भांडवलशाहीत श्रम करणाऱ्यांचा दर्जा 'सजीव कच्चा माल' एवढाच निश्चित करण्यात आला होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून उत्पादन आणि नफा या दोन्हीतील श्रम करणाऱ्यांची अपरिहार्यता आणि हक्काचा वाटा अधोरेखित करण्यासाठी मार्क्सची जागतिक इतिहासामधील वर्गयुद्धाचं सूत्र प्रमाण मानणारी मीमांसा पुढे आली, तेव्हा तो मार्क्सवाद नव्हता. वसाहतवाद आणि भांडवलशाही यांच्या साट्यालोट्यातून बाहेर पडलेल्या साम्राज्यवादी अर्थातच प्रबळ भांडवलशाही राष्ट्रांनी उरलेल्या राष्ट्रांवर लादलेली गुलामगिरी, या दोन्हीचा एकाच रणनीतीमधून छेद करण्याचं सामर्थ्य मार्क्सच्या विश्लेषणात आणि मुख्यतः कम्युनिस्ट जाहीरनाम्यात होतं. त्यातून 'मार्क्सवाद' ही आयडिऑलॉजी मांडली गेली. भांडवलशाही आणि मार्क्सवाद या दोनच प्रमुख आयडिऑलॉजी अजूनही प्रस्तुत आहेत. इतर सर्व त्यांच्यामधील संघर्षामधून व त्यांनी एकमेकींना दिलेल्या हुलकावण्यांमधून निर्माण होतात.
Philosophy interprets the world; art creates it, ideology changes it.
:: 1 ::
'आयडिऑलाजी' या शब्दाची व्युत्पत्ती, व्याख्या आणि व्याप्ती मला कळायला लागली, त्याच सुमारास माझ्या कानावर end of ideology हे शब्द पडले, हा एक विलक्षण योगायोग म्हणायला हवा. साधारण तीस वर्षांपूर्वी 'माणूस' साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांच्याशी गप्पा मारताना. आमच्या चर्चेचा संदर्भ होता तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या 'संपूर्ण क्रांती' या घोषणेचा. संपूर्ण क्रांती हे शब्द आकर्षक असले तरी त्यात नेमकेपणा नाही अशा क्रांतीची आयडिऑलॉजी जेपींनी स्पष्ट केलेली नाही; त्यांच्यानंतर तरी कुणीतरी ती मांडणी करायला हवी, असं माझं म्हणणं होतं. त्यावर माजगावकर म्हणाले, 'जेपींच्या घोषणेमधली धूसरता मलाही कळते, परंतु आता 'आयडिऑलॉजी'चा मनू संपत आला आहे, अशी कुणकुण राजकीय चर्चेमधून कानावर पडायला लागली आहे. यापुढे 'विकास' हीच एक आयडिऑलॉजी शिल्लक राहणार, अशीही मांडणी केली जाते आहे; त्यामुळे जेपींनी वा इतर कुणी फार तपशीलवार मांडणी केली असती, तरी किती फरक पडणार होता?
माजगावकरांच्या बोलण्यातून त्यांना पालटता मनू पटला होता, असं वाटत नव्हतं; परंतु एकूणच एका जाचक प्रकरणामधून राजकारण आणि राजकीय चर्चा यांची सुटका होणार म्हणून त्यांना हायसं वाटत असावं. आमच्या चर्चेचा भारतीय संदर्भ स्पष्ट होता. आणीबाणी उठवण्याचं ऐतिहासिक कार्य करून झाल्यावर जनता पक्षाचा शेवट होण्याची अपरिहार्यता घडून गेल्यावरही आम्हांला विशेषत: मला ती पटत नव्हती; म्हणूनच जेपींनी आयडिऑलॉजी मांडली नाही, पण ती मांडली गेली पाहिजे, अशी माझी भूमिका होती. माजगावकरांना वाटत होतं की जनता पक्षाचं अपयश आणि विघटन याला त्या पक्षाच्या अहंमन्य नेत्यांनी इंदिरा गांधींच्या बाबतीत उदार भूमिका न घेता त्यांचा छळ करून परत येण्याचे दरवाजे उघडून दिले, हे मुख्य कारण होतं. त्यामुळेही जेपींच्या मांडणी मधल्या धुसरतेचा मुद्दा तितकासा कळीचा ठरत नव्हता. 1980 च्या आसपासचे जागतिक संदर्भही आयडिऑलॉजीची निकड अधोरेखित करण्यापेक्षा तिची फारशी गरज उरलेली नाही, असं सूचित करणारेच होते.
माओचा मृत्यू झालेला होता आणि संपूर्ण जागतिक राजकारणाला अनपेक्षित कलाटणी देऊन आयडिऑलॉजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणणाऱ्या गोर्बाचेव्हचा संपूर्ण सोव्हिएत युनियनचा नेता म्हणून उदय व्हायचा होता. साम्यवादी चीन डेंगच्या व्यवहारवादाचा स्वीकार करून कूस पालटत होता आणि सोव्हिएत युनियन मध्ये ब्रेझनेव्हची प्रदीर्घ कंटाळवाणी आणि निस्तेज कळाहीन (lack-lustre) कारकीर्द सुरू होती. नोकरशाही नावाच्या नव्या हितसंबंधाने साम्यवाद केव्हाच गाडून टाकला होता. सोव्हिएत युनियन स्वत:च्या वजनाखालीच कोसळणार होता, याचा अंदाज आलेला नसला तरी दोन बलाढ्य साम्यवादी सत्ता साम्यवादापासून दूर चालल्याची लक्षणं स्पष्ट होती. शीतयुद्धाची धार बोथट व्हायला सुरुवात झाली होती. उदारमतवादी इंग्लंडमध्ये प्रखर राष्ट्रवादी मार्गरेट थॅचरबाईंनी पाय रोवले होते; तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी चीन व सोव्हिएत युनियन हेच मूळ आयडिऑलाजीपासून दूर चालल्यामुळे ज्या भिंतीवर चेंडू आपटायचा ती भिंतच एकाएकी नाहीशी झाल्यामुळे गोंधळून जाणं आणि जागतिक राजकारणामध्ये एकाकी महाशक्ती म्हणून नेमकं कसं उभं राहायचं याचा त्यांना थांगपत्ता नसणं, हेही क्रमप्राप्तच होतं. आजही अमेरिकेच्या राजकीय धुरीणांना त्यांच्या देशावर इतिहासक्रमाने लादलेल्या या नव्या जबाबदारीची ओळख पटलेली नाही.
व्हिएतनाम प्रकरणामधली नाचक्की अमेरिकन राजकीय मुत्सद्दी अजूनही स्वीकारत नाहीत. त्यातूनच इराण-सर्बिया-बॉस्निया अफगाणिस्तान-इराक या फजितवाड्यांची मालिका चालूच राहिली आहे. जॉर्ज ऑर्वेल, आर्थर कोत्स्लर यांनी उघडा केलेला साम्यवादी व्यवस्थेचा स्टालिनशाहीचा क्रूर चेहरा क्रुश्चॉव्हच्या त्या प्रसिद्ध भाषणानंतर कट्टर साम्यवाद्यांनाही नाकारता येईनासा झाला होता. आयडिऑलॉजीचा मुद्दा जागतिक राजकारणात प्रभावी बनवणाच्या मार्क्सवादी मांडणीमध्येही लेनिन-माओ-टिटो- कॅस्ट्रो-हो चि मिन्ह या आपापल्या देशातल्या क्रांतीच्या नेत्यांनी आणि मार्क्स-एंगल्स ते रोजा लक्झेंबर्ग पर्यंतच्या विचारवंतांनी महत्त्वाचे फेरफार कळत-नकळत केलेलेच होते. त्यांच्यातही 'पोथीनिष्ठ' आणि 'क्रांतिकारी' असे दोन गट तयार होऊन वैचारिक पातळीवर जवळपास 'वर्गयुद्धच' भडकल्याची लक्षणं दिसत होती. कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये जिची भविष्यवाणी अत्यंत उत्कटपणे करण्यात आली ती, शासनाचं दमनकारी महत्त्व कमी होऊन त्याला मुक्तिदात्याचं सकारात्मक प्रयोजन बहाल करणारी, न्याय्य वाटपाची हमी देणारी आणि संकुचित भांडवलदारी राष्ट्रवादाचा पाडाव करून संपूर्ण जगाला क्रांतिकारी, विमोचक, समंजस, प्रतिभावान मानवतावादी हमरस्त्यावर नेणारी व्यवस्था दूरच्या भविष्यकाळातही दिसत नव्हती.
भ्रष्टाचार, नोकरशाहीची मगरमिठी, लष्करी सामर्थ्यांचा जीवघेणा हव्यास, संकुचित राष्ट्रवाद, व्यक्ती-पूजा, नैतिक अध:पतन (decadence), वैफल्यग्रस्त आणि व्यसनाधीन युवा पिढी या समस्या भांडवलशाही आणि साम्यवादी या तत्त्वतः परस्परविरोधी समाजांपुढे 'आ' वासून उभ्याच होत्या. त्यातही सर्वसामान्य माणसाच्या राहणीमानाची प्रत भांडवलशाही देशातच अधिक चांगली होती. कुजलेलं का होईना, बूज्च्वा जाणिवांनी आक्रसलेलं का असेना, मुक्त जीवन भांडवलशाही देशातले रहिवासीच जगत होते. स्वत:च्या प्रदूषणामुळे कोलमडून पडण्याची शक्यता ठळक झाली होती. साम्यवादी व्यवस्थेत मार्क्सची अपेक्षा नेमकी उलट होती. त्या 80 च्या दशकात आणखी एक यक्षप्रश्न जागतिक राजकारणावर प्रभाव गाजवत होता. अण्वस्त्रांच्या अतिरेकाचा. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्याकडे संपूर्ण जगाचा एकाहून अधिक वेळा संहार घडवू शकणाऱ्या अण्वस्त्रांचे, क्षेपणास्त्रांचे ढीग लागले होते. रासायनिक आणि जैविक अस्त्रांचे शोधही उद्याच्या शक्यतांमध्ये होते. दोन महायुद्धे, रशिया आणि जर्मनीत आयडिऑलॉजीच्या नावावर झालेले नरसंहार, शीतयुद्धाची निरर्थक आणि संशयाधीन राष्ट्रवादांची मारामारी यांतून जग सावरत होतं, तोच तिसऱ्या (आण्विक) महायुद्धाचं सावट गडद झालं होतं.
त्यातूनच 'आर्मागेडॉन' किंवा 'स्टार वॉर्स' सारख्या आचरट कल्पनांचा प्रसार अमेरिकेचे पूर्वाश्रमीचे फंटूश सिनेमा नट अध्यक्ष (रेगन) करत होते. पर्यावरणीय असमतोल आणि दहशतवाद या दोन संकटांची अजून चाहूल लागलेली नसल्यामुळे संहारक अण्वस्त्रांचा विनाश करून निदान त्यांच्या संख्येवर निर्बंध आणून टिकाऊ शांतता निर्माण करण्याची गरज हेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं मुख्य सूत्र उरले होतं. त्यामुळे आयडिऑलॉजीचं शुक्लकाष्ठ आता बाजूला ठेवावं अशी हाकाटी सुरू झाली होती. एवढीच कारणं 'एन्ड ऑफ आयडिऑलॉजी' या शब्दरचनेमागे असती तर ती रास्त मागणी वा सूचना ठरली असती; पण तसं नव्हतं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये एकूण जगातील स्वतंत्र राष्ट्रांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली; वसाहतवाद मागे पडला आणि स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, स्वयंनिर्णयाचा हक्क हे परवलीचे शब्द झाले. दुसऱ्या देशावर प्रत्यक्ष राज्य करण्यापेक्षा त्या देशाला आपल्या गटात सामील करून, त्याच्या धोरणावरती प्रभाव टाकणाऱ्या Political presence युग आलं व वसाहतवादाची जागा वर्चस्ववादाने (hegemony) घेतली आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये राजकारणी, सैन्यदले, नोकरशाही आणि निरनिराळ्या यंत्रणा असे नवे हितसंबंध कोणीही कोणतेही खास प्रयत्न न करताच प्रस्थापित झाले, कारण हे सर्वच देश स्वातंत्र्याच्या मुद्यावर अत्यंत आग्रही असणं, possessive होणं आणि अनेक शतकांनंतर मिळालेलं स्वातंत्र्य आपण पुन्हा गमावणार तर नाही ना भारतीयांनी तर अराजक नको, गरिबी परवडली अशी दाद परकीय सत्तेला शंभर वर्षे दिलीच होती या भयगंडाने पछाडून जाणं नैसर्गिकच होतं.
प्रत्येक देशामधल्या प्रशिक्षित जितपत असतील तितपत मंडळींनी या चारही क्षेत्रातल्या मोक्याच्या जागा फार झपाट्याने काबीज केल्या. वसाहतवादाला विरोध करणं ही राष्ट्रवादाची व्याख्या बदलून आलेल्या व्यवस्थेत सामील होणं, ही नवी उदात्त सोय उपलब्ध झाली. सीमा सुरक्षित ठेवणं, स्थिर शासनाची आवश्यकता वारंवार मांडणं आणि ज्यांना बदललेल्या व्यवस्थेत महत्त्वाच्या जागा मिळाल्या नव्हत्या, त्यांना राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी देशभक्तीचे धडे देणं, यातलं ढोंग उघड व्हायलाही काही वर्षे जावी लागली त्यातूनच पुन्हा एकदा व्यक्तिस्तोम, एकाधिकारशाही, राजकीय आणि आर्थिक हितसंबंधीयांची हातमिळवणी, वंचित वर्गाला स्वप्नांचा रतीब आणि सबुरीचा शहाजोग सल्ला, काही क्षेत्रांची नको इतकी मातब्बरी आणि अनावश्यक वाढ हे दोष या सगळ्या नवस्वतंत्र राष्ट्रांत पाय रोवून बसले. शासन व्यवस्था लोकशाही असो, वा हुकूमशाही; हुकूमशाही एका पक्षाची असो, वा व्यक्तीची वा घराण्याची वा वर्गाची, प्रमाण आयडिऑलॉजी भांडवलशाहीची असो वा साम्यवादाची वा फॅसिझमची; स्वतंत्र देशातलं स्वातंत्र्य ही वर म्हटलेल्या विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होऊन प्रत्येक देशातला फार मोठा समाज 'स्वदेशी' गुलामगिरीतच अडकला.
ऐतिहासिक बदल घडविण्यासाठी संघर्ष करणारे सहसा सत्तेवर येत नाहीत. बलिदान करणाऱ्यांच्या बाबतीत तो प्रश्न उद्भवत नाही. ते नव्या हितसंबंधांचे चलनी आयकॉन्स बनतात याला संघर्ष आणि व्यवस्थापन यासाठी लागणारे स्वभाव आणि कौशल्ये वेगवेगळी असतात हे एक वाजवी कारण आहेच. पण प्रत्येक समाजात संघर्षाच्या क्षणी घरी बसणारा आणि स्वातंत्र्याच्या जल्लोषात सर्वांत पुढे असणारा एक चतुर आणि बोलका वर्ग असतो. हाच वर्ग नव्या देशामध्ये सरकारी-निमसरकारी, उद्योग-शिक्षण-व्यापार नव्याने निर्माण झालेला माध्यमांचा खटाटोप कला साहित्य-मनोरंजन ही क्षेत्रे व्यापून टाकतो. एक ऐतिहासिक बदल झाल्यानंतर दुसरा केव्हा होणार, हे या वर्गाच्या हातांत नसतं (ते कोणाच्या हातांत असतं या प्रश्नाचं उत्तर आयडिऑलॉजी हेच आहे, पण ते पुढे येईल); पण पुन्हा एक बदल म्हणजे आपली सुरक्षितता धोक्यात येणं एवढं या वर्गाला कळतं; म्हणून त्या बदलाची मागणी बोथट करून, त्या प्रक्रियेला खीळ घालून, निदान खरेखोटे गैरलागू मुद्दे महत्त्वाचे करून-मांडून बदलाचा क्षण पुढे ढकलण्याचं ऐतिहासिक कार्य याच वर्गाकडून घडतं. मार्क्स 'बा' म्हणाला ते यांनाच. प्रत्येक बदलानंतर नवे बूज्र्वा तयार होतात, हे त्यानं मांडलं नसलं तरी अपरिहार्य आहे. एन्ड ऑफ आयडिऑलॉजीचा गवगवा, कोल्हेकुई सुरू करण्यात या मंडळींचा मोठा वाटा होता, म्हणून मतलबी शब्द वापरला.
:: 2 ::
आयडिऑलॉजी'ला नेमका मराठी प्रतिशब्द मला अद्याप सुचलेला/सापडलेला नाही. विचारप्रणाली, तत्त्वज्ञान, वैचारिक चौकट, विश्वदृष्टी (वेल्टेनशुंग), वाद, इझम (हा शब्द इथे मराठी म्हणूनच घ्यावा), परिवर्तनवाद, वगैरे शब्द एकेकटे अपुरे पडतात; कदाचित सगळे एकत्र वापरले तरी अपुरेच वाटतील. त्यांतल्या त्यात 'वाद' हा शब्द प्रचारात आहे. मार्क्सवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद, स्त्रीवाद, कला/जीवनवाद, सौंदर्यवाद, स्वातंत्र्यवाद, वसाहत/साम्राज्यवाद इ. परंतु 'वाद' हा शब्द निर्लेप नाही परंपरेने त्याला इतर अर्थच्छटा चिकटलेल्या आहेत. संस्कृत परंपरेतला 'शास्त्र' हा शब्द बराच जवळ जातो. योगशास्त्र, कामशास्त्र, अर्थ/ राज्यशास्त्र वगैरे; पण तोही निर्लेप नाही, त्यात पुन्हा धर्मशास्त्र, नीतिशास्त्र असे इतर प्रयोगही रूढ आहेतच. सावरकरांनी 'लब्ध-प्रकाश इतिहास निसर्ग माने' अशी शब्दयोजना केली होती ती आयडिऑलॉजी संज्ञेच्या काही छटा व्यक्त करते हे पुढल्या चर्चेवरून स्पष्ट होईल. मात्र सावरकरांनीच आधीच्या ओळीत 'व्रत' हा शब्द वापरून इतर अनेक अर्थच्छटांचं सूचन होईल अशी शक्यता निर्माण करून ठेवली. त्यामुळे या आधीच्या मजकुराप्रमाणेच पुढेही परका शब्द वापरणार आहे. कदाचित कुणा वाचकाला नेमका शब्द सापडेलही.
आयडिऑलॉजी म्हणजे नेमके काय?
1. आयडिऑलॉजी समाजाच्या समकालीन अवस्थेत बदल करून अधिक प्रगत, न्याय्य, सुखी व सुसंस्कृत समाजनिर्माण करण्यासाठी निर्माण होते; ती पुढे पाहते, मागे नाही.
2. आयडिऑलॉजी अभ्यास/ इतिहासाच्या मधून निर्माण होते, हा इतिहास मुख्यत: माणसांचा असतो.
3. मानवी इतिहासाच्या समग्र तपासणीमधून आयडिऑलॉजी विकासक्रमाची एक स्पष्ट, सर्वस्पर्शी दिशा अधोरेखित करते आणि
4. त्या दिशेला अनुसरून समकालीन समाजव्यवस्थेमध्ये तातडीने करावयाचे बदलही स्पष्टपणे मांडते.
5. असे बदल स्पष्ट केल्यानंतर समाजातील कोणता वर्ग/ समूह हे बदल करू शकेल, ते निश्चित करून.
6. त्या बदलासाठी आवश्यक असणारे मार्ग ठरवून संघर्ष अपरिहार्य असल्यास संघर्षरेखा निश्चित करून,
7. त्या संघर्षाची रणनीती, साधनसामग्री नेमकेपणाने मांडते.
8. ही मांडणी झाल्यावर या बदलासाठी आवश्यक ते मनुष्यबळ तयार करण्यासाठी तात्त्विक, वैचारिक, भावनिक आणि प्रत्यक्ष बदलाच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण कोणाला व कसे द्यायचे हेही आयडिऑलॉजी स्पष्ट करते.
9. अपेक्षित बदल घडवण्याचा कालखंड संपला की नंतर येणाऱ्या समाजाचे विशेषत: त्यातील शासनयंत्रणा, राजकारण, अर्थकारण, शिक्षणव्यवस्था आणि व्यापक अर्थाने बदलानंतर निर्माण करण्याच्या संस्कृतीची मार्गदर्शक व्याख्या आयडिऑलाजीने केलेली असते.
10.बदलासाठी आवश्यक ती पावले उचलताना आयडिऑलॉजी व्यक्तिगत नाते/ हितसंबंध तसेच परंपरेने आलेले धर्म, पंथ, भाषा, संस्कृती यांचे हितसंबंध कठोरपणे दूर सारण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीवर भर देते.
11. मागील अभ्यासामधून समकालीन बदल ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे, हे आयडिऑलॉजीचे प्रधान गृहीत असते. त्यामुळे,
12. आयडिऑलॉजी म्हणजे स्वप्नरंजन नव्हे, किंवा आदर्श समाजाची व्याख्या नव्हे आणि एकदा बदल घडवून नंतर विश्रांती घेणारी प्रक्रिया नव्हे.
13. विज्ञान, तंत्रज्ञान, जीवशास्त्र, वैद्यक, अशा इतर ज्ञानशाखांमधल्या आधुनिक शास्त्रीय विकासाचा आयडिऑलॉजी अनादर करीत नाही, तिचा गाभा राज्य-अर्थशास्त्रीय (Political economy) असला; तरी उलट या माणसांच्या उपयोगी ज्ञानशाखांमधील घडामोडीचे मानवी संदर्भ ठळक करते.
(वरच्या 13 मुद्यांत काही सुधारणा, भर व नेमकेपणा आणण्यासाठी सूचनांचे स्वागत आहे.)
हे सर्व आयाम लक्षात घेतले तर आयडिऑलॉजी हा शब्द किती सैलपणाने वापरला जातो, आधीचे शब्द अपुरे का पडतात, याचा उलगडा होईल. त्याचप्रमाणे विचार, वक्तृत्व, लेखन, आचरण, संघटन ही सर्व कौशल्ये ज्यांच्याकडे आहेत आणि जे मोठ्या प्रमाणावर गर्दी गोळा करतात; प्रभाव टाकतात; नियमन करतात, नेतृत्व करतात; त्या गर्दीच्या वर्तनावर अशा लोकमान्य व्यक्तींच्या विचारालाच काही वेळा आयडिऑलॉजी म्हणण्यातली गफलत उदा. गांधीवाद, आंबेडकरवाद, लोहियाबाद स्पष्ट होईल. आज भारतीय संदर्भात ज्या विचारांना आयडिऑलॉजी मानण्यात येते, त्यांपैकी बहुतेक विचारसरणीतून वरच्या 13 पैकी अनेक मुद्दे निसटले आहेत, वा त्यांची स्पष्ट उत्तरं मांडलेली नाहीत, हेही दिसून येईल. भारतीय भाषांमध्ये 'आयडिऑलॉजी'चे आयाम स्पष्ट करणारा शब्द का नसावा, या प्रश्नाचं उत्तरही वरच्या व्याख्येमध्येच मिळेल. आयडिऑलॉजीचं मुख्य प्रयोजन ऐहिक जग बदलण्याचं आहे. भारतीय मानसिकता ऐहिक जग अनित्य मानून, जन्माने जे वाट्याला आलं ते स्वीकारून पारलौकिक जगामध्ये हक्काची जागा आरक्षित करण्याची आहे.
त्यातच गीतेसारख्या आकर्षक पण दुष्ट ग्रंथाचा पगडा बहुतेक सर्व भारतीय विचारवंतांवर असतोच असतो व गीता चातुर्वर्ण्य व्यवस्थेत प्रत्येकाच्या वाट्याला येणारे सामाजिक काम कर्तव्य भावनेतून करण्यावरच नीती-अनीतीचा संदर्भ बाजूला ठेवून आणि त्याला कर्मफळाची आशा न ठेवण्याचा उदात्त मुलामा देऊन भर देते, त्यामुळे जग बदलण्याचा मुद्दा उपस्थितही करता येत नाही; मग भाषेमध्ये तसा शब्द येणार कसा आणि कुठून ? ('क्रांती' हा शब्द सुद्धा महत्त्वाचा ऐतिहासिक बदल घडवणारी घटना/प्रक्रिया या अर्थाने भारतात केव्हा रूढ झाला, हेही या निमित्ताने तपासून पाहण्यासारखे आहे.) या व्याख्येमध्ये 'संघर्ष अपरिहार्य असेल तर' असे शब्द आहेत. त्यांचं थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. महत्त्वाचे बदल संघर्षामधूनच होतात, असा अनुभव आहे. अगदी जैविक उत्क्रांतीमध्येसुद्धा निर्वाणीच्या संकटांचा यशस्वीपणे आणि डौलदारपणे मुकाबला करणारेच जीव टिकले आणि अधिकाधिक प्रगत बनले. हाच नियम मानवी समाजाला सदा सर्वकाळ लागू करायचा म्हटला तर मानव इतर जीवांपासून वेगळा कसा, ही अडचण उभी राहते. शिवाय संघर्षाची अपरिहार्यता मान्य केल्यावर त्या संघर्षाचं स्वरूप हिंसक की दुसरं काही, हा नवा पेच निर्माण होतो; कारण संघर्ष सर्वसाधारणपणे हिंसक असणार हे गृहीत आहे. रक्तविरहित क्रांतीसारखी संघर्ष मुक्त बदलाची भविष्यातली शक्यता पूर्णपणे नाकारू नये म्हणून हे शब्द वापरले आहेत.
स्पष्ट आयडिऑलॉजी असेल तर समाजपरिवर्तनाची प्रक्रिया नेमकी आणि धारदार बनते. वेळ, साधन आणि श्रम यांचा अपव्यय टळतो. प्राधान्यक्रम समोर असल्यामुळे एकाच वेळी सगळ्याच प्रश्नांना हात घालून एकही प्रश्न निर्णायकरित्या न सुटण्याची किंवा तो जास्तच किचकट बनून बोकांडी बसण्याची नामुष्की टळते. परिवर्तनाच्या प्रयत्नांत प्रत्येक समाजघटकाकडून त्यांच्या कुवतीप्रमाणे भर पडेल अशी योजना करता येते, परिवर्तन आणि त्यासाठी लागणाऱ्या cadresची निर्मिती या दोन्ही पूरक आणि एकाच वेळी चालणाऱ्या प्रक्रियांमुळे प्रश्न एकीकडे आणि तो सोडवण्यासाठी प्रशिक्षण दिलेले तज्ज्ञ दुसरीकडे आज भारतात व्यवस्थापन क्षेत्रात managers who don't/ can't manage or only mismanage हा सार्वत्रिक अनुभव आहे अशा विपरीत शक्यता टळतात. मुख्य म्हणजे जग बदलता येतं, बदललं पाहिजे आणि मी ते बदलू शकतो अशी गतिमान, सकारात्मक, आक्रमक मानसिकता वाढीला लागून जैसे थे वृत्ती, परिस्थितीला (प्रौढ स्वीकारशीलतेच्या नावाखाली) शरण जाण्यातली अगतिकता मागे पडते.
'आपण एका मोठ्या प्रवासाला निघालो आहोत, मार्ग अडचणीचा असला तरी तो आपण शोधून काढू', 'एक टप्पा गाठला की मग पुढचा रस्ता दिसेल', 'भविष्य अस्पष्ट असलं तरी आपण आशावादी असलं पाहिजे', 'प्रत्येकानेच आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे', 'आम्ही वेडे ठरलो पण निष्ठांशी तडजोड केली नाही', 'एक ना एक दिवस आम्हांला अपेक्षित असलेली व्यवस्था येईलच येईल', '(कुणाच्या तरी) स्वातंत्र्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही', 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल' अशी आयडिऑलॉजीला मंजूर नसणारी भंपक विधाने तथाकथित परिवर्तनवादी करत असतात. त्यांना फार तर गोंधळलेले प्रामाणिक म्हणता येईल. पण 'प्रत्येक व्यक्ती हे एक स्वतंत्र विश्व असतं, म्हणून तिची स्वत:ची आयडिऑलॉजी असते', 'आयडिऑलॉजी स्वीकारल्याने विचारस्वातंत्र्याचा संकोच होतो, सर्जनशीलता बंदिस्त होते, अभ्यासाला मर्यादा पडतात', किंवा कितीही क्रांत्या घडवल्या तरी मानवी जीवनाचा अर्थ बदलत नाही, अंतिम सत्य तेच राहतं', म्हणणारे चापलूस आयडिऑलॉजीचे खरे मारेकरी असतात.
:: 3 ::
एक ऐतिहासिक बदल घडल्यानंतर त्या बदलाचे फायदे हस्तगत (हायजॅक) करून 'झाला एवढा बदल पुरे हाच बदल सर्व सामाजिक घटकांपर्यंत पोचवण्याचं काम आता केलं पाहिजे (आणि ते आम्ही करणार आहोत) म्हणणारे नवे बूज्र्वा 'एन्ड ऑफ आयडिऑलॉजी'चा बूट काढतात. पण एवढं एकच कारण आयडिऑलॉजीच्या आवश्यकतेपुढे प्रश्नचिन्ह उभं राहण्यामागे नसतं. आयडिऑलॉजीच्या नावाने निरनिराळ्या देशांमधून परिवर्तनाच्या नावाखाली जे घडलं/घडवण्यात आलं, त्याचा अनुभव आणि चर्चाही अशी प्रश्नचिन्हे उभी करते व त्यांमध्ये काही तथ्यांश असतो, शंका आणि प्रश्न वाजवी असतात, हे नाकारण्यात अर्थ नाही. मुळात 'आयडिऑलॉजी' हा शब्द जागतिक इतिहासातल्या आधुनिक युगात, युरोपीय प्रबोधन युगानंतर दोनशे वर्षांनी आला. त्याआधी धर्मसत्ता आणि राजसत्ता व्यक्तिशः धर्मगुरू-प्रचारक आणि राजे व राजघराणी हे परिवर्तनाचे एजंटस होते. त्यांच्या संगनमताने वा त्यांच्यातील संघर्षामधून जी काही शासनव्यवस्था वाट्याला येईल ती स्वीकारण्याचा एकमेव पर्याय प्रजेला उपलब्ध होता.
प्रबोधन युगानंतर स्वातंत्र्य, समता, सौख्य, समृद्धी, संस्कृती इ. मूठभरांची मक्तेदारी असता कामा नये; तत्त्वत: पृथ्वीवरील सर्व मनुष्यमात्रांना ती मिळाली पाहिजेत. ही जाणीव निर्माण होऊन त्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्याची मानसिकता वाढीला लागली व आयडिऑलॉजीची प्राथमिक चाहूल लागली. व्यापारवाढ, भांडवली गुंतवणूक, औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेल्या प्रचंड उत्पादनाच्या सोयी-शक्यता, कच्च्या मालाचे साठे आणि उत्पादनाला हमखास बाजारपेठ, त्यातून जास्तीत जास्त नफा, त्या नफ्यातून पुन्हा गुंतवणूक या साधारण शंभर वर्षांच्या उद्योगातून भांडवलशाहीचा जन्म झाला. या भांडवलशाहीत श्रम करणाच्यांचा दर्जा 'सजीव कच्चा माल' एवढाच निश्चित करण्यात आला होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून उत्पादन आणि नफा या दोन्हीतील श्रम करणाच्यांची अपरिहार्यता आणि हक्काचा वाटा अधोरेखित करण्यासाठी मार्क्सची जागतिक इतिहासामधील वर्गयुद्धाचं सूत्र प्रमाण मानणारी मीमांसा पुढे आली, तेव्हा तो मार्क्सवाद नव्हता.
वसाहतवाद आणि भांडवलशाही यांच्या साट्यालोट्यातून बाहेर पडलेल्या साम्राज्यवादी अर्थातच प्रबळ भांडवलशाही राष्ट्रांनी उरलेल्या राष्ट्रांवर लादलेली गुलामगिरी, या दोन्हीचा एकाच रणनीतीमधून छेद करण्याचं सामर्थ्य मार्क्सच्या विश्लेषणात आणि मुख्यत: कम्युनिस्ट जाहीरनाम्यात होतं. त्यातून 'मार्क्सवाद' ही आयडिऑलॉजी मांडली गेली. भांडवलशाही आणि मार्क्सवाद या दोनच प्रमुख आयडिऑलॉजी अजूनही प्रस्तुत आहेत. इतर सर्व त्यांच्यामधील संघर्षामधून व त्यांनी एकमेकींना दिलेल्या हुलकावण्यांमधून निर्माण होतात. या दोन प्रमुख आयडिऑलॉजींपैकी 'मार्क्सवाद' ही लिखित असल्यामुळे जगभर तिचा प्रसार फार झपाट्याने झाला आणि त्याचा वचपा मार्क्सवाद / दी यांच्यावर इतरांनी पोथीनिष्ठ (dogmatic) असण्याचे व मार्क्सवाद्यांपैकी काहींनी त्यांच्यापैकीच काहींवर फेरफारवादी (revisionist) असण्याचे आरोप करण्यामधून निघाला. भांडवलशाहीवर लिखाण खूपच झालं तरी 'कॅपिटल' वा 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' सारख्या आद्य व प्रमाण ग्रंथांची प्रतिष्ठा त्यांच्यापैकी कोणत्याच लिखाणाला मिळाली नाही. त्यातूनच 'भांडवलशाही पोथीनिष्ठ नाही, व्यवहारनिष्ठ आहे, लवचिक आहे (resilient)' असं काही झुकतं मापही मिळालेलं दिसतं.
मार्क्सवादाचा पुढला टप्पा 'लेनिनवाद' आणि 'माओवाद' (सोयीसाठी रूढ शब्द वापरतो आहे) गाठला गेला, त्यामुळे त्यांनाही स्वतंत्र आयडिऑलॉजीची प्रतिष्ठा मिळाली; काही काळ टिटो, कास्ट्रो, चे गव्हेरा, हो-चि-मिन्ह यांच्याही शैली स्वतंत्र मानल्या गेल्या. भांडवलशाहीमधून कल्याणकारी राज्य (वेल्फेअर स्टेट), सहभागी-विकेंद्रित भांडवलशाही (पब्लिक लिमिटेड कंपन्या), बहुराष्ट्रीय कंपन्या आणि सरकारनेच सुचवलेली जनभांडवलशाही (पॉप्युलर कॅपटॅलिझम) आणि आता खुली अर्थव्यवस्था, गुणवत्ता, स्पर्धा यांतून संपूर्ण जगाची बाजारशाही असे पर्याय उपलब्ध झाले. यातला शेवटचा पर्याय अद्यापही प्रायोगिक अवस्थेत आहे. त्याचे स्वरूप पूर्णपणे स्पष्ट न झाल्यामुळे 'मूळ भांडवलशाहीच वेगळ्या रूपात पुन्हा दृढ होत आहे' असा आक्षेप घेतला जातो. 'या नव्या भांडवलशाहीला मानवी चेहरा दिला पाहिजे' अशी भूमिकाही मांडली जाते. एक छोटा गट या खुल्या जागतिक अर्थव्यवस्थेला काही नैतिक आयाम असले पाहिजेत, असं मानतो व त्या खटपटीत असतो.
याच काळात मिश्र अर्थव्यवस्था, लोकशाही समाजवाद, फॅसिझम, गांधीवाद वगैरेंनाही आयडिऑलॉजीचा दर्जा देण्यात आला, ही महत्त्वाची गफलत बाजूला ठेवली (या लेखापुरती) तरी कोणत्याही आयडिऑलॉजीला निर्भेळ, निर्विवाद यश मिळालं असं दिसत नाही. त्यातच मार्क्स-लेनिन-माओ यांच्या आयडिऑलॉजी लिखित असल्याने त्यांच्या अपयशाची दवंडी पिटणं तुलनेने सोपं जात असलं, तरी अलिखित असून उत्क्रांत होत जाणाऱ्या भांडवलशाहीचं प्रगतिपत्रकही लाल शेऱ्यांनी भरलेलं आहेच. दोन्ही मार्गांनी गेलेल्या देशांत त्याच समस्या पुन्हा पुन्हा उद्भवतात; फरक आढळतो तो आकड्यांमध्ये. भांडवलशाहीतला गरीब, समाजवादी देशातल्या गरिबांच्या मानाने श्रीमंत असतो, बेकारीच्या समस्येने उग्र रूप धारण केलेलं नसतं. आरोग्यव्यवस्था अधिक भरवशाची असते. संहारक शस्त्रे दोन्हीकडे असली, तरी भांडवलशाही देशांकडे त्यांची संख्या मोठी असते. एवढंच नाही, तर गुन्हेगारी, भ्रष्टाचार, व्यक्तीची असुरक्षितता, राजकीय नेतृत्वाची गुणात्मक घसरण हे दोषही दोन्हीकडे सापडतात; म्हणूनही आयडिऑलॉजी हे प्रकरणच अनावश्यक आहे, अशी धारणा होत असावी.
आणखी एक लक्षणीय साम्य असं, की मानवी सुखाचा शोध संपलेला नसला, तरी आता मानवी सुखाची व्याख्या दोन्ही बाजूंची जवळपास एकच आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, शोषणमुक्ती, सुरक्षितता, विकासाची हमी, किमान जीवनमानाची शाश्वती, तिसरं महायुद्ध न होण्याची खबरबदारी हीच भाषा दोन्हीकडे बोलली जाते आहे आणि नजिकच्या भविष्यात तरी, कोणतीही एक आयडिऑलॉजिकल धारा सर्व जगापुढचे हे जटिल प्रश्न सोडवू शकेल, अशी खात्री आयडिऑलॉजीच्या खंद्या समर्थकालाही वाटत नाही. त्यातच दहशतवाद आणि पर्यावरण असमतोल ही दोन नवी आव्हाने उभी आहेत आणि त्यांचा मुकाबला आयडिऑलाजीमधले भेद विसरून करण्याची भाषा तरी बोलली जाते आहे. असं असेल तर काही विषयांत किंवा काही काळापुरती आयडिऑलॉजी बाजूला ठेवता येते in suspended animation हे मान्य करण्याची आपत्ती उभी राहते; मग आयडिऑलॉजीच्या संपूर्णतेलाच तडा जातो.
भांडवलदारी देशांमधल्या भांडवलदारांचे आंतरराष्ट्रीय हितसंबंध आपोआपच तयार होतात; म्हणून अशा देशांमधल्या श्रम करणाऱ्यांचे हितसंबंधही समानच असणार या निष्कर्षामधून जगातील कामगारांच्या आंतरराष्ट्रीय एकजुटीची रणनीती हिरीरीने मांडली गेली होती. म्हणजे दोनही बाजूंनी आंतरराष्ट्रवाद Internationalism स्वीकारलेलाच होता. त्यात विसाव्या शतकात भौगोलिक साधर्म्य, अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था, प्रगत-अप्रगत संस्कृती, श्रीमंत-मध्यम-गरीब-अत्यंत गरीब, विकसित-विकसनशील-अविकसित आणि गेल्या वीस वर्षांत विशिष्ट जीवनमान राखण्यासाठी अनावश्यक ऊर्जा वापरून पर्यावरणाचा हास घडवणारे-न घडवणारे (एवढ्या एकाच बाबतीत गरीब देश दोषमुक्त आहेत; पण त्यांची गरिबी कोणामुळे आली, हा प्रश्नही आहेच) अशा अनेक आयामांवर आधारित आंतरराष्ट्रवाद मांडून सहकार्याने, सामंजस्याने समस्या सोडवण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला जातो. तरीही आंतरराष्ट्रवाद यशस्वी होताना दिसत नाही. वैश्विक, जागतिक जाणिवा मुळात अमूर्त असतात. त्यामुळे त्या स्वीकारणं, व्यक्त करणं, त्यांचा उद्घोष करणं सोपं असतं, पण आंतरराष्ट्रीय जाणीव म्हणजे नेमकं काय? उदा. विश्व नागरिक (world citizen) असणं, याची व्याख्या फार अवघड आहे. विश्व नागरिकाची जीवनशैली नेमकी कोणती, हे ठरवणं त्याहूनही किचकट.
वर्ण, धर्म, भाषा, संस्कृती आणि विशिष्ट राष्ट्रीयत्व या मूळ ओळख निश्चित करणाऱ्या जाणिवा बोथट करण्यात कोणत्याच आयडिऑलॉजीला मोठे यश मिळालेलं नाही. यावर उपाय म्हणून 'राष्ट्रवाद' हीच एक आयडिऑलॉजी आहे असं मानण्याचे प्रयत्न झाले; पण राष्ट्रवाद हे अनाकलनीय अशास्त्रीय वास्तव सर्वांनाच स्वीकारावं लागलं. आयडिऑलॉजीवरून पडलेल्या गटात विरोधी गटाच्या संदर्भात राष्ट्रवाद बोथट झालाही; पण गटांतर्गत मात्र तो जिवंत राहिला. काही वेळा तर प्रबळ राष्ट्रवादी भूमिकेमधून विरोधी गटातल्या राष्ट्राची मदतही घेतली गेली. अमेरिका-चीन यांच्यामधील गेल्या तीस वर्षांतलं राजकारण किंवा भारत-बांगलादेश संबंध अशी जागतिक आणि विभागीय पातळीवरची बोलकी उदाहरणं अनेक आहेत. प्रखर राष्ट्रवादी भूमिकेतूनच गरीब देशांमध्ये लष्करी सामर्थ्यावर वारेमाप खर्च आणि श्रीमंत देशांमध्ये संहारक शस्त्रांची स्वतंत्र त्या देशांतल्या सत्ताधार्यांना वेठीला धरणारी माफियाशाही हे दोष शिरले व जागतिक गरिबीत वाढच झाली.
गरीब देश केवळ लष्करी सामर्थ्याच्या जोरावर सार्वभौम राहणे शक्य नाही, हे धोरणे ठरवणाच्यांना कळत नसेल, असं नाही; पण राष्ट्रवादी जाणीव इतकी प्रबळ असते, की भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या गरिबांना अण्वस्त्रांच्या चाचण्यांबद्दल वाचून स्वत:च्या गरिबीचा विसर पडतो. आणि काही निश्चित आयडिऑलॉजी नसेल, तर देशातल्या देशात सुद्धा श्रीमंत-गरीब यांतली दरी भरून काढणं अशक्य आहे; असा हा आयडिऑलॉजी आणि राष्ट्रवाद यांच्यातला पेच आहे. देशभक्त आणि राष्ट्रवादी असण्यासाठी मुद्दाम काही वेगळं करावं लागत नाही, उलट देशाचं सामर्थ्य वाढावं म्हणून देशांतर्गत भेद सहज सतरंजीखाली लोटता येतात; अशी सोय उपलब्ध असताना आयडिऑलॉजीची पीडा कोण मागे लावून घेईल? प्रत्येक आयडिऑलॉजी स्वत:ची एक परिभाषा बनवते आणि त्या परिभाषेच्या वापराची सक्ती झाली की वावदूक मंडळी परिभाषेच्या माध्यमातून विचार व कार्यकर्ते यांच्यामध्ये स्वतःचा एक हितसंबंध तयार करतात असाही आक्षेप आहे, अनुभवही आहे. मार्क्सवादी परिभाषा, विश्लेषणपद्धतीचा अनेक जणांनी धसका घेतलेला आहे. काटेकोरपणा न सोडता सर्वसामान्यांच्या भाषेत मांडणी करणं अवघड असतंच.
मार्क्सवाद भारतात रुजावा तितका रुजला नाही, याचं एक कारण भारतीय भाषांतून त्याची सुबोध मांडणी झाली नाही असं मानलं जातं. आर्थर कोस्लरचं वाक्य असं आहे. ' तास दोन तास मार्क्सवादी चर्चेच्या गोंगाटात सापडलात की तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट मान्य करायला तयार होता.' यातला मिस्किलपणा बाजूला ठेवला तरी आयडिऑलॉजीची परिभाषा आणि लोकभाषा (Popular idiom) यात तफावत असते व ती कमी झाली पाहिजे. शेवटचा पण महत्त्वाचा आक्षेप असा की आयडिऑलॉजी मांडणाराची बुद्धिमत्ता, अभ्यास, विश्लेषणपद्धती आणि बांधीलकी निर्विवाद असली, तरी ती मांडणी एका विशिष्ट परिस्थितीत केलेली असते. मार्क्सवाद ही मुख्यत: निर्दय ब्रिटिश भांडवलशाहीला दिलेली प्रतिक्रिया होती. ते संदर्भ बदलले, की त्या मांडणीचं औचित्य कमी होतं. नव्या संदर्भाशी सुसंगत मांडणी करणारी पुढची पिढी निर्माण झाली नाही तर पोथीनिष्ठा मूळ धरते, बळावते. परिणाम म्हणून आयडिऑलॉजीची गतिशीलता कमी होत जाते. मार्क्सवादाच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत; त्यांचा उल्लेख पहिल्या भागात आलेला आहेच. ही सर्व निरीक्षणे, समीक्षा, आक्षेप जमेला धरूनही आयडिऑलॉजीची आवश्यकता असतेच असते. का?
:: 4 ::
वैचारिक मांडणी, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, प्रचार, व्यवस्थेशी संघर्ष, रणनीतीची मांडणी व निष्ठुर अंमलबजावणी, सत्ता मिळवून मूळ उद्दिष्टांसाठी ती राबवण्यासाठी सत्तेवर पकड आणि उद्दिष्टे गाठून पुढल्या उद्दिष्टांची मांडणी हे कोणत्याही आयडिऑलॉजीच्या प्रवासामधले महत्त्वाचे टप्पे असतात. प्रचाराच्या पातळीवर प्रथम भाषा बदलायला सुरुवात होते. संघर्ष आणि रणनीतीच्या टप्प्यात आचरणाचे नियम बदलतात; काही वेळा त्यात कठोर लष्करी शिस्त येते व त्या प्रमाणात मतभिन्नतेला वाव मिळत नाही; विचारांचा संकोच झाल्यासारखा वाटतो. संघर्ष यशस्वी होऊन सत्ता मिळाली तर ती टिकवताना पुन्हा भाषा बदलते. आचरणाचे नियमही बदलतात. सत्ता ही एक स्वतंत्र व्यवस्था असते, तिचं स्वत:चं तर्कशास्त्रही असतं असं मानलं जातं. सत्ता टिकवून राबवण्यासाठी सत्ताधारी जे काही करतात वा करणं अपरिहार्य असतं, त्याची बरीवाईट चर्चा ज्यांना सत्तेत्त सहभाग मिळाला नाही, ते करू लागतात. हे दोनही गट एकाच आयडिऑलॉजीमधून येणं अपरिहार्य असतं, आरोग्यदायकही असतं ट्रॉटस्की आणि स्टालिन हा संघर्ष आवश्यकच होता; त्याचं उत्तर विचित्र निघालं तरीही आयडिऑलॉजी मानणाऱ्यांमध्ये असा अंतर्विरोध असणं हा तिचा पराभव नसतो.
विचार एकदा प्रचाराच्या टप्प्यात गेला की त्यात काव्य शिरायला सुरुवात होते, अतिशयोक्तीचा रोग जडतो. नेतृत्वाचं दैवतीकरण सुरू होतं, प्रचारकांची एक प्रकारे अशक्य अवास्तव मांडणी करण्याची स्पर्धाच सुरू होते. भविष्याचं अतिशय भव्य, उदात्त, स्वप्नसदृश चित्र उभं केलं जातं. एवढा एक संघर्ष यशस्वी केला की आदर्श समाजव्यवस्था निर्माण होण्याची हमी दिली जाते तोपर्यंत पुढचा संघर्ष दिसू लागलेला असतोच. आयडिऑलॉजी ही जादूची कांडी नाही. तो निश्चित मुक्कामावर पोचणारा पण दीर्घ मुदतीचा प्रवास आहे याचं भान सुटल्यानंतर आयडिऑलॉजीकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्याची सवय ज्यांचं परिवर्तन व्हायचं त्यांना लागते व त्या प्रमाणात नैराश्य, वैफल्य, हतबलता या वृत्ती वाढीला लागतात. हा दोषही आयडिऑलॉजीचा नसून प्रचारशैलीचा असतो, कारण परस्परविरोधी आयडिऑलॉजीची प्रचारशैली सारखीच असते. खुली अर्थव्यवस्था ही भारतीयांच्या कोटकल्याणासाठी आली आहे. हा एक पक्ष असतो, तर या अर्थव्यवस्थेत भारत उद्ध्वस्त होऊन पुन्हा एकदा गुलामगिरीच्या बेड्यांत अडकणार आहे हा दुसरा. हे पक्ष त्या व्यवस्थेला अभिप्रेत नसतात.
भांडवलशाही आणि मार्क्सवाद याच दोन आयडिऑलॉजी आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्हीकडच्या व्यक्ती, त्यांचे गुणदोष, शैली, सत्ता राबवण्यातले गुणदोष यांच्या चर्चेवर अतिरिक्त भर दिला जातो. त्यांचं दैवतीकरण किंवा मूर्तिभंजन करणं यालाच त्या आयडिऑलॉजीचं परिशीलन म्हटलं जातं. या दुष्टचक्रातून आयडिऑलॉजीची सुटका करणंही आवश्यक आहे. एकूण मानवी मन व्यक्तिपूजक असतं व त्यामुळे हे घडणं साहजिक आहे, अशी पळवाट काढण्यापेक्षा विचार लोकभाषेतून मांडण्यासाठी प्रवक्त्यांनी स्वत:च्या स्वभावात, शैलीत बदल घडवणं जास्त योग्य ठरेल. कदाचित असंही घडेल, की भांडवलशाही व समाजवाद हे एकमेकांचे thesis and anti thesis असण्याची अवस्था राहणार नाही. पण लोक असतील, त्यांचे प्रश्न असतील. विषमता असेल. सौख्य कमी असेल, वंचितावस्था अधिक असेल. असंतोषाची आग धुमसत असेल. तिचे वेडेवाकडे उद्रेक होण्यापेक्षा 21 व्या शतकाची नवी आयडिऑलॉजी मांडण्याची गरज ओळखून त्या कामाला लागलं पाहिजे; आयडिऑलॉजीचं युग संपलेलं नाही तिला परस्पर रिटायर करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
चाऊ-एन-लाय यांना कुणी एक प्रश्न विचारला, 'फ्रेंच राज्यक्रांतीचा जगाच्या इतिहासावर काय प्रभाव पडला?' चाऊ स्वत: आयडिऑलॉजीच्या सर्व अवस्थांमधून तावून सुलाखून निघालेले. ते म्हणाले, 'आता कुठे दोनशे वर्षे झालीत फ्रेंच राज्यक्रांतीला! जगाच्या इतिहासावर काय प्रभाव पडला हे एवढ्यात कसं सांगता येईल?' फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच परिवर्तनाचं शास्त्र म्हणून आयडिऑलॉजीची संकल्पना जन्माला आली, तिचंही तसंच आहे, आणि तिला तर अजून दोनशे वर्षही व्हायची आहेत.
(इंग्रजी पत्रकारितेत दशकभर वावरल्यानंतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बनलेल्या विनय हर्डीकर यांची जनांचा प्रवाहो चालिला', 'श्रद्धांजली', 'विठोबाची आंगी' व 'कारुण्योपनिषद' ही चार मराठी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.)
Tags: रणनीती व्यवस्थेशी संघर्ष प्रचार कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण वैचारिक मांडणी गांधीवाद फॅसिझम लोकशाही समाजवाद अर्थव्यवस्था 'लेनिनवाद' 'मार्क्सवाद हस्तगत साधनसामग्री आयडिऑलॉजी 'एन्ड ऑफ आयडिऑलॉजी' साम्यवादी अमेरिकन राजकीय weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या