्राकडं पाहत होता. त्याला माहीत होतं; हे जंगल दूर, नदीकिनाऱ्यापर्यंत पसरलेलं आहे. तो अनेकदा दीदीबरोबर या जंगलात भटकला होता. पण ते पार करून पलीकडं जाणं त्याला जमलं नव्हतं. मात्र हे विशाल जंगल त्याच्या आणि त्याच्या बहिणीच्या आनंदाचा एक चिरंतन ठेवा होतं. या जंगलात भटकताना त्यांना जो आनंद होई आणि त्यांच्या मनाला जी शांती मिळे त्याचं वर्णन त्यांना करता आलं नसतं; पण तो आनंद, ती शांती त्यांना स्पष्ट जाणवे. कधीकधी त्यांना एखादा अनोळखी पक्षी झाडाच्या फांदीवर येऊन बसलेला दिसे. तो जे गाणे गात असे ते या जगातले नव्हतेच. अपूला वाटे, आपण एखादं स्वप्नच पाहत आहो!

या जंगलाच्या मध्यभागी एक लहानसं तळं होतं. या तळ्याच्या शेजारी आता मोडकळीला आलेलं विशालाक्षी देवीचं प्राचीन मंदिर होतं. पूर्वी या गावातील लोक तिचीच पूजा करायचे. मुजुमदार कुटुंबानं त्या देवीची स्थापना केली होती. पण काही कारणामुळं ती देवी रागावली व मंदिर सोडून निघून गेली. तेव्हापासून या मंदिरात लोक जाईनासे झाले, मग ते मोडकळीला आलं. त्या मंदिराभोवती रान माजलं होतं, तिथं दिवा लावण्यासाठी मुजुमदार घराण्यातही कुणी वारस उरला नव्हता. या मंदिराच्या संदर्भात आणखी एक गोष्ट गावात सांगितली जाते. एके दिवशी स्वरूप चक्रवर्ती नावाचा गावातला एक माणूस शेजारच्या गावी जाऊन परत येत होता. परत येण्यास त्याला बराच उशीर झाला होता. अंधार पडला होता. त्यानं पाहिलं, नदीशेजारी एक सोळा वर्षांची सुंदर मुलगी उभी होती. या निर्जन भागात, अशा कातरवेळी, एक सुंदर मुलगी पाहून तो घाबरला. मात्र त्याला पाहून ती मंजूळ स्वरात म्हणाली, ‘‘मी विशालाक्षी देवी. काही दिवसांतच या गावात कॉलऱ्याची भीषण साथ येणार आहे. गावकऱ्यांना सांग, चतुर्दशीच्या दिवशी पंचनंदा देवीची पूजा करा आणि तिला 108 भोपळ्यांची माळ घाला.’’ पाहता पाहता ती अदृश्य झाली. काही दिवसांनी गावात खरोखरच देवीची साथ आली. पण सांगितलं तसं गावकऱ्यांनी केल्यामुळं त्या साथीचा प्रकोप वाढला नाही.

विशालाक्षी देवीच्या बाबतीत अशा अनेक गोष्टी गावात अजून सांगितल्या जातात. या खिडकीशेजारी उभा राहून जंगलाकडं पाहताना अनेक वेळा त्या गोष्टी अपूला आठवायच्या. एके दिवशी तो एकटाच जंगलात गेला असताना ते घडलं.

त्याच्या समोर एक सुंदर स्त्री उभी राहून त्याला विचारीत होती, ‘‘तू कोण आहेस?’’

‘‘मी...अपू...’’

‘‘तू खूप चांगला मुलगा आहेस. मी तुला काय देऊ?’’

 पुढं काय घडलं हे अपूला माहीत नाही. ते सत्य होतं की स्वप्न?

अनुवाद : विजय पाडळकर, पुणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विभूतीभूषण बंद्योपाध्याय

बंगाली साहित्यिक, कादंबरीकार


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके