डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाथेर पांचाली : चित्रपटाच्या आधी स्केचबुक

सत्यजित यांनी या चित्रपटासाठी लिखित अशी पटकथा तयार केलेली नव्हती. नुसती कल्पना सांगून निर्माता मिळणे कठीण होते. मग त्यांनी एक स्केचबुक घेतले व त्यात भावी चित्रपटातील दृश्यांची चित्रे रेखाटण्यास प्रारंभ केला. हे स्केचबुक ते निर्मात्यांना दाखवू लागले. हा प्रयोग अतिशय अभिनव होता. जगात अशा प्रकारे चित्रात्मक पटकथा कुणी तयार केली नव्हती. मात्र हा प्रयोग निर्मात्यांच्या डोक्यावरून गेला. पुढे असंख्य खटपटी करून, मोठ्या कष्टाने त्यांनी हा चित्रपट निर्माण केला हा वेगळाच इतिहास आहे. 

सत्यजित राय यांचा ‘पथेर पांचाली’ हा चित्रपट अनेक दृष्टींनी एक क्रांतिकारक चित्रपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीची खऱ्या अर्थाने जगाशी ओळख करून देणारा तो चित्रपट आहे. 1952 मध्ये राय यांच्या मनात या चित्रपटाची पक्की रूपरेषा तयार झाली व 1955 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र त्याचे बीज सुप्त रूपाने राय यांच्या मनात त्यापूर्वी कितीतरी वर्षे पडले होते. 1953पर्यंत राय यांची एक विशिष्ट मनोभूमिका तयार झाली होती. मात्र तिला आकार मिळण्यास प्रारंभ झाला तो 1940 मध्ये, ज्या वेळी राय कोलकता सोडून शांतिनिकेतनमध्ये चित्रकलेच्या शिक्षणासाठी गेले. 

शांतिनिकेतनमधील शिक्षण व वास्तव्य रायच्या मनावर फार मोठा परिणाम करून गेले. बंगालच्या ग्रामीण  जीवनाचा अनुभव ते आयुष्यात प्रथमच घेत होते. निसर्ग आणि माणूस यांच्यातील संवादाला कलेतून दृश्य रूप कसे द्यायचे हे सत्यजित या ठिकाणी नंदलाल बोस यांच्याकडून शिकले. पुढे त्यांनी या संदर्भात लिहिले, ‘‘मी जर शांतिनिकेतनमध्ये शिकण्यास आलो नसतो तर मी ‘पथेर पांचाली’ हा चित्रपट कधीच निर्माण करू शकलो नसतो.’’ 

शांतिनिकेतन सोडल्यावर सत्यजित कोलकत्याला एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करू लागले. त्याच काळात त्यांनी मासिके व पुस्तकांसाठी चित्रे आणि मुखपृष्ठे काढण्यास सुरुवात केली. त्यांनी केलेले पुस्तकाच्या रचनेतील प्रयोग बंगाली मुद्रणकलेला नवी दिशा देणारे ठरले. 1944 मध्ये सिग्नेट प्रेसने विभूतिभूषण बंदोेपाध्याय यांच्या ‘पथेर पांचाली’ या कादंबरीची कुमारांसाठी संक्षिप्त आवृत्ती काढण्याचे ठरविले व हे लेखन चित्रे काढण्यासाठी सत्यजितच्या हवाली केले. सत्यजितनी हे पुस्तक पूर्वी वाचलेले नव्हते. त्यांनी मूळ कादंबरी व तिचे संक्षिप्त रूप, दोन्ही काळजीपूर्वक वाचले. या पुस्तकाने सत्यजितना फार प्रभावीत केले. त्यांना ती एक महान कादंबरी तर वाटलीच; शिवाय ग्रामीण बंगाली जीवनाचा तो एक ज्ञानकोश आहे असेही त्यांचे मत झाले. सिग्नेट प्रेसच्या प्रकाशकांनी बोलता बोलता सत्यजितना सांगितले की या संक्षिप्त आवृत्तीवर एक उत्तम चित्रपट निघू शकेल. या आवृतीसाठी चित्रे काढताना सत्यजितच्या मनात पार्श्वभूमीला हा विचार नेहमी यायचा. मनात एका कल्पनेचे बीज पडले होते. त्याचा अंकुर वर येण्यास दहा वर्षे लागली, पण अंतर्मनात  त्याची वाढ सुरू झाली होती. 

1947 मध्ये सत्यजित राय यांनी भारतातील पहिली चित्रपट सोसायटी काढली. या सोसायटीत त्यांनी जगातील उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शकांचे चित्रपट दाखविले, स्वत:ही अभ्यासले. चांगला सिनेमा हा कसा असतो याची कल्पना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली होती. 1950 मध्ये राय जाहिरात कंपनीच्या कामासाठी इंग्लंडला गेले. तेथील सुमारे चार महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी सुमारे शंभर उत्तमोत्तम चित्रपट पाहिले, त्यांत डी सिकाचा ‘बायसिकल थीव्ह्‌ज’ हाही होता. तेथून परत येताना सत्यजित आपल्या पत्नीला म्हणाले, ‘‘माझ्या मनात असाच चित्रपट काढण्याची कल्पना कितीतरी दिवसांपासून घोळत आहे. मी त्यासाठी एक कथाही निवडून ठेवली आहे.’’ 

‘‘कोणती?’’ 

‘‘विभूतिभूषण बंदोपाध्याय यांची ‘पथेर पांचाली’. 

भारतात आल्यावर जेव्हा त्यांनी गंभीरपणे या प्रकल्पाचा विचार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या समोर पहिला प्रश्न चित्रपटासाठी पैसा पुरवू शकेल असा निर्माता बघण्याचा होता. सत्यजित यांनी या चित्रपटासाठी लिखित अशी पटकथा तयार केलेली नव्हती. नुसती कल्पना सांगून निर्माता मिळणे कठीण होते. मग त्यांनी एक स्केचबुक घेतले व त्यात भावी चित्रपटातील दृश्यांची चित्रे रेखाटण्यास प्रारंभ केला. हे स्केचबुक ते निर्मात्यांना दाखवू लागले. हा प्रयोग अतिशय अभिनव होता. जगात अशा प्रकारे चित्रात्मक पटकथा कुणी तयार केली नव्हती. मात्र हा प्रयोग निर्मात्यांच्या डोक्यावरून गेला. पुढे असंख्य खटपटी करून, मोठ्या कष्टाने त्यांनी हा चित्रपट निर्माण केला हा वेगळाच इतिहास आहे. 

पुढे अनेक वर्षांनी हे स्केचबुक सत्यजित राय यांनी Cinematheque Francais या संस्थेला भेट दिले. याबद्दल त्यांचा मुलगा संदीपला ते बोलले होते. म्हणून त्याला ही गोष्ट ठाऊक होती. राय यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांना ही चित्रे पुन्हा पाहण्याची इच्छा झाली, त्या वेळी सत्यजित राय यांचा मुलगा संदीप याने Cinematheque Francais ला ते परत देण्याची विनंती केली. पण त्यांनी सांगितले की ते स्केचबुक गहाळ झाले आहे. राय यांना ते पुन्हा पाहावयास मिळालेच नाही. 

संदीपने तरीही त्या पुस्तकाचा शोध सुरू ठेवला. सुदैवाने 2015 मध्ये त्या पुस्तकाची scanned copy संदीपला मिळाली व त्यावरून "Society for the preservation of Satyajit Ray Archives'' या संस्थेच्या सहकार्याने संदीपने 2016 मध्ये हे संपूर्ण पुस्तक 'The Pather Panchali Sketchbook' या नावाने प्रकाशित केले. 

अतिशय देखण्या स्वरूपात आर्ट पेपरवर हे पुस्तक प्रकाशित करताना संदीपने त्यात फार मोलाची माहिती एकत्रित करून दिली आहे. ‘पथेर पांचाली’ जेव्हा प्रदर्शित झाला त्या वेळी त्या चित्रपटावर आलेली परीक्षणे येथे वाचावयास मिळतात. यापैकी पंकज दत्ता यांनी ‘देश’ साप्ताहिकात लिहिलेले दीर्घ परीक्षण आजही या चित्रपटावरील सर्वोत्तम समीक्षेपैकी एक मानले जाते. 

या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल राय यांच्या दोन महत्त्वाच्या मुलाखती यात आहेत. त्यात ते म्हणतात, ‘‘या चित्रपटाची लिखित पटकथा माझ्याजवळ नव्हती याचे एक  कारण म्हणजे संपूर्ण चित्रपट माझ्या मनात पक्का होता. दुसरे म्हणजे त्या वेळी मला विश्वास नव्हता की मी चित्रपटातील संवाद उत्तम प्रकारे लिहू शकेन. सुदैवाने विभूतिभूषण यांनी कादंबरीत फार सुरेख संवाद लिहिलेले होते. माझ्या सिनेमातील तीन चतुर्थांश संवाद मी पुस्तकातूनच घेतले आहेत.’’ 

या पुस्तकात राय यांच्या पत्नी विजया यांनी ‘पथेर पंचालीचे दिवस’ या नावाने एक सुरेख टिपण लिहिले आहे. सत्यजितचे छायाचित्रकार सुब्रत मित्र व सौमेंदू राय, तसेच कला निर्देशक बन्सी चंद्रगुप्त आणि संकलक दुलाल दत्ता यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी सांगितल्या आहेत. उमा सेन आणि सुबीर बानर्जी यांनी आयुष्यात प्रथमच या चित्रपटात अभिनय केला. मोठी बहीण दुर्गा व तिचा धाकटा भाऊ अपू यांच्या भूमिका करताना आलेले अनुभव त्यांनी फार छान व्यक्त केले आहेत. या साऱ्या लेखांतून राय यांचे दिग्दर्शक व माणूस म्हणून अतिशय लोभस रूप नजरेसमोर येते. 

या पुस्तकात संदीपने व सोसायटीने अतिशय दुर्मीळ असा ऐवज सर्वांसाठी खुला केला आहे. यात राय यांनी ‘पथेर पांचाली’साठी काढलेली पोस्टर्स आहेत, बुकलेट आहे. सत्यजित राय यांनी विभूतिभूषण यांच्या पत्नीशी केलेल्या कराराची कॉपीदेखील येथे आपल्याला पाहावयास मिळते. सत्यजित राय यांच्या हस्ताक्षरात त्यांनी ‘अपू-त्रिवेणी’वर लिहिलेले स्टेटमेंट येथे आहे. ‘पथेर पांचाली’च्या मुलांसाठीच्या आवृत्तीचे नाव ‘आम आंटीर भेन्पू’ होते. या मूळ पुस्तकासाठी राय यांनी काढलेली अनेक चित्रेही आपल्याला पाहावयास मिळतात. राय यांनी त्या काळात वर्तमानपत्रात आपल्या सिनेमाची केलेली जाहिरात, 'Hindusthan Standard' मध्ये आलेले परीक्षण, राय यांना आलेली नामवंतांची पत्रे व काही दुर्मीळ फोटो या पुस्तकाचे संदर्भमूल्य निश्चितच वाढवितात. भारतीय टपाल खात्याने राय यांच्या गौरवार्थ काढलेल्या पोस्टाच्या तिकिटाचे चित्रही यात आहे. 

ज्यांनी ‘पथेर पांचाली’ बघितलेला नाही त्यांच्या मनात तो बघण्याची उत्सुकता निर्माण करणारे तसेच ज्यांनी तो बघितला आहे त्यांच्यासाठी या असामान्य कलाकृतीच्या अभ्यासाचे एक वेगळे दालन उघडणारेदेखील हे पुस्तक आहे. राय यांच्या मनात या सिनेमाची क्षणचित्रे सतत कशी भिरभिरत होती व प्रत्यक्ष शूटिंग करताना त्यांनी ती पडद्यावर कशी मांडली हे पाहणे हा विलक्षण अनुभव आहे. 

लेखकाचे शब्द व त्यांना दिग्दर्शकाने दिलेले दृश्य, प्रतिमारूप असा अभ्यास नेहमी केला जातो. येथे प्रथमच एका चित्रकाराच्या मनात रेखाटले गेलेले चित्र आणि आणि त्याने त्याचे दृश्य प्रतिमेत केलेले रूपांतर अभ्यासण्याची संधी मिळते. चित्रकला आणि सिनेछायाचित्रकला या दोन्हींत गती असलेल्या एखाद्या अभ्यासकाने हा प्रकल्प अवश्य करायला हवा. 

Tags: सिनेमा सत्यजीत राय कला दिग्दर्शक चित्रपट भारतीय चित्रपट वृत्तचित्र संस्कृती विजय पाडळकर सत्यजित राय satyajeet ray films vijay padalkar t cinema bhartiy chitrapa bhartiy cinema satyajeet ray national film archive films indian cinema satyajit ray and indian cinema sadhana issue on satyajit ray satyajit ray weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके