डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

तज्ज्ञ हा विशिष्ट विषयातला जाणकार असल्यामुळे त्या विषयाचं जे एक शास्त्र असतं त्या-अनुरूप तो भूमिका घेईलही; पण राजकीय माणसाला व्यवहार्य भूमिका हवी असते आणि हातात घेतलेल्या प्रश्नाची सोडवणूक योगायोगाने झालीच तर त्या सोडवणुकीतला एक महत्त्वाचा घटक म्हणून आपलं नाव लागेल याचीही खबरदारीही त्याला घ्यायची असते. सगळीकडे आपल्या नावाचे बोर्ड लावता यावेत म्हणून सर्वत्र पुतळे उभे केले जातात अशी टीका तुम्ही राजकारण्यांवर करत होता. काही राजकीय नेते तर इतके महान निघाले की, त्यांनी आपल्या हयातीत आपल्या पुतळ्यांची उद्घाटनं स्वतःच केली. त्यामुळे तुमची टीका बरोबरच होती. पण तज्ज्ञ आणि राजकारणी यांचा एकत्र येण्याचा कोणता बिंदू होता?

वि. म. दांडेकर सर,
नमस्कार,

खूप दिवसांनी तुमच्याशी गप्पा माराव्यात  असं वाटतं आहे. जुनी गोष्ट आहे, तुम्ही गोखले इन्स्टिट्यूटमध्ये होता तेव्हाची. मी इंडियन एक्सप्रेसचा प्रतिनिधी होतो. तुम्हाला कधी कुणी पत्रकाराने फोन केला की, फोनवरच वसकन ओरडून ‘हे पाहा मला कामं असतात,  उगाच ‘देश कुठे चालला आहे’ असल्या गप्पा मारायला मला वेळ नाही’ अशाच प्रकारचं तुमचं पहिलं उत्तर असायचं. एकदा मात्र मी तुमच्यावर कुरघोडी केली म्हणायला हरकत नाही. मी तुम्हाला म्हटलं, “देश कुठे चालला आहे हे आम्हाला माहीत आहे कारण आम्ही त्याच धंद्यात आहोत, दांडेकर कुठे चालले आहेत याची उत्सुकता आहे” कारण त्या वेळेला पत्रकारितेतला माझा वरिष्ठ प्रकाश कर्दळे याने ‘पुणे नोटबुक’ नावाची दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारी लेखमाला सुरु केली होती. पुण्यातले महत्त्वाचे नागरी प्रश्न आणि तुमच्यासारखी वेगवेगळ्या विषयांवरची अधिकारी मंडळी यांच्या मुलाखती आम्ही आलटून-पालटून छापायचो. त्यासंदर्भात तो फोन मी तुम्हाला केला होता त्यावर तुम्ही म्हणालात, “तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी? माझी कामं मला करू द्या.” पण नंतर तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आम्ही तुमची मुलाखत घेतली. काही योगायोगांचं मला नेहमी आश्चर्य वाटतं त्यातला तो एक होता.

तुमची - माझी (आमच्या दृष्टीने) शेवटची भेट आठवते. तुमचं निधन झालं होतं आणि तुमची मुलं परदेशातून यायची होती. त्यामुळे दोन दिवस तुम्हाला बर्फाच्या पेटीत ठेवलेलं होतं. तुमच्या अंत्यविधीसाठी गोविंदराव तळवलकर मुंबईहून मुद्दाम आले होते. (गोविंदरावांची आणि तुमची लव्ह-हेट रिलेशनशिप शेवटपर्यंत असावी; निदान गोविंदरावांच्या बाजूने) कोल्डरूममधून बाहेर काढल्यानंतर कुठल्याही वस्तूवर बाष्प जमायला सुरवात होते, तसे तुमच्या चेहर्‍यावर ‘घर्मबिंदू’ जमले होते. तुमचं नेहमीचं दर्शन आणि ते दर्शन याचा कुठे मेळच घालता येत नव्हता. दोन दिवस फ्रीजिंग टेम्परेचरला असल्यामुळे तुमच्या गौर कांतीवर करडी छटा आलेली होती. डोळे मिटलेले होते. आणि तुमची सगळी ताकद तर तुमच्या डोळ्यांमध्येच होती! चष्मा असूनही काही लोक भेदक डोळे सांभाळून असतात, अशांमध्ये तुमचा नंबर फार वरचा होता. गोविंदरावांनी मला मुद्दाम स्वतःजवळ बसवून घेतलं होतं. ते म्हणाले, "इथे बसा, म्हणजे मला कोणी त्रास द्यायला येणार नाही". मी मनात म्हटलं, "यांच्या एका बाजूला दांडेकर आणि दुसऱ्या बाजूला विनय हर्डीकर! त्यामुळे गोविंदरावांना आज कुणीच काहीच त्रास देणार नाही." तुमच्या घरच्या मंडळींनी तुम्हाला निरोप देताना फारच धार्मिक अवडंबर माजवलं होतं. त्यावर गोविंदराव अतिशय तुच्छपणे म्हणाले, “हे अमेरिकेत स्थायिक झाले आहेत ना! त्यामुळे भारतात आले की, मुद्दाम अशी थेरं करतात.” मी म्हटलं, "गोविंदराव, एखादवेळेस दांडेकरच उठतील आणि 'हे सगळं बंद करा आणि आधी त्या भटजीला हाकलून द्या' असं सगळ्यांना सुनावतील”. हा ब्लॅक ह्यूमरच म्हणायला पाहिजे. आलेलं हसू दाबताना गोविंदरावांचा कसनुसा झालेला चेहरा मला अजूनही आठवतो.

तुम्ही गेलात आणि भारतातला एक खणखणीत आवाज निघून गेला असं मला तेव्हाही वाटत होतं, आजही वाटतं. तुमच्या खणखणीत आवाजाच्या कथा आणि दंतकथा सगळीकडे पसरलेल्या होत्याच.

तुमच्या निधनानंतर पंचवीस वर्षांनंतर का होईना, पुणे विद्यापीठाला तुमची आठवण झाली आणि तुमचा स्मृतिग्रंथ त्यांनी प्रकाशित केला आहे. त्यात प्रदीप आपटेचा लेख आहे. (सर, प्रदीपला ‘बिचारा’ म्हणावा असा हा एकमेव योग आहे की, तो तुमचा आणि माझा - दोघांचाही विद्यार्थी आहे) त्यात तुमच्या खणखणीत आवाजाची अनेक उदाहरणे त्याने दिलेली आहेत. तो लेख वाचल्यानंतर मी बर्‍याच वर्षांनंतर पहिल्यांदाच नॉस्टॅल्जिक झालो, कारण तो वाचल्यानंतर मलाही तुमच्या खणखणीत आवाजाच्या अनेक आठवणी यायला लागल्या. म्हणून म्हटलं त्या सगळ्या तुम्हालाच सांगाव्यात. कारण तुम्ही बोलत होता ते तुमच्या नैसर्गिक स्वरातच बोलत होता. मुद्दाम खणखणीत आवाज तुम्ही कधी काढला असेल; वाचिक किंवा भाषिक अभिनय केला असेल असं तर तुमच्या बाबतीत घडूच शकत नाही. भर्तृहरीचं मला अतिशय आवडणारं एक वाक्य आहे. 'नृपतिजनपदानां दुर्लभ कार्यकर्ता' - एकाच वेळेला राजा आणि प्रजा या दोन्ही पातळ्यांवर वावरु शकणारा कार्यकर्ता दुर्मिळ असतो. त्या ओळीत मी तुमच्यासारख्या व्यक्तींसाठी एकच बदल करतो. नृपतिजनपदानां दुर्लभ ‘स्पष्टवक्ता'! त्यातलं काहीच स्पष्टवक्तेपण माझ्यामध्येही आहे असं लोक म्हणतात.  अभ्यासातून आलेलं सत्य अप्रिय असलं तरी स्पष्टपणे मांडलं पाहिजे हे तुमचं ब्रीद होतं. तो कदाचित तुमच्या-माझ्यामधला समान धागा असावा. नाही तर मी तुमचा विद्यार्थी नाही, समवयस्क नाही, मित्र नाही, सहकारी नाही; तरीसुद्धा 1980च्या दशकात संपूर्ण दशकभर आपली अतिशय (जवळीक तर तुमच्याशी कुणाची होऊ शकेल असं शक्यच नव्हतं) चांगली मैत्री होती.

आपली ओळख होण्याआधी गोखले इन्स्टिट्यूटशी माझा संबंध फारसा नव्हता. पण ही काहीतरी मान्यवर, मातब्बर संस्था आहे; तिथे मोठमोठी माणसं बसलेली असतात आणि ती मोठमोठे अहवाल तयार करतात हे येता जाता ऐकून माहीत होतं. काहीवेळेला गोखले इन्स्टिट्यूटमधल्या अर्थशास्त्रीय पंडितांचा उल्लेख मी ‘लोकांच्या गरिबीवर लिहून आणि बोलून श्रीमंत होणारी माणसं’ असाही केला होता. आणि त्या वेळेला आणि त्या वेळेला तुम्ही माझ्या मनात नव्हताच असं नाही. कारण ‘Poverty in India’ हे तुमचं नीळकंठ रथ यांच्याबरोबर लिहिलेलं, भारतातल्या गरिबीची मीमांसा करणारं त्यावेळचं एकमेव उपलब्ध पुस्तक होतं. त्याचं मराठी भाषांतर नंतर उपलब्ध झालं. भारतातल्या गरिबीचा अभ्यास करणाऱ्यांचं ते त्यावेळी बायबल होतं. पण गोखले इन्स्टिट्यूटबद्दल मला आत्मीयता वाटावं असं तोवर काहीच नव्हतं. मी देशभक्तीच्या मार्गाने आलेला माणूस होतो! आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (ज्याच्याशी तुमचाही काही संबंध आलेला होता) आणि नंतर ज्ञानप्रबोधिनी इथून मी इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेलो होतो. आणि तिथे आल्यानंतर आर्थिक विषय माझ्या डोळ्यांसमोर यायला लागले. निदान पुण्यातल्या अर्थतज्ज्ञांशी आपण संपर्क ठेवला पाहिजे असं वाटायला लागलं. गोखले इन्स्टिट्यूटशी माझा पहिला संबंध 1972-73च्या दुष्काळात आलेला होता. ज्यांना तुमचा अँटिथीसिस असं प्रदीपने म्हटलं आहे त्या डॉ. काकडे यांना मी दुष्काळाची प्राथमिक माहिती घेण्यासाठी भेटून गेलो होतो. ते अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते. त्यांनी मला एक मोठा अहवाल दिला आणि सांगितलं की, याच्यात तुम्हाला सगळी माहिती मिळेल पण हा काही परिपूर्ण नाही. शेवटी जाताजाता त्यांनी त्यांच्या कापऱ्या-कापऱ्या आवाजात ‘you can dot some I’s and cross some t’s’ असंही म्हटलं हे माझ्या लक्षात राहिलं आहे. पण त्यानंतर पुन्हा गोखले इन्स्टिट्यूटशी माझा संबंध यायचं काही कारण नव्हतं, पुढे जो संबंध आला तो तुमच्यामुळेच.

प्रत्यक्ष तुमची भेट होण्याच्या आधी मला तुमच्या स्वभावाची ओळख महाराष्ट्रामध्ये जो एक मोठा वाद झडून गेला होता त्या वेळेला झाली होती. महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला अमुक इतकी वर्षं झाली म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम झाला. त्या वेळेला प्रमुख वक्ते तुम्ही होता. चव्हाणसाहेब कार्यक्रमाला आहेत म्हटल्यानंतर काँग्रेसवाल्यांची गर्दी होती. त्यांच्याबरोबरीने सहकारातील खरे महर्षी, खोटे महर्षी, ज्यांच्यावर महर्षीपणा लादला गेला आहे असे महर्षी, ज्यांनी महर्षीपणावर स्वतःला लादलं आहे असे महर्षी असे सगळे हौशे, नवसे, गवसे तिथे आलेले होते. अगदी ज्यांना मनापासून नमस्कार करावा इथपासून ते ज्यांना जोड्याने मारावं इथपर्यंत सगळे सभागृहात हजर होते. आणि तिथे तुम्ही स्पष्ट सांगितलंत की, ही सहकारी साखर असली तरी ती गोड नाही; कडू आहे. महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीचा इतका कठोर परामर्श तुम्ही घेतलात की, त्या कार्यक्रमाला हजर असलेले यशवंतराव चव्हाण लालबुंद झाले (असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. पण हे काही वास्तव वर्णन नाही. तुमचाच बाणा कायम ठेवायचा तर यशवंतराव ‘जांभळे’ झाले असतील असं मला म्हणायला पाहिजे). कुणाचाही मुलाहिजा न ठेवता महाराष्ट्रातील साखर कारखानदारी राजकीय पुढार्‍यांनी आपल्या राजकारणाच्या वेठीला कशी बांधली ते तुम्ही आपल्या भाषणात सांगितलं. (त्यातला आर्थिक मुद्दा पुढे शरद जोशींनी उचलला याचीही मला इथे नोंद केली पाहिजे) साखरेवर 65 टक्के लेव्ही बसवल्यामुळे साखर कारखानदारीचं कसं नुकसान झालं आणि त्याचं ओझं साखरसम्राटांनी शेतकऱ्यांवर कसं टाकलं हे गणित शरद जोशींनी मांडलं तर साखर कारखानदारी - विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातली सहकारी साखर कारखानदारी - संपूर्णपणे राजकारणाच्या दावणीला कशी बांधली गेली हे तुम्ही मांडलं. मी हे माझं भाग्य समजतो की, तुम्ही आणि शरद जोशी यांचा मला एकाच वेळेला चांगला सहवास मिळाला आणि दोघांनाही प्रश्न विचारता आले. त्यामुळे तुम्हा दोघांपैकी एकाच्याही आहारी मी पूर्णपणे गेलो नाही. ते तुमचं भाषण झालं आणि दुसऱ्या दिवशी त्याचे वृत्तान्तही छापून आले. गोविंदराव तळवलकरांचा अग्रलेख होता. गोविंदरावांनी लिहिलं होतं, 'दांडेकर कसे बोलले असतील, कसे मध्ये मध्ये त्यांनी मिश्कीलपणे कसे डोळे मिचकावले असतील, कसे टोमणे मारले असतील याची कल्पना आम्ही करू शकतो...' गोविंद तळवलकरांपासून मुंबई विद्यापीठाचे रेक्टर गोवर्धन पारीख यांच्यापर्यंत सगळे यशवंतरावांच्या बाजूला आणि तुम्ही एकटे, असा तो प्रसंग होता.

या प्रसंगामुळे तुमच्याविषयी मला माहीत होतंच. पण अर्थशास्त्र हा विषयाचं माझं वाचन सुरु झालं तेच मुळात पदवीधर झाल्यानंतर. त्यावेळी मी रॉबर्ट हेल्ब्रॉनरचं ‘वर्ल्डली फिलॉसॉफर्स’ (ज्याचं 'अर्थशास्त्राचे शिल्पकार' या नावाने चांगलं भाषांतर बाळ गाडगीळ यांनी केलेलं आहे) हे इंग्लिश पुस्तक फक्त वाचलं होतं. त्याच्यातून उत्सुकता जागी झाली म्हणून शुंपिटरचं ‘टेन ग्रेट इकॉनॉमिस्टस्’ वाचलं. त्याच्यातून उत्सुकता जागी झाली म्हणून केन्सचं चरित्र वाचलं… असं माझं अर्थशास्त्राचं वाचन जुजबी होतं. परंतु हे प्राथमिक वाचनसुद्धा मी वयाची विशी ओलांडल्यानंतर केलेलं होतं. त्यावेळेला मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये नुकताच शिक्षक म्हणून रुजू झालेलो होतो. गांधी जयंतीला कोणाला बोलवायचं याची चर्चा प्रबोधिनीत सुरू झाली. माझ्या मनात सहज असं आलं की, वि. म. दांडेकर यांना बोलवावं का? माझ्या मनात असं का आलं माहीत नाही. तुम्ही गांधींचे कठोर टीकाकार असूनही नखशिखान्त खादीच्या पोशाखात असायचा. एवढंच नव्हे, ते खादीचे गोधडी म्हणावे असे कपडे पहाटे उठून तुम्ही स्वतःचे स्वतः धुवायचा, त्यावेळी तुमच्या घरातली माणसं तुमच्या खुडबुडीमुळे वैतागून जायची हे सगळं तुम्हीच मला नंतर सांगितलं होतं. कदाचित मला असं वाटलं असेल की, गांधीजयंतीचा नेहमीचा जो कार्यक्रम असतो त्याहून वेगळा कार्यक्रम व्हायचा असेल तर वेगळ्या माणसाला बोलवायला हवं. 1972 च्या 2 ऑक्टोबरची ही गोष्ट आहे. गांधी जन्मशताब्दी उलटून तीन वर्षं झालेली होती. अर्थशास्त्रातलाच मुद्दा आहे म्हणून तुम्हाला सांगतो. जयप्रकाश नारायण यांना एक लाख रुपयांची देणगी चेकने द्यायला कोणी तयार नव्हतं. सगळ्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही चेक मी मागणार असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील. कॅश मागणार असाल तर तुम्हाला पाच लाख रुपयेसुद्धा आम्ही देऊ. ‘गांधी स्मारक निधी’साठी जयप्रकाश देशभर आवाहन करत होते. देश किती सडला आहे हे जयप्रकाश नारायण यांनी 1974 पासून मांडायला सुरुवात केली त्याचा झटका त्याच्या पाच वर्षं आधी गांधी स्मारक निधीच्या निमित्ताने त्यांना बसलेला होता. मी तुमच्याकडे आलो त्याला हेही कारण असेल. आपली ओळख नव्हती. तुम्ही म्हणालात, “गांधी जयंती आणि शाळेचा कार्यक्रम? डोकंबिकं फिरलं का तुमचं?” तुम्हाला भेटायला आल्यानंतर हे असं ऐकून घ्यायला लागणार आहे यासाठी मनाची तयारी झालेली होती त्यामुळे मी काही ते मनाला लावून घेतलं नाही. मी म्हटलं, “पण सर आम्हाला नेहमीचं भाषण नको आहे.” तुम्ही विचारलंत, “तुमची शाळा कितवीपर्यंत आहे? मी म्हटलं, “बारावीपर्यंत आहे” “त्या मुलांच्या समोर मी काय बोलणार?” “पण सर आमची शाळा जरा वेगळी आहे. आमची मुलं निवडून घेतलेली असतात. त्यामुळे तुम्ही कल्पना करत असलेल्या दहावी-बारावीच्या इतर मुलांपेक्षा ती नक्कीच वरचढ असतील. तुम्ही प्लीज माझी विनंती मान्य करा. तुम्हालाही कदाचित नंतर बरं वाटेल.” “बरं बरं येईन मी. पण फार मोठं भाषण वगैरे काही करणार नाही. तुम्ही गळच घातली आहे आणि चांगली संस्था आहे म्हणून येईन” मला सतत काळजी होती की, आता पुढे काय होणार? मी तुम्हाला विचारलं होतं की, तुम्हाला आणायला-न्यायला कोणाला पाठवावं का? तर तुम्ही म्हणालात, “पुणं माझंच गाव आहे. मला पत्ता माहीत आहे. माझा मी येईन.” त्याप्रमाणे तुम्ही आलात. ज्ञानप्रबोधिनीचा गणवेश त्या वेळेला पांढरी सुरवार आणि पांढरा झब्बा असायचा. पांढरा झब्बा तर तुमचा होताच. सुरवार तुम्ही वापरत नव्हता, नॅरो पायजमा वापरायचा. त्यामुळे पोषाखापासूनही काही ‘मॅचिंग’ व्हायला सुरुवात झाली असेल. प्रबोधिनीत गांधीजयंतीनिमित्त आम्ही इकडेतिकडे जी वातावरणनिर्मिती केली होती त्याच्याकडे तुम्ही ढुंकूनही पाहिलं नाहीत. तुम्ही सभास्थानी आलात. स्थानापन्न झालात. कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेचा कार्यक्रम. एक-दोन मुलांची भाषणं आधी झाली. एका शिक्षकाचं भाषण झालं. आमच्या प्रबोधिनीच्या पद्धतीप्रमाणे गाणंही म्हटलं असेल. आता दांडेकर बोलायला उठले. मला काळजी अशी होती की, मी तर तुम्हाला शब्द देऊन बसलो होतो की, आमची मुलं इतरांपेक्षा नक्कीच सुपिरियर आहेत; तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही. पण मी असं काही सांगितल्याचं मुलांना माहीत नव्हतं. ...आणि तुम्ही बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला जे थोडं औपचारिक बोलायला लागतं ते तुम्ही बोललात. पुढे जेव्हा तुम्ही मला तुमचं गांधी जन्मशताब्दीच्यावेळचं गांधीवाद्यांच्यासमोर केलेलं भाषण वाचायला दिलंत तेव्हा तुमची स्टाईल माझ्या लक्षात आली. सुरुवातीला औपचारिक जे असेल त्याच्यामध्ये कसूर करायची नाही. पुढे आपण जे बोलू त्याने औचित्यभंग होणारच आहे पण तरी तो सुरुवातीपासूनच करायचा नाही. त्या जन्मशताब्दीच्या भाषणामध्ये तुम्ही म्हणाला होता, “हा माझा मोठा सन्मान आहे. त्याच्याबद्दल मी समितीचे आभार मानतो...” आणि एवढं संपून भाषण सुरू झाल्यानंतर तुमचं पहिलं वाक्य होतं,  Gandhi was not a thinker as for instance Marx was. He was not even a well-read person. आणि ह्याला पुरावा म्हणून तुम्ही गांधींच्या आत्मचरित्रातला एक उतारा उद्धृत केला होता. ‘पुस्तकं वाचण्यात मला फारसा रस वाटला नाही. पुस्तकं वाचण्यापेक्षा स्वतः विचार करायचा ही मी ज्ञान मिळवण्याची पद्धत म्हणून वापरली’ असं गांधींनी लिहिलेलं आहे. आमच्याकडच्या भाषणातही सुरुवातीचं औपचारिक झाल्यानंतर तुम्ही म्हणालात की, गांधींनी दोन कल्पना मांडल्या. एक, यंत्रवापर कमी असावा आणि ग्रामोद्योग, हाताने करायची कामं यांची प्रतिष्ठा आपल्या देशामध्ये राहिली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि दुसरी कल्पना गांधींनी मांडली की, सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. अगदी खालच्या पातळीपर्यंत लोकांना आपल्या संबंधीचे निर्णय घेण्याची सत्ता असली पाहिजे. भारत हा खेड्यांचा देश आहे... वगैरे. त्यानंतर तुम्ही एक पॉज घेतला. पुढे अनेकवेळा तुमच्याबरोबर हिंडताना-फिरताना माझ्या लक्षात आलं की, तुम्हाला एखादं जबरदस्त वाक्य सुचलं की, ते बोलण्याआधी तुम्ही एकदा दाढीला हात लावायचा. तुमची घोसदार मोठी दाढी होती, खुरटी नव्हती.  सरांनी दाढीला हात लावला की आता कुणीतरी ठार मरणार यांच्या हातून, हे सूत्र नंतर माझ्या लक्षात आलं. तुम्ही म्हणालात, “गांधींच्या विचाराला अनुसरून धोरणं ठरवायची म्हणून सरकारने एकीकडे दारुबंदी केली आणि दुसरीकडे ती दारूबंदी झाल्याबरोबर गांधींच्या विचाराला अनुसरूनच महाराष्ट्रात दुसरा ग्रामोद्योग सुरू झाला!” हे वाक्य उच्चारल्याबरोबर आमच्या मुलांनी हसून आणि टाळ्या वाजवून सभागृह डोक्यावर घेतलं. तेव्हा तुम्ही खुश झालात आणि काँग्रेसवाल्यांचं गांधीप्रेम कसं बेगडी आणि खोटं आहे याच्यावर तुम्ही पुढे अर्धा तास बोललात. हातभट्टीला तुम्ही ग्रामोद्योग म्हणालात आणि तेही पुन्हा गांधींच्याच गळ्यात घातलंत! ही खास तुमची शैली होती. असं बोलू शकणारे फार थोडे वक्ते मी पाहिले. कॅरममध्ये स्ट्रायकर एका सोंगटीवर आपटतो, ती सोंगटी दुसऱ्या सोंगटीवर आपटते आणि ती दुसरी सोंगटी गोलात जाऊन पडते. अशा ‘पासिंग शॉट’सारखी जी तुमची शैली होती तिचा मला आलेला हा पहिला सजीव अनुभव होता. प्रबोधिनीलाही गांधींचं फार प्रेम नव्हतंच. गांधींचं अर्थशास्त्र हे कसं अनर्थशास्त्र आहे आणि गांधींचे शिष्य म्हणवणारे हे कसे पाखंड सांगणारे आणि खोटारडे आहेत हे सगळं तुम्ही बोललात. तो कार्यक्रम चांगला झाला. मुलं खुश झाली. तुम्ही बोलून काही दाखवलं नाहीत. पण तुम्हाला कार्यक्रम आवडला नसता तर तुम्ही मला निघतानाच दोन - चार टोमणे मारले असते. पण तसं झालं नाही. तुम्ही प्रसन्नपणे चहा वगैरे घेतला. पण मला हेही आठवतं की, तुम्ही आम्हाला एका अक्षरानेही विचारलं नाही की, तुम्ही इथे काय शिकवता? काय प्रयोग करता? प्रबोधिनी ही बुद्धिमान मुलांना निवडून घेणारी संस्था आहे म्हणजे नक्की काय? या सगळ्याबद्दल तुम्ही कुणाशी काही बोलला नाहीत. तुम्ही आलात, आपलं खणखणीत आवाजातलं भाषण केलंत आणि निघून गेलात. तेव्हा मला असं वाटायला लागलं की, काहीतरी करून तुमच्याशी संपर्क वाढवला पाहिजे. अर्थशास्त्र हा आपला विषय मागे पडला आहे, पुस्तकं वाचून अर्थशास्त्र काही प्रमाणात कळेल पण प्रत्यक्ष सैद्धांतिक अर्थशास्त्र आणि निरनिराळ्या काळात त्या सिद्धांतांना धरून किंवा सोडून ठरणारी सरकारी आर्थिक धोरणं या विषयामध्ये आपल्याला जर काही कळायचं असेल तर आपण याच्यापुढे बेसिक अर्थशास्त्राचा विचार फक्त वाचायचा आणि कुठून तरी तुमच्याशी संबंध जुळवायचा प्रयत्न करायचा असं मी ठरवलं. पण हे सोपं नव्हतं.

विलासराव साळुंखे हे ग्रामविकासातलं त्या काळातलं मोठं नाव होतं. किंबहुना अर्थशास्त्रीयदृष्ट्या ‘प्रयोग छोटा नाव मोठं’ असंही त्यांच्या प्रयोगाबद्दल म्हणता येईल. गावात पडणारं पावसाचं पाणी सगळ्या गावाच्या मालकीचं असतं. त्यामुळे त्यातलं जास्तीत जास्त पाणी एका जागी साठवून त्या पाण्याचं रेशनिंगच्या पद्धतीने सगळ्यांना समान वाटप करावं म्हणजे ज्याची जितकी जमीन असेल त्या प्रमाणात त्याला पाणी मिळेल आणि प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी जितकं पाणी लागतं तितकं मिळेलच अशी ती योजना होती. केवळ सुभाषितांकडे पाहून अर्थशास्त्रीय व्यवहार ठरवायला जाणारे जे लोक असतात अशा सगळ्यांना साळुंख्यांचा विचार अतिशय मोलाचा वाटलेला होता. पाण्याच्या प्रश्नावर त्यावेळेला महाराष्ट्रात दोन चळवळी होत्या, हेसुद्धा त्या काळाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. एकीकडे गावातला एक पाणवठा सगळ्यांना उपलब्ध व्हावा म्हणून डॉ. बाबा आढाव 'एक गाव एक पाणवठा' ही चळवळ करत होते आणि विलासराव साळुंख्यांनी पाणीपंचायत स्थापन केली होती. ग्रामपंचायत जशी सगळ्या गावासाठी काम करते तसं सगळ्या गावाच्या पाण्याचं व्यवस्थापन करणारी एक पाणीपंचायतही असली पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्या पाणीपंचायतीचा एक कार्यक्रम होता. ‘ग्रामायन’ची स्थापना तेव्हा नुकतीच झाली होती आणि त्यात काँग्रेस सोडून इतर सगळ्या विचारसरणींचे लोक होते. पाणीपंचायतीच्या त्या कार्यक्रमाला तुम्ही अध्यक्ष किंवा प्रमुख वक्ते होतात. माझं सुदैव असं की, त्या कार्यक्रमाला जाताना - येताना तुमच्या जीपमध्ये बसायची मला संधी मिळाली होती. (हा किस्सा प्रदीपनेही लिहिलेला आहे) बहुधा तिथे पाझर तलावाचं उद्धाटन होतं. 1973 साली महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात पैसा वाटण्याची योजना आली. तिला ‘रोजगार हमी योजना’ म्हणतात. त्या योजनेमध्ये सगळ्यात जास्त कामं पाझर तलावांची घेतली जायची. दुष्काळ हा महाराष्ट्राच्या एक तृतीयांश भागाच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे ती कायम धडक (क्रॅश प्रोग्रॅम) योजना या पद्धतीने घेतली जायची. त्या कार्यक्रमाच्या आधी एक शेतकरी तुम्हाला भेटायला आला आणि त्याने चिठ्ठी दिली की, साहेब, माझी जमीन या पाझर तलावामध्ये गेली आहे आणि यांनी मला त्याचे काही पैसे दिले नाहीत. तुम्ही माझं काम मार्गी लावून द्या. तुम्ही चौकशी केली की, या पाझर तलावाच्या कामाचं सुपरव्हिजन करणारे अधिकारी कोण आहेत? त्याच्या दुर्दैवाने तो अधिकारी आलेला होता. तुम्ही चहापान वगैरे करताना त्याला बोलवून घेतलं. त्याला वाटलं, क्रॅश प्रोग्रॅममध्ये विद्युतवेगाने काम पूर्ण केल्याबद्दल दांडेकर साहेब आता आपल्याला शाबासकी वगैरे देतील. तुम्ही त्याला विचारलं की, या पत्राचं काय? त्याने उत्तर दिलं, “काय आहे साहेब, हे काम अजून इर्रेग्युलर आहे. पण क्रॅश प्रोग्रॅमची ऑर्डर असल्यामुळे आम्ही ते करून टाकलं आहे. आता हे काम आधी रेग्युलर होईल आणि वर्षभरात यांचे पैसे यांना मिळतील. तूर्त हे बेकायदेशीर आहे.” खरं म्हणजे सरकारी कामात आणीबाणीसारखी परिस्थिती असते तेव्हा असे निर्णय होतात आणि मग पूर्वलक्षी प्रभावाने त्यांची कागदपत्रं तयार केली जातात हे तुम्हालाही माहीत असणार. पण त्या बिचाऱ्याने तो ‘बेकायदेशीर’ शब्द वापरायला नको होता. कार्यक्रमात भाषणाला उभं राहिल्यानंतर आणि भाषणात एक दोन औपचारिक वाक्यं झाल्यानंतर तुम्ही घडला प्रकार ऐकवलात आणि म्हणालात, “हे काम बेकायदेशीर आहे. त्यामुळे यांना पैसे मिळणार नाहीत. किंबहुना सरकारचा ठरावच अजून झालेला नाही म्हणजे हा पाझर तलावही झालेला नाही.” मग तुम्ही दाढीत हात घातलात आणि पुढे म्हणालात, “म्हणजे समजा, माझ्या मुलाने परवाना नसताना गाडी चालवली आणि कुणी मेला; तर हा बेकायदेशीर गाडी चालवतो म्हणून तो बेकायदेशीर मेला...”

तुमच्या धारदार तिरकसपणाची अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. एकदा डॉक्टरांच्या सभेत तुम्ही बोलत होता. नेहमीप्रमाणे मध्येच तुम्ही दाढीला हात लावलात. त्याही सभेत मी - कसा कोण जाणे - होतो. तुम्ही म्हणालात, “तुम्हा डॉक्टर लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे...” लगेच सगळे डॉक्टर जरा सावरून बसले. “फॅमिली डॉक्टर ही काय कल्पना आहे? एका कुटुंबातला पेशंट तुमच्याकडे काल येत होता, आज येतो, उद्या येणार आहे; तो बिचारा येतच राहतो. तुमच्या मनात असा विचार कधी कसा येत नाही... (की, याचं आपलं नातं असंच टिकलं पाहिजे, वगैरे अशा धर्तीचं वाक्य असेल अशी श्रोत्यांची कल्पना!) ...की, हा अजून मेला कसा नाही?” दांडेकर म्हणजे भुईचक्र. सर, तुम्ही फटाके उडवत होता की नाही मला माहीत नाही. भुईचक्र नावाचा फटाका भयानक असतो. तो दुसऱ्याच्या पायात गेला की गंमत वाटते पण आपल्या पायात आला की त्रेधातिरपीट उडते. तसे तुम्ही होता. आणि मग लोक त्याबद्दल तुम्हाला आहेरही द्यायचे. मात्र तुम्हाला येणारी ‘तशी’ पत्रं निनावी असायची. एकदा मी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला भेटायला आलो होतो. तुम्ही मला म्हणालात, “दांडेकरांची इमेज काय आहे माहीत आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणता ना, तुम्हाला महाराष्ट्रभर मान आहे, सन्मान आहे, तुमची एक प्रतिमा आहे... हे पत्र वाचा.” ते निनावी पत्र होतं. ‘दांडेकर साहेबांना नमस्कार, आपली राष्ट्रीय एकात्मता परिषदेवर नेमणूक झाल्याचे कळले. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. कृपा करून तेथे गाढवासारखे काही बोलू नका.’ असं त्यात लिहिलेलं होतं. तुम्ही ते पत्र जपून ठेवलं होतं. कारण समितीवरची निवड वगैरे या तेव्हाही जुन्या गोष्टी होत्या. “ही आमची इमेज हे लक्षात ठेवा” असंही तुम्ही मला ऐकवलंत. मी तुम्हाला म्हटलं, “पण काय हो सर? तुम्ही हे सगळे टोमणे-बिमणे आधी मनाशी ठरवून जात असाल ना?” माझं वाक्य पुरं व्हायच्या आत पुन्हा दाढीमध्ये हात गेला. "हो! मला माहीतच असतं. तिथे कोण काय मूर्खासारखं बोलणार आहे ते त्यांनी मला आधी लिहून दिलेलं असतं. त्यामुळे मी आधी ठरवूनच बोलतो.” अशी प्रत्युत्पन्नमती, विषयावरचं प्रभुत्व, खरं बोलण्याची पक्की तळमळ, एरवीच्या वागण्यात कोणतंही अवडंबर नाही, आवडीनिवडी नाहीत, असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काहीही नाही असं तुमचं व्यक्तिमत्त्व मला टप्प्याटप्प्याने उलगडत होतं.

तुम्ही स्वतःच्या आयुष्यातच एक दंतकथा बनल्यासारखे होता. एक दंतकथा प्रदीपने त्याच्या लेखात लिहिली आहे. (हे प्रसंग प्रत्यक्षात घडले आहेत तरी आता ते दंतकथेसारखेच सांगितले जातात.) तुम्ही एकदा गाय पाळली होती. ती दूध देत होती. इतकं दूध घरात संपण्यासारखं नव्हतं. कदाचित तुम्हाला गायीचं दूध आवडतही नसेल. त्यामुळे तुमच्या काही मित्रांना ते दूध विकत घेण्याची सक्ती तुम्ही केलेली होती. स्वतः तुम्ही पहाटे सायकलवर जाऊन त्यांच्याकडे रतीब घालायचा. त्यातही दांडेकरी हिसका असा होता की, मी फक्त दोन वेळा कडी वाजवीन आणि दार उघडलं नाही तर निघून जाईन असं तुम्ही बजावलेलं होतं. ती बिचारी माणसं - तुमच्या कौतुकापोटी असेल किंवा धाकापोटी - हे गायीचं (की वाघिणीचं दूध? किंवा साक्षात वाघाने आणून दिलेलं गायीचं दूध!) घेत होती. त्याची बिलं आली की, तुमची मुलं तुम्हाला म्हणायची, “बाबा, हे तुझं गोधन आलंय. हे तुझं तू सांभाळ.” हे सगळं तुम्हीच मला सांगितलं होतं. तुमच्या पत्नी तुम्हाला नावाने हाक मारायच्या; ‘अरे विनू’ म्हणायच्या आणि मुलं तुम्हाला ‘अरे बाबा’ म्हणायची हेही तुमच्या घरी यायला लागल्यानंतर मला कळलं. (खरं म्हणजे ‘अरे बाबा’, आता गप्प बसायला काय घेशील? असा तुमचा धाक महाराष्ट्रभर पसरलेला होता.)

त्या तीन कन्यका म्हणजे मालतीबाई बेडेकर, इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत. तुमचं लग्न ज्या खरे कुटुंबामध्ये झालं होतं, त्यातल्या कुटुंबप्रमुखाचं ‘खरे मास्तर’ नावाचं कादंबरीवजा चरित्र मालतीबाईंनी लिहिलं आहे. त्या कुटुंबातील तीन बहिणींपैकी सर्वांत धाकट्या बहिणीशी तुमचं लग्न झालं. बाळूताई खरे म्हणजेच विभावरी शिरुरकर आणि मालतीबाई बेडेकर! थोरल्या कृष्णाबाई तर त्यांच्या यजमानांपेक्षा चार वर्षांनी मोठ्या होत्या. त्या काळात धाडस करूनच त्यांनी लग्न केलं होतं. त्या स्वतंत्र लेखिका होत्या. मालतीबाईंविषयी काही बोलायलाच नको! त्या मानाने कुमुदिनी दांडेकर इतर दोघी बहिणींपेक्षा दिसायला सुस्वरूप होत्या. जरी त्यांचं नाव इतर दोघींइतकं गाजलं नाही तरी त्यांनीही त्यांच्या विषयाचं उत्तम शिक्षण घेतलेलं होतं आणि त्या काम करत होत्या.  हरिभाऊ मोटे हे प्रकाशन क्षेत्रातलं आणि सिनेमाच्या क्षेत्रातलं मोठं नाव. विश्राम बेडेकर हे प्रसिद्ध नाटककार, लेखक आणि तेही सिनेमाच्या क्षेत्रात होते. त्यांच्याबद्दलच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध होत्या. तुम्ही तिघे साडू कधी एकत्र भेटता की नाही, तुमच्यामध्ये काही देवाणघेवाण होते का याबद्दल मला उत्सुकता होती.

तुमचा एक किस्सा 'माणूस'च्या श्री ग माजगावकरांनी मला सांगितला होता. तुमची-माझी ओळख वाढायला लागली तेव्हा माजगावकर मला म्हणाले, “जरा जपून बरं का त्या माणसाशी. तो भलताच फटकळ माणूस आहे.” असं म्हणून त्यांनी तुमचा गोखले इस्टिट्यूटमध्ये इंटरव्ह्यू झाला त्याची हकीगत मला सांगितली होती. धनंजयराव गाडगीळ आणि मंडळींनी तुमची मुलाखत घेतली. त्याच्यात कदाचित सोवनीही असावेत. तुम्हाला स्टॅटिस्टिक्सची पदवी होती. तुमचं वय या मंडळींपेक्षा तरुण असलं तरी पोरसवदा नव्हतं. त्या क्षेत्रातला अनुभव तर होताच. शेवटी गाडी पगारावर आली. त्या वेळी गोखले इन्स्टिट्यूटची ही सगळी मंडळी दीडशे रुपयांच्या आसपास काम करत होती. (हा प्रयोग तुम्ही नंतर ‘अर्थबोध’मध्येही केला) पगार कमी आहे म्हणून तुम्ही हातातून निसटू नये असा सगळ्या मंडळींचा सूर होता. म्हणून धनंजयराव गाडगीळ तुम्हाला म्हणाले की, आम्ही इथे एवढा एवढा पगार घेतो. पण तुमची वैयक्तिक गरज असेलच तर तुम्हाला थोडा जास्त पगार आम्ही देऊ शकू. तुम्ही त्यांना सरळच विचारलंत, “जास्त म्हणजे किती देणार तुम्ही?” 1940च्या दशकातली ही गोष्ट. ते म्हणाले, “साधारण वीस रुपये वाढवून देता येतील.” त्यावर तुमचं उत्तर असं होतं की, मग नको. मी तुमच्या इतकेच घेतो. या उत्तराने त्या मंडळींना आनंद व्हायला सुरुवात झाली असेल तेवढ्यात तुमचं पुढचं वाक्य आलं, “तुम्हा मंडळींच्या वीस रुपये त्यागाचं ओझं मला नको!” असं असलं तरी धनंजयरावांनी तुम्हाला आपल्या संस्थेत घेतलं, पूर्ण वाढू दिलं.

(मला आठवतं, ओंकारेश्वरच्या स्मशानभूमीवर धनंजयरावांना अग्नी दिला. गोखले इन्स्टिट्यूटपासून ती अंत्ययात्रा मी तुम्हा सगळ्यांसोबत मी चालत आलेलो होतो. त्यावेळेला तुमची क्वचित दिसणारी भावनात्मकता दाखवणारं एक वाक्य तुम्ही बोललात, ‘धनंजयरावांच्याशिवाय आम्ही सगळे आता पोरके आहोत.’ यात सगळंच आलं. आधीचा प्रसंगसुद्धा मला त्यामुळेच आठवतो.)

एकदा आपण साताऱ्याला गेलो होतो. वाहनाची व्यवस्था असली की तुम्ही मला विचारायचा. “मोकळे असाल तर चला, गाडीची व्यवस्था आहे आणि सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं आहे” म्हणायचा.  असे आपण साताऱ्याला गेलेलो होतो. कुठेतरी शिक्षण संस्थांसंबंधी कार्यक्रम होता. शिक्षणसंस्था, विद्यापीठं, अभ्यासक्रम हे न संपणारे विषय आहेत. त्यावर कुणीही एखादी परिषद भरवू शकतो, सभा घेऊ शकतो. सगळ्यांनी आदर्शवादी काहीतरी बोलायचं आणि ते प्रत्यक्षात उतरत नाही अशी खंत व्यक्त करायची आणि मग ‘शिक्षण क्षेत्राची परिस्थिती बिकट आहे...’,वगैरे म्हणून  समाजातल्या धनिकांना, प्रत्यक्ष समाजाला, सरकारला मदतीचं आवाहन करायचं.

मधुकरराव चौधरी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते,  तुम्ही उद्घाटक होता.  तीन दिवस परिषद असल्यामुळे आणि तुम्हाला तेवढा वेळ नसल्यामुळे त्यांना अध्यक्ष  केलेलं होतं. ते तीन दिवस तिथे थांबणार होते. मधुकरराव चौधरी म्हणजे जळगाव जिल्ह्याचे शिक्षणमहर्षी. ‘इंडियन एक्सप्रेस’चे विनय हर्डीकर आपल्यासोबत आहेत हे तुम्ही चौधरींना सांगितल्याबरोबर त्यांनी अतिशय वाकडं तोंड केलं. तुम्ही मला नंतर विचारलंत, “तुमची ओळख करून दिल्यानंतर ते एकदम गप्प का बसले?” मला खरं सांगणं भाग होतं. मी म्हटलं, “मधुकररावांवर एकदाच फौजदारी खटला भरण्यात आलेला होता. त्याची बातमी लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये माझ्यामुळे आली होती. ती त्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा.” तुम्ही म्हणालात, “तुमचंही बरंच काय काय दिसतं आहे.” मी तुम्हाला काय म्हणणार! म्हटलं, “तुमच्यातले काही गुण आमच्याकडे आहेत.” 

पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी सहकारी साखर कारखाने, सहकारी पतसंस्था अशा आर्थिक संस्था वापरल्या जातात. गावपातळीवरही खरेदी-विक्री संघ (ज्यांना आपण ‘खविस’ म्हणायचो) असतातच. त्याचप्रमाणे  महाराष्ट्राच्या इतर भागात - जिथे अशा आर्थिक संस्था उभं करणं शक्य नाही तिथे पुढारी शिक्षणसंस्था काढतात. विदर्भ आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. कदाचित खानदेशातही झालं असेल. त्या कार्यक्रमात तुम्ही शैक्षणिक धोरणासंबंधात काही बोलला नाहीत. इथे एक शिक्षणसंस्था चालवणारा माणूस हजर आहे, तो राजकीय पुढारीसुद्धा आहे हे लक्षात घेऊन संपूर्ण भाषणात तुम्ही संस्थाचालकांवर रोष ठेवलात. ‘शिक्षणप्रसाराच्या नावाखाली राजकीय पुढारी संस्था काढतात. त्या संस्थांचं जाळं पसरत जातं. प्राध्यापकांना गुलामगिरीत ठेवण्यासाठी या संस्था वापरल्या जातात. संस्थाचालक प्राध्यापकांना आपली धोतरं धुवायला वापरतात.’  ही तुमची वाक्यं अजूनही माझ्या लक्षात आहेत. मधुकरराव चौधरींविषयी मला नंतर सहानुभूती वाटायला लागली. त्यांची सकाळी आल्या आल्या विनय हर्डीकरची गाठ पडली, त्यात तुमचं हे भाषण.

त्या भाषणात आणखीही एक दांडेकरी हिसका होताच.  त्यावेळी एन. सी. जोशी नावाच्या एका उपद्रवी संस्थाचालकांचा पुणे विद्यापीठामध्ये नकारात्मक अर्थाने बराच बोलबाला होता. कुलगुरूंसकट सगळे त्यांना घाबरून असायचे. व्हाईस चान्सलर म्हणजे व्हीसी, एक्झिक्युटिव्ह काउंसिल म्हणजे इसी.  तर तिथे एक वाक्य खाडकन तुमच्या तोंडून निघून गेलं की, पुणे विद्यापीठात इ सी नाही, व्ही सी नाही फक्त एन सी! असे कित्येक प्रसंग तुमच्या सोबत वावरणार्‍या लोकांकडून ऐकायला मिळायचे, तुमची भाषणं ऐकताना अनुभवायला यायचे. माझ्या मनात यायचं, हा तुमचा बाह्य फुलोरा आहे. पण तुमच्याशी काही सैद्धांतिक अर्थशास्त्रीय चर्चा करायला कधी मिळेल का? 

अशी चर्चा तुमच्याशी करायला मिळण्याचे दोन प्रसंग माझ्या मनात खोलवर घर करून राहिले आहेत. भारतातील दारिद्र्य हा तुमचा विषय होता. दारिद्रयरेषा कशी ठरवायची याच्या अनेक थिअरीज त्या काळात प्रचलित होत्या. किंबहुना दारिद्र्यरेषा किंवा डेव्हलपमेंट इंडेक्स हा विषयच असा आहे की, दर दहा वर्षांनी तो निश्चित करण्याचे नवीन निकष येतात. त्यावेळी जो निकष होता तो ‘कॅलरिफिक डेफिनेशन’ असा होता. पाच माणसांचं कुटुंब मानायचं आणि ज्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना मिळून अमुक इतक्या कॅलरीज परवडतात ते कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर आणि त्या ज्यांना परवडत नाहीत ते दारिद्र्यरेषेच्या खाली अशी त्यावेळेची थिअरी होती. नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये जगातल्या निरनिराळ्या भागात निरनिराळे निकष होते. अमेरिकेमध्ये दर माणशी दर दिवशी साडेतीन हजार कॅलरीज असा निकष होता. अमेरिकेची दारिद्र्यरेषा खूपच वर होती. मला आठवतं त्याप्रमाणे युरोपचा निकष अडीच ते तीन हजार कॅलरीज होता. भारतातला निकष दोन हजार कॅलरीज असा ठरवण्यात आलेला होता. आणि त्या निकषासंबंधी सुद्धा वाद होते की, एकीकडे जगातील काही माणसं साडेतीन हजार कॅलरीज रोज हडप करत आहेत आणि दुसरीकडे भारतासारख्या अविकसित किंवा अर्धविकसित देशांमध्ये दोन हजार कॅलरीजचा निकष हे साडेतीन हजार कॅलरीजवाले लोकच ठरवून देत आहेत. सगळीकडे ज्यांना भांडवलदारी मंडळींची कारस्थानं दिसतात त्या डाव्या मंडळींचा हा एक मुद्दा होता. भारतात हा निकष ठरवण्यामध्ये डॉ. पा. वा. सुखात्मे होते. तुम्ही मूळ संख्याशास्त्रज्ञ तर सुखात्मेही आधी मूळ संख्याशास्त्रज्ञ आणि नंतर समाजशास्त्रज्ञ किंवा आहारशास्त्रज्ञ. तुमच्या तुलनेत ते बिचारे फारच साधे आणि मवाळ गृहस्थ होते. तुमच्या संस्था एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर होत्या. गोखले इन्स्टिट्यूट आणि पा. वा. सुखात्मे यांची संस्था म्हणजे महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स किंवा विज्ञानवर्धिनी यांच्यामध्ये फक्त जैन बोर्डिंग आणि कॉमर्स कॉलेज या दोनच इमारती आहेत. दोघांच्या संस्थांमध्ये अर्धा किलोमीटरदेखील अंतर नव्हतं, इतके तुम्ही एकमेकांच्या जवळ होता पण या प्रश्नावर सुखात्मे एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला अशी परिस्थिती होती. आमच्या दृष्टीने ही जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक अशा तिन्ही प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी असल्यामुळे मला तुम्हा दोघांच्याही मुलाखती घेणं भाग होतं.

ज्या वंशाची किंवा ज्या प्रदेशातली माणसं मुळातच चणीने लहान असतात, ती कमी अन्न ग्रहण करूनसुद्धा तितकंच काम करू शकतात हे तत्त्व सुखात्म्यांनी आपल्या डोक्यात ठेवून म्हटलं होतं की, हा दोन हजार कॅलरीजचा निकष असला तरीसुद्धा भारतातली अनेक माणसं पंधराशे कॅलरीजवरसुद्धा दोन हजार किंवा साडेतीन हजार कॅलरीज रोज हडप करणाऱ्या माणसांच्या इतकेच श्रम करू शकतात, उत्पादन करू शकतात.  दोन हजार कॅलरीजच्या निकषाप्रमाणे 40 टक्के लोकसंख्या दारिद्य्ररेषेखाली जात होती. सुखात्म्यांच्या पंधराशे कॅलरीजच्या निकषानुसार, पाचशे कॅलरीज कमी झाल्याबरोबर दारिद्य्ररेषा 20 टक्क्यांवर आली आणि ताबडतोब इंदिरा कॉंग्रेसने व इंदिरा गांधींनी तो प्रचाराचा मुद्दा म्हणून वापरायला सुरुवात केली. ‘अनेक तज्ज्ञांचं असं मत आहे की, लोक समजतात तितके जास्त गरीब लोक भारतात नाहीत. भारतात 20 टक्केच गरीबी आहे.’ मला आठवतं, चर्चगेट स्टेशनच्या बाहेर सरकारच्यावतीने मोठं पोस्टरही लावण्यात आलं होतं. कुणीतरी असाही शोध लावला की, दोन इडल्या (पुणेरी साईजच्या नव्हे, उडपी साईजच्या) सांबार आणि चटणी मिळून पंधराशे कॅलरीज असतात. त्यामुळे त्या पोस्टरवर लिहिलं होतं : डॉक्टर सुखात्मे सेज टू इडलीज अ डे इज इनफ. ...आणि तुम्ही खवळून उठलात! अशी परिस्थिती निर्माण झाली की, तुम्ही एकीकडे आपला मुद्दा मांडताहात आणि दुसरीकडे सुखात्मे रदबदली करत आहेत, “माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतो आहे. मी असं म्हणत नाही की, सगळ्यांना तुम्ही एवढेच द्या. मी म्हणतो आहे की, कॅलरीजचा नियम शंभर टक्के लागू करता येईलच असं नाही. मी वेगळ्या मुद्द्याबद्दल बोलत होतो. भरपूर कॉन्ट्रिब्यूशन करण्यासाठी भरपूर खाल्लंच पाहिजे असं नाही...” तुमची आणि सुखात्म्यांची शारीरिक उंची सारखीच होती. तुम्ही त्यातल्या त्यात अंगाने भरलेला होता, सुखात्मे अगदीच किडकिडीत होते. आक्रमकता हे तुमचं वैशिष्ट्य आणि सुखात्म्यांकडे आक्रमकता नावाची गोष्ट नव्हती.  पंधराशे कॅलरीजवर मी कसा दिवसभर इफिशियंटली काम करत असतो हे सांगण्यासाठी सुखात्म्यांनी स्वतःसंबंधीची उदाहरणं दिली होती. ‘मी ऑफिसमध्ये काम करतो, घरातली माझ्यावाट्याची कामं करतो, एवढंच नाही तर संध्याकाळी फिरायलाही जातो...’ वगैरे. सुखात्मे एवढं बोलले आणि त्यानंतर तुम्ही त्यांची अशी काही टिंगल सुरू केली! पत्रकारितेतल्या वस्तुनिष्ठतेच्या मूल्याप्रमाणे आम्हाला दोघांच्याही मुलाखती घ्यायच्या होत्या. त्यावेळी तुम्ही मला म्हणाला, “हे जे काय आहे ना यांचं, फिरायला काय जातात आणि घरकाम काय करतात... या सगळ्याचा अर्थशास्त्राशी काय संबंध आहे? मी या सगळ्याला ‘इंट्रा सुखात्मे व्हेरिएशनस्’ असं नाव दिलेलं आहे.”  या मुलाखतींच्या वेळेला दोन तज्ज्ञांच्या दोन भूमिका तर माझ्या लक्षात आल्याच पण फिजिकली एकमेकांच्या इतके जवळ असणारे दोन तज्ज्ञ किती वेगवेगळे असावेत हेही पाहायला मिळालं. अभ्यासविषय एकच पण स्वभाव इतके वेगळे!

या वादामध्ये तुमची मुलाखत घ्यायला मी आलो तेव्हा तुम्ही मला म्हणाला की, तुम्ही नोट्स बिट्स काही काढू नका. मला वाटलं की, हे काय आज काही गौप्यस्फोट करणार की काय? तुम्ही म्हणालात, “नोट्स काढायची काही गरज नाही. माझा स्टेनो आहे. तुमचा प्रश्न विचारा माझं उत्तर स्टेनो लिहून घेईल आणि तुम्हाला उद्याला इंटरव्ह्यूचं स्क्रिप्ट मिळेल. त्याच्यामध्ये अक्षराचाही बदल करायचा नाही या अटीवर मी इंटरव्ह्यू देईन.” आणि बरोबर आम्हाला हवं तसं दोन हजार शब्दांचं फीचर आम्ही करू शकलो. तुमची सगळी मुलाखत छापून आली. नंतर मी सुखात्म्यांना भेटायला गेलो. आमच्या ज्ञानप्रबोधिनीचे ते अध्यक्षही होते. त्यामुळे त्यांची-माझी बर्‍यापैकी ओळख होती. ते मला म्हणाले, “बरं झालं तुम्ही आलात. दांडेकरांशी लढणं मला शक्य नाही. मला त्यांच्यासारखं बोलता येत नाही, त्यांच्यासारखं लिहिताही येत नाही आणि माझ्या मुद्द्यांचा तर राजकीय गैरफायदादेखील उठवला जातो आहे.” सुखात्म्यांच्या विचारातूनच पुढे ‘इंदिरा कम्युनिटी किचन’ ही पुण्यात रोज माफक दरामध्ये उत्तम जेवण देणारी संस्था निघाली. खरं तर सुखात्मे जे बोलत होते ते आहारासंबंधी स्वतः प्रयोग केल्यानंतर बोलत होते आणि तुम्ही स्वतःच म्हटलं तसं ‘इंट्रा सुखात्मे व्हेरिएशनस्’ आणि पंधराशे कॅलरीजचा हिशोब याला धरून तुम्ही बोलत होता. पण पत्रकारितेमध्ये आपल्या मतांना स्थान देता येत नाही. मी सुखात्म्यांची मुलाखत घ्यायला गेलो. आम्ही दिवसभर बोलत होतो. ते त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग करत होते. माझ्या पोटात गोळा आला की, हे सगळं रेकॉर्डिंग आपल्याला लिहित बसावं लागणार की काय! पण सुखात्म्यांनी मला त्याचं तयार शब्दांकनच दिलं. तुमची मुलाखत दोन हजार शब्दांची होती, सुखात्म्यांची दहा हजार शब्दांची झाली. मी ती तशीच इंडियन एक्स्प्रेसच्या हेडऑफिसकडे पाठवली. त्यांनी धडाधडा कुऱ्हाड चालून ती दोन हजार शब्दांत बसवली. (पुढे बरेच दिवस मी सुखात्म्यांना भेटायलाच गेलो नाही.) हा तुमच्या आणि त्यांच्या शैलीतला फरक होता. ‘मोजक्या शब्दांमध्ये जास्तीत जास्त’ हा आमच्या पत्रकारितेचा नियम असतो. तो गुण मला तुमच्या बाबतीत नेहमीच जाणवायचा. आपण एका सुजाण वर्गासाठी बोलतो-लिहितो आहोत त्यामुळे फापटपसारा मांडण्याची गरज नाही, उगाच उदाहरणं किंवा कीर्तनकारांसारखे दृष्टांत देण्याची गरज नाही ही शिस्त सगळ्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये, समाजशास्त्रज्ञांमध्ये त्यावेळी तरी दिसत नव्हती. मुद्याला धरूनच बोलायचं आणि ते अतिशय खणखणीत बोलायचं हे तुमचं वैशिष्ट्य होतं.

स्वतःविषयी अभिमान वाटावा असे काही प्रसंग असतात, दुसरा प्रसंग त्यामधला आहे. त्याकाळात मी दोन सायकली चालवत होतो. एकीकडे मी तुमच्या सहवासात होतो आणि दुसरीकडे शरद जोशींच्या जास्तीत जास्त प्रभावाखाली येत होतो. हे कबूल करायला पाहिजे की, मी तुमच्याकडे ‘सोर्स’ म्हणून जास्तकरून पाहत होतो आणि शरद जोशींकडे ‘इन्स्पिरेशन’ म्हणून पाहत होतो. असं का झालं हे मी नंतर सांगेन, कारण तुम्ही असताना ते कधी सांगता आलं नाही. शरद जोशींच्या आर्थिक विचाराचं एक शिबिर झालं होतं. मी त्याला हजर नव्हतो परंतु त्या सगळ्या शिबिराचं व्यवस्थित रेकॉर्डिंग झालेलं होतं. सुरेशचंद्र म्हात्रे यांनी नंतर ते लिहून काढलं. त्याचं पुस्तक करायचं आणि प्रकाशनाचा कार्यक्रम करायचा असं ठरलं. अरविंद वामन कुलकर्णी यांनी त्यांचं शेतकरी प्रकाशन हे बहुधा त्याच पुस्तकापासून सुरू केलं असावं. त्यावेळी योगायोगाने मी पु. ल. देशपांडे राहत होते त्या रूपाली बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होतो. मला शरद जोशींचा फोन आला आणि मी त्यांना भेटायला गेलो. ते मला म्हणाले, “तू पुलंच्या इथे राहतोस आणि तुझी त्यांची चांगली ओळख आहे ना?” मी म्हटलं, “आहे. पण तुमचं त्यांच्याकडे काय काम आहे? कारण पुलंकडे काम असलं तरी ते आधी सुनीताबाईंना पटावं लागतं” ते म्हणाले की, आपल्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे आणि त्याला पु. ल. देशपांडे यांना बोलवायचं आहे. मी म्हटलं, “कुठल्या मूर्खाने ही कल्पना तुम्हाला सुचवली?” मी असं म्हटल्यावर तिथे सन्नाटाच पसरला. शरद जोशी म्हणाले, “पु. ल. लोकप्रिय वक्ते आहेत. ते आल्यावर हॉल भरेल.” मी म्हटलं, “तुम्हाला एवढाही आत्मविश्वास नाही का की, आपले विचार ऐकण्यासाठी लोक येतील. लोक जमवायला पुलंची इमेज वापरावी लागेल असं तुम्हाला का वाटतं? एक तर हा पुलंचा विषय नाही, त्यांच्या पत्नीची परवानगी मिळाल्याशिवाय ते कुठे जात नाहीत आणि सुनीताबाईंना तर हा विषय पटणं शक्यच नाही. पण आपण कशाला त्या नादाला लागायचं? आपण काहीतरी महत्त्वाचं मांडतो आहोत, ते ऐकायला लोकांनी आलं पाहिजे आणि तसा आत्मविश्वास आपण ठेवला पाहिजे.” शरद जोशी म्हणाले, “तू कोणाला बोलवशील?” मी म्हटलं, “मी दांडेकरांना बोलवेन.” तिथे पुन्हा सन्नाटा पसरला कारण त्यावेळी ‘शरद जोशींचे ‘भाव’बंधन’ या नावाचा तुमचा मास्टरपीस म्हणावा असा एक कुत्सित लेख फार गाजलेला होता. तुम्ही आणि शरद जोशी हे तुम्ही आणि सुखात्म्यांसारखेच दोन टोकांना उभे होतात, जरी दोघांचा प्रश्न ‘भारतातलं दारिद्रय’ हाच होता. शरद जोशी म्हणाले की, दांडेकर येणंच शक्य नाही.  मी म्हटलं, “मी घेऊन आलो तर?” ते म्हणाले, “मग चालेल” मी म्हटलं, “शेतकरी संघटनेचा कार्यक्रम आणि दांडेकर येणार. आपण कुठला हॉल घेतला आहे?” टिळक स्मारक मंडळाचं मोठं सभागृह घेतलेलं होतं. मी म्हटलं की, मग तुम्ही काळजी करू नका. गर्दी होणार. शरद जोशी मला म्हणाले, “तू जा दांडेकरांकडे आणि त्यांचा होकार घेऊन ये.” आता माझ्या पोटात गोळा आला. एक शिकार तर साधली आता दुसरी कशी साधायची? दुसऱ्या दिवशी सकाळी मी सरळ तुमच्या ऑफिसमध्ये धडकलो. नेहमीप्रमाणे तुम्ही म्हणाला, “फोन न करता आलात. काय काम आहे?” मी त्यांना म्हटलं की, तसंच काम आहे म्हणून आलो. असा असा विषय आहे, तुम्ही त्या कार्यक्रमाला यावं आणि तुमच्या हस्ते प्रकाशन करावं असं मी सुचवलं आहे. तुमचं नेहमीचं वाक्य आलं, “डोकं फिरलं का तुमचं? तो शरद जोशी आणि मी एका व्यासपीठावर?” मी म्हटलं, “तेही मला असंच म्हणाले की तुम्ही येणंच शक्य नाही आणि तुम्ही म्हणता की, तो मला बोलावणं शक्य नाही, म्हणजे ‘बोलावलं तरी जाणार नाही’ असं तुम्ही ध्वनित करताहात.  मी मात्र हा कार्यक्रम असाच झाला पाहिजे या मताचा आहे.” “तुमचं मत काहीही असेल” असं म्हणून तुम्ही मला उडवून लावलं. तेव्हा धनंजयरावांचा धागा माझ्या डोक्यात होता. मी तुम्हाला म्हटलं, “हा शेतीच्या अर्थशास्त्राचा विषय आहे आणि गोखले इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातली शेतीवर काम करणारी सगळ्यात मोठी संस्था आहे. शेती, दुष्काळ अशा विषयांवर तुमच्याकडे जितका डेटा आहे तितका इतर कोणाकडेही नाही आणि आज धनंजयराव असते तर मी त्यांना बोलावलं असतं. तसं मी तुम्हाला बोलावतो आहे.” मला आठवतं, धनंजयरावांचं नाव घेतल्यावर तुम्ही एकदम सौम्य झालात. म्हणालात, “हा मुद्दा बरोबर आहे. येईन मी. पण माझ्या दोन अटी आहेत. मला त्या शरद जोशीने इथे येऊन व्यक्तिगत आमंत्रण दिलं पाहिजे. तुमच्या आमंत्रणावर मी येणार नाही.” मी म्हटलं, “मान्य आहे” “...आणि ती चर्चेची सभा असेल. तिथे हुल्लडबाजी चालायची नाही. शेतकऱ्यांची गर्दी आणायची आणि दांडेकरांना बोलू द्यायचं नाही असं चालणार नाही.” तुम्ही हे बजावलंत कारण तसे प्रसंग आधी घडले होते. आमच्या कार्यकर्त्यांनी संघटनेचे बिल्ले लावून तुमच्या कार्यक्रमात घुसून आरडाओरडा केलेला होता. तुमच्या सगळ्या अटी मान्य करून मी तसाच उठलो आणि शरद जोशींकडे गेलो. त्यांना तुमच्या अटी सांगितल्या. त्यांनी त्या लगेच मान्य केल्या. (दुसऱ्याच दिवशी तुम्हा अहि-नकुलांची भेट झाली पण त्यांची मारामारी/लढाई वगैरे झाली नाही.) शरद जोशींनी तुम्हाला व्यवस्थित आमंत्रण दिलं. तुम्ही आलात. आणि सर मला आठवतं, टिळक स्मारक मंदिरात खालचं सभागृह भरलं, वरची गॅलरी भरली, उभं राहायला जागा राहिली नव्हती एवढी गर्दी झाली. आमच्या लोकांनी हुल्लडबाजी केली नाही तरी आमचे माधवराव मोरे दोन-तीन वेळा ‘निमकहराम अर्थशास्त्रज्ञ’ वगैरे बोलले. त्या बोलण्याला काय चपराक द्यायची ती तुम्ही तुमच्या भाषणामध्ये दिली आणि शरद जोशींना तुम्ही जे तुम्ही टोमणे मारले त्याची त्यांनीही उत्तरं दिली.

तुमचा मुद्दा असा होता : ‘भारतामध्ये दारिद्रय आहे. ते शेतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. पण तुम्ही जी आंदोलनं करता आहात ती कॅशक्रॉपवाल्यांच्या जास्त फायद्याची आहेत, कोरडवाहू आणि छोट्या शेतकऱ्यांच्या ती उपयोगाची नाहीत आणि तुम्हाला वाटत असेल की, पर्कोलेशन थिअरीप्रमाणे शेती व्यवस्थेमध्ये वरच्या स्तराला पैसा मिळाला की, तो हळूहळू झिरपत खाली येईल. पण हे असं कुठल्याच व्यवस्थेत घडत नाही, इथेही घडणार नाही.’  तुमच्यावर जो डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता - जो नंतरही काही प्रसंगांनी माझ्या लक्षात आला - त्याला हे धरून होतं. तुम्ही क्वचित उपमा द्यायचा. तुमचा मुद्दा समजावून देताना तुम्ही म्हणालात, “झाडाच्या शेंड्याला जी फळं लागलेली आहेत ती तुम्ही पाण्याचे फवारे मारून घासूनपुसून लख्ख करत आहात. (त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फळशेती मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली होती) मी असं म्हणतो आहे की, तुम्ही शेंड्यावर पाणी मारण्यापेक्षा ते पाणी झाडाच्या मुळांना द्या.” हा तुमचा युक्तिवाद तिथे आलेल्या तुमच्या पक्षाच्या लोकांना फार आवडलेला होता. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. तो धागा पकडून शरद जोशी आपल्या भाषणात म्हणाले, “अशी अजागळ मानवतावादी कल्पना आमची नाही! एकदा शेतकऱ्याला पैसे मिळायला लागले किंवा शेतीत नुकसान तरी होत नाही अशी व्यवस्था तयार झाली की, शेतकरी आपणहून त्या झाडाची मुळापासून शेंड्यापर्यंत काळजी घेऊ शकेल आणि मग उत्तमच उत्पादन येईल हा अर्थशास्त्रीय विचार आमच्या भुमिकेमागे आहे.” एखाद्या वस्तूमध्ये फायदा आहे असं लक्षात आल्यानंतर त्याची गुणवत्ता वाढवत नेण्याची जबाबदारी आणि स्पर्धेमध्ये टिकायची जबाबदारी उद्योजक स्वतः घेतो अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली. पुण्यामध्ये नंतर कित्येक महिने त्या कार्यक्रमाची चर्चा चालू होती.

दुर्दैव असं की, तुम्ही एकटे पडलात. शरद जोशींनी हातात घेतलेला प्रश्न तुम्ही मान्य केला पण आमचं उत्तर मान्य केलं नाहीत. पण तुम्ही तो प्रश्नच का मान्य केला म्हणून डावे लोक तुमच्यावर नाराज झाले आणि तुम्ही पुरेसे आमच्या बाजूने आला नाहीत म्हणून आमचंही पूर्ण समाधान झालं नाही. परंतु शेतकरी संघटनेने प्रकाशित केलेली जी काही पुस्तकं आहेत त्यातलं हेच पुस्तक अजूनही सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याचं नाव आम्ही ‘खंडन-मंडन’ असं ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांची भाषणं शब्दांकन करून छापलेली आहेत. त्यावेळी अशीही कल्पना होती की, तुम्ही आणि शरद जोशींनी एकमेकांची भाषणं पुन्हा एकदा वाचावी आणि पुन्हा जे मुद्दे उपस्थित होतील, तसंच त्यादिवशी तुम्हा दोघांमध्ये ज्या चकमकी झाल्या त्यासंबंधी तुम्हा दोघांनाही अजून काही म्हणायचं असेल तर त्यासाठी एक दुसरी फेरी करावी आणि त्या फेरीतल्या भाषणांसकट हे पुस्तक प्रकाशित करावं. पण नंतर तुम्ही आणि शरद जोशी वेगळ्या मार्गाने जाणार हे स्पष्ट झालं. मात्र ग्रामीण महिलांच्या हातात सर्व राजकीय सत्ता द्यावी, त्या जास्त चांगलं व्यवस्थापन करतील या मुद्द्यावर तुम्ही आणि शरद जोशी एकाच मताचे होता. पुढे हा मुद्दा शेतकरी संघटनेचा कार्यक्रम म्हणून आम्ही राबवला. पुढे ग्रामीण भागात महिलांना जिल्हा परिषदेपर्यंत 33 टक्के आरक्षण मिळालं त्याची सुरुवात माझ्या दृष्टीने ती होती.

माझं सुदैव असं आहे की, एकाच काळात माझी तुम्ही आणि शरद जोशी यांची गाठ पडली. एक अर्थव्यवस्थेचा निर्भय अभ्यासक/ संशोधक आणि दुसरा समकालीन नेहरूप्रणित अर्थव्यवस्थेची निर्दय चिरफाड करून ती लोकांच्या भाषेत मांडून त्यांना आंदोलनासाठी पेटवणारा. त्यातच ज्ञानप्रबोधिनी सोडून आधी ग्रामायण आणि नंतर पत्रकारितेमुळे मी जसा ग्रामीण भागात हिंडू लागलो तसतसं माझं अर्थशास्त्राचं ज्ञान तोकडं पडायला लागलं. मात्र तुम्हा दोघांच्या मैत्रीमुळे अपुऱ्या ज्ञानी माणसाची कोणताही प्रश्न विचारण्याची सोय झाली. त्या प्रश्नांची तुमची मार्मिक उत्तरं आजही आठवतात. एकदा मी तुम्हाला विचारलं, "प्लॅनिंग कमिशन आहे, केंद्र सरकारचं अर्थ खातं आहे, राज्य सरकारांची स्वतंत्र अर्थ खाती आहेत, ‘गोखले’सारख्या अभ्यास करून सल्ला देणाऱ्या संस्था आहेत, तुमच्यासारखे संशोधक आहेत, तरी भारतातल्या काही लोकसंख्येपर्यंत याचे कोणतेही फायदे का पोहोचत नाहीत?" तुम्ही म्हणालात, "आधुनिक अर्थशास्त्राच्या चौकटीत भारतीय अर्थव्यवस्था आणणं आणि सर्वंकष धोरण ठरवणं अतिशय गुंतागुंतीचं आहे; इतक्या कुठेही नोंदणी नसलेल्या sub-economies (दुय्यम अर्थव्यवस्था) आपल्याकडे आहेत. हजारो जाती आहेत. आणि बहुतेक सगळ्या जातींचे पोट भरण्याचे व्यवसाय आहेत. या सगळ्याची नोंदणी ठेवणं अवघड असतं. (हे बोलणं 1982/83 चं आहे.) आणि त्या सगळ्यांना एकाच धोरणामधून काही मिळणं अशक्य असतं. धोरण आखताना अधिकाधिक लोकांचा फायदा व्हावा हेच उद्दिष्ट ठेवावं लागतं, त्यामुळे त्यामुळे अनेक सब-इकॉनॉमिजवरती गुजराण करणारे लोक तसंच पारंपरिक जगत राहतात."  लगेच माझ्या डोळ्यासमोरुन नॅशनल हायवेवरून जाणारे अवाढव्य आधुनिक कंटेनर्स आणि त्याच हायवेच्या कडेने जाणारे गाढवांचे, मेंढ्यांचे, दुभत्या गाईंचे कळप उभे राहिले. 'आधी पुनर्वसन मग धरण' ही घोषणा त्यावेळी नव्हती. एकदा मी तुम्हाला विचारलं, "धरणं तर जगभर बांधली जातात पण इतर विकसनशील देशात इतक्या मोठ्या संख्येने धरणग्रस्त का दिसत नाहीत?" तुम्ही जरा विचारात पडलात आणि म्हणालात, "हा प्रश्न मला कोणीतरी पहिल्यांदाच विचारतोय, जरा अभ्यास करून याचं उत्तर देतो!" पुढच्या भेटीत मी आठवण करायच्या आधीच तुम्ही म्हणालात, "हर्डीकर, आपल्या देशाइतकी प्रचंड लोकसंख्या असलेले देश मुळातच थोडे. त्यामुळे अगदी अडचणीच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती मुळातच कमी असते. आपल्या देशात मात्र कडेकपारीतसुद्धा हजारो वर्षं नांदणारी गाव सापडतात." मला उत्तर पटलं ते दोन कारणांनी - जिम कॉर्बेटचं बहुतांश लिखाण अशा गढवाली लोकांबद्दलचं आहे, हे पहिलं कारण! आणि महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात ट्रेकिंग करताना एकही स्थानिक माणूस भेटला नाही असा एकही दिवस मला आठवत नाही. शिवाय धरणग्रस्त सतत डोंगराच्या वरच्या भागाकडे सरकत असतात, नव्याने वस्ती करतात, धरणाचं पाणी उन्हाळ्यात ओसरलं की गाळपेराची शेती करतात हेही मी पाहत होतो.

2

त्या पिढीतल्या तुमच्यासारख्या माणसांना पैसा या गोष्टीचं काहीतरी विचित्र वावडं होतं. एकदा तुम्ही मला म्हणालात, ‘‘मला एक सहायक हवा आहे. एखादा गरजू आणि हुशार मुलगा बघा.’’ पण सर, ‘गरजू आणि हुशार’ हा काही अर्थशास्त्रीय विचार नाही! मी तुम्हांला म्हटलं, ‘‘अशा दोन्ही प्रकारची मुलं माझ्या परिचयाची आहेत. तुम्हांला गरजू हवा की हुशार हवा? हुशार माणसाला जर तुम्ही गरजू माणसाचा पगार देणार असाल तर मी काही तुमच्याकडे कुणालाही पाठवणार नाही.’’ तुम्ही चिडून म्हणाला, ‘‘जा चालते व्हा. हा विषय आपण बोललोच नाही असं समजा.’’ पण तुमच्या पिढीची ही भानगड काय होती? उत्तम काम करा, उत्तम पैसे मिळवा आणि ते उत्तम प्रकारे खर्च करा हा सगळ्यांत चांगला विचार नाही का?

काही वेळा असा अनुभव येतो की वाईट गोष्टी घडून जातात परंतु त्याच्यातूनही काही चांगलं घडतं. 1981 मध्ये माझे मेंटर प्रा. अ. भि. शहा यांचं हृदयविकाराने अचानक आणि अकाली निधन झालं. त्याच्या पुढच्याच वर्षी शहा यांच्या पत्नी त्यांच्या मुलीकडे काही महिन्यांकरता राहायला गेल्या होत्या. त्यावेळी मी शहांच्या बंगल्याचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या घरीच राहत होतो. शहा आणि तुम्ही माझ्या आयुष्यात बिंब-प्रतिबिंब असल्यासारखे आहात. एकाच गल्लीच्या अर्ध्या भागामध्ये तुमचा बंगला होता आणि दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये शहांचा बंगला होता. शहा गणिताचे प्राध्यापक आणि तुम्ही संख्याशास्त्राचे संशोधक. तुम्ही पोलिटिकल इकॉनॉमीमध्ये जास्त रमला तर तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र हे शहांचे आवडते विषय होते. त्यामुळे दोघांना एकत्र केलं तर मानवी आयुष्याचे चार महत्त्वाचे आयाम - जे न्यायमूर्ती रानडे यांनी सांगितलेले आहेत - राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजाचं नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान या चार आयामांकडे लक्ष दिल्याशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास करता येणं शक्य नाही  अशी रानडे यांची भूमिका होती - तुम्हा दोघांमुळे माझ्या आयुष्यात आपोआप हे चार कोपरे तयार झाले. तुम्हालाही मी इतक्या जवळ राहायला आलो याचा आनंद झाला होता. कारण, मी राहायला आल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी सकाळी साडेसात वाजता बेल वाजली. मी डोळे चोळत दार उघडतोय तर नेहमीच्या पांढऱ्या शुभ्र पोषाखामध्ये, अंघोळ करून नीट विंचरलेले काळेभोर केस, दाढी असे तुम्ही दारात उभे होता. माझा अवतार पाहून तुम्ही म्हणाला, “अरे, माझी वेळ चुकली वाटतं.” मी म्हटलं, “नाही. तुम्हाला केव्हाही यायला परवानगी आहे...” त्यानंतर तुम्ही केव्हाही हुक्की आली की माझ्याकडे यायचा आणि मग नंतर भांडारकर रोडवर तुमचा एक आवडता चहावाला होता त्याच्याकडे जाऊन आपण चहा घ्यायचो, गप्पा व्हायच्या. त्या काळात माझी फिरती बरीच होती. तुमचेही अनेक दौरे असायचे. त्यातूनच आपले एकत्र प्रवास घडायला सुरुवात झाली.

तुम्हाला खाण्यापिण्याचे षोक फारसे नसावेत; तरीही एकदा आपण संगमनेरला जात असताना वाटेत धारगावला भरधाव चाललेली कार थांबवून तुम्ही पळत पळत जाऊन एक ऑफव्हाईट रंगाचा तळहाताच्या आकाराचा जाडजूड पेढा घेऊन आला होता; त्यातला अर्धा मला देत तुम्ही खास दांडेकरी टिप्पणी केली, 'खाऊन बघा. पूर्वी हा पेढा खव्याचा असायचा आता साखरेचाच वाटतोय!' मला सहकारी साखरेची तुमची अॅलर्जी तेव्हा परत एकदा आठवली होती. तसं म्हटल्यावर तुम्ही कधी नव्हे ते कसनुसं स्मित केलंत - 'तुम्हाला सहकारी साखर गोड लागते तर सर!' असं मी म्हटलं होतं. चहा तुम्हाला आवडत असे; गोखले इन्स्टिट्यूटच्या आसपास चहा कुठे प्यावा, कुठल्या टपरीवर 'बरा' वडापाव मिळतो तेही तुम्ही अधूनमधून सांगायचा. जीभ तिखट असली तरी खाण्यातली आवड सपक होती - त्या काळात मलाही तिखट वर्ज्य होतं त्यामुळे आपलं जमायचं!

माझ्याच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे,

उत्कटतेची अफाट ऊर्जा, प्रखर बुद्धीची तिखट धार 
संघर्षाचा घेतला वसा, बांधिलकीचे इंधन अपार!

ही तुमची मुख्य प्रतिमा असली तरी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे इतर आयामसुद्धा मला तुमच्यासोबत प्रवास करताना दिसायला लागले.

जेव्हा आपण पहिल्यांदाच प्रवासाला बाहेर पडलो तेव्हा तुमचे मित्र दत्ता देशमुख यांनी तुम्हाला कार पाठवलेली होती. म्हाळादेवी-निळवंडे या धरणांचा त्यावेळी वाद चालू होता. असे वाद मुख्यतः राजकीय असतात. संगमनेर तालुक्यामधल्या देशमुखांच्या गावी एक धरण परिषद त्यांनी बोलावलेली होती. तिथे तुम्ही प्रमुख पाहुणे होतात. या प्रवासाला आपण जेव्हा चाललो होतो त्यावेळेला ड्रायव्हरने एक चूक केली. पेट्रोलपंपावर डिझेलच्या गाडीमध्ये चुकून पेट्रोल भरलं. त्यामुळे आधीचं पंधरा-वीस लिटर डिझेल आणि नंतर भरलेलं पंधरा-वीस लिटर पेट्रोल शोषून बाहेर काढावं लागलं. या सगळ्यात अर्धा तास गेला. ती सगळी टाकी रिकामी करून,  पुन्हा डिझेल भरून निघेपर्यंत अर्धा तास वेळ गेला. मला असं वाटलं होतं की, तुमच्या संतापाचा स्फोट होईल पण तुम्ही मात्र पेट्रोलपंपावर ‘प्रवासात असल्या गोष्टी चालायच्याच’ असा चेहरा करून उभे होतात. आपण तिथे फेर्‍या मारत गप्पा मारत होतो. दांडेकर तापट आहेत परंतु उठसूट चिडके नाहीत हे मला त्यावेळेला जाणवलं. थोडा उशीर झालेला होता त्यामुळे गाडी वेगाने नेणं आवश्यक होतं. त्यामुळे पाठीमागच्या काचा आपण बंद केलेल्या होत्या कारण तुमचे केस वाऱ्याने उडू नयेत याची तुम्ही कायम दक्षता घ्यायचा. बाबासाहेब पुरंदरे आणि तुमच्यात हे एक (कदाचित एवढं एकच) साम्य आहे. तुम्हा दोघांच्या खिशात कायम एक कंगवा  आणि व्यासपीठावर जाण्यापूर्वी केसांतून आणि दाढेतून कंगवा फिरवल्याशिवाय तुम्ही दोघे व्यासपीठावर जात नाही. त्यावेळी मी जवळजवळ चेनस्मोकर होतो. तुमचा धूम्रपानाला विरोध नव्हता आणि पाठिंबाही नव्हता. पण मी गाडीमध्ये सिगरेट ओढली तर तुम्ही हरकत घेत नव्हता. त्यामुळे मी सिगरेट पेटवली आणि ती संपल्यानंतर उरलेलं, अजून जळत असलेलं थोटुक गाडीची उजवीकडची काच थोडीशी उघडून बाहेर टाकलं. ते बाहेर गेलंच नाही वाऱ्याचा  झोत आला आणि त्या एका इंचाच्या फटीतून ते पुन्हा आत आलं आणि ते थेट तुमच्या शर्टवर येऊन पडलं. मी प्रसंगावधान राखून ताबडतोब ते उचललं पण तुम्ही तत्क्षणी मला म्हणालात, “शरद जोशीला विरोध करतो म्हणून जाळून मारता की काय मला?” हा माणूस आपल्या बाजूचा नाही, शरद जोशीचा आहे याचा रागही त्याच्यामध्ये होता पण तो रागही इतका नव्हता की तुमचा मिश्कीलपणा तुम्हाला सोडून जाईल. खादीच्या तुमच्या जाड्याभरड्या कापडामुळे असेल किंवा मी ते लगेच उचलल्यामुळे असेल माझ्या सुदैवाने तुमच्या शर्टला काही भोक वगैरे पडलं नाही. नाही तर मला आयुष्यभर तुम्ही त्यावरून ऐकवलं असतं. आपण धरण परिषदेला गेलो. हे धरण परिषद वगैरे तुमच्या शिस्तीमध्ये न बसणारे कार्यक्रम होते. शेतकरी संघटनेमध्ये काम करायला लागल्यानंतर मी मात्र एक गोष्ट शिकलो. एकदा पुणे जिल्हा सोडला की घड्याळाचा विचार बाजूला ठेवायचा. प्रत्येक ठिकाणी आपण वेळेवर पोहोचायचं. पण कार्यक्रम वेळेवर सुरू होईल किंवा होणार नाही या गोष्टी आपल्या हातात नसतात. तुमचा टॉलरन्स मात्र फार कमी होता. शहरांमधल्या कार्यक्रमांतही जरा कोणी मुद्याला सोडून बोलायला लागलं की तुम्ही अस्वस्थ व्हायचा. काही वेळा त्या व्यक्तीला ‘अहो, तुम्ही कुठे भरकटत चालला आहात’ असं विचारायलाही कमी करायचा नाहीत. मी तुमची ग्रामीण भागातली भाषणं ऐकली तेव्हा तुमच्यात आणि शरद जोशींमधलं हेही मला एक साम्य दिसलं की, बोथ ऑफ यू नेव्हर प्लेड टू द गॅलरी! काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं असतं की, शेतकऱ्यांच्यात मिसळायचं म्हणजे शेतकऱ्यांच्या सवयी आपल्याला लावून घेतल्या पाहिजेत. त्यांच्यासारखं तंबाखू खायला शिकलं पाहिजे, त्यांच्यासारखंच कुठेही विचार न करता थुंकायला शिकलं पाहिजे. पण हे तुम्हा दोघांच्यातही नव्हतं. त्याचप्रमाणे काहीजण मुद्दाम ग्रामीण शैलीने बोलायला जातात. ग्रामीण धर्तीचे विनोद करायला जातात  आणि हास्यास्पद होतात. तुम्ही आणि शरद जोशी यांच्यामध्ये हे अतिशय महत्त्वाचं साम्य होतं की, तुम्ही कधीही मुद्द्याला सोडून बोलायचा नाहीत. विनाकारण फापटपसारा वाढवायचा नाहीत. तुमची जी शहरी सुशिक्षित मध्यमवर्गाची भाषा होती, त्या भाषेतच तुमची भाषणं असायची. शरद जोशींच्या भाषणांचा वेग तुमच्या मानाने थोडा कमी होता. त्यामुळे तुमचं भाषण कधीच फार मोठं नसायचं. अर्ध्या तासाच्या वर तुम्ही बोलल्याचं मला तरी आठवत नाही. अशी आणखी उदाहरणं द्यायची तर महाराष्ट्राचे अनेक वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांची देता येतील. त्यांचीही भाषणं कधी फाफटपसाऱ्याची नसत.

पण परिषद बोलावली आहे तर ती दिवसभर चालली पाहिजे. अशावेळी सगळे वक्ते तुमच्यासारखे असतील तर ती परिषद सुरु झाली म्हणेपर्यंत आणि मुद्दे लोकांच्या लक्षात आले म्हणेपर्यंत संपूनही जाईल. आणि मग जो राजकीय माहोल निर्माण करायचा असतो तो होणार नाही. त्यामुळे अशा ठिकाणी ऐसपैस बोलणारे वक्तेही लागतात. त्यामुळे त्या धरण परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये डी. डी. चव्हाण नावाचे एक मंत्री होते. ‘एरंड चव्हाण’ म्हणून ते प्रसिद्ध होते कारण महाराष्ट्रभर त्यांनी एरंडाची झाडं लावायचा कॅम्पेन हाती घेतलेला होता. ते एक तास बोलले. दत्ता देशमुखांच्या ते मैत्रीतले होते आणि स्वतः मंत्री असल्यामुळे कदाचित म्हाळादेवी-निळवंडे धरणांच्या वादात त्यांना भूमिका घ्यायची नव्हती. त्यामुळे त्यांच्या सबंध भाषणात एकही मुद्दा नव्हता. पण तो दहा-पंधरा हजारांचा समुदाय त्यांनी धरून ठेवला होता, हे तुम्ही बघत होता. चव्हाण बोलतील तसे लोक हसून गडाबडा लोळत होते आणि त्यांनी एखादं गंभीर वाक्य उच्चारलं तर लोक गंभीरही होत होते. मला वाटलं तुम्हाला या भाषणाचा कंटाळा आला असेल.  पण परत येतानाच्या प्रवासात तुम्ही मला विचारलं, “हे लोक कसं काय जमवतात हो? त्या माणसाच्या भाषणामध्ये एकही मुद्दा नव्हता. तरी त्यांनी एक तास कसा काय काढला मला काही समजत नाही.” पुढे तुम्ही म्हणालात, “आम्हाला असं बोलता येत नाही. मी एखाद्या सेमिनारमध्ये असलो काय किंवा सरकारी कमिटीमध्ये असलो काय आणि सभेमध्ये असलो काय माझं बोलणं, माझे मुद्दे, माझी भाषा मला बदलता येत नाही.” तेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरताना लोक संभाषण कुठल्या पद्धतीने करतात, कुठल्या प्रकारची शैली त्यांना आवडते यावर आपल्यात अशी चर्चा झाली. ‘तुम्ही सहसा म्हणी वापरत नाही, सहसा उदाहरणं देत नाही, संत वाङ्मयाचा - तुमचा काही संबंध दिसत नाही...’ असं बरंच बोलणं झालं. पुढच्याच भेटीत तुम्ही मला म्हणालात की, तुमचं म्हणणं मला पटलं. मला लहानपणी शिकलेले मनाचे श्लोक तेवढे पाठ आहेत. मी म्हटलं, “रामदास ब्राह्मण्यवादी असल्यामुळे तसाही अनपॉप्युलर आहे आणि ग्रामीण भागात तुकाराम - ज्ञानेश्वर जितके पोहोचले आहेत तितके अन्य संत पोहोचलेले नाहीत. ‘ग्यानबा तुकाराम’ ही तर वारकरी संप्रदायाची घोषणाच आहे आणि वारकरी संप्रदाय काही फक्त ब्राह्मणांचा नाही. या दोघांप्रमाणेच एकनाथही बहुजन समाजापर्यंत पोहोचलेला आहे. तेव्हा यांचं तुम्ही काही वाचलं आहे का?” तुम्ही अगदी लहान मुलासारखा चेहरा करुन म्हणालात, “नाही हो. त्याला कधी वेळच झाला नाही आणि हे इतकं महत्त्वाचं असतं हे कधी लक्षातही आलं नाही. आता काय करता येईल? त्या मोठाल्या गाथा आता मी केव्हा वाचू?”  तेव्हा मी तुम्हाला म्हटलं, “तुम्हाला न आवडणारं नाव सांगतो. त्यांनी तुमच्या उपयोगाचं एक काम केलेलं आहे.” तुम्ही म्हणालात, “कोण?” मी म्हटलं, “विनोबा भावे” तुमच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या. “विनोबांनी या चारही संतांच्या निवडक रचनांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत आणि त्याला त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत, त्याही चांगल्या आहेत. विनोबांचं बाकी सगळं सोडून द्या पण गीताई, गीता प्रवचने आणि संतांच्या निवडक रचनांची त्यांनी संपादित केलेली आणि प्रस्तावना लिहिलेली पुस्तकं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे.” नंतर मला तुमचं अतिशय कौतुकही वाटलं आणि आनंदही झाला कारण खादी आणि ग्रामोद्योगाबद्दलचे तुमचे सर्व आक्षेप आणि अनिच्छा बाजूला ठेवून तुम्ही पुढच्या चारच दिवसांत ती पुस्तकं आणलीत आणि वाचायला सुरुवात केलीत.

एक गमतीशीर प्रसंग आठवतो. एकदा तुम्हाला नगरला जायचं होतं. तुम्ही मला म्हणालात की, अमुक वाजता माझ्या घरी या. मी तयार असेन आणि आपण लगेच निघू. आणि मग तुम्ही मला दरडावून सांगितलंत, “आणि तिथे येऊन मूर्खासारखं ‘चला वहिनी तुम्हीपण आमच्याबरोबर... अनायसे गाडी आहेच’ असं काही बोलू नका. मी तिला सांगितलं आहे की, तो पत्रकार सोबत आहे. तू कशाला येतेस’ हे आपलं माहीत असू द्या. नाही तर तुम्ही घोटाळा करून ठेवाल.” आता याला गृहकलह म्हणायचं का या भानगडीत मी जात नाही! 

एकदा आपण संध्याकाळी कुठल्यातरी कार्यक्रमाहून परत येत होतो आणि तुम्ही मला म्हणाला की, आता मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे. (मी मनात म्हटलं, तुम्ही सकाळपासून दुसरं काय केलं आहे?) आता मी थोडावेळ गाणार आहे. दररोज संध्याकाळी पंधरा-वीस मिनिटं मी जिथे असेन तिथे गाणं म्हणतो. मी म्हटलं, “गाणं हा माझ्याही आवडीचा विषय आहे. म्हणा तुम्ही गाणं” तुम्ही म्हणालात, “नाही. मी तसं गात नाही. माझ्या गाण्याला शब्द नसतात. मी मुक्तकंठाने माझा आवाज फेकत असतो” आणि तुम्ही सुरुवात केली. खरं सांगायचं झालं तर पुढे दहा-पंधरा मिनिटं मुक्तकंठाने चाललेला तो आरडाओरडाच होता असं म्हणायला हरकत नाही. पुढे खूप वर्षांनी मी किराणा घराण्याच्या विजयपताका श्रीमती गंगूबाई हनगल यांना हा प्रश्न विचारला होता की, तुमच्या गाण्यात हा आरडाओरडा कुठून आला? तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं, “अरे बाबा, मी स्टेजवर बसले की माझी मी मोकळी असायचे मला हवा तसा आवाज काढायला आणि मला हवं तितक्या जोरात गायला.” पण हे कनेक्शन मला बरंच नंतर लक्षात आलं. आपण स्वतः मुद्देसूद राहायचं, स्वतः शिस्तीने राहायचं, ती शिस्त इतरांना लागली पाहिजे असा आग्रह धरायचा, ती लागली नाही तर त्या माणसावर चिडायचं. तुमचं चिडणं म्हणजे दुर्वास ऋषीसारखंच होतं. त्या काळात जन्माला आला असता तर तुम्ही त्याच्यासारखं कुणालातरी भस्मही केलं असतंत! हे जे तुमचं बांधलेलं आयुष्य होतं त्यात तुम्हाला पंधरा-वीस मिनिटं हवी असायची आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकांत हवा असायचा. मी तुम्हाला म्हटलं, “सर, तुम्ही असं कशाला गाता?” तुम्ही म्हणालात, “मला मोकळं वाटतं म्हणून गातो. मी तुम्हाला सांगितलं होतं की, तुम्हाला त्रास होईल.” मी म्हटलं, “मला त्रास नाही झाला. पण मला आश्चर्य वाटलं. मी ही असंच तबला-पेटीशिवाय गातो पण त्या गाण्यात शब्द असतात, काही वेळेला त्या शास्त्रीय बंदिशी असतात, काही वेळेला अभंग असतात, काहीवेळा लोकगीतं असतात. असं का नाही तुम्ही करत?” असं मी तुम्हाला सुचवलं आणि त्यावेळी मी तुम्हाला भूप रागामध्ये मी चाल लावलेला तुकारामाचा ‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते’ हा अभंग म्हणून दाखवला आणि म्हटलं, “तुम्ही जी पुस्तकं आणली आहे त्यातून तुमच्या आवडीचे अभंग निवडा. आपण त्यांना चाली लावू. म्हणजे तुमचा आनंदही कायम राहील आणि अर्थ असलेलं काहीतरी तुमच्या तोंडून निघेल.” “बरं बरं बघू या” तुम्ही म्हणालात. तुम्ही असं म्हटलं म्हणजे ती गोष्ट घडायची नाही हे ठरलेलं होतं.

एकदा नगरला तुमचं काहीतरी काम होतं म्हणून आपण गेलो होतो. खरं म्हणजे मी येणार नव्हतो. पण त्यावेळेला मला इंडियन एक्सप्रेसमध्ये रोजचं बांधलेलं काम नसायचं आणि पुण्यात असेन त्यावेळी मी मोकळा असायचो. त्यामुळे मी तुमच्यासोबत आलो. एक कंटाळवाणा दिवस समोर वाढून ठेवलेला आहे याची जाणीव होत होती. नगरच्या सर्किट हाऊसमध्ये मध्ये तुमची मीटिंग चालली होती. त्या मीटिंगला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री असे महाराष्ट्र सरकारचे दोन मंत्री यायचे होते. तिथे मी पत्रकार आहे हे सांगायचं नाही असं आपलं ठरलं होतं. नाही तर हा पत्रकार मिटिंगमध्ये आहे म्हणजे आपण जपूनच बोललं पाहिजे असं इतरांना वाटेल. पण मीटिंगचा विषय आता मला आठवतही नाही इतका कंटाळवाणा आणि कमी महत्त्वाचा होता म्हणून मी फार वेळ मीटिंगमध्ये थांबलोच नाही. मात्र त्या वेळी एक प्रसंग घडला. त्या दोन मंत्र्यांपैकी असीर नावाचे एक मंत्री होते. त्यांना मीटिंग चालू असताना मध्येच फोन आला. त्यांच्या सेक्रेटरीने आत मीटिंग हॉलमध्ये जाऊन त्यांना सांगितलं. तेही लगेच उठून बाहेर आले. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते त्यामुळे ट्रंक कॉल वेळेवर लागणं आणि त्यावर स्वच्छ ऐकू येणं मुश्कीलच असायचं. फोनवरही मोठमोठ्याने बोलावं लागायचं. असीर फोनवर तीन-चार मिनिटं मोठमोठ्याने अखंड ओरडत होते. "हू इज द कलेक्टर? तो स्वतःला काय समजतो? मी मंत्री आहे. कलेक्टरने माझा निर्णय मानला पाहिजे आणि तो राबवला पाहिजे. ऐकत नसेल तर त्या कलेक्टरला सांगा तू किती दिवस राहतोस औरंगाबादला तेच बघतो. डोणगावचं प्रकरण काय आहे ते त्याला माहीतसुद्धा नाही, साउथ इंडियन आहे तो... वगैरे वगैरे. मी ऐकत होतो. माझ्यातला पत्रकार जागा होता. डोणगाव, औरंगाबाद आणि असीर एवढे तीन शब्द मी लक्षात ठेवले. परत येताना तुम्ही मला म्हणालात की, तुम्ही आज अगदी कंटाळला असाल ना. मी म्हटलं, "कंटाळलो तर होतोच पण आज मला एक बातमी मिळाली. तुम्हाला आठवतं का ते असीर मध्येच पाच-दहा मिनिटं बाहेर आले होते. तो ट्रंक कॉल असल्यामुळे मला त्यांचा शब्दन् शब्द ऐकू येत होता. आता मी उद्याच औरंगाबादला जाईन. खरं म्हणजे तुमच्याबरोबर परत येण्याऐवजी तिकडे जायचा माझा विचार होता पण तुम्हाला येता-जाता कंपनी द्यायची असं आपण ठरवून आलेलो आहे." तुम्ही माझ्याकडे बघतच बसलात आणि म्हणालात, "तुमचं पत्रकारांचं पोलिसांसारखंच दिसतं आहे." मी म्हटलं, "खरं आहे. तत्वतः तरी ते बरोबर आहे. डॉक्टर, पोलीस आणि पत्रकार यांची 'राउंड द क्लॉक' ड्युटी असते. त्यावेळी तुम्ही मला म्हणालात की, तुम्ही औरंगाबादला उद्या जाऊन आलात की मला काय काय घडलं ते सांगा म्हणजे मलाही कळेल तुम्ही लोक इन्वेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग कसं करता हे मला कळेल आणि मग मीही फोनवर बोलताना आसपास कोणी पत्रकार आहे की नाही याची काळजी घेत जाईन. मग मी खरोखरच औरंगाबादला जाऊन आलो. तो किरकोळ विषय होता. इस्लामधर्मियांसाठी वक्फ फंडाचे पैसे असतात त्यामध्ये भानगड चालू होती. फार मोठं प्रकरण नव्हतं. तुमच्या बारकाईने इकडे तिकडे पाहण्याचा असाही एक अनुभव मी घेतला.

पुढे तुम्ही 'अर्थबोध' ही संस्था स्थापन केलीत. 'अर्थबोध'मध्ये 'अर्थ'ही होता आणि 'बोध'ही होता. (पोलिटिकल इकॉनॉमी हा शब्द त्यावेळी प्रचारात नव्हता नाही तर गोखले इन्स्टिट्यूटचं नाव 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी’ असायला हवं होतं असं माझं मत आहे.) त्याच पद्धतीचं काम अर्थबोधमध्ये व्हावं असं तुम्हाला अपेक्षित होतं. त्यामुळे पोलिटिकल इकॉनॉमी आणि सामाजिक प्रश्न यासंबंधी काम करणार्‍या संस्थांना तुम्ही अर्थबोधमधल्या सगळ्या सुविधा माफक दरामध्ये उपलब्ध करून देत होता. आपल्या दोघांचीही मैत्रीण विद्युत भागवत हिने अशीच एकदा स्त्रियांच्या संबंधात एक बैठक तिथे बोलावली होती. तुम्ही स्त्रीद्वेष्टे होता की नाही हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. पण स्त्रियांचा उल्लेख तुम्ही समाजवाद्यांप्रमाणे 'मैत्रिणी' असा करत नव्हता किंवा हिंदुत्ववाद्यांप्रमाणे 'माता-भगिनी' असाही करत नव्हता. तुम्ही कुणाचंच उदात्तीकरण करत नव्हता, त्यामुळे स्त्रियांचंही उदात्तीकरण तुम्हाला मान्य नव्हतं. कुणाच्याही बाबतीत अनावश्‍यक फाजील सलगी तुमच्या स्वभावात नव्हती तशीच ती स्त्रियांच्या बाबतीतही असणं शक्य नव्हतं. पण दांडेकरांच्या संस्थेत कार्यक्रम आहे, त्यांनीच हॉल आणि बाकीच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत; त्यामुळे उद्घाटनासाठी तुम्हाला बोलवणं क्रमप्राप्त होतं. तिथे आल्यावर तुम्ही चार शब्द बोलले पाहिजेत हेही क्रमप्राप्त होतं. त्याप्रमाणे उद्घाटनाच्या कार्यक्रमात तुमचं छोटेखानी भाषण झालं. अगदी जीवावर आल्यासारखं तुम्ही बोललात. त्यात नेहमीप्रमाणे दोन-चार टोमणे तिथे जमलेल्या ‘बायांना’ तुम्ही मारले. नंतर म्हणाला, "तुमचं हे सगळं चालू द्या. मला दुसरी महत्त्वाची कामं आहेत. कुठे काही अडचण वाटली तर आमची ही दोन माणसं आहेत, त्यांना सांगा. ते तुमची अडचण सोडवतील." आणि तुम्ही जाऊ लागला. तेवढ्यात वादावादीसाठी प्रसिद्ध असलेल्या एक बाई म्हणाल्या, "दांडेकर सर, तुम्ही असे जाऊ नका. मला तुमच्या काही मुद्द्यांचा परामर्श घ्यायचा आहे." हे वाक्य ऐकल्याबरोबर तुमचा हात दाढीमध्ये गेला. माणसाचा चेहरा किती तुच्छतादर्शक होऊ शकतो याचा मला तेव्हा प्रत्यय आला. तुमच्या त्या मुद्रेचा फोटोच काढून ठेवायला हवा होता. त्या बाईंकडे अत्यंत जळजळीत कटाक्ष टाकून तुम्ही म्हणालात, “हे पाहा. तुमचं चालू द्या. मला माझ्या कामाला जाऊ द्या. परामर्श? मी परामर्श घ्यायला लागलो तर तुमची पंचाईत होईल...” एवढं बोलून तुम्ही निघूनही गेलात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला फायनर साईडस् असूनही एकदा तुम्ही चर्चेच्या चौकटीत आलात की, तुमचा कठोर स्वभाव असा उफाळून यायचा.

मला तुमच्या वैयक्तिक आयुष्याची फारशी माहिती नाही. किंबहुना तुमच्या चरित्राची मला काहीच माहिती नाही. तुम्ही कुठे जन्माला आला, कुठे शिकला,तुमचे वडील काय करत होते हे विषय कधी आपल्यामध्ये आलेच नाहीत. तुम्ही मूळचे सातारचे एवढं माहीत होतं. पण तुमच्या सासुरवाडीची मंडळी काही साधी नव्हती. त्र्यं. शं. शेजवलकरांनी ‘विभावरी वाङ्मयाच्या निमित्ताने’ असा एक लेख लिहिलेला आहे. त्यात महाराष्ट्राच्या तीन ‘वाढाळू कन्यका’ असा उपहासात्मक उल्लेख येतो. (शेजवलकर म्हणजे इतिहासाच्या क्षेत्रातले तुमचेच पूर्वावतार किंवा तुम्ही त्यांचे अर्थशास्त्रातले वंशज असंही म्हणता येईल पण शेजवलकरांच्या मानाने तुमचं आयुष्य खूपच नॉर्मल होतं.) त्या तीन कन्यका म्हणजे मालतीबाई बेडेकर, इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत. तुमचं लग्न ज्या खरे कुटुंबामध्ये झालं होतं, त्यातल्या कुटुंबप्रमुखाचं ‘खरे मास्तर’ नावाचं कादंबरीवजा चरित्र मालतीबाईंनी लिहिलं आहे. त्या कुटुंबातील तीन बहिणींपैकी सर्वात धाकट्या बहिणीशी तुमचं लग्न झालं. बाळूताई खरे म्हणजेच विभावरी शिरुरकर आणि मालतीबाई बेडेकर! थोरल्या कृष्णाबाई तर त्यांच्या यजमानांपेक्षा चार वर्षांनी मोठ्या होत्या. त्या काळात धाडस करूनच त्यांनी लग्न केलं होतं. त्या स्वतंत्र लेखिका होत्या. मालतीबाईंविषयी काही बोलायलाच नको! त्या मानाने कुमुदिनी दांडेकर इतर दोघी बहिणींपेक्षा दिसायला सुस्वरूप होत्या. जरी त्यांचं नाव इतर दोघींइतकं गाजलं नाही तरी त्यांनीही त्यांच्या विषयाचं उत्तम शिक्षण घेतलेलं होतं आणि त्या काम करत होत्या. हरिभाऊ मोटे हे प्रकाशन क्षेत्रातलं आणि सिनेमाच्या क्षेत्रातलं मोठं नाव. विश्राम बेडेकर हे प्रसिद्ध नाटककार, लेखक आणि तेही सिनेमाच्या क्षेत्रात होते. त्यांच्याबद्दलच्या अनेक दंतकथा प्रसिध्द होत्या. तुम्ही तिघे साडू कधी एकत्र भेटता की नाही, तुमच्यामध्ये काही देवाणघेवाण होते का याबद्दल मला उत्सुकता होती पण तुम्ही त्या दोघांचा किंवा तुमच्या मेव्हण्यांचा उल्लेख माझ्याजवळ फारसा कधी केला नाही. एकदाच असा उल्लेख झाल्याचं आठवतं. काही कारणाने मी तुमच्या मेव्हण्यांना भेटायला जायचा विचार करत होतो. तुम्ही मला म्हणाला की, जरा काळजीपूर्वक बोला त्यांच्याशी. तो माणूस जरा तोंडाळ आहे. मी हसायला लागलो. ते बघून तुमच्या कपाळाला पुन्हा आठ्या पडल्या. तुम्ही मला म्हणाला, “काय झालं?” मी म्हटलं, “तुम्हीसुद्धा तोंडाळ म्हणताय म्हणजे तो माणूस काय असेल या कल्पनेने मला हसू यायला लागलं.” आणि खरंच तसं झालं. त्या गृहस्थांना समोरच्या माणसांशी बोलण्यात काही इंटरेस्ट नसायचा. तेव्हा एकदा आमची भेट झाली आणि नंतर पुन्हा कधीही झाली नाही.

ज्या काळात आपण भेटत होतो तेव्हा तुमचं वय वॉर स्टोरीज (आमच्या काळी असं झालं होतं,तसं झालं होतं) सांगण्याचं होतं. पण तसं काही मला तुमच्याकडून ऐकायला मिळालं नाही. गोखले इन्स्टिट्यूट ही बोलूनचालून इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे आणि नंतरच्या काळात शिक्षणसंस्था आणि संशोधन संस्थांचा सरकारवर बऱ्यापैकी अवलंबित्व निर्माण झालं. त्यामुळे संस्थेच्या अर्थकारणाचा बराचसा भाग सरकार उचलत होतं. शिवाय गोखले इन्स्टिट्यूटला स्वतःचंही काही उत्पन्न होतंच. त्यामुळे तिथे प्रचंड राजकारण चालत असे. तुम्ही, धनंजयराव, सोवनी असेपर्यंत तिथे बहुसंख्येने मराठी माणसं होती. पण गोखले इन्स्टिट्यूट ही राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था झाल्यानंतर देशातल्या इतर भागातील लोकही तिथे येऊ लागले. त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष तिथे असायचा. साहित्यिकांच्या संस्थांना लाजवेल असं राजकारण गोखले इन्स्टिट्यूटमध्ये सतत सुरू असायचं. तुमच्या कनिष्ठांमध्येही ते  एकमेकांत चालू असायचं. पण त्याच्याहीविषयी तुम्ही काही बोलल्याचं मला आठवत नाही. तुम्हाला ज्युनियर असलेले गोखले इन्स्टिट्यूटमधले अनेक लोक मला म्हणायचे, ‘अमुक प्रश्नावर दांडेकरांचा कल काय आहे? तुझी एवढी ओळख आहे तर जरा अंदाज घे ना’. अशावेळी मी तो प्रश्न समजावून घ्यायचो आणि मला वाटलं तर तुमच्याजवळ विषय काढायचो.  पण ती कानात घातलेली काडी पोटात जायची! गोखले इन्स्टिट्यूटमधल्या अंतर्गत विषयांवर तुम्ही कधीही बोलायचा नाहीत. कदाचित मी पत्रकार असल्यामुळे, माझ्याशी बोललं तर ते षटकर्णी होईल म्हणूनही तुम्ही बोलत नसाल पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की, याबाबतीत तुमचं मत डॉ. बारलिंगे यांच्यासारखं असेल. संस्था आल्या म्हणजे माणसं आली. माणसं आली म्हणजे महत्त्वाकांक्षा आल्या. महत्त्वाकांक्षा आल्या म्हणजे राजकारण आलं. त्यामुळे बारलिंग्यांचं मत होतं की, या सगळ्या संस्था म्हणजे सार्वजनिक मुताऱ्या आहेत. लोक तिथे जाऊन घाण करणार आणि ती त्यांना करू दिली पाहिजे नाही तर ते सगळीकडे घाण करत फिरतील. तुमचं मत कदाचित इतकं जहाल नसेल पण तसाही कधी उल्लेख तुम्ही केल्याचं आठवत नाही.

तुम्हाला खूप ज्युनियर असलेली माझी एक मैत्रीण गोखले इन्स्टिट्यूटमध्ये होती. आपला  लाघवीपणा वापरून लोकांच्या पोटात शिरण्याच्या तिच्या कलेची बरीच कीर्ती पसरलेली होती. तिने मला विचारलं, “दांडेकर सर आपल्या घरी जेवायला येतील का?” मी एवढंच म्हटलं की, मी त्यांना विचारून बघतो. माझ्यावर तिचं लाघव चाललं नाही हे तिच्या लक्षात आलं. मग मी एके दिवशी तुमच्याकडे विषय काढला की, तुमची तरुण सहकारी तुम्हाला जेवणासाठी आमंत्रण देते आहे तर काय करायचं तुम्ही ठरवा... तुम्ही म्हणालात, “येईन ना. त्याला काय हरकत आहे!” तिला हे कळल्यावर तिने मला विचारलं, “दांडेकर सर ड्रिंक घेतात का?” मला माहीत नव्हतं. पण आता आठवतं त्याप्रमाणे तुम्ही तिथे थोडी वाईन घेतली. संध्याकाळी साडेसहा ते साधारण नऊ वाजेपर्यंत आपण त्यांच्या घरी होतो. गप्पा चालू होत्या. ती या ना त्या प्रकारे तुम्हाला गोखले इन्स्टिट्यूटकडे खेचायचा प्रयत्न करत होती पण त्यातल्या एकाही बॉलला तुमची विकेट पडली नाही! तुम्ही ठरवलं होतं तेवढंच ड्रिंक घेतलं. त्यानंतर तुम्ही म्हणालात की, माझी रोजची जेवायची वेळ झाली. तयार असेल तर आपण जेवूया. त्याप्रमाणे जेवण झालं. गोखले इन्स्टिट्यूटचे क्वार्टर्स तेव्हाही तुमच्या घराजवळच होते. साडेनऊ वाजता तुम्ही म्हणाला, “दहा वाजता माझी झोपायची वेळ असते, मी आता निघतो.” आणि तुम्ही निघूनही गेला. तुम्ही गेल्यानंतर आमच्यात अशी चर्चा झाली की, म्हातारा पक्का बेरकी आहे! दोन दिवसांनी मी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आलो होतो. तुम्हाला भेटायला आलो तेव्हा तुम्ही मला म्हणालात, “तिला सांगा, ते गोड बोलणं गोड हसणं ठीक आहे, असूदे!” त्या सगळ्यावर तुमची कॉमेंट एवढीच होती पण इट स्पीक्स व्हॉल्युम्स! एखाद्या संस्थेमध्ये ज्युनिअर्सशी आणि  विशेषतः ‘लाघवी’ ज्युनिअर्सशी कसं वागावं. मी काही संस्था काढणारा किंवा संस्थांमध्ये फार काळ टिकणारा माणूस नाही पण ती तुमची कॉमेंट मी आयुष्यभर लक्षात ठेवलेली आहे.

3

आपल्याकडे यायला नकार दिला आणि संघटनेसाठी नोकरी सोडली म्हणून दोन माणसं माझ्यावर रागावली. एक, तुम्ही आणि दुसरे, मधुकरराव देवल. नंतर जेव्हा योगायोगाने तुमची गाठ पडली तेव्हा तुम्ही मला खास दांडेकरी चेहरा करून विचारलंत, ‘‘सध्या बरं चाललं असेल. नोकरी सोडून दिली, त्या शरद जोशीच्या नादी लागला आहात आणि ते काम सोपं आहे... चळवळ आणि संघटना म्हटल्यानंतर तीच तीच भाषणं करत फिरायचं, दुसरं आहेच काय!’’ पण या तिरकस शेऱ्यातही मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून वाटणारी निराशा जास्त होती, म्हणून मी तुम्हांला उलट उत्तर दिलं नाही. विनय हर्डीकरने उलट उत्तर दिलं नाही असे थोडेच प्रसंग असतील, त्यातला हा एक आहे. 

सर, माझ्या या वाक्यावर तुम्ही तुच्छपणे हसला असता - 1 ऑगस्ट 1920 ला टिळक गेले आणि 31 ऑगस्ट 1920 ला तुमचा जन्म झाला हा योगायोगसुद्धा (मी अगदी याला ‘नियतीचा संकेत’ वगैरे म्हणत नाही) लक्षात घेण्यासारखा आहे. टिळकांचे काही गुण तुमच्यामध्येही आलेले होते. 1915 ते 1925 या काळामध्ये जन्मलेली तुमची पिढी भाग्यवान होती कारण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी तुम्ही पंचविशी ओलांडलेली होती आणि भारताने राज्यघटना स्वीकारली त्यावेळी तुम्ही तिशी गाठलेली होती. म्हणजे आमच्या वाट्याला जो भारत येणार होता त्याचा पाया तुम्ही मंडळी घालणार होता. पण त्या वेळच्या एकूणच राजकीय परिस्थितीकडे नजर टाकली तर असं दिसतं की, नवीन देशासाठी, नवीन समाजासाठी काही भक्कम आर्थिक भूमिका आवश्यक आहे याचं भान जवळजवळ कोणालाच नव्हतं. काँग्रेसवर गांधींचं ओझं होतं. आज ज्याला आपण ‘विकास’ म्हणतो त्या अर्थाचा कुठलाच विकास गांधीना नको होता. त्यांना औद्योगिकीकरण नको होतं, पैसा नको होता, वासना सोडून द्या पण माणसाच्या साध्या इच्छांचीही भरघोस पूर्तता गांधींना नको होती. गांधींचं दुसरं टोक म्हणजे सावरकर. त्यांना फक्त देशाच्या संरक्षणक्षमतेमध्ये रस होता. देश बलवान असेल, त्याच्या सीमा सुरक्षित असतील तर त्या देशाचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही अशी त्यांची भूमिका होती. तिसरे समाजवादी आणि चौथे कम्युनिस्ट. खरं म्हणजे या दोन्ही अर्थवादी विचारसरणी आहेत परंतु कम्युनिझम आणि समाजवाद आपल्याकडे सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्यांपुरताच स्वीकारला गेला असं मला वाटतं. वर्गतत्त्वावर समाजाची पुरेशी विभागणी व्हायच्या आधीच आपल्याकडच्या कम्युनिस्टांना वर्गविहीन समाज निर्माण करायचा होता. आणि एकाच वेळेला वर्गलढा व जातीचा अंत ही दोन्ही उद्दिष्टं गाठायची हे समाजवाद्यांचं अद्भुतरम्य स्वप्न होतं. डॉ. आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे पी एचडी होते मात्र त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचं राजकारण मुख्यतः दलित वर्गाशी संबंधित होतं. त्या अर्थाने त्यांच्याही पक्षाचा मुद्दा सामाजिक-सांस्कृतिक जास्त होता. नव्या देशाची अर्थव्यवस्था कशी असावी याचा विचार खोलवर जाऊन कुणी केल्याचं दिसत नाही. या सगळ्यांत मी नेहरूंचं नाव घेतलं नाही पण स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारताचं जे काही बरं-वाईट झालं त्यावर नेहरूंची मोठी छाप पडलेली दिसते कारण त्यातल्या त्यात नेहरू काहीतरी विचार करत होते. विकासाची दोन वेगळ्या पद्धतीची मॉडेलस् त्यांनी त्या काळात पाहिलेली होती. चाळीसच्या दशकामध्ये ते रशियाला जाऊन आलेले होते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जपानला जाऊन आलेले होते. जपानसारखा दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेला देश पाच वर्षांत औद्योगिकीकरणाच्या मार्गाने पुन्हा उभा राहिलेला नेहरू पाहत होते. रशियन साम्यवादासंबंधी सगळी खरी माहिती त्या काळात बाहेर आलेली नव्हती त्यामुळे नेहरू रशियाच्या प्रचंड प्रभावाखाली होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यात आणखीही एक मुद्दा होता, जो धनंजयराव गाडगीळांच्या लिखाणामध्ये आलेला आहे. त्यातून माझ्या असं लक्षात आलं की, ‘नेहरुंना देशाची वाट लावायची होती आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करायचं होतं म्हणून त्यांनी समाजवादी ढाचा स्वीकारला’ असं म्हणणं बालिशपणाचं आहे. (हा मुद्दा मी शरद जोशींच्याही अनेकदा लक्षात आणून दिलेला होता) धनंजयरावांनी लिहिलेला उतारा ‘ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडियन बिझनेस’मध्ये उद्धृत केला गेलेला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, कुठल्याही अर्थव्यवस्थेचे दोन मुख्य आधार असतात. व्यापार हा अर्थव्यवस्थेचा एक भाग असतो त्यामुळे व्यापारी हा पहिला आधार आणि उद्योजक उत्पादक यंत्रांच्या साह्याने उत्पादन करतात तो दुसरा आधार. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या दोन्ही वर्गांनी युद्धमान परिस्थितीचा फायदा घेऊन ग्राहक वर्गाची मोठी पिळवणूक केली. महाराष्ट्रीय समाजाला दुसऱ्या महायुद्धाची झळ बसली ती प्रचंड वाढलेली महागाई या स्वरुपाची होती आणि ती महागाई ज्या वस्तूंच्या टंचाईमुळे निर्माण झाली वस्तूंची टंचाई दरवेळेला खरी होतीच असं नाही. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर या वर्गाच्या हातात जर आपण खुली अर्थव्यवस्था दिली आणि ‘लेसे फेअर इकॉनॉमी’चं प्रारूप जर आपण स्वीकारलं तर ग्राहक पूर्णपणे नागवला जाईल या चिंतेपोटी सरकार अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करेल, नियंत्रण करेल आणि महत्त्वाच्या वस्तूंचं उत्पादनही करेल हा विचार भारताने स्वीकारला. तुम्ही धनंजयरावांचे तरुण सहकारी होता पण तुमच्या तोंडून मी नेहरूंचं फार कौतुक कधी ऐकलं नाही. (तसं तुम्ही कोणाचंच कौतुक कधी फार करत नव्हता.) परंतु त्या काळामध्ये ज्याला भारताच्या आर्थिक विकासामध्ये विशेष रुची होती आणि ज्यांचा अभ्यास होता असा कुणीही कुठल्याही अर्थाने ‘गांधींच्या दगडापेक्षा नेहरूंची वीट मऊ’ याच निष्कर्षाला येणार होता. धनंजयराव तर प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष होते. प्लॅनिंग कमिशनची रचनाच अशी होती की, पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतील आणि कुणीतरी महत्त्वाचा अर्थशास्त्रज्ञ उपाध्यक्ष असेल. म्हणजे प्रत्यक्षात प्लॅनिंग कमिशन ही उपाध्यक्षाच्याच ताब्यात होती. तुम्ही गोखले इन्स्टिट्यूटमध्ये धनंजयरावांच्याच हाताखाली असल्यामुळे प्लॅनिंग कमिशनमध्ये तुम्ही प्रत्यक्ष असलात काय नसलात काय, तिथे जे घडतं त्यासंबंधी धनंजयरावांपर्यंत काही पोहोचवणं तुम्हाला थेट शक्य होतं. देशाचं जे आर्थिक धोरण ठरायचं त्यातल्या महाराष्ट्रातल्या अर्थशास्त्रज्ञांच्या कामाचा  विचार करताना धनंजयरावांच्या पाठोपाठ तुमचं नाव येणं अपरिहार्य होतं. मी तुमच्या गांधीजन्मशताब्दीच्या ज्या व्याख्यानाचा उल्लेख केला त्याचं नावच 'गांधीयन इकॉनॉमिक्स : अ पाथ टू अनइकॉनॉमिक गोल्स’ असं तुम्ही ठेवलेलं होतं. गांधींच्या विकासविरोधी आर्थिक चौकटीला तुम्ही पूर्णपणे नकार दिलेला होता. गांधीवादी जीवनशैलीचं तुम्ही जे वर्णन करायचात ते खास तुमच्या शैलीचं असायचं. तुम्ही म्हणायचात, ‘गांधीवादी जीवनशैली म्हणजे काय आहे? एक जमिनीचा लहानसा तुकडा आहे. त्याच्या एका कोपऱ्यात एक झोपडी आहे, झोपडीशेजारी दोन कापसाची झाडं आहेत. प्लॉटमध्ये काही शेती पेरलेली आहे, एखादी गाय किंवा बकरी बांधलेली आहे. लुंगी जेमतेम गुंडाळलेला घरचा पुरुष अधून-मधून कापसाच्या झाडावरून बोंडं तोडून आणतो, ती वाळत टाकतो. वाळलेल्या बोंडांचं सूत त्याची बायको टकळीवर काढत असते. (बायकोला टकळीचं काम देणं हा पुन्हा दांडेकरी मासला होता. ती टकळी सतत चालूच असणार असं तुम्हाला सुचवायचं होतं?) कुटुंबप्रमुख त्या टकळीतून निघणारं सूत घेऊन चरख्यावर बसतो. पलीकडे एक चूल आहे.  तिच्यामध्ये लाकडं जळत आहेत, मडक्यामध्ये काहीतरी शिजत आहे. जरा वेळाने बायको म्हणते, “नाथ, तुम्ही चरखा फिरवून दमलात. आता थोडा वेळ मी चरखा फिरवते.” उघडी-बागडी पोरं अंगणात खेळत आहेत. त्या मुलांचं पुढे काय होणार याचा विचार दोघाही नवरा-बायकोच्या मनातही येत नाही. पण यांचं जे झालं तेच त्यांचं होणार हे उघड आहे.’ गांधींच्या अर्थशास्त्रामध्ये भविष्यकाळाचा विचार नाही, पुढच्या पिढीचं आयुष्य कसं जाणार याचा विचार नाही. आयुष्यातल्या विसाव्याच्या क्षणांमधूनच (Leisure) नवनिर्मिती होत असते. पोट भरल्यानंतर माणसं फक्त डुलक्याच काढतात असं नाही! जगण्याची चिंता मिटल्यानंतर माणसाची प्रतिभाशक्ती जागी होते आणि त्यातून नव्या कल्पना सुचतात. अशा शंभर नव्या कल्पना सुचाव्यात तेव्हा एखादी कल्पना व्यवहार्य ठरते. हे गांधीवादी जीवनशैलीमध्ये कुठेच नाही. त्यामुळे तुम्ही गांधी स्वीकारणं शक्यच नव्हतं.

अर्थशास्त्र हा तुमच्या आवडीचा, अभ्यासाचा, व्यासंगाचा, संशोधनाचा आणि उपजीविकेचाही विषय होता. त्यामुळे तुम्ही त्यात पूर्ण बुडालेले होता. पण या नेहरूवादी आर्थिक धोरणाचे भावी परिणाम काय होतील? अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची क्षमता सरकारकडे खरोखर आहे का? सरकारचा कृतीकार्यक्रम राबवण्यासाठी ज्या नोकरशाहीची भरती केली जात आहे तिला काही खास ओरिएंटेशन दिलं जातं का किंवा देता येईल का? असे मुद्दे तुमच्या आणि धनंजयरावांच्या चर्चेत येऊन गेले असतील परंतु त्यांचा उल्लेख कुठे सापडत नाही.

भारताने लोकशाही स्वीकारली, निवडणुकांचा मार्ग स्वीकारला परंतु निवडणुका आर्थिक मुद्द्यांवर होतील अशी व्यवस्था अजूनही झालेली नाही मग त्या वेळेला ती असणं शक्यच नव्हतं. पहिल्या महायुद्धात टाटांनी ब्रिटिश सत्तेला जहाजं पुरवली आणि पोलाद पुरवलं, त्यामुळे भारतातल्या यंत्रउद्योजकांविषयी ब्रिटिश सरकारच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. 'देश संकटात आहे, युद्ध सुरू होणार आहे' अशा कोणत्याही कारणासाठी शेतकऱ्यांचा माल सरसकट उचलून घ्यायची पद्धत तर पूर्वीपासूनच होती. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये नेमकी सरकारची प्रतिभा किती आणि राबवण्याची शक्ती किती? मुळात अशी प्रतिभा सरकारकडे आहे का, ती असेल आणि कल्पना सुचल्या तर नोकरशाहीकडे ती कुवत आहे का आणि तिचा वेग काय आहे या मुद्द्यांकडे कुणाचं लक्ष गेलेलं दिसत नाही. त्या काळात भ्रष्टाचार कमी होता असं मानण्याची पद्धत आहे. परंतु ज्या वेगाने कामं व्हायला हवी होती, त्या वेगाने ती होत नव्हती. संसाधनांचा ऑप्टिमम उपयोग न होणं आणि त्यांच्या वापरातून देशावरची आर्थिक संकटं कमी न होणं यालाही भ्रष्टाचार म्हटलं पाहिजे. या सगळ्याचे दुष्परिणाम नेहरू गेले तेव्हाच जाणवायला लागले होते. गरिबांची संख्या वाढत होती, गरिबी कशी ठरवायची यावर वाद झडत होते, दुष्काळ पडत होते. मी माझ्या तरुण मित्रांना सांगतो की, आमच्या तब्येती इतक्या धडधाकट का आहेत? कारण, जगभरच सगळं कदान्न आम्ही खाल्लेलं आहे! निरनिराळे आंतरराष्ट्रीय करार होऊन वाटेल तिथलं धान्य भारतात यायचं. अमेरिकेतल्या पांढऱ्याशुभ्र गव्हाच्या पोळ्या, साबणाच्या फेसात शिजवलेला तांदूळ असावा असा ब्रह्मदेशातला भात हे सगळं आम्ही खाल्लेलं आहे त्यामुळे आम्हाला आजही तब्येतीची काळजी करायचं कारण नाही. पण हे सगळं जर घडतच होतं तर प्लॅनिंग कमिशनने वेगळं असं काय साधलं? किंवा थोडं स्पष्टच म्हणायचं झालं तर धनंजयरावांनी काय साधलं? व्यापाऱ्यांना, उद्योजकांना चाप लावण्यात तरी आपण यशस्वी झालो का? झालं उलटच! व्यापारी धूर्त असतातच.  कृत्रिम टंचाई किंवा कृत्रिम भाववाढ केली तर कोणतं खातं त्याची चौकशी करेल, त्या खात्याला  त्यांनी पैसे चारायला सुरुवात केली. आपला देश असा अद्भुत देश आहे की, उद्योजकांवर निर्बंध घातल्यावर उद्योजक खुश झाले. त्यांना स्पर्धा नकोच होती. प्रत्येकाने आपापलं उत्पादन ठरवायचं, आपला कोटा ठरवून घ्यायचा आणि एकदा सरकारचा तो मंत्री आणि ते खाते सांभाळलं की मग ते कुठल्याही किमतीला, कुठल्याही गुणवत्तेचा (किंवा कुठलीही गुणवत्ता नसलेला) माल लोकांना विकायला मोकळे! असं होऊ शकेल हे कोणाच्या लक्षात कसं आलं नाही असा प्रश्न मला अनेकवेळा पडतो. तुम्ही इतके कठोर तर्कवादी होता, वस्तुनिष्ठपणे विचार करणारे होता, व्यक्तीचं माहात्म्य तुम्ही मानत नव्हता मग तुमच्याही हे कसं लक्षात आलं नाही? या देशाचा विकास पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून होईल ही 'कमांड इकॉनॉमी' पहिली पंचवीस वर्षं आपण स्वीकारली आणि सगळं सरकारच करणार म्हटल्यानंतर पुढे स्वयंसेवी चळवळींची स्थापन होईपर्यंत विकासाचा प्रश्न हा केवळ हळहळ वाटून चर्चा करण्याचाच प्रश्न राहिला. त्याच्यावरचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. दुर्दैव असं की, याच काळात देशाच्या काही भागात हरितक्रांती झाली, उत्पादन वाढलं मात्र ते घडवून आणणारे शेतकरी कर्जबाजारी झाले. ही नाथाच्या घरची उलटी खूण कोणाच्याच लक्षात आली नाही असं नव्हतं. सरकारने कबूल केलेलं आहे की, शेतीकडे आम्हाला सद्हेतूने दुर्लक्ष करावं लागतं. ‘बिनाईन निग्लेक्ट’ असे शब्द सरकारी अहवालात आहेत. तेही ठीक! पण त्या बदल्यात ज्या वेगाने औद्योगिकीकरण व्हायला हवं होतं, तेही झालं नाही. पुढे इंदिरा गांधी आल्यानंतर तर लायसन्स परमिटराज सुरू झालं.

या सगळ्याचा पाया दोन गोष्टींनी घातला. देशाचं भवितव्य ठरवणारे जे राजकीय पक्ष होते, त्यांच्या नेत्यांना आर्थिक दृष्टी अजिबात नव्हती ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या देशामध्ये मुळात एवढी विषमता आहे; त्या देशामध्ये कमांड इकॉनॉमी आणली रे आणली की सरकार, सरकारी अधिकारी भ्रष्ट होणार हे कुणाच्या लक्षात आलं नाही. रशियामध्येही हेच झालं त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यानंतर तीस वर्षांनी रशियाची अर्थव्यवस्था कोलमडली. त्या अर्थाने आपली अर्थव्यवस्था कधी कोलमडली नाही परंतु ती कधी उभीही राहिली नाही. मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं की, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जे काही चाललं आहे त्यामध्ये तुम्ही फक्त दुरुस्त्या सुचवायची भूमिका घेता. हे बदलता कसं येईल याचा विचार तुम्ही करत नाही. तो विचार शेतकरी संघटना आणि शरद जोशी करत आहेत. तेव्हा तुम्ही अत्यंत कुत्सितपणे मला म्हणालात, “म्हणजे तुम्ही ‘सर्वंकष परिवर्तनवादी’ दिसता आहात, तुम्हाला ‘नवा माणूस’ निर्माण करायचा आहे, मग तुमचं चालू द्या... तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत.” खरं तर तेव्हा तुम्ही इतक्या कुत्सितपणे बोलायची गरज नव्हती. पण सरकारी समित्यांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांची ही सवयच होती. तिची काही कारणं आपल्या समाजव्यवस्थेमध्येसुद्धा आहेत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हा तज्ज्ञांचा वर्ग उच्चवर्णीयांतून येणार हे स्पष्ट होतं कारण शिक्षणाचा प्रसारच झालेला नव्हता. आता एक चांगला बदल झालेला आपण पाहतो की, बहुतेक ठिकाणी उच्चवर्णीय बाजूला ठेवून मध्यवर्णीय आणि आपल्याकडच्या आरक्षणामुळे समाजाच्या निम्नस्तरातील लोकही निरनिराळ्या अधिकाराच्या पदांवर येत आहेत. (यामुळे परिवर्तन होत आहे की नाही हा मुद्दा आता मी बाजूला ठेवतो.) परंतु त्या काळात हे घडणं अशक्य होतं. कदाचित त्यामुळेच तुमच्या पिढीला अशी सवय लागली की, सगळीकडे आपण केवळ तज्ज्ञ म्हणूनच वावरायचं आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये - जिथे एका जातीचं प्राबल्य आहे - राज्यकर्त्यांनी तुमची मजबूरी ओळखली होती. तुमच्या-माझ्यासारख्याची मजबूरी ही आहे की, आपण कधी निवडून येऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही कितीही विद्वान, स्पष्टवक्ते असला तरी तुम्हाला या नाटकामध्ये मुख्य कलाकार होता येणार नाही; दुय्यम भूमिकेतच तुम्हाला वावरावं लागेल. दुय्यम भूमिकेतच वावरायचं असेल तर निरनिराळ्या समित्यांवरची आपली नियुक्ती सांभाळावी लागेल आणि मग त्या प्रमाणातच स्पष्ट बोलावं लागेल! हा रोग अजूनही बरा झालेला नाही. पण त्याही काळामध्ये या रोगाला बळी न पडणाऱ्या थोड्या लोकांपैकी तुम्ही होता हे तर मान्यच केलं पाहिजे. तुमचं आणि यशवंतरावांचं जाहीर भांडण झालं. त्यानंतर त्या प्रसंगाबाबत बोलताना अगणित लोकांनी मला असं सांगितलं की, यशवंतराव मनाने इतके मोठे होते की, त्यांनी दांडेकरांच्या कोणत्याही संस्थेच्या अनुदानावर गदा आणली नाही. असा शेरा मारणाऱ्या लोकांना त्या त्या प्रत्येक वेळेला मी असं म्हटलं आहे की, म्हणजे त्यांनी दांडेकरांवर मोठे उपकार केले का? त्या संस्थांना यशवंतराव पदरचे पैसे थोडेच देत होते. दांडेकर ज्या ज्या कारणासाठी अनुदान घेत होते त्या सगळ्याचा खणखणीत हिशोब ठेवत होते. कुठेही भ्रष्टाचार तर सोडूनच द्या, अपव्ययही होत नव्हता. त्यामुळे यशवंतरावांना अनुदानं चालू ठेवणंच भाग होतं. परंतु तुमच्यासारखा एखादा अपवाद सोडला तर, 'आपण तज्ज्ञ म्हणून ही दुय्यम भूमिका आता स्वीकारायची आहे आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आहे' या सापळ्यात न सापडलेला कुणी दिसत नाही.

सर्वंकष परिवर्तन का नाही करायचं असा प्रश्न त्यावेळेला मी तुम्हाला विचारायला हवा होता. निदान तसे प्रयत्न का नाही करायचे? कदाचित त्याला तुम्ही असं उत्तर दिलं असतं की, अर्थशास्त्र हे आदर्शवाद मानत नाही. एखाद्या समाजाला उपलब्ध असलेली संसाधनं, त्या समाजाने स्वीकारलेली राज्यपद्धती, त्या समाजातील लोकांची उत्पादक कौशल्यं, त्या समाजाची गरज आणि त्या समाजातील लोकांची क्रयशक्ती यांचा विचार करता अर्थशास्त्रामध्ये तत्त्वज्ञानाला (आदर्शवादाला?) स्थान नाही. अर्थशास्त्र इतकं निर्दय असतं असं तुम्ही म्हणाला असता. पण एकदा गमतीचा प्रसंग घडला. त्या प्रसंगामुळे तुमचं एक वेगळंच रूप मला पाहायला मिळालं. त्या काळात मधुकरराव देवलांचा म्हैसाळचा प्रयोग म्हणजे पंढरपूरच झालं होतं. मात्र म्हैसाळचे जहागीरदार शिंदे सरकार यांचा विरोध पत्करून मधुकररावांनी म्हैसाळचं काम उभं केलं होतं आणि यशस्वी केलं होतं त्यामुळे काँग्रेसवाले तिकडे फिरकायचे नाहीत आणि गोळवलकरांशी भांडून मधुकरराव संघ सोडून गेले होते म्हणून संघवाले तिकडे फिरकायचे नाहीत. त्यामुळे मधुकरराव एकेकाळचे संघाचे असले तरी तिथे राबता मात्र डाव्या मंडळींचा जास्त होता. एकदा तुम्हीही तिथे आला होतात आणि ती सहकारी शेतीसंस्था असूनही कधी न नव्हे ते तुम्ही सहकारावर टीका केली नाहीत, देवलांच्या सगळ्या प्रयत्नांचं तुम्ही स्वागतच केलं. गमतीचा भाग असा की, भाषणात तुम्ही असं म्हणालात, "कबूल आहे की गरिबी आहे. पण म्हणून रोज अंघोळ करणं एवढं अवघड आहे का? कपडे स्वच्छ धुतलेले असावेत, घर,अंगण झाडून स्वच्छ ठेवावं, ते नेटनेटकं असावं, अंगणामध्ये सदाफुली, कण्हेरी अशी दोन-चार फुलझाडं लावावीत, एखादं फळझाड लावावं, एखादवेळेस रांगोळी काढावी हे इतकं अवघड आहे का?" गांधींचा 'बग' तुम्हालाही डसलेला होता असं मला त्या प्रसंगाने वाटून गेलं. तुमची विचारसरणी जर शंभर टक्के अर्थवादी असती तर तुम्ही हे आवाहन केलं नसतं. नारायण सुर्व्यांची कविता आहे,  'भाकरीचा चंद्र रोज आमच्या ताटात पडला असता तर भरल्या पोटाने आम्हीही कुणाची याद केली असती'. तुम्ही हे काय सांगत होता? मी टिपिकल विचार करणारा माणूस नाही म्हणून; नाही तर मी म्हटलं असतं की, दांडेकरांच्या स्वभावाचं मृदू दर्शन मला झालं. त्यांच्यामध्येही एक रसिक माणूस होता. पण मला तसं म्हणायचं नाही. मला असा प्रश्न पडतो की, अर्थवादावरची तुमची पकड शंभर टक्के होती का?

तुमच्यासारख्या तज्ज्ञांना इलेक्टिव्ह मेरिट नव्हती आणि इलेक्टिव्ह मेरिट असल्याशिवाय देशाचे निर्णय बदलणं शक्य नव्हतं. नेहरूंच्या आर्थिक चौकटीला विरोध करायचा असेल तर तो राजकीय विरोधही असणार होता; फक्त आर्थिक मुद्द्यांवर तो करता येणार नव्हता. व्यापार आणि उत्पादन हे अर्थव्यवस्थेचे दोन खांब कमांड इकॉनॉमीला सरावलेले होते, त्याच्यात त्यांचा फायदा आहे असं त्यांनाच वाटत होतं. ‘फोरम ऑफ फ्री एंटरप्राइजेस’सारख्या संस्था एकीकडे बंद पडत होत्या. सरकारी समित्यांवर तुम्ही जाऊ शकत होता परंतु त्या समित्यांचे निर्णय राबवायचं बंधन सरकारवर नव्हतं. अशा समित्यांनी दिलेल्या अहवालांच्या थप्प्या लागत होत्या. उदाहरणार्थ, तुम्ही, देऊस्कर आणि देशमुख अशी एक समिती प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमली. तिला मी ‘दे दान दे कमिटी’ म्हणायचो, आणि आज कमिटीने  कुणाला दान दिलं असं तुम्हाला खेळीमेळीत विचारायचो. तुमच्या त्या समितीने दिलेला अहवाल चांगलाच होता. तुम्ही एकाच वेळेला प्रादेशिक असमतोलही मांडला होता आणि त्या-त्या प्रदेशांतर्गत असणारा असमतोलही मांडलेला होता. जो प्रदेश अविकसित राहिलेला आहे, त्या प्रदेशातही काही भाग विकसित आहे आणि काही अविकसित आहे असं संतुलित विकासाचं सर्वंकष अपयश समितीने मांडलेलं होतं. आजही ते चित्र जसंच्या तसं आहे! म्हणून आम्ही शेतकरी संघटनेद्वारे असं म्हणत होतो की, सर्वंकष परिवर्तन होईल की नाही माहीत नाही पण त्या दिशेने प्रयत्न तर झाले पाहिजेत. पण तुम्हाला हे सगळं सोडवत नव्हतं.

मला वाटतं काही बाबतींत तुम्ही कम्युनिस्टांच्याही जवळ असावेत. पण या मुद्द्यावर आपली कधी चर्चा झाली नाही. एकदा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की, परदेशात जेव्हा सार्वत्रिक बेकारी निर्माण होते त्यावेळी काय करतात आणि आपल्याला काय करता येईल? त्या काळात महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना आणली होती. भ्रष्टाचार तर सगळ्याच सरकारी योजनांमध्ये होतो पण केवळ भ्रष्टाचारच झाला, काम झालंच नाही अशा योजनांमध्ये रोजगार हमी योजना होती. रस्ता झालेला नाही, पाझर तलाव झालेला नाही पण रजिस्टर तयार आहे, लोक मजुरी घेऊन घरी बसलेले आहेत असं या योजनेबाबत घडलेलं होतं. नगर जिल्ह्यामध्ये एका पाझर तलावावरचा अधिकारी इतका भ्रष्ट होता की तिथे अवाच्या सव्वा मजुरी मिळते म्हणून दुष्काळग्रस्त लोक रिक्षा करून कामावर जात होते! त्या संबंधाने मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. (त्यावेळी माझा फार अभ्यास नव्हता नाही तर मी तुम्हाला विचारलं असतं की, अर्थव्यवस्थेच्या अपयशामुळे बेकारी निर्माण झाली; केवळ लोकसंख्येमुळे नाही हे तुम्ही मान्य करता की नाही?) तुम्ही मला म्हणाला की, बेकार लोकांच्या आर्मी स्थापन करायच्या. हे तर चक्क रशियन मॉडेल होतं. रशियामध्ये बेकारी नव्हती पण कम्युनिस्ट विचारसरणीला विरोध करणाऱ्या लोकांच्या अशा आर्मी रशियन सरकारने स्थापन केल्या आणि फुकटावारी, अर्धपोटी ठेवून त्या सगळ्यांना विकासकामाला जुंपलं. स्टालिनचं राज्य आणि दांडेकरांची सूचना याच्यामध्ये फरक फक्त एवढाच होता की, दांडेकरांची मजुरी द्यायला हरकत नव्हती आणि ते बेकारांची 'आर्मी' म्हणत होते, 'कॉन्सन्ट्रेशन कॅम्प' म्हणत नव्हते. पण मूळ तत्व तर तेच होतं. या बेकारांना तुम्ही कुठेही देशभर फिरवाल. मग त्यांच्या कुटुंबांचं काय करायचं? बेकार झाला तरी त्याला मानवी भावभावना आहेत. त्याला कुटुंब हवं असतं, मुलं हवी असतात, तुम्ही सांगितलं तसं त्याचं घर असेल तर त्या घराच्या अंगणात संध्याकाळी बसून त्याला गप्पागोष्टी करायच्या असतात. त्यावर कदाचित उपाय असा की, जिथेकुठे काम असेल तिथे कुटुंबासकट त्याने जावं. पण हे तर आधीपासून घडतच होतं. त्यात नवीन काय होतं? दुष्काळ पडल्यानंतर बेकारांचे तांडे जेव्हा आपली गावं सोडतात तेव्हा हाताशी असणाऱ्या जनावरांच्या पाठीवर ते आपल्याकडच्या जीवनावश्यक वस्तू लादतात, किरकोळ गोष्टी घरातच ठेवून घराला कुलूप लावतात आणि स्थलांतरच करतात; त्यासाठी प्लॅनिंग कमिशन कशाला लागतं? मूळ प्रश्नाचं आकलन आणि त्याच्यावरचा उपाय यात कुठे गोंधळ उडत होता का? या गोंधळाचं तुम्हीच दिलेलं एक उदाहरण मला आठवतं. तुमच्या 'दे दान दे' कमिटीचा अहवाल तयार झाला तेव्हा वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. दादा सातवीपर्यंत शिकले होते असं सांगितलं जातं. त्यांचं सर्टिफिकेट वगैरे कोणी पाहिलेलं नाही पण दादा अतिशय बुद्धिमान आणि खोल होते, स्वतः बडबड न करणारे आणि कुणाची बाष्कळ बडबड ऐकूनही न घेणारे होते हे मात्र सगळ्यांना माहीत आहे. अहवाल घेऊन तुमचं त्रिकूट मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं. दादांनी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, “एवढा रिपोर्ट मी वाचणार नाही. मला तेवढा वेळ नाही. माझे अधिकारी तो वाचतील आणि त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांना तुम्ही उत्तरं द्या. माझ्याकडे आता तुमच्यासाठी अर्धा तास आहे. पंधरा मिनिटं तुमची आणि पंधरा मिनिटं माझी. तुम्ही या रिपोर्टात काय काय म्हटलंय ते मला पंधरा मिनिटात सांगा आणि मग पंधरा मिनिटं मी प्रश्न विचारेन.” सर, मला तुमच्या मनमोकळेपणाचं कौतुक वाटतं आणि वसंतदादांचंही कौतुक वाटतं. तुम्ही मला असं सांगितलं की, दादांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं आमच्याजवळ लगेच उत्तर नव्हतं. प्रत्येक प्रश्नावर दादांना आम्ही असं आश्वासन दिलं की, आम्ही या विषयाचा विचार करतो आणि त्यासंबंधी वेगळं छोटं टिपण तुमच्याकडे पाठवतो. या प्रसंगात दादांची गुणवत्ता दिसली, तुमचा प्रांजळपणा दिसला पण तज्ज्ञ आणि सरकार चालवणारे लोक यांच्यामधली दरीही दिसली! तज्ज्ञांनी निःपक्षपाती असावं अशी आपली अपेक्षा असते. पण म्हणून तो काहीच भूमिका न घेणारा असावा का असा प्रश्न इथे विचारता येईल. तज्ज्ञ हा विशिष्ट विषयातला जाणकार असल्यामुळे त्या विषयाचं जे एक शास्त्र असतं त्यानुरूप तो भूमिका घेईलही पण राजकीय माणसाला व्यवहार्य भूमिका हवी असते आणि हातात घेतलेल्या प्रश्नाची सोडवणूक योगायोगाने झालीच तर त्या सोडवणुकीतला एक महत्त्वाचा घटक म्हणून आपलं नाव लागेल याचीही खबरदारीही त्याला घ्यायची असते. सगळीकडे आपल्या नावाचे बोर्ड लावता यावेत म्हणून सर्वत्र पुतळे उभे केले जातात अशी टीका तुम्ही राजकारण्यांवर करत होता. काही राजकीय नेते तर इतके महान निघाले की, त्यांनी आपल्या हयातीत आपल्या पुतळ्यांची उद्घाटनं स्वतःच केली. त्यामुळे तुमची टीका बरोबरच होती. पण तज्ज्ञ आणि राजकारणी यांचा एकत्र येण्याचा कोणता बिंदू होता?

तज्ज्ञांना व्यवहार्य तोडगे सुचवता आले पाहिजेत, राजकीय माणसाची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा गृहीत धरून त्यांनी आर्थिक धोरणं ठरवली पाहिजेत जेणेकरून ती नोकरशाहीकडून वेगाने राबवून घेता येतील. नाही तर हा रोजचाच अनुभव आहे की, तज्ज्ञांना सगळे राजकारणी विकासविरोधी ठरवतात. एकीकडे तुम्ही गांधींना विकासविरोधी ठरवत होता, आता त्या-त्या विषयाचं ज्ञान आणि अभ्यास असणारे लोकही विकासविरोधी ठरायला लागले आहेत.

निवडणुकीच्या प्रक्रियेत आपल्याला स्थान उरलेलं नाही हे लक्षात आल्यानंतर तुमच्या पिढीच्या वाट्याला निराशा किंवा वैफल्य आलं असावं, आता आपण सत्ताधारी होऊ शकणार नाही हे स्वीकारणं तुम्हाला जड गेलं असेल आणि त्याच्यातून राजकारणी लोकांशी लव्ह-हेट रिलेशनशिप निर्माण झाली असेल. पण या सगळ्यामध्ये समाजाच्या विकासाचा पाया ज्या पिढीने घालायचा होता त्या तुमच्या पिढीचं आणि राजकारण्यांचं फाटलं. मग राजकारण्यांशी जमलं कुणाचं? जे त्यांना सलाम ठोकत होते, 'येस सर' म्हणत होते त्यांचं जमलं. अजूनही हे बघण्यासारखं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सगळे निवृत्त सरकारी अधिकारी जाऊन बसले आहेत. त्या अधिकाऱ्यांनी नोकरी करत असताना फक्त स्वतःची बढती, स्वतःच्या नियुक्त्या इकडे लक्ष दिलं, सरकारला चार खडे बोल कधी ऐकवले नाहीत. आणि हे काही फक्त काँग्रेसनेच केलेलं नाही, आताचा भाजपही तेच करतो आहे. मला असं वाटतं, तुमच्यासारख्या प्रतिभावान, बुद्धिमान आणि एक्स-रे सारखी नजर असणाऱ्या माणसाने याच्यातून काहीतरी वेगळा मार्ग काढायला हवा होता. पण परिस्थिती अशी होती की, प्रत्येक प्रश्नावर सरकारचं मत एक असेल तर दांडेकरांचं त्याच्यावरचं जळजळीत भाष्य दुसरं असायचं. आणि लोकांना दुसऱ्याची तिसऱ्याने अब्रू घेतलेली, लज्जाहरण केलेलं बघायला आवडतंच. आपल्या प्रोफेशनल क्लासेसमध्ये हा व्हायोरिझम तर फारच आहे. त्यामुळे दांडेकरांची प्रसिद्धी वाढत गेली आणि सरकारचीही मग्रुरीही वाढत गेली. पण देशाच्या आर्थिक धोरणांचा विचार करता जे प्रश्न आपण पन्नास साली सोडवायला घेतलेले होते त्यातला एकही प्रश्न धड सुटला नाही असं मात्र आपल्याला नमूद करावं लागतं. मग शरद जोशींसारखा माणूस ज्या वेळेला या व्यवस्थेच्या एखाद्या खांबालाच हात घालायचा आणि तो खांब उखडायचा प्रयत्न करायचा तेव्हा तज्ज्ञ, नोकरशाही आणि राजकीय नेतृत्व हे तिघेही त्याच्याविरोधात उभे राहायचे. हे काही संगनमत नव्हतं. तुमचे आपापसात मतभेद होतेच. राजकीय नेत्यांना अर्थशास्त्रातलं फारसं काही कळत नाही हे तुम्ही मांडतच होता. नोकरशाही भ्रष्ट होती आणि तिचे वाभाडे तुम्ही काढतच होता. ‘दांडेकरांसारख्या लोकांना त्यांच्या बारक्या ऑफिसमध्ये बसून (कारण तुमचा काही 'हस्तिदंती मनोरा' नव्हता) काय समजणार की, जमिनीवरचं धगधगीत वास्तव काय आहे’ असं राजकारणी आणि नोकरशाहा तुमच्याविषयी म्हणत होतेच. पण ही सबंध व्यवस्थाच बदलली तर सगळ्यांचीच कामं गेली असती म्हणून जो कोणी व्यवस्थेविरोधात उभा राहील त्याला आपापसांतले मतभेद कायम राखून निकराचा विरोध ते करत होते. शरद जोशींचं आणि आमचं सुदैव हे की, आर्थिक परिवर्तनाशिवाय सामाजिक परिवर्तनाला अर्थ नाही हे आमचं मत ठाम होतं. पण आर्थिक परिवर्तन करायचं तर राजकीय परिवर्तनही करावं लागतं. (हे शरद जोशींनी लक्षात घेतलं नाही.) राजकीय पक्षांना आपली धोरणं पटवून द्यावी लागतात. ती धोरणं अंमलात आणण्यात राजकीय पक्षांचा तत्काळ फायदा नसला तरी दीर्घकालीन फायदा आहे हे पटवून देण्यात शरद जोशी कमी पडत होते, अशी ही सगळी शोकांतिका आहे.  आता 2020-21 साली शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. बातम्या अशा आहेत की, दिल्लीची नाकेबंदी केलेली आहे पण दिल्लीतले व्यवहार चालू आहेत आणि शेतकऱ्यांचं आंदोलनही चालू आहे. भारत बंद झाला असं म्हणतात पण प्रत्यक्षात काहीच बंद झालेलं नव्हतं. प्रश्न आजही तेच आहेत. शेतकऱ्याचा माल कोणत्या भावाने कुणी खरेदी करावा हा प्रश्न तर प्लॅनिंग कमिशन स्थापन झालं तेव्हापासून आहे. तो अजूनही सुटलेला नाही. सगळीकडे संघछाप संस्कृतीकरण करायचं म्हणून प्लॅनिंग कमिशन जाऊन भाजप सरकारने नीती आयोग आणलेला आहे आणि ‘सगळीकडे बगलबच्च्यांची नियुक्ती’ ही काँग्रेसचीच संस्कृती पुढे चालू ठेवली आहे. माझ्या डोळ्यांसमोर जे दांडेकर आहेत त्यांच्याकडून माझी ही मरणोत्तर अपेक्षा मला नमूद केली पाहिजे की, या परिस्थितीतून तुम्ही काहीतरी मार्ग काढायला हवा होता.

सर, आता शेवटी दोन वैयक्तिक आठवणी आहेत. त्या तुमच्या दृष्टीने त्या सकारात्मक आणि माझ्या दृष्टीने नकारात्मक आहेत. पण त्याही मला प्रामाणिकपणे सांगितल्या पाहिजेत. तुम्ही ज्या वयात अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला त्या वयात मी अर्थशास्त्र वाचायला लागलो. गोखले इन्स्टिट्यूटमधून निवृत्त झाल्यानंतर तुम्ही 'अर्थबोध' नावाची स्वतःची संस्था काढलीत. शिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी ही संस्था होतीच. काही बाबतींत तिथे गोखले इन्स्टिट्यूटचाच ढाचा होता. तिथे मी तुमच्यामुळेच येत-जात असे. ती संस्था स्थापन झाल्यावर दोन-तीन वर्षांतच तुम्ही मला विचारलं, "तुम्ही अर्थबोध जॉईन का करत नाही? मी तुम्हाला म्हटलं, “मी कसा जॉईन करणार? मी लिटरेचरमध्ये एम ए केलेला आणि पी एचडी अर्धवट सोडलेला माणूस आहे. मी जॉईन केलं तर तुम्ही अडचणीत याल.” पण तुम्ही वि. म. दांडेकर होता! तुम्ही म्हणालात, “त्याची काळजी तुम्ही करू नका. त्याची उत्तरं मी देईन.  तुम्ही जॉईन व्हायला तयार आहात का ते सांगा.” मी म्हटलं, "तुमच्या बरोबर काम करण्यात मला केव्हाही आनंदच आहे पण बाकीच्या अटी काय आहेत?" तुम्ही म्हणालात, "अटी वगैरे काही नाही. पण इथे सगळ्यांना दीड हजार रुपये पगार आहे." (तुम्ही गोखले इन्स्टिट्यूटमध्ये असताना तिथेही सगळ्यांना दीडशे रुपये पगार होता. त्यात तुम्ही दसपटीने वाढ केली होती. भूतकाळातून तुम्ही काही शिकत होता की नव्हता असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला.) त्यावेळी मला 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये अडीच हजार रुपये पगार होता. मी तुम्हाला म्हटलं, "सर, आताचं काम का सोडलं याला मी काय उत्तर देणार?" तुम्ही म्हणाला, "चांगलं काम करायला मिळालं म्हणून सोडलं..." (‘अर्थबोध’चा रजिस्ट्रार म्हणून काम करायला मला आवडेल हे तुम्ही गृहीत धरलं होतं?) मी म्हटलं, "मला नाही जमणार" तुम्ही माझ्याकडे संतापाने बघून म्हणाला, "आम्ही नाही का केलं दीडशे रुपयावर काम गोखले इन्स्टिट्यूटमध्ये?" मग मलाही राग आला. मी म्हटलं, "सर, 140 रुपयांची नोकरी करून तुमचा भांडारकर रोडवर बंगला झाला. पंधराशे रुपये महिना घेऊन मला एक संडाससुद्धा माझ्या पगारातून बांधता येणार नाही आणि माझा आत्ताच व्यवसायही चांगलाच आहे. त्यामुळे तुम्ही मला क्षमा करा."

त्या पिढीतल्या तुमच्यासारख्या माणसांना पैसा या गोष्टीचं काहीतरी विचित्र वावडं होतं. एकदा तुम्ही मला म्हणाला, "मला एक सहायक हवा आहे. एखादा गरजू आणि हुशार मुलगा बघा." पण सर, 'गरजू आणि हुशार' हा काही अर्थशास्त्रीय विचार नाही! मी तुम्हाला म्हटलं, "अशा दोन्ही प्रकारची मुलं माझ्या परिचयाची आहेत. तुम्हाला गरजू हवा की हुशार हवा? हुशार माणसाला जर तुम्ही गरजू माणसाचा पगार देणार असाल तर मी काही तुमच्याकडे कुणालाही पाठवणार नाही." तुम्ही चिडून म्हणाला, "जा चालते व्हा. हा विषय आपण बोललोच नाही असं समजा." पण तुमच्या पिढीची ही भानगड काय होती? उत्तम काम करा, उत्तम पैसे मिळवा आणि ते उत्तमप्रकारे खर्च करा हा सगळ्यात चांगला विचार नाही का? आपल्या समाजाने यातला पहिला टप्पा थोडाफार गाठला आहे पण हे मिळवलेले पैसे आपल्या लोकांना शिल्लक टाकायचे आहेत आणि शिल्लक टाकायचे म्हणजे सोनं घेऊन ठेवायचं आहे! पण अशा अर्थशास्त्रीय विषयावर मी तुमच्यासमोर फार बडबड करू नये. समाजातली आर्थिक विषमता, आर्थिक दरी जितकी मिटवता येईल तितकी मिटवलीच पाहिजे पण त्यासाठी 'सगळ्यांना एकसारखे करून टाका' हे तत्त्व कम्युनिस्ट किंवा समाजवादी विचारसरणीमध्ये सुरुवातीच्या काळात होतं त्यामुळे त्या अर्थव्यवस्थांचा काही फायदा झाला असं दिसत नाही. मी काही तुमचा तो प्रस्ताव स्वीकारला नाही. तुमच्या लोणावळ्याच्या महिला हॉस्टेलची रेक्टर म्हणून माझ्या आईने काम करावं अशी एक कल्पना तुम्ही त्या आधी सुचवली होती ती माझ्या आईने तिच्या कारणांमुळे स्वीकारली नव्हती. पण मी 'अर्थबोध'मध्ये काम करायला नकार दिल्यानंतर मात्र तुम्ही भयंकर चिडला. त्यानंतर कधी खेळीमेळीत आपल्या गप्पा झाल्याचं मला आठवत नाही. यानंतर पुढे दोनच वर्षांमध्ये शेतकरी संघटनेचं पूर्णवेळ काम करण्यासाठी मी 'इंडियन एक्सप्रेस'मधली नोकरी सोडली, ते तुमच्या कानावर आलेलं होतं. आपल्याकडे यायला नकार दिला आणि संघटनेसाठी नोकरी सोडली म्हणून दोन माणसं माझ्यावर रागावली. एक, तुम्ही आणि दुसरे, मधुकरराव देवल. नंतर जेव्हा योगायोगाने तुमची गाठ पडली तेव्हा तुम्ही मला खास दांडेकरी चेहरा करून विचारलंत, "सध्या बरं चाललं असेल. नोकरी सोडून दिली, त्या शरद जोशीच्या नादी लागला आहात आणि ते काम सोपं आहे... चळवळ आणि संघटना म्हटल्यानंतर तीच तीच भाषणं करत फिरायचं, दुसरं आहेच काय!" पण या तिरकस शेऱ्यातही मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून वाटणारी निराशा जास्त होती म्हणून मी तुम्हाला उलट उत्तर दिलं नाही. विनय हर्डीकरने उलट उत्तर दिलं नाही असे थोडेच प्रसंग असतील, त्यातला हा एक आहे.

सर, मी तुमच्या मनातून उतरलो आणि भेटी/गाठी कमी होत बंदच झाल्या. मनमोकळ्या गप्पा/चर्चांची शक्यताच संपली; प्रवास थांबले!त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण थांग मला लागला नाही. काही प्रश्न विचारायचे राहिले ते राहिलेच. पुढे गोखले इन्स्टिट्यूटमध्येही जाणं-येणं कमी झालं. मात्र एक सतत जाणवत राहिलं की, तुमच्याबद्दल मवाळ/ गुळमुळीत भाषेत बोलणं/लिहिणं अशक्य आहे, बहुधा कुणालाच ते जमणार नाही. तुमच्याबरोबर काम केलेली माणसंही शंभर टक्के तुमच्या भीतीयुक्त आदरात असायची किंवा भीतीयुक्त अंतर ठेवून असायची. मात्र निर्भीड संशोधक ही तुमची ओळख कुणी अमान्य करत नसे.

मला पडलेला प्रश्न असा की, ही तुमची पूर्ण ओळख म्हणता येईल का? की, तुमच्या मनातही एक शरद जोशी होता, आणि त्याची आणि संशोधकाची सतत होड लागलेली होती? गोखले इन्स्टिट्यूट आणि नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशन या दोन संस्थांशी तुमचं तादात्म्य झालेलं होतंच पण तुम्ही पूर्णपणे समाधानी होता का? कारण तुमच्या नजरेमध्ये एक निरंतर अस्वस्थता जाणवत असे, ती भावनिक नव्हती, बौद्धिक होती हेही खरं! पण तुम्ही आमच्यात असायचा आणि नसायचाही. अशी तंद्री लागलेली असली तर तुम्हाला जागं केलेलं आवडत नसे. पण कशामुळे? धनंजयराव गाडगीळांनी पहिल्याच मुलाखतीमध्ये तुमचा 'बेअदब, बेमुलाहिजा' बाणा अनुभवूनही तुमचा स्वीकार केला होता, तुमच्यापेक्षा ते जवळपास वीस वर्षांनी मोठेही होते, आपल्यानंतर हाच तरुण ही संस्था सांभाळील अशी त्यांना खात्री वाटली असणार. शिवाय पी. सी. महालनोबीस यांच्या हाताखाली तुमचं प्रशिक्षण झालेलं होतं आणि आर्थिक धोरणं निश्चित करण्यासाठी जी प्रचंड माहिती गोळा करावी लागते त्याचं तंत्र माहित असलेला कुणी त्यावेळी गोखलेमध्ये नव्हता. सर्व्हे डिझाईन हे पाट्या टाकणाऱ्यांचं काम नसतं (कदाचित प्रत्यक्ष सर्व्हे करणं असू शकेल!) त्यासाठी प्रतिभा, बुद्धी आणि कामाची कठोर शिस्त लागते (हे तिन्ही गुण एकत्र असणं जवळपास असंभव!) आणि निर्णय राबवण्याची धडाडी, आक्षेपांना सडेतोड उत्तर द्यायची हिंमतही लागते त्यामुळे तुमच्याकडे अर्थशास्त्राची पदवी नसली तरी धनंजयरावांनी ती संधी दिली आणि त्यांची निवड चुकीची नव्हतीच; तरीही वि. म. दांडेकर तिथे पूर्ण रमले होते का? NSSOच्या बाबतीतही हाच प्रश्न विचारावा लागेल!

धनंजयरावांनी तुमच्या स्पष्टवक्तेपणालाही मुभा दिली. 'दांडेकर आणि सोवनी हे धनंजयरावांचे बाहेरच्यांच्या अंगावर सोडायचे कुत्रे आहेत' असाही अभिप्राय होता. शिवाय कालांतराने स्वतः धनंजयराव आणि महालनोबीस यांनाही तुमच्या स्वतंत्र बाण्याची झळ लागली होती, इतक्या जवळच्या वडिलधाऱ्यांची ही कथा तर मग समवयस्क सुखात्मे, यशवंतराव चव्हाण आणि एका पिढीने लहान शरद जोशी त्यात सापडले हे अटळच होतं की 'दुसऱ्याच्या मता | मिळेनासे झाले चित्ता ||' हा तुमचा कायमचा अनुभव होता?

याचं उत्तर शोधता शोधता मी सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी पर्यंत मागे गेलो. 12 जून 1905 ला गोपाळकृष्ण गोखले फर्गसनच्या टेकडीवर गेले आणि त्यांनी शपथ घेतली - to carry out this service in religious spirit, and to promote, by all constitutional means, the national interests of the Indian people. पाठोपाठ द्रविड, देवधर आणि पटवर्धन या त्यांच्या मित्रांनी शपथा घेतल्या आणि सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटीचा जन्म झाला.

सर, या शपथेचा पुर्वार्ध 'carry out service in a religious spirit' हा आचरायला कठीण असला तरी समजायला सोपा आहे. मात्र 'by all constitutional means'ची अट गोखल्यांची वैयक्तिक पसंती होती. कदाचित परतंत्र देशात लगेच रोष ओढवू नये म्हणून ते आवश्यकही असेल असेल. मात्र समाजहिताची कामं करताना काही वेळा constitution बाजूला ठेवावी लागते कारण ती तत्वतः उदात्त असली तरी व्यवहारात 'जैसे थे' धोरणंच राबवते. गोखले इन्स्टिट्यूटनेही हे बंधन प्रमाण मानलं - अभ्यास/ संशोधनाचं व्रत सोडलं नाही हे संस्थेचं श्रेय पण सरकारशी थेट दोन हात केले नाहीत, हेही खरं! स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरूप्रणीत विकासधोरणं निश्चित करताना constitutional means वगैरे केवळ सुभाषितं उरली आणि निवडणुका आणि बहुमत हे परवलीचे शब्द झाले. ‘गोखले’सारख्या संस्था निदान आपल्या देशात तरी सरकारी मदतीशिवाय जगू शकल्याच नसत्या, त्यांच्यावर अदृश्य पण पक्की बंधनं आली. शिवाय या संस्थांमध्ये त्या काळात तरी ज्या उच्चवर्णीय शिक्षितांचीच बहुसंख्या असणं साहजिक होतं, त्यांना निवडणुकांमध्ये 'electoral merit' उरलेलं नव्हतंच. मग सरकारी आश्रयाने राहण्याची नामुष्कीही स्वीकारावी लागत होती, आपले रिपोर्ट धूळ खात पडणार हे माहीत असूनही ते बनवावे लागतच होते. या सगळ्याबद्दलची एक अगतिक कटुता तुम्ही स्पष्टपणे व्यक्त करत होता. म्हणजे तुम्ही बोलत होता ते या सगळ्या marginalised अभ्यासकांच्या वतीने, मात्र ते केव्हाही तुमची साथ सोडून ही पोटार्थी अगतिकता स्वीकारायला तयार होते, याचा तुम्हाला उबग येत होता? जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी 'गोखले'-शैलीचं महत्त्व मान्य करून तसं काम केल्यावर ते प्रश्न निर्णायकपणे सोडवायचे असतील तर 'टिळक'-शैलीच वापरावी लागेल हे सतत जाणवत होतं म्हणूनही तुम्ही अस्वस्थ होता?

जर/तरची भाषा वि. म. दांडेकरांशी बोलून चालणार नाही हे तर खरंच पण तुम्ही अभ्यास आणि जन-जागृती (फक्त तज्ज्ञांची जागृती नव्हे) या दोन्ही रुळांवरून चालला असता तर दांडेकर कमी प्रसिद्ध पण जास्त समाधान पावले असते...? 

आणखी एक प्रसंग तुम्ही कदाचित विसरूनही गेला असाल पण तो माझ्या अभिमानाचा विषय आहे. मनोहर राजर्षी नावाचा माझा एक मित्र पुणे विद्यापीठात संख्याशास्त्राचा प्राध्यापक होता. त्याने एक प्रकाशन संस्था काढली होती. (एक-दोन प्रकाशनांनंतर सगळ्यांच्याच सुदैवाने ती बंद पडली.) त्याचा एक बेत असा होता की, अर्थशास्त्रीय विषय सोडून तुमच्या इतर संबंधित लेखांचं पुस्तक करायचं. आणि त्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहायची असं त्याच्या डोक्यात होतं. मी त्याला म्हटलं की, मी प्रस्तावना द्यायला तयार आहे पण दांडेकरांनी माझं नाव सुचवलं पाहिजे. तू सुचवतोस म्हणून हे काम मी करणार नाही. तो म्हणाला, "हे कसं जमावं?" मी त्याला म्हटलं, "तू दांडेकरांकडे जा आणि त्यांना विचार की, प्रस्तावना कोणाची घ्यावी. ते एक तर प्रस्तावना नकोच म्हणतील किंवा दोन-चार नावं सुचवतील. ती जर त्यांनी समवयस्कांची सुचवली (कारण त्या वेळेला तुम्हालाही सीनियर असं फारसं कोणी उरलेलंच नव्हतं) तर तू त्यांना म्हण की, आमच्या पिढीच्या कोणाचीतरी प्रस्तावना घ्यावी असं मला वाटतं, त्यादृष्टीने तुमच्या डोळ्यांसमोर कोणी आहे का" राजर्षीने हे मान्य केलं आणि तो तुम्हाला भेटायला आला. प्रस्तावना म्हटल्यानंतर तुमचा चेहरा थोडा त्रासिक झाला असणार आणि ती आमच्या पिढीच्या कुणाची तरी असावी असं राजर्षीने म्हटल्यानंतर तुम्ही कपाळाला आठ्या घातल्या असणार. त्याचं बोलून झाल्यावर तुम्ही दोन मिनिटं विचार केलात आणि त्याला म्हणालात, "त्या विनय हर्डीकरशी ओळख आहे का तुमची? जरा चक्रम माणूस आहे पण चांगला आहे. त्याला विचारा." सर, तुमचं हे वाक्य मी मला मिळालेला सन्मान आहे असं समजतो.

विनायक हे नाव मला आवडतं; माझ्या आयुष्यात अनेक विनायकांचं स्थान आहे हे एक कारण आणि माझं नाव त्या नावाच्या पोटात आहे (किंवा माझ्या नावाचा विस्तार केला की, विनायक हे नाव तयार होतं) हे दुसरं! मात्र विचक्षण, विलक्षण ही नावं तुम्हाला अधिक शोभली असती!

(शब्दांकन : सुहास पाटील)

Tags: धनंजयराव गाडगीळ यशवंतराव चव्हाण अर्थशास्त्र वि. म. दांडेकर प्रदीप आपटे विनय हर्डीकर political economy gokhale institute economist dandekar vinay hardikar v m dandekar vinay hardikar economy indian economy indian economist v m dandekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनय हर्डीकर,  पुणे
vinay.freedom@gmail.com

पत्रकार, समीक्षक, प्राध्यापक, शास्त्रीय संगीताचे जाणकार, मर्ढेकर-शेक्स्पिअर यांचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, गिर्यारोहक आणि वक्ते
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके