डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाहिलेच पाहिजेत असे सत्यजित राय यांचे 10 चित्रपट

सत्यजित राय यांनी त्यांच्या सुमारे 35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत एकंदर चौतीस चित्रपट, दोन लघुपट आणि पाच वृत्तचित्रे अशी विपुल चित्रसंपदा निर्माण केली. यांपैकी एक-दोन चित्रपटांचा अपवाद वगळता बाकी साऱ्या कलाकृतींवर त्यांची ठळक अशी मुद्रा उमटलेली आहे व त्या आजदेखील पाहाव्याशा, अभ्यासाव्याशा वाटतात.  

सत्यजित राय यांनी त्यांच्या सुमारे 35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत एकंदर चौतीस चित्रपट, दोन लघुपट आणि पाच वृत्तचित्रे अशी विपुल चित्रसंपदा निर्माण केली. यांपैकी एक-दोन चित्रपटांचा अपवाद वगळता बाकी साऱ्या कलाकृतींवर त्यांची ठळक अशी मुद्रा उमटलेली आहे व त्या आजदेखील पाहाव्याशा, अभ्यासाव्याशा वाटतात. मात्र राय यांच्या संदर्भात एक गोष्ट विषादाने नमूद करावी लागते ती म्हणजे, भारतातदेखील ते एक महान दिग्दर्शक आहेत एवढीच त्यांच्याविषयी माहिती- अगदी सुशिक्षित, सुसंस्कृत माणसालादेखील, असते. फार तर त्यांच्या, नेहमी घेतल्या जाणाऱ्या चार-पाच चित्रपटांची नावे बहुसंख्य रसिक सांगू शकतात. मात्र त्यांचे महत्त्वाचे चित्रपट पाहिले व आस्वादले असणारी मंडळी फारच थोडी आहेत. याची कारणे अनेक आहेत. त्या तपशिलात येथे पडण्याचे कारण नसले तरी ही उदासीनता निश्चितच विषण्ण करणारी आहे. आपल्या देशाचे भूषण असलेल्या कलावंताला आपण सहसा मोठे नागरी सन्मान देतो व नंतर त्याचे कार्य विसरून जातो. या वर्षी राय यांची जन्मशताब्दी साजरी होत असताना या गोष्टीकडे रसिकांचे लक्ष वेधणे मला गरजेचे वाटते. ‘या वर्षात तरी राय यांचे किमान काही चित्रपट मी मिळवून पाहीन,’ असा संकल्प प्रत्येक सिनेरसिकाने केला तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

हा हेतू मनात ठेवून मी राय यांच्या दहा महान चित्रपटांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. हे चित्रपट राय यांच्या सिनेविश्वाचे प्रतिनिधित्व करतात अशी माझी धारणा आहे. अर्थात अशा प्रकारच्या याद्या जेव्हा केल्या जातात तेव्हा त्या पूर्णपणे सर्वमान्य होतील असे सहसा शक्य नसते. या ठिकाणी मतभेदांना नेहमीच वाव असतो. अमुक एक चित्रपट का घेतला नाही किंवा अमुक एक चित्रपट का घेतला असे आक्षेप घेतले जाऊ शकतात. सर्वांचे समाधान करणे अशक्य असते. 

1. पथेर पांचाली (1955) 

सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा अग्रपूजेचा मान त्यांच्या पहिल्या ‘पथेर पांचाली’ या चित्रपटास द्यावा लागतो. हा एक असामान्य बोलपट तर आहेच; पण एका अभूतपूर्व वाटचालीचे ते पहिले दमदार पाऊल आहे. राय यांच्यानंतरच्या पिढीतील श्रेष्ठ दिग्दर्शक अदूर गोपाल कृष्णन या चित्रपटाबद्दल लिहितात, ‘‘ ‘पथेर पांचाली’ ही खऱ्या अर्थाने भारतीय सिनेमाची सुरुवात होती. आम्हां सर्वांची ती सुरुवात होती. आज भारतीय सिनेमाचा अभ्यास करताना त्याचे विभाजन दोन खंडांत करावे लागते-‘पथेर पांचाली’पूर्वीचा सिनेमा आणि ‘पथेर पांचाली’नंतरचा सिनेमा.’’ तर मृणाल सेन यांनी या चित्रपटासंदर्भात लिहिले, ‘‘ ‘पथेर पांचाली’सोबत भारतीय सिनेमा वयात आला.’’ 

विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या ‘पथेर पांचाली’ या कादंबरीवर राय यांनी हा चित्रपट निर्माण केला. बंगालमधील एका लहानशा खेड्यात राहणाऱ्या काही गरीब माणसांच्या जीवनातील एका कालखंडाची ही कहाणी. हरिहर नावाचा भिक्षुक, त्याची पत्नी सर्वजया, मुलगी दुर्गा, धाकटा मुलगा अपू आणि त्यांच्याकडे राहणारी एक दूरची नातेवाईक इन्दिर आत्या ही प्रमुख पात्रे. या सामान्य माणसांची सुखदु:खे, त्यांचे रागलोभ, त्यांची छोटी छोटी स्वप्ने, यांची कहाणी आपल्यासमोर उलगडत जाते. एक मुलगी झाडाखालचे आंबे वेचते, एक वृद्धा अधाशीपणे कटोरीतला मूठभर भात खाते, बहीणभाऊ वाऱ्याच्या तालावर डुलणाऱ्या गवतातून आगगाडीच्या मागे धावतात, कुणी एकाकी रानात आपली जीवनयात्रा संपविते तर एक मुलगी आपल्या आईच्या कुशीत आपला शेवटचा श्वास घेते. उद्‌ध्वस्त घराच्या विटांतून एक साप वळवळत फिरतो, काही माणसे भविष्याच्या दिशेने निघालेली असतात. 

आपण जे पाहत असतो ते आपल्याला जीवनाच्या अधिक जवळ घेऊन जाते. एकाच वेळी आत कुठेतरी व्याकूळ करते आणि आनंदही देते. दु:ख आणि सुख यांचे मूळ एकच असते, हे पटविते. 

सत्यजित राय यांनी लिहिले आहे, ‘‘एक गोष्ट निश्चित- चित्रपट बनविल्यानंतर मी व्यक्ती म्हणून अधिक चांगला बनलो आहे.’’ ‘पथेर पांचाली’ पाहिल्यावर आपणही निश्चितपणे चांगली व्यक्ती होण्याकडे वळतो. 

राय यांच्या कार्याची ओळख करून घेण्यासाठी हा चित्रपट प्रथम पाहावा. कारण हा चित्रपट पाहिल्यावर आपल्या मनावर ‘व्यावसायिक चित्रपटा’ची जी धूळ साचलेली असते ती पुसून जाण्यास सुरुवात होते. आणि आपली कलात्मक चित्रपट पाहण्याची मनोभूमिका तयार होते. ‘पथेर पांचाली’ आवडला नाही असे म्हणणारा कुणी मला अजून भेटला नाही, पण जर कुणी असेल तर त्याने पुढे सत्यजित राय यांच्या सिनेमाच्या वाटेला जाऊ नये. 

2. अपराजितो (1956) 

विभूतिभूषण बंदोपाध्याय यांनी ‘अपू’ या पात्राभोवती दोन कादंबऱ्या लिहिल्या. ‘पथेर पांचाली’ व ‘अपराजितो’. ‘पथेर पांचाली’ चित्रपटाला लोकप्रियता व कलात्मक यश मिळाल्यावर राय यांनी तीच कथा पुढे नेणाऱ्या या दोन कादंबऱ्यांतील भागावर लक्ष केंद्रित केले. ‘पथेर पांचाली’मध्ये हरिहरची मोठी मुलगी दुर्गा हिचा मृत्यू झाल्यावर तो आपली पत्नी व मुलासह गाव सोडून बनारसला जायला निघतो. पुढील भागात आपल्याला संपूर्णपणे वेगळे वातावरण दिसते. बनारसच्या चिंचोळ्या  गल्ल्या, गंगेचे विशाल पात्र, प्रचंड मोठे दगडी घाट, त्यांवर गर्दी करणारी माणसे व पाखरे...हरिहर येथे येऊन भिक्षुकी करतो आहे. खेड्याच्या मानाने त्याचे उत्पन्न थोडे वाढले आहे. अशा वेळी अचानक तो मरण पावतो. पत्नी सर्वजया व मुलगा अपू पुन्हा पोरके, निराधार बनतात. नाइलाजाने सर्वजयाला बनारस सोडून एका नातेवाइकाकडे खेड्यात आश्रयाला यावे लागते. 

...आणि मग एक वेगळाच संघर्ष सुरू होतो. आईला वाटते, एकुलता एक मुलगा आहे, त्याने आपल्याजवळ राहावे, थोडाफार शिकला आहे, गावात भिक्षुकी करावी, पोटापुरते सहज मिळेल. मुलाच्या मनात वेगळीच स्वप्ने आहेत. शालान्त परीक्षेत तो जिल्ह्यात पहिला आला आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी कोलकत्याला जायचे आहे. त्याला एक वेगळे जग बोलावते आहे. हळूहळू त्या दोघांत एक दरी पडू लागते. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे हे जीव, त्यांची जगण्याची दृष्टी भिन्न असल्यामुळे एकमेकांपासून मनानेही दूर जातात. आई आणि मुलगा यांच्या नात्यातील दुराव्याचे हे चित्र भारतीय सिनेमात प्रथमच दाखविले जात होते. कॉलेजमध्ये शिकताना अपूला आई आजारी असल्याचे पत्र येते. तो गावाकडे येतो. पण तोपर्यंत आई हे जग सोडून गेलेली असते. 

आता जगात अपूचे कुणी नाही. आजी, बहीण, वडील, आई...एकामागोमाग सारे दूर निघून गेले आहेत. पण आणखी एक गोष्ट घडली आहे. सारे पाश गळून पडले आहेत. आता तो मुक्त आहे. डोळ्यांत स्वप्ने आहेत, मनात उमेद आहे, पायांत शक्ती आहे. 

तो परत कोलकत्याला जायला निघतो. भविष्याच्या दिशेने. 

स्टॅनले कुफ्मनने लिहिले आहे, ‘‘पिशवी खांद्यावर लटकावून अपू पायवाटेने निघतो तेव्हा आपल्याला ठाऊक असते की ‘ग्रहांच्या गती बदलून टाकण्याच्या मोहिमेवर’ तो निघाला आहे.’’ 

श्रेष्ठ कलाकृतीची ही एक खूण आहे की तिच्यातून एक उज्ज्वल असा प्रकाश बाहेर येत असतो. एक दिवा विझला, पण विभूतिभूषण-सत्यजित यांच्या विश्वांत अंधार होत नाही. कारण ते एक नवी पणती पेटवून ठेवतात. आता ही कहाणी माणसाच्या विजिगीषू वृत्तीची, चिवट जीवनेच्छेची, व अम्लान स्वप्नांची बनते. अंधारातून प्रकाशाकडे चालत राहणाऱ्या पथिकाची बनते. 

3. अपूर संसार (1959) 

‘अपूर संसार’ हा ‘अपू त्रिवेणी’मधील तिसरा चित्रपट. खरे तर प्रारंभी विभूतिभूषण यांच्या कादंबऱ्यांवर तीन चित्रपट बनविण्याची राय यांची योजना नव्हती. मात्र दोन चित्रपट निर्माण केल्यावर त्यांनी ‘अपराजितो’ कादंबरी पुन्हा वाचली तेव्हा तिच्यात तिसऱ्या सिनेमाचे बीज आहे हे त्यांच्या ध्यानात आले. 

अपू कोलकत्याला आल्यावर नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करू लागतो. मित्रासोबत तो त्याच्या गावी गेला असता तेथे मित्राच्या नात्यातील एका मुलीवर एक विलक्षण प्रसंग ओढवतो. तिच्या लग्नाच्या दिवशीच तिच्या घरच्यांना समजते की तिचा भावी पती हा वेडसर आहे. लग्न मोडते, पण नवाच पेचप्रसंग निर्माण होतो. मुहूर्तावर लग्न झाले नाही तर मुलीवर आयुष्यभर कुमारी राहण्याची पाळी येईल. अशा वेळी अपू तिच्याशी लग्न करून तिला कोलकत्याला घेऊन येतो. 

अपू आणि अपर्णा यांचा सुखाचा संसार सुरू होतो. नवदाम्पत्याच्या सहजीवनाचे अतिशय लोभस असे चित्रण राय यांनी केवळ सहा प्रसंगांत केले आहे. हे प्रसंग म्हणजे रुपेरी पडद्यावरील कधीही न विसरले जाणारे काव्य आहे. पती-पत्नींच्या सहवासातील नाजूक क्षण इतक्या तरल काव्यात्मतेने चित्रित केलेले मी इतरत्र कुठेही पाहिले नाहीत. अपूची भूमिका करणारा सौमित्र चटर्जी व अपर्णाची भूमिका करणारी शर्मिला टागोर या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट. चित्रपटाच्या दृश्य रूपात या दोघा देखण्या कलावंतांनी जबरदस्त भर घातली होती. 

मात्र या सुखी क्षणांना दैवाची दृष्ट लागते. अपर्णा बाळंतपणासाठी माहेरी गेली असताना मुलाला जन्म देऊन ती मरण पावते. आजवर अपूने अनेक आघात पचविले आहेत. पण हा आघात पचविणे त्याला अवघड जाते. तो शहर सोडून जंगलात इतस्तत: भटकत राहतो. आपल्या नवजात मुलाकडेही त्याला जावे वाटत नाही, त्याच्याविषयीचा राग त्याच्या मनात धुमसत राहतो. 

मात्र जंगल, तेथले वातावरण आणि काळ हळूहळू त्याच्या मनातील कल्लोळ शांत करतात. तशात त्याचा प्रिय मित्र पुलू त्याला भेटायला येतो. मुलाला भेटण्याबद्दल त्याचे मन वळवितो. 

अपू अपर्णाच्या माहेरी येतो. तेथे तो पाहतो, त्याचा मुलगा काजोल हा आईबापांविना ज्या परिस्थितीत वाढत असतो ती पाहून त्याचे मन द्रवते. तो मुलाला घेऊन परत आपल्या गावाकडे जाण्यास निघतो. 

जीवनसातत्याचा जयजयकार करणारी ही कहाणी राय यांनी ज्या तरल काव्यात्मतेने आणि कलात्मकतेने पडद्यावर साकार केली आहे त्याला तोड नाही. ‘अपूर संसार’ च्या शेवटच्या दृश्याविषयी बिल्गेइबिरी या समीक्षकाने लिहिले आहे- "The World of Apu ends with what might be the most transcendent and moving final shot of any film, ever."

आजवर पाहिलेल्या असंख्य चित्रपटांतील फक्त एक दृश्य निवडायचे असल्यास मीदेखील हेच दृश्य निवडीन. 

एक कहाणी नव्याने सुरू झाली आहे. माणसे येतातजातात. नदीच्या पात्रावर नेहमी कुठली ना कुठली नाव तरंगत असतेच. हे तीनही चित्रपट सुटे सुटे पाहता येतात; पण ते जर एकत्रित पाहिले तर त्यांचा परिणाम अविस्मरणीय होतो. निर्विवादपणे ही जगातील सर्वश्रेष्ठ ‘चित्र-त्रिवेणी’ आहे. श्रेष्ठ समीक्षक रॉजर इबर्त याने तर ‘ही त्रिवेणी म्हणजे एक प्रार्थना आहे,’ असे गौरवोद्गार काढले आहेत. 

4. जलसाघर (1958) 

पहिले दोन चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवर तयार केल्यानंतर राय यांनी ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या ‘जलसाघर’ या दीर्घ कथेवर चित्रपट बनविण्यास घेतला. आज ज्यांच्या पूर्वजांनी कमावून ठेवलेले वैभव नाहीसे झाले आहे आणि फक्त जीर्ण अवस्थेतील हवेलीच उरली आहे, अशा एका वृद्धत्वाकडे झुकलेल्या विश्वंभर राय या जमीनदाराची ही कथा आहे. हा माणूस आयुष्यभर आपल्याच मस्तीत जगत आला आहे. उत्पन्नाचे सारे स्रोत एकामागोमाग एक आटत चालले असताना त्याचे सारे शानशौक कायमच आहेत. तो एकटा आहे, पण एकाकी नाही. आपल्या हवेलीत त्याने एक आलिशान जलसाघर तयार केलेले असून मोठमोठ्या कलावंतांना बोलावून तो त्यांच्या गायनाचे व नृत्याचे जलसे करतो व त्यांना भरपूर बिदागी देतो. 

या गावात माहीम गांगुली नावाचा एक नवश्रीमंत तयार झाला आहे. व्यापारात त्याने भरपूर पैसा कमावला आहे आणि तो स्वत:ला विश्वंभर रॉयच्या बरोबरीचा मानतो. पण विश्वंभर त्याला अत्यंत कमी दर्जाचा समजतो. गांगुलीशी स्पर्धा करता करता आपल्या संपत्तीला फार मोठी गळती लागली आहे इकडे त्याचे लक्ष नाही. 

मात्र जलसाघरातील आपल्याच तसबिरीवर एक कोळी फिरताना जेव्हा त्याला दिसतो, त्या क्षणी त्याच्या ध्यानात येते की आता आपले ‘दिवस’ संपले आहेत. पण तो असा हार मानणारा नाही. ‘‘मी माझ्या अंताची वाट पाहत थांबणार नाही, मीच आपणहून त्याच्याकडे जाईन,’’ असे ठरवून तो आपला घोडा तबेल्यातून बाहेर काढतो आणि भरधाव दौडत निघतो. निश्चित अंताच्या दिशेने- ताठ मानेने. 

सरंजामी पद्धतीच्या ऱ्हासाची ही कहाणी राय यांनी अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर मांडली आहे. या चित्रपटासाठी त्यांनी निवडलेली हवेली आणि जमीनदाराच्या भूमिकेसाठी निवडलेले छबी विश्वास यांनी  हे विश्व जिवंत करण्यात फार मदत केली आहे. रायनी या संदर्भात लिहिले आहे, ‘‘विश्वंभर रायसारख्या व्यक्तींचे मी समर्थन करीत नाही. त्या चांगल्या आहेत असेही माझे मत नाही. पण नामशेष होत असलेल्या काळाचे प्रतिनिधी म्हणून मला त्यांच्यात रस आहे. ते एका दृष्टीने करुणाजनकही आहे डायनोसोरसारखे- ज्यांना माहीत नाही की ते का नष्ट होत आहेत.’’ 

पॉलीन कीलने ‘न्यूजवीक’मध्ये लिहिले आहे, ‘‘सत्यजित राय यांनी एवढा एकच चित्रपट निर्माण केला असता तरी जगातील ‘ग्रेट मास्टर्स’मध्ये त्यांची गणना केली गेली असती.’’ 

5. देवी (1960) 

‘देवी’ या चित्रपटात राय यांनी पुन्हा एकदा एका जमीनदाराची कथा सादर केली; परंतु तिच्यातील विश्व, तिच्यात उभे केलेले प्रश्न आणि शोधलेली उत्तरे यांचे स्वरूप ‘जलसाघर’पेक्षा फार वेगळे होते. हा चित्रपट प्रभात मुखर्जी यांच्या कथेवर आधारित होता. एकोणिसाव्या शतकातील बंगालमधील एका खेड्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर ही कथा आधारित होती. काली किंकर हा एक मध्यमवयीन श्रीमंत जमीनदार आहे. त्याची पत्नी वारलेली आहे. दोन मुलांपैकी एक त्याच्याजवळ राहतो व धाकटा कोलकत्याला शिकायला असतो. धाकट्याचे लग्न झालेले असून त्याची तरुण पत्नी येथे खेड्यातच राहत असते. एके दिवशी रात्री सासऱ्याला स्वप्न पडते की देवी आपल्या घरात राहायला आली असून तिचा चेहरा अगदी आपल्या सुनेसारखा आहे. तो याला ‘देवीचा दृष्टान्त’ मानतो. सकाळी उठल्यावर तो सुनेच्या पाया पडतो व तिच्या रूपाने घरात देवी आली आहे असे जाहीर करतो. साऱ्यांनी तिच्या पाया पडावे असा हुकूम सोडतो. तिची ‘प्रतिष्ठापना’ एका वेगळ्या खोलीत केली जाते, तिच्या गळ्यात हार घातले जातात. गावातले लोक तिच्या दर्शनाला येऊ लागतात. ती सोळा-सतरा वर्षांची मुलगी बावरून जाते. हे काय चालले आहे तिला समजत नाही. तिला हे नसते ओझे नको असते, पण तिला आपले म्हणणे नीट मांडताही येत नाही. 

चार-पाच दिवसांनी तिचा नवरा कोलकत्याहून येतो. त्याला अर्थातच हे सारे पटत नाही. तो वडिलांशी वाद घालतो; पण ते काहीच ऐकायला तयार नसतात. शेवटी तो बायकोला घेऊन गुपचूप पळून जाण्याची योजना आखतो. मात्र आजूबाजूच्या माणसांच्या ‘भक्ती’चा व श्रद्धेचा परिणाम पत्नीवर झाल्याशिवाय राहत नाही. तिच्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला असतो. शिवाय तीदेखील परंपरांच्या संस्कारांत वाढलेली मुलगी. तिला वाटते, खरेच आपल्या अंगात देवी आली असेल तर? आपण पळून गेलो तर तिचा आपल्या संसारावर कोप होईल. ती पतीसोबत निघून जात नाही. तो एकटाच निराश होऊन कोलकत्याला परततो. 

मात्र हा ताण त्या कोवळ्या मुलीला सहन होत नाही. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात शेतातील उंच वाढलेल्या गवत-फुलांतून ती धावत जाताना दिसते. हळूहळू तिची आकृती धुक्यात अदृश्य होऊन जाते. देवी अदृश्य व्हावी तशी.... 

माणसाच्या मनातील श्रद्धा, तिचे उगम, तिचे स्वरूप, श्रद्धा आणि अंधविश्वास यांतील न कळणारी सीमारेषा, धर्म आणि रूढी यांच्यातील फरक- अशा अनेक संकल्पनांचे मनात काहूर उठविणारा हा प्रभावी चित्रपट आहे. मात्र शेवटी अमिट परिणाम करून जाते ती एका अश्राप जिवाची झालेली शोकांतिका. शर्मिला टागोरच्या अत्यंत प्रभावी अभिनयासाठी देखील हा चित्रपट पाहायलाच हवा. ‘देवी’मधील शर्मिलाला पाहून प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्ग्मन राय यांना म्हणाले, ‘‘ही नटी तुम्ही कोठून मिळविली? तिचे डोळे मला माझ्या स्वप्नातही अस्वस्थ करतात.’’ 

6. पोस्टमास्तर (1961) 

1961 मध्ये रवीन्द्रनाथ टागोर यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार होती. सत्यजित राय यांच्यावर टागोरांचा अतिशय प्रभाव होता. टागोर हे विश्वमानव आहेत असे त्यांचे मत होते. त्यांना आपल्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी सत्यजित यांनी ‘तीन कन्या’ या नावाचा चित्रपट निर्माण केला. वास्तविक हा एक चित्रपट नसून टागोरांच्या तीन कथांवर आधारित तीन लघुपट होते. या तीन चित्रपटांतून राय यांनी टागोरांच्या तीन मानसकन्यांची अतिशय वेधक व तरल चित्रे रेखाटली होती. यापैकी ‘पोस्टमास्तर’ या कथेवरील त्याच नावाचा चित्रपट हे राय यांच्या सिनेविश्वातील अविस्मरणीय काव्य आहे. 

नंदलाल या तरुण पोस्टमास्तरचे सारे आयुष्य शहरात गेलेले आहे. त्याची बदली एका आडवाटेच्या खेड्यात होते. अनोळखी जीवन, अनोळखी वातावरण, त्यातून मलेरिया होण्याची भीती, सोबतीला कुणी मित्रही नाही अशा अवस्थेत येथे जगणे त्याला फार कष्टाचे जात असते. सारी घरकामे करणे, स्वयंपाक करणे- यासाठी जुन्या पोस्टमास्तरने एक नऊ-दहा वर्षांची रतन नावाची मुलगी ठेवली होती. ती येथेच राहते, दिवसाकाठी पोटाला दोन घास मिळाले, कधी एखादा कपडा मिळाला की तिच्या गरजा संपतात. नंदलाल आल्यावर तीच त्याचे सारे करू लागते. तो तिच्याशी बोलतो, तिला आपल्या आई, बहिणीबद्दल सांगतो याचे तिला अप्रूप वाटते. तो तिला मुळाक्षरे वाचायला शिकवितो. 

एकदा नंदलाल मलेरियाने आजारी पडतो. रतन रात्र- रात्र जागून त्याची सेवा करते. मात्र तापातून उठल्यावर नंदलालला येथे राहावेसे वाटत नाही. तो हेड ऑफिसला पत्र लिहून बदली करण्याची विनंती करतो. त्याची परत शहराला बदली होते. नंदलाल ही बातमी रतनला सांगतो तेव्हा तिला धक्काच बसतो. आजवरच्या सहवासाने तिच्या मनात त्याच्याबद्दल आपुलकी आणि श्रद्धा निर्माण झालेली असते. ती म्हणते, ‘‘दादा, मलाही तुमच्या सोबत न्याल?’’ 

एक स्वप्न तिच्या मनात निर्माण झाले आहे. या दरिद्री, एकाकी जगातून बाहेर पडण्याचा एक मार्ग तिला दिसतो आहे; पण नंदलालला तिच्या भावनांची ओळखच नाही. त्याच्या लेखी ती फक्त एक घरकाम करणारी मुलगी आहे. तो सहज म्हणून जातो, ‘‘छे:! असे कसे करता येईल?’’ 

क्षणात रतनच्या मनातील स्वप्न भंग पावते. वास्तवाचे विषण्ण आणि क्लेशकारक ज्ञान तिला होते. त्या क्षणात तिला आपल्या आयुष्याच्या मर्यादाही कळून चुकतात. तिचे स्वप्नच नव्हे तर बालपणदेखील संपून जाते. नंदलालने जाताना देऊ केलेले पैसे ती नाकारते आणि स्वत:ला नव्या पोस्टमास्तरच्या सेवेत जुंपून घेते. रतनची भूमिका करणारी चंदना बानर्जी ही एक विलक्षण मुलगी आहे. ती अभिनय करते आहे असे वाटतच नाही. कारुण्य आणि समजूतदारपणा यांचे विलक्षण मिश्रण तिच्या नजरेत होते. रायनी या चित्रपटात तिचे अनेक क्लोजअप घेतले आहेत. तिच्या चेहऱ्यावरचे समजूतदार दु:ख हृदय पिळवटून टाकते. 

7. चारुलता (1964) 

टागोरांच्या तीन कथांवर जेव्हा राय यांनी तीन लघु चित्रपट तयार केले तेव्हा त्यांच्या मनात त्यांच्याच ‘नष्ट नीड’ (विस्कटलेले घरटे) या आणखी एका दीर्घ कथेवर चित्रपट काढण्याचे होते. पण शताब्दीच्या आधी त्या पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी वेळ मिळणे कठीण होते, त्यामुळे त्यांनी तो प्रकल्प पुढे ढकलला. मात्र या कथेने त्यांच्या मनात घर केले होते. आणखी तीन वर्षांनी त्यांनी त्या कथेवर ‘चारुलता’ हा चित्रपट तयार केला. 

‘नष्ट नीड’ ही टागोरांची अतिशय गाजलेली कथा. या कथेतील मुख्य पात्रे तीन. भूपती हा मध्यमवयीन श्रीमंत असा गृहस्थ आहे. त्याला कसले काम करण्याची गरज नाही म्हणून तो एक वर्तमानपत्र काढतो व राजकारण आणि समाजकारण या आवडीच्या विषयांच्या अभ्यासात मग्न असतो. त्याची तरुण आणि सुंदर पत्नी चारुलता भल्या मोठ्या हवेलीत एकटीच कधी वाचीत, तर कधी कशिदा काढीत, कधी दुर्बिणीतून खिडकीबाहेरचे जग न्याहाळीत दिवस काढते. 

या पार्श्वभूमीवर भूपतीचा एक दूरचा भाऊ अमल त्यांच्याकडे राहावयास येतो. तो चारूचा समवयस्क तर असतोच; पण तिच्या आणि त्याच्या आवडीनिवडी देखील मिळत्याजुळत्या असतात. हव्याहव्याशा सहवासातून ते एकमेकांच्या अधिक जवळ येतात आणि एके दिवशी चारुला समजते, की ती अमलच्या प्रेमात पडली आहे. हा साक्षात्कारी क्षण तिला हादरवून टाकतो. एकीकडे अमलविषयीचे आकर्षण आणि दुसरीकडे आपण करतो आहो ते चूक आहे ही अपराध-भावना यांच्या द्वंद्वात तिचे मनोविश्व ढवळून निघते. अमललाही हे कळते. त्यालाही या नव्या नात्यातील व्यर्थपणा जाणवतो. दोघे जण एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतात. 

मात्र एका क्षणी भूपतीलाही या परिस्थितीची जाणीव होते व या पती-पत्नींचे घरटे विस्कटून जाते. 

ही झाली कथानकाची तोंडओळख. पण कथानक म्हणजे सिनेमा नसतो आणि हे जाणून घ्यायचे असेल तर ‘चारुलता’ पाहायलाच हवा. दृश्य प्रतिमांच्या साह्याने कथेतील शब्दांचे रूप पडद्यावर किती उत्कटपणे व काव्यात्मतेने प्रकट करता येते याचा हा सिनेमा हा वस्तुपाठ आहे. सिनेमा या कलेच्या अभ्यासकांसाठी तो पाहणे ही तर पर्वणीच आहे. रसिकांसाठी ही रुपेरी पडद्यावरील एक भावकविता आहे. अभिनय, छायाचित्रण, कला-दिग्दर्शन, संगीत या साऱ्यांचे नवे मानदंड या चित्रपटाने निर्माण केले. या चित्रपटाशी निगडित प्रत्येक कलावंताने आपले ‘अत्त्युत्तम’ या ठिकाणी दिले आणि या साऱ्यांना सामावून घेऊन सत्यजित राय यांनी त्यांच्या जादूच्या स्पर्शाने एका विलक्षण कलाकृतीची निर्मिती केली. अनेक जण हा राय यांचा ‘सर्वश्रेष्ठ’ चित्रपट मानतात. स्वत: राय यांचाही तो अत्यंत आवडता चित्रपट होता. 

8. कांचनजंघा (1962) 

यापूर्वी उल्लेखलेले चित्रपट पाहिल्यावर तुमच्या ध्यानात येईल की सत्यजित राय यांचे चित्रपट ‘कला-चित्रपट’ असले तरी ‘अवघड’ नसतात, ‘दुर्बोध’ नसतात किंवा कंटाळवाणे देखील नसतात. त्यांचे चित्रपट नेहमीच एखाद्या लेखकाच्या साहित्यकृतीवर आधारित असतात अशीही टीका केली जाते. पण तेही अर्धसत्य आहे. 1962 या वर्षाचा ‘कांचनजंघा’ हा चित्रपट म्हणजे एकंदरीतच राय यांच्या प्रेक्षकांना एक सुखद धक्का होता. 

राय यांनी स्वत:च्याच कथेवर हा चित्रपट निर्माण केला. हा त्यांचा पहिलाच रंगीत चित्रपट होता. राय यांच्या शैलीशी आणि नव्या चित्रपटाशी थोडेसे परिचित झाल्यावरच हा चित्रपट पाहायला हवा. ही एक दृश्य प्रतिमांतून सांगितलेली ‘नवकथा’ आहे. भारतीय चित्रपटासाठी तर हा अतिशय वेगळा प्रयोग होता. सांगता येण्यासारखी कथा, घटनाक्रम, पात्रांचा विकास, निश्चित शेवट किंवा तात्पर्य वगैरे सारे बाजूला ठेवून फक्त एका सिच्युएशनभोवती राय यांनी हा चित्रपट ‘विणला’ आहे. चित्रपटाला ठळक कथेची गरज नाही असे राय यांचे पूर्वीपासून मत होते. ‘‘चित्रपटाला एखादा स्पष्ट प्लॉट हवा  असतो यावर माझा विश्वास नाही. त्याला एक आशयसूत्र (Theme) हवे असते. एक कल्पना हवी असते. एक घटना हवी असते. शिवाय काही पात्रे. या साऱ्यांचा दृश्य प्रतिमांतून विकास करणे म्हणजे चित्रपट.’’ त्यांच्या या थिअरीचे मूर्त रूप म्हणजे हा चित्रपट. 

दार्जिलिंग या थंड हवेच्या ठिकाणी इंद्रनाथ चौधरी या श्रीमंत व्यावसायिकाचे कुटुंब सुट्टी घालविण्यासाठी आले आहे. इंद्रनाथ हे संसारातील पुरुषाचे वर्चस्व जपणारे गृहस्थ. त्यांच्या कुटुंबात त्यांचा शब्द हा शेवटचा आहे. त्याला कुणी आव्हान देऊ शकत नाही. त्यांची पत्नी लावण्या तर त्यांच्यासमोर मान वर करून बोलूही शकत नाही. त्यांच्यासोबत त्यांची तरुण मुलगी मनीषा आहे, जिच्या लग्नासाठी इंद्रनाथ यांनी एक प्रणव नावाचा इंजिनिअर पाहून ठेवला आहे. तोही दार्जिलिंगला आलेला आहे. मनीषाला आत्ताच लग्न करायचे नाही. पण तसे वडिलांना सांगण्याची तिची हिम्मत नाही. दार्जिलिंगला तिला अनिल नावाचा तरुण भेटतो. तो तिला एक चांगला मित्र वाटतो. 

चित्रपट सुरू होतो त्या वेळी ही मंडळी दार्जिलिंगला येऊन दोन-तीन दिवस झाले आहेत. उद्या ते परत जाणार आहेत. संध्याकाळी सारे जण फिरायला निघतात. नंतरच्या दोन तासांत जे काही घडते ते राय आपल्याला दाखवितात. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचा जो अवधी आहे तो आणि त्यांतील कथानकाचा अवधी एकच आहे. त्यामुळे झाले असे की पात्रांचे पोशाखदेखील जवळजवळ कायमच राहिले. या दोन तासांत या माणसांच्या आयुष्यात बरेच सूक्ष्म बदल घडून येतात. फार मोठ्या निर्णर्याप्रत कुणी येत नाही; पण परिवर्तनाची बीजे त्यांच्यात पडली आहेत हे जाणवते. 

अतिशय सूक्ष्म मनोविश्लेषण हे या चित्रपटाचे मोठे वैशिष्ट्य होते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यांतील निसर्गाचे चित्रण करताना राय यांनी योजलेले रंग. इतर चित्रपटांचे रंग हे सजविणारे असतात. राय यांनी रंगांना भावना व नाट्य फुलविण्यासाठी वापरले. पुढे 1982 मध्ये Cineaste मासिकाला मुलाखत देताना राय म्हणाले, ‘‘हा चित्रपट किमान दहा ते पंधरा वर्षे काळाच्या पुढे होता. आज तो प्रदर्शित झाल्यानंतर साठ वर्षांनीदेखील तो शिळा वाटत नाही. उलट आजच्या प्रेक्षकालाही ‘नवे’ वाटेल असे काही त्यात आहे.’’ 

9. अरण्येर दिन रात्री (1970) 

‘अरण्येर दिन रात्री’ हा सत्यजित राय यांचा अत्यंत गुंतागुंतीचा चित्रपट होता. हा चित्रपट सुरू होताना कारमधून प्रवास करणारे असीम, शेखर, हरी आणि संजय हे चार तरुण आपल्याला दिसतात. ते चौघेही कोलकत्याला राहणारे, मध्यमवर्गीय, सुखवस्तू पार्श्वभूमी असलेले आहेत. या जंगलात सुटी घालविण्यासाठी ते चालले आहेत; पण ती कशी घालवायची याचे कसलेच प्लानिंग या तरुणांजवळ नाही. जो अनुभव समोर येईल तो घेऊ- या भावनेने ते जंगलाला सामोरे जातात. येथील निसर्गाच्या सौंदर्याने ते मोहून जात नाहीत. ही माणसे सुशिक्षित आहेत खरी; पण त्यांना सुसंस्कृत म्हणता येईल का असा प्रश्न प्रेक्षकाच्या मनात येतो, या पद्धतीने राय यांनी अनेक प्रसंगांची रचना केली आहे. ते चौकीदाराला लाच देऊन डाकबंगल्यात जागा मिळवितात, मात्र त्याचे त्यांना काही वाटत नाही. अनुभव घ्यायचा म्हणजे मोहाची दारू प्यायची, जमल्यास एखाद्या आदिवासी बाईचा उपभोग घ्यायचा अशी त्यांची कल्पना आहे.  

त्यांच्याप्रमाणेच कोलकत्याहून त्रिपाठी कुटुंबातील काही जण सुटी घालविण्यास जंगलात आलेले असतात. या कुटुंबात त्रिपाठीची तरुण, सुंदर व बुद्धिमान मुलगी अपर्णा, व त्यांची विधवा सून जया आहे. ‘शहरातून आलेली माणसे’ ही समान पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांची एकमेकांशी लगेच मैत्री होते. असीमला अपर्णाचे आकर्षण वाटू लागते तर त्रिपाठींची विधवा सून संजयकडे आकर्षित होते. छोट्या छोट्या प्रसंगांतून राय या मैत्रीतून निर्माण होणारे धागे विणतात. 

आनंद मिळवण्यासाठी जंगलात एकत्र आलेले हे तरुण आता आपल्या पद्धतीने आनंदाचा शोध घेऊ लागतात. शेखर मित्रांकडून पैसे उधारीने घेतो व जुगार खेळू लागतो. हरीला दोन दिवसांपूर्वी येथेच एक आदिवासी तरुणी भेटलेली असते. तो तिला जंगलात घेऊन जातो आणि तिच्या सोबत संग करतो. मात्र परत येताना खेड्यात राहणारा एक माणूस त्याला पाहतो. या माणसाला त्याने पाकीटचोरीचा आळ घेऊन मारलेले असते. आता तोच माणूस हरीला बडवून काढतो. 

त्रिपाठीची विधवा सून संजयकडे आकर्षित झालेली असते. बंगल्यावर कुणी नाही असे पाहून ती त्याला कॉफी पिण्यासाठी बोलावते, आणि साजशृंगार करून त्याला सामोरी जाते. या खेळात आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे हे तिने ओळखलेले आहे व तसा ती घेतेही, पण संजय तिच्या कल्पनेपेक्षाही भीरू निघतो. तो तिला प्रतिसाद देत नाही. 

असीम जेव्हा आपल्या मनाचा अपर्णाकडे झुकलेला कल व्यक्त करतो तेव्हा ती त्याला तिचा कोलकत्याचा पत्ता मात्र देते. 

हा तत्कालीन भारतीय चित्रपटात एक अतिशय आगळावेगळा प्रयोग होता. रूढ अर्थाने या सिनेमाला कथा नव्हती. चार तरुण शहरातून जंगलात येतात व तेथे त्यांना शहरातून आलेल्या दोन तरुणी व एक जंगलकन्या भेटते. काही घटना घडतात. पुन्हा सारे आपापल्या मार्गाने जिकडे तिकडे जातात. 

शहरातून आलेले हे सहा जण व ती आदिवासी तरुणी या सात जणांच्या सोबतीने सत्यजित जंगलाला चित्रपटातील आठवे पात्र बनवितात. अनोळखी, विस्तृत, भोवती गडद काळोख असणारे, चकविणारे, मोहविणारे, शोध घ्यावा वाटणारे आणि थकविणारे देखील. माणसांचे जंगलासमोरचे पर्यायाने निसर्गासमोरचे खुजेपण जाणवून देणारे. 

पॉलीन कीलने या सिनेमाबद्दल लिहिलेले वाक्य आता सुप्रसिद्ध बनले आहे. ती लिहिते- “Satyajit Ray's films can give rise to a more complex feeling of happiness in me than the work of any other director." 

ही complex feeling अनुभवायची असेल तर हा चित्रपट पाहावयासच हवा. 

10. आगंतुक (1992) 

‘आगंतुक’ (1992) हा सत्यजित राय यांचा शेवटचा चित्रपट. हृदयाचे ऑपरेशन झाल्यावरदेखील त्यांच्या मनात चित्रपटाच्या नवनव्या कल्पना येत. फार वर्षापूर्वी त्यांनी ‘संदेश’ या मुलांसाठीच्या मासिकात ‘अतिथी’ या नावाची एक कथा लिहिली होती. ती कथा आता अगदी वेगळ्या रूपात त्यांना जाणवली आणि त्यांनी तिच्यावर चित्रपट निर्माण करण्याची त्यांनी तयारी सुरू केली. 

एका आगंतुक पाहुण्यामुळे एका कुटुंबात उठलेल्या वादळाची ही कहाणी आहे. पत्नीला सुमारे 40 वर्षांपूर्वी परदेशात गेलेल्या तिच्या मामाचे अचानक एक पत्र येते. ते भारतात आलेले व दोन दिवसांनी तिला भेटायला येणार असतात. पती-पत्नी गोंधळतात. हे मामा अचानक कसे उगवले? ते का येत आहेत? मुख्य म्हणजे हे पत्र लिहिणारे खरेच आपले मामा आहेत का? की तो कुणी तोतया आहे? आजकाल असे फसविणारे खूप झाले आहेत. त्यांना येऊ नका म्हणून कळवावे तर कोठे कळवावे? ते परवाच येणार आहेत. 

नाइलाजाने ते पाहुण्याचे स्वागत करायला सिद्ध होतात. मनात एक शंका व संशय ठेऊनच. फक्त त्यांचा दहा-एक वर्षांचा मुलगा कुतूहलाने आजोबांची वाट पाहतोय. मामा येतात. उत्पल दत्त यांनी ही भूमिका मोठी जबरदस्त केली होती. साठीचे, उत्तम शरीरयष्टी, चेहऱ्यावर मिस्कील हास्य. आणि ते आल्यावर एक नवाच खेळ सुरू होतो. त्यांचे खरे रूप शोधणे हाच पती-पत्नीला ध्यास लागतो. या खेळात आपणही सामील होतो. आणि मग या लहानशा घटनेतून सत्यजित आपल्याला जीवनातील काही मूलभूत प्रश्नांकडे घेऊन जातात. माणसाची खरी ओळख कोणती? पासपोर्ट, ओळखपत्रे यावरूनच त्याचे खरेखोटेपण ठरवायचे का? आपला कोणाला म्हणायचे, परका कोणाला? इथपासून ते सुसंस्कृत माणसाची लक्षणे कोणती? मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळातील वन-माणसापेक्षा आपण अधिक सुसंस्कृत झालो आहोत का? विकास कशाला म्हणायचे? 

सत्यजित राय यांनी इतक्या कौशल्याने ही पटकथा विणली आहे की हे प्रश्न चर्चात्मक असूनही तसे भासत नाहीत. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीचे स्वभाव ते स्पष्ट करीत जातात. त्यांचे अंतरंग उलगडून दाखवितात. कथा म्हणूनही हा चित्रपट रंजक आहे. मी मुद्दामच पुढे काय घडते हे सांगणार नाही; पण या चित्रपटामागे चिंतनाची जी बैठक आहे तीमुळे जीवनदर्शनाचे त्याचे सामर्थ्य अधिकच वाढले आहे. 

या चित्रपटाला आणखी एक हृद्य पदर आहे. सिनेमातील ‘मामा’ हे सत्यजित राय यांचेच दुसरे रूप असावे इतके दोघांत साम्य आहे. एका मुलाखतीत राय यांनी स्वत:च हे कबूल केले की -‘मामा म्हणजे माझाच प्रवक्ता आहे.’ शूटिंगदरम्यान राय यांनी उत्पल दत्तला सांगितले की तो ‘त्यांची’च भूमिका करतो आहे. सत्यजित आणि मामा यांच्याजवळ एक वैश्विक विचारधारा आहे. मामा जगभर भटकणारा असला तरी भारताशी त्याची नाळ जोडलेलीच आहे. राय यांच्यातही पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचे मिश्रण आहे. दोघांनाही साहित्य, कला, क्रीडा, संगीत, तत्वज्ञान अशा विविध क्षेत्रांत प्रचंड गती आहे. दोघांजवळही उत्तम सेन्स ऑफ ह्युमर आहे. दोघेही जीवनाचा अर्थ लावू पाहतात. 

‘आगंतुक’ हा राय यांनी मानवतेच्या नावे ठेवलेला अंतिम संदेश आहे. चित्रपट तयार झाल्यावर राय त्यांच्या पत्नीला म्हणाले, ‘‘मला जे सांगावयाचे होते ते सारे मी सांगितले आहे. आता माझ्याजवळ सांगण्यासारखे काही उरले नाही.’’ 

मात्र राय यांनी जे सांगून ठेवले आहे ते कधीच विसरले जाणार नाही. 

Tags: कला दिग्दर्शक चित्रपट भारतीय चित्रपट सिनेमा सत्यजीत राय वृत्तचित्र संस्कृती विजय पाडळकर सत्यजित राय satyajeet ray films vijay padalkar cinema bhartiy chitrapat bhartiy cinema satyajeet ray national film archive films indian cinema satyajit ray and indian cinema sadhana issue on satyajit ray satyajit ray weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


Comments

  1. Ranjit Kurhe- 08 May 2021

    अप्रतिम लेख लिहला आहे..

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके