डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कांचनजंघा : तरल व काव्यात्म, पण दुर्लक्षित चित्रपट

‘कांचनजंघा’ हा राय यांचा पहिला रंगीत चित्रपट. या कहाणीत निसर्गाच्या बदलत्या रंगांना अतिशय महत्त्व होते. म्हणून राय यांनी ‘रंगीत’ चित्रपट काढण्याचे ठरविले. दार्जिलिंगच्या रंगांनी रायना लहानपणापासून मोहित केलेले होते. सत्यजित व सुब्रतो मित्र यांनी या चित्रपटात रंगांचा वापर अतिशय सुरेखपण कोठेही भडक न होऊ देता केला आहे.  

सत्यजित राय यांचा ‘पथेर पांचाली’ हा चित्रपट देशविदेशांत गाजला. त्यानंतर अपूच्या कहाणीवर आधारित आणखी दोन चित्रपट त्यांनी तयार केले व ते आजदेखील अत्यंत श्रेष्ठ चित्रपट म्हणून ओळखले जातात. या चित्रपटांना देशात व परदेशांत असंख्य मानाचे पुरस्कार मिळाले. या तीन चित्रपटांमुळे राय यांचे नाव जगातील आघाडीच्या दिग्दर्शकांत घेतले जाऊ लागले. हे तीनही चित्रपट विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या ‘पथेर पांचाली’ व ‘अपराजितो’ या कादंबऱ्यांवर आधारित होते. यानंतरच्या चार-पाच वर्षांत राय यांनी जे सारे चित्रपट निर्माण केले तेदेखील वेगवेगळ्या उत्तम साहित्यकृतींवर आधारित होते. ‘जलसाघर’ हा त्याच नावाच्या ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या दीर्घ कथेवर आधारित होता. तर ‘पाराश पत्थर’ हा परशुराम यांच्या लघुकथेवर. ‘देवी’ या चित्रपटाची मूळ कथा प्रभात मुखर्जी यांची होती. 1961 मध्ये, रवीन्द्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राय यांनी ‘तीन कन्या’ हा चित्रपट निर्माण केला. त्यात टागोरांच्या तीन लघुकथांवर तीन वेगवेगळे चित्रपट एकत्रित दाखविले होते. यानंतरचा 1962 या वर्षातील ‘अभिजान’ हा चित्रपट ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित होता. हे सारे चित्रपट अतिशय अप्रतिम होते व या संदर्भात साहित्यकृतीवरून चित्रपट तयार करण्यात राय हे अत्यंत कुशल आहेत हे जगभरच्या समीक्षकांनी मान्य केले. मात्र याच वेळी राय यांच्या विरोधात काही टीकेचे सूर बंगालमध्ये निघू लागले होते. त्या टीकाकारांचा प्रमुख मुद्दा राय हे लेखकाच्या साहित्यकृतीत अनावश्यक बदल करतात असा होता. विदेशांतदेखील या विषयाची चर्चा सुरू झाली होती. मात्र काही समीक्षकांनी राय यांच्या बाजूने आपले मत ठामपणे व्यक्त केले. गॅरी अर्नोल्डने या संदर्भात लिहिले, “Ray's reliance on literary sources probably tends to discredit him among cineastes who prefer to keep holy communion exclusively with imagery. It will always seem a virtue to those who value the medium's capacity to transfigure literary material.'' या टीकेला राय यांनीदेखील आपल्या पद्धतीने उत्तर दिले खरे; पण ही टीका अधून मधून होतच राहिली. दुसरे म्हणजे या संदर्भात तसेच ते इतरांच्या कथांवरच चित्रपट का तयार करतात असाही उपप्रश्न विचारला जाऊ लागला होता. 

22 जून 61 रोजी राय बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून गेले. तेथून आल्यानंतर त्यांनी नरेंद्र नाथ मित्र यांच्या कथेवर ‘महानगर’ नावाचा चित्रपट काढण्याची तयारी सुरू केली. मात्र त्या चित्रपटातील ‘आरती’ या प्रमुख भूमिकेसाठी त्यांना योग्य अशी तरुणी सापडेना. ही एक अत्यंत आव्हानात्मक भूमिका होती व आपल्या मनाजोगी तरुणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत चित्रपट करण्यात त्यांना रस नव्हता. त्यांनी तो प्रकल्प बाजूला ठेवला व नवा चित्रपट करण्यासाठी कथा शोधत असताना त्यांना स्वत:चीच 'Baganbari' ही कथा आठवली. वेळ रिकामा जाऊ नये म्हणून त्यांनी स्वत:च्याच या कथेवर चित्रपट काढण्याचा संकल्प केला. नवा चित्रपट शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचे आणखी एक कारण होते. त्यांनी आपले एक लहानसे युनिट तयार केले होते. ज्या वेळी हातात एखादा चित्रपट नसेल त्या वेळी त्या युनिटमधील कलाकारांना पैसे देता येत नसत. त्यांना पैसे देता आले नाहीत याबद्दल सत्यजितना अपराधी वाटत राही. आपली जबाबदारी आपण नीट पार पाडत नाही असे वाटून ते अस्वस्थ होत, इतके की त्यांचे ब्लड प्रेशर वाढे. 

या कथेवर पटकथा लिहिण्यासाठी त्यांनी दार्जिलिंग येथे जाण्याचे ठरविले. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये विजयाबाई व ते दार्जिलिंगला गेले. राय यांच्या मूळ कथेत काही व्यक्ती एक दिवसाची सुटी घेऊन एका जुन्या हवेलीत पिकनिकला येतात असा कथाभाग होता. यासाठी टागोरांच्या नातेवाइकाचे एक जुने घर त्यांनी पाहूनही ठेवले होते, पण तेथे शूटिंग करण्याची परवानगी अजून मिळाली नव्हती. दार्जिलिंग येथे काही दिवस राहिल्यावर त्यांनी हा चित्रपट येथेच चित्रित करावयाचा असे ठरविले. कथेतील व्यक्ती एका हवेलीत राहतात असे दाखविण्यापेक्षा ते दार्जिलिंगची सफर करण्यास आले आहेत असे दाखविले तर सिनेमाला एक निसर्गसुंदर पार्श्वभूमी आपोआप मिळेल असे त्यांच्या ध्यानात आले. शिवाय कथा त्यांचीच असल्यामुळे त्यांनी तिच्यात बदल केला याबद्दल कुणी तक्रार करणार नव्हते! पटकथा लिहीत असताना रायना आपल्या मूळ कथेचे नाव फारसे आकर्षक नाही असे वाटले व त्यांनी ते ‘कांचनजंघा’ असे बदलले. आपण केलेला स्थानबदल फारच उत्तम आहे असे सत्यजित यांच्या ध्यानात आले. एक नव्या पद्धतीची कथा त्यांना मांडायची होती व त्यासाठी दार्जिलिंगचा निसर्ग, तेथील ऊन-सावली-धुक्याचा खेळ पार्श्वभूमी म्हणून मोलाचे काम करील असे त्यांना जाणवले. प्रतिमांतून प्रसंग प्रभावी करण्याची त्यांना आवड होती व येथे तर विलक्षण सुंदर अशा प्रतिमा जागोजागी विखुरल्या होत्या. 

चित्रपटाची पटकथा लिहीत असताना सत्यजित राय यांनी कोलकत्याहून तेथे आलेल्या माणसांच्या आयुष्यातील फक्त एका संध्याकाळच्या दोन तासांच्या जीवनक्रमावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी ठरविले, या संकल्पित चित्रपटाचा कालावधीदेखील एक तास पन्नास मिनिटेच ठेवायचा. हा आणखी एक वेगळा प्रयोग राय यांनी केला होता. या अवधीत काही माणसे एकमेकांना भेटतात, आपल्या समोर असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधू पाहतात. त्यांना काही उत्तरे मिळतात, काही नाही. 

‘जलसाघर’ आणि ‘देवी’ या चित्रपटांतील प्रमुख भूमिका छबी विश्वास या श्रेष्ठ बंगाली नटाने केल्या होता. छबी विश्वास (1900-1962) हे बंगाली नाट्य व सिनेसृष्टीतील एक अत्यंत महत्त्वाचे नाव.या चित्रपटातील प्रमुख भूमिका करण्यासाठी रायनी पुन्हा एकदा छबी विश्वास यांचीच निवड केली. छबी विश्वासशी त्यांचे उत्तम ट्युनिंग जमले होते. दोघांनाही एकमेकांविषयी खूप आदर होता. ‘जलसाघर’, ‘देवी’, आणि ‘कांचनजंघा’ या तीनही चित्रपटांत छबी विश्वास यांनी घरातील कर्तबगार, करारी व कर्त्या प्रौढ पुरुषाची भूमिका केलेली असली तरी तिन्ही भूमिकांत अनेक सूक्ष्म फरक होते. हे तिन्ही चित्रपट लागोपाठ पाहिले म्हणजे विश्वास यांच्या अभिनयाची रेंज ध्यानात येते. त्यांच्या पत्नीचे काम करण्यासाठी रायनी करुणा बानर्जीला निवडले. करुणा बानर्जीने राय यांच्या ‘पथेर पांचाली’ व ‘अपराजितो’ या दोन्ही चित्रपटांत अप्रतिम भूमिका केल्या होत्या. या भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नावाजल्या गेल्या होत्या. 

नायिकेच्या भूमिकेसाठी रायना पूर्वी चित्रपटात काम न केलेली, आकर्षक, बुद्धिमान अशी तरुणी हवी होती. तिचा शोध घेताना कुणीतरी त्यांना अलकनंदा रायचे नाव सुचविले. ही मुलगी रायना नायिका म्हणून योग्य वाटली. रायबहाद्दूर यांच्या पत्नीच्या भावाच्या लहानशा भूमिकेसाठी त्यांनी पहाडी संन्याल यांना बोलाविले व त्यांनीही आनंदाने हे छोटेसे काम केले. 

या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राय यांनी आजवर न अवलंबलेली एक गोष्ट केली. चित्रपटाच्या कथेतील प्रसंगांचा आणि भोवतीच्या नैसर्गिक वातावरणाचा जवळचा संबंध आहे, व चित्रपटातील बहुतेक सारे प्रसंग खुल्या वातावरणातच घडतात; त्यामुळे जसे वातावरण असेल त्याप्रमाणे, त्याच्याशी संबंधित प्रसंग चित्रित करावयाचा असे त्यांनी ठरविले. त्यासाठी सर्व प्रमुख नटांना त्यांनी संवादांच्या कॉपीज दिल्या व सारे संवाद पाठ करण्यास सांगितले. कोठलाही प्रसंग केव्हाही सुरू केला जाईल व त्यासाठी ते तयार असावेत असे राय यांचे म्हणणे होते. या पद्धतीमुळे पूर्ण सिनेमा फक्त सव्वीस दिवसांत चित्रित केला गेला. 

‘कांचनजंघा’या चित्रपटाला स्पष्ट ठळक असे कथानक नाही. मात्र अशा कथानकाची चित्रपटाला गरज नाही असे राय यांचे पूर्वीपासून मत होते. फार वर्षांपूर्वी, 1955 साली, फिल्मफेअरमध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी आपली ही भूमिका प्रथम मांडली होती. ते लिहितात, ‘‘चित्रपटाला एखादा स्पष्ट प्लॉट हवा असतो यावर माझा विश्वास नाही. त्याला एक आशयसूत्र (theme) हवे असते. एक कल्पना हवी असते. एक घटना हवी असते. शिवाय काही पात्रे. या साऱ्यांचा दृश्य-प्रतिमांतून विकास करणे म्हणजे चित्रपट.’’ 

आपल्या कथेवरून चित्रपट बनविताना त्यांनी मनातील या कल्पनांना पडद्यावर साकार करण्याचे ठरविले. या चित्रपटात दार्जिलिंग येथे सुटी घालविण्यासाठी कोलकत्याहून आलेल्या एका श्रीमंत कुटुंबाच्या आयुष्यातील दोन तासांची कहाणी आपल्या समोर उलगडते. सुरुवातीच्या काही प्रसंगांत राय या माणसांचा भूतकाळ केवळ संवादांतून आणि त्यांच्या परस्पराशी वागण्यांतून आपल्या समोर मांडतात. या कुटुंबाचे प्रमुख, सुमारे साठ वर्षांचे इंद्रनाथ चौधरी हे एक बडे प्रस्थ आहे. ते कोलकत्याला पाच कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांना ब्रिटिश सरकारने ‘रायबहाद्दूर’ हा किताब दिलेला आहे. अर्थातच त्याचा त्यांना फार अभिमान आहे व त्यांचे इंग्रजांविषयीचे प्रेम त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सतत जाणवते. घराचा सारा कारभार त्यांच्या मर्जीप्रमाणेच चालतो आणि त्याविरुद्ध बोलण्याचीही कुणाची प्रज्ञा नाही. 

त्यांची पत्नी लावण्या ही सरळसाधी गृहिणी आहे, नवऱ्याच्या ‘हो’ ला ‘हो’ मिळविणारी. स्वत:च्या इच्छा, आकांक्षा तर तिला नाहीतच; स्वत:चे मतदेखील मांडण्याची तिची हिम्मत नाही. 

या जोडप्यासोबत मोठी मुलगी अनिमा, तिचा नवरा जगदीश व त्यांची आठ-दहा वर्षांची मुलगी तुकलु हेही आलेले आहेत. यांचा एक वेगळाच भूतकाळ आहे. अनिमाचे एका तरुणावर प्रेम होते. पण रायबहाद्दुरांनी तिचे लग्न जगदीशबरोबर लावून दिले. अजून त्याची पत्रे तिला येतात. तिचा नवरा जगदीश रेससारख्या व्यसनात पैसे घालविणारा, उधळ्या आहे. नवराबायकोचे पटत नाही.  पण ते कसाबसा हा नाइलाजाचा संसार ओढत आहेत. त्यांची मुलगी हा त्यांच्यात उरलेला एकमात्र दुवा आहे. 

धाकटी मुलगी मनीषा ही कॉलेजमध्ये शिकणारी एक लोभस, गोड तरुणी आहे. रायबहाद्दुरांना तिचे लग्न बानर्जी नावाच्या एका ‘उज्ज्वल भविष्यकाळ’ असणाऱ्या तरुणाशी लावून द्यायचे आहे. इंग्लंडहून इंजिनिअर बनून आलेल्या या तरुणाला मनीषा आवडलेली आहे व तिने आपल्याशी लग्न करावे अशी त्याचीही इच्छा आहे. तिला आपले शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, पण ते वडिलांना बिनमहत्त्वाचे वाटते. 

या मंडळीत रायबहाद्दूर यांचा ‘वाया गेलेला’ एक मुलगाही आहे. हातात कॅमेरा घेऊन नवनव्या आकर्षक तरुणींच्या मागे फिरणे एवढाच त्याला नाद आहे. या कुटुंबासोबत ‘लावण्या’चा ‘पक्षी निरीक्षक’ भाऊदेखील आलेला आहे. तो हातात दुर्बीण घेऊन दार्जिलिंगच्या वनराईत फिरत असतो. 

दार्जिलिंगचा निसर्ग या माणसांच्या जीवनात कसा आणि कुठपर्यंत परिवर्तन घडवून आणतो याची कहाणी राय आपल्या समोर मांडतात. पटकथाकार म्हणून त्यांचे सारे कौशल्य येथे पणाला लागले आहे. या माणसांचा भूतकाळ त्यांना प्रेक्षकांसमोर मांडायचा आहे, पण तो निवेदनातून मांडणे ‘दृश्यात्मक’ ठरले नसते. त्यामुळे सुरुवातीला ते काही प्रसंग असे रचतात की ज्यांतून तो भूतकाळ आणि त्यांतून घडलेली माणसे स्पष्ट व्हावीत. मात्र हे प्रसंग कोठेही कृत्रिम व ‘रचलेले’ वाटत नाहीत. 

चित्रपटाच्या सुरुवातीला रायबहाद्दूर ते राहत आहेत त्या हॉटेलातून बाहेर पडताना दिसतात. पटकथा लिहीत असताना राय याच हॉटेलमध्ये राहत होते. ‘लावण्या’चे भाऊ- पक्षी निरीक्षक- त्यांना हातातील एका पुस्तकात असलेले दुर्मीळ पक्ष्याचे चित्र दाखवून म्हणतात, ‘‘मी या पक्ष्याच्या शोधात आहे.’’ 

त्यावर रायबहाद्दूर विचारतात, ‘‘याला शिजवून खाल्ले जाते का?’’ 

‘‘नाही.’’ 

‘‘मग मला त्यात रस नाही.’’ 

पुढे पत्नीसह फिरायला निघाल्यावर रस्त्यावरून चालणारा एक जण शिंक देतो. रायबहाद्दूर एकदम थांबतात, बायकोलाही एक मिनिट थांबायला सांगतात. नंतर एकदा ती, मुलीचे शिक्षण पूर्ण होण्याआधी तिचे लग्न करू नये असे घाबरत घाबरत मत मांडते तेव्हा ते म्हणतात, ‘‘ती शिकून काय करणार? एक मुलगी शिकली की एका मुलाची नोकरीची संधी जाते.’’ 

उच्चशिक्षित, मोठ्या पदावर असलेला हा माणूस आतून किती जुनाट विचारांचा व असंस्कृत आहे हे स्पष्ट होते. बायको मुलीच्या शिक्षणाची उगीच काळजी करते आहे असे त्यांना वाटते. ती बोलत नाही हेही त्यांना खटकते. ते म्हणतात, ‘‘तू चेहरा पाडून का बसली आहेस? ते मला आवडत नाही हे तुला माहीत आहे ना?’’ 

बायको बिचारी आज्ञाधारकपणे हसते. 

"That's better." ते समाधानाने म्हणतात. 

काही वेळाने कथेतील आणखी एका महत्त्वाच्या पात्राची आपल्याला ओळख होते. रायबहाद्दूर यांच्या मुलाला ज्याने लहानपणी शिकविलेले असते तो शिक्षक त्यांना रस्त्यावर फिरताना अचानक भेटतो. या शिक्षकासोबत त्याचा अशोक हा तरुण पुतण्या आहे. अशोक शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात आहे. काका त्याची ओळख रायबहाद्दूर यांच्याशी करून देतात. त्यांच्या ओळखीने त्याला नोकरी मिळू शकेल असे त्यांना वाटते. 

ही सारी मंडळी फिरायला बाहेर पडली आहेत. पंधरा दिवसांपासून ते येथे आहेत. पण कांचनजंघा शिखराचे अजून त्यांना दर्शन घडलेले नाही. ते सतत धुक्यातच आहे. 

या माणसांच्या मनातही धुके पसरलेले आहे. 

बानर्जीला मनीषा आवडलेली आहे. पण तिच्या मनात काय आहे याबद्दल त्याच्या मनात संभ्रमाचे धुके आहे. अशोकची व मनीषाची भेट झाल्यावर व ते दोघे एकमेकांशी मिळून मिसळून बोलताना पाहून तो अस्वस्थ होतो. मनीषाला स्वत:च्याच मनाचा थांग लागत नाही. बानर्जीशी बोलताना त्याला साहित्य, कला यांत रस नाही हे तिला माहीत झाले आहे. ती स्वत: टागोर आणि ब्राउनिंगची चाहती आहे. पण तेवढ्यासाठी त्याला नकार द्यावा काय? पण मग होकार देण्यासाठीही सबळ कारण काय आहे? आपण केवळ वडिलांच्या दबावामुळे लग्न करावे का? अशा प्रश्नांचे काहूर तिच्या मनात उठले आहे. तिला उत्तर सापडत नाही. 

दार्जिलिंगच्या रस्त्यावरून ही सारी मंडळी फिरत असतात. तेथील अरुंद आणि वळणावळणाचे रस्ते, तेथील विशाल वृक्ष, ठिकठिकाणी विखुरलेले ‘पॉइंटस्’, घोड्यावरून रपेट करणारे मुसाफिर, या साऱ्यांतून दार्जिलिंग आपल्या समोर उलगडत जाते. या भटकंतीत कधी कुणा दोघांची गाठ पडते, कधी कुणा तिघांची. प्रत्येक भेटीत माणसामाणसांतील नात्यांचे वेगवेगळे पदर त्या व्यक्तींना व आपल्यालाही जाणवू लागतात. एकदा रायबहाद्दुरांची पत्नी एका व्ह्यू पॉइंटवर एकटीच बसलेली असताना तिच्या मनात रवींद्रनाथांच्या गीताची आठवण जागी होते. ती गाऊ लागते- 

‘असे संभ्रमाचे ओझे कुणीच फार काळ वाहू शकत नाही. 

हा कधीच न संपणारा छळवाद, हे दु:ख 

या अनोळखी प्रदेशात कोण मला साहाय्य करील? 

कोण माझी वेदनेपासून, भीतीपासून सुटका करील? 

कुणीच नाही माझ्या हृदयापर्यंत पोचणारे 

या रिकाम्या, विस्तीर्ण, ओसाड प्रदेशात मी एकाकी आहे..’ 

एक रायबहाद्दूर सोडले तर या कहाणीतील प्रत्येकाच्याच मनातील ही स्थिती आहे. ‘असे संभ्रमाचे ओझे कुणीच फार काळ वाहू शकत नाही....मी एकाकी आहे...’ 

पक्ष्यांच्या मागे फिरणाऱ्या तिच्या भावाला ती गाताना दिसते. तो जवळ येऊन तिच्या उदास होण्याचे कारण विचारतो. ती म्हणते, ‘‘आज मनीषा आपला निर्णय घेणार आहे. तिला सांग की आपल्या मनाचा कौल मान. इतरांचे ऐकू नकोस.’’ 

‘‘रायबहाद्दुरांचे देखील?’’ 

‘‘हो.’’ 

‘‘ते रागावतील.’’ 

‘‘पण आता तिचा निर्णय झाला आहे. ती म्हणते, “रागावू दे. मी त्यांना विरोध करीन. फक्त शरणागत असे आयुष्य किती दिवस स्वीकारायचे?’’ 

‘फक्त शरणागत असे आयुष्य किती दिवस स्वीकारायचे?’ हा प्रश्न आता तिच्या एकटीचाच उरत नाही. ज्यांच्या भावना दडपून टाकल्या गेलेल्या आहेत त्या सर्वांचाच हा प्रश्न बनतो. आणि त्याला उत्तर ‘विरोध करणे आणि आपले मत मांडणे’ हेच असू शकते. 

मोठी मुलगी अनिमा आणि तिचा नवरा जगदीश हेदेखील याच प्रश्नाचा शोध घेताना याच उत्तरापाशी आलेले आहेत. भावना दडपण्यात अर्थ नाही. नवरा तिला सांगतो, ‘‘तुझे दुसऱ्यावर प्रेम होते, अजून तुला त्याची पत्रे येतात हे मला ठाऊक आहे. पण आता माझा निर्णय झाला आहे. मी तुला घटस्फोट देण्यास तयार आहे.’’ पण तिनेही मनाशी एक निर्णय घेतला आहे. ती आपले जुने प्रेमप्रकरण कायमचे संपवून टाकण्यास तयार आहे. या उत्तरापाशी येण्याचे कारण दोघांनाही ठाऊक आहे. त्यांची मुलगी. तिला सोडून ते दोघेही जगू शकत नाहीत. मग तिला सोबत घेऊन एक नवे आयुष्य जगायला सुरुवात का करू नये? ते शेवटी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. 

अशोकलाही एक प्रश्न पडला आहे. रायबहादूर त्याला ‘‘कोलकत्याला ये, मी तुला नोकरी देईन,’’ असे सांगतात. पण त्यामुळे जन्मभर त्यांचे मिंधे राहावे लागेल हे त्याच्या लक्षात आले आहे. तो त्यांना स्पष्ट सांगतो, ‘‘माझ्या प्रयत्नाने मी नोकरी मिळवीन.’’ 

काही वेळाने मनीषाची भेट झाल्यावर तो तिला सांगतो, ‘‘मी तुझ्या वडिलांची ऑफर नाकारली.’’ 

ती म्हणते, ‘‘चांगले केले.’’ 

अशोक म्हणतो, ‘‘मी असे का केले? कदाचित या वातावरणाचा हा परिणाम असावा. कोलकत्याला असताना मी असा निर्णय घेतला नसता. हा विराट हिमालय, हे विशाल, स्तब्ध पाईन वृक्ष, क्षणात सूर्यप्रकाश, क्षणात ढग, क्षणात धुके...हे सारे स्वप्नात जणू असल्यासारखे आहे. अ-वास्तव. माझ्या आत काहीतरी बदलत गेले. जणू मी कुणी वेगळाच बनलो. जीवनाला धैर्याने सामोरे जाणारे एक वेगळेच व्यक्तिमत्व.’’ 

सत्यजित राय यांची स्वत:च्या कथेवर लिहिलेली ही पहिलीच पटकथा. त्यातील संवाद इतके प्रभावी व काव्यात्म आहेत की त्यांच्यातील लेखकाला दाद द्यावी लागते. शिवाय हे संवाद लेखकाचे आहेत असे वाटत नाही, ते त्या त्या पात्राच्याच तोंडचे स्वाभाविक संवाद वाटतात हे विशेष. 

तेवढ्यात मनीषाला दुरून येणारा बानर्जी दिसतो. ती अशोकला म्हणते, ‘‘आपण नंतर बोलू.’’

तो निघून जातो. 

मनीषा बानर्जीला विचारते, ‘‘मी काही बोलावे अशी तुमची अपेक्षा आहे का?’’ 

तो म्हणतो, ‘‘आधी मला बोलू दे. लगेच लग्न करावे असे माझ्या मनात नव्हते. पण तुला भेटून माझा विचार बदलला होता. पण आता मला स्पष्ट दिसते आहे की नजीकच्या भविष्यात हे शक्य नाही. मी हे सारे विसरून जाऊ इच्छितो.’’ 

त्याला वाटते की मनीषाचे मन अशोककडे ओढ घेत आहे, म्हणून तो पुढे म्हणतो, ‘‘या वातावरणात तुला असे वाटत असेल की प्रेम ही सर्वांत मोठी गोष्ट आहे, पण कोलकत्याला गेल्यावर तुला समजेल की सुरक्षित आयुष्य सर्वांत महत्त्वाचे असते...आता तू निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेस.’’ 

मनीषाचा चेहरा खुलतो. छातीवर हात ठेवत ती म्हणते, ‘‘ओह, मि. बानर्जी!’’ 

तिच्या मनावरचे दडपण नाहीसे झाले आहे. 

चित्रपटात प्रथमच आपण तिच्या चेहऱ्यावर हसू पाहतो. 

बानर्जी वळतो व निघून जातो. सत्यजित त्याला व्हिलन करीत नाहीत किंवा विनाकारण खुज्या व्यक्तिमत्त्वाचाही दाखवीत नाहीत. त्याग करणारा हिरोही बनवीत नाहीत. तो साधारण माणसाच्या पातळीवरच राहतो. सर्वांसारखा. उलट थोडा अधिकच समजदार.  

चित्रपटाच्या शेवटी पुन्हा एकदा मनीषा व अशोकची गाठ पडते. ती त्याला विचारते, ‘‘कोलकत्याला गेल्यावर भेटाल का?’’ 

‘‘नाही.’’ 

‘‘का?’’ 

‘‘तुझ्या बाबांना भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागते.’’ 

‘‘पण माझ्या मित्रांना ती लागत नाही.’’ 

आता वातावरणातील ढग व धुके नाहीसे झाले आहे. दूरवर असलेले विलक्षण सुंदर कांचनजंघा शिखरदेखील आता स्पष्ट दिसू लागते. माणसांच्या मनातील धुकेही विरते. ती ‘वेगळी’ बनतात. फक्त रायबहाद्दूर सोडून. ते बदलण्याची शक्यता नाहीच. 

00 

‘कांचनजंघा’ हा राय यांचा पहिला रंगीत चित्रपट. या कहाणीत निसर्गाच्या बदलत्या रंगांना अतिशय महत्त्व होते. म्हणून राय यांनी ‘रंगीत’ चित्रपट काढण्याचे ठरविले. दार्जिलिंगच्या रंगांनी रायना लहानपणापासून मोहित केलेले होते. सत्यजित व सुब्रतो मित्र यांनी या चित्रपटात रंगांचा वापर अतिशय सुरेख- पण कोठेही भडक न होऊ देता केला आहे. चित्रपट समीक्षक बी.डी.गर्ग यांनी या चित्रपटातील रंगांची व त्या काळात आलेल्या इतर रंगीत चित्रपटांची तुलना करताना म्हटले आहे की मेहबूब व व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांतील रंगांचा वापर हा सिनेमा ‘नटविण्यासाठी’ केला जातो. राय यांनी तो भावना आणि नाट्य खुलविण्यासाठी केला. 

राय हे तसे पाश्चात्त्य संगीताचे प्रेमी व अभ्यासक, परंतु ‘कांचनजंघा’ला संगीत देताना त्यांनी बंगाली 'folk music' चादेखील अप्रतिम वापर केला. चित्रपटात रवीन्द्रनाथांच्या गीताचाही चपखल उपयोग केलेला होता. चित्रपटाच्या श्रेयनामावलीपाशी, पार्श्वभूमीला एक नेपाळी गीत सत्यजितनी वापरले आहे. चित्रपटाच्या शेवटी तेच गीत एक भिकारी मुलगा गाताना दिसतो. राय यांच्या मूळ पटकथेत हा मुलगा नव्हता, पण एकदा त्यांनी त्याला दार्जिलिंगला फिरताना व गाणे म्हणताना पाहिले तेव्हा त्यांना वाटले की हा स्थानिक माणसांचा प्रतिनिधी म्हणून वापरता येईल. या गीताची चाल व शब्द, किशोरकुमार याने नंतर संगीतबद्ध केलेल्या ‘दूर का राही’ या सिनेमातील ‘जीवन से ना हार जीनेवाले’ या गीताशी बरेच मिळतेजुळते आहेत. 

राय हे जसे उत्तम चित्रकार होते तसेच ते कुशल सुलेखनकारदेखील होते. त्यांच्या बहुतेक चित्रपटांच्या श्रेयनामावल्या त्यांनी स्वत:च तयार केल्या असून त्यांत अक्षरलेखनाचे विविध प्रयोग केलेले आढळतात. ‘कांचनजंघा’ या चित्रपटाची श्रेयनामावली तयार करताना रायनी बंगाली अक्षरांसाठी नेपाळी भाषेचे वळण वापरले. शिवाय नेपाली चित्रकलेच्या पद्धतीने चित्रपटातील काही प्रसंगांची चित्रेदेखील रेखाटली. 

‘कांचनजंघा’ हा अनेक अर्थांनी ‘नवा’ चित्रपट होता. चित्रपटाचा कालावधी व चित्रपटातील घटनांचा कालावधी एकच ठेवण्याची कल्पना 1960 च्या सुमारास, भारतीय सिनेमासाठी नवीच होती. सिनेमाची पटकथा लिहिताना राय यांना बरीच ‘कसरत’ करावी लागली. रचनेतील त्यांचे सारे कौशल्य येथे पणाला लागले होते. त्यांनी या संदर्भात लिहिले आहे, "In a sense Kanchanjungha is a very artificial kind of creation. It is a manufactured situation where everything takes place according to a certain preconceived pattern. It is very decorative. Yet the total effect is natural. There is extremely conscious planning of words gestures, movements. That is why I call it a musical.'' साठच्या दशकाच्या सुरुवातीस भारतातील महत्त्वाच्या भाषांत ‘नवकथा’ लिहिण्याचे ‘प्रयोग’ सुरू झाले होते. ज्यांच्या ध्यानात साठोत्तरी साहित्याच्या या प्रयोगांचे स्वरूप येत नव्हते ते त्यांना दुर्बोध समजत होते. ‘कांचनजंघा’ ही एका दृष्टीने पडद्यावरची ‘नवकथा’च होती. त्यामुळे तिलाही ‘दुर्बोध’ ठरविले गेले. 

राय यांनी केलेली ही ‘रचना’ सामान्य प्रेक्षकाला समजायला व ‘पचायला’ थोडी जडच गेली. पुढे 1982 मध्ये Cineaste मासिकाला मुलाखत देताना राय म्हणाले, ‘‘हा चित्रपट किमान दहा ते पंधरा वर्षे काळाच्या पुढे होता. लोकप्रिय बंगाली-हिंदी सिनेमावर ज्यांची अभिरुची जडलेली आहे त्यांना हा सिनेमा समजलाच नाही. एक तर त्यात ‘व्यवस्थित सांगितलेली कथा’ नव्हती. दुसरे म्हणजे कथेचा एक विशिष्ट- सुखान्त किंवा दु:खान्त- शेवट नव्हता. त्यामुळे आपण काहीतरी न समजणारे, ‘अर्धवट’ पाहिले, अशी भावना प्रेक्षकांची झाली.’’ जे समाजात नाही ते माणसाला सहसा आवडत नाहीच. एका उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. 

चित्रपटातील शेवटचा प्रसंग अभिनित करताना नवी अभिनेत्री अलकनंदा बरीच गोंधळली होती. नायिकेच्या मनात कोणत्या भावना आहेत हे तिला समजेना. नायिकेचे प्रेम कुणावर आहे, मुळात ते प्रेम आहे का, असे अनेक प्रश्न तिच्या मानत निर्माण झाले होते. बरे, राय यांचा दबदबा एवढा होता की त्यांना या शंका विचारणेही अवघड होते. रायनी तिच्या मनातला गोंधळ ओळखला. ते तिला म्हणाले, ‘‘लोकप्रिय सिनेमाच्या ज्या कल्पना तुझ्या मनात आहेत त्या विसरून जा. तू त्या मुलाच्या प्रेमात वगैरे पडलेली नाहीस व त्यामुळे तुझ्या नजरेत आर्त भाव आणणे आवश्यक नाही. हे फक्त एक आमंत्रण आहे. तुला मैत्री करावी वाटणाऱ्या तरुणाला तू दिलेले.’’ एका मुलाखतीत अलकनंदा म्हणाली, ‘‘मला स्वत:ला सिनेमाचा हा शेवट पटला नव्हता. नायिकेच्या जागी मी असते तर मी इंजिनिअरचीच निवड केली असती. स्वत:चा जोडीदार स्वत:च शोधायचा वगैरे रोमँंटिक भावना माझ्या मनात नव्हत्या.’’ 

राय यांचा हा प्रयोग पाश्चात्त्य देशांतही फारसा लोकप्रिय झाला नाही. काही तुरळक समीक्षकांना तो आवडला; पण त्यांची प्रतिक्रियाही सावध अशी होती. Sam Kaplan ने लिहिले, "Though it is a film of great distinction, it is not Ray's one of the best works. But that hardly matters.'' व्यावसायिकदृष्ट्या तो परदेशांत यशस्वी होऊ शकला नाही. भारतात प्रदर्शित झाल्यावर चार वर्षांनी तो अमेरिकेत दाखविला गेला. युरोपात तो बरीच वर्षे दाखविला गेलाच नाही; कारण निर्मात्याने त्याचे sub-titles तयार केले नाहीत. परदेशी सामान्य प्रेक्षकाला त्यांतील भारतीय कुटुंबसंस्थेच्या, संस्कृतीच्या संदर्भातील गुंतागुंतीचे संबंध ध्यानात आले नाहीत. एका प्रसंगी इंद्रनाथ व त्यांची पत्नी फिरायला निघाली असता समोरून जाणारा एक जण शिंक देतो. इंद्रनाथ पटकन थांबतात व बायकोलाही थांबायला सांगतात. भारतीय प्रेक्षकाला यातील सुशिक्षितांच्या मनात असलेल्या खुळ्या समजुतींचा उपहास जाणवू शकतो, पण परकीय प्रेक्षकांसाठी हा प्रसंग बिनमहत्त्वाचा ठरला. 

सत्यजित राय एका सेमिनारमध्ये गेले असता एका अमेरिकन स्त्रीने त्यांना विचारले, ‘‘या सिनेमातील पात्रे कोण आहेत? मी त्यांना ओळखत नाही.’’ गंमत म्हणजे तिला फक्त भारतातील गरीब माणसे सिनेमातून किंवा साहित्यातून माहीत होती! 

शिवाय या चित्रपटात दृश्य प्रतिमांइतकेच संवादांनाही महत्त्वाचे स्थान होते. त्यांतील बारकावे व पात्रांचे एकमेकांशी नाते परक्या संस्कृतीतील लोकांना समजायलाही कठीण गेले. 

बोस्ले क्रोथरने या चित्रपटाची स्तुती केली. पण शेवटी लिहिले, "Mr. Ray, in this instance, has not bitten off as much as he could chew.'' 

मात्र ‘कांचनजंघा’ पाहिल्यानंतर जाणवते की हा एक विलक्षण काव्यात्म अनुभव आहे. मी राय यांचे चरित्र लिहावयास सुरुवात करेपर्यंत हा चित्रपट पाहिला नव्हता किंवा त्याबद्दल फारसे ऐकले नव्हते. नंतर तो मिळवून पाहिला. पण एकदा पाहिल्यानंतर तो विसरणे अशक्य आहे. सत्यजित राय यांच्या भांडारातील हे एक दुर्लक्षित पण अमूल्य रत्न आहे. 

Tags: कला दिग्दर्शक चित्रपट भारतीय चित्रपट सिनेमा सत्यजीत राय वृत्तचित्र संस्कृती विजय पाडळकर सत्यजित राय satyajeet ray films vijay padalkar cinema bhartiy chitrapat bhartiy cinema satyajeet ray national film archive films indian cinema satyajit ray and indian cinema sadhana issue on satyajit ray satyajit ray weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके