डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दुर्गाने घरापासून थोडे दूरवर रानातली एक जागा पाहून व साफसूफ करूनही ठेवली होती. सहलीसाठी ही फारच आदर्श जागा होती. सगळीकडे मोठमोठ्या वृक्षांची सावली होती. वाटले तर उन्हात बसायचे, वाटले तर सावलीत. आजूबाजूला रानफुले उमललेली होती. त्यांचा सुगंध वातावरणात पसरला होता. शांत वातावरणात मध्येच एखाद्या पक्ष्याची मधुर किलबिल ऐकू येत होती. दुर्गाने येताना घरून थोडे तांदूळ, थोडे तेल आणि बटाटे आणले होते. तिने तीन मोठे दगड गोळा करून चूल बनविली. अपूने त्या चुलीत जाळण्यासाठी वाळलेल्या फांद्या व पाने आणली. दुर्गाने चूल पेटविली, तिच्यावर मातीचे गाडगे ठेऊन त्यात पाणी, तांदूळ व बटाटे शिजत टाकले. 

त्या दिवशी अडगळीच्या खोलीत इकडे तिकडे शोधताना अपूला एका लाकडी खोक्यात ठेवलेली काही पुस्तके दिसली. एका पुस्तकाचे नाव ‘प्राचीन तत्त्वज्ञानाची ओळख’ असे होते. या नावाचा अर्थ त्याला काहीच समजला नाही. पण त्याचे मुखपृष्ठ त्याला आकर्षक वाटले आणि विशेष म्हणजे त्याचा वास त्याला फारच आवडला. त्याने ते पुस्तक खोक्यातून काढले आणि आपल्या पुस्तकांत ठेवून दिले. आजूबाजूला कुणी नसताना तो ते पुस्तक चाळत असे. एके दिवशी त्याला त्या पुस्तकात एक अतिशय विस्मयजनक गोष्ट वाचायला मिळाली. लेखकाने लिहिले होते, ‘गिधाडाचे एक अंडे घ्यायचे, त्याच्यात थोडा पारा भरायचा आणि त्याला काही दिवस उन्हात ठेवायचे. काही दिवसांनी ते अंडे तोंडात धरले तर तो माणूस हवेत उडू शकतो.’

बाप रे! ही काही तरी वेगळीच गम्मत होती. इतर कुणी सांगितली असती तर त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नसता, पण ती जुन्या पुस्तकात लिहिलेली होती. ती खरीच असली पाहिजे. अपूला माहीत होते की, आरशाच्या मागच्या बाजूला पारा लावलेला असतो. घरात एक फुटलेला आरसा आहे हेही त्याला आठवले. आता प्रश्न फक्त गिधाडाच्या अंड्याचा होता. ते मिळाले की झाले. आपल्याला हवेत उडता येईल...अपू हवेत उडण्याचे स्वप्न पाहू लागला.

मात्र लवकरच त्याच्या ध्यानात आले की, गिधाडाचे अंडे मिळविणे ही फार अवघड गोष्ट आहे. एकतर तो ही गोष्ट कुणालाच- बाबांना किंवा आईला- सांगू शकत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत. एके दिवशी सहज म्हणून त्याने दुर्गाला विचारले, ‘‘दीदी, गिधाडांची घरटी कोठे असतात हे तुला माहीत आहे का?’’

अर्थात तिला ते माहीत नव्हते. तिला त्या गोष्टीत रसही नव्हता. तिला आजकाल एक वेगळाच नाद लागला होता. दुपारच्या वेळी ती आपल्या जेवणातील थोडासा भात काढून ठेवी आणि तो घेऊन पाठीमागच्या दाराकडे जाई. एक कुत्रे तो भात खाण्यासाठी येत असे. तिने त्याचे नाव ‘भुता’ ठेवले होते. हे नाव कुत्र्याच्याही ओळखीचे झाले होते. तिने हाक मारली की, ते जिथे असेल तिथून धावत तिच्याकडे येई आणि तिने समोर ठेवलेला भात खाऊन टाकत असे. कधी कधी त्याला उशीर झाला तर दुर्गाला वाटे, आज भुता येणार आहे की नाही? ती मोठ्या आशेने त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसे. पण, भुता आला नाही असे कधीच झाले नाही. केव्हा केव्हा तर घरात भात कमी असला तर दुर्गा आपल्या जेवणातले चार घास, आईला नकळत काढून ठेवी त्याच्यासाठी.

तिला त्याचा इतका लळा लागला होता.

अपूला मात्र कुत्र्याला खाऊ घालण्यात कसली गम्मत वाटत नव्हती. त्याला तो मुलींचा खेळ वाटे. दुसरे म्हणजे त्याचे चित्त सगळे त्या अंड्यात गुंतले होते. एकदा मित्रांशी बोलताना त्याने सहज गिधाडाच्या अंड्याचा विषय काढला. पण कुणीच ते पाहिलेदेखील नव्हते. एके दिवशी अपू जंगलात गेला असताना त्याला शेळ्या-मेंढ्या हाकणारा एक गुराखी मुलगा भेटला. हा मुलगा सारखा रानावनांत फिरायचा, म्हणून अपूने त्याला गिधाडाच्या अंड्याविषयी विचारले. आणि काय आश्चर्य! त्याने ती अंडी पाहिली होती, इतकेच नव्हे तर ती कशी मिळवावी हेही त्याला माहीत होते!  त्याने ती अंडी आणून देण्याचे कबूल केले. पण दोन अंड्यांसाठी अपूने त्याला चार पैसे द्यावे अशी त्याने मागणी केली. अपूजवळ पैसे कोठून असणार? तो त्या मुलाला म्हणाला, ‘‘माझ्याजवळ एक डबा भरून कवड्या आहेत. त्या मी तुला देईन.’’

पण त्या मुलाला अपूच्या कवड्यांत रस नव्हता. तो पैशांच्या मागणीवर अडून बसला. अपूने आपल्या पेटीत शोधल्यावर दोन पैसे मिळाले. उरलेले दोन पैसे त्याने दुर्गाजवळून मागून घेतले. पण त्याने तिला अंड्याबद्दल काहीच सांगितले नाही.

दोन दिवसांनी त्या मुलाने अपूला गिधाडाची अंडी आणून दिली. ती अपूने कुणाला न दाखविता आतल्या खोलीत लपवून ठेवली. आता आरशाचा पारा काढणे बाकी राहिले होते. पारा भरून ती अंडी उन्हात ठेवणे सोपे काम होते. नंतर ते अंडे तोंडात धरले की अपू आकाशात उडू शकेल. अपू विचार करू लागला, ‘उडायला आले म्हणजे प्रथम कोठे जायचे बरे? नदीपलीकडे? मामाच्या गावाला? की थेट चंद्रावर जायचे?’

मात्र दुसऱ्या दिवशी दुर्गा तिची एक हरवलेली वस्तू शोधण्यासाठी त्या खोलीत गेली. खोलीत बराच अंधार होता. अंधारात शोधताना तिचा धक्का त्या अंड्यांना लागला आणि ती खाली पडून फुटली.

अंडी फुटलेली पाहिल्यावर अपूने जो गोंधळ केला त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. संपूर्ण दिवस तो दुर्गाशी बोलला नाही. त्या दिवशी तो जेवलादेखील नाही.

-------

काही दिवसांनंतरची गोष्ट.

गावात नुकताच एक उत्सव झाला होता. त्या उत्सवात गावातील अनेक बायकांनी  मिळून रानात सहल काढली होती. घरून सामानसुमान आणून तेथे स्वयंपाक केला होता. सर्वाजयादेखील गेली होती. पण अशा सहलीत घरच्या मुलांना आणायचे नाही असा नियम होता. त्यामुळे अपू किंवा दुर्गाला रानात जाऊन मजा करता आली नव्हती. त्यामुळे अपूला वाईट वाटले होते. दुर्गाने ठरविले की बहीणभावांनी रानात जाऊन स्वयंपाक करायचा, जेवायचे, मजा करायची. नाराज झालेल्या अपूला खूश करण्यासाठी काहीतरी करावे असा विचार ती करीत होतीच.

दुर्गा अपूला म्हणाली, ‘‘आपण रानात मेजवानी करायची का?’’

दुर्गाने घरापासून थोडे दूरवर रानातली एक जागा पाहून व साफसूफ करूनही ठेवली होती. सहलीसाठी ही फारच आदर्श जागा होती. सगळीकडे मोठमोठ्या वृक्षांची सावली होती. वाटले तर उन्हात बसायचे, वाटले तर सावलीत. आजूबाजूला रानफुले उमललेली होती. त्यांचा सुगंध वातावरणात पसरला होता. शांत वातावरणात मध्येच एखाद्या पक्ष्याची मधुर किलबिल ऐकू येत होती. दुर्गाने येताना घरून थोडे तांदूळ, थोडे तेल आणि बटाटे आणले होते. तिने तीन मोठे दगड गोळा करून चूल बनविली. अपूने त्या चुलीत जाळण्यासाठी वाळलेल्या फांद्या व पाने आणली. दुर्गाने चूल पेटविली, तिच्यावर मातीचे गाडगे ठेऊन त्यात पाणी, तांदूळ व बटाटे शिजत टाकले.

तेवढ्यात त्यांना एक आवाज ऐकू आला.

‘‘दुर्गा दीदी, तुम्ही काय करीत आहात?’’

दुर्गाने आवाज ओळखला. तिच्याच वयाची तिची एक मैत्रीण बिनी होती.

‘‘आम्ही ‘सहल सहल’ खेळतो आहो. तूदेखील ये ना.’’

बिनीला यायचे होतेच. पण ती त्यांच्यापेक्षाही गरीब होती. म्हणून त्यांच्यात सामील व्हायला तिला संकोच वाटत होता. आता दुर्गाने बोलावल्यावर ती आनंदाने त्यांच्यात सामील झाली. दुर्गा अपूला म्हणाली, ‘‘आता बिनी आली आहे ना? मग घरी जाऊन आणखी थोडा तांदूळ घेऊन ये.’’ हे ऐकून तर बिनीला खूपच आनंद झाला.

अपू घरून आणखी मूठभर तांदूळ घेऊन आला. आई तळ्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती म्हणून त्याचे काम सोपे झाले. आता दुर्गाने दोन वांगी कापली आणि तेलात परतली. तिने अपूला विचारले, ‘‘आई असेच करते ना रे अपू?’’

अपूला कुठे हे सारे माहीत होते? पण दीदीने आपल्याला विचारले याचाच त्याला आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘हो. असेच करते.’’

रानात, स्वत: करून खाण्याचा आनंद इतका होता की मुलांना स्वयंपाकात मीठ नाही ही गोष्टही काही महत्त्वाची वाटली नाही. थोडा कच्चा शिजलेला भात, करपलेली वांगी हे साधे अन्नदेखील त्यांना अतिशय गोड लागले. त्यांनी ठरविले की आणखी काही दिवसांनी अशी सहल पुन्हा करायची.

-------

नरोत्तमदास बाबाजी या नावाचे एक खूप वृद्ध वैष्णव साधू-पुरुष  अपूच्या घरापासून काही अंतरावर, एका झोपडीत, एकटेच राहत होते. ते फारसे कुणात मिसळत नसत. एकदा हरिहर त्यांना भेटायला जाताना अपूलाही सोबत घेऊन गेला. त्यांना अपू खूप आवडला आणि अपूलाही त्यांच्याविषयी जवळीक वाटू लागली. बाबाजी हरिहरपेक्षाही वयाने खूप मोठे होते.  तो त्यांना ‘आजोबा’ म्हणू लागला. काही दिवसांनी तर तो एकटाच त्यांच्याकडे जाऊ लागला. तो दाराबाहेरूनच हाक मारी, ‘‘आजोबा, तुम्ही आहात का?’’

आजोबा लगबगीने बाहेर येऊन म्हणत, ‘‘कोण? अपू? ये, आत ये.’’

तो आला म्हणजे त्यांनाही खूप बरे वाटे. खरे तर गावात कुणाकडेही गेला म्हणजे अपू लाजून गप्प बसत असे. पण या आजोबांजवळ त्याला मनातल्या अनेक गोष्टी सांगण्यास संकोच वाटत नसे. आजोबा त्या लक्ष देऊन ऐकत, त्याला निरनिराळ्या गोष्टी सांगत. एके दिवशी आजोबा त्याला म्हणाले, ‘‘अपू, तू माझे प्रिय संत गौरांग यांच्यासारखाच दिसतोस. तुला पाहिले की मला त्यांची आठवण येते. त्यांच्या लहानपणी नक्कीच ते तुझ्यासारखे दिसत असावेत.’’

अपू हसला. ते पाहून आजोबा म्हणाले, ‘‘हसू नकोस. मी खरेच सांगतो आहे.’’

अपू म्हणाला, ‘‘आजोबा, तुमच्या पुस्तकातील त्यांचे चित्र मला पुन्हा एकदा दाखवा ना!’’

आजोबा त्यांच्या जवळचे जाडजूड पुस्तक घेऊन आले. त्या पुस्तकाचे नाव ‘प्रेमभक्ती चंद्रिका’ असे होते. त्या पुस्तकात दोनच चित्रे होती, त्यांपैकी एक संत गौरांग यांचे होते. आजोबा हे पुस्तक नेहमी भक्तिभावाने वाचत. इतर कुणालाच ते कधीच दाखवीत नसत. अपूला एकदा ते म्हणाले, ‘‘मी मरण पावल्यावर हे पुस्तक तुझ्यासाठी ठेवून जाईन. माझी खात्री आहे, तू त्याला सांभाळून ठेवशील.’’

आजोबा अनेकदा त्याला या पुस्तकातून कथा वाचून दाखवीत, कवने म्हणत. ती ऐकत असताना अपूला वाटे की, आपल्यावरून शब्दांचा एक झराच वाहतो आहे आणि तो आपल्याला दूर कोठेतरी घेऊन जातो आहे. पक्ष्यांची गाणी ऐकताना जसे त्याचे भान हरपत असे तसेच ही कवने ऐकतानादेखील होई.

एके दिवशी अपू बाबाजींच्या घरून आपल्या घराकडे परतत होता तेव्हा त्याला पिवळ्या चाफ्याचे एक झाड दिसले. त्यावर फुलांचे गुच्छ लटकलेले होते. त्याने दोन्ही हातांत मावतील एवढी फुले तोडून घेतली आणि तो घरी परतला. त्याने ती फुले आपल्या अंथरुणावर ठेवली. मात्र त्याच वेळी बाबांनी त्याला अभ्यास करण्यासाठी बोलावले. अभ्यास करीत असताना त्याचे सारे लक्ष त्या फुलांकडेच होते. एकदाचा अभ्यास संपला, रात्रीचे जेवण झाले आणि तो झोपण्यासाठी आपल्या खोलीत पळाला. अंथरुणावर पालथा पडून त्याने त्या फुलांत आपला चेहरा बुडविला. या फुलांतून येणारा सुगंध त्याला जुन्या काळात घेऊन गेला. बालपणीच्या अनेक आठवणी त्याच्या मनात जाग्या झाल्या. जणू भूतकाळ पुन्हा एकदा वर्तमानकाळ बनला होता! अपू कितीतरी वेळ तो सुगंध अनुभवत राहिला...

------

आणखी काही दिवसांनंतरची गोष्ट

सर्वजयाच्या शेजारच्या शेजो मावशीच्या घरात नुकतेच एक लग्न लागले होते आणि तिचे घर दूरदुरून आलेल्या पाहुण्यांनी अजून भरलेले होते. त्या पाहुण्यांत एक टुनी नावाची मुलगीदेखील तिच्या आईवडिलांच्या सोबत आली होती. तिची आणि दुर्गाची चांगलीच मैत्री झाली होती.

दुपारच्या वेळी शेजो मावशीला  टुनीची आई काहीतरी शोधताना दिसली. तिने विचारले, ‘‘तू काय शोधते आहेस?’’

टुनीची आई म्हणाली, ‘‘मी नेहमी माझा सिंदूर ज्या सोन्याच्या डबीत ठेवते ती डबी कुठे दिसत नाही. सारीकडे शोधले.’’

‘‘तू डबी कोठे ठेवली होतीस?’’

‘‘इथेच, याच खोलीत.’’

आता शेजो मावशीसुद्धा डबी शोधू लागली. पण तिलाही ती सापडली नाही. मग तिने चौकशी केली तेव्हा तिला समजले की काही वेळापूर्वी दुर्गा येथे आली होती. सारे जण जेवायला बसले असताना ती एकटीच या खोलीत होती. त्यानंतर ती घरी जाऊन परत आली आहे. आधीच तिचा दुर्गावर राग होता. आता तिला नक्की वाटू लागले की, ती डबी दुर्गानेच चोरली असावी. तिने सरळ दुर्गाला विचारले, ‘‘दुर्गा, मुकाट्याने ती डबी परत कर, नाहीतर...’’

तिचा आविर्भाव पाहून दुर्गा घाबरली. तिच्या तोंडून शब्द फुटेना.

टुनीची आई गेल्या काही दिवसांपासून दुर्गाला पाहत होती. तिला ती मुलगी आवडली होती. मावशी दुर्गावर आळ घेते आहे हे तिला पटले नाही. ती म्हणाली, ‘‘मला नाही वाटत तिने डबी घेतली असेल म्हणून.’’

‘‘तू गप्प बैस.’’ मावशी रागाने म्हणाली. ‘‘तुला कल्पना नाही, पण या पोरीला मी चांगली ओळखते.’’

जमलेल्या बायकांपैकी एक जण म्हणाली, ‘‘दुर्गा, तू डबी घेतली असशील तर देऊन टाक. गोष्ट संपली. आम्ही कुणी तुला काही म्हणणार नाही.’’

दुर्गाचे पाय थरथर कापत होते. भिंतीचा आधार घेत ती कशीबशी म्हणाली, ‘‘मी खरेच सांगते. मी ती डबी पाहिलीसुद्धा नाही.’’

‘‘मी तुझ्यावर विश्वास ठेवीन असे तुला वाटते का?’’ मावशी ओरडून म्हणाली. मग आवाज खाली आणत ती म्हणाली, ‘‘मी तुला पुन्हा विचारते, गोडीगुलाबीने ती डबी परत कर. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.’’

तरी दुर्गा काहीच बोलली नाही. ते पाहून मावशीचा पारा चढला. तिने दुर्गाला मारण्यास सुरुवात केली. त्यानेही ती ऐकत नाही हे पाहून तिने दुर्गाचे डोके धरले व ते भिंतीवर आपटले. ते पाहून टुनीची आई धावत आली आणि तिने मावशीचा हात पकडला. ‘‘हे काय करते आहेस? माझी डबी गेली तर गेली. पण तिला मारू नकोस. सोड बरे आधी.’’

‘‘तिच्या नाकातून रक्त येत आहे.’’ एक जण म्हणाली. ‘‘कुणीतरी पाणी घेऊन या लवकर.’’

राणूची आई शेजारी गेली होती. हा आरडाओरडा ऐकून ती धावत आली. तिने दुर्गाची अवस्था पाहिली तेव्हा तिला धक्काच बसला. तिने दुर्गाचे तोंड पाण्याने धुतले व एका कोरड्या कपड्याने पुसून काढले. ती मावशीला म्हणाली, ‘‘हे काय दीदी? गरीब बिचारी अशक्त मुलगी. इतके मारतात का?’’

‘‘अशा चोरांना मारच  पाहिजे. ती डबी मिळाल्याशिवाय मी तिला सोडणार नाही. आणखी मारीन. मग हरिहरने मला फासावर दिले तरी चालेल.’’

‘‘मला ती डबी नको आहे. मी उगीचच त्या डबीचा विषय काढला. तिला जाऊ दे बरे. टुनीची आई म्हणाली.’’

मावशीच्या मनात दुर्गाला तसे सोडायचे नव्हते. पण सगळ्या बायका तिच्या विरुद्ध बोलू लागल्या तेव्हा तिला गप्प बसावे लागलेच.  

अनुवाद : विजय पाडळकर, पुणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विभूतीभूषण बंद्योपाध्याय

बंगाली साहित्यिक, कादंबरीकार
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके