डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सत्यजित राय यांनी केलेल्या पाच डॉक्युमेंटरी

सुमारे पस्तीस वर्षांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत त्यांनी चौतीस चित्रपटांसोबत पाच उत्तम वृत्तचित्रेही निर्माण केली. मात्र ही बाब काहीशी अलक्षित व अपरिचितच राहिली आहे. आपल्याकडे वृत्तचित्रे व्यावसायिक दृष्ट्या प्रसारित होण्याची सोय नाही, हे याचे प्रमुख कारण आहे.  

‘वृत्तचित्र’ (Documentary) हे चित्रपटाचे एक महत्त्वाचे रूप आहे. Documentary हा शब्द सर्वप्रथम जॉन ग्रीअर्सन याने रोबर्ट फ्लाहर्तीच्या ‘मोना’ या चित्रपटासंदर्भात वापरला असला तरी अशा प्रकारचे चित्रपट अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून तयार केले जात होते. सर्वसाधारणपणे Documentary ची व्याख्या ‘अकथात्म चित्रपट’ अशी केली जाते. असे चित्रपट एखाद्या सत्य घटनेचे चित्रण करणारे, किंवा व्यक्तीचे जीवनदर्शन घडविणारे, किंवा प्रचार करणारे असतात. परदेशांत या चित्रपटांकडे एक वेगळी विद्या म्हणून पाहिले जाते, त्यांचा अभ्यास होतो व अनेक चित्रपट लोकप्रियदेखील बनतात. मात्र भारतात त्यांना फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. याचे कारण म्हणजे इतर चित्रपटांसारखे ते टॉकीजमध्ये दाखविले जाण्याची सोय नसते. आपल्याकडे बहुतेक Documentaries सरकारतर्फेच काढल्या जातात. ‘फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया’ने या संदर्भात महत्त्वाचे कार्य केले आहे. 

Documentaries या सर्वसाधारणपणे माहितीपर असल्या, तरी श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या हाती त्यांना कलात्मक रूप प्राप्त होते. केवळ माहिती किंवा नोंद यांच्या पलीकडे जाऊन जीवनातील काही सत्यांचा कलात्मक वेध त्या घेऊ शकतात. प्रसंगी त्या अतिशय प्रेक्षणीय व काव्यात्मदेखील बनू शकतात. सत्यजित राय हे आज जगातील श्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून सर्वमान्य झालेले असले तरी वृत्तचित्रांच्या क्षेत्रातदेखील त्यांनी मोठे काम केले आहे. सुमारे पस्तीस वर्षांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत त्यांनी चौतीस चित्रपटांसोबत पाच उत्तम वृत्तचित्रेही निर्माण केली. मात्र ही बाब काहीशी अलक्षित व अपरिचितच राहिली आहे. आपल्याकडे वृत्तचित्रे व्यावसायिक दृष्ट्या प्रसारित होण्याची सोय नाही, हे याचे प्रमुख कारण आहे. 

1. रवीन्द्रनाथ टागोर (1961) 

1961 हे वर्ष रवीन्द्रनाथ टागोरांचे जन्मशताब्दी वर्ष होते. टागोरांची शताब्दी भव्य प्रमाणावर साजरी करण्याचे भारत सरकारने ठरविले व त्यानुसार एक स्थायी समिती तयार करण्यात आली. या समितीत इतर अनेक ठरावांसोबत असे ठरले की टागोर यांच्यावर देशात आणि परदेशांत दाखविता येईल असा चित्रपट निर्माण करावा. सत्यजित राय हे बंगाली असल्यामुळे त्यांना हे काम द्यावे असे काही जणांचे मत पडले. मात्र समितीतील एकाने असा मुद्दा मांडला की राय हे सिनेमा काढतात, ते काही इतिहासतज्ज्ञ नाहीत, त्यामुळे हे काम त्यांच्याकडे सोपविणे बरोबर नव्हे. पण जवाहरलाल नेहरूंनी राय यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यांनी राय यांचे काही चित्रपट पाहिलेले होते व ते त्यांना आवडलेले होते. नेहरू म्हणाले, "We don't need a historian, what we need is an artist."

समितीला हे मानावेच लागले. समितीतील सदस्यांना Documentaryची काहीच कल्पना नसल्यामुळे त्यांनी या कामावर देखरेख ठेवण्यास फिल्म्स डिव्हिजनला सांगितले. सत्यजित यांना जेव्हा विचारण्यात आले की या कामाचे मानधन तुम्ही काय घेणार, तेव्हा राय यांनी प्रतिफूट 25 रु. मोबदला मागितला, जो लगेच मंजूर करण्यात आला. रायना सांगण्यात आले की या चित्रपटाच्या दोन आवृत्त्या काढल्या जाव्यात. एक आवृत्ती सुमारे एक तास लांबीची असेल व तिला राय यांच्या आवाजात इंग्रजीत commentary असेल. दुसरी आवृत्ती फक्त दोन रीलची सुमारे वीस मिनिटे असेल. या आवृत्तीला हिंदी किंवा इतर भारतीय प्रादेशिक भाषांत डब करण्याचे अधिकार फिल्म्स डिव्हिजनकडे असतील. 

राय यांनी ठरविले की हा टागोरांच्या जीवनावरील कथात्म चित्रपट असणार नाही. कारण मग त्यासाठी अनेक खाजगी गोष्टी चित्रपटात मांडाव्या लागल्या असत्या. त्यामुळे या फिल्मचे रूप टागोर यांचे विचार व कार्य दर्शविणारी डॉक्युमेंटरी असे ठेवून त्यानुसार त्यांनी पटकथेची मांडणी करण्यास सुरुवात केली. या डॉक्युमेंटरीसाठी आवश्यक ती कागदपत्रे आणि इतर गोष्टी मिळविण्यासाठी ते काही दिवस शांतिनिकेतनमध्ये जाऊन राहिले. नंतर ते या कामासाठी लंडन व पॅरिसलाही जाऊन आले. 

रवीन्द्रनाथ टागोर आणि सत्यजित राय हे गेल्या शतकातील जागतिक मान्यता मिळालेले दोन महान भारतीय कलावंत. या दोघांचेही एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते खऱ्या अर्थाने ज्यांना ‘विश्वमानव’ असे म्हणता येईल अशा व्यक्ती होते. दोघांच्याही व्यक्तिमत्त्वाची बैठक ही अस्सल भारतीय होती. पण तरीही साऱ्या विश्वातील कलावंतांना आणि महान व्यक्तींना ते आपलेच वाटावेत अशी विलक्षण किमयादेखील त्यांना साधलेली होती. दोघांनीही मानवी जीवनाच्या पलीकडे असलेल्या मूलभूत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. श्रेष्ठ जर्मन तत्त्ववेत्ता हरमान कायसर्लिंग याने टागोरांबद्दल लिहिले आहे, ‘‘माझ्या परिचयातील ती सर्वांत विश्वव्यापी, सर्वंकष आणि परिपूर्ण व्यक्ती आहे.’’ जपानी चित्रपट दिग्दर्शक कुरोसावाने लिहिले आहे, ‘‘राय यांचे चित्रपट न पाहिलेले असणे म्हणजे सूर्य किंवा चंद्र न पाहता जगात राहणे होय.’’ 

1921 मध्ये जन्मलेल्या सत्यजित राय यांच्या आणि टागोरांच्या वयांत साठ वर्षांचे अंतर होते. सत्यजित अगदी लहान असल्यापासून टागोरांची कीर्ती व त्यांचा गुणगौरव ऐकत आले. त्यांच्या घरात टागोरांविषयी सतत बोलले जायचे; कारण त्यांच्या आजोबांच्या काळापासून राय व टागोर कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते. उपेंद्र किशोर यांनी जे ‘संदेश’ या नावाचे मुलांसाठी मासिक सुरू केले त्यात रवीन्द्रनाथही बरेचदा लेखन करीत. उपेन्द्र किशोर वारले तरी रवीन्द्रनाथांनी या कुटुंबावरचा आपला स्नेह कायम ठेवला होता. दुर्दैवाने सत्यजितचे वडील सुकुमार राय हेदेखील अल्पायुषी ठरले. 1923 साली, वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. सुकुमार हे आजारपणामुळे बिछान्यावर पडून असताना रवीन्द्रनाथ अनेकदा त्यांच्या घरी जाऊन त्यांना आपल्या कविता ऐकवीत. 

सत्यजित राय दहा-अकरा वर्षांचे असताना त्यांची आई त्यांना घेऊन डिसेंबर महिन्यातील पौंषमेळा पाहण्यासाठी शांतिनिकेतनमध्ये गेली होती. आईने सत्यजितला एक नवे ‘स्वाक्षरी पुस्तक’ दिले होते आणि त्यांची इच्छा होती की रवीन्द्रनाथ टागोरांनी त्यात पहिली स्वाक्षरी करावी. एके दिवशी आई आपल्या मुलाला रवीन्द्रनाथांना भेटायला घेऊन गेली. तिने सत्यजितची इच्छा त्यांना सांगितल्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘ही वही माझ्याजवळ ठेवून जा, आणि उद्या ती परत नेण्यासाठी ये.’’ 

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दोघे जण परत त्यांच्याकडे गेले. त्यांनी ती वही सत्यजितजवळ दिली व ते त्यांच्या आईला म्हणाले, ‘‘आज कदाचित त्याला समजणार नाही पण, तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला या ओळींचा अर्थ समजेल. या वहीत त्यांनी एक लहान कविता लिहिली होती- 

"It took me many days, it took me many miles; 
I spent a great fortune, I travelled far and wide, 
to look at all the mountains, 
and all the oceans, too. 
Yet I did not see, two steps away from home, 
Lying on a single stalk of rice: - single drop of dew."

दवाचा एक बिंदू -‘बिंदूत सिंधू साठवणे’ ही संकल्पना लहान मुलासाठी निश्चितच अवघड होती. पण सत्यजितनी अनेक वेळा ही वही चाळली आणि ती त्यांच्या मनात इतकी खोलवर रुजली गेली की पुढे चालून त्यांचे चित्रपट या संकल्पनेचे श्रेष्ठ उदाहरण बनले. सुमारे पन्नास वर्षांनंतर एका मुलाखतीत या भेटीचा उल्लेख करून राय म्हणाले, ‘‘ही खरी भारतीय परंपरा आहे. मोठ्या गोष्टींचे अस्तित्व लहानशा गोष्टीत सामावलेले असणे.’’ 

पुढे, वयाच्या विसाव्या वर्षी चित्रकलेच्या शिक्षणासाठी सत्यजित शांतिनिकेतनमध्ये येऊन दाखल झाले. येथे आल्यावर तेथील वातावरणाचा प्रभावदेखील सत्यजितच्या मनावर पडणे स्वाभाविक होते. विशेषत: टागोरांचे साहित्य, त्यांचे कार्य व त्यांचे व्यक्तिमत्व यांचे जवळून दर्शन घडल्यावर ते अतिशय प्रभावित झाले. टागोरांचा त्यांच्यावरील प्रभाव पुढे आयुष्यभर टिकला. 

मात्र शांतिनिकेतनमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते 1941 मध्ये रवीन्द्रनाथांच्या मृत्यूपर्यंत सत्यजित दुरूनच त्यांना न्याहाळीत होते. त्यांच्या जवळ जाऊन संबंध वाढविण्याचा सत्यजितनी कधी प्रयत्न केला नाही. तीनचार वेळीच त्यांची भेट झाली व त्या वेळीही जवळ जाऊन पायाला हात लावून अभिवादन करण्यापलीकडे दोघांत संवाद झाला नाही. टागोरांची प्रचंड कीर्ती, त्यांचा दबदबा आणि दोघांच्या वयांत असलेला साठ वर्षांचा फरक ही यामागची कारणे असावीत. शांतिनिकेतनमधील संपूर्ण वातावरणावर टागोरांचा एक अमीट असा ठसा होता. या काळात सत्यजित यांनी टागोरांचे बरेचसे साहित्य वाचले, रवीन्द्रसंगीत ऐकले, त्यांनी काढलेली चित्रे काळजीपूर्वक अभ्यासली. या साऱ्या अभ्यासातून टागोर हे एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व आहे अशी धारणा राय यांच्या मनात निर्माण झाली. 

25 जुलै 1941 रोजी रवीन्द्रनाथांची प्रकृती खूपच खालावली व त्यांना शांतिनिकेतनमधून कोलकत्याला नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण तिचा काही उपयोग झाला नाही. 7 ऑगस्ट 1941 रोजी महाकवींनी शेवटचा श्वास घेतला. यानंतर सत्यजित यांचा शांतिनिकेतनमधील रस संपला व ते कोलकत्याला परत आले. मात्र पुढे आयुष्यभर ते टागोरांचे साहित्य व संगीत याचा अभ्यास करीतच होते. 

या डॉक्युमेंटरीच्या कामासाठी राय यांनी प्रचंड अभ्यास केला. ही डॉक्युमेंटरी पूर्ण झाल्यावर सुमारे वर्षाने राय यांनी त्यांचा मित्र श्रीलंकन फिल्म मेकर लेस्टर पेरी याला एका पत्रात लिहिले होते, ‘‘मी या प्रकल्पासाठी जे काम केले ते ‘पाठ मोडणारे होते!’ एवढ्या कष्टात मी दोन चित्रपट बनवून टाकले असते.’’ 

बरीचशी सामग्री जमल्यावर राय यांनी सुमारे एक महिना दार्जिलिंग येथे मुक्काम करून चित्रपटाची पटकथा तयार केली. टागोरांचे प्रदीर्घ जीवन आणि त्यांचे प्रचंड कार्य हे एका तासात पडद्यावर मांडणे हे जवळजवळ अशक्यप्राय काम होते. यासाठी रायनी टागोरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग निवडले. त्यांना अनेक संग्रहांतून विखुरलेल्या कागदपत्रांची व छायाचित्रांची कल्पक जोड दिली. हे काम अतिशय किचकट होते. टागोरांच्या आयुष्यावरील उपलब्ध माहितीचा शोध घेत असताना रायना जाणवले की कवींच्या जीवनावर ‘video’ स्वरूपात फारच थोडे footage जपून ठेवले गेले आहे. तुलनेने गांधी व नेहरू यांच्या जीवनांवर ते फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, असे रायनी लिहिले आहे. यामुळे झाले असे की फक्त कागदपत्रांचे व स्थिर छायाचित्रांचे जर फोटो घेतले असते तर फिल्म रटाळ व गद्य बनली असती. म्हणून रायनी काही प्रसंगांची पुनर्रचना करण्याचे ठरविले. 

चित्रपटात तरुण आणि प्रौढ रवीन्द्रनाथांचे काम कोण करू शकेल याचा विचार करताना राय यांच्या ध्यानात आले की टागोरांचा चेहरा जनतेच्या चांगलाच ओळखीचा आहे, त्यामुळे इतर कुणाला ते टागोरांच्या भूमिकेत मान्य करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी तो भाग उपलब्ध छायाचित्रांद्वारेच चित्रित करण्याचे ठरविले. मात्र लहानपणीचे रवीन्द्रनाथ, त्यांचे वडील अशा काही भूमिका त्यांनी नटांकडून करून घेतल्या. 

टागोरांचे वास्तव्य काही काळ जेथे होते तो भाग (त्या काळात) पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचा बांगलादेश) येतो. या चित्रपटाचा काही भाग त्या ठिकाणी शूट करण्यासाठी राय यांनी पाकिस्तान सरकारकडे विनंती केली. मात्र पाकिस्तान सरकारने ती मान्य केली नाही. आता काय करावे असा विचार करताना राय यांच्या मनात अचानक ‘जलसाघर’ या चित्रपटाच्या वेळची आठवण झाली. हा चित्रपट त्यांनी निमटीता या गावात व तेथील हवेलीत चित्रित केला होता. या गावाच्या शेजारून पद्मा नदी वाहत होती आणि तिच्या पलीकडल्या तीरावर पूर्व पाकिस्तानची हद्द होती. टागोर हे एका लहानशा बोटीतून प्रवास करीत आहेत हा प्रसंग या नदीवरच चित्रित करण्यात आला. ‘ह्रिदय मंद्रीला...’ हे टागोरांचे गाणे डॉक्युमेंटरीत घ्यायचे ठरले होते. या गाण्याच्या वेळी पावसाची दृश्ये चित्रित करायची होती. पण त्यावेळी सप्टेंबर महिना होता व पावसाची चिन्हे दिसत नव्हती. पण अचानक कसा कोणास ठाऊक, जोराचा पाऊस आला आणि राय यांनी लगेच तशा पावसात ती दृश्ये चित्रित केली. 

या डॉक्युमेंटरीचे छायाचित्रण सौमेंदू राय यांनी केले होते. देवप्रिया संन्याल यांनी सौमेंदू राय यांचे 'Through the eyes of the Cinematographer' या नावाचे चरित्र लिहिले असून त्यात त्यांनी या प्रसंगाचे सविस्तर वर्णन केले आहे. या प्रसंगात पद्मा नदीच्या पाण्यात उतरून काही सीन चित्रित करावेत असे राय यांच्या मनात आले. सौमेंदूला त्यांनी तसे सांगितले. परंतु ज्या वेळी प्रत्यक्ष शूटिंगची पाळी आली तेव्हा सौमेंदूच्या ध्यानात आले की ते स्वत: उंचीने कमी असल्यामुळे त्या ठिकाणी जवळजवळ त्यांच्या गळयाइतके पाणी होते. मात्र राय यांच्या मनात एकदा काही कल्पना आली की अशा लहानमोठ्या अडचणींमुळे ते कधीच माघार घेत नसत. आपल्या उंचीचा फायदा घेऊन त्यांनी तो प्रसंग स्वत:च शूट केला. चित्रण करताना पाण्याच्या प्रवाहामुळे राय नदीत पडू नयेत म्हणून दोन-तीन जणांनी त्यांना घट्ट धरून ठेवले होते. वरून जोरदार पाउस, आजूबाजूला नदीचे अथांग पाणी, यांकडे मुळीच लक्ष न देता राय काम करीत होते आणि आपल्याला मनासारखे दृश्य शूट करता येत आहे याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

कष्ट करण्याची तयारी असली की नशीबदेखील माणसाला साथ देते. निमटीता या गावी चित्रण सुरू असता एके दिवशी सहज राय हे हवेलीच्या गच्चीवर गेले. त्यांना दिसले की नदीच्या तीरावर एका ठिकाणी ‘काश’ची पांढरी फुले फुलली आहेत. सायंकाळच्या काजळू लागलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही फुले अतिशय मोहक दिसत होती. राय यांनी लगेच या दृश्याचे अनेक शॉट घेऊन ठेवले. अशा शॉटमुळे ही डॉक्युमेंटरी अतिशय देखणी बनली आहे. 

या चित्रपटाची सुरुवात 7 ऑगस्ट 1941 रोजी रवीन्द्रनाथ टागोर यांच्या अंतिम यात्रेच्या वेळी लोटलेल्या अपार जनसमुदायाच्या दृश्यांनी होते. या अंत्ययात्रेत त्या दिवशी खुद्द सत्यजित रायदेखील उपस्थित होते. पार्श्वभूमीला राय यांच्या खर्जातील आवाजात कॉमेंटरी सुरू होते- "On the 7th of August, in the city of Calcutta, a man died......He left behind a heritage no fire could consume. It was a heritage of words, of music and poetry, of ideas and ideals, and it has the power to move us and inspire us, today and the days to come. We who owe him so much salute his memory."  

यानंतर टागोरांचे घराणे, त्याचा इतिहास, टागोरांचे आजोबा व वडील यांची माहिती राय देतात. 

विशेषत: बालपणी टागोर त्यांच्या वडिलांबरोबर उत्तर भारताच्या प्रवासाला जातात- याच्या चित्रणाचा भाग फारच काव्यमय उतरला आहे. या भागातील छायाचित्रण, संगीताचा व कवितांचा वापर मनावर मोहिनी तर घालतोच; पण एक संवेदनशील कलावंत वाढत जाताना त्याच्यावर जे संस्कार होतात त्याचेही दर्शन घडवितो. 

हे वृत्तचित्र तयार करताना राय यांनी काही गोष्टी मनाशी ठरविल्या होत्या. एक म्हणजे अशा चित्रपटात अनेक लोकांच्या मुलाखती वगैरे घेतल्या जात, ते रायना टाळायचे होते. दुसरे म्हणजे टागोरांच्या इंग्रजी कवितादेखील त्यांना घ्यायच्या नव्हत्या. कारण टागोरांच्या कवितांच्या इंग्रजी अनुवादात मूळचे काव्य अर्ध्याहून अधिक निसटून गेले आहे असे त्यांचे मत होते. कवितांच्या ऐवजी रायनी रवीन्द्रांची गीते व संगीत यांचा प्रभावी उपयोग केला. या वृत्तचित्राचे संगीत रवींद्र-संगीताचे प्रसिद्ध अभ्यासक व संगीतकार ज्योतीन्द्रनाथ मोइत्रा यांनी तयार केले होते. रवींद्र-संगीताला सामान्य जनतेपर्यंत आणण्याचे त्यांचे कार्य सत्यजितना प्रभावीत करून गेले होते. 

त्यांनी घेतलेल्या तिसऱ्या निर्णयावर मात्र बरीच टीका झाली. रायनी ठरविले की टागोरांच्या जीवनात जे वादग्रस्त कालखंड होते, त्यांचा कोणत्याही प्रकारे टागोरांना दोष द्यावा लागेल असा उल्लेख करावयाचा नाही. त्यानुसार त्यांनी टागोर व त्यांची वहिनी कादंबरीदेवी हिच्या संबंधांच्या बाबतीत, तसेच टागोर यांनी केलेल्या मुसोलिनीच्या कथित स्तुतीबद्दलदेखील मौन पाळले. टागोर आणि गांधी यांच्यात बरेच मतभेद होते व ते लपून राहिलेले नव्हते. या मतभेदांचीही चर्चा रायनी केली नाही. त्यांची भूमिका अगदी स्वच्छ होती. ते म्हणाले, ‘‘टागोरांचे गुणगान करणारा, त्यांचे सर्वोत्तम ते दाखविणारा चित्रपटच मला तयार करावयाचा होता. म्हणून मी वादग्रस्त घटनांना स्पर्श केला नाही.’’ 

अर्थात या भूमिकेमागे एक व्यावहारिक दृष्टिकोन होता. या फिल्मसाठी सरकार पैसा खर्च करणार होते, त्यामुळे त्यांची ध्येयधोरणे पाळणे आवश्यक होते. रायनी जर वादग्रस्त घटना मांडल्या असत्या तर सरकारने या फिल्मचे प्रदर्शन केले नसते. त्यामुळे रायना ही तडजोड करणे भाग पडले. राय यांच्यासारख्या महान कलावंताला देखील चित्रपट व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर किती तडजोडी कराव्या लागतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

या चित्रपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी म्हणून राष्ट्रपती सुवर्णपदक, तर लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोल्डन सेल’ पारितोषिक मिळाले. 

2. ‘द इनर आय’ (1974) 

सत्यजित राय हे शांतिनिकेतनमध्ये शिकत असताना त्यांचे गुरु बिनोद बिहारी मुखर्जी आणि मुखर्जींचे गुरू नंदलाल बोस यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. या शिक्षणाचा त्यांच्यावरील प्रभाव उत्तरायुष्यात सतत जाणवतो. राय यांनादेखील या संस्कारांची जाण होती, आणि अनेक वर्षे आपल्या गुरूवर त्यांचे ऋण फेडण्यासाठी एखादा लघू चित्रपट काढावा असे त्यांच्या मनात होते. म्हणून 1971 मध्ये त्यांनी अर्ध्या तासाहून कमी वेळाचा एक वृत्तचित्रपट काढण्याची योजना आखली. अर्थात हे बरेच खर्चाचे काम होते. पण आपण सुरुवात तर करू, पुढे काहीतरी मार्ग निघेलच या आशेने ते प्राथमिक तयारी करण्यासाठी नोव्हेंबर 1971 मध्ये शांतिनिकेतन येथे गेले. तेथे त्यांनी विनोद बिहारी यांची गाठ घेतली. 1904 मध्ये जन्मलेले विनोद बिहारी त्या वेळी सदुसष्ट वर्षांचे होते. त्यांना या गोष्टीचा खूप आनंद झाला. त्यांनी व शांतिनिकेतनमधील इतर अधिकारी वर्गाने या बाबतीत हवे ते सहकार्य करण्याचे मान्य केले. तेथे गेल्यावर त्यांनी आपले छायाचित्रकार सौमेंदू राय यांनाही बोलावून घेतले. 

काही दिवस तेथे राहून व आवश्यक ती कागदपत्रे तपासून, लोकेशन निश्चित करून परत आल्यावर राय यांनी फायनान्सरचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुदैवाने फिल्म्स डिव्हिजनने बिनोद बिहारी यांच्यावर वृत्तचित्र काढण्याचा प्रकल्प मान्य केला व त्यासाठी अर्थसाहाय्य करण्याचे ठरविले. मात्र त्यांनी घातलेल्या आर्थिक मर्यादेमुळे राय यांना हे वृत्तचित्र सुमारे वीस मिनिटांचेच करता येणार होते. सुदैवाची गोष्ट ही होती की बिनोद बिहारी जरी अंध बनलेले असले तरी त्यांचे कार्य तरुणाच्या तडफेने अजून सुरूच होते. त्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष चित्रणदेखील राय यांना करता आले. या कामासाठी त्यांनी छायाचित्रकार सौमेंदू राय, साउंड रेकॉर्डर जे. डी. इराणी व संकलक दुलाल दत्ता हे आपले नेहमीचेच सहकारी निवडले. या वृत्तचित्राच्या पटकथेचे लेखन अर्थातच त्यांनी स्वत: केले आणि त्याची इंग्रजी कॉमेंटरीदेखील त्यांच्याच आवाजात आहे. संगीताची जबाबदारीही त्यांनी स्वत:च उचलली होती व त्यासाठी साहाय्यक म्हणून त्यांनी प्रख्यात सतारवादक निखिल बानर्जी यांची मदत घेतली. 

सत्यजित राय यांच्या मते काही अपवाद वगळता विसाव्या शतकातील भारतीय चित्रकला ही खूप अनुकरणात्मक होती. बिनोद बिहारी हे अपवादात्मक कलावंतांपैकी एक होते. त्यांनी पौर्वात्य जपानी चित्रशैली व पाश्चात्त्य चित्रपद्धती यांच्याशी भारतीय कलाविचारांचा सुरेख संगम घडवून आणला. रायनी लिहिले आहे, ‘‘ते कधीच कुणाची नक्कल करीत आहेत असे वाटत नसे. ते स्वत:मधून काहीतरी प्रकट करीत आहेत व अनेक धाग्यांतून एक वस्त्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे जाणवत राहते.’’ चित्रपटाच्या सुरुवातीला फक्त एक हात काही रेखाटताना दिसतो. मग शांतिनिकेतनच्या भिंतीवर बिनोद दा यांनी तयार केलेले प्रचंड म्युरल दिसते. 67 वर्षांचे अंध कलाकार हातांनी चाचपून म्युरल तयार करताना दिसतात. हे काम करताना त्यांची मुलगी त्यांच्या सोबत असते. काम झाल्यावर ती त्यांना रिक्षात बसवून घरी घेऊन जाते. तेथे ते सहजतेने वावरताना दिसतात. आता हळूहळू राय यांच्या निवेदनातून व जुन्या काळाच्या चित्रांतून त्यांचा जीवनपट उलगडू लागतो. 

आता पडद्यावर आपल्याला एका सहा-सात वर्षांच्या मुलाच्या फोटोचा मिड शॉट दिसतो. कॅमेरा खाली रिप होतो तेव्हा दिसते की या मुलाच्या हातात त्याला उचलणे  अवघड जावे एवढा जाडजूड ग्रंथ आहे. लहानपणापासून बिनोद यांना वाचनाची फार आवड होती. त्यांचे कुटुंब खूप मोठे होते. सहा भावांतील ते सर्वांत लहान भाऊ. जन्मापासून त्यांना एका डोळ्याने दिसत नव्हते. पण चित्रकलेकडे ओढ असल्यामुळे त्यांनी चित्रकार होण्याचे ठरविले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी शांतिनिकेतनमधील कला दालनात चित्रकलेचा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. तेथे त्यांना नंदलाल बोस यांसारखे महान गुरू लाभले. या काळातच आजूबाजूच्या नयनरम्य निसर्गाची त्यांना भूल पडली. शांतिनिकेतनच्या भोवतीचा परिसर त्यांनी जवळून अभ्यासला तेव्हा त्यांनी काढलेली काही निसर्गचित्रे आता राय दाखवितात. 1925 मध्ये ते तेथेच शिक्षक म्हणून रुजू झाले. 

1937 मध्ये बिनोद बिहारी जपानला गेले. तेथे गेल्यावर जपानी चित्रकलेतील विविध शैलींनी त्यांना मोहवून टाकले. परत आल्यावर त्यांनी ज्या कलाकृती निर्माण केल्या त्यांच्यावर या अनुभवाचा कसा परिणाम झाला ते राय आता प्रत्यक्ष चित्रांतून दाखवितात. राय स्वत: उत्तम चित्रकार असल्यामुळे कलेचे हे मर्म उलगडण्यास अधिकच मदत झाली आहे. बिनोद बिहारी यांनी यानंतर अक्षरलेखनातदेखील अनेक प्रयोग केले. 

शांतिनिकेतनमधील हिंदी भवनाचे काम त्यानंतर बिनोद बिहारी यांनी हाती घेतले. या भवनात त्यांनी भिंतींवर कबीर, रविदास, सूरदास वगैरे संतांची चित्रे रेखाटली. आजवरच्या त्यांच्या शैलीपेक्षा ती अतिशय वेगळी होती. विशेष म्हणजे ही चित्रे त्यांनी कोणतेही ट्रेसिंग न करता सरळ भिंतीवरच काढली. 1949 मध्ये नेपाळ सरकारच्या आमंत्रणावरून ते काठमांडू येथे गेले व तेथे त्यांनी नेपाळच्या म्यूजियमचे curator म्हणून काही वर्षे काढली. मात्र दृष्टी अधिकच बिघडू लागल्यामुळे ते परत आले. 

1956 मध्ये त्यांच्या डोळ्याचे कॅटेरॅक्टचे ऑपरेशन झाले, मात्र ते अयशस्वी झाल्यामुळे त्यांची दृष्टी पूर्ण गेली. राय हे निवेदन करीत असताना पडदा पूर्णपणे काळा होतो व नंतर कॅमेरा झूम आउट होत बिनोददांचा काळा गॉगल घातलेला चेहरा दिसतो. पार्श्वभूमीला सत्यजित यांच्या खर्जातील आवाजात निवेदन सुरू असते. ‘‘त्यांनी सिद्ध केले visual artist च्या संदर्भातदेखील दृष्टीहीनता हा कलेच्या मार्गात अडथळा होऊ शकत नाही. कारण त्यांच्याजवळ अनुभवातून आणि कलेवरील श्रद्धेतून निर्माण झालेला एक अंतश्चक्षू होता, एक अंतर्दृष्टी होती.’’ या काळात त्यांनी तयार केलेली लहान लहान शिल्पे याची साक्ष देतात. दृष्टीहीन झाल्यावर ते काढीत असलेल्या चित्रांचे चित्रण राय यांनी केले आहे ते पाहताना त्यांची रेषेवरील हुकूमत व लय थक्क करून सोडणारी आहे. 

दृष्टी गेल्यावर बिनोददा परत शांतिनिकेतनला आले. काही दिवसांनी ते येथील कला भवनाचे प्राचार्य बनले. 

‘The Inner Eye' चे राय यांनी दिलेले अप्रतिम संगीत हे विषयाशी मिसळून जात त्याची काव्यात्मता अनेक पटींनी वाढविणारे आहे. या संगीतात त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत, भजने, नेपाळी लोकसंगीत या साऱ्यांचा सुंदर असा वापर केला आहे. चित्रपटाच्या शेवटी सतारीचे आसावरी रागातील आशावादी स्वर ऐकू येत असताना पडद्यावर काळा चश्मा घातलेला बिनोद बिहारींचा चेहरा येतो आणि पाठोपाठ शब्द उमटतात- 

"Blindness is a new feeling, a new experience, a new state of being'' - Binod Bihari Mukharjee.

हा चित्रपटही एक नवा अनुभव देत असताना नवी जाण मनात निर्माण करतो. राय यांचा चरित्रकार Andrew Robinson याने लिहिले आहे, "'The Inner Eye' is a small masterpiece. It is quite simply the finest short documentary about a creative artist I have seen''. 

 2014 मध्ये कॅनडामध्ये 'The sun and the moon - the Films of Satyajit Ray’ हा राय यांच्या काही चित्रपटांचा महोत्सव भरविण्यात आला. त्या प्रसंगी समीक्षक Greig Klimkiw याने या वृत्तचित्राबद्दल लिहिले, "A truly beautiful and inspirational experience and Ray captures it in only 20 minutes. Its 20 minutes wherein life stands still and we get a glimpse into one of the artist's great geniuses.'' 

या लघुपटास 1972 च्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्तम वृत्तचित्रा’चे पारितोषिक मिळाले. 

3. बाला (1976) 

1975 च्या सुमारासच National Center for Performing Arts आणि Government of Tamilnadu यांच्याकडून प्रख्यात नर्तिका बाला सरस्वती यांच्यावर एक डॉक्युमेंटरी तयार करण्याचा प्रस्ताव सत्यजित यांच्याकडे आला. ‘बाला’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या तंजावर  बालासरस्वती या भरतनाट्यम शैलीच्या सर्वश्रेष्ठ नर्तिका म्हणून ओळखल्या जातात. राय यांनी फार पूर्वी, 1935 मध्ये कोलकत्याला बाला यांच्या नृत्याचा कार्यक्रम पाहिला होता. त्या वेळी राय चौदा वर्षांचे, तर बाला सतरा वर्षांच्या होत्या. मात्र त्या वेळी पाहिलेल्या त्या नृत्याची आठवण अजून राय यांच्या मनात ताजी होती. मध्यंतरी, 1966 मध्ये त्यांनी बालाचे जीवन व कार्य यावर फिल्म तयार करण्याचा विचार केला होता. पण तेव्हा तो मनातच राहिला. आता मात्र दोन संस्थांनी आर्थिक जबाबदारी उचलल्यावर राय यांनी नव्या उत्साहाने या डॉक्युमेंटरीसाठी अभ्यास करण्यास सुरुवात केली. 

बाला यांचे घराणे देवदासीचे. चार वर्षांच्या असतानाच त्यांचे नृत्यशिक्षण सुरू झाले. सात वर्षांच्या असताना त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. पुढे त्या उदय शंकर यांच्या नृत्याच्या ग्रूपमध्ये काम करू लागल्या. भारतात व जगातही एक श्रेष्ठ नर्तिका म्हणून गणल्या गेल्यावरदेखील त्यांच्या नृत्याचे चित्रीकरण मात्र अद्याप झालेले नव्हते हे समजल्यावर रायना आश्चर्य वाटले. खरे तर या वयात त्यांच्या नृत्यात ती जादू राहिलेली नव्हती तरी ‘चित्रण मुळीच न होण्यापेक्षा 58 वर्षांच्या बालांचे चित्रण होणे महत्त्वाचे आहे’ असे राय यांचे मत पडले. राय यांनी जेव्हा त्यांच्या नृत्याचे चित्रण केले तेव्हा बाला यांनी जे पैंजण घातले होते ते त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यातील पहिल्या कार्यक्रमासाठी घातले होते. 

या वृत्तचित्राचे छायाचित्रण सौमेंदू राय यांनी, तर संकलन दुलाल दत्ता यांनी केले होते. 

या वृत्तचित्रासाठी राय यांनी भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचाही अभ्यास केला. सुरुवातीला राय याचा संदर्भ देतात व बाला यांच्या काही ‘हस्तमुद्रां’द्वारे त्यांचे दर्शन घडवितात. साठीला आलेल्या या तपस्विनीचे नृत्यलाघव आणि भावाविष्कार पाहून आपण अचंबित होतो. एक ‘मयूर मुद्रा’ जरी घेतली तरी त्याद्वारे ‘मोर’, ‘हंस’ एवढेच नव्हे- तर ‘लेखन’, ‘मंगळसूत्र बंधन’, ‘श्रवण’, ‘विचार’, ‘दागिने’ व ‘सत्य’ अशा विविध भावांचे दर्शन त्या घडवितात. 

यानंतर राय बाला यांचा जीवनपट थोडक्यात उलगडून दाखवितात. यानंतर आपल्याला त्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्ण नी बेगाने’ हे नृत्य सादर करताना दिसतात. 

घरात वावरताना बाला किती साधेपणाने व उत्साहाने वावरतात याचेही चित्रण राय यांनी केले आहे. त्या सोंगट्या खेळत असतानाचे चित्रण पाहताना त्यांनी अजून आपल्यात एक मूल कसे जपले आहे हे दिसते. 

राय यांनी ही डॉक्युमेंटरी तयार केली नसती तर हे सारे दृश्यरूपात आपल्याला कधीच दिसले नसते व केवढ्या मोठ्या आनंदाला आपण मुकलो असतो. 

मार्च 1976 मध्ये राय या डॉक्युमेंटरीच्या चित्रणासाठी मद्रासला गेले. सोबत विजयाबाईदेखील होत्या. या निमित्ताने दक्षिण भारतातील अनेक उत्तमोत्तम मंदिरे रायनी पाहिली. महाबलीपुरम येथील मंदिर त्यांना विशेष आवडले. बाला व त्यांच्या परिवाराने राय यांचे प्रेमाने स्वागत केले. तेथून परत येताना बाला यांनी रायना एक सोन्याचा बाळकृष्ण भेट दिला. त्याच्यावर विविध प्रकारची मौल्यवान माणके लावलेली होती. 

4. सुकुमार राय (1987)

1987 हे वर्ष सुकुमार राय यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. या संदर्भात बुद्धदेव भट्टाचार्य सत्यजितना येऊन भेटले. सुकुमार राय यांच्या जीवनावर सत्यजितनी एक डॉक्युमेंटरी तयार करावी अशी विनंती त्यांना केली. राय यांना अतिशय आनंद झाला. ही गोष्ट राय यांच्या दृष्टीने दुहेरी आनंदाची होती. एक तर नव्या पिढीला सुकुमार यांचे जवळजवळ विस्मरण झाले होते व या निमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय तरी नव्याने लोकांना होईल अशी आशा रायना वाटली. दुसरे म्हणजे सुमारे दोन वर्षांपासून त्यांच्याजवळ कोणतेच काम नव्हते. चित्रपट निर्मितीशिवाय जगणे हे रायना असह्य होत होते. ही डॉक्युमेंटरी फक्त अर्ध्या तासाचीच असणार होती. बरेचसे शारीरिक कष्टाचे काम त्यांचे सहकारी करू शकणार होते, त्यामुळे डॉक्टरांनीदेखील रायना तिच्यावर काम करण्यास परवानगी दिली. 

15 सप्टेम्बर 1987 रोजी सुकुमार रायवरील फिल्मचे काम सुरू झाले. पहिल्या दिवशी घरातीलच काही कागदपत्रांचे, फोटोंचे, पुस्तकांचे चित्रण करण्यात आले. या फिल्मसाठी सुकुमार यांच्या काही कवितांचे, वेच्यांचे व नाटकांतील प्रसंगांचे वाचन करण्याचे राय यांनी ठरविले. या वाचनासाठी सौमित्र चटर्जी व उत्पल दत्त यांची निवड राय यांनी केली. यापूर्वी राय यांनी ज्या डॉक्युमेंटरी केल्या होत्या त्याला निवेदन त्यांच्याच आवाजातील होते. मात्र यावेळी निवेदन बंगालीमध्ये करण्याचे ठरविले. त्यामुळे ते सत्यजित राय यांनी लिहिले व सौमित्रच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. सौमित्रने त्यांना विचारले, ‘‘खरे तर निवेदन तुमच्या आवाजातच शोभले असते. तुम्ही का करीत नाहीत?’’ त्या वेळी राय म्हणाले, ‘‘ही फिल्म माझ्या वडिलांच्या जीवनावरच असल्यामुळे निवेदन माझे नको. शिवाय तिच्यात अनेक बंगाली कविता आहेत, आणि कवितावाचनात तुझी बरोबरी कुणी करू शकत नाही.’’ 

डॉक्युमेंटरीची सुरुवात सुकुमार राय यांनी काढलेल्या काही कार्टूनवजा चित्रांनी होते. नंतर त्यांच्या ‘अबोल ताबोल’ आणि ‘हा जा बा रा ला’ या पुस्तकातील चित्रे व कविता पडद्यावर दिसतात व ऐकू येतात. त्यांचे वडील उपेंद्र किशोर राय यांची माहिती आता राय सांगू लागतात. डॉक्युमेंटरी रूक्ष बनू नये म्हणून रायनी सुकुमार यांच्या  लेखनाचा काही भाग उत्पल दत्त आणि सौमित्र यांच्याकडून वाचून घेऊन त्यांच्यावर चित्रित केला आहे. उत्पल दत्त शिक्षकाचा पोशाख घालून सुकुमार यांच्या ‘झालापला’ मधील एक भाग वाचतात. रामायणातील एका प्रसंगाला विनोदी डूब देऊन तो सौमित्र चटर्जी आणि इतर नट मंडळी सादर करतात. 

या दरम्यान काही अप्रकाशित व दुर्मीळ माहिती सांगितली जाते. सुकुमार राय यांनी 1914 मध्ये 'The Quest' या त्रैमासिकात 'The spirit of Rabindranaath Tagore'  या नावाचा लेख लिहून टागोरांची पाश्चिमात्य जगाला प्रथम ओळख करून दिली, तो अंक पाहावयास मिळतो. पुढे टागोरांना ब्राह्मो समाजात सामील करून घ्यावे की नाही याबद्दल जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा सुकुमार यांनी टागोरांची बाजू घेऊन लेख लिहिले. उपेंद्र किशोर राय यांनी सुरू केलेले ‘संदेश’ हे मासिक ते वारल्यावर सुकुमार यांनी आपल्या खांद्यावर वडिलांइतक्याच समर्थपणे पेलले. त्यांनी ‘संदेश’साठी केलेले काम आता पडद्यावर दिसते. 

1921 मध्ये सुकुमार यांच्या मुलाचा- सत्यजितचाजन्म झाला. त्याच वर्षी सुकुमारना ‘काला आजार’ नामक दुर्धर रोगाने गाठले. मुलांसाठी ‘महाभारत’ कवितेतून लिहिण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुकुमार यांनी हाती घेतला होता, पण त्यांच्या आजारपणामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. 

आपण या आजारातून उठत नाही अशी जाणीव सुकुमार यांनी झाली असावी. कारण त्यांच्या शेवटच्या कवितेत हीच भावना अतिशय उत्कटतेने व्यक्त झाली आहे. 
"Today before I leave, I will speak out my heart Even it is meaningless, let people not understand. 
I have let my imagination flow today. 
There is no one who can stop it any more. 
It is now time to sleep. 
My song is over today.'' 

10 सप्टेम्बर 1923 रोजी कोलकत्यात एक भूकंप झाला. त्याच दिवशी सुकुमार यांचेही निधन झाले. 

त्यांच्या मृत्यूनंतर रवीन्द्रनाथ टागोर म्हणाले, ‘‘मी अनेक मृत्यू पाहिले आहेत. पण या तरुणाच्या मृत्यूसारखा एकही पाहिला नाही. तो मृत्यूसमोर उभा राहून जीवनाची गीते गात होता. त्याच्या पार्थिवाशेजारी बसल्यावर मला ती गीते ऐकू येत आहेत आणि माझे हृदय त्यांनी भरून गेले आहे.’’ 

सुमारे 19 मिनिटांच्या कालावधीत एक विलक्षण काव्यात्म अनुभव देऊन ही डॉक्युमेंटरी संपते. 30 ऑक्टोबर 87 रोजी सुकुमार यांच्या जन्मास शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी राय यांची डॉक्युमेंटरी एका खास कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली. मुख्यमंत्री ज्योती बसू आणि सांस्कृतिक मंत्री बुद्धदेव भट्टाचार्य या कार्यक्रमास हजर होते. 

5. सिक्कीम (1971) 

सत्यजित राय हे आज जगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक म्हणून सर्वमान्य झालेले आहेत. त्याबरोबरच भारतातदेखील ‘दादासाहेब फाळके पारितोषिका’पासून ते ‘भारतरत्न’पर्यंत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 2021 हे राय यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. यामुळे त्यांच्या जीवनावर व कार्यावर सतत नवी नवी माहिती प्रकाशात येत आहे. रायसारख्या महान दिग्दर्शकालादेखील चित्रपट निर्मात्याच्या व सरकारच्या विक्षिप्त धोरणामुळे कसा त्रास सहन करावा लागला याची कहाणी चित्रपट-रसिकांना निश्चित नावीन्यपूर्ण वाटेल. 

1962 मध्ये राय ज्या वेळी ‘कांचनजंघा’ निर्माण करीत होते त्या वेळी त्यांच्या एका नातलगाने त्यांना सांगितले होते की सिक्कीमचे महाराज व त्यांच्या पत्नीला सिक्कीमसंदर्भात एक डॉक्युमेंटरी करायची आहे. तो नातलग महाराजांच्या परिचयाचा होता व त्यांना सत्यजित यांचे नाव त्यानेच सुचविले होते. पण पुढे सात वर्षे राय वेगवेगळ्या प्रकल्पांत गुंतलेले होते. त्यामुळे या संदर्भात काही प्रगती झाली नाही. 1969 मध्ये या संदर्भात बोलणी करण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी राय यांनी सिक्कीमला जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे 1 जून 1969 रोजी ते विमानाने जाण्यास निघाले असता वैमानिकांनी संप केल्यामुळे त्यांचे जाणे रद्द झाले. पण नंतर पाच-सहा दिवसांनीच त्यांच्या डोळ्याला कसलेसे इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही दिवस मुळीच न काम करण्याचा सल्ला दिला. शेवटी संदीपच्या शाळेला सुट्या लागल्यावर सत्यजित त्याला व विजयाबाईंना घेऊन सिक्कीमवरील डॉक्युमेंटरी करण्यासाठी गेले. 

सिक्कीमला गेल्यावर राय यांनी राजाशी या डॉक्युमेंटरी संदर्भात प्राथमिक चर्चा केली. त्यांची पहिली अट ही होती की डॉक्युमेंटरी करताना विषय मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले पाहिजे. ही अट मान्य झाल्यावरच त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. राय यांना एकाच सलग वेळापत्रकात शूटिंग करावयाचे नव्हते. सिक्कीममधील वेगवेगळ्या ऋतूंचे दर्शन यांतून घडवावे अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे ते दोन वेळा सिक्कीमला गेले. 

डॉक्युमेंटरीची सुरुवात अतिशय काव्यात्म आणि सिक्कीमसारख्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या भूभागाला न्याय देणारी आहे. या फिल्मसाठी निवेदन राय यांनीच लिहिले होते व आवाजही त्यांचाच आहे. सिक्कीममधील धुक्याने वेढलेले पर्वत, खळखळत्या नद्या, धबधबे, दाट झाडी, नानाविध फुलेफळे आणि पशुपक्षी यांचे विलोभनीय दर्शन आपल्याला घडते. या डॉक्युमेंटरीचे अप्रतिम छायाचित्रण सौमेंदू राय यांनी केले होते. सुरुवातीची सात मिनिटे हे एक अत्यंत सुंदर दृश्यकाव्य आहे. प्रथम पडद्यावर दिसतात ती सिक्कीममधील काही नयनमनोहर निसर्गदृश्ये. मग राय एक विजेवर चालणारा एक रोपवे दाखवितात. या रोपवेवर एकीकडून एक माणूस येतो आहे व दुसऱ्या बाजूने एक रिकामा पाळणा. हे दोन्ही पाळणे जवळ, एका रेषेत येतात, आणि राय दृश्य कट करतात. आता पावसाचे दृश्य दिसते. विजेच्या तारांवर पाण्याचे दोन थेंब विरुध्द दिशेने येत असतात. तेही एका बिंदूवर जवळजवळ येतात आणि दृश्य संपते. निसर्ग आणि माणूस यांचे अभिन्न नाते मनावर ठसते.

यानंतर राय तेथील माणसांचे चित्रण करतात. तेथील सणवार, तेथील उत्सव वेगवेगळ्या धर्मांचे लोक मिळून मिसळून एकत्र साजरे करताना दिसतात. या फिल्मसाठी संगीतदेखील राय यांनीच तयार केले होते. ‘कांचनजंघा’ची निर्मिती करताना त्यांनी नेपाळी संगीताचा बराच अभ्यास केला होता. नेपाळी व आसामी लोकगीतांचा उत्तम उपयोग त्यांनी करून घेतला आहे. फिल्मच्या बहुतेक कालावधीमध्ये पार्श्वभूमीला या संगीताचे मंद अस्तित्व जाणवत राहते. 

ही डॉक्युमेंटरी ज्या वेळी तयार करण्यात आली होती त्या वेळी सिक्कीम हे स्वतंत्र राष्ट्र होते. सिक्कीमला लागूनच चीनची हद्द असल्यामुळे चीन ते गिळंकृत करण्याची वाटच पाहत होता. ते चीनच्या ताब्यात जाऊ नये, व भारतात विलीन व्हावे अशी अर्थातच भारताची इच्छा होती. असे म्हणतात की सिक्कीम हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे हे पाश्चात्य जनतेच्या मनावर ठसावे व अर्थातच सिक्कीममधील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी म्हणून तेथील राजाने सत्यजितना ही फिल्म काढण्यास बोलावले. मात्र हा हेतू त्याने राय यांच्या कानावर घातला नाही. डॉक्युमेंटरी तयार झाल्यावर त्याला व त्याच्या अमेरिकन पत्नीला त्यांच्या मनाप्रमाणे चित्रण त्यात दिसले नाही. फिल्म तर रायनी तयार करून दिली होती. त्यामुळे ठरलेले मानधन राजाने त्यांना दिले; परंतु तिच्या प्रिंट वगैरे काढून तिचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला नाही. हा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय शेवटी राय यांना मनस्ताप देणाराच ठरला. सिक्कीमच्या राजाची पत्नी ही होप कुक या नावाची पूर्वायुष्यातील अमेरिकन तरुणी होती. तिच्या डोक्यात या डॉक्युमेंटरीबद्दल काही वेगळ्याच कल्पना होत्या. शिवाय स्वतंत्रपणे राय यांनी काही गोष्टींची मीमांसा केलेली तिला आवडली नाही. तिच्या हाती डॉक्युमेंटरी आल्यावर तिने स्वत:च त्यात अनेक ठिकाणी काटछाट केली. विशेषत: राजाला व त्याच्या पत्नीला सिक्कीममधील गोरगरिबांच्या जीवनाचे जे चित्रण राय यांनी केले होते ते पटले नाही. आपल्याकडे ‘पथेर पांचाली’च्या संदर्भात जे झाले त्याचीच थोडी पुनरावृत्ती तेथे झाली. मात्र तेथे हुकूमशाही असल्यामुळे व राजानेच चित्रणासाठी पैसा पुरवला असल्यामुळे त्याने ती फिल्म दडपून टाकली. 

या डॉक्युमेंटरीबद्दल मला खूप कुतूहल होते. 2016 मध्ये मी अमेरिकेत गेलो असताना कॅलिफोर्नियामधील ‘सत्यजित राय फिल्म अँड स्टडी सेंटर’ला भेट दिली. सत्यजित राय यांच्या कार्याचा अभ्यास करणारे हे आणि राय दृश्य कट करतात. आता पावसाचे दृश्य दिसते. विजेच्या तारांवर पाण्याचे दोन थेंब विरुद्ध दिशेने येत असतात. तेही एका बिंदूवर जवळजवळ येतात आणि दृश्य संपते. निसर्ग आणि माणूस यांचे अभिन्न नाते मनावर ठसते. यानंतर राय तेथील माणसांचे चित्रण करतात. तेथील सणवार, तेथील उत्सव वेगवेगळ्या धर्मांचे लोक मिळून  भारताबाहेरचे सर्वांत मोठे केंद्र आहे. या ठिकाणी राय यांच्या संदर्भातील अत्यंत दुर्मीळ माहिती, पुस्तके, फिल्म्स, हस्तलिखिते यांचा मोठा साठा आहे. तेथील दिलीप बसू नावाचे प्रमुख मूळ भारतीय वंशाचे होते. त्यांनी सत्यजित राय यांच्या चित्रपटांचे आधुनिक तंत्राने पुनर्निर्माण करण्याचे मोलाचे कार्य हाती घेतले होते. बसू यांनी मला ‘सिक्कीम’संदर्भात बरीच माहिती दिली. त्या काळात सिक्कीममध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. शेवटी 1975 मध्ये भारताने हस्तक्षेप करून त्या थांबविल्या व सिक्कीम हे भारतीय संघराज्याचा एक भाग बनले. पण 1975 मध्ये सिक्कीम भारतात सामील झाल्यावर या डॉक्युमेंटरीमध्ये सिक्कीमचे केलेले राजघराण्याचे चित्रण भारतातीलच काही नोकरशहांना पटले नाही आणि त्यांनी तिच्यावर बंदी घातली. त्यासाठी त्यांनी दिलेले कारण अतिशय मूर्खपणाचे होते. सिक्कीम हे लोकशाही राज्य बनलेले असूनदेखील डॉक्युमेंटरीमध्ये राजघराण्याविषयीच तपशील आहे असे त्यांचे म्हणणे होते. मात्र ही डॉक्युमेंटरी एका विशिष्ट काळाचे दर्शन घडविणारी आहे, तिच्यात आजच्या सिक्कीमचे चित्र कसे येणार, असा राय यांचा प्रश्न होता. परंतु फिल्मची मूळ प्रतच गायब असल्यामुळे व खुद्द राय यांनाच या प्रकल्पात रस उरलेला नसल्यामुळे त्यांनी ही बंदी उठविण्यासाठी वगैरे काहीच प्रयत्न केले नाहीत. ते त्यांचा चरित्रकार रॉबिन्सनला विनोदाने म्हणाले, ‘‘पहा, हे लोक लोकशाहीची चिंता करताहेत आणि दुसरीकडे कलाकृतीवर बंदी घालताहेत! ही आपली लोकशाही!’’ मात्र या बंदीमुळे ही डॉक्युमेंटरी सामान्य लोकांपर्यंत किंवा जाणकारांपर्यंत पोहोचलीच नाही. 

या डॉक्युमेंटरीचे पुढे काय झाले याचा नेमका पत्ता लागत नाही. अनेक वर्षे ती हरवली किंवा नष्ट केली गेली असेच समजले जात होते. तिची फक्त एक अधिकृत प्रिंट एका अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये होप कुक हिने ठेवलेली आहे असे समजल्यावरून बसू यांनी होप कुकशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिने भेटण्याचेही नाकारले. शिवाय एक प्रिंट इंग्लंडमध्ये एका खाजगी संग्राहकाजवळ मिळाली, ती 2002 मध्ये छरींळेपरश्र ऋळश्रा ढहशरीींश मध्ये दाखविण्यात आली. रॉबिन्सनच्या मते राय यांच्या मर्जीविरुद्ध या फिल्ममध्ये भरपूर कंटाळवाणी आकडेवारी टाकण्यात आली होती. 

शेवटी जानेवारी 2003 मध्ये माहिती मिळाली की एक चांगल्या प्रतीची प्रिंट ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आहे. शिवाय कोलकता येथील सत्यजित राय सोसायटीला पत्ता लागला की एक प्रिंट चोग्याल घराण्याकडे सुरक्षित ठेवलेली आहे. त्यांनी पाठपुरावा केला तेव्हा त्यांना दिसले की ही प्रिंट दुरुस्त होण्यापलीकडे खराब झाली आहे. बरीच शोधाशोध करून एक प्रत लंडन येथे मिळाली ती हस्तगत करून Academy Film Archive ने तिचे रिस्टोरेशन केले. ही पुनरुज्जीवित केलेली फिल्म 2008 मध्ये फ्रान्समध्ये एका चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आली. सप्टेंबर 2010 मध्ये या नव्या फिल्मची एक कॉपी आर्ट अँड कल्चर ट्रस्ट ऑफ सिक्कीम, गंगटोक येथे आणण्यात आली. 

2010 मध्ये या फिल्मवरील भारतातील बंदी उठविण्यात आली व नोव्हेंबर महिन्यात कोलकता येथील फिल्म फेस्टिव्हलमध्ये ती दाखविण्यात आली. कोलकत्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात ही एक फार मोठी बातमी होती. त्यामुळे ती फिल्म पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आदल्या रात्रीपासून रांगा लावल्या होत्या. त्या दिवशी या फिल्मचा फक्त एक शो दाखविण्यात आला. ‘स्टेट्‌समन’च्या समीक्षकाने या संदर्भात लिहिले, "Sikkim is beautiful, more an essay from a respected travel journal from Ray's era accompanied by detailed photographs that graced magazines like Life.''

मात्र पुन्हा कुठे आणि कशी चक्रे फिरली कुणास ठाऊक! सिक्कीम कोर्टाकडून ऑर्डर आल्यामुळे तिचे प्रदर्शन थांबवण्यात आले. या बंदीमागेही काही लोकांचा हात असावा असे मानण्यास जागा आहे. कारण पहिला शो दाखविल्यानंतर काही तासांतच गंगटोक येथील कोर्टातून ‘या डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन थांबवा’ अशी ईमेल आली व संध्याकाळपर्यंत कोर्टाची इंजक्शन ऑर्डरदेखील आली. या घाईचे कारण कळू शकले नाही. अजूनही ही बंदी ऑफिशियली उठलेली नाही. मात्र सध्या तिची पायरेटेड प्रिंट पाहावयास मिळू शकते. YouTube वरदेखील ती उपलब्ध आहे. आहे त्या स्थितीतदेखील ही फिल्म पाहणे हा एक आनंददायक, मात्र मूळ डॉक्युमेंटरी किती उत्तम असेल याची विषण्ण करणारी जाणीव करून देणारा अनुभव आहे. 

Tags: कला दिग्दर्शक चित्रपट भारतीय चित्रपट सिनेमा सत्यजीत राय वृत्तचित्र संस्कृती विजय पाडळकर सत्यजित राय satyajeet ray films vijay padalkar cinema bhartiy chitrapat bhartiy cinema satyajeet ray national film archive films indian cinema satyajit ray and indian cinema sadhana issue on satyajit ray satyajit ray weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके