Diwali_4 बहुजनगायक
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

भीमसेन हे सुदैवी ठरले ते अशा दृष्टीने की त्यांना किराणा घराण्याची तालीम मिळाली. हे घराणे मुळातच गायकाला काहीशी मोकळीक देणारे. इतर काही घराण्यांत असते तशी पोलादी चौकट नसलेले. भीमसेनांची मुळातली भटकेपणाची आवड आणि संगीत व एकूण जीवन यांविषयीची कलंदर वृत्ती यांचे किराणा घराण्याला वावडे नव्हते. भीमसेननी पुष्कळ जग पाहिले, खूप संगीत ऐकले, सर्व घराण्यांतल्या दिग्गजांचे कर्तृत्व समजावून घेतले. ते जसे घडत गेले तसे त्यांनी सर्वांतले उत्तम गुण आत्मसात केले. त्यांच्या याच गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांची मैफिल ऐकल्यावर वाटायचे, हे पूर्ण संगीत आहे.  

हा एका युगाचा अस्तच म्हणायला हवा. खरोखरच, नजीकच्या भूतकाळाच्या संदर्भात ही गुळगुळीत शब्दयोजना दुसऱ्या कुठल्या घटनेसाठी योजावी अशा योग्यतेचं काही घडलंच नाही. एखाद्या प्रस्तरशिल्पाच्या मोजमापाचा महापुरुष, भीमसेन जोशी, आता आपल्यात राहिला नाही. उण्यापुऱ्या सहा दशकांच्या सांगीतिक कारकिर्दीचे ताणतणाव ज्या देहाने सोसले त्याला शेवटी मृत्युशरण व्हावेच लागले. संगीत हा ज्यांचा जीवनरस होता ते भीमसेन जोशी त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात चिरकाल वास्तव्य करून राहतील. अगदी त्यांच्या कठोर टीकाकारांच्या मनातही संभ्रमच राहील की त्यांच्यासारखे कर्तृत्व भारतीय संगीताच्या क्षेत्रात पुन्हा कधी पाहायला मिळेल का?

भीमसेनजींच्या बाबतीत सगळ्यांत मोठी गोष्ट अशी होती की ते गायक बनले स्वत:च्या निवडीने. ही निवड त्यांनी अगदी कोवळ्या वयात केली आणि बाकीचे पर्याय निश्चयपूर्वक बाजूला सारले. गदगमध्ये एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात ते जन्मले. त्यांना पोसण्याची त्यांच्या पालकांची असमर्थता त्यांनी समजावून घेतली आणि संगीताची आणि त्यातील गुरू शोधण्याची मार्गक्रमणा त्यांनी स्वत:च्या हिमतीवर सुरू केली. थांबणे त्यांना माहीतच नव्हते. मग ते रेल्वेच्या तिकिटासाठी असो की आश्रयदात्यासाठी. त्यांच्या आयुष्यातली ही काही हरवलेली वर्षे होती - जशी ती शेक्सपीअरच्या आयुष्यात होती. त्या काळात कुणाच्या गावीही नव्हते की एक थोर संगीतकार आकार घेतो आहे. त्या काळातल्या एका शुभ घटनेबद्दल नियतीचे आभारच मानले पाहिजेत. त्यांचा पं. विनायकराव पटवर्धनांशी परिचय झाला. विनायकराव हे मिशनरी वृत्तीने संगीताचा प्रसार करणारे आचार्य. त्यांना घडवले ते थोर गानमहर्षी पं. विष्णु दिगंबर पलुसकर यांनी आणि ते आता पाकिस्तानात असलेल्या लाहोर येथे असतात.

विनायकरावांनी भीमसेनना पटवून दिले की त्यांना गुरू शोधण्यासाठी इतके लांब यायचे कारण नव्हते. संगीताचार्य, रामभाऊ कुंदगोळकर धारवाड जिल्ह्यातल्या कुंदगोळमध्ये म्हणजे अगदी शेजारीच वास्तव्य करून होते. हे ऐकून भीमसेननी अधिक वेळ न घालवता कुंदगोळ गाठले. त्यांना गुरू भेटला. ह्याच गुरूचे नाव पुढे त्यांनी पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत संमेलनाद्वारे अमर केले.

‘गुरु-शिष्य परंपरा’ हा एक मोठाच शब्दप्रयोग. पण भीमसेनांच्या उभारीच्या काळातले गुरू हे आजच्या संगीताच्या प्राध्यापकांसारखे नव्हते. ते शिष्याची प्रथम कठोर सत्त्वपरीक्षा घेत आणि नंतर अधूनमधून शिकवीत. भीमसेननी दोन कामांना स्वत:ला जुंपून घेतले. पहिले- त्यांनी गुरुघरचे सगळे काम कुणीही न सांगताच स्वत: करायला सुरुवात केली. आणि दुसरे- गंगूबाई हनगलांच्यासारखे ज्येष्ठ विद्यार्थी शिकवणीसाठी आले की त्यांची तालीम लक्षपूर्वक ऐकायची. गंगूबाईंच्या रूपाने त्यांना एक प्रेमळ थोरली बहीण आणि संगीत सहाध्यायी मिळाली. अखेरीला सवाई गंधर्वांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली, पण त्यांच्या सर्व शिष्यांनी निर्वाळा दिलेला आहे की ते खऱ्या अर्थाने क्वचितच शिकवीत. ते विद्यार्थ्यांना स्वर, ताल, लय, राग आणि बंदिश असे मूळ धडे देऊन रियाजाच्या रिंगणात उतरवीत आणि स्वत:ची लढाई स्वत: लढायला सोडून देत.

भीमसेननी जो काही रियाज केला त्याच्या आता कहाण्या बनल्या आहेत. स्वत:चा आवाज घडवण्यात घालवलेले तासच्या तास ह्यांच्या आणि ते जे काही शिकले ते आपलेसे करून त्यातून स्वत:ची एक प्रणाली घडवली त्याच्या. वर्षानुवर्षे त्यांनी अशा रियाजात व्यतीत केली आणि ते मैफिलीच्या दुनियेत प्रवेश करते झाले- यशस्वी गायकाच्या सगळ्या वैशिष्ट्यांनिशी. तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा एक बुलंद, घुमारेदार, पुरुषी आवाज, तालावरची पुरेशी पकड, लयीसंबंधीची सूक्ष्म दृष्टी, लोकप्रिय रागाविषयीची सखोल जाणकारी आणि पारंपरिक तसेच नव्या बंदिशींचा मोठा संग्रह. ही सर्व वैशिष्ट्ये आगामी काळासाठी त्यांची बोधचिन्हे बनली. एका अर्थाने त्यांच्यावर भाग्यलक्ष्मी प्रसन्न होती असे म्हटले पाहिजे (सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा - हे त्यांचेच एक गाजलेले कानडी गीत)

संगीत मैफलीच्या क्षेत्रात त्या वेळी मोठीच पोकळी जाणवू लागली होती. कुमार त्यांच्या आजारपणामुळे मैफिली करू शकत नव्हते. द.वि. पलुसकरांचं अकाली देहावसान झालं होतं. वसंतराव देशपांडेंना ते चाकरी करीत असलेल्या मिलिटरी हिशेबखात्याने आसामची हवा खायला पाठवून दिलं होतं आणि पं. मल्लिकार्जुन मन्सूरांची गानप्रतिभा हे सर्वसामान्य श्रोत्यांच्या कुवतीबाहेरचे प्रकरण होते. भीमसेननी ही पोकळी आत्मविश्वासपूर्वक आणि तितक्याच नम्रतेच्या भावनेने भरून काढली. ह्या सर्व गुणवंत समकालीनांविषयी त्यांना प्रेमादर होता. मैफलींचे संयोजक हे गुरूंइतकेच कसोटी पाहणारे महाभाग होते. तीन आकड्यांत बिदागी मिळण्यासाठी भीमसेनना दीर्घ काळ वाट पाहावी लागली. पण त्यांनी मोठ्या उत्साहाने आणि निष्ठापूर्वक आपली साधना चालू ठेवली. श्रोत्यांना त्यांनी नेहमीच अग्रभागी ठेवले. संयोजकांना त्यांनी लहरीपणा करून कधीच छळले नाही. (पुष्कळदा त्यांना ते मैफिलीनंतरच्या आनंदसोहळ्यासाठी आमंत्रण देत.) अशा रीतीने ते बहुजनगायक बनले आणि अशा बहुजनगायकाला आपण आज मुकलो आहोत.

भीमसेन हे सुदैवी ठरले ते अशा दृष्टीने की त्यांना किराणा घराण्याची तालीम मिळाली. हे घराणे मुळातच गायकाला काहीशी मोकळीक देणारे. इतर काही घराण्यांत असते तशी पोलादी चौकट नसलेले. भीमसेनांची मुळातली भटकेपणाची आवड आणि संगीत व एकूण जीवन यांविषयीची कलंदर वृत्ती यांचे किराणा घराण्याला वावडे नव्हते. भीमसेननी पुष्कळ जग पाहिले, खूप संगीत ऐकले, सर्व घराण्यांतल्या दिग्गजांचे कर्तृत्व समजावून घेतले. ते जसे घडत गेले तसे त्यांनी सर्वांतले उत्तम गुण आत्मसात केले. त्यांच्या याच गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांची मैफिल ऐकल्यावर वाटायचे, हे पूर्ण संगीत आहे. भले ते मैफिलीत सादर करीत असलेल्या रागांची संख्या मर्यादित होती. त्यांचे टीकाकार म्हणायचे, ते ठराविक रागच गातात. त्यावर भीमसेनांचं उत्तर होते- ‘श्रोत्यांना ते राग आनंद देतात आणि त्यांचा आनंद तो माझा आनंद’ आणि ते खरंच होतं. त्यांच्या सर्वसामान्य चाहत्यांना आणि मर्मज्ञांनासुद्धा त्यांच्या तोडी, दरबारी, मिया की मल्हार, मालकंस यांसारख्या रागात प्रत्येक वेळी नवनिर्मिती ऐकल्याचा आनंद मिळत असे.

भीमसेन हे आजीवन सामर्थ्य आणि ऊर्जा ह्यांचेच दुसरे नाव होते. त्यांच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत, त्यांची प्रकृती सणसणीत. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पंचावन्न मैफिली करायच्या, सुसाट वेगाने मैफिलीच्या जागेपर्यंत कार पळवायची, पुढच्या मैफिलीच्या ठिकाणापर्यंत रात्रभर ड्रायव्हिंग करायचं, मद्याचा अमर्याद साठा (त्यांच्या मध्यवयाच्या काही वर्षांत) उदरी बाळगायचा, प्रसंगोपात्त गरज वाटल्यास- चुरचुरीत आणि खरमरीत सुद्धा - भाषणे करायची - सशक्त मन आणि कुशाग्र बुद्धी. प्रसंग पडल्यास अतिचिकित्सक टीकाकारांना आणि भोचक माध्यमकारांना त्यांनी चूप बसवले आहे. कधी पूर्णसत्य सांगून तर कधी अर्धसत्यही.

सवाई गंधर्व समारोहासारखा जंगी उपक्रम वर्षानुवर्षे अगदी एकाकीपणे राबवायचे आणि आयुष्यातल्या चढउतारांना बेधडकपणे सामोरं जायचे. वसंतराव देशपांडे आपल्यातून गेले तेव्हा कुमार म्हणाले होते ‘‘निधन पावलेल्यांना आपण गमावत नसतो. ते आपल्या अंत:करणात कायमचे राहण्यासाठी येतात आणि आपल्या अस्तित्वाचे भाग बनून जातात.’’ त्यानंतर कुमार गेले आणि आता भीमसेन. ही यादी कालक्रमानं लांबत राहील. पण कालवश झालेले आपल्यातून तसे जातील का? संगीताचे भीमसेन गेले. ‘‘सम्राट चिरायू होवोत.’’ सम्राटाच्या निधनाची घोषणा अशीच करतात.

(अनुवाद : अरुण भागवत)

Tags: अरुण भागवत विनय हर्डीकर भीमसेन जोशी सवाई गंधर्व संगीत महोत्सव सवाई गंधर्व संगीत शास्त्रीय संगीत arun bhagwat shastriya sangeet music savai gandharv vinay hardikar Bhimsen joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Maruti Lhayakar- 18 Sep 2020

    विनय हर्डीकर यांचे सर्वच लेख अत्यंत मार्मिक, सम्यक दृष्टीचे, संदर्भसंपन्न, गुण दोषांचे परिपूर्ण भान असलेले असतात.

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात