डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘उद्या’ : वास्तव आणि शक्यतांवरील प्रकाशझोत

नंदासरांनी या कथामालिकेतून सरकार आणि कॉर्पोरेट यातील संगनमत कसे असेल याची शक्यता नोंदवली आहे. स्वार्थाकरता शेतकरी-आदिवासींना नक्षलवादी ठरवून त्यांच्या जमिनीतील खनिजसंपत्तीची लूट चालविली आहे. या कथेतील पहाडे पोलीस म्हणतो, ‘साली चांदा-गडचिरोलीची किस्मत खोटी. जमीन खंदली तर सिमेंटचा गोटा, कोयला, तांबा, लोखंड भेटणार. जमिनीवर चार- बोरापासनं बांबू-सागापर्यंतचे झाडं. जंगल कायदे घरच्यानले चोर ठरवणार!’ मूलनिवासी आदिवासींना नक्षलवाद्यांमध्ये कसे रूपांतरित केले जाते याची नियोजनबद्ध प्रक्रिया या कथामालिकेतून खरेसरांनी उलगडून दाखविली आहे. ‘तीनदा स्टिग्लित्झ’ या लेखात फार चिंतनशील, विचारप्रवृत्त करणारे आणि दाहक वास्तव अमेरिकन अर्थशात्रज्ञ व 2001 चे नोबेल पारितोषिकप्राप्त जागतिक बँकेचा प्रमुख सल्लागार जोसेफ स्टिग्लित्झ यांच्या सिद्धांताच्या आधाराने स्पष्ट केलेले आहे.

अनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे यांनी लिहिलेल्या ‘उद्या’ या कादंबरीला 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मनोविकास प्रकाशनातर्फे ही कादंबरी 2015 मध्ये प्रकाशित झाली. आधुनिकतेचा आणि नावीन्यतेचा शोध घेणारे आशयगर्भ लेखनविश्व खरेसरांनी आतापर्यंत साकारलेले आहे. वर्तमानातून भविष्याचा चिकित्सक वेध घेणे आणि माणसाच्या असुरक्षित असण्याची घुसमट निडरपणे व्यक्त करणे, हे त्यांच्या लेखनातील प्रमुख लक्षण आणि प्रसिद्धिपराड्‌मुख असणे हा त्यांचा स्वभाव. अशा वाङ्‌मयविरहित साहित्याच्या/ लेखनाच्या बाबतीत अरसिक म्हणता येईल अशा क्षेत्रात कार्यरत असून, विपुल तरीही दर्जेदार आणि समकाळाबरोबर भविष्यवेध घेणारे मराठी/इंग्रजी लेखन करणे हा त्यांचा लेखनधर्म आहे. एखादी व्यक्ती अथवा परिस्थितीकडे कोणत्या व किती अंशांच्या कोनातून आपल्याला पाहता येईल तेव्हाच त्यामागील आणि त्यातील नेमके सत्त्व सापडू शकेल, या शोधात या अभियंत्याचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व सतत मग्न असते. प्रतिभावान, भविष्यवेधी आणि विचक्षण आकलनशक्ती लाभलेल्या या वैदर्भीय साहित्यिकाला त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीतून समजून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न!

नंदा खरे यांचे ‘उद्या’ नावाचे पुस्तक एक प्रकारे कथापुंज आहे. एकूण 15 कथा 285 पानांमध्ये पुस्तकरूपाने आपल्यासमोर येतात. यातील ‘अस्तित्व’, ‘लोगो अन्‌ पेनं’ व ‘मुळं-पारंब्या’ या कथेतील विषय एकच आहे. तसेच ‘सर्व्हेलन्स’, ‘बच के कहा जाओगे’ या दोन कथांत एकच विषय विभागला गेलेला आहे आणि ‘जंगलात शेतं’, ‘लांडगेतोड’ व ‘कुत्रे’ यातून एकच वास्तवकथा वर्णिलेली आहे. ‘दिवाणखान्यातील हत्ती’, ‘तंबूतला उंट : केवायसी प्लस’, ‘लक्ष्मीची पाऊले’, ‘सुस्वरूप कन्या म्हणजे’, ‘ज्याची त्याची श्रद्धा’, ‘सरडे’ व ‘तीनदा स्टिग्लित्झ’ या उरलेल्या कथांमधील विषय अतिशय वास्तववादी आणि वाचकाला स्तंभित करणारे आहेत. मुळात ‘उद्या’ हे पुस्तकच भविष्यात घडणाऱ्या घटितांवर बेतलेले आहे. भूतकाळात रमणे सहसा बहुतेकांना सहज शक्य होते, पण भविष्याचे भीषण वास्तव काय असू शकते; नव्हे, तर काय असणार याची मांडणी करणे सोपे असू शकते असे मला वाटत नाही. या पुस्तकातील घटनाच मुळात बाविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या जगातील आहेत. जागतिकीकरण, व्यापारी-भांडवलदारांची मनमानी, हळूहळू हुकूमशाहीकडे परावर्तित होत जाणारी एककेंद्री सत्ता, बेमुर्वत सत्ताधारी, असुरक्षित आणि संख्येने कमी होत जाणाऱ्या स्रिया, मुलींची हंटिंग, वैयक्तिक माहिती चोरणारी व सतत कॅमेऱ्याने सर्वांवर काटेकोर लक्ष ठेवणारी शासनव्यवस्था, सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांद्वारे होणारा वापर व त्यातून येणारे डिप्रेशन, राग आणि ताण, या सर्वांत पिचला जाऊन उद्‌ध्वस्त होत जाणारा सामान्य-अतिसामान्य माणूस आणि यातून जगावे लागलेले अस्तित्वहीन जीवन- या सर्व भविष्यातील नकोशा वाटेल एवढे वास्तव लेखक नंदा खरे ‘उद्या’ या time machine ने वाचकाच्या दृष्टिक्षेपात आणतात. खरे तर हॉलीवुड सिनेमांत अशा कल्पना मुबलक प्रमाणात बघायला मिळतील. पण त्यात आणि आपल्या उद्यात आशयमूल्याच्या दृष्टीने फार मोठा फरक आहे. त्यात बव्हंशी काल्पनिकता अधिक, अतार्किक प्रसंगांची रेलचल आणि मर्यादेपलीकडील मनोरंजन असते. ‘उद्या’मध्ये भविष्याची निश्चितता (certainty),  काल्पनिकता टाळून अटळ वास्तव गंभीर आणि तटस्थपणे मांडलेलं आहे. या अर्थी उद्यातील कथा अधिक रिॲलिस्टिक म्हणून विचारात घेण्यासारख्या आहे. लेखक हा जेवढा भूतकाळात रमणारा तेवढाच, किंबहुना त्यापेक्षा अधिक भविष्यवेधी असावा, असे मला वाटते. कारण साहित्य हे जेवढा भूतकाळ कवेत घेते तेवढ्याच ताकदीने भविष्यकाळालाही पकडू पाहणे अत्यावश्यक बाब आहे. म्हणजे साहित्यिक द्रष्टा असावा. नंदा सरांजवळ हे द्रष्टेपण आहे.

उद्या या कथापुंजात ‘अस्तित्व’, ‘लोगो अन्‌ पेनं’, ‘मुळं- पारंब्या’ या तीनही कथांतील विषय एकच आहे. सुदीप जोशी नावाच्या बाविसाव्या शतकातील एका भाषा ट्रान्सलेशन कंपनीत ट्रान्सलेटर म्हणून काम करणाऱ्या व तांत्रिक जगात होरपळणाऱ्या तरुणाची धडपड या कथेतून समोर येते. या जगात जगण्याचा व आपल्या असण्याचा पुरावा म्हणजे त्याचे ओळखपत्र आहे. या ओळखपत्रानेच तो जगण्यासंबंधातील सर्व कामे करू शकतो, सर्व आर्थिक व्यवहार यामुळे शक्य होत असतात. हे ओळखपत्र हरवल्यानंतर तो या आधुनिक जगात जिवंत असूनही अस्तित्वहीन होतो. ते अस्तित्व मिळवण्यासाठी त्याची प्रचंड तडफड चाललेली आहे. असे अनेक जीवघेणे आणि नकोसे प्रसंग माणसाच्या फक्त काही काळ अंतरावर असून अटळ आहेत. ही उद्याची चेतावणी खरेसरांनी या कथेतून दिलेली आहे. मुंबई या महानगरातील 2022 च्या सुरुवातीची ही कथा आहे. ज्या वेळी सुदीप जोशीला दुसरे ओळखपत्र मिळवण्यासाठी पैशाची गरज भासते, तेव्हा तो सुरेश आजरेकर या दळव्याच्या मदतीने महिकादळात सामील होतो.

याच कथेचा पुढचा भाग म्हणजे, ‘लोगो अन्‌ पेनं’ ही कथा होय. अमरावती जिल्ह्यातील तीनखेडा हे सुदीप जोशींचं गाव. या गावातील सद्‌गृहस्थ भाकरेगुरुजी आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा तरुण नितीन भक्ते व पत्नी रितू यांच्या जीवनाची ही कथा होय. ही कथासुद्धा भविष्यकाळातीलच आहे. या तीनखेडा गावात विविध जागतिक कॅमेरे, चिप बनवणाऱ्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. नितीन भक्ते याच गावातील विद्यार्थी शिकून एका कंपनीशी मिळून काम करतोय! त्याची पत्नी रितूसुद्धा उत्कृष्ट designer  आहे. तिच्या मदतीने तो आंतराष्ट्रीय कंपन्यांचा लोगो design  करतो आणि नफ्याचा व्यवसाय करतो. नंतरच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे नितीनची घुसमट सुरू होते; शेवटी तो डिप्रेशनमध्ये जातो व दारू पिण्याचं प्रमाण वाढून अखेर मृत्यू पावतो. विविध जागतिक कंपन्यांची मक्तेदारी नोकरदारांच्या जीवावर उठणार आहे, अशी पूर्वसूचना लेखक या माध्यमातून देतात.

‘मुळं-पारंब्या’ हा वरील दोन कथांचा शेवटचा भाग. सुदीप जोशी कंपनीत ट्रान्सलेटर आणि महिकादळात काम करीत असतो. हळूहळू तो गुन्हेगारी जगतात कुख्यात होतो. असं सर्व सुरळीत चालू असताना जोशीचा बहीणजावई अशोकराव आणि भाची एका अपघातात मृत्यू पावतायेत, त्यामुळे जोशीला सर्व सोडून तातडीने गावाकडे जावे लागते.

जावई मेल्यानंतर सुदीप कित्येक दिवस संबळी या बहिणीच्या गावी काढतो. तेथे अपुरा पैसा आणि जावयाच्या कर्जाची परतफेड करणं त्याला कठीण होत जाते. अमरावतीचा गवळीसेनेचा प्रमुख सगनभाऊ नावाचा गुन्हेगार कशी तरुण मुलींची हंटिंग करवतो व बाहेर त्यांना कसे विकतो याचेही वर्णन या कथेत आलेले आहे. मुलींचे असुरक्षित जीवन हे पुढचे महत्त्वाचे आव्हान राहणार आहे, असे दिसते. या कथेत मुलींजवळ तिखटाचे स्प्रे असतात. त्या ज्या वाहनाने जाणार त्याला कॅमेरा, मोबाईलमध्ये जीपीएस इत्यादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मानवी अस्तित्व हरवून जाण्याची शक्यता खरेसरांनी व्यक्त केलेली आहे.

‘सर्व्हेलन्स’ आणि ‘बच के कहाँ जाओगे’ या दोन्ही कथांचा विषय एकच आहे. देशातील आयएएस, आयपीएस तथा समकक्ष अधिकाऱ्यांची सत्ताधाऱ्यांकडून हेरगिरी कशी होते आणि सत्ताधारी विविध प्रलोभने दाखवून या बुद्धिमान अधिकाऱ्यांना कसे जाळ्यात पकडतात याचे चकित करणारे वास्तव रेखाटन या दोन कथांत केलेले आहे. विकास आणि भरोसासारख्या सरकारच्याच व त्यांच्याच कृपादृष्टीने चालणाऱ्या कंपन्या जनतेच्या संपत्तीची कशी चोरी करतात याचे उपरोधिक वर्णन अरुण सन्मार्गी या आयएएस अधिकाऱ्याच्या व त्याच्या पत्नीच्या- अनसूया सन्मार्गी यांच्या- जीवनातून स्पष्ट केलेले आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपून अत्याधुनिक यंत्रणेद्वारे त्यांच्या कृतीचा अदमास घेतला जातो आहे. नव्वद टक्के लोक ‘अँगर अँड अँझाईटी’ म्हणजे राग आणि ताणात आहेत. हे उद्याचे वास्तव आहे.

 ‘जंगलात शेतं’, ‘लांडगेतोड’ आणि ‘कुत्रे’ या तीनही कथा सानिका धुरू या तीस-बत्तीस वर्षांच्या तरुण वार्ताहर मुलीची जिज्ञासा वर्णन करणारी आणि सरकारची छुपी राजनीती स्पष्ट करणारी कथामालिका आहे. सानिका धुरू ही ‘राउंड अँड अबाऊट’ या ई-वृत्तपत्राची वार्ताहर आहे. काही तरी वेगळी खळबळजनक स्टोरी लिहिण्याची तिची तगमग तिला स्वस्थ बसू देत नाही. या वृत्तपत्राचा संपादक केके तिची भेट एसेमदा नावाच्या सत्तर वर्षांच्या सिनिअर रिपोर्टरशी घालून देतो. पूर्वी त्याने बराच काळ चंद्रपूर, गडचिरोली या भागात देशांतर्गत आतंकवादावर काम केलेले असते, पण एका कॉर्पोरेटसच्या नाराजीमुळे त्याला हा भाग सोडावा लागतो. तेथील आदिवासींच्या स्टोरी कव्हरेजसाठी एसेमदा तिला स्टोरी बनवायला चंद्रपूरला पाठवितो. तेथील साधू नावाचा खबऱ्या तिला गडचिरोलीच्या जंगलात खूप आत असलेल्या चारगाव या भागात पोहोचवण्याची व्यवस्था करतो. नागेपल्ली, आतमपल्ली, तांबेपाडा आणि देवठाण या जंगलातील चार गावांच्या समूहाला चारगाव म्हणून ओळखले जाते. संपूर्ण खनिज संपत्तीने संपन्न असे क्षेत्र. पलीकडे अबूजमाड या पहाडी भागात असणारे नक्षलवादी आणि बाजूला मोन्सागिल या शेतीत संशोधन करणाऱ्या कंपनीची वसाहत. तांबे, पितळ इत्यादी धातूची भांडी बनवण्याचे स्थानिक लोकांचे लघुउद्योग या भागात आहेत. सरकारनियंत्रित कॅमेऱ्याने वेढलेल्या या भूभागाची इत्थंभूत माहिती नागोरावदादा आणि देवरावभाऊ सानिकाला देत असतात. त्याच कालावधीत कुण्या एका मोठ्या कॉर्पोरेटला हा चारगावचा खनिजसंपत्तीने विपुल भाग घशात घालायचा असल्यामुळे चारगावला नक्षलवादी ठिकाण म्हणून सरकारपुरस्कृत झालेल्या चकमकीत सानिका धुरूचा नाहक बळी जातो.

नंदासरांनी या कथामालिकेतून सरकार आणि कॉर्पोरेट यातील संगनमत कसे असेल याची शक्यता नोंदवली आहे. स्वार्थाकरता शेतकरी-आदिवासींना नक्षलवादी ठरवून त्यांच्या जमिनीतील खनिजसंपत्तीची लूट चालविली आहे. या कथेतील पहाडे पोलीस म्हणतो, ‘साली चांदा-गडचिरोलीची किस्मत खोटी. जमीन खंदली तर सिमेंटचा गोटा, कोयला, तांबा, लोखंड भेटणार. जमिनीवर चार- बोरापासनं बांबू-सागापर्यंतचे झाडं. जंगल कायदे घरच्यानले चोर ठरवणार!’ मूलनिवासी आदिवासींना नक्षलवाद्यांमध्ये कसे रूपांतरित केले जाते याची नियोजनबद्ध प्रक्रिया या कथामालिकेतून खरेसरांनी उलगडून दाखविली आहे. ‘तीनदा स्टिग्लित्झ’ या लेखात फार चिंतनशील, विचारप्रवृत्त करणारे आणि दाहक वास्तव अमेरिकन अर्थशात्रज्ञ व 2001 चे नोबेल पारितोषिकप्राप्त जागतिक बँकेचा प्रमुख सल्लागार जोसेफ स्टिग्लित्झ यांच्या सिद्धांताच्या आधाराने स्पष्ट केलेले आहे. कोटीतील लाख, लाखातील हजार आणि हजारातील शंभर कशा प्रकारे सत्ताधीश होऊन आपल्याला हवे ते अनुकूल बदल करून घेतात; फक्त शंभर लोकच कसे अदलून-बदलून त्याच पदावर येतात, हे दाखविले आहे. जगाच्या व्यवहारात हक्क हा तुल्यबळांमध्येच उद्‌भवणारा प्रश्न आहे. बलवान त्यांना जमेल ते करतात, आणि दुर्बल त्यांना भोगावे लागते ते भोगतात. ग्रीक इतिहासकार थुकिडायडिजच्या या वाक्याद्वारे ही प्रक्रिया ते स्पष्ट करतात.

‘दिवाणखाण्यातील हत्ती’ या रूपक कथेतून लोकसंख्या आणि दुष्परिणामांवर प्रकाशझोत टाकलेला आहे. लोकसंख्येने व्यक्तीचे व्यक्तीपण हरवले आहे. प्रजा वाढण्याबरोबर ती टिकून राहणे, बहुसंख्य होताना सक्षम होणे किती गरजेचे आहे- या भयावह वास्तवाला भविष्यात किती विराट रूप येईल याचे मौलिक चिंतन या लेखात आलेले आहे.

‘तंबूतला उंट : केवायसी प्लस’ या लेखातून सेवेच्या नावावर know your customer  केवायसी या प्रक्रियेद्वारे आपण वापरत असलेल्या मोबाईल, कॉम्पुटरद्वारे वैयक्तिक माहिती उघड होऊन केवायसी नावाचा उंट आपल्या तंबूत नकळत शिरून आपले खासगीपण संपले आहे. तसेच खुल्या अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञान, पेटंट विकली जातात आणि विकत घेणारे श्रीमंत होतात. विकत घेणारे हे कसे भाडखाऊ/सटोडिये आहेत, हे खरेसर ‘लक्ष्मीची पाऊले’ या लेखातून पटवून देतात. कायद्याची अंमलबजावणी त्यांच्याच सोईची असून हा सर्व प्रकार सर्वसामान्यांना समजू नये म्हणून प्रसारमाध्यमांनासुद्धा यात कसे जुंपले जाते याची चर्चा या लेखात आलेली आहे. ज्या प्रदेशात नैसर्गिक संसाधनं मुबलक असतात, त्या प्रदेशाचा विकास झपाट्याने व्हावयास पाहिजे; पण तसे न होता, ते असणं म्हणजे एक शाप ठरतो. सुस्वरूप कन्या ज्याप्रमाणे आई-बापाच्या छाताडावरील धोंड ठरविली जाते, त्याप्रमाणे या जमिनीचा मालक असणे शाप ठरतो. लेखक या प्रकाराला संसाधनांचा शाप (resource curse)  संबोधतात. ‘ज्याची त्याची श्रद्धा’ आणि ‘सरडे’ या दोन्ही लेखांतून लेखकाने अतिशय गंभीर विषय हाताळले आहेत. 2001 पासून अस्तित्वात आलेले आभासी चलन बिटकॉइनचे संभाव्य धोके आणि स्त्रीभ्रूणहत्येमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नांची चर्चा या लेखांत आलेली आहे.

नंदा खरे हे एक अभियंता आहेत. अभियंता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक विशिष्ट मूस बनलेली आहे. प्रचंड पाश्चात्त्य आणि भारतीय साहित्यवाचनातून आलेली सजगता त्यांच्या लेखनाचा आधारस्तंभ आहे. तशी त्या-त्या क्षेत्रात ती-ती सर्वांची असतेच. म्हणून सर्वांचा दृष्टिकोन परस्परांहून पूर्णतः वेगळा. ‘उद्या’ या कथापुंजात त्यांच्यातील अभियंत्याचे द्रष्टेपण जागोजागी प्रत्ययास येते भविष्यातील शक्याशक्यतेचा वावर त्यांच्या विचारातील अविभक्त घटक असून त्यांच्या लिखाणाचा कॅनव्हास प्रचंड भव्य आहे. त्यांचा वाचक सतत दक्ष राहावा म्हणून विचाराच्या, घटितांच्या नानाविध शक्यता खरेसर निडरपणे मांडतात. डाव्या-उजव्याची चिंता न वाहता मानवतावादी राहणे त्यांना अधिक सोईचे वाटते. स्वातंत्र्यापेक्षा समता, समतेपेक्षा बंधुता त्यांना अधिक महत्त्वाची वाटण्याबरोबरच साहित्यातील मनोरंजनापेक्षा ज्ञान जीवनावश्यक व जीवनोद्धारक घटक वाटतो. केवळ रटाळ, वाचकाच्या बुद्धीला ताण न आणणारे लेखन बहुधा त्यांच्या हातून घडत नाही. लेखक म्हणून विविधता अनुस्यूत असलेले सर्जनशील लेखन करणे हा त्यांच्या लेखणीचा अंगभूत गुण असून त्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून सतत येत असतो. बहुधा सामान्यांच्या दृष्टिक्षेपात न येणाऱ्या घटकांचे वैज्ञानिक/संशोधकाच्या पातळीवर जाऊन निरीक्षण नोंदवणे ही त्यांच्या लेखनाची खासियत ठरते. वर्तमानात सतत डोकावणारी अस्वस्थता त्यांना उद्याच्या दृष्टीने धोक्याची वाटते. या सगळ्या वैशिष्ट्यगुणांनी खरेसर मराठी साहित्यात चाकोरीबाहेरचे लेखक ठरतात. कोणत्याही सभा-समारंभापासून अलिप्तता राखून आपल्या अनन्य शैलीने लेखन करणारे खरेसर ‘द्रष्टा’ लेखक ठरतात. त्यांना दिसलेले उद्याचे जटिल/गुंतागुंतीचे स्वरूप पाहून निश्चितच विचारप्रवृत्त होऊन उद्याचा दिवस तरी गोड होईल, अशी अपेक्षा करू या.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके