डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

अपू बाहेर आला आणि त्याने दोन पैशांचे शेंगदाणे विकत घेतले. तेवढ्यात त्याला राजकुमार अजयचे काम करणारा मुलगा दिसला. तो जवळजवळ अपूच्याच वयाचा होता. त्याला भूक लागली होती, तो दुसऱ्या एका नटाला काहीतरी खाण्यासाठी मागत होता. पण त्या नटाने त्याला काहीच दिले नाही. तो हिरमुसला झाला. ते पाहून अपूला फार वाईट वाटले. तो त्या मुलाकडे जाऊन त्याला म्हणाला, ‘‘तुला थोडे शेंगदाणे पाहिजेत का?’’ ‘अजय’ने ‘हो’ म्हटले आणि अपूने आपल्याजवळील अर्धे शेंगदाणे त्याला आनंदाने दिले. दोघे जण एकमेकांचे मित्र बनले. अपूच्या आईने राजपुत्र अजयच्या अनेक गोष्टी अपूला सांगितल्या होत्या. त्यामुळे ‘अजय’ त्याला चांगलाच माहीत होता. हा मुलगा अजयची भूमिका करतो आहे हे पाहिल्यावर अपूला त्याच्याबद्दल अधिकच आकर्षण वाटू लागले.

चरक पूजा काही दिवसांवर आली होती आणि गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. एके दिवशी वैद्यनाथ मजुमदार हरिहरकडे आला व म्हणाला, ‘‘या वर्षी आपण उत्सव फार धूमधडाक्यात करणार आहो. मी वर्गणी गोळा करतो आहे. तुम्ही एक रुपया वर्गणी द्यावी अशी आमची इच्छा आहे.’’

हरिहर म्हणाला, ‘‘तुम्हाला माझी आर्थिक परिस्थिती माहीत आहेच. मी काही एक रुपया देऊ शकणार नाही.’’ (1)

या वर्षी गावातील लोकांनी नीलमणी हाजराची नाटक कंपनी बोलावली होती. ही नाटक कंपनी आजूबाजूच्या भागात फार प्रसिद्ध होती. पूजेचा दिवस जसजसा जवळ येत चालला तसतसे गावात दूरदुरून संन्याशी येण्यास सुरुवात झाली. हे संन्याशी भजने गात गावातून फिरत व लोकांकडे भिक्षा मागत. गावातील बरीच माणसे त्यांना डाळ, तांदूळ, गहू किंवा गूळ देत. ते एकदा हरिहरकडेही भिक्षा मागण्यास आले. त्या वेळी सर्वजया त्यांना फक्त हलक्या प्रतीचा तांदूळ देऊ शकली. नंतर पुन्हा ते तिच्याकडे आले नाहीत. मात्र दुर्गा, अपू आणि गावातील बहुतेक मुले दिवसभर या संन्याशांच्या मागेमागेच फिरत.

संन्याशांची भजने बारा दिवस चालली. तेरावा दिवस हा शंकराच्या पूजेचा दिवस होता. मुलांना कुणीतरी सांगितले की, या दिवशी संन्याशी स्मशानात जातात आणि नाच करतात. उत्सवासाठी एका विशिष्ट झाडाची पाने व फांद्या तोडली जात. दुर्गाने बातमी आणली की, या वर्षी संन्याशांनी पाने तोडण्यासाठी एक वेगळेच झाड निवडले आहे. दुर्गा, राणू, पुती, टूनी या साऱ्याजणी ते झाड पाहण्यास गेल्या. अपूदेखील त्यांच्यासोबत गेला. वाटेत मुलांच्या गप्पाचा विषय संन्याशी व भुतांच्या करामती हाच होता. राणू म्हणाली, ‘‘तुम्हांला माहीत आहे का? आज रात्री एक संन्याशी मेल्याचे सोंग करील. दुसरे त्याला स्मशानात नेतील. तेथे मंत्राने त्याला जिवंत केले जाईल. येताना ते काही खऱ्या कवट्या घेऊन येतील.’’

‘‘खऱ्या कवट्या?’’

‘‘हो. आज रात्री कुणी येथे आले तर त्याला ते दिसेल.’’

‘‘पण आजच्यासारख्या भयानक रात्री येथे कोण येणार?’’ एक जण म्हणाली.

‘‘आजच्यासारख्या म्हणजे?’’ अपूने विचारले.

‘‘ते समजून घेऊन तुला काय करायचे आहे? काही गोष्टी मुलांच्यासाठी नसतात. तू घरी जा बरे. राणू म्हणाली.’’

मुलीही घरी निघाल्या. मात्र त्या आपल्या गप्पांच्या नादात होत्या आणि अपू आजची रात्र भयानक आहे म्हणजे काय आहे याचाच विचार करीत होता. त्यामुळे काही वेळाने अपूच्या ध्यानात आले की, सारे जण पुढे निघून गेले आहेत, तो एकटाच मागे राहिला आहे. संध्याकाळ झाली होती. त्यातच आकाशात ढग जमा झाले, अंधार अधिकच भासू लागला. अपूला भीती वाटू लागली. त्यातच त्याला कसलातरी उग्र वास आला. हा कसला वास आहे, त्याला समजेना. तेवढ्यात त्याला दुरून एक म्हातारी येताना दिसली. तो अधिकच घाबरला. पण जवळ आल्यावर त्याला दिसले की ती त्याच्या मित्राची आजी आहे. त्याला थोडे हायसे वाटले. त्याने विचारले, ‘‘आजी, हा वास कसला आहे?

‘‘ ‘ते’ बाहेर पडले आहेत. तो हा वास आहे.’’ ती म्हणाली.

‘‘ ‘ते’ म्हणजे कोण?’’

‘‘आणखी कोण? तेच. शंकराचे सोबती. रात्रीच्या वेळी त्यांचे नाव घेत नसतात. राम...राम...राम...’’

अपूचे भय आणखी वाढले. तो थरथरत म्हणाला, ‘‘आजी, मी आता घरी कसा जाणार?’’

आजीला त्याच्या आवाजातील भीती जाणवली. ती म्हणाली, ‘‘तू या वेळी घराबाहेर आलासच का? ठीक आहे. माझी पूजा आटोपली की मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडते.’’

-------

गावातील मध्यवर्ती चौकात नाटकासाठी स्टेज उभारण्याचे काम जोरात सुरू झाले होते. अपू आणि त्याचे मित्र ज्या ठिकाणी कवड्या खेळायचे ती जागा आजूबाजूची झुडुपे तोडून रुंद आणि प्रशस्त बनविण्यात आली होती. आता सारा गाव नाटकात काम करणारी नटमंडळी केव्हा येते याची वाट पाहत होता. अपूला तर रात्री झोपदेखील येत नव्हती. ज्या दिवशी मंडळी येणार म्हणून नक्की बातमी आली त्या दिवशी अपू व त्याचे मित्र दुपारीच गावाबाहेर जाऊन त्यांच्या स्वागतास उभे राहिले. मोठ्या आकाराच्या पाच बैलगाड्यांतून नाटकासाठी लागणारे सामान आणले जात होते. सोबत नमुनेदार कपडे घातलेली अनेक माणसे चालत होती. मंडळींना जेथे उतरण्यासाठी जागा दिली होती तिकडे या गाड्या जात असताना गावातील सगळी मुले त्यांच्यामागून धावत होती.

मुलांनाच काय, सगळ्या गावालाच आनंद झाला होता. गाड्या आल्या हे सांगण्यासाठी अपू घरी आला. त्याने पाहिले, बाबा नाटकातील एक पद गुणगुणत होते. तो म्हणाला, ‘‘बाबा, किती गाड्या होत्या माहीत आहे? पाच. केवढे सामान होते! तुम्हांला कल्पनाही करता येणार नाही.’’

 सकाळ झाली. आपण कधी घराबाहेर पडतो आणि जत्रा कधी सुरू होते असे अपूला झाले होते. मात्र नेमके त्या दिवशी बाबांनी त्याला पुस्तकातील एक धडा लिहून काढायला सांगितले. तो म्हणाला, ‘‘बाबा, मी जाऊ का? जत्रा सुरू झाली असेल.’’

मात्र बाबा म्हणाले, ‘‘अरे, जत्रा सुरू झाली की ते लाउडस्पीकरवरून सांगतील. तू आजचा अभ्यास पूर्ण कर आणि मग बाहेर जा.’’

अपू हिरमुसलेला चेहरा घेऊन आईकडे गेला आणि त्याने बाबांची तक्रार केली. त्याच्या डोळ्यांतील अश्रू पाहून सर्वजया हरिहरला म्हणाली, ‘‘आजच त्याने अभ्यास केला पाहिजे असे काही आहे का? तुम्ही वर्षातले नऊ महिने फिरतीवर असता त्या वेळी त्याचा अभ्यास कोठे असतो? जाऊ द्या त्याला. एक दिवस अभ्यास केला नाही तर काही बिघडणार नाही.’’

खरे तर नाटक संध्याकाळी सुरू होणार होते. पण अपू दिवसभर त्या मंडळींच्या आगेमागेच फिरत राहिला. त्यांचे पोशाख, त्यांचे बोलणे-चालणे, त्यांनी सोबत आणलेले सामान, वगैरे  इतके चमत्कारिक होते की अपूने त्यापैकी कित्येक वस्तू तर कधीच पाहिल्या नव्हत्या. भूक लागली म्हणून नाइलाजाने तो दुपारी घरी परतला आणि कसेबसे चार घास खाऊन पुन्हा बाहेर पळण्याच्या विचारात होता तर हरिहरने त्याला पुन्हा पकडले. तो म्हणाला, ‘‘नाटक संध्याकाळी सुरू होणार आहे. आताच जायची गरज नाही. मी तुला शुद्धलेखन सांगतो. ते मला लिहून दाखव आणि मग जा.’’

शुद्धलेखन लिहून दिल्यावर कशीबशी अपूची सुटका झाली. जाण्यापूर्वी दुर्गा हलकेच त्याला म्हणाली, ‘‘अपू, आईला सांग ना! म्हणावे दीदीलाही जत्रा पाहायला जाऊ दे.’’

अपू आईला म्हणाला, ‘‘आई, दीदीला माझ्याबरोबर येऊ दे ना! तेथे बायकांसाठी खास सोय केली आहे. दीदी तेथे बसू शकेल.’’

आई म्हणाली, ‘‘नको. मी नंतर जाणारच आहे. दुर्गा माझ्यासोबत येईल.’’

आई आपल्याला नेते म्हणाली याचा दुर्गाला आनंद झाला. तिने अपूला बोलाविले व हळूच त्याच्या हातात दोन आणे देत ती म्हणाली, ‘‘भूक लागली तर काही घेऊन खा.’’

-------

मागच्या महिन्यात अपूने दुर्गाला एकदा पैसे मागितले होते.

‘‘तुला पैसे कशासाठी हवे आहेत?’’ दुर्गाने विचारले होते.

‘‘मी आज पाहिले, बाजारात पिकलेल्या लिची आल्या आहेत. एका पैशाला सहा. अशा मोठमोठ्या, लालभडक. त्या मला घ्यायच्या होत्या...तुझ्याजवळ एक पैसा आहे का दीदी?’’ पण दुर्गाजवळ त्या वेळी एक पैसाही नव्हता. त्याचा हिरमुसला चेहरा पाहून तिला फार वाईट वाटले होते. तिच्या भावावर तिचे अतिशय प्रेम होते, आणि त्याची साधी इच्छाही आपल्याला पूर्ण करता येत नाही याचे तिला दु:ख झाले. काही दिवसांपूर्वी हरिहर गावाहून आल्यानंतर तिने काही सामान आणण्यासाठी म्हणून त्याच्याकडून दोन आणे मागून घेतले होते. ते तिने अपूला देण्यासाठी जपून ठेवले होते.

पैसे हातात आल्यावर त्याचा चेहरा खुलला. तो चेहरा पाहूनच दुर्गाला खूप आनंद झाला.

संध्याकाळ झाली आणि नाटक सुरू झाले. पाहतापाहता अपूचे नेहमीचे ओळखीचे जग मागे पडले, आणि एक अनोळखी, जादूने भरलेले जग त्याच्यासमोर उलगडू लागले. आता तो होता आणि त्याच्यासमोर नाटकातली ती पात्रे होती जी त्याला खरीच वाटत होती. नाटक सुरू होण्यापूर्वीच काही गायक-वादकांनी मंचावर येऊन गाणी म्हणण्यास सुरुवात केली. अपूने इतके सुंदर आणि मधुर संगीत कधीच ऐकले नव्हते. त्याच्या मनाच्या तारा त्या संगीताने छेडल्या होत्या. रंगमंचावर वावरणाऱ्या पात्रांचे पोशाख भरजरी होते आणि त्यांनी भडक असा मेकअप केला होता. पण अपूला तो भडकपणा हा दोष वाटत नव्हता. उलट त्याचे लक्ष त्या हावभावांवर अधिकच खिळले  होते. तो भान हरपून त्यांच्याकडे पाहत होता. मंचावर मोठे कंदील लटकवलेले होते, त्यांचा प्रकाश वातावरणाला अधिकच प्रभावी करीत होता. तेवढ्यात त्याला पाठीमागून आवाज ऐकू आला, ‘‘तुला नीट दिसते आहे ना, अपू?’’

हा हरिहरचा आवाज होता. गर्दीतून अपूला शोधत तो त्याच्या मागे येऊन बसला होता.

‘‘दीदी आली आहे ना, बाबा?’’ अपूने विचारले.

‘‘हो. तिकडे बायकांत, तिच्या आईसोबत बसली असेल.’’

अपू पुन्हा नाटकाकडे लक्ष देऊ लागला. राजाच्या विरुद्ध त्याच्या मंत्र्याने कट-कारस्थान केल्यामुळे राजाला त्याची पत्नी आणि मुलांसोबत वनवासात जावे लागते. हा प्रसंग पाहताना अपूच्या डोळ्यांत पाणी आले. पुढच्या प्रसंगात राजाची मुले अजय आणि इंदुलेखा रानात रस्ता चुकतात. नंतर त्या दोघांचीही ताटातूट होते. इंदुलेखा भुकेने व्याकूळ होऊन काही रानफळे खाते. ती विषारी असतात, त्यामुळे ती मरण पावते. राजपुत्र अजय तिचा शोध घेत भटकत असताना त्याला ती नदीच्या किनारी मारून पडलेली दिसते. तो एक अतिशय करुण गीत गाऊ लागतो. ते गाणे ऐकताना तर अपूला अश्रू आवरेनात.

नंतर आलेला कलिंगचा राजा आणि विचित्रकेतू यांच्यातील लढाईचा प्रसंग मात्र सारे काही विसरावयास लावणारा होता. काय जबरदस्त लढाई होती ती! एवढ्या त्वेषाने ते आपल्या तलवारी फिरवू लागले की प्रेक्षकांना मंचावरील दिवे फुटतील की काय याची भीती वाटू लागली. ‘‘दिवे सांभाळा, दिवे सांभाळा’’ ते ओरडू लागले.

काही वेळानंतर हरिहरने मागून आवाज दिला, ‘‘अपू, तू पेंगतो आहेस. आपण घरी जायचे का?’’

पण आपण पेंगतो आहो हे अपूला मान्य नव्हते. तो घरी येण्यास तर मुळीच तयार नव्हता. मग हरिहरने त्याला दोन पैसे दिले व तो म्हणाला, ‘‘हे पैसे घे आणि तुला खाण्यासाठी काही पाहिजे असेल तर घेऊन खा. मी घरी चाललो.’’

अपू बाहेर आला आणि त्याने दोन पैशांचे शेंगदाणे विकत घेतले. तेवढ्यात त्याला राजकुमार अजयचे काम करणारा मुलगा दिसला. तो जवळजवळ अपूच्याच वयाचा होता. त्याला भूक लागली होती, तो दुसऱ्या एका नटाला काहीतरी खाण्यासाठी मागत होता. पण त्या नटाने त्याला काहीच दिले नाही. तो हिरमुसला झाला. ते पाहून अपूला फार वाईट वाटले. तो त्या मुलाकडे जाऊन त्याला म्हणाला, ‘‘तुला थोडे शेंगदाणे पाहिजेत का?’’

‘अजय’ने ‘हो’ म्हटले आणि अपूने आपल्याजवळील अर्धे शेंगदाणे त्याला आनंदाने दिले. दोघे जण एकमेकांचे मित्र बनले. अपूच्या आईने राजपुत्र अजयच्या अनेक गोष्टी अपूला सांगितल्या होत्या. त्यामुळे ‘अजय’ त्याला चांगलाच माहीत होता. हा मुलगा अजयची भूमिका करतो आहे हे पाहिल्यावर अपूला त्याच्याबद्दल अधिकच आकर्षण वाटू लागले. जत्रेच्या दिवसांतील नाटकात जी माणसे भूमिका करीत त्यांना गावातील लोक आपल्या घरी जेवायला बोलावीत. अपूने ‘अजय’ला दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जेवण्यास बोलाविले. तो मुलगा म्हणाला,

‘‘तुला माझे गाणे कसे वाटले?’’

‘‘खूपच छान.’’

‘‘आता यानंतर माझे आणखी एक गाणे आहे. ते ऐक. मी जेवायला येईन. पण नाटक संपायलाच रात्रीचे बारा वाजून जातील. मी उद्या दुपारी आलो तर चालेल काय?’’

अपू म्हणाला, ‘‘ठीक आहे. मी तसे आईला सांगतो.’’

तेवढ्यात पुढला अंक सुरू होण्याची घंटा झाली व ‘अजय’ धावतच मंचाकडे गेला. त्या दिवशी नाटक इतके रंगले की ते संपले तेव्हा मध्यरात्र होऊन गेली होती. नाटक संपले तरी अपूच्या डोक्यात ते चालूच होते. त्याला नाटकातील प्रसंग आठवत होते, कित्येक वाक्ये आठवत होती, त्याच्या मनात नाटकातील पदांच्या चाली फेर धरून नाचत होत्या. इतका उशीर झाला तरी अपू घरी आला त्या वेळी त्याची आई आणि दुर्गा दोघीही जाग्या होत्या व त्याची वाट पाहत होत्या. दुर्गाने त्याला नाटकाबद्दल अनेक प्रश्न विचारले. पण गम्मत म्हणजे त्याच्या डोक्यात मात्र भावाला हाका मारणाऱ्या इंदुलेखाचाच आवाज घुमत होता. मात्र झोपण्यापूर्वी तो आठवणीने आईला म्हणाला,

‘‘आई, नाटकात अजयचे काम करणाऱ्या मुलाची व माझी मैत्री झाली आहे. मी त्याला उद्या घरी जेवायला बोलावले आहे.’’

ते ऐकून सर्वजया काळजीने म्हणाली, ‘‘अपू, आपल्याकडे कुणी दुसरा नट येणार होता ना? मी दोघादोघांना जेवण कुठून घालणार?’’

अपू म्हणाला, ‘‘तो दुसरा नट येणार नाही. फक्त ‘अजय’च येणार आहे.’’

रात्री अंथरुणावर पडल्यावर अपूला लवकर झोप आली नाही. नाटक पाहण्याचा हा अनुभव त्याला इतका मोहित करून गेला होता की, झोपेतही त्याला नाटकातील प्रसंग दिसत होते. संगीत ऐकू येत होते. दुसऱ्या दिवशी त्याला लवकर जाग आली नाही. डोळ्यांवर ऊन आल्यामुळेच तो उठला. सकाळी दुर्गा त्याला उठविण्यास आली तेव्हा त्याला वाटले, नाटकातील राजकन्या इंदुलेखाच आपल्याला उठवीत आहे. कालच्या नाटकात इंदुलेखाचे काम एका मुलाने केले होते. ते काम चांगले होते. पण अपूला वाटले की आपली बहीण खरी इंदुलेखा आहे. तिने ते काम कितीतरी चांगले केले असते.  तिचे डोळे किती सुंदर आहेत!

दुपारच्या वेळी अपू आपल्या मित्राला बोलावण्यासाठी गेला. दोघे जण घरी आल्यावर सर्वजयाने त्यांना जवळजवळ बसविले व ती अजयला अनेक प्रश्न विचारू लागली. अजयने सांगितले की तो एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा असून, त्याचे आईवडील तो लहान असतानाच मरण पावले आहेत. आता त्याचे जवळचे असे कुणीच नाही. त्याचा आवाज चांगला असल्यामुळे या नाटक कंपनीच्या मालकाने त्याला आपल्या कंपनीत ठेवून घेतले आहे. हे ऐकून सर्वजयाला फार वाईट वाटले. तिने जे काही पदार्थ बनविले होते ते आग्रह करून त्याला खाऊ घातले. जेवण झाल्यानंतर दुर्गा आईला म्हणाली, ‘‘आई, काल अजयने इतके छान गाणे म्हटले! त्याला ते म्हणायला सांग ना.’’

‘‘म्हण की रे!’’ सर्वजया अजयला आग्रह करीत म्हणाली.

अजयने ते गाणे म्हणण्यास सुरुवात केली. त्या गाण्याचे करुण सूर आणि शब्द ऐकून सर्वजयाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. जगात आपले असे म्हणण्यासारखे कुणीच नसणाऱ्या त्या पोरक्या मुलाविषयी करुणेने तिचे मन भरून गेले. तो जाताना ती म्हणाली, ‘‘तू जोपर्यंत येथे आहेस तोपर्यंत रोज आमच्याकडे जेवायला येत जा. लाजू नकोस.’’

जेवणानंतर दोघे मित्र गावात भटकण्यासाठी निघाले. अपू अजयला नदीच्या किनारी घेऊन गेला. वाटेत अजय म्हणाला, ‘‘अपू, तुझी आई म्हणत होती की तूसुद्धा छान गाणे म्हणतोस. मला एखादे म्हणून दाखव ना.’’

अपूलाही गाणे म्हणून दाखवावे वाटत होते, पण त्याला थोडी लाज व थोडी भीतीही वाटत होती. शेवटी अजय हा मोठ्या गावात राहणारा, नाटकात काम करणारा नट होता. त्याच्यासमोर गाणे म्हणायचे म्हणजे...त्याला जर आवडले नाही तर? पण गाणे म्हणण्याची इच्छाही त्याला गप्प बसू देईना. तसेही ते गावापासून दूर आले होते. येथे त्यांचे गाणे ऐकणारे दुसरे कुणी नव्हते. त्याने वडिलांनी शिकविलेले एक गाणे म्हणावयास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून अजय आश्चर्यचकित झाला. खेड्यातील एका मुलाचा आवाज इतका सुरेल असू शकेल असे त्याला वाटलेच नव्हते. तो म्हणाला, ‘‘अपू, तुझा आवाज तर फार सुरेख आहे. तू गाणे शिकत का नाहीस? लोक तुझे गाणे आनंदाने ऐकतील. आणखी एक गाणे म्हण ना.’’

अपूला आता फारसा आग्रह करावा लागला नाही. दुर्गाने त्याला शिकविलेले एक गीत त्याने म्हणावयास सुरुवात केली. दुर्गा हे गाणे कोठूनतरी शिकून आली होती व तिने अपूलाही ते शिकविले होते. घरी कुणी नसताना ते दोघे मिळून हे गाणे म्हणत.

अजय म्हणाला, ‘‘अपू, तू एखाद्या नाटक कंपनीतच जायला हवे. त्यांना उत्तम गाणाऱ्यांची फार गरज असते. ते तुला महिन्याला पंधरा रुपयेसुद्धा देतील. पण एक आहे, कंपनीत गाण्याची  प्रॅक्टिस मात्र खूप करावी लागते.’’

अपू म्हणाला, ‘‘तू आईसमोर जे गाणे म्हणालास ते मला शिकवशील का?’’

अजयने त्याला ते गाणे शिकविले आणि मग दोघे मिळून ते गाणे गाऊ लागले. असा कितीतरी वेळ गेला. गाणी संपल्यावर काही काळ ते शांतपणे एकमेकांसोबत बसून राहिले. मग अपू म्हणाला, ‘‘अजय, तू आमच्या बरोबरच का राहत नाहीस?’’

या प्रश्नाच्या उत्तरादाखल अजयने आपली स्वप्ने त्याला सांगितली. ज्याला तो हे सारे सांगू शकेल असा कुणी जिवाभावाचा मित्र त्यालाही आजवर मिळाला नव्हता. त्याला एका मोठ्या नाटक कंपनीत जायचे होते. आणखी चांगल्या, मोठ्या भूमिका करायच्या होत्या. एखाद्या खेड्यात राहून ते शक्य नव्हते. त्याचा सध्याचा मालक अनेकदा त्याला मारतो, वेळेवर आणि पोटभर जेवण देत नाही. जो काय थोडासा पगार मिळतो त्यातून अजयने चाळीस रुपये जमविले आहेत. आणखी थोडे जमले की तो ही कंपनी नक्कीच सोडणार. त्याने एक कंपनी पाहूनही ठेवली होती. त्या कंपनीत रोज जेवणाबरोबर लिची दिली जाते. आणि जर आपल्याला जेवायचे नसेल तर तीन आणे दिले जातात...

संध्याकाळ झाली तेव्हा या दोन मित्रांना आपल्या गप्पा नाइलाजाने आवराव्या लागल्या.

जत्रा आणखी तीन दिवस चालली. जोपर्यंत गावात जत्रा होती तोपर्यंत गावकऱ्यांना बोलण्यासाठी दुसरा विषयच नव्हता. रस्त्यावरून चालणारी माणसे, तळ्यावर पाणी भरणाऱ्या बायका, नाव चालविणारे नावाडी एवढेच नव्हे- तर गुरे हाकणारे गुराखीदेखील नाटकातील गाणी म्हणू लागले. या काळात अपूने अजयकडून आणखी तीनचार गाणी शिकून घेतली. एके दिवशी अजय त्याला आपल्या कंपनीतील सोबत्यांकडे घेऊन गेला. त्या माणसांना त्याने अपूविषयी खूप गोष्टी सांगितल्या होत्या त्यामुळे तो भेटताच त्यांनी त्याला गाणे म्हणण्याचा आग्रह केला. अपूने प्रथम खूप आढेवेढे घेतले; पण त्याला गाणे म्हणावेच लागले. त्यांना त्याचे गाणे फार आवडले, ते त्याला घेऊन कंपनीच्या मॅनेजरकडे गेले. आता अपूला त्याच्यासमोरदेखील गावे लागले. ते गाणे ऐकू मॅनेजर इतका खूश झाला की त्याने लगेच अपूला आपल्या कंपनीत काम करण्यास येण्याचे निमंत्रण दिले. मात्र तो म्हणाला की, काही दिवस अपूला लहान मुलीच्या वगैरे किरकोळ भूमिका कराव्या लागतील. अपूला तर लढाई करणारा राजपुत्र किंवा वीर व्हायचे होते. त्याने आणखी थोडा मोठा झाल्यावर नाटक कंपनीत जाण्याचे मनात ठरविले.

जत्रेतील शेवटचे नाटक झाले आणि दुसऱ्या दिवशी कंपनी पुढील गावाला जाण्यासाठी निघाली. हे पाच दिवस अजय रोज अपूच्या घरी दुपारी जेवण्यासाठी येत होता. त्याला हे घर आपलेच वाटत होते. अपू तर त्याला आपला भाऊच समजत होता. पण सर्वजयादेखील आपल्या मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम करू लागली होती. दुर्गालाही तो खूप आवडला होता. तिने त्याच्याकडून काही गाणी शिकून घेतली. अजयच्या आयुष्यातील हा प्रेमाचा पहिला अनुभव होता. आजवर त्याला कुणी जेवलास का, असेदेखील विचारले नव्हते. आज त्याचे पोट भरल्यावरदेखील आणखी खाण्याचा आग्रह करणारी आई त्याला भेटली होती. त्याला या माणसांपासून दूर जावेच वाटत नव्हते.

पण शेवटी त्याला जावे लागलेच. निरोपाचा क्षण आला आणि अचानक त्याच्या मनात एक विचार आला. त्याने आपल्या पिशवीत हात घातला व त्याच्या जवळच्या साठवलेल्या पैशांतून पाच रुपयांची एक नोट काढून तो सर्वजयाला देऊ लागला. तो म्हणाला, ‘‘या पैशांनी दीदीच्या लग्नात माझ्याकडून तिला साडी घ्या.’’

पण सर्वजया त्याच्याकडून पैसे कसे घेणार होती? ती म्हणाली, ‘‘अरे, तू दीदीसाठी काही करू पाहतोस ही चांगली गोष्ट आहे. पण मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही. या पैशांची तुला अधिक गरज आहे.’’

अजयने खूप आग्रह केला. पण सर्वजयाने त्याला ते पैसे परत पिशवीत टाकावयास लावले. सारे जण फाटकापर्यंत त्याला निरोप देण्यासाठी गेले. अजय वळला. दिसेनासा झाला. सर्वजया मनाशी म्हणाली, ‘‘लहान असून कसा मोठ्यासारखं वागतो आहे हा मुलगा! बिचाऱ्याला या वयात जगण्यासाठी किती कष्ट करावे लागतात! किती दुर्दैवाची गोष्ट!’’ 

(ही गोष्ट शंभर वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळी एका रुपयात एका कुटुंबाचा महिन्याभराचा खर्च भागत असे.)

अनुवाद : विजय पाडळकर, पुणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विभूतीभूषण बंद्योपाध्याय

बंगाली साहित्यिक, कादंबरीकार
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके