डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

या पुस्तकाचे प्रयोजन काय असा कदाचित प्रश्न पडेल. मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, संशोधक यांच्यासाठी हे संकलन उपयुक्त ठरावे, ही या पुस्तकामागची भूमिका आहेच! परंतु, ज्या पुस्तकाने ललितलेखनाचे जुने संकेत मोडीत काढून नवे मानदंड प्रस्थापित केले, जे पुस्तक ललित साहित्याच्या क्षेत्रात अजूनही परमोच्च स्थानावर आहे, ज्या पुस्तकावरची समीक्षा अजूनही स्फटिकरूप झालेली नाही आणि जे पुस्तक अजूनही वाचकाला निर्मळ आनंदाची अनुभूती देते, अशा पुस्तकाचे वाङमयेतिहासाच्या दृष्टीनेही एक महत्त्व असते आणि तसे स्थान त्या पुस्तकाला दिले जाणे अपेक्षित असते. तसे ते मिळावे हा या पुस्तकामागचा उद्देश आहे.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा ‘डोह’ हा 1965 मध्ये प्रकशित झालेला एक नितांतसुंदर ललित लेखसंग्रह आहे. केवळ अकरा लेखांच्या या पुस्तकाने वाचकांच्या मनावर घातलेली भूल अजून उतरलेली नाही. म्हणूनच 1965 सालच्या पहिल्या आवृत्तीनंतर आजपर्यंत या पुस्तकाच्या नऊ आवृत्त्या निघाल्या. सर्व आवृत्त्या ‘मौज प्रकाशना’ने काढल्या. केवळ वाचकप्रियता हे एकच कारण त्यामागे नव्हते, तर या पुस्तकाची गुणवत्ताच तशी होती आणि आहे. 1960 पासूनच यांतील लेखांना ‘मौज’ व ‘सत्यकथा’ या नियतकालिकांमधून पूर्वप्रसिद्धी मिळालेली होती, तेव्हापासूनच मराठीतील जाणकार रसिकांची दाद मिळत गेली. पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्रातून सजग वाचकांच्या प्रतिक्रियांचा ओघ सुरूच राहिला. अजूनही हे पुस्तक अनेकांना तितकेच आकर्षित करत आहे.

हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे ‘मौजे’नेच काढलेले व एका छोटेखानी कार्यक्रमात नुकतेच प्रकाशित झालेले ‘डोह : एक आकलन’ हे पुस्तक. गेल्या पंचावन्न वर्षांत ‘डोह’वर बरीच परीक्षणे आली. समीक्षकांमध्ये वा.ल. कुलकर्णी, सरोजिनी वैद्य, दुर्गा भागवत, द. भि. कुलकर्णी अशी अनेक मातब्बर नावे होती. अनेक मासिके, वर्तमानपत्रे यांतून विखुरलेले हे लेख संग्रहित करावे ही मूळ कल्पना सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांची. ‘डोह’वरील समीक्षेचे वाङमय दृष्ट्या असलेले मोल त्यांनी ओळखले होते. म्हणूनच, त्यांनी हा प्रस्ताव जेव्हा माझ्यापुढे ठेवला, तेव्हा इतके जबाबदारीचे काम मी करू शकेन का, याविषयी साशंकता मनात होती. श्री.सासणे यांची इच्छाशक्ती प्रबळ ठरली आणि मी ‘डोह : एक आकलन’ या पुस्तकाचे संपादन करायचे मान्य केले.

एकदा हे काम करायचे ठरवल्यानंतर मी सामग्री गोळा करत गेले. स्वत: श्रीनिवासांनी त्यांच्या व्यक्तिगत संग्रहातील लेख उपलब्ध करून दिले. ग्रंथालयांमधून इतर लेखनाचा शोध घेतला. गोळा झालेल्या लेखांमध्ये जसे अनेक नामवंतांनी ‘डोह’वर लिहिलेले लेख होते, तसेच त्यांच्या ‘सोन्याचा पिंपळ’ (1975), ‘पाण्याचे पंख’ (1987), ‘कोरडी भिक्षा’ (2000) या पुस्तकांवरचेही लेख होते. काही लेख श्रीनिवासांवर लिहिलेले होते. श्रीनिवासांची ‘माझ्या साहित्याच्या प्रेरणा’ या विषयावर पुणे आकाशवाणीवरून 2005 मध्ये पाच भाषणे प्रसारित झाली होती. तीही त्यांनी लिखित स्वरूपात माझ्या हाती सोपवली. या पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया नीटपणे आकळून घ्यायची असेल, तर हे सर्वच लेखन समाविष्ट करणे योग्य ठरेल असे वाटले. आज पंचावन्न वर्षांनंतरही ‘मराठी ललित गद्याचा परमोच्च आविष्कार’ असे बीरुद मिरवणाऱ्या या पुस्तकाचे परिपूर्ण व समग्र आकलन व्हावे, यासाठी ते गरजेचे वाटले. त्या दृष्टीने उपलब्ध लेखांची विषयवार वर्गवारी केली.

पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिताना ‘डोह’ हे सूत्र सोडायचे नाही असे ठरवले. ‘डोह’ला अनन्यसाधारणत्व प्राप्त करून देणाऱ्या विविध घटकांची मांडणी प्रस्तावनेतून केली. प्राप्त झालेल्या लेखांमध्ये मुद्यांची सरमिसळही झाल्यासारखी वाटत होती. त्याला प्रस्तावनेतून एक आकार प्राप्त करून देणे गरजेचे होते. पुस्तकातील अनुभवविश्व, बालमन व प्रौढमनाचा अनोखा आविष्कार, ललित लेखनातून प्रकट होणाऱ्या ‘मी’चे वेगळेपण,  पंचेंद्रियांना आवाहन करणाऱ्या संवेदना व पंचमहाभूतांचा आविष्कार, भाषिक समृद्धी अशा अनेक गुणवैशिष्ट्यांचा उहापोह प्रस्तावनेत केला आहे. तसेच अभ्यासाच्या आणखी दिशाही प्रस्तावनेतून सुचवल्या आहेत.

श्रीनिवासांची जडणघडण, बालपणी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, पंचेंद्रियांद्वारे अनुभव घेण्याची त्यांची निसर्गदत्त क्षमता आणि ती अनुभूती तितक्याच प्रत्ययकारी शब्दांतून वाचकापर्यंत पोहोचवण्याची त्यांची हातोटी हे सर्व पैलू पुस्तकांतून आपल्यासमोर येणार आहेतच! पण इथे विशेषत्वाने मला लक्ष वेधायचे आहे ते श्रीनिवासांच्या भाषेकडे. ‘डोह’ची भाषाशैली हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. अंगभूत सौंदर्याने युक्त अशी ही भाषा श्रीनिवासांना कशी सापडली? पंचेंद्रियांद्वारे अनुभव घेण्याची त्यांची शक्ती जितकी अद्‌भुत, तितकीच तो अनुभव व्यक्त करण्यासाठी लागणारी प्रभावी शब्द्‌कळा सापडणे हीसुद्धा अद्‌भुत अशीच गोष्ट आहे.

श्रीनिवास जिला शब्दशक्ती म्हणतात, तिचे नेमके स्वरूप काय? वर्ण्यविषयाशी तादात्म्य पावण्याशी हिचे काही नाते आहे काय? याचा शोध विशेषत्वाने घ्यायला हवा. सर्वच समीक्षकांनी ‘डोह’मधील भाषासौंदर्याबद्दल लिहिलेले आहे. परंतु श्रीनिवासांच्या भाषाशैलीविषयी स्वतंत्र लेख लिहिला गेलेला नाही. वस्तुत: श्रीनिवासांची कोमल आरस्पानी भाषा हा मराठी साहित्याचा अद्भुत असा ठेवा आहे. भाषाभ्यासकांनी विशेषत्वाने भाषिक अंगाचा अभ्यास करावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.

या पुस्तकाचे प्रयोजन काय असा कदाचित प्रश्न पडेल. मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, संशोधक यांच्यासाठी हे संकलन उपयुक्त ठरावे, ही या पुस्तकामागची भूमिका आहेच! परंतु, ज्या पुस्तकाने ललितलेखनाचे जुने संकेत मोडीत काढून नवे मानदंड प्रस्थापित केले, जे पुस्तक ललित साहित्याच्या क्षेत्रात अजूनही परमोच्च स्थानावर आहे, ज्या पुस्तकावरची समीक्षा अजूनही स्फटिकरूप झालेली नाही आणि जे पुस्तक अजूनही वाचकाला निर्मळ आनंदाची अनुभूती देते, अशा पुस्तकाचे वाङमयेतिहासाच्या दृष्टीनेही एक महत्त्व असते आणि तसे स्थान त्या पुस्तकाला दिले जाणे अपेक्षित असते. तसे ते मिळावे हा या पुस्तकामागचा उद्देश आहे.

तूर्तास इतकेच ! पुस्तक परिपूर्ण व्हावे यासाठी मी मनापासून प्रयत्न केला आहे. काही त्रुटी असतीलही. ती जबाबदारी माझीच आहे. जाणकारांच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. ललितसाहित्याच्या अभ्यासकांना या पुस्तकाची मदत झाली तर ती मोठीच फलश्रुती ठरेल.

Tags: मराठी कोरडी भिक्षा पाण्याचे पंख सोन्याचा पिंपळ ललित लेखसंग्रह डोह श्रीनिवास विनायक कुलकर्णी koradi bhiksha panyache pankh sonyacha pimpal lalit lekhsangrah doh shriniwas winayk kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात