डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सत्यजित राय : धर्मविचार आणि सामाजिक बांधिलकी

राय हे कट्टरपंथीय नव्हते, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्यावर लहानपणापासून समतोल विचारांचे संस्कार झाले होते. त्यांनी पाश्चात्त्य विचारधारांचा अभ्यास केला होता व त्यांतील काही गोष्टींचा त्यांच्यावर प्रभावदेखील होता. तसेच शांतिनिकेतनमध्ये काही काळ राहिल्यामुळे पौर्वात्य तत्त्वज्ञान व कला यांचाही. त्यांच्यावर टागोरांच्या विचारांचाही मोठा प्रभाव होता. पूर्व व पश्चिम यांना जोडणारा तेदेखील एक पूल होते.  

सत्यजित राय हे तीन वर्षांचे असतानाच त्यांचे वडील सुकुमार राय मरण पावले. सत्यजितचे बालपण मोठ्या संयुक्त कुटुंबात गेले. आजोबा उपेंद्रकिशोर राय यांना तीन भाऊ होते. या चौघा भावांपैकी दोघे जण ब्राह्मो समाजाचे सदस्य बनले होते आणि दोघे जण हिंदू रीतिरिवाजांचे काटेकोर पालन करीत. सत्यजितचे वडील ब्राह्मो समाजी होते. त्यांच्या घरात ब्राह्मोसमाजी प्रार्थना होत. शेजारच्या हिंदू घरांतील स्त्रिया त्यांच्या भांगात सिंदूर भरत, त्यांच्या देवघरातून शंख आणि घंटांचा आवाज ऐकू येत असे. पूजा झाल्यावर त्या घरातील स्त्रिया सत्यजितलादेखील प्रसाद देत व तो आनंदाने त्याचे ग्रहण करीत असे. मात्र त्याच्या घरात अशी पूजाअर्चा होत नसे. उपासना पद्धतीतील हा फरक दोन्ही घरांनी आपल्यापुरताच मर्यादित ठेवला होता. या बदलामुळे त्यांच्यात कसलाही दुजाभाव निर्माण झालेला नव्हता. या शिकवणुकीचा सत्यजितच्या मनावर खोलवर परिणाम झाला, मोठेपणी तो कधीच कट्टरपंथीय बनला नाही. आपली मते कायम ठेवून इतरांच्या मतांचा आदर करणे हा त्याचा स्वभाव बनला. लहान्या सत्यजितला हिंदू घरातील सणांचे उत्सवी स्वरूप फार आकर्षित करून घेत असे. त्याच्या घरात फक्त माघोत्सव हा वार्षिक उत्सव साजरा केला जाई, परंतु तोदेखील अत्यंत साधेपणाने. दुर्गापूजा आणि कालीपूजासारख्या हिंदू सणांत जो सण साजरा करण्याचा उत्साह असे, जो आनंदध्वनीतून, एकत्र येण्यांतून, गाण्या-बजावण्यातून व्यक्त केला जाई तो सत्यजितला अधिक आवडे.

खूप वर्षांनंतर 1982 मध्ये एका मुलाखतीत रायना विचारण्यात आले की त्यांच्या चित्रपटांतून नेहमी घेतली जाणारी एक नैतिक भूमिका त्यांच्या ब्राह्मो असण्यामुळे तयार झाली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘मला तसे वाटत नाही. मी ब्राह्मो आहे म्हणजे नेमके काय आहे हेही मला ठाऊक नाही. वयाच्या 14-15 व्या वर्षी मी ब्राह्मो समाजाच्या सभांना वगैरे जाणे बंद केले. माझा संघटित धर्मावर विश्वास नाही.’’

राय हे कट्टरपंथीय नव्हते, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्यावर लहानपणापासून समतोल विचारांचे संस्कार झाले होते. त्यांनी पाश्चात्त्य विचारधारांचा अभ्यास केला होता व त्यांतील काही गोष्टींचा त्यांच्यावर प्रभावदेखील होता. तसेच शांतिनिकेतनमध्ये काही काळ राहिल्यामुळे पौर्वात्य तत्त्वज्ञान व कला यांचाही. त्यांच्यावर टागोरांच्या विचारांचाही मोठा प्रभाव होता. पूर्व व पश्चिम यांना जोडणारा तेदेखील एक पूल होते. वयाच्या पस्तिशीनंतर ते जेव्हा देशाच्या भूतकाळाचा अभ्यास करू लागले तेव्हा आपल्या समृद्ध परंपरांचाही त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. विशेषत: वेद आणि उपनिषदे यांच्यातील तत्त्वचिंतन आजही मार्गदर्शक आहे असे त्यांचे मत होते. ‘Sight and Sound' या मासिकाला 1970 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राय म्हणाले, ‘‘माणसानेच परमेश्वराला जन्म दिला आहे असे माझे मत आहे. पण मी मागे, मागे जात विश्वाच्या प्रारंभापाशी जाऊ पाहतो तेव्हा माझ्या ध्यानात येते की विश्वनिर्मितीचे गूढ अजून कायम आहे. मात्र देव ही विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे असे मला वाटत नाही. तिची काही आवश्यकतादेखील नाही. सध्याच्या काळात विज्ञान देत असलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे अधिक गरजेचे आहे.’’

तुम्ही नियतीवादी आहात काय, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘नाही. मी आशावादी आहे. पण भारत देशाच्या संदर्भात मी काहीसा निराशावादी व नियतीवादी बनलो आहे. मी काय करू शकतो? सारेच राजकीय पक्ष अपेक्षाभंग करणारे ठरले आहेत व आज एकही नेता असा नाही ज्याच्याकडे आशेने पाहता येईल. सर्वत्र भ्रष्टाचार माजला आहे. सारीकडे अकर्मण्यता व मूल्यहीनता पसरली आहे....म्हणून मी मला माझ्या कामात गुंतवून ठेवतो.’’

तरुणपणी राय यांना साम्यवादी विचारसरणीचे आकर्षण होते व त्यांचे अनेक मित्र याच विचारसरणीने भारावलेले होते. पण हळूहळू त्यांचा भ्रमनिरास होत गेला. त्यांनी म्हटले आहे, ‘‘राजकारणापासून मी अलिप्त कधीच नव्हतो, पण मी अद्याप त्याचे चित्रण केले नव्हते. कारण भारतातील राजकारण हे अतिशय अस्थिर आहे. येथे राजकीय पक्ष फार चटकन फुटतात. सध्या भारतात तीन कम्युनिस्ट पक्ष आहेत. हे का ते मला समजत नाही....माओने केलेल्या क्रांतीचे महत्त्व मला मान्य आहे. पण मी चीनमध्ये जाऊन राहण्यास तयार नाही. कारण मी प्रथमत: व्यक्तिवादी आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर माझा ठाम विश्वास आहे. शिवाय मी पूर्वापार चालत आलेल्या काही शाश्वत मूल्यांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे.’’

या संदर्भात ते पुढे म्हणाले, ‘‘माझे अनेक मित्र राजकीयदृष्ट्या अतिशय कार्यरत व सोविएत रशियाला पाठिंबा देणारे होते. पण मी पाहतो, आता ते मोठे उद्योगपती, धनवान बनले आहेत. आपल्या या बदलाचे ते समर्थनदेखील करतात.’’

हा दुटप्पीपणा राय यांना आवडत नसे. भारतात कम्युनिस्टप्रणीत क्रांती कधी होईल का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘बनारसला जा, घाटावर जाऊन पहा आणि तुमच्या ध्यानात येईल की कम्युनिझम येथून लक्षावधी मैल दूर आहे. कदाचित चंद्रावर असेल.’’

राय हे चळवळीत भाग घेत नाहीत याचा कट्टर साम्यवादी मंडळींना राग होता. सत्यजित राय साम्यवादी विचारांकडे सहानुभूतीने व जवळिकेने पाहत असले तरी हिंसेच्या मार्गावर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. ‘माणिक- सत्यजित यांचे टोपणनाव हा व्यक्तिवादी होता व म्हणून तो कम्युनिस्ट बनणे शक्य नव्हते’ असे राय यांच्या चुलत बहिणीने म्हटले आहे. त्यांची पहिली श्रद्धा कलेवर व माणसावर होती. एखाद्या चळवळीत हिरीरीने भाग घेणे, कुठल्या मोर्चात सहभागी होणे त्यांच्या स्वभावात नव्हते.

साम्यवादी मंडळींचा रायवरील राग कोणत्या थराला गेला होता ते दर्शविणारा एक प्रसंग 1974 मध्ये घडला. राय यांचा मुलगा संदीप कॉलेजची परीक्षा देत होता. त्याने पेपर अर्धा सोडविला असेल, तेवढ्यात खालच्या बाजूने मोठ्या आवाजात गलका ऐकू आला. पाठोपाठ अनेक विद्यार्थी आरडाओरडा करीत हॉलमध्ये घुसले. ते घोषणा देत होते, ‘‘आम्ही परीक्षा देणार नाही, दुसऱ्यालाही देऊ देणार नाही.’’ त्यांनी काही मुलांच्या हातातील उत्तरपत्रिका हिसकावून घेतल्या व फाडून टाकल्या. ते ओरडत होते, ‘‘शांतपणे बसून राहा, हललात तर मेलात म्हणून समजा.’’ एकजण संदीपजवळ आला व त्याची उत्तरपत्रिका फाडून टाकत तो म्हणाला, ‘‘तुझी परीक्षा संपली. आता घरी जा.’’ संदीप घरी येत होता त्या वेळी एका घोळक्याने त्याला घेरले. ती मुले बहुतेक त्याला ओळखत होती. कारण एक जण म्हणाला. ‘‘हा सत्यजित रायचा पोरगा परीक्षा कसा देतो ते आम्ही बघतोच.’’ त्यापैकी दोघांच्या हातात चाकूदेखील होते. संदीप प्रचंड घाबरला. सुदैवाने त्याला ओळखणारा एक गृहस्थ शेजारून कारमध्ये जात होता. त्याने संदीपला पाहिले, तो उतरून खाली आला व त्याने त्या मुलांना हाकलून लावले.

सत्यजित राय हे सक्रिय राजकारणात भाग घेत नाहीत, याबद्दल कोलकत्याच्या कट्टर मार्क्सवादी गटामध्ये नाराजी होती. पक्षात नव्याने घुसलेल्या तरुण पोरांना तेवढेच माहीत होते. त्यामुळे राय यांचा मुलगा दिसताच बापावरचा राग त्यांनी मुलावर काढला. मात्र राय यांनी त्याबद्दल कधीच चळवळीवर राग धरला नाही. जेव्हा पोलिसांनी उत्पल दत्त यांना नक्षलवादी चळवळीचे म्हणून पकडले तेव्हा रायनी इंदिरा गांधींकडे त्यांची रदबदली करून त्यांची सुटका केली होती.

सामाजिक बांधिलकीचा जो पुस्तकी अर्थ लावला जातो तो राय यांना मान्य नव्हता. आपल्या साम्यवादी मित्रांबद्दल राय एकदा म्हणाले, ‘‘माझ्यावर ते टीका करतात की माझ्यात सामाजिक बांधिलकी नाही. बांधिलकी कशाशी? मी माणूस-प्राण्याशी बांधील आहे, माझ्या तत्त्वांशी बांधील आहे. आणि मला वाटते ते पुरेसे आहे.’’

कलावंताला एक वेगळी बांधिलकी असतेच असे त्यांचे मत होते. अर्थात तो जर समाजापासून तुटून राहत नसेल तर. ते म्हणत,‘‘पण मी कलावंत आहे, ‘प्रचारक’ नाही. सामाजिक प्रश्नांना अंतिम उत्तरे कुणीही देऊ शकेल असे मला वाटत नाही. आणि ते आवश्यकही नाही.’’

राय यांचे हे विचार आजच्या काळातदेखील मार्गदर्शक ठरणारे आहेत.

Tags: सिनेमा सत्यजीत राय कला दिग्दर्शक चित्रपट भारतीय चित्रपट वृत्तचित्र संस्कृती विजय पाडळकर सत्यजित राय satyajeet ray films vijay padalkar t cinema bhartiy chitrapa bhartiy cinema satyajeet ray national film archive films indian cinema satyajit ray and indian cinema sadhana issue on satyajit ray satyajit ray weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके