डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समृद्ध वारसा जतन करणे हे आपले कर्तव्य

1992 मध्ये सत्यजित राय वारल्याची बातमी आली. त्यानंतर दूरदर्शनवर त्यांचे चित्रपट दाखविण्यात आले, त्या वेळी मी ‘पथेर पांचाली’ प्रथम पाहिला आणि माझ्या लेखी सिनेमाचे रूपच बदलून गेले. अदूर गोपालकृष्णन यांनी लिहिले आहे, "At the beginning there was 'Pather Panchali'.'' माझ्या संदर्भात ही खरेच एक सुरुवात होती. जे पडद्यावर पाहत होतो ते विलक्षण थक्क करून टाकणारे होते. असा चित्रपट असू शकतो याची कल्पनाही मी केली नव्हती.  

सत्यजित राय हे केवळ एक महान सिने-दिग्दर्शकच नव्हते तर विसाव्या शतकाच्या सांस्कृतिक जीवनावर ज्यांचा अमीट प्रभाव पडलेला आहे असे विश्वमानव होते. सत्यजित हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. चित्रपटाच्या विविध अंगांवर विलक्षण प्रभुत्व असणारे ते दिग्दर्शक तर होतेच शिवाय ते उत्तम संगीतकार होते, बंगाली वाचकांच्या दोन पिढ्यांना आकर्षित करून घेणारे रहस्यकथा व विज्ञानकथांचे लेखक होते, मुलांच्या भावविश्वात नव्या संवेदना जागविणारे बाल साहित्यिक आणि साक्षेपी संपादक होते. ते उत्तम चित्रकार होते आणि पुस्तक निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली होती. भारतीय सिनेमाला जगाच्या पाठीवर महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे दिग्दर्शक म्हणून ते आता सर्वमान्य झाले आहेत. सुमारे 36 वर्षांच्या कार्यकाळात चौतीस चित्रपट आणि पाच वृत्तचित्रे एवढा ठेवा ते रसिकांसाठी ठेवून गेले आहेत. 

हे चित्रपट आणि त्यांना मिळालेली पन्नासहून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिके त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास पुरेसे आहेत. मात्र राय यांचे कर्तृत्व या पारितोषिकांच्या व मानसन्मानांच्या पलीकडले आहे. विशेषत: भारतीय चित्रपट दिग्दर्शकांच्या मनात त्यांनी  असंख्य मर्यादा व साधनांच्या कमतरता असताना श्रेष्ठ सिनेमा भारतात बनविता येऊ शकतो याचा आत्मविश्वास निर्माण केला. त्यांचे हे कार्य त्यांना कोठल्याही भारतीय दिग्दर्शकापेक्षा अधिक मानाचे स्थान देते. श्रेष्ठ चित्रपट समीक्षक रॉजर इबर्ट या संदर्भात लिहितो, “Never before had one man such decisive impact on the films of his culture.’’ आजही जागतिक चित्रपटविश्वात भारतीय सिनेमा हा ‘सत्यजित राय यांचा सिनेमा’ म्हणून ओळखला जातो. 

चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या मते ‘सत्यजित राय यांच्यानंतर त्यांच्या दर्जाचा दुसरा दिग्दर्शक भारतात झालेला नाही.’ आणखी एक ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बेनेगल यांच्या मते भारतीय सिनेमाबद्दल बोलताना ‘सत्यजितच्या पूर्वीचा सिनेमा व सत्यजितच्या नंतरचा सिनेमा’ असेच वर्गीकरण करावे लागते.’ महान चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी या संदर्भातील शेवटचा शब्द उच्चारला आहे. ते म्हणतात – 

“Not to have seen the cinema of Ray means existing in the world without seeing the sun or the moon.” 

माझी आणि सत्यजित राय यांच्या चित्रपटांची ओळख 1977 मध्ये झाली. तोपर्यंत माझे विश्व केवळ ‘हिंदी व्यावसायिक सिनेमा’पुरतेच मर्यादित होते. हिंदीतील तोपर्यंतचे जवळजवळ सारे ‘पाहण्यासारखे’ आणि असंख्य ‘न पाहण्यासारखे’ चित्रपट बघून झाले होते. बिमल रॉय, व्ही. शांताराम, राज कपूर, मेहबूब, विजय आनंद, हृषीकेश मुखर्जी या मान्यवरांचे चित्रपट काळजीपूर्वक पाहिले होते. त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची नोंद मनात झालेली होती. चित्रपटातील ‘चांगले-वाईट’ आपल्याला कळते, असा समजदेखील मनात निर्माण झाला होता. अशा पार्श्वभूमीवर मी 1977 मध्ये ‘शतरंज के खिलाडी’ पाहिला. तोपर्यंत सत्यजित रायबद्दल काही माहिती वाचनात आली होती. चित्रपट पाहताना काहीतरी वेगळे आपण पाहत आहोत, अशी भावना मनात निर्माण झाली होती; पण पाहिल्यावर, खरे सांगायचे म्हणजे तो मला ‘समजला’ नाही. त्याचा फारसा प्रभावही मनावर राहिला नाही. 

मध्ये अनेक वर्षे गेली. 1992 मध्ये सत्यजित राय वारल्याची बातमी आली. त्यानंतर दूरदर्शनवर त्यांचे चित्रपट दाखविण्यात आले, त्या वेळी मी ‘पथेर पांचाली’ प्रथम पाहिला आणि माझ्या लेखी सिनेमाचे रूपच बदलून गेले. अदूर गोपालकृष्णन यांनी लिहिले आहे, "At the beginning there was 'Pather Panchali'.'' माझ्या संदर्भात ही खरेच एक सुरुवात होती. जे पडद्यावर पाहत होतो ते विलक्षण थक्क करून टाकणारे होते. असा चित्रपट असू शकतो याची कल्पनाही मी केली नव्हती. 

मराठवाड्याच्या एका कोपऱ्यात वास्तव्य असल्यामुळे सत्यजित राय यांचे आणखी चित्रपट पाहावयास मिळण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे आयुष्यात ‘सिनेमाचे दिवस पुन्हा’ आले ते 2001 मध्ये, नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर. त्यावर्षी FTII  आणि NFAI यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात जो चार आठवड्यांचा Film Appreciation Course घेतला जातो, त्यासाठी मी नाव नोंदविले. त्या एक महिन्याच्या काळात मला जागतिक सिनेमाचे जे विराट दर्शन घडले ते विस्मयचकित करणारे होते. एक नवे विश्व माझ्या नजरेसमोर उलगडत होते. या काळात मी सत्यजित यांचे आणखी तीन चित्रपट पाहिले, त्यांच्यावरची अधिकारी मंडळींची समीक्षा ऐकलीवाचली आणि मी एवढा झपाटून गेलो की या कलावंताच्या विश्वाचा संपूर्ण वेध घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. 

हा कोर्स संपल्यानंतर मी जागतिक सिनेमाचा गंभीरपणे अभ्यास सुरू केला. आता फुरसतदेखील होती, आर्थिक ताण नव्हते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे थोडा प्रयत्न केला तर जगातील उत्तमोत्तम चित्रपट पाहावयास आणि विकत घेण्यास मिळत होते. एकविसाव्या शतकाचे ते सुरुवातीचे दिवस होते. भारतात, किमान मोठ्या शहरात, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल येऊन पोहोचले होते, नवे आणि गाजलेले चित्रपट सीडीच्या रूपात मिळू लागले होते. सत्यजित राय यांचे ‘अपू त्रिवेणी’मधील तीनही चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की- या चित्रपटांचा एकत्रित आस्वाद हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. त्याप्रमाणे मी विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्या व राय यांनी त्यांवर निर्माण केलेले तीन चित्रपट यांचा तपशीलवार अभ्यास करण्यास सुरुवात केली. या अभ्यासावर आधारित ‘नाव आहे चाललेली’ हे पुस्तक राजहंस प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झाले व वाचकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाद्वारे मराठीत प्रथमच साहित्य आणि चित्रपट या दोन कलांतील  साम्य, भेद व त्यांची तौलनिक बलस्थाने यांचा अभ्यास केला गेला. 

हाच प्रकल्प पुढे नेत मी राय यांच्या आणखी सहा चित्रपटांवरचे समीक्षा-लेख लिहिले. माझ्या ‘नाव आहे चाललेली’ या पुस्तकाची आवृत्ती तोपर्यंत संपली असल्यामुळे राजहंस प्रकाशनने एका नव्या पुस्तकात हे नवे सहा लेख व पूर्वीचे तीन, असे एकत्रित समाविष्ट केले व ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक प्रकाशित झाले. 

मात्र राय यांच्या कार्याची मनावर पडलेली भूल कमी झाली नाही. मग मी राय यांचे सारे चित्रपट आणि त्यांचे जीवन यांचा तपशीलवार वेध घेण्याचा प्रकल्प हाती घेतला. सत्यजित राय यांच्या जीवनाचा समग्र वेध घेणारी पुस्तके मराठीत तर नाहीतच; पण इंग्रजीतदेखील त्यांची संख्या फारच कमी आहे. राय यांचे बृहद चरित्र लिहिण्याचा विचार जेव्हा मनात आला व पक्का झाला तेव्हा मी, 2016 मध्ये अमेरिकेत गेलो व तेथील कॅलिफोर्नियामधील प्रचंड मोठ्या वाचनालयात त्यांच्यावरील पुस्तकांचा शोध घेतला. पण तेथेही या विषयावर मोजकीच पुस्तके मिळाली. तेथे असलेली अनेक पुस्तके राय यांच्या चित्रपटांची समीक्षा करणारी, तर काही त्यांच्या मुलाखती वगैरेंची होती. चरित्रपर पुस्तके दोन-तीनच होती.  

या संदर्भात नेटवर काही माहिती शोधात असता अचानक मला ‘Satyajit Ray Film And Study Centre, California’  या संस्थेची माहिती मिळाली. या संस्थेचे प्रमुख कुणी डॉक्टर दिलीप बसू आहेत व त्या संस्थेत राय यांच्या संबंधीच्या कागदपत्रांचा, छायाचित्रांचा व इतर इलेक्ट्रॉनिक माहितीचा प्रचंड खजिना आहे, असे मला समजले. त्यांना मी मेल केला व या संस्थेस भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टर बसू यांनी त्वरित प्रतिसाद दिला व काही दिवसांनी मी सांताक्रूझ येथील Crown Collage मधील या संस्थेला भेट दिली. डॉक्टर बसू या सुमारे साठ वर्षांच्या हसतमुख गृहस्थांनी माझे आस्थेने स्वागत केले. आपल्या संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. राय यांच्या अभ्यासकांसाठी ही संस्था म्हणजे एक खजिनाच आहे. वेगवेगळ्या भाषांतील रायविषयक पुस्तके, नियतकालिके तेथे आहेत. सुमारे 5000 दुर्मीळ छायाचित्रे आहेत. दुर्मीळ मुलाखतींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्यांनी मला 'My life, My love’ हे माधवी मुखर्जीने लिहिलेले पुस्तक भेट दिले व काही आवश्यक अशा पुस्तकांची यादीही दिली. 

भारतात आल्यावर भारतीय लेखकांनी व प्रकाशकांनी प्रकाशित केलेली राय यांच्यावरील पुस्तके शोधण्याचा प्रयत्न चालू केला. या पुस्तकांपैकी राय यांच्या पत्नी विजयाबाई यांनी लिहिलेले ‘Manik and I' हे एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. राय या व्यक्तीविषयी फार मोलाची माहिती मला त्या पुस्तकातून मिळाली. शिवाय सौमित्र चटर्जी, निमाई घोष, सौमेंदू राय अशा अनेकांनी सत्यजित यांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. स्वत: सत्यजित राय यांनी ‘Childhood Days' आणि ‘My Years with Apu' अशी दोन पुस्तके लिहून आपल्या बऱ्याच आठवणी त्यांत शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांचाही मला हे चरित्र लिहिताना फार उपयोग झाला. 

सत्यजित राय यांच्या चरित्रावर काम करीत असताना आणखी एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे राय यांच्याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे अनेक सुशिक्षित माणसांच्या मनातदेखील त्यांच्याविषयी काही पूर्वग्रह आहेत. सत्यजित राय यांनी भारतातील गरिबीचे व दारिद्र्याचे चित्रण करून ते परदेशांत ‘विकले’ व त्यामुळे भारताची परदेशांतील प्रतिमा मलिन झाली हा त्यांपैकी एक पूर्वग्रह. अभिनेत्री नर्गिसने प्रथम या गोष्टीचा जाहीर उच्चार केला व नंतर अनेकांनी तिची ‘री’ ओढली. राय यांच्या चित्रपटांची ओळख सामान्य प्रेक्षकाला व्हावी म्हणून गेल्या काही वर्षांत मी त्यांचे काही चित्रपट अनेक ठिकाणी दाखविले. अनेक ठिकाणी प्रेक्षकांशी माझा जो संवाद झाला त्यात हा प्रश्न हटकून येत असे. वास्तविक हा आरोप बिनबुडाचा आहे. राय यांचे चित्रपट परदेशांत नावाजले गेले ते त्यांतील कलात्मक चित्रणामुळे. रायनी जी कादंबरी चित्रणासाठी निवडली त्यांत गरिबीचे दर्शन होते आणि ते कथेचा अविभाज्य भाग असल्यामुळे रायना दाखवावे लागले. पण या चित्रपटात फक्त गरिबी अथवा दारिद्र्यच नव्हते. माणसे आपल्या नशिबात आलेल्या या दारिद्र्याचा कसा सामना करतात आणि या लढ्यात परस्परांविषयी असणारे प्रेम आणि मनातील दुर्दम्य आशावाद त्यांना कशी साथ देतो, हेदेखील राय दाखवितात. चित्रपट संपल्यावर प्रभाव राहतो तो माणसातील या जिद्दीचा, आणि दिग्दर्शकातील ‘मानवतावादी’ दृष्टीचा. दुसरे म्हणजे ‘पथेर पांचाली’ पाहून पाश्चिमात्य प्रेक्षकांच्या मनात भारतातील दारिद्र्याबद्दल फक्त ‘कुतूहल’ निर्माण झाले असे म्हणणेही चुकीचे आहे. Keanu Reeves हा कॅनेडिअन चित्रपट दिग्दर्शक, नट लिहितो- 

"My only understanding of India was through the Satyajit Ray films I watched in film festival after film festival. They are incredible. That is how I perceive India - real, warm and unaffected.’’ 

राय हे खऱ्या अर्थाने विश्वमानव होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळजवळ येत चालले आहे असे आज आपण म्हणतो, पण आपल्याला हेही दिसते आहे की ते लहान-लहान तुकड्यांत विभागले जात आहे. अशा वेळी आपल्या भोवतीची माणसे व हे विश्व यांबद्दल आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला राय यांच्यासारख्या कलावंताकडेच वळले पाहिजे. 

‘Wire' या नियतकालिकाच्या अंकात शर्मिला टागोर यांनी त्यांच्या आणि सत्यजित राय यांच्या नात्यावर विस्तृत लेख लिहिला आहे. त्या लिहितात, ‘‘त्यांचे चित्रपट म्हणजे त्यांच्या कालखंडातील ‘काळाच्या सरकत्या वाळूशी केलेला संवाद’ आहेत... त्यांचे चित्रपट त्या काळाचा आत्मा उलगडून दाखविणारे जसे आहेत तसेच ते सत्यजित राय या व्यक्तीची जडणघडण, संगीत आणि विविध कला यांचे त्यांच्यावरील संस्कार, त्यांच्या श्रद्धा व पूर्व आणि पश्चिमेशी सांधा जोडण्याचा त्यांचा प्रयत्न या साऱ्यांचे मनोज्ञ दर्शन घडवितात.’’ 

राय यांच्या चरित्राचे काम सुरू केल्यावर काही दिवसांनी, पुन्हा 2018 च्या डिसेंबर महिन्यात मी अमेरिकेला गेलो तेव्हा बसूंना देण्यासाठी मी ‘गगन समुद्री बिंबले’ची एक प्रत सोबत घेतली होती. तेथे गेल्यावर मी त्यांना फोन केला. फोन लागला नाही. कदाचित फोन नंबर बदलला असेल म्हणून मेल केला तर तोही परत आला. नेटवर पाहिले तर त्यांची साइटदेखील बंद झाली होती. जेव्हा मी कसून शोध घेतला तेव्हा मला समजले की डॉक्टर बसू यांचे 2017 मध्ये अचानक निधन झाले असून सध्या 'Satyajit Ray Film And Study Centre' देखील बंद आहे. मला धक्काच बसला. त्यांना पुस्तक देऊन त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मनापासून धन्यवाद देण्याचे राहूनच गेले. 

राय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आणखी एक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो तो म्हणजे राय यांच्या चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकाला खूप काही दिले, मात्र आपण ते स्वीकारले का? याचे उत्तर नकारार्थीच येते. Cineasteने घेतलेल्या मुलाखतीत खुद्द रायना विचारण्यात आले होते... 

‘‘भारतीय समीक्षक नेहमी म्हणतात की ‘पथेर पांचाली’ने भारतीय सिनेमाचे अर्थकारण बदलून टाकले. स्टुडिओचा पाठिंबा असल्याशिवाय देखील चित्रपट निर्माण करता येऊ शकतो हे त्याने सिद्ध केले. असा काही परिणाम खरेच झाला का?’’ 

त्यावर राय म्हणाले, ‘‘मला तसे वाटत नाही. प्रेक्षकांनी आणि टीकाकारांनी जरी त्या चित्रपटाची ‘एक महत्त्वाचा सिनेमा’ म्हणून प्रशंसा केली तरी इतर चित्रपट निर्माते त्या चित्रपटाचे अनुकरण करण्यास तयार नव्हते. माझ्या सिनेमाचा इतर दिग्दर्शकांवर तातडीने काही परिणाम झाला नाही.’’ खूप वर्षांनी, आता आता फिल्म इन्स्टिट्यूटमधून बाहेर येणारे दिग्दर्शक ‘पथेर पांचाली’च्या त्यांच्यावरील प्रभावाची चर्चा करीत आहेत. 

ऋतुपर्णो घोष, अपर्णा सेन असे काही दिग्दर्शक राय यांचे ऋण मान्य करताना दिसतात. पण एकंदरीत बंगाली सिनेजगतात नेहमीच एक रायविरोधी सूर उमटताना दिसतो. 

मात्र ‘‘राय यांच्या चित्रपटांचा अभ्यास जागतिक फिल्म फेस्टिव्हलसाठी केला पाहिजे’’, असेही एक मत आजकालच्या दिग्दर्शकांत दिसते. मधुर भांडारकर यांनी 2019 च्या कान चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने काढलेले उद्‌गार याचेच निदर्शक आहेत. या वर्षी ‘कान’मध्ये एकही भारतीय चित्रपट नव्हता हे स्पष्ट करून भांडारकर म्हणाले, ‘‘अशा महोत्सवात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वास्तव आणि मातीशी संबंध असलेले विषय निवडून आपण आपले चित्रपट निर्माण केले पाहिजेत. आपल्या चित्रपटात राय आणि घटक यांच्यासारखा ‘मजबूत आशय’ पाहिजे.’’ 

भारतातील जनतेची एकमेव प्रातिनिधिक करमणूक असलेल्या हिंदी सिनेमावरदेखील सत्यजित राय यांच्या सिनेमाचा काहीच परिणाम झाला नाही असे खेदाने नमूद करावे वाटते. सत्यजित राय यांनी दोन हिंदी चित्रपट तयार केले. ‘शतरंज के खिलाडी’ हा पूर्ण लांबीचा आणि ‘सद्‌गती’ हा दूरदर्शनसाठी सुमारे 50 मिनिटांचा. पहिला चित्रपट आर्थिक दृष्ट्या चालला नाही व त्याकडे प्रेक्षकांनी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीनेही दुर्लक्ष केले. हिंदी सिनेमात, अगदीच अपवाद वगळता, व्यवसायाच्या गणितानुसार चित्रपट निर्माण केले जातात. राय यांनी ज्या प्रकारचा चित्रपट तयार केला तसा आपण केला तर त्या चित्रपटाला प्रेक्षक मिळणार नाहीत हे येथील निर्मात्यांनी पक्के गृहीत धरले होते. त्यामुळे ती जोखीम घेण्यासही कुणी तयार झाले नाही. श्याम बेनेगल यांच्यावर राय यांच्या सिनेमाचा मोठा प्रभाव आहे; पण त्यांनीदेखील चित्रपट निर्मिती करताना नामवंत नट-नट्या व गीत-संगीत यांना बरेच महत्त्व दिले. मणी कौल, कुमार सहानी वगैरे ‘नव-चित्रपट’ दिग्दर्शकांनी हेतुपुरस्सर नवी वाट धरली व राय यांच्या मार्गावरून चालण्याचे नाकारले. हे दोन दिग्दर्शक आपणाला ऋत्विक घटक यांचे शिष्य मानतात. या संदर्भात राय यांनी त्यांच्या ‘Our Films, Their Films' या पुस्तकात मजेदार टिप्पणी केली आहे. ते लिहितात, ‘‘या दोघांनी घटक यांच्याकडून जर काही घेतले असेल तर फक्त-‘विनोदाचा अभाव’!’’ 

अमेरिकन चित्रपटसृष्टीवर राय यांच्या सिनेमाचा फारसा परिणाम झाला नाही. कारण तीदेखील मुख्यत्वे व्यवसायाच्या सूत्रानुसार वर्तन करणारी आहे. शिवाय राय यांच्या ‘पद्धती’चे चित्रपट अमेरिकन प्रेक्षकांना पचणार नाहीत, अशीही त्यांची खात्री आहे. पण मार्टिन सोर्सेसीसारख्या अमेरिकेतील काही मान्यवर दिग्दर्शकांवर राय यांचा प्रभाव आहे व ते तो मान्यही करतात. मात्र जगभर जे दिग्दर्शक नवा चित्रपट देण्याचा विचार करतात; त्यांच्या मनांतही राय यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. तिसऱ्या जगातील Ousmane Sembene, किंवा Yilmaz Guney, किंवा Glauber Rocha सारखे आधुनिक दिग्दर्शक त्यांचा अभ्यास करताना दिसतात. 

सत्यजित राय यांचा जन्म 2 मे 1921 चा. म्हणजे या 2 मे रोजी त्यांच्या जन्मास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. निदान आता तरी त्यांनी आपल्याला काय दिले व ते किती मोलाचे होते याचा विचार करायला हवा. राय हे भारतीय चित्रपट कलेच्या पहिल्या शतकाचे निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी होते. या कलावंताने आपल्या कर्तृत्वाने जे अफाट कार्य केले आहे, त्याचा अभ्यास करीत त्यामागे असणारा माणूस शोधण्याचाही प्रयत्न झाला पाहिजे. फक्त त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रांतील निर्मिती आणि तिचे भारतीय सांस्कृतिक जीवनावर झालेले परिणाम यांच्यापुरते विवेचन मर्यादित न ठेवता, त्या निर्मितीमागे राय यांच्या कोणत्या  प्रेरणा होत्या, जीवनविषयक व कलाविषयक कोणते दृष्टिकोन होते आणि आपले कार्य पार पाडण्यासाठी त्यांनी आपल्या क्षमतांचा कसा अथक पाठलाग केला; एक व्यक्ती म्हणून त्यांची स्वप्ने, त्यांच्या भावना, त्यांच्या अपेक्षा आणि अपेक्षाभंग यांचाही शोध घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. नुकतेच मी सत्यजित राय यांच्या जीवनाचा व कार्याचा वेध घेणारे ‘तो उंच माणूस’ हे प्रदीर्घ चरित्र पूर्ण केले आहे. राय यांच्या श्रेष्ठत्वाची पुन्हा एकदा ओळख करून देण्याची जन्मशताब्दी ही एक अत्यंत चांगली संधी आहे. लवकरच ते ‘मॅजेस्टिक’ प्रकाशनातर्फे प्रकाशित होईल. 

गेल्या सुमारे दोन-तीन वर्षांपासून या प्रकल्पावर अभ्यास करताना मला जे काही आढळून आले ते फारसे उत्साहवर्धक नव्हते. जागतिक कलाक्षेत्रात आपली मुद्रा उमटविणारा हा कलावंत भारतात अजून ‘अपरिचित’ असाच आहे. अनेक साक्षेपी वाचकांशी, सिनेरसिकांशी मी संवाद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला जाणवले की, राय यांच्याबद्दल फारच थोडी माहिती सुशिक्षित वर्गाला आहे. बहुतेकांना ते मोठे दिग्दर्शक आहेत हे माहीत असते, त्यांच्या चार गाजलेल्या चित्रपटांची नावे माहीत असतात पण त्यांचे चित्रपट पाहिलेले फार कमी प्रेक्षक आहेत. अभ्यासलेले तर तुरळकच. आज भारतातील सर्व फिल्म इन्स्टिट्यूट्‌समधून राय यांचे चित्रपट अभ्यासले जातात, पण हा अभ्यास एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित राहिलेला आहे. याची काही कारणे आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर अजून आपल्याकडला सुशिक्षित वर्ग सिनेसाक्षर नाही. चित्रपटाच्या कलेसंबंधी त्याची जाण मर्यादित आहे. आर्ट फिल्मविषयी त्याच्या मनात गैरसमज फार आहेत आणि राय यांचे चित्रपट ‘आर्ट फिल्म’च आहेत, अशीही एक धारणा त्यांच्या मनात आहे. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे हे चित्रपट सहज पाहावयास मिळतील, अशी कोणतीही व्यवस्था आज उपलब्ध नाही. राय किंवा भारतातील इतरही कलात्मक चित्रपट-दिग्दर्शकांचे चित्रपट व्यावसायिकरीत्या वितरीत होत नाहीत. काही चित्रपटांच्या डीव्हीडी आज उपलब्ध झाल्या आहेत; पण सामान्य रसिकांना ते ठाऊक नाही. या बाबतीत चित्रपट सोसायट्या महत्त्वाचे काम करू शकतात. पण आज महाराष्ट्रातील पाच-सहा शहरे सोडली तर इतरत्र फिल्म सोसायटी चळवळ पोहोचलेलीच नाही. राय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने खरे तर भारतभर त्यांचा सिनेमा नेण्याचे प्रयत्न केले जायला हवेत. पण त्या बाबतीतही ठोस अशी पावले उचलली गेली नाहीत. त्यांच्या अनेक फिल्म्स आज खराब अवस्थेत आहेत. त्यांच्या restorationचे कार्य सुरू आहे, पण त्यालाही गती मिळायला हवी. 

या पार्श्वभूमीवर ‘साधना’ने राय यांच्यावर एक खास अंक काढण्याचा विचार केला व तो अमलात आणला याचा मला विशेष आनंद होत आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच या अंकाचे संपूर्ण लेखन व संपादन यासाठी त्यांनी माझी निवड केली याबद्दल त्यांचे आभार. 

या अंकाची रचना एक विशिष्ट उद्देश ठेवून करण्यात आली आहे. सत्यजित राय यांचे जीवन आणि कार्य यांच्याबद्दल किमान महत्त्वाची माहिती वाचकाला कळावी हा प्राथमिक उद्देश आहे. मात्र राय यांच्यासारख्या युगप्रवर्तक व अष्टपैलू कलावंताचे कार्य या लहानशा अंकातून समग्रपणे मांडणे अशक्य आहे. त्यामुळे आम्ही असा विचार केला की, राय यांचे जे चित्रपट लोकांना ‘माहीत’ आहेत व ज्यांवर ‘रायचा सिनेमा’ म्हणून चर्चा होते- उदाहरणार्थ ‘अपू त्रिवेणी’, ‘चारुलता’, ‘अरण्येर दिन रात्री’, ‘शतरंज के खिलाडी’ वगैरे- त्यांना थोडे बाजूला ठेवून राय यांच्या अलक्षित पैलूंवर अधिक जोर द्यावयाचा. पण या सिनेमांना पूर्णपणे बाजूला ठेवूनही चालण्यासारखे नाही, म्हणून ‘पाहायलाच हवेत असे राय यांचे दहा चित्रपट’ हा लेख मी प्रारंभी घेतला आहे. राय यांच्या चित्रपटांतील विषयांची व मांडणीची विविधता रसिकाला दिसावी हा विचार यामागे आहे. तसेच ज्याला राय यांच्यापर्यंत जायचे असेल त्याने सुरुवातीला काय पाहावे या अनेक वेळा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे माझे हे उत्तरही आहे. 

‘कांचनजंघा’ या राय यांच्या एका दुर्लक्षित पण अतिशय तरल आणि काव्यात्म चित्रपटाचा दीर्घ परिचय दिला आहे. राय यांनी कथात्म चित्रपटाशिवाय काही उत्तम वृत्तचित्रे निर्माण केली आहेत. त्यांचे हे कार्यदेखील बरेचसे अलक्षित आहे. त्या साऱ्याच वृत्तचित्रांचा एका स्वतंत्र लेखात मी परिचय करून दिला आहे. 

राय हे उत्तम चित्रकारदेखील होते. त्यांनी आपल्या पहिल्या ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाची पटकथा चित्रांतून तयार केली होती. त्या चित्रकथेचे हरवलेले पुस्तक सत्यजित यांचा मुलगा संदीप याने काही वर्षांपूर्वी मिळवून प्रकाशित केले. त्याविषयीचा लेख वाचकांना वेगळी माहिती देईल. 

‘कवि हा होता कसा आननी’ हा प्रश्न प्रत्येक रसिकाच्या मनात असतोच. राय हे व्यक्ती म्हणून कसे होते याचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न मी ‘उंच माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टी’ या लेखातून केला आहे. 

सरतेशेवटी परिशिष्टांत, सत्यजित राय यांचे संपूर्ण चित्रपट, त्यांचे इतर दिग्दर्शकांच्या चित्रपटातील योगदान, त्यांना मिळालेली पारितोषिके, त्यांनी लिहिलेली पुस्तके व त्यांच्यावरील संदर्भ ग्रंथ यांची यादी दिली आहे. 

सत्यजित राय व सौमित्र चटर्जी यांचे गुरू-शिष्याचे नाते होते. सौमित्रला त्यांनीच प्रकाशात आणले व पुढे त्याने राय यांच्या 14 चित्रपटांत अप्रतिम भूमिका केल्या. राय यांच्या निधनानंतर सौमित्र त्यांच्या पार्थिवाजवळ मान खाली घालून बसला होता त्या वेळी त्याची एक मैत्रीण त्याच्याजवळ येऊन म्हणाली, ‘‘रडू नकोस, राय तुला एक समृद्ध वारसा देऊन गेले आहेत.’’ 

सत्यजित राय आपल्यासाठीही एक समृद्ध वारसा सोडून गेले आहेत. तो जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. 

Tags: विजय पाडळकर कला दिग्दर्शक चित्रपट भारतीय चित्रपट सिनेमा सत्यजीत राय वृत्तचित्र संस्कृती सत्यजित राय satyajeet ray films cinema bhartiy chitrapat bhartiy cinema satyajeet ray national film archive films indian cinema satyajit ray and indian cinema sadhana issue on satyajit ray satyajit ray weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके