डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उंच माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टी

सत्यजित यांच्या उंचीइतकाच वैशिष्ट्यपूर्ण त्यांचा आवाज होता. इंग्रजीत ज्याला Baritone असे म्हटले जाते तसा तो खर्जातील आवाज ज्याने ऐकला, त्याच्यावर त्या आवाजाची लगेच छाप पडे. ते सुरेख शिट्टी वाजवीत. या शिट्टीची एक गंमत आहे. सत्यजित तरुण असताना त्यांचे त्यांच्या मामाच्या मुलीवर प्रेम बसले. ती त्यांच्या घरीच राहत असे. इतरांना कळू नये म्हणून हे दोघे जण अनेकदा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शिट्टीचा उपयोग करीत. (पुढे ते दोघे पती-पत्नी झाले)  

भारतातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक, ऋत्विक घटक, हे माधवी मुखर्जी या बंगाली अभिनेत्रीशी बोलत असताना एकदा म्हणाले, 

‘‘ऐक मधु, आपल्या देशातील सारे चित्रपट दिग्दर्शक एक तर अर्धवट आहेत किंवा मूर्ख आहेत. ज्याला सिनेमाची कला अवगत आहे असा एकच माणूस आहे- ‘तो उंच माणूस’!’’ 

सत्यजित राय यांच्या संदर्भात हे उद्‌गार काढताना ऋत्विक घटक यांच्या मनात राय यांची सहा फूट चार इंचांहून अधिक शारीरिक उंची तर होतीच, पण आणखीही बरेच काही होते! 

सत्यजित राय हे केवळ एक महान सिने-दिग्दर्शकच नव्हते, तर विसाव्या शतकाच्या सांस्कृतिक जीवनावर ज्यांचा अमिट प्रभाव पडलेला आहे असे विश्वमानव होते. सत्यजित राय हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. 2 मे 2021 रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष संपते आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याची समीक्षा होत राहीलच, पण सत्यजित व्यक्ती म्हणून कसे होते याची; त्यांचे लेखन, त्यांच्या पत्नीचे आत्मचरित्र आणि त्यांच्या परिचितांच्या आठवणी यांतून संकलित केलेली माहिती वाचकांना नावीन्यपूर्ण आणि रंजक वाटेल. 

सत्यजित यांच्या सहवासात येणारे बहुतेक जण त्यांच्या उंचीचा उल्लेख करीत. एकदा एक रशियन चित्रपट दिग्दर्शक भारतात आले होते. त्यांना सत्यजित राय यांची भेट घेण्याची खूप इच्छा होती. अर्थात अशा मान्यवर व्यक्तीला भेट द्यायला जाताना ‘रिकाम्या हाताने जाऊ नये,’ या विचाराने ते दिग्दर्शक राय यांच्यासाठी एक रशियातून भेटवस्तू घेऊन गेले. या भेटीबद्दल त्यांनी लिहिले आहे, ‘‘मी राय यांना भेट देण्यासाठी माझ्या प्रदेशातील एक वैशिष्ट्यपूर्ण अंगरखा घेऊन गेलो. ते उंच आहेत हे मला ठाऊक होते. म्हणून मी दुकानदाराला त्याच्या जवळचा सर्वांत लांब अंगरखा देण्यास सांगितले होते. पण जेव्हा रायनी तो उलगडून पाहिला तेव्हा आम्हांला दिसले की तोदेखील राय यांच्यासाठी आखूड होतो आहे!’’ या आठवणीचा शेवट करताना ते दिग्दर्शक लिहितात, ‘‘अशी उंच माणसे आपल्याला भेटणे हे आपले भाग्यच आहे.’’ 

सत्यजित यांच्या उंचीइतकाच वैशिष्ट्यपूर्ण त्यांचा आवाज होता. इंग्रजीत ज्याला Baritone असे म्हटले जाते तसा तो खर्जातील आवाज ज्याने ऐकला, त्याच्यावर त्या आवाजाची लगेच छाप पडे. सुदैवाने त्यांच्या अनेक मुलाखती youtube वर उपलब्ध आहेत, त्यामुळे तो आवाज कसा होता याची आपल्याला कल्पना येऊ शकते. ते सुरेख शिट्टी वाजवीत. या शिट्टीची एक गंमत आहे. सत्यजित तरुण असताना त्यांचे त्यांच्या मामाच्या मुलीवर प्रेम बसले. ती त्यांच्या घरीच राहत असे. इतरांना कळू नये म्हणून हे दोघे जण अनेकदा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शिट्टीचा उपयोग करीत. सत्यजित यांचे कपडे अतिशय साधे असत. धोतर, शर्ट आणि पायांत चपला. एखाद्या खास कार्यक्रमाला जायचे असेल तरच ते कोटपँट घालीत. मात्र त्यांना खांद्यावर वेगवेगळ्या शाली घेणे फार आवडे. शालींचा मोठा साठा त्यांच्याजवळ होता. त्यांच्या खिशात नेहमीच भरपूर रुमाल असत. ते काही विचारात असले की स्वत:च्या नकळत खिशातून रुमाल काढून त्याचे टोक दातांनी चावत राहत. चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना तर राय यांचे विचार करणे व रुमाल चावणे सतत चालू असे, इतके की त्यांच्या पत्नी विजयाबाईंसाठी हे रुमाल सतत बदलून त्या जागी नवे रुमाल ठेवणे हे एक महत्त्वाचे कामच बनून गेले होते. 

साधी राहणी राय यांच्या स्वभावातच होती. त्यांचे नुकतेच नवे लग्न झाले होते त्या वेळी त्यांना व पत्नी विजयाला अनेक समारंभांची आमंत्रणे येत. अशा वेळी विजयाने किमती साडी नेसावी, खूप सारे दागिने घालावेत असे सत्यजितच्या आईला वाटे. सत्यजित यांचा या भपक्याला विरोध होता. सासूला मान देऊन विजयाबाई ते सारे अंगावर चढवीत. पण सत्यजित त्यांना लगेच चिडवू लागत. ‘‘तू नवरी मुलगी नाहीस तर ख्रिसमसचे झाड दिसते आहेस!’’ ते म्हणत, ‘‘मला असा दिखाऊपणा मुळीच आवडत नाही.’’ यावर त्यांची आई रागावून म्हणे, ‘‘तू गप्प बस. तुला काही समजत नाही. ती मी सांगेल तसेच करील.’’ 

या दिवसांत त्यांच्याकडे स्वत:ची कार नव्हती, त्यामुळे बरेच वेळा ते अशा कार्यक्रमासाठी टॅक्सी करून जात. टॅक्सीमध्ये बसल्यावर विजयाबाई आपल्या अंगावरील बरेचसे दागिने उतरवून पर्समध्ये ठेवत. मग म्हणत, ‘‘आता तुला कसे वाटते आहे?’’ 

सत्यजित हसून म्हणत, ‘‘आता माझी बायको शोभतेस. खरेच मला संपत्तीचे प्रदर्शन आवडत नाही.’’ कार्यक्रमानंतर घरी परत येताना पुन्हा सारे दागिने अंगावर चढविले जात. 

सत्यजितशी लग्न झाल्यावर त्यांच्या पत्नीच्या ध्यानात आले की आपला पती अतिशय साधा आहे व त्याचे घरातील लहानसहान गोष्टींत लक्षच नाही. आपल्याला काय हवे काय नाही याबद्दलही सत्यजित बेफिकीर असत. विजयाबाईंनी पाहिले, घरी स्नानासाठी एक रुपया पंचवीस पैसे किमतीचा गोदरेजचा स्वस्त साबण आणला जाई. त्यांना स्वत:ला यार्डले कंपनीचा महागाचा साबण आवडे. एके दिवशी त्यांनी सत्यजितना विचारले, ‘‘तुला हा गोदरेजचा साबण खरेच आवडतो का?’’ 

सत्यजितना या प्रश्नाचा रोखच समजला नाही. ते आश्चर्याने म्हणाले, ‘‘का? हा साबण चांगला नाही का?’’ 

‘‘तसे नाही, पण बाजारात यापेक्षा उत्तम दर्जाचे अनेक साबण उपलब्ध आहेत. मी जर ते आणले तर तुझी काही हरकत नाही ना?’’  

‘‘मी या गोष्टींचा कधी विचारच केला नाही, आई ज्या वस्तू आणते त्या मी वापरतो. तू तुझ्या आवडीच्या वस्तू आणायला हरकत नाही. तुझी इच्छा असेल तर मी त्या वापरीन.’’ 

तेव्हापासून सत्यजितसाठी अनेक वस्तू स्वत: आणण्याचे विजयाबाईंनी सुरू केले. 

घरातील लहानसहान गोष्टींबद्दलही रायना काही माहिती नसे. एकदा त्यांच्या खोलीतील टेबल लँपचा बल्ब शॉट झाला. त्यांनी लगेच नोकराला हाका मारण्यास सुरुवात केली. विजयाबाई त्यांचा आवाज ऐकून आल्या व त्यांनी तो बल्ब बदलून नवा लावला. पण तो चालू होईपर्यंत राय ‘‘आता काही भयंकर घडते की काय, अपघात होतो की काय’’ अशा नजरेने पाहत होते. सारे झाल्यावर ‘‘तुला हे कसे काय जमते?’’ असे त्यांनी विचारलेच! 

सत्यजित अतिशय खंबीर मनाचे होते, पण तितकेच ते हळवेदेखील होते. ‘गोपी ग्याने बाघा ब्याने’ या चित्रपटाचे काम करीत होते तेव्हा अचानक त्यांचा मुलगा संदीप खूप आजारी पडला. त्याचा ताप 103 अंशांपर्यंत, तर काही दिवसांनी 105 अंशांपर्यंत पोहोचला. डॉ. भीष्म यांनी त्याला तपासून तो टायफाईड असल्याचे सांगितले. या आजारावरचा औषधोपचार बरेच दिवस चालला. कधी ताप उतरल्यासारखा होई व पुन्हा चढू लागे. सत्यजित व विजयाबाई दोघेही त्यामुळे त्रस्त झाले. सत्यजित तर जास्तच. संदीपच्या प्रकृतीची सारी काळजी विजयाबाई घेत पण सत्यजित ते पाहूनच अस्वस्थ होत. विजयाबाईंनी नमूद करून ठेवले आहे की, अनेकदा सत्यजित आपल्या खोलीत एकटेच बसलेले असत व त्यांच्या डोळ्यांतून आसवे ओघळत असत. अशा वेळी विजयाबाई त्यांना धीर देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. 

मात्र रुग्ण म्हणून सत्यजित अतिशय आदर्श होते. डॉक्टरनी दिलेल्या सगळ्या सूचनांचे ते कटाक्षाने पालन करीत. या संदर्भात एक लहानशी खंतदेखील विजयाबाईंनी व्यक्त केली आहे. सत्यजित राय यांना सिगारेट पिण्याचे जबरदस्त व्यसन होते. या व्यसनाला डॉक्टरांनी वेळीच पायबंद घालायला हवा होता असे त्यांचे म्हणणे आहे. विजयाबाईंना वाटे, आपल्या नवऱ्याने स्वत:ला सतत कामात झोकून दिलेले असते. तो दारूच्या थेंबालाही स्पर्श करीत नाही. सिगारेट पिण्याची त्याला आवड आहे, तर उगीच तक्रार करू नये. सत्यजितच्या आई मात्र या बाबतीत नेहमी त्यांना रागवत. ‘‘तुझे आजोबा सिगारेट ओढत नसत, वडील ओढत नसत, मग तू का?’’ असे त्या त्यांना म्हणत. सत्यजित त्यांना उलट उत्तर देत नसत, किंवा त्यांच्या समोर सिगारेटला स्पर्श करीत नसत. पण त्यांची पाठ वळली की लगेच सत्यजितच्या तोंडात नवी सिगारेट येई. पुढे जेव्हा सत्यजितना उच्च रक्तदाबाचा विकार जडला तेव्हा विजयाबाईंनी त्यांना सिगारेट सोडण्याची अनेकदा विनंती केली. त्यांच्या बऱ्याच गोष्टी सत्यजित ऐकत, मात्र ही गोष्ट त्यांनी कधीच ऐकली नाही. उलट ते हसून म्हणत, ‘‘विन्स्टन चर्चिल अजून सिगार ओढतात, पी.जी. वुडहाऊस ओढतात. त्यांचे काय बिघडले आहे? पण त्यांना कोठे उच्च रक्तदाब होता? तू उगीच काळजी करतेस. मला काहीही होणार नाही.’’ सत्यजित दुसरी सिगारेट शिलगावत बेफिकीरपणे म्हणत. आत्मचरित्रात ही आठवण सांगून विजयाबाई लिहितात, ‘‘त्यांनी माझे ऐकले असते तर आज ते आमच्यातच राहिले असते.’’ पण अशा ‘जरतर’ला काहीच अर्थ नसतो. 

मुलगा संदीप मोठा झाला, सत्यजित यांच्या कामाचा व्यापही वाढला, मग जुने घर अपुरे पडू लागल्यावर विजयाबाईंच्या मनात नवीन घर किरायाने घेण्याचा विचार आला. त्यांची आर्थिक परिस्थिती घर विकत घेण्याजोगी नव्हती. शिवाय घर स्वत:चे असो की किरायाचे, राय यांच्या दृष्टीने फारसा फरक पडत नव्हता. अशा बाबतीत ते नेहमीच उदासीन असत. नवे घर किरायाने घ्यायचे ठरले तेव्हा जुन्या घराचे भाडे आपण किती भरतो व नव्या घराचे भाडे परवडेल किंवा नाही, याबद्दल त्यांना काहीच सांगता आले नव्हते. ही गोष्ट सेक्रेटरी ‘‘अनिलबाबूंना विचार,’’ असे त्यांनी पत्नीला सांगितले. लेखी करार, देणेघेणे या बाबतीत ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. शिवाय इतरांवर चटकन विश्वास टाकण्याचा त्यांचा स्वभाव होता. 

एके दिवशी विजयाबाईंच्या मैत्रिणीने त्यांना बिशप लेफ्रोय रोडवरील एक फ्लॅट लवकरच रिकामा होणार असल्याची बातमी दिली. विजयाबाई तो फ्लॅट पाहण्यासाठी गेल्या. फ्लॅट अतिशय सुरेख, ऐसपैस आणि प्रसन्न होता. हा फ्लॅट सत्यजितनादेखील आवडला. तो आवडण्याचे एक कारण म्हणजे हॉलची उंची खूपच होती. घराच्या अंतर्गत रचनेत फारसे लक्ष न घालणाऱ्या सत्यजित यांनी या हॉलची रचना अगदी आपल्या मनाप्रमाणे करून घेतली, त्याच्या खिडक्यांसाठी कापडदेखील त्यांनी  स्वत:च निवडून खरेदी केले. 

या बिल्डिंगमध्ये एका मजल्यावर तीन असे एकंदर नऊ फ्लॅट होते. राय यांच्या शेजारचा फ्लॅट रिकामा होता. उरलेल्या सातपैकी फक्त एकातच बंगाली कुटुंब राहत होते. बाकी साऱ्या फ्लॅट्‌समध्ये रशियन वकिलातीतील माणसे राहत. येथे राहावयास आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक चमत्कारिक प्रसंग घडला. त्या दिवशी संध्याकाळी विजयाबाई आपले काम आटोपून जेव्हा सत्यजित यांच्या खोलीत गेल्या तेव्हा ते उदास चेहऱ्याने खिडकीबाहेर पाहताना त्यांना दिसले. विजयाबाईंनी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तू मला कोठे आणून ठेवलेस? मला लहान मुलांचा आवाजदेखील ऐकू येत नाही, कुणी माणसेही येताना-जाताना दिसत नाहीत. हसणारा तर एकही चेहरा दिसत नाही. सगळे कसे शांत आणि निर्जीव आहे. नको. मला येथे राहावयाचे नाही. आपण परत आपल्या जुन्या घरी जाऊ या.’’ 

विजयाबाई चकित होऊन म्हणाल्या, ‘‘आता ते कसे शक्य आहे? आपण इकडे आलो म्हणून सौमित्रने (सौमित्र चटर्जी - राय यांच्या अनेक चित्रपटांचा नायक) आपला जुना फ्लॅट किरायाने घेतला व तो त्यात राहायला आलादेखील.’’ 

सत्यजित यांच्या दृष्टीने ही अडचण फार क्षुल्लक होती. ‘‘त्यात काय! मी सांगितले तर सौमित्र लगेच तो फ्लॅट रिकामा करून देईल. मला ‘तुझ्या’ या फ्लॅटमध्ये मुळीच राहावयाचे नाही.’’ 

‘‘अहो पण आपण इकडे येण्यासाठी किती खर्च केला आहे! आणि आता तुम्ही परत जायचे म्हणता. लोक हसतील ऐकल्यावर.’’ 

‘‘हसू दे. नव्या घरात आल्यावर लगेच दोन दिवसांत परत जाण्याचे रेकॉर्ड आपल्या नावे होईल. चल. आपण जाण्याची तयारी करू.’’ 

परत जाणे जवळजवळ अशक्य होते हे विजयाबाईंना माहीत होते. त्यांनी मोठ्या मुश्किलीने सत्यजितची समजूत घातली. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही काही दिवस येथे राहा, तरी तुम्हांला बरे वाटले नाही तर आपण दुसरी जागा बघू.’’

मात्र काही दिवसांनी सत्यजितना हीच जागा चांगली वाटू लागली व त्यांनी मग कधी जागा सोडण्याचा विषय काढला नाही. 

सत्यजितनी खरेदी केलेल्या खिडक्यांच्या पडद्यावरूनच एकदा मोठा मजेशीर प्रसंग घडला. या फ्लॅटमध्ये राहावयास आल्यानंतर विजयाबार्इंनी एके दिवशी शिंप्याला खिडक्यांची मापे घेण्यास घरी बोलावून घेतले. तो ज्या वेळी सत्यजित यांच्या खोलीत गेला तेव्हा त्यांनी आश्चर्याने विचारले की हा येथे का आला आहे? 

‘‘खिडक्यांना लावायच्या पडद्यांची मापे घेण्यासाठी.’’ 

‘‘त्याची काही आवश्यकता नाही.’’ राय अगदी सहज म्हणाले. 

‘‘म्हणजे? पडद्यांचा कपडा तुम्हीच आणलाय ना?’’ 

‘‘आणला खरा, पण या घरात आल्यावर आता मला उघड्या खिडक्याच चांगल्या वाटू लागल्या आहेत. त्यांना पडद्याने का झाकायचे?’’ 

‘‘पडदा काही खिडकी झाकण्यासाठीच नसतो. शिवाय आपण केव्हाही त्याला बाजूला सरकवू शकतो.’’

यावर काय युक्तिवाद करावा हे सत्यजितना कळेना. ते आपला मुद्दाच पुढे सारीत म्हणाले, ‘‘माझ्या खोलीविषयी इतकी चर्चा करण्याची गरज नाही. आणि इकडे येऊन पहा, खिडकीतून किती चांगले दृश्य दिसते आहे!’’ 

‘‘पण तुम्ही ते कापड विकत आणले आहे ना, त्याचे काय?’’ 

‘‘ते दुसऱ्या खोल्यांच्या खिडक्यांना लावू शकतेस.’’ 

‘‘मला वाटते, पडदे लावल्यामुळे तुमची खोली अधिक सुरेख दिसेल.’’ 

‘‘पण मला वाटते की पडद्यामुळे ती कोंदट बनेल. पडद्याशिवाय येथे किती मोकळे वाटते आहे.’’ 

आणखी चर्चा करण्यांत अर्थ नव्हता. सत्यजितची खोली विनापडद्याचीच राहिली. 

1970 च्या दशकात कोलकत्यात विद्युत पुरवठा अतिशय विस्कळीत व अनियमित झाला होता. शूटिंग करता करता मध्येच पॉवर कट होत असे व काम बंद ठेवावे लागे. यामुळे खर्चातही फार मोठी वाढ होई. रायना या गोष्टीचा त्रास होई, मात्र ते कसलीही चिडचिड न करता अतिशय शांतपणे तो सहन करीत. ‘‘ज्या गोष्टीवर आपला ताबा नाही त्या गोष्टीबद्दल चिडण्यात काय अर्थ आहे?’’ असे ते म्हणत. राय यांच्या मते आपला राग ताब्यात ठेवणे हे सुसंस्कृत माणसाचे महत्त्वाचे लक्षण आहे. राग हा स्वत:चेच मानसिक व शारीरिक स्वास्थ्य नष्ट करतो असे ते म्हणत. घरीदेखील ते कुणा नोकरावर कधी संतापले नाहीत. ‘‘संतापत होते मी, कारण त्यांना शिस्त लावणे आवश्यक होते ना.’’ विजयाबाई लिहितात. 

सत्यजितना नोकरांकडून बरीच कामे करवून घेणेही आवडत नसे. दाराची घंटी वाजली तर ते स्वत: उठून दार उघडीत. पाहुणा परत जाताना दारापर्यंत जाऊन त्याला निरोप देत. एकदा अमेरिकेहून डॉ. बसू हे राय यांच्या चित्रपटांचे अभ्यासक रायना भेटायला आले असता राय स्वत: दार उघडण्यासाठी आलेले त्यांनी पाहिले व त्यांना आश्चर्यच वाटले. कारण नुकताच राय यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला होता. बसू यांनी त्यानंतर एका मुलाखतीत या प्रसंगाचा आवर्जून उल्लेख केला. 

ऋत्विक घटक व राय यांच्यात अनेक मतभेद होते. घटकबद्दल रायच्या मनात अतिशय प्रेम होते व त्यांच्या कार्याविषयी आदरही होता. मात्र त्यांची जीवनशैली रायना पसंत नव्हती. घटक हे काही दिवसांपासून पी. जी. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांची प्रकृती खूप बिघडल्याचे कळल्यावर सत्यजित त्यांना भेटावयास गेले. राय यांच्या ध्यानात आले की ते आता काही दिवसांचेच सोबती आहेत. परत आल्यानंतर ते अतिशय उदास बनले होते. हॉस्पिटलमधून परत आल्यावर ते विजयाबाईंना म्हणाले, ‘‘एवढा गुणी माणूस! आपले आयुष्य त्याने स्वत:च उद्‌ध्वस्त केले आहे ही किती दु:खाची गोष्ट आहे.’’ 

राय यांचा रोख घटक यांच्या मद्यपानावर होता. ते स्वत: कधीच मद्य घेत नसत. मात्र इतरांनी प्रमाणात मद्य घेण्यास त्यांची हरकत नसे. आउटडोर शूटिंगसाठी परगावी गेले असताना कामे आटोपल्यावर युनिटमधील सदस्यांनी माफक मद्यपान करण्यास त्यांची हरकत नसे. अर्थात सकाळी सांगितलेल्या वेळेला प्रत्येकाने हजर असणे आवश्यक असे! या संदर्भात राय यांचे व्यक्तिगत छायाचित्रकार नेमाई घोष यांनी एक आठवण लिहून ठेवली आहे. ‘सोनार केला’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी रायबरोबर घोषदेखील राजस्थानला गेले होते. एका डाकबंगल्यात सारे युनिट थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला शूटिंग सुरू करावयाचे होते. घोषनी पाहिले, सकाळी साडे पाचच्या आत राय तयार वगैरे होऊन, बाकीचे लोक कधी उठतात याची वाट पाहत व्हरांड्यात फेऱ्या मारीत होते! 

राय नेहमी म्हणत की, जीवन ही माणसाला मिळालेली सर्वांत महत्त्वाची भेट आहे. जीवनाचा कालावधी मर्यादित आहे म्हणून प्रत्येकाने या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. माणसे वेळ वाया घालविताना दिसली की त्यांना राग येई. ते स्वत:ही याच पद्धतीने वागत. घरी असले तरी एक क्षणही ते निवांत बसून राहत नसत. त्यांचे लेखन किंवा आवडीच्या विषयावरील पुस्तकांचे वाचन चालू असे. वाचनातील किंवा कामातील त्यांची एकाग्रता अगदी अद्भुत अशी होती. अनेकदा बैठकीच्या खोलीत बरीच माणसे जमा झालेली असत. त्यांच्या गप्पा, हसणे-बोलणे चालू असताना सत्यजित मात्र आपल्या खुर्चीत बसून लेखन किंवा रेखाटन करण्यात दंग असत. हे कसे जमते असे विजयाबाईंनी विचारल्यावर एकदा ते म्हणाले, एकाच वेळी दोन तीन कामे करण्याची मी स्वत:ला सवय लावून घेतली आहे. 

संगीत ऐकणे त्यांना फार आवडे, पण ते ऐकत असताना देखील त्यांच्या मनात आपल्या चित्रपटासाठीच्या संगीतरचनांचे विचार घोळत असत. विजयाबाईंनी लिहिले आहे की सत्यजित राय यांनी आयुष्यात कधीही ‘आता मी थकलो आहे’ किंवा ‘मी थोडी विश्रांती घेतो’ असे म्हटलेले नाही. 

राय यांचे काम अतिशय शिस्तबद्ध होते. शूटिंग सुरू होण्याआधी त्यांच्याजवळ असलेल्या ‘रेड बुक’मध्ये त्यांचे ‘शॉट डिव्हिजन’ तयार असे. ते अत्यंत वक्तशीर होते. ‘जन अरण्य’मध्ये काम करताना सुहासिनी मुळ्ये त्यांची पाचवी असिस्टंंट होती. मी सत्यजित राय यांच्या संदर्भात तिची मुलाखत घेतली तेव्हा ती म्हणाली, ‘‘एकदा सकाळी सहा वाजता शूटिंग होते. तर राय साडेपाच वाजता सेटवर हजर होते. या सीनमध्ये उत्पल दत्तदेखील होते. शॉट संपल्यावर उत्पल दत्त सुहासिनीला म्हणाले की, सत्यजित राय आणि मृणाल सेन यांना सोडून कुठल्याही दिग्दर्शकाने मला सकाळी सहा वाजता या असे सांगितले असते तर मी सातशिवाय तेथे पोहोचलो नसतो. कारण मला माहीत आहे की सहाला तेथे कोणीच नसणार. पण रायच्या बाबतीत मला साडेपाचला येणे भाग आहे, कारण मला हेही ठाऊक आहे की राय सहाला कॅमेरा सुरू करतील.’’ 

एकदा राय व विजयाबाई व्हेनिसला गेले होते. या भेटीसंदर्भात विजयाबाईंनी सांगितलेली एक आठवण राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक खास पैलू दर्शविणारी आहे. एके दिवशी विजयाबाई एकट्याच काही खरेदीसाठी बाजारात गेल्या होत्या. राय महोत्सवाचे ज्युरी असल्यामुळे ते कामात व्यस्त होते, त्यामुळे अर्थातच ते पत्नीसोबत गेले नाहीत. परत आल्यावर विजयाबाईंनी विकत आणलेले दोन सुंदर पेपरवेट त्यांना दाखविले. सहसा राय अशा खरेदीत रस दाखवीत नसत. मात्र त्या वेळी त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्या पेपरवेटकडे काही वेळ निरखून पाहत ते म्हणाले, ‘‘छान आहेत. एखाद्या चित्रपटात त्यांना वापरता येईल!’’ राय हे असे सिनेमात आकंठ बुडालेले कलावंत होते. सत्यजित यांचे मन एखाद्या बालकासारखे निर्व्याज होते. 

काठमांडू हे राय यांच्या अत्यंत आवडीचे ठिकाण. अधून मधून तेथे जाऊन काही दिवस राहायला त्यांना आवडे, पण कामाच्या व्यापात असे फुरसतीचे क्षण कधीतरीच येत. काठमांडू येथे गेल्यानंतर तेथील कसिनोमध्ये जाऊन ‘स्लॉट मशीन’वर जुगार खेळणे हा राय यांचा आवडता छंद होता. त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाशी ही आवड अतिशय विसंगत अशी होती. कदाचित नेहमीच्या गंभीर विचारांतून, चिंतनातून विरंगुळा म्हणून ते हा खेळ खेळत असावेत. ते स्वत:जवळ कधीच पैसे बाळगत नसत. विजयाबाई बाजारात जाताना ते त्यांच्याकडून काही रक्कम मागून घेत व कसिनोमध्ये जाऊन खेळत. बार्इंनी लिहिले आहे, ‘‘ते  बहुतेक वेळा हरत, पण कधी नशिबाने जिंकले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असे.’’ 

बालकासारखे निर्व्याज मन असल्यामुळे राय यांचे लहान मुलांशी खूप छान जमे. त्यांच्या चित्रपटात बाल कलावंतांनी जो अप्रतिम अभिनय केला आहे त्याचे कारण त्यांचे मुलांशी चटकन जुळणारे नाते होते. ‘पथेर पांचाली’मधील सुबीर बानर्जी, ‘पोस्टमास्तर’मधील चंदना बानर्जी, ‘सोनार केला’मधील कुशल चक्रवर्ती अशा अनेक बाल कलाकारांनी त्यांच्या सिनेमात अप्रतिम अभिनय केला आहे. आणि यांपैकी बहुतेकांना सिनेमा काय हेदेखील माहीत नव्हते. 

पारितोषिके, मानसन्मान अशा गोष्टींचे रायना मुळीच आकर्षण नव्हते. बर्लिन महोत्सवात ‘अशानी संकेत’ला ‘Best Picture Award' मिळाले. हे ॲवॉर्ड सहसा चित्रपटाच्या निर्मात्याला देण्याचा प्रघात आहे. मात्र महोत्सवाच्या समितीने हे ॲवॉर्ड राय यांनी स्वीकारावे आणि लहानसे भाषणदेखील करावे असा आग्रह धरला. राय यांना हे मान्य नव्हते, पण महोत्सव समितीने तसे जाहीरही करून टाकले. शेवटी रायना ते मान्य करावेच लागले. त्यांनी निर्मात्याना समितीचा निर्णय कळविला तेव्हा ते अतिशय नाराज झाले. अर्थात भाषण करता येणे शक्य नसल्यामुळे त्यांना आपला हट्ट सोडून द्यावा लागला. 

मात्र निर्माते भट्टाचार्य यांच्या मनात ही गोष्ट सलत राहिली. भारतात आल्यावर त्यांनी एक युक्ती केली. एके दिवशी ते सत्यजित राय यांच्या घरी आले व म्हणाले, ‘‘आपल्या चित्रपटाला मिळालेले ॲवॉर्ड पाहण्याची माझ्या आईची फार इच्छा आहे. मला ते द्या, मी तिला दाखवून परत आणून देतो.’’ 

भट्टाचार्य ॲवॉर्ड घेऊन गेले आणि त्यानंतर त्यांनी ते परत केलेच नाही! विजयाबाईंनी सत्यजितना ते ॲवॉर्ड परत मागून घेण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले, ‘‘ते ॲवॉर्ड निर्मात्यालाच मिळते. त्याने ते नेले याबद्दल माझी काही तक्रार नाही. मी ते परत मागणार नाही.’’ 

‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटासाठी काही ॲनिमेशनचे काम करावयाचे होते. ते काम कोलकत्याला होत नव्हते म्हणून ते करण्यासाठी सत्यजित राय मुंबईला आले होते तेव्हाची गोष्ट. ‘माधुरी’ या सिनेपाक्षिकाचे एक वार्ताहर राकेश माथुर त्यांची मुलाखत घेण्यासाठी राय उतरलेल्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये गेले. माथुर एका फोटोग्राफरला घेऊन तेथे पोहोचले, तेव्हा राय काही चित्रे काढीत होते. रायनी उठून त्यांच्यासाठी दार उघडले व त्यांना आत बोलावले. मात्र या गडबडीत त्यांनी आपल्या पेनचे टोपण न लावताच तो पेन खिशात ठेवला. एक-दोन मिनिटांतच पेनमधून शाई बाहेर येऊ लागली व तिचा डाग शर्टच्या खिशावर दिसू लागला. तो पाहताच फोटोग्राफरने चटकन त्यांचा तशा अवस्थेतला फोटो घेतला. त्याला वाटले की सत्यजित हा फोटो छापू नका असे म्हणतील. पण त्यांनी काही हरकत घेतली नाही. पुढे हा फोटो ‘माधुरी’मध्ये प्रकाशित झाला व खूप गाजला. 

राय मद्य घेत नसत. मात्र आपल्या युनिटमधील माणसांनी काम आटोपल्यावर, मद्य घेण्यास त्यांची ना नसे. जानेवारी 1989 मध्ये फ्रेंच सरकारने सत्यजित राय यांना Legion of Honour हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्याचे ठरविले. राय आजारी होते म्हणून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वत: कोलकत्याला येऊन तो रायना देण्याचे मान्य केले. नॅशनल लायब्ररीच्या गार्डनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांपैकी अनेकांसाठी कार्यक्रमानंतरच्या अल्पोपाहाराचे मुख्य आकर्षण फ्रेंच वाईन हे होते. मात्र राय यांनी नम्रपणे वाईन घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘‘मला एखादे शीतपेय द्या, किंवा पाणीही चालेल.’’ 

सत्यजितना हार्ट ॲटॅक आल्यावर डॉक्टरनी प्रथम सिगारेट ओढण्यावर बंधने घातली तेव्हा ते फार बेचैन झाले. त्यांनी बरीच विनंती केल्यावर त्यांना दिवसातून दोन-तीन वेळा पाईप ओढण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली. त्यांना गोड खाणेही खूप आवडत असे. पण त्यावरही बंधने आली. या सुमारास रायना ऑस्कर मिळाले. ‘‘आता ऑस्कर तर मिळाले आहे, यानंतर काय हवे,’’ असे अभिनेता तपन चटर्जीने विचारल्यावर ते हसून म्हणाले, ‘‘मला गूळ घातलेला थोडा संदेश हवा.’’ 

सार्वजनिक जीवनात राय अतिशय सचोटीने वागत. माणूस म्हणून जगताना जी मूल्ये मनोमन स्वीकारली ती आचरणात आणण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. सुरुवातीच्या काही चित्रपटांनंतर ते आपल्या प्रत्येक चित्रपटाला स्वत:च संगीत देत. मात्र ते निर्मात्यांकडून फक्त दिग्दर्शनासाठी ठरलेली रक्कम घेत. संगीतासाठी वेळ व श्रम खर्चूनही वेगळी रक्कम त्यांनी कधीच मागितली नाही. सत्यजित यांना हार्ट ॲटॅक आल्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करावी लागेल असे डॉक्टरांचे मत पडले. मात्र अमेरिकेला जाण्यायेण्याचा व सर्जरीचा खर्च राय यांच्या आवाक्याबाहेरचा होता. ते मोठे दिग्दर्शक असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती साधारणच होती. इतकी की जन्मभर त्यांना स्वत:साठी बंगला विकत घेता आला नाही. राय कुटुंबासमोर प्रश्न पडला. सुदैवाने बंगाल सरकारने त्यांच्या उपचाराचा खर्च करण्याची तयारी दाखविली. सत्यजितनी डॉक्टरना विचारून खर्चाचा अंदाज संबंधित मंत्रालयाला कळविला व त्यांना ती रक्कम देण्यात आली. त्याप्रमाणे अमेरिकेत त्यांचे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले. 

सत्यजितनी संदीपला ऑपरेशनच्या खर्चाचा काटेकोर हिशोब लिहून ठेवण्यास सांगितले होते. परत आल्यावर त्यांना दिसले की सरकारने दिलेल्या रकमेतील काही रक्कम शिल्लक आहे. त्यांनी ती रक्कम सरकारला परत करण्यास मुलाला सांगितले. तो म्हणाला, ‘‘ऑपरेशन जरी झाले असले तरी अजून काही महिने औषधे घ्यावी लागतील, उपचार घ्यावे लागतील.’’ 

सत्यजित म्हणाले, ‘‘तो खर्च सरकारने का करावा?’’ त्यांनी ती रक्कम आपण परत करीत आहो असे मंत्रालयाला कळविले. राय हे अत्यंत आशावादी होते. ‘आगंतुक’ चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर, प्रकृती अत्यंत खालावलेली असतानाही ते विजयाबार्इंना म्हणाले, ‘‘एक नवी सुरेख कल्पना माझ्या मनात आली आहे. तिच्यावर एक उत्कष्ट चित्रपट बनू शकेल.’’ 

पण हा चित्रपट बनावा अशी ‘त्या सर्वोच्च दिग्दर्शकाची’ इच्छा नव्हती. काही दिवसांनीच सत्यजित राय यांची प्रकृती झपाट्याने ढासळत गेली. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर मधूनच बेहोशीत ते बडबडायचे, ‘‘चला, चला, शॉट घ्यायचा आहे. लाईट, कॅमेरा, साउंड..’’ अखेर 23 एप्रिल 1992 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘पथेर पांचाली’पासून सुरू झालेली सत्यजित यांची शोधयात्रा ‘आगंतुक’पाशी येऊन थांबली. 

आता ही आपली शोधयात्रा बनली आहे. 

Tags: सिनेमा सत्यजीत राय कला दिग्दर्शक चित्रपट भारतीय चित्रपट वृत्तचित्र संस्कृती विजय पाडळकर सत्यजित राय satyajeet ray films vijay padalkar t cinema bhartiy chitrapa bhartiy cinema satyajeet ray national film archive films indian cinema satyajit ray and indian cinema sadhana issue on satyajit ray satyajit ray weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


Comments

  1. BHAKTI SHIVAJI PTALEWAD- 01 May 2021

    जीवन ही माणसाला मिळालेली सर्वात महत्त्वाची भेट आहे. खुपच शिकायला मिळाले. धन्यवाद!

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके