डिजिटल अर्काईव्ह

मला सतत जाणवत राहिलं की, आयडिऑलॉजी नसेल तर मांडणी बाळबोध तरी राहते किंवा बटबटीत तरी होते. त्यामुळे स्वामी उपरोध करायला जायचे, त्या वेळेला तो बटबटीत व्हायचा. आणि काही मूलभूत मांडणी करायला जायचे, त्या वेळी ती इतकी बाळबोध राहायची की, त्या मांडणीचा प्रभाव पडायचा नाही; त्यांच्या तळमळीचा पडायचा. पण ही तळमळ आणि बोलण्याची पद्धत, बोलण्यातली नम्रता या सगळ्यावरती स्वामींनी आयुष्यभर आपलं काम उभं केलं. 

1

स्वामी अग्निवेश हे एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होतं. ते संन्यासी होते, आर्यसमाजी होते, वेठबिगार कामगारांच्या सुटकेसाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते होते. सुमारे पावणेदोन लाख वेठबिगार मजुरांना त्यांनी बंधनातून सोडवलं होतं. माध्यमांतून अधून-मधून कुठल्या ना कुठल्या वादविषयामध्ये स्वामींचं नाव येत असे. आजकालच्या भाषेत ज्याला 'news savvy' म्हणता येईल, असा स्वामींचा स्वभाव होता. वयाची तिशी उलटायच्या आधीच त्यांनी आर्य समाजाची दीक्षा व संन्यास घेतलेला होता आणि तिथून पुढे 50 वर्षं ते भगव्या वस्त्रांमध्येच होते, म्हणून त्यांचं नाव अग्निवेश. आणखीही दोन ‘वेश’ त्यांच्याबरोबर आम्हाला भेटले होते : शक्तिवेश आणि इंद्रवेश. संन्यास घेतल्यामुळे ज्यांचं मूळ नाव रद्द झालेलं आहे अशा संन्याशांतही अमुक वेश, तमुक वेश अशी नावं असणाऱ्यांचा जास्त ‘रुतबा’ आर्य समाजाच्या वर्तुळामध्ये असायचा. 

स्वामींशी माझी भेट पहिल्यांदा झाली 1982 मध्ये. इंडियन एक्स्प्रेसमध्ये मी नुकताच लागलेलो होतो. इंडियन एक्सप्रेसचं काम 81-82 मधला एक मोठा संप संपून पुन्हा नव्या जोमाने सुरू झालेलं होतं. मुंबईचे संपादक श्री.हिरण्मय कार्लेकर (मराठी आडनावाचा बंगाली माणूस) यांच्याकडे माझी स्वामींशी पहिल्यांदा भेट झाली. एक्स्प्रेस टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर एका कोपऱ्यात हिरण्मयचं केबिन होतं. पुण्याहून मी तिथे पोचलो, तर तो एका व्यक्तीशी बोलत होता. गव्हाळ वर्ण, पाणीदार डोळे, भगवी पगडी बांधलेली, भगवी लुंगी आणि भगवा अंगरखा, रुमालसुद्धा भगवा, नखशिखान्त रंग! त्या वेळेला डोळ्याला नियमित चष्मा नव्हता, त्यामुळे डोळ्यांतील तेज आणि पगडी बांधली असली तरी धारदार नाक व भव्य कपाळ यामुळे स्वामींची एकदम छाप पडायची. मी ज्ञानप्रबोधिनी वर्तुळातला असल्यामुळे अशा पोशाखातले विवेकानंदांचे अनेक (black and white) फोटो आणि पुतळे पाहिलेले होते. पण विवेकानंदांच्या डोळ्यांत जी एक धार होती, तशी स्वामींच्या डोळ्यांमध्ये नव्हती. 

हिरण्मयने मला सांगितलं, "This is Swami Agnivesh and he is champion of the bonded labour." खरं सांगायचं तर ‘बॉन्डेड लेबर’ म्हणजे काय, हेसुद्धा एकदम माझ्या लक्षात आलं नाही. कारण वेठबिगार कामगारांसारखेही समाजाचे काही गट असतात याची जाणीवच तेव्हा नव्हती. तोपर्यंतच्या माझ्या लोकशाही राष्ट्रवादामध्ये समाजाच्या अगदी तळाशी असणाऱ्या माणसांपर्यंत मी पोचलेलोच नव्हतो. हिरण्मयने सांगितलं की, यांनी गेल्याच वर्षी एक संघटना सुरू केली आहे. तिचं नाव ‘बंधुआ मुक्ती मोर्चा’. ‘मुक्ती मोर्चा’ हे शब्द नंतर हिंदीभाषक पट्‌ट्यात अनेक प्रकारच्या चळवळी आणि संस्था यांच्यासाठी वापरले गेले. ‘भारत मुक्ती मोर्चा’ अशी एक संघटना असावी, असं नंतर काही वर्षांनी मीही सुचवलेलं होतं. ‘बॉन्डेड’ किंवा ‘बंधुआ’ म्हणजे वेठबिगारीत अडकलेला समाजातील तळाचा गट हे तेव्हा माहीत नव्हतं. आमच्यासाठी बंधू म्हणजे ‘तुम्ही-आम्ही सकल हिंदू बंधू-बंधू’ एवढ्यापुरतंच. त्यामुळे स्वामी नेमकं काय काम करतात, हे त्यावेळेला कळलं नाही. स्वामी गेल्यानंतर हिरण्मयशी बोलणं झालं, तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. हिरण्मयला एक चांगली सवय होती की, आपल्या सगळ्या मित्रांची एकमेकांशी मैत्री व्हावी म्हणून तो प्रत्येकाबद्दलच दुसऱ्याला अतिशयोक्तीपूर्ण सांगायचा. त्याप्रमाणे त्याने माझी ओळख करून दिली. ‘जनांचा प्रवाहो’ आणि त्यामुळे मला ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये मिळालेली नोकरी वगैरे त्याने स्वामींना सांगितलं. त्यामुळे मी स्वामींच्या लक्षात राहिलो असेन. 

पुण्याला परत आलो आणि शरद जोशींची भेट झाली; तेव्हा मी त्यांना सांगितलं की, अशी-अशी एक गमतीदार आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मीही ऐकून आहे त्यांच्याबद्दल. आणि पुन्हा दिल्लीला गेलो की, कदाचित मी त्यांना भेटणार आहे. त्या वेळेला बघू या काय होतं.’’ पण तेव्हाही शेतकरी संघटनेचा स्वतःचा विचार स्पष्ट होता. ‘बॉन्डेड लिबरेशन फ्रंट’मध्ये आम्हाला कधीच रस नव्हता. पुढे स्वामी आणि आम्ही जरी 15 वर्षं एकत्र काम केलं, तरी स्वामींनी शेतकरी संघटनेमध्ये जेवढा रस दाखवला तेवढा आम्ही बॉन्डेड लिबरेशन फ्रंटमध्ये दाखवला नाही, हे मोकळेपणाने सांगितलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात शरद जोशींच्या पहिल्या वाक्यापासूनच झाली. शरद जोशींनी स्वामींना पहिल्यांदा पाहिलं आणि ते मला म्हणाले, ‘‘ते वेठबिगार वगैरे राहू दे पण तो स्वामी आपल्याला मिळाला तर हवा आहे.’’ स्वामींच्या व्यक्तिमत्त्वामुळे तेही इतके प्रभावित झालेले होते. हे साधारण 1983 मध्ये. 

आणीबाणीनंतरच्या दहा वर्षांतला हा माहोल होता. आणीबाणीमध्ये आम्ही जो राजकीय सत्ताबदल करून दाखवलेला होता, त्याने समाजापुढचे प्रश्न सुटले तर नव्हतेच, उलट आणखीच गुंतागुंतीचे झाले होते. त्यामुळे चळवळींतली-आंदोलनांतली माणसं अशा भूमिकेवर यायला सुरुवात झाली होती की, प्रत्यक्ष राजकारणात न जाता, राजकारणाबाहेर राहून राजकीय व्यवस्थेवर दबाव आणि प्रभाव टाकता येईल, अशा प्रकारचं काम करायला हवं. आपली भूमिका राजकीय मोक्याच्या क्षणी —उदाहरणार्थ, निवडणुकांच्या वेळेला— जाहीर करायची. तोपर्यंत सगळे राजकीय पक्ष आपले मित्र आहेत किंवा सगळे राजकीय पक्ष आपले शत्रू आहेत. जनता पक्षाचा फियास्को 1983-84 मध्ये होऊन इंदिरा गांधींची हत्या होईपर्यंतच्या मधल्या काळात या प्रकारची विचारसरणी पुन्हा एकदा मूळ धरायला लागली होती. कारण 1977 मध्ये. 

आणीबाणीनंतर ज्या निवडणुका जाहीर झाल्या, त्या वेळी एरवी राजकारणापासून लांब असलेले लोकसुद्धा (स्वयंसेवी संस्था, लहान-मोठे गट, चळवळी) निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले होते. पण निवडणुकीनंतर त्यातल्या प्रत्येकाची स्वतःची स्वप्नं तर सोडूनच द्या; पण खुद्द जनता पार्टीला जे काम करायचं होतं असं जनता पार्टीचे नेते म्हणत होते, तेही झालं नाही म्हटल्यावर राजकीय मार्गाबद्दलची साशंकता देशभरच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. त्यातूनच असं ठरलं की, आपण अ-राजकीय संघटनांची मोट बांधायची. त्यामध्ये शेतकरी संघटना, सुरेंद्रमोहन यांच्या ट्रेड युनियन्स, व्यक्ती म्हणून अरुण शौरी, आसाम गण परिषदचे कार्यकर्ते, उत्तराखंड आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते असे आम्ही सगळी मिळून 15-16 माणसं होतो. स्वामीही बंधुआ मुक्ती मोर्चातर्फे आलेले होते. तिथे त्यांचा जास्त परिचय झाला. 

बंधुआ मुक्ती मोर्चा हा राजकीय पक्ष तर नव्हताच, पण ते आंदोलनही नव्हतं. ती मुळात न्यायालयीन लढाई असायची. पण न्यायालयीन पातळीला जाण्याआधीच एखाद्या माणसाने आपल्याजवळचे कामगार सामोपचाराने मुक्त केले, तर तिथे कोर्टात जाण्याचीही गरज नसायची. त्यामुळे राजकारणाशी त्यांचा संबंध जवळजवळ नव्हताच. त्यांची मागणीही अशी होती की, तिला कुणी विरोध करायचंही कारण नव्हतं. वेठबिगारी ही अन्यायकारक प्रथा आहे, हे कुणाला पटवून द्यायची गरज पडत नसे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अ-राजकीय संघटना तेवढीच होती. बाकीचे आम्ही सगळे कुठल्या ना कुठल्या राजकीय धोरणाशी लढत होतो. स्वामींची लढाई राजकीय धोरणाशी नव्हती, तर कायद्याने केलेल्या तरतुदी राबवून घेणं आणि लोकांची सुटका करून घेणं- असं त्यांचं काम होतं. दोन किंवा तीन दिवस ती बैठक चालली. तिथे स्वामींच्या कामाची पद्धत, त्यांचा उत्साह, हिंदी व इंग्लिश अशा दोन्ही भाषांवरचं त्यांचं प्रभुत्व आणि बैठकीतलं तारतम्य हे सगळं जवळून पाहता आलं. त्या वेळेला त्यांचं वय पस्तिशीच्या आतच असेल. 

कुठल्याही बैठकीत चर्चा गोल-गोल फिरायला लागली किंवा एकच भूमिका पुन:पुन्हा मांडली जाते आहे असं वाटलं किंवा चर्चेत दोन व्यक्ती एकदम चिरडीला गेल्या, तर मधे पडावं लागतं. त्याशिवाय चर्चेसाठी आलेल्या प्रत्येक माणसाची गुणवत्ता ओळखून त्याला दाद द्यावी लागते. अशा मोक्याच्या क्षणी स्वामी उत्साहाने पुढे असायचे. याचं एक उदाहरण सांगतो. त्या काळात शरद जोशींचं हिंदीवर प्रभुत्व नव्हतं. म्हणजे अगदी मुंबई-पुणे छापाचं हिंदी ते बोलत नव्हते, त्यांना बऱ्यापैकी हिंदी अवगत झालेलं होतं. त्याच्या आधी त्यांना हिंदी भाषणांची सवय होती ती पंजाबमधली. पंजाबी लोक पंजाबी सोडून इतर कुठल्याही भाषेची अशी काही वाट लावतात की, त्यामुळे शरद जोशींचं हिंदी तिथे धकून गेलं. पण इथे हे सगळे हिंदीभाषक प्रदेशांतले लोक समोर असल्यामुळे शरद जोशी थोडे सावकाश व चाचरत बोलत आहेत, असं अरुण शौरीला वाटलं आणि अरुण त्यांना म्हणाला की, You can speak in English, if you are more comfortable. 

शरद जोशींनी पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि इंग्लिशमधून तोफा डागायला सुरुवात केली. तेव्हा तिथेच स्वामी अरुणला म्हणाले, ‘‘अरुणजी, आपने ये क्या किया? इतनी अच्छी हिंदी बोलनेवाले को आपने अंग्रेजीमें बोलने को क्यूं कहा?’’ अरुण म्हणाला, "I did not know." अर्थात स्वामींनाही माहीत होतं की, शरद जोशींचं हिंदी काही फार चुस्त आणि प्रवाही नाही; परंतु त्यांचा तो गंड घालवला पाहिजे, अशा धोरणाने त्यांनी हस्तक्षेप केला. तिथून पुढे अगदी महत्त्वाची सैद्धांतिक चर्चा सोडली तर शरद जोशी, स्वामी आणि मी- आमचं सगळ्यांचं एकमेकांतलं बोलणं हिंदीतच होत असे. स्वामींचं स्वतःचं इंग्रजी उत्तम असलं तरी हिंदीतून जास्त व्यवहार झाला पाहिजे, असं त्यांना वाटत असे. अर्थात अशी भूमिका व्यासपीठावरून त्यांनी कधी घेतली नाही. 

पुढे त्या बैठकीत असं ठरलं की, आपापल्या भागातल्या इतर संघटना शोधून काढायच्या आणि त्यांना या सूत्रामध्ये ओढायचं. पुढली निवडणूक 1984 च्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अपेक्षित होती. बैठक झाली होती जुलैमध्ये. तीन महिन्यांत नवा राजकीय पर्याय नाही तरी निदान सध्या राजकारणात नसलेल्या, पण ज्यांची ताकद राजकारणात वापरता येईल अशा संघटनांची एक नॅशनल फ्रंट उभी करायची आणि त्याचे निमंत्रक म्हणून अरुण शौरी, स्वामी अग्निवेश व विनय हर्डीकर हे काम करतील, असं ठरलं. मात्र पुढे 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधींची हत्या झाली आणि या सगळ्या कामावरती बोळा फिरवण्याचं काम त्यांच्या मारेकऱ्यांनी केलं. त्या निवडणुकीला काही अर्थच राहिला नाही. इंदिरा गांधींना श्रद्धांजली म्हणून जो येईल त्याने (माझ्यासकट) काँग्रेसला मत दिलं! पण तो एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न होता. 

ही लोकसभेची निवडणूक 1984 च्या डिसेंबरच्या शेवटी झाली. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली नवं सरकार आलं आणि लगेचच फेब्रुवारीत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यायची होती. ‘युध्द हरलं, पण लढाई जिंकता येते का बघू या’ असा विचार आम्हा सगळ्यांच्या मनात होता. म्हणून शरद जोशींनी असं ठरवलं की, इंदिरा काँग्रेसच्या बाजूने असलेली ही सहानुभूतीची लाट जर परतवून लावायची असेल, तर आपल्याला इंदिरा काँग्रेस सोडून इतर सगळ्या राजकीय पक्षांची एकत्र फळी बांधायचे प्रयत्न केले पाहिजेत. 

इथे एक सैद्धांतिक मुद्दा असा होता की, इतर सगळ्या राजकीय पक्षांनी तुमचं का ऐकावं? तुम्ही तर राजकारणात नाही आणि शरद जोशी तर राजकारणाविषयी नेहमी टोकाला जाऊनच बोलायचे. ‘मी कधी मतं मागायला आलो तर मला जोड्याने मारा’ हे त्यांचं फार आवडतं वाक्य होतं. दुसरं आवडतं वाक्य ‘प्रत्येकाने शेतकरी संघटनेत येताना आपल्या राजकीय पक्षांचे जोडे बाहेर काढून ठेवावेत.’ (पुढे मी त्यांना सांगितलं की, या भानगडीत अनेक वेळा माझे नवे जोडे चोरीला गेले आणि पायांत जुनेच जोडे घालून मला घरी जावं लागलं) तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही अभ्यास केलेला आहे, राजकीय गणित तुम्ही कागदावर बरोबर मांडू शकता. आणि सगळे एकत्र आले, तर सहानुभूतीच्या लाटेतही इंदिरा काँग्रेसचा पराभव अशक्य नाही; निदान झुंज देता येईल. हे सगळं खरं असलं, तरीही आधीपासूनच राजकारणातच असलेल्या लोकांनी तुमचं का ऐकावं? मात्र त्या वेळी असं दिसलं की, काँग्रेसेतर सगळेच पक्ष इतके हतबुद्ध आणि हतबल झालेले होते की, ते कुणाचंही ऐकायला तयार होते. कसंही करा, पण आम्हाला निवडून आणून दाखवा! 

त्या काळात शेतकरी संघटनेचे लोक तर राजकीय उमेदवाराबद्दल (अर्थात, व्यक्तिशः नव्हे) काय वाट्टेल ते बोलायचे. कारण शरद जोशींनीच अशी वाक्यं पेरून ठेवलेली होती. या निवडणुकीत घोडा एकही नाही, सगळीच गाढवंच  आहेत. आपल्याला ‘सोईस्कर गाढव’ निवडायचं आहे (आणि ‘सोईस्कर गाढवं’च नंतर गैरसोईची ठरली, असा पुढला इतिहास आहे) राजकारणाबाहेर राहून आम्ही राजकारणाचा अधिक्षेप करत होतो आणि राजकारणात हस्तक्षेपही करत होतो, असा तो एकंदर माहोल होता. आम्ही अशी भूमिका ठरवली की, महाराष्ट्रापुरतं तरी पुन्हा एकदा बिगर इंदिरा काँग्रेस पक्षांना एकत्र करायचं. त्यांना सांगायचं की, तुम्ही एकत्र आलात तर आम्ही तुमचं काम करू; आम्हाला यातून दुसरं काही मिळवायचं नाही. खरं म्हणजे, त्या वेळेला असे 40 मतदारसंघ अनुकूल होते. आपल्याला आश्चर्य वाटेल, एकाच वेळी शरद जोशींनी दिल्लीत 40 हा आकडा सांगितला, शरद पवारांनी मुंबईत 40 हा आकडा सांगितला आणि पुण्यामध्ये विद्यापीठात गप्पा मारताना मीही तोच आकडा सांगितला होता. म्हणजे, तिघांचंही परिस्थितीचं रीडिंग बरोबर होतं की, 288 मधल्या 40 मतदारसंघांत तरी शेतकरी संघटना काय भूमिका घेते, याला निर्णायक महत्त्व होतं. त्यामुळे माझ्यासारख्याचं म्हणणं होतं की, 40 पैकी निदान 20 मतदारसंघ आपण मागून घ्यावेत. पण त्या वेळी शरद जोशींना थेट राजकारणात उतरण्याइतका आत्मविश्वास नव्हता किंवा इतके उपयुक्ततावादी ते झालेले नव्हते की, कसंही करू आणि पाच-दहा माणसं विधानसभेमध्ये पाठवू. 

ही सगळी भूमिका मांडण्यासाठी त्या वेळेला धुळ्याला शेतकरी संघटनेचं अधिवेशन बोलावलं होतं. तिथे एक सेशन असा होता की, ‘सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तिथे आपापली भूमिका मांडतील. पण भूमिका म्हणजे राजकीय भूमिका नाही’; ‘शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव’ या एकाच मुद्यावर सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी बोलायचं. आणि त्यानंतरचा दुसरा सेशन नॉन-पोलिटिकल फ्रंटच्या लोकांना दिलेला होता. त्यात स्वामीजी बोलणार होते. मला आठवतंय, त्या सेशनमध्ये प्रमोद महाजनचं भाषण साफ आपटलं होतं. कारण त्या भाषणात काही अभ्यासच नव्हता. ‘माझा शेतकरी जेव्हा एक एकर जमीन नांगरतो, तेव्हा तो चालतो सात किलोमीटर आणि या शेतकऱ्याला भेटायला आमचा मंत्री येतो तेव्हा त्याला लागतं हेलिकॉप्टर’ असल्या त्याच्या कोट्या, विनोद यांना आमचे लोक अजिबातच बधले नाहीत. कारण त्यांना शरद जोशींच्या बुद्धिमान, धगधगीत अर्थशास्त्राच्या मांडणीची सवय झाली होती. तो सेशन साफ आपटला. अधिवेशनातल्या प्रत्येक भाषणाचे मुद्दे काढून ‘शेतकरी संघटक’मध्ये छापायचे होते. त्यासाठी आम्ही रिपोर्ट लिहीत होतो, प्रमोदच्या भाषणाचं काय करायचं? तिथे आम्ही चक्क लिहिलं होतं, ‘मुद्दे नाहीत’. एवढ्या दोन शब्दांत आम्ही प्रमोदची संभावना केली होती आणि त्याबद्दल नंतर मी प्रमोदच्या पुष्कळ शिव्याही खाल्ल्या होत्या. 

दुसऱ्या सेशनमध्ये मात्र स्वामींचं भाषण सगळ्यात प्रभावी झालं. नाही तर तो दिवस वाया गेल्यासारखाच होता. उत्तम व्यक्तिमत्त्व, उत्तम हिंदी, भाषेचा ओघ, no playing to the gallery. आपण संन्यासी आहोत, आपला वेष विशिष्ट आहे; त्याच्यामुळे लोकांच्या मनात विशिष्ट प्रकारचं इम्प्रेशन तयार होतं, हे सगळं लक्षात ठेवून संथ लयीतल्या ख्याल गायकीसारखी सुरुवात करत स्वामी जवळजवळ तासभर बोलले. आणि समोर त्याचा प्रचंड प्रभाव दिसत होता. ‘हा स्वामी आपल्याला पाहिजे’ असं शरद जोशी ज्याकरता म्हणाले होते, ते स्वामींनी शब्दशः खरं करून दाखवलं. त्या अधिवेशनात तरी शरद जोशींच्या खालोखाल प्रभाव पडला होता तो स्वामी अग्निवेशांचा. मात्र स्वामींच्या भाषणाचा रिपोर्ट जर मला लिहावा लागला असता, तर तिथेही प्रमोदच्या भाषणासारखंच ‘मुद्दे नाहीत’ असंच लिहावं लागलं असतं. मग काय होतं त्यांच्या भाषणात? स्वामींना एक फायदा व्यक्तिमत्त्वाचा होता, दुसरा वेशाचा आणि तिसरा नावाचा होता. आर्य समाज काय आहे, हे महाराष्ट्राच्या त्या भागात तरी कुणाला माहीत नव्हतं. महाराष्ट्रात जी आर्य समाजाची छोटी-मोठी कामं आहेत, ती मराठवाड्यात. निजाम स्टेटमध्ये 19 व्या शतकात मराठवाड्यात आर्य समाजाची बऱ्यापैकी युनिट्‌स उभी राहिलेली होती. पण स्वामींचा त्यांच्याशीही काही धागा नव्हता. धुळ्याला अधिवेशन असल्यामुळे सगळी गर्दी स्थानिक होती. 

त्यांचा प्रभाव पडण्याची काही कारणं माझ्या लक्षात आली. पहिलं कारण म्हणजे- तळमळ; दुसरं- गंभीरपणे बोलायचं, थिल्लरपणे बोलायचं नाही, पाचकळ कोट्या अजिबात करायच्या नाहीत. आणि तिसरं- अपिलिंग टोन. काही गायकांचे सूर जसे तुम्हाला सुरुवातीपासूनच दूर ढकलल्यासारखे करतात, उलट काहींचे ओढून घेतात; तसा स्वामींचा स्वर आत ओढून घेणारा होता. भाषणात काय होतं? तसं काहीच नव्हतं. आयडिऑलॉजी नसलेल्या परिवर्तनवाद्यांना भारतात भाषणं करणं फारच सोपं आहे,  कारण आपलं परंपरेचं गोडाऊन अन्यायांनी कायम गच्च भरलेलंच असतं. अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता, श्रीमंत-गरीब हे तर जगात सगळीकडेच असतं. पण भारतात त्याला चातुर्वर्ण्य आणि जातिसंस्थेचा भक्कम आधार आहे. तुम्ही कुठे जन्माला आलात याला जास्त महत्त्व आहे. (कर्ण म्हणो, ‘दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्‌’, पण ‘कुले जन्म’ आणि ‘पौरुष’ लोक एकत्रच बघतात) त्याशिवाय निरक्षरता, बेकारी, दारिद्य्र, अंधश्रद्धा हेही आहे. You name the injustice; you find it in India (in the past at least). त्यातलंच वेठबिगारीसारखी गुलामगिरीसदृश प्रथा हे टोक स्वामींनी धरून ठेवलेलं होतं.

भारतामध्ये अशा परिवर्तनासाठी उभं राहणं, त्यासाठी भाषणं करणं, लेख लिहिणं हे तसं अवघड नाही. त्यामुळे स्वामींच्या भाषणातही नवं काहीच नव्हतं. सतीप्रथा 1985 मध्ये बंद होऊन जवळपास 150 वर्षं झाली होती. विल्यम बेंटिकने सतीप्रथा बंदीचा कायदा 1829 मध्ये केलेला होता. तरीही स्वामी सतीबद्दल बोलतच होते. अस्पृश्यता कायद्याने बंद आणि प्रत्यक्षातही एकूण बोथट झाली होती, तरी स्वामी अस्पृश्यतेबद्दल बोलतच होते. स्त्रियांचं घरातलं शोषण हीसुद्धा जुनी समस्या आहे, पण तोही मुद्दा त्यांच्या भाषणात होता. जातिप्रथा हे तर तिचं लॉजिक समजावून न घेता कुणीही उठावं आणि धोपटावं, असं आपलं एक सामाजिक वैशिष्ट्य आहे. (अलीकडे नेमाडेंनी त्यांच्या लोकसत्तेच्या मुलाखतीत फार चांगलं म्हटलं आहे- मी जातिव्यवस्थेबद्दल बोलत होतो, जातीयतेबद्दल नाही. जातीयतेला माझाही विरोध आहे, असं त्यांनी म्हटलेलं नाही; पण त्यांना म्हणायचं असावं.) हे सगळं इतकं विस्ताराने सांगायचं कारण म्हणजे, हा इतका सगळा वैचारिक मतभेद कायम ठेवून पुढे 10-15 वर्षं आमचं कोलॅबरेशन होतं आणि ते पूर्णपणे एकतर्फी होतं. नेहमी ते आमच्या सभांना येत. इतक्या वर्षांच्या मैत्रीमध्ये एकदाच मी त्यांच्या एका सभेमध्ये बोललो होतो आणि त्या माझ्या पहिल्याच जाहीर हिंदी भाषणावरही स्वामींचा फीडबॅक तोच होता- ‘आप कितनी अच्छी हिंदी बोलते है!’ तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ते शरद जोशींसारखं मलाही उत्तेजन देत आहेत. आपल्याला आपल्या हिंदीवर अजून काम केलं पाहिजे. 

19 व्या शतकात बंगालमध्ये ‘ब्राह्मो समाज’ आणि पश्चिम भारतामध्ये ‘प्रार्थना समाज’ या धार्मिक परिवर्तनाच्या दोन चळवळी सुरू झाल्या. त्यांना प्रतिक्रिया म्हणून दोन संस्था उभ्या राहिल्या : एक- ‘रामकृष्ण मिशन’ आणि दुसरी- पंजाबमध्ये उभा राहिलेला ‘आर्य समाज’. आर्य समाज हे एक विचित्र रसायन होतं. काही बाबतींत ते अतिशय बुद्धिनिष्ठ अशा प्रकारची मांडणी करायचे आणि काही बाबतींत मात्र त्यांची मांडणी obscurest असे. अशा मांडणीचं लॉजिक इतरांना कधीही समजत नाही. ते विचारायचंही नसतं, जसं आहे तसंच ते स्वीकारायचं असतं. अशा दोन टोकांमध्ये स्वामी सापडलेले होते. दीक्षा घेताना याचा विचार त्यांनी केला होता की नाही, हा माझ्या मनातला प्रश्न कधीच सुटला नाही. दीक्षा का घेतली याचंही उत्तर त्यांनी कधी दिलं नाही. संन्याशाने स्वतःच्या भूतकाळाबद्दल कमीत कमी बोलायचं असतं. आहार आणि वर्तनाच्या नियमांसोबत स्वामी हेही पाळायचे. 

खूप टोकल्यानंतर स्वामींकडून मला वैयक्तिक माहिती एवढीच मिळाली की, हे मूळचे आंध्रमधले ब्राह्मण. यांचं बालपण भोपाळला मामाकडे गेलं. (तेही घरच्या गरिबीमुळे की आई-वडील निवर्तल्यामुळे, हे कधी कळलं नाही) स्वामी बायोलॉजीचे एमएस्सी होते. भोपाळच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि तिथे राहिल्यामुळे स्वामींचं हिंदी हैदराबादी वळणाचं झालं नाही आणि आर्य समाजी लोकांसारखं पंजाबी वळणाचंही झालं नाही. नर्मदेचं खोरं हा शुद्ध हिंदीचा प्रदेश आहे. त्या प्रदेशात स्वामींचं बालपण आणि तारुण्य गेल्यामुळे त्यांचं हिंदी स्वतंत्र आणि शुध्द होतं. त्याला कुठलाही इतर फ्लेवर नव्हता. पण आर्य समाजच का निवडला वगैरेविषयी त्यांनी विस्ताराने कधी सांगितलं नाही. ‘‘किसी कारण से वो हो गया. मुझे शुरूसे लगता था की, खुद के लिये मुझे नहीं जीना है. फिर आर्य समाजके कुछ लोग मिले. उनसे बाते हुई.’’ याच्यापेक्षा जास्त वैयक्तिक माहिती मिळाली नाही. एरवी स्वामी अत्यंत लॉजिकल आणि बुद्धिवादी होते; मग ते विवेकानंदांकडे का वळले नाहीत? त्यातल्या त्यात ज्यांनी रॅशनल पायावरती काही मांडणी केली आहे, असं गेल्या 100-125 वर्षांत भारतामध्ये कोणी असेल, तर ते विवेकानंद. पण विवेकानंदांचं नावही स्वामींनी फारसं कधी घेतल्याचं मला आठवत नाही. 

आम्हाला समाजवाद या शब्दाचा तिटकारा होता. पण मधल्या काळात मैत्री इतकी झाली होती की, तुम्ही नाही बोलवलं तरी स्वामी येणारच. मग काय करायचं? त्यामुळे  आमचा मोठा कार्यक्रम असला तर त्याला स्वामी अग्निवेश यायचे आणि त्यांचं धुळे अधिवेशनातलं तेच भाषण पुन्हा ऐकवायचे. स्वामींनी एकाच भाषणावर सगळं आयुष्य काढलं. अधून-मधून ते त्याला आधुनिक संदर्भ जोडत राहायचे. स्वामींचा ‘वैदिक समाजवाद’ हे तत्त्वज्ञान असू शकत नाही, असं आमचं मत असलं तरी स्वामींची त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि वक्तृत्वामुळे उपयुक्तता निर्विवाद होती. शरद जोशींचा प्रभाव जर कायम राहायचा असेल, तर त्या सेशनमध्ये किंवा अधिवेशनामध्ये त्यांना स्वतःला आणखी एक वैचारिक भाषण नको असायचं. हे ट्रेड सिक्रेट मला फार नंतर कळलं. सभेत मी जेव्हा काही वेगळी मांडणी करायचो, त्या वेळी कार्यकर्ते खूश व्हायचे आणि जोशीसाहेब अस्वस्थ व्हायचे. पण ते मुरब्बी होते, सीनिअर होते, संघटना तर त्यांनीच उभी केलेली होती. मग ते काय करायचे? He used to kick me upstairs! 

‘अशी मांडणी मी कित्येक वर्षांत ऐकलेली नव्हती’ अशी सुरुवात करायचे आणि म्हणायचे, ‘विनयने आपल्याला पुढचा रस्ता दाखवलेला आहे. त्याच्यावर मी जरा जास्त विचार करतो.’ तो विचार काही ते करायचे नाहीत, आणि तो विषयही पुन्हा चर्चेला येऊ द्यायचे नाहीत हा अनुभव तीन-चार वेळेला घेतल्यावर हे माझ्या लक्षात आलं. आता मला जर ते असं वागवत असतील, मग स्वामी तर बाहेरचेच. त्यांच्या भाषणावर शरद जोशी म्हणायचे, ‘‘चांगलं बोलले स्वामीजी! लोकांना किती आवडलं, ते तुम्ही पाहिलं का? स्वामींनंतर मी बोलायला उभा राहिलो, तेव्हा लोक असे काही स्पेलबाउंड झालेले होते. त्यामुळे माझं काम खूप सोपं झालं’’ वगैरे, वगैरे. 

स्वामीजी लोकांना हसवायचेसुद्धा. ‘जरा स्वयंपाक होतोय तोवर लोकांना हसवत ठेवा’ असं पुलंनी काही ठिकाणी विनोदाने म्हटलं आहे तसं हसवत नव्हे, पण स्वामींचे काही विनोद चांगले असायचे. ते म्हणायचे, ‘‘मी पुरुषांना विचारतो, सिर्फ औरत ने सती क्यों जाना है? उसको सरग मिलेगा. तुझे नहीं जाना क्या सरग में? फिर तेरी बीबी मर जाती है तो तू सता क्यूँ नही होता?’’ असे त्यांचे विनोद असायचे. पंचतारांकित हॉटेलांबद्दलचा त्यांचा एक आवडता दृष्टांत होता. जो पैसा गरिबांसाठी खर्च व्हायला  पाहिजे, तो कुठे खर्च होतो आहे? तर, 20 मंजिला इमारत बनायी. 20 वे मंजिल पर स्विमिंग टँक बनाया, वहाँ पर नीली टाइल्स लगायी, और फिर पानी उठाउठाकर इतने उपर ले के गये, पानी में भी खुशबू आये ऐसा इंतजाम किया; ताकि विलायत से गोरी मड्डम आयेगी और चड्डी पहनके कूदकूदके नहायेगी! स्वामींचा उपरोध या प्रकारचा असायचा. मला सतत जाणवत राहिलं की, आयडिऑलॉजी नसेल तर मांडणी बाळबोध तरी राहते किंवा बटबटीत तरी होते. त्यामुळे स्वामी उपरोध करायला जायचे, त्या वेळेला तो बटबटीत व्हायचा. आणि काही मूलभूत मांडणी करायला जायचे, त्या वेळी ती इतकी बाळबोध राहायची की, त्या मांडणीचा प्रभाव पडायचा नाही; त्यांच्या तळमळीचा पडायचा. पण ही तळमळ आणि बोलण्याची पद्धत, बोलण्यातली नम्रता या सगळ्यावरती स्वामींनी आयुष्यभर आपलं काम उभं केलं. 

काही वर्षांपूर्वी ज्याला नोबेल प्राईज मिळालं, तो कैलाश सत्यार्थी हा एके काळी स्वामींचा उजवा हात होता. त्याला नोबेल मिळाल्याची बातमी आली, तेव्हा मी पहिला फोन स्वामींना केला होता. He was moved and touched. ते म्हणाले, ‘‘आपने मुझे कैसे याद किया?’’ मी म्हटलं, ‘‘आप नहीं होते तो कैलाशजी नहीं होते, और मेरी कैलाशजी से पहचान तक नहीं होती.’’ त्यांना बरं वाटलं होतं. कारण स्वामींना त्यांचं क्रेडिट फार कुणी दिलेलं नव्हतं, त्यामुळे ते थोडे व्यथित होते. कैलाश सत्यार्थी आणि त्यांच्यामध्ये काय झालं, हे मला माहीत नाही. पण नंतर कैलाशने वेठबिगार मजुरांच्या मुलांसह इतर सगळ्याच निराधार मुलांसाठीचं काम स्वतः सुरू केलं आणि त्याच मार्गाने पुढे जात ते वाढवलं. एका विशिष्ट राजकीय क्षणी कैलाश सत्यार्थीला नोबेल ॲवॉर्ड मिळालं. स्वामींनाही त्याबद्दल वाईट वाटायचं काही कारण नव्हतंच. कारण नोबेलच्या तोडीचं समजलं जाणारं ‘राईट लाइव्हलीहूड ॲवॉर्ड’ त्यांनाही मिळालं होतं. 

शरद जोशी, मी आणि स्वामी अशा आमच्या चर्चांमध्ये एकदा असा मुद्दा निघाला की, कसं जमवायचं आपण? आम्ही एककलमी कार्यक्रम घेऊन चाललो आहोत, तुमचाही एककलमी कार्यक्रम आहे. शरद जोशी त्यांना म्हणाले, ‘‘जोपर्यंत शेतीची अवस्था अशी आहे, तोपर्यंत वेठबिगार मजूर तयार होणारच आहेत. वेठबिगारीची समस्या सामाजिक-सांस्कृतिक नाही, ती आर्थिक आहे.’’ आर्थिक शोषणाची सांस्कृतिक मीमांसा हा मोह अनेकांना सुटत नाही. आणि अगदी आपल्या जोतिराव फुल्यांपासून ही गल्लत केली जाते. वेठबिगारी, अस्पृश्यता, शोषण यांच्या मागचा मूळ प्रश्न आर्थिक आहे, हे अजूनही सगळ्यांना पटत नाही. अजूनही या समस्यांची सांस्कृतिक बाजू अगोदर सोडवली पाहिजे, असं अनेकांना वाटतं. शरद जोशी याला शरीरावरच्या फोडांची उपमा द्यायचे. त्यांनी स्वामींना सांगितलं, ‘‘शरीरावर जेव्हा अनेक फोड येतात, तेव्हा त्यातला एकेक फोड बरा करण्याचं काम तुम्ही करत आहात. त्याला आमची हरकत असण्याचं कारण नाही. पण शरीरातलं रक्त आणि रुधिराभिसरण बिघडल्यामुळे आलेले हे फोड आहेत. रक्त आणि रुधिराभिसरण सुधारेल, शरीराच्या सगळ्या भागांना रक्ताचा पुरवठा होईल, यासाठीची व्यवस्था केली पाहिजे. अशी अर्थव्यवस्था तयार व्हावी, यासाठीचं काम आम्ही करत आहोत. आपल्या दोघांच्या कामांमधला हा फरक लक्षात ठेवून आपल्याला एकत्र काम करायचं आहे.’’ 

आमच्या दृष्टीने हे सोईचं होतं. पण आमच्या बरोबरीने स्वामींचा काय फायदा झाला? खरं म्हणजे काहीच फायदा झाला नाही. स्वामी आमच्या कार्यक्रमाला यायचे, तेव्हा मराठवाड्यातले आर्य समाजाचे किरकोळ कार्यकर्ते त्यांना भेटायला यायचे आणि ते ओशाळल्यासारखे लांब उभे असायचे. त्या काळात उत्तर भारतामध्ये ज्या पद्धतीची वेठबिगारी होती, तितकी महाराष्ट्रामध्ये नव्हती. आपल्याकडे 19 व्या शतकापासून सुधारणांची परंपरा आहे, त्यामुळे कुठल्याही सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या महाराष्ट्रामध्ये बोथट झालेल्या दिसतात. महाराष्ट्रात तर आर्य समाजाची आर्थिक ताकदही नाही. उत्तर भारतामध्ये आणि विशेषतः जिथे पंजाबी लोक आहेत, तिथे आर्य समाजामध्ये सधन लोक आहेत. कैलाश सत्यार्थीदेखील अशाच एका सुखवस्तू आर्यसमाजी घरातला आहे. ‘सत्यार्थप्रकाश’वरून काही लोकांनी सत्यार्थी हे आडनाव घेतलं, त्यांच्यापैकी ते लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये स्वामींना त्यांच्या कामासाठी कुणीच माणूस मिळाला नाही. खरं तर ठाण्यामध्ये विवेक पंडित वगैरे मंडळी तेच काम करत होती, पण शरद जोशींबरोबर स्वामी फिरतात म्हणून त्यांनी स्वामींना डावललं. आणि शरद जोशींच्या सभांना जेवढी माणसं जमतात तेवढी त्यांच्या सभांना जमत नाहीत, म्हणून स्वामीही तिकडे गेले नाहीत.  

संन्यासी असूनही स्वामींना तीन-चार मोह मात्र आवरता आले नाहीत. एक म्हणजे, भाषणाचा मोह. भाषण करायची त्यांना प्रचंड हौस होती. अगदी 100-150 लोकांच्या छोट्या समूहापासून 20-25 हजार किंवा त्याहून अधिक श्रोत्यांपुढे बोलावं, आपली भूमिका मांडावी- हा मोह त्यांना आवरता येत नसे. आणि ते चांगलेच वक्ते असल्यामुळे त्यांना बोलायला दिलं तरी संयोजकांचं काहीच नुकसान व्हायचं नाही. लोकांना त्यांचं भाषण आवडायचंच. दुसरा मोह प्रसिद्धीचा होता. ‘पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी’ या परंपरेतले संन्यासी ते नव्हते, हे मोकळेपणाने सांगितलं पाहिजे. आणि वैराग्याचं मुख्य लक्षण म्हणून ‘चातुर्य लपवी, महत्त्व हारवी, पिसेपण मिरवी, आवडीने’ असंही ते वागत नव्हते. वागणं, राहणं, खाणं-पिणं अतिशय सुसंस्कृत, डिसेंट आणि आकर्षक होतं. 

प्रसिद्धीपायी मात्र स्वामी निरनिराळे स्टंट करायचे. एकदा त्यांनी दिल्लीतली रस्त्यावरची 25-30 पोरं गोळा केली. त्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसवलं. मुलांना सांगितलं की, इथे मोकळेपणाने वागा. कोणाला घाबरायचं नाही, मी आहे. हॉटेलमध्ये सगळी पळापळ झाली. स्वामी तिथे जाऊन म्हणाले की, आम्ही चहा प्यायला आलोय. व्यवस्थापनातले लोक तिथल्या कर्मचाऱ्यांना म्हणाले की, यांना लवकर चहा द्या. ही ब्याद एकदाची जाऊ दे. स्वामी त्यांना म्हणाले की, असं नाही चालणार. इथे आम्ही सगळे व्यवस्थित तुमच्या टेबलांवर बसणार आणि इतर गिऱ्हाइकांना जसा तुम्ही चहा देता तसा आम्हाला दिला पाहिजे. आम्ही चहा पिऊन, बिल देऊन जाऊ. नाही तर आम्ही पोलिसांना बोलावू. आणि माझ्यासकट सगळ्यांना अटक करायला आमची हरकत नाही. तोपर्यंत बातमी पसरली होती. स्वामींनीही आधी काही वार्ताहरांना सांगून ठेवलेलं होतं. त्यामुळे तिथे लोक गोळा झाले. स्वामी त्या पोरांसोबत चहा प्यायले आणि बाहेर चहाचा दर होता त्याप्रमाणे बिल देऊन ऐटीत बाहेर आले. 

प्रसिद्धीसाठी अशी प्रतीकं शोधायची, हा एक मोह त्यांना होता आणि त्याच्यापायी ते काही वेळेला गोत्यातही यायचे. ‘हरसूद’ हे नर्मदा प्रकल्पातील जिल्ह्याचं एक गाव. प्रकल्पात ते सबंध गाव बुडालं. मेधा पाटकर आणि मंडळींनी खूप प्रयत्न केले, पण ते गाव तलावाच्या अक्षरशः मध्यभागी येत होतं. विस्थापन करणं एवढाच उपाय होता. या सगळ्याचा निषेध म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाने हरसूदला एक शेवटचा मेळावा घ्यायचा आणि शेवटची आर्त किंकाळी फोडायचं ठरवलं! देशभरची माणसं जमणार तिथे स्वामीजी गेले नाहीत, असं होणारच नाही. राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये ही मजबुरी असतेच. पण स्वामींनी त्या मेळाव्यासाठी एक जबरदस्त प्रतीक शोधून काढलं. काही दिवसांपूर्वीच ते इंडोनेशियामध्ये जाऊन आले होते. (भारतातल्या दारिद्य्राबद्दल परदेशात जाऊन बोलणाऱ्या मंडळींमध्येही स्वामी बऱ्यापैकी सक्रिय होते.) इंडोनेशियालाही असंच एक आंदोलन चालू होतं. स्वामींनी तिथून एक पिशवी भरून माती आणली होती. ते हरसूदला जाण्याआधी आम्ही दिल्लीत भेटलो होतो, तेव्हा त्यांनी मला ती पिशवी मला दाखवली होती. ते म्हणाले, ‘‘ये मिट्टी लेकर मे हरसूद जाऊँगा. इंडोनेशिया की मिट्टी और भारत की मिट्टी मै वहाँ मिलाऊंगा और फिर एक इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग पैदा होगा.’’ 

पुढे स्वामी हे सगळं घेऊन दिल्लीहून निघाले. आणि त्या नादात त्यांनी ही चौकशी केलीच नाही की, आपण ज्या गाडीतून निघालो आहोत; ती हरसूदला थांबते की नाही! त्यांच्याकडे कुठल्या तरी राजधानी एक्स्प्रेसचं फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. हरसूद स्टेशन मागे राहिलं आणि तिथे गाडी थांबली नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा स्वामींनी गडबडीने साखळी ओढली. रेल्वेची साखळी ओढणं हा गुन्हा आहे. त्यातून ती राजधानी एक्स्प्रेस. राजधानी एक्स्प्रेसला प्रत्येक राज्यात एकच स्टॉप असतो आणि ज्या राज्यात ती जाणार असते तिथे जास्त स्टॉप असतात. मध्य प्रदेशचा स्टॉप भोपाळला होऊन गेला होता. एवढी वेगाने जाणारी गाडी साखळी ओढली म्हणून लगेच थोडीच थांबणार? पुढे 25-30 किलोमीटर जाऊन एका डफ्फड स्टेशनमध्ये गाडी उभी राहिली. गार्ड आणि मंडळी आली आणि त्यांनी विचारलं की, साखळी कुणी ओढली? स्वामी म्हणाले, ‘‘मैने खींची.’’ ते म्हणाले, ‘‘बाबा होकर ऐसी हरकते करते हो? दिखने में तो साधू लगते हो और चेनपुलिंग करते हो- वो भी राजधानी का? अब ये तो फौजदारी मामला हो गया!’’ डब्यातले लोक म्हणाले की, तुम्ही यांना उतरवून घ्या आणि काय करायचं ते करा, आमची गाडी सोडा. त्याप्रमाणे स्वामींना उतरवलं आणि गाडी पुढे गेली. 

ते अगदीच साधं स्टेशन होतं. स्टेशनमास्तरला तिथे भर मध्यरात्री स्वामींनी ‘इंडोनेशिया  की मिट्टी आणि भारत की मिट्टी’ इथपासूनची सगळी कहाणी ऐकवली. स्वामी त्याला म्हणाले, ‘‘किसी भी तरह मुझे वापीस हरसुद जाना है.’’ स्टेशनमास्टर गोंधळून गेला. ‘‘यांचं काय करायचं?’’ तो म्हणाला, ‘‘बाबाजी, यहां पर वेटिंग रूम वगैरा कुछ नहीं. बहुत छोटा स्टेशन है. कोई गाडी रुकती नहीं. कोई गुड्‌स ट्रेन भी नहीं है. वरना उसको मै सिग्नल देके रोकता. कल एक पॅसेंजर यहा रुकेगी, लेकिन वो दोपहर को बारा बजे आती है. रोड से जानेमें बहोत बडी दिक्कत है.’’ स्वामींनी त्याला सांगितलं की, दहा वाजता तर तिथे सभा सुरू व्हायची आहे. त्याने बराच विचार केला. तोवर यांच्या खाण्यापिण्याची सोय केली. आणि तो म्हणाला, ‘‘मेरे पास एक खराब इंजिन हैं. वो मे कल भेजनेवालाही था. लेकिन आज भेज देता हूं आपके लिये. लेकिन इसकी कोई गॅरंटी नहीं की, हरसूद तक आप पहुँचेंगे. अभी जाना है तो आपको वो खराब इंजिनमें ही जाना पडेगा. बीचमें तीन-चार छोटे स्टेशन आयेंगे. कोई through train आयेगी तो इंजिन साईड में जायेगा.’’ 

25-30 किलोमीटरच्या अंतरालाही चारेक तास लागणार होते. इंजिन ठीकठाक करून, ड्रायव्हरला उठवून निघेपर्यंत सकाळ झाली होती. आपण वेळेत पोचतो की नाही म्हणून स्वामींचा जीव वर-खाली होत होता. ते कोळशाचं इंजिन. त्याची वाफ, धूर, त्यात बाहेरचा उकाडा- हे सगळं सहन करत साडेनऊ-पावणेदहाला स्वामीजी हरसूदला पोचले. स्टेशनवर तोंड वगैरे खळबळून घेतलं. रिक्षा पकडली आणि गेले ते थेट व्यासपीठावर. इंडोनेशिया की मिट्टी और भारत की मिट्टी का मीलन हो रहा है. ये पुरी दुनियाभर के शोषित जनता की आवाज है... असाच्या असा हा किस्सा स्वामींनी मला सांगितला होता. म्हणजे तितकी अलिप्तताही त्यांना आलेली होती. पण म्हणून त्यांचं प्रतीकांचं प्रेम कमी झालं नव्हतं. 

आपल्याकडे अशा नेत्यांची संख्या फार मोठी आहे. काही तरी सुंदर प्रतीक ते शोधून काढतात आणि त्याच्यामागे आयुष्यभर धावत राहतात. टोकनिझममध्ये मूळ प्रश्न सुटणार नसतोच, पण त्यांना त्या काळापुरती त्याची नशा चढते. प्रतीकं शोधायची आणि कार्यकर्त्यांना त्याच्यामागे पळवत राहायचं. आपल्याकडचं असं फार मोठं नाव बाबा आमट्यांचं आहे. मी स्वतः बाबांच्या सहवासात अनेकदा राहिल्यामुळे मला माहीत आहे की, बाबा प्रतीकांची मांडणी करायचे त्या वेळी ती इतकी अद्‌भुत असायची की, आपण मूळ रस्ता सोडून भलतीकडे चाललो आहोत, हे आमच्या लक्षात तर यायचं नाहीच, पण बाबांच्याही ते लक्षात यायचं नाही. स्वामींमध्येही हा भाग मोठा होता. 

त्यांना कुठून तरी लोकसभेत किंवा राज्यसभेत जायचं होतं, हा तिसरा मोह त्यांना होता. त्यामुळे जे नेते जास्त लोक जमवतात, अशांना ते धरून असायचे. असे दोन नेते त्यांनी पकडले होते. एक शरद जोशी आणि दुसरा शंकर गुहा नियोगी. शरद जोशी असे बिलंदर होते की, बाहेरच्या माणसाला अशी समजूत करून द्यायचे की, एक ना एक दिवस शरद जोशी आपल्याला महाराष्ट्रातून कुठून तरी निवडणुकीचं तिकीट देतील. आपला खर्च आणि प्रचारसुद्धा तेच करतील. शरद जोशींच्या अशा बऱ्याच बळींचे डोळे पुसण्याचं काम मी केल्यामुळे मला ते माहीत आहे. पण तो माणूस जास्तच चिकटायला लागला की, शरद जोशी अंग काढून घ्यायचे. ते म्हणायचे, ‘मीच निवडून येईन की नाही ते मला सांगता यायचं नाही, तिथे तुमचं काय!’ स्वामींना मात्र अशी अभिलाषा होती की, एक ना एक दिन मै महाराष्ट्र से चुनाव लडूंगा. पण महाराष्ट्रात आमचीच अवस्था अतिशय वाईट होती, त्यामुळे ते काही झालं नाही. मग त्यांनी दुसरा प्रयोग केला. ते शंकर नियोगीकडे गेले आणि त्या मतदारसंघातून (झाबुआ किंवा दुर्ग?) त्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला. आणि अर्थातच ते हरले. त्यांनी हा उद्योग केल्याचं तोवर मला माहीत नव्हतं. नंतर आमची भेट झाली, तेव्हा स्वामींनी सगळी हकिगत सांगितली. 

पुढे माझी आणि नियोगीची भेट झाली. मी त्याला स्वामींबद्दल विचारलं, तेव्हा त्याच्या ‘बंगाली हिंदीत’ तो म्हणाला, ‘‘हमने स्वामी को नहीं बुलाया था. वो आया, चुनाव लढता बोला. हमने बोला, हम तो चुनावमे नहीं है. वो बोला, मै आपका कॅन्डिडेट बनकेही लढनेवाला हूँ. लेकिन इधर उनको कोई पहचानता नहीं. हमारा कार्यकर्ता लोग को भी ये आदमी मालूम नहीं. जो हुआ सो हो गया. नियोगीची काय परिस्थिती आहे ते न पाहता, अचानक उठून स्वामी तिथे गेलेले होते, हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर भोपाळमधून त्यांनी निवडणूक लढवून पाहिली. मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनाचा त्यांना पाठिंबा होता. पण तिथेही ते हरले. स्वामींच्या पद्धतीने आजच्या भारतात निवडणूक जिंकणं अशक्यच होतं. पण स्वामी पार्लमेंटमध्ये जायचा प्रयत्न पुन:पुन्हा  करत राहिले आणि त्यात अपयशी होत राहिले. 

हा मोह त्यांच्यामध्ये कुठून आला? स्वामी 1978 मध्ये चाळिशीच्या आसपास होते, तेव्हा देवीलालच्या जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात ते हरियाणाचे शिक्षणमंत्री होते. हरियाणाचं मंत्रिमंडळ काही पाच वर्षं पूर्ण करू शकलं नाही. तिथे चरणसिंहांनीच यांना बाहेर फेकलं. स्वामींनी मला सांगितलं की, लोकसभेमध्ये बोलता-बोलता ते समाजवादाची मांडणी करायला लागल्याबरोबर चरणसिंह उभे राहिले. त्यांना थांबवून त्यांच्या हातातून माईक घेतला आणि सगळ्यांना म्हणाले, ‘‘इस भोंदू बाबा की बातोमें मत आना. सोशॅलिझम का मतलब इतनाही है की, सरकार तुम्हारी जमीन, तुम्हारे बैल, तुम्हारा जोत, सब लेकर जायेगी और तुम्हे कुछ नहीं मिलेगा!’’ तेव्हापासून स्वामींनी चरणसिंहाशी भांडण घेतलं आणि कदाचित त्यामुळेच ते स्वतः समाजवादी असूनसुद्धा त्यांना उत्तर भारतातल्या कुठल्याही पक्षाने जवळ केलं नाही. त्यानंतर त्यांना कुठल्याही सभागृहात जायची संधी मिळाली नाही, याची कदाचित एक अतृप्ती होती. पण मुळात त्यांचं काम अल्पसंख्याकांचं. त्याला ठोस वैचारिक पाया काही नाही. त्यात सर्वहारा वर्गाच्या संघटनेकडे पैसा आणि बळ कितीसं असणार? तरीही स्वामी सतत प्रयत्न करत राहिले. 

2 

संन्यासी दोन प्रकारचे असतात. स्थिर संन्यासी- जे मठस्थापना, शिक्षणकार्य किंवा रुग्णसेवा वगैरे करतात. आणि परिव्राजक संन्यासी- ज्यांनी फिरत राहायचं असतं. त्यांच्यासाठी एका घरी दोनदा जेवायचं नाही, एका गावात दोन रात्रींचे मुक्काम करायचे नाहीत- असे काही पारंपरिक नियम आहेत. अग्निवेश मात्र दोन्ही प्रकारचे संन्यासी होते, हे मला त्यांच्या सहवासानंतर लक्षात आलं. जगभर फिरत असलेले परिव्राजक ते होतेच. भारतात आर्य समाजाचे जिथे जिथे कार्यक्रम-उपक्रम व्हायचे, तिथे त्यांना जावं लागत असे. पण स्वतःची संस्था काढल्यानंतर स्वामींना स्थिर होणंही भाग होतं. जनता पार्टीने निवडणुकीत घडवलेला पराक्रम जादू वाटावी असाच होता आणि त्यांच्या ऑफिसचा पत्ताही जंतरमंतर रोड. त्यामुळे आम्हाला त्या ऑफिसबद्दल कुतूहल होतं. एके काळच्या जनता पार्टीच्या राष्ट्रीय ऑफिसच्या त्या विस्तीर्ण बिल्डिंगच्या मागच्या बाजूचा, जवळपास चारशे स्क्वेअर फुटांचा एक मोठा गाळा स्वामींच्या ताब्यात होता. अर्थात ते सुरुवातीला जनता पक्षाचे कार्यकर्तेच होते. त्या गाळ्यामध्ये बाहेरच्या बाजूला बंधुआ मुक्ती मोर्चा आणि स्वामी अग्निवेशांचं ऑफिस, मधे त्यांची बैठकीची मोठी खोली, एका बाजूला छोटं स्वयंपाकघर आणि एक पोटमाळा होता. पोटमाळा ही स्वामींची खासगी खोली. 

त्या जागेत भरपूर वर्षं राहिलेले जे काही कार्यकर्ते होते, त्यांच्यामध्ये मी नक्कीच होतो. अनेक वर्षं दिल्लीला गेलो की मी त्याच जागी राहत असे. पुढे काही वर्षांनी स्वामींनी पाहुण्यांची व्यवस्था त्या जागेपासून स्वतंत्र केली. पण ते ठिकाण दिल्लीच्या त्या भागापासून 15-20 किलोमीटर लांब, कालका म्हणून इलाखा आहे तिथे होतं. स्वामींना संन्यासी धर्माचं काही कर्मकांड करताना आम्ही कधी पाहिलं नाही. झोपायची वेळ झाली की, ते पोटमाळ्यावरच्या त्यांच्या खोलीत जायचे. तिथे मी कधी कुतूहल म्हणूनही गेलो नाही. सकाळी ते खाली यायचे, तेव्हा त्यांची फक्त अंघोळ आणि स्वच्छता शिल्लक राहिलेली असायची. बहुधा पहाटे उठून ते त्यांची ध्यानधारणा, व्रतसाधना, जपजाप्य वगैरे (करत असले तर) करत असावेत. पण सकाळी उठल्यावर पूर्णपणे ताजेतवाने आणि त्या-त्या दिवसाचं काम करायला तयार, अशा मूडमध्येच मी स्वामींना कायम पाहिलेलं आहे. रात्री ते सहसा फार जागरण करत नसत. पण कार्यकर्ता संन्यासी असल्यामुळे सगळ्या भेटीगाठी आटपून झोपायला त्यांना उशीरच होत असे. मात्र आहार आणि निद्रा या दोन्हींवरती त्यांनी बऱ्यापैकी काबू मिळवलेला असावा. वीसेक वर्षं माझं तिथे जाणं-येणं होतं; पण त्या काळात मी त्यांना खूप थकलेलं, उदास किंवा जागरणाने अस्वस्थ असलेलं असं कधी पाहिलेलं नाही. 

बंधुआ मुक्ती मोर्चा, आर्य समाज यांच्याशिवाय आमच्यासारखे इतर सहोदर आंदोलनांतले कार्यकर्ते यांची तिथे अखंड रीघ चालू असायची. त्यामुळे स्वयंपाकघरात कायम दोन माणसं असायचीच. एक चहापाणी करण्यासाठी आणि दुसरा मुक्कामाला असणाऱ्यांच्या स्वयंपाकासाठी. जेवण अगदी स्वच्छ व साधं असायचं. डाळ, भात, एखादी भाजी, रोट्या आणि क्वचित एखादं फळ किंवा मिठाई. बाहेरच्या बाजूला असलेलं स्वच्छतागृह सगळेच जण वापरायचे. सात-आठ मुलं किरकोळ कामांसाठी तिथे कायम पडीक असायची. दिल्लीच्या सगळ्याच घरांमध्ये नेपाळी घरगडी ठेवायची पद्धत आहे. आपल्याकडे कोकणी  लोकांची अशी ख्याती आहे की, कोकणी माणूस एखादवेळेस मनापासून काम करणार नाही; पण तो चोऱ्यामाऱ्या करत नाही, अतिशय प्रामाणिक असतो. त्यामुळे 24 तास घरगडी ठेवायचा असेल, तर तो कोकणी असावा. तशी दिल्लीमध्ये नेपाळी मुलांची कीर्ती असते. (अर्थात सगळेच तसे नसतात, हे आरुषी हत्याकांडासारख्या घटना घडतात तेव्हा आपल्या लक्षात येतं.) 

अशी 15-16 वर्षांपासून 20-25 वयापर्यंतची चार-पाच नेपाळी मुलं स्वामींकडे कायम असायची. जेवणखाण, पडेल ते काम आणि (80 च्या दशकात) हातखर्चाला 25 रुपये एवढ्यावर ती मुलं तिथे राहायची. आम्ही सगळे उठायच्या आधी त्यांच्या अंघोळी वगैरे उरकलेल्या असायच्या. मी एकदा स्वामींना विचारलेलं होतं की, ‘ही मुलं इतक्या कमी पगारावर कशी काम करतात तुमच्याकडे?’ त्यावर ते म्हणाले की, ‘नाही तर ती उपाशी मरतील.’ नेपाळमध्ये कम्युनिटी फीलिंग फार स्ट्राँग असतं. एकाला कामाला ठेवलं की तो दुसऱ्याला आणतो, तो तिसऱ्याला... आणि आपसांत समझोता करून त्यांचा कारभार चालू राहतो, ते मालकाला तोशीस पडू देत नाहीत. 

ती पोरं एकापेक्षा एक भारी होती. मी स्वामींना त्यांचे ‘बॉन्डेड लेबर’ म्हणायचो. बऱ्याच वेळेला ती काही तरी घोटाळे करून ठेवायची आणि स्वामी वैतागून जायचे. या मुलांकडे स्वामींच्या पाहुण्यांची उठ-बस करणं, त्यांची सोय पाहणं असंही काम असायचं. स्वामींकडे येणारा प्रत्येक पाहुणा कोणी तरी महत्त्वाचाच माणूस आहे, त्यामुळे त्याच्याशी सन्मानाने वागलं पाहिजे- एवढी जाणीव मात्र या सगळ्या मुलांना होती. त्या सगळ्यांनाच स्वामी ‘बहादूर’ म्हणायचे. (हे विशेषण नाही, नेपाळी आडनाव आहे) स्वामींचे आणखी एक स्पष्टवक्ते कार्यकर्ते होते. स्वामी त्यांना प्रोफेसरसाब म्हणायचे. स्वामींकडे त्या वेळेला महिंद्राची आरमाडा नावाची जीप होती. ती चालवण्याचं काम हे प्रोफेसरसाहेब करायचे. स्वामी दौऱ्याला निघाले आणि वाटेत कोणीही थकला-भागलेला दिसला की, गाडी थांबवून ते त्याला गाडीत घ्यायला लावायचे. तो मनुष्य गाडीत चढण्याआधीच प्रोफेसर त्याला विचारायचे, ‘या आधी गाडीत बसला आहेस का कधी, तरच आत ये. नाही तर यायचं नाही.’ मग स्वामी त्यांना म्हणायचे की, तुम्ही इतक्या उद्धटपणे कसं काय बोलता? ते म्हणायचे, ‘त्याने गाडीत उलटी केली तर? तुम्ही भाषण करायला जाल, पण गाडी धुवायचं काम मला करावं लागेल.’ प्रत्येक गोष्टीत स्वामींचं आणि त्यांचं दुमत असायचं. प्रोफेसर अत्यंत व्यवहारी होते आणि स्वामी मात्र कायम त्यांना आदर्शवादी डोस देत राहायचे. तरीही ते स्वामींना पूर्णपणे समर्पित होते. 

हा सगळा माहोल सांभाळता-सांभाळता स्वामींची त्रेधातिरपीट व्हायची. दोन बहादूर स्वयंपाकघरात, दोघे ऑफिसमध्ये आणि आणखी एक-दोन बहादूर स्वामींचे मोठमोठे भगवे डगले, लुंग्या धुऊन इस्त्री करून जागच्या जागी आणून ठेवायच्या कामी असायचे. आणि या सगळ्यातून शिल्लक राहिलेली कामं करायला एखादा बहादूर असायचा. या मुलांसंबंधी एक गमतीदार किस्सा मला आठवतो. चरणसिंहांप्रमाणेच चंद्रशेखरांशीही स्वामींचं सूत फारसं जुळत नव्हतं. हे दोन ‘च’ त्यांना कायम वर्ज्य होते. एकदा आम्ही स्वामींशी काही तरी राजकीय चर्चा करत बसलो होतो आणि शरद जोशी त्यांना म्हणाले की, मला चरणसिंहांना भेटलं पाहिजे. स्वामी म्हणाले, आप चरणसिंह से क्या बात करेंगे? शरद जोशी म्हणाले की, कितीही झालं तरी दिल्लीच्या आसपास सगळे जाट शेतकरी आहेत आणि जाट शेतकऱ्यांचा तो नेता आहे. त्यावर स्वामी म्हणाले, ये मुझे बिलकुल पसंद नहीं आणि कधी नव्हे ते उपरोधिक बोलायला गेले. त्यांनी एका बहादूरला हाक मारली आणि त्याला म्हणाले, बहादूर, जा... और बाहर अपना चायवाला बैठता है न, उसको बुलाके ला. जोशीजी उससे बात करना चाहते है. 

बहादूरने आयुष्यात इतका महत्त्वाचा निरोप कधीच कुणाला पोचवला नसावा. तो लगेच पळतपळत बाहेर गेला. त्याला बिचाऱ्याला स्वामींचा उपरोध कुठून कळणार? इकडे आमची चर्चा पुढे दुसऱ्या मुद्यावर गेली. 15 मिनिटांनी बहादूर पुन्हा धावत-पळत आला. येऊन मिलिटरीच्या ‘दक्ष’ पोझमध्ये उभा राहिला आणि म्हणाला, स्वामीजी, आज चायवाला नही आया है. स्वामी म्हणाले, कौन चायवाला? तो म्हणाला, स्वामीजी, आप ही ने तो कहा था, बाहर के उस चायवाले को बुलाके लाव. स्वामी म्हणाले, अबे गधे, मैने सचमुच थोडी कहा था उसे बुलाने के लिये? पण तो खरा बहादूर मुलगा होता. तो म्हणाला, मुझे यही समझ में नहीं आता की आपका काम करना है की नहीं करना है... असा हा अखंड गोंधळ चाललेला असायचा. पण त्यामुळे there was a sign of life about the whole thing. 

स्वामींकडे साधारण सकाळी दहाला माणसांची अखंड  रीघ सुरू व्हायची ती रात्री साडेनऊ-दहापर्यंत. दौरा संपवून स्वामी दिल्लीत परत आले की, त्यांना भेटायला वेगवेगळ्या प्रकारचे लोक यायचे. त्यांच्या स्वतःच्या संघटनेचे कार्यकर्ते ‘दौरा कसा झाला? काय झाला?’ अशा चर्चेसाठी यायचे. मात्र या जागेत त्यांच्या संघटनेच्या बैठकी झाल्याचं मला आठवत नाही. शेतकरी संघटनेसारख्या इतर चळवळीतले लोक यायचे. त्यांच्याशी बोलणं, त्यांचं दिल्लीत काय काम आहे ते पाहणं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मदत करता येईल, या सगळ्यात स्वामींनी कधीही हात आखडता घेतला नाही. याशिवाय इतर भागातले अडकलेले वेठबिगार मजूर, त्यांचे स्थानिक कार्यकर्ते आपापले पाच-दहा गट घेऊन यायचे. वर्तमानपत्रं आणि टेलिव्हिजनमधल्या प्रसिद्धीचा मोह असल्यामुळे पत्रकारांचा कायम राबता असायचा. विनोद दुआ हा पत्रकार मला पहिल्यांदा स्वामींच्या घरीच भेटला. तो शरद जोशींची मुलाखत घ्यायला आला होता. त्या दिवशी काही कामात अडकल्यामुळे शरद जोशी त्याला म्हणाले, ‘‘मला आज तितका वेळ नाही. पण तू विनयशी बोललास, तर माझ्याशी बोलल्यासारखंच आहे.’’ नंतर मी केव्हाही दिल्लीला गेलो की, त्याला तिथे बोलवून घ्यायचो. 

यशवंत सिन्हा यांनी जेव्हा आयएएस नुकतंच सोडलं होतं, तेव्हा ते स्वामींकडे जवळजवळ रोज यायचे. त्यांनी आयएएसची नोकरी सोडलेली, मी पत्रकारितेतली नोकरी सोडलेली, कैलाश सत्यार्थीने इंजिनिअरिंगमधली नोकरी सोडलेली- अशा लोकांचा एक छोटासा गट तिथे तयार झाला होता. त्या काळात यशवंत सिन्हांसोबत खूप वेळा चर्चा झाल्याचं आठवतं. एक उमदा, प्रभावी आणि विचारांनी पक्का पण आक्रस्ताळा नाही अशी त्यांची छाप पडली होती, नंतरही ती कायम राहिली. 

मोहन गुरुस्वामी नावाचा एक माणूस तिथे होता. तो बहुतेक चंद्रशेखर यांनी स्वामींच्या मागे लावून दिलेला एजंट असावा. कारण चंद्रशेखर यांना स्वामींचं काहीच पसंत नव्हतं. चंद्रशेखर यांनी 1989 नंतरच्या निवडणुकीत जेव्हा व्ही.पी.सिंह यांच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी दावा केला, तेव्हा स्वामींनी त्यांना जनता पार्टीच्या अंतर्गत विरोध केला होता. त्या निवडणुकीत व्ही.पी.सिंह, चंद्रशेखर आणि देवीलाल हे तिघे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. देवीलाल यांचं समाधान उपपंतप्रधानपदावर करण्यात आलं. (देवीलालनी मात्र उपप्रधानमंत्रीमधला ‘उप’शब्द गाळून घेतलेली शपथ सगळ्या देशाने ऐकली होती.) चंद्रशेखरही माघार घेणं शक्य नव्हतं. पण त्यांनी माघार घ्यावी म्हणून स्वामींनी त्यांच्या घरावर मोर्चा नेला होता. (आपल्याच माणसावर मोर्चे काढणं, हा समाजवाद्यांमध्ये काँग्रेसमधून आलेला रोग आहे आणि तो आता भाजपमध्येही बळावला आहे.) त्यानंतर काही दिवसांनी चंद्रशेखर यांची माणसं आली अन्‌ त्यांनी स्वामींचं सगळं सामान त्या गाळ्यातून काढलं आणि अंगणात फेकून दिलं. दोन दिवसांनी स्वामी परत आल्यावर त्यांनी ते पुन्हा आत नेऊन ठेवलं. मोहन गुरुस्वामी हा चंद्रशेखर यांच्या खूप विश्वासातला माणूस होता. त्यामुळे बहुतेक तो तिकडे स्वामींच्या बातम्या पोचवायचं काम करत असावा. 

दिल्लीत मी असंही पाहिलं की- ज्याच्याकडे गाडी आहे, एक टेलिफोन आहे, एक गेस्टरूम आहे असा माणूस कुणालाही पळवून नेऊ शकत होता. कारण त्या काळात दिल्लीमधल्या पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणं महाकठीण होतं. त्या भयानक बसेस व लोकल्समध्ये दिल्लीबाहेरच्या माणसाला चढणं शक्यच नव्हतं. शिवाय पत्ते माहीत नसायचे आणि दिल्लीमध्ये अंतरं प्रचंड. त्यामुळे कमीत कमी सोय केली, तरी कुणीही कुणाहीकडे राहू शकत असे. त्याचप्रमाणे बाहेरून येणाऱ्या महत्त्वाच्या लोकांना ठेवून घेणे, त्यांच्यामार्फत त्यांच्या कामाची माहिती काढणे, त्याचा आपल्या नेत्याला उपयोग होईल किंवा त्रास होईल असा फीडबॅक देत राहणे- अशी कामं करणारा एक मोठा गट या काळात दिल्लीमध्ये होता. या मंडळींचा राबता सगळीकडे असायचा आणि ते सगळ्यांची काम करायचे. मोहन गुरुस्वामी त्या प्रकारचा होता. 

कार्यकर्त्यांचा आणखीही एक प्रकार मी स्वामींकडे पाहिला. तिथे 20 ते 30 वयोगटातले रोमँटिक वृत्तीचे कार्यकर्ते यायचे. शिक्षण संपलेलं आहे, घरचा बरा आहे, तातडीने काही घरची जबाबदारी नाही, कुठे प्रेमप्रकरणात अडकलेला नाही- अशी मुलं ‘आम्हाला देशासाठी काम करायचं आहे, आम्ही कुठलं काम करावं’ वगैरे चर्चेसाठी यायची. या सगळ्यातच आमच्या राजकारणाच्या, आंदोलनांच्या किंवा पुढच्या आखणीच्या गंभीर चर्चा होत. अधून-मधून ब्रेक घेऊन हे असं दिवसभर चालायचं. स्वामींच्या व्यक्तिमत्त्वाला इतर आधुनिक जीवनशैलीच्या सवयी बऱ्यापैकी असल्या, तरी काही फाईनर साईड्‌स असल्याचं मी कधी पाहिलं नाही. क्वचित एखादं लोकगीत ते गुणगुणायचे. रामकृष्ण मिशन आणि आर्य समाज यांच्यातला हा मोठा फरक मला वाटतो. विवेकानंद स्वतः शास्त्रीय संगीत उत्तम शिकलेले होते, स्वतः गायक होते, रचना करत होते, कविता लिहून त्यांना चाली लावत होते. आर्य समाजात असं कुणी दिसत नाही. त्या तुलनेत आर्य समाज अकारण पुरुषी (macho) प्रकारचा होता. स्वामींचं इंग्लिश किंवा हिंदी साहित्याचं वाचन वगैरेही फार नव्हतं. त्यांची मातृभाषा तेलुगू होती आणि तेलुगूमध्येही साहित्याची, संतकाव्याची मोठी परंपरा आहे. पण त्यातलंही काही मी त्यांच्या तोंडून कधी ऐकलं नाही. 

स्वामींची मुख्य अडचण ही होती की, त्यांच्या नावावर असलेलं काम आज न उद्या आक्रसत जाणार होतं. त्यामुळे कुठल्या तरी मोठ्या कामाशी, चळवळीशी ते स्वतःला जोडू पाहत होते. पहिल्यांदा आमच्याशी आणि नंतर शंकर नियोगीशी स्वामींनी संधान बांधण्याचं हेही एक कारण होतं. स्वामींचा स्वतःचा आर्य समाज हा सधन व्यापारी समूह असल्यामुळे ती चळवळ होऊ शकत नव्हती. ‘व्यापार व्यवस्थित चालला पाहिजे’ याच्यापेक्षा जास्त धोरणात्मक चर्चेमध्ये व्यापारीवर्ग पडत नाही. त्याचे दोन फायदे आपल्याकडे झालेले दिसतात. कितीही आक्रमणं झाली तरी त्याची झळ व्यापाराला बसलेली नाही. कारण सगळे आक्रमक नव्या गरजा घेऊन यायचे आणि प्रदेश इतका चांगला होता की, ते इथेच स्थायिक व्हायचे. नव्या कमॉडिटीजच्या व्यापाराच्या संधी भारतीय व्यापाऱ्यांनी ओळखल्या आणि सांभाळल्या. आपले व्यापारी सत्तेशी भांडणं घेत नाहीत, त्याचं कारण बहुधा हे असावं. 

आपल्या दीड-दोन हजार वर्षांच्या इतिहासात अनेकदा दुष्काळ  पडले, परचक्रं आली आणि गेली; पण व्यापाऱ्यावर हल्ला झालेला नाही. (प्लासीच्या लढाईवेळी जगतसेठच्या हवेलीचा अपवाद. पण तीही राजकीय गरज होती) आर्य समाज अशा व्यापारी मंडळींचा होता. पुढे नियोगीची हत्या झाल्यानंतर तिथेही स्वामींसारखा ज्येष्ठ, पण नवा माणूस सामावून घेणं तिथल्या कार्यकर्त्यांसाठी अवघड होतं. शरद जोशी, नियोगी, मेधा पाटकर अशा सगळ्याच नेत्यांच्या कामाशी जुळवून घेताना, प्रत्येक ठिकाणी स्वामींना हे लक्षात आलं की, आपल्याला इथे यायला उशीर झाला आहे. लोक जरी आपल्याशी चांगले वागत असले, तरी प्रत्येक ठिकाणी आपण परकेच राहतो आहोत. 

स्वामींचं काम म्हटलं तर संघर्षाचं होतं, म्हटलं तर नव्हतं. त्यांना काही एकेका गावात दहा हजार वेठबिगार मजूर सापडणार नव्हते. जास्तीत जास्त लोकसंख्येला स्पर्श करणाऱ्या प्रश्नावर काम करायला घेतलं म्हणजे गळती लागली तरी काही माणसं हाताशी राहतात. उलट मुळातच जो प्रश्न छोट्या गटाचा आहे, तो कामासाठी घेतला तर काम उत्तरोत्तर कमी होत जातं. याही मुद्यावर शरद जोशी स्वामींना म्हणाले होते की, अशी कामं बंदच पडली पाहिजेत. माझी शेतकरी संघटनासुद्धा बंद पडली पाहिजे. म्हणजे प्रश्न संपले. गरिबी आणि बेकारी संपली, असं केव्हा म्हणायचं? ज्या वेळी ‘एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज’वरची नोंदणी बंद होईल, त्या वेळी. त्यासाठी बेकारांची संख्या प्रत्यक्ष मोजायची गरज नाही. तसंच, ‘वेठबिगार म्हणून ठेवा, पण काम द्या’ किंवा ‘फक्त भाकरीपोटी, मुलांच्या शिक्षणापोटी काम द्या’ असं माणसं म्हणायचं थांबतील, तेव्हा हे काम संपलं. पुढे वेठबिगारीच्या प्रश्नावर कैलास सत्यार्थीनेही आपलं काम सुरू केलं, इतरांनीही त्या समस्येवर कामं सुरू केली. लोकांमध्ये कायद्याचं भानही उत्तरोत्तर वाढलं. मग 2000 नंतर स्वामींचं काम आक्रसत गेलं. त्यानंतर जसजसं वार्ध्यक्य आणि एकटेपणा येत गेला, तसे ते पुन्हा आर्य समाजाकडेच वळले. आर्य समाजाचं प्रबोधन करायचं, म्हणून दिल्लीहून निघणाऱ्या आर्य समाजाच्या मासिकांच्या संपादनाचं काम त्यांनी स्वतःकडे घेतलं. 

मी अगदी वैयक्तिक कामासाठी जरी दिल्लीला गेलो तरी स्वामींकडे निदान एकदा, सलग 24 तास त्यांच्या सहवासात राहत असे. वीसेक वर्षं हा क्रम कधीच चुकला नाही. त्या भेटींमध्ये आम्ही या विषयावर सतत बोलायचो  की- जी स्वप्नं, ध्येयं, कार्यक्रम, अजेंडा घेऊन आपण 1984 च्या जुलै महिन्यात इंडिया युथ सेंटरमध्ये बसलो होतो; तो आपण का राबवू शकलो नाही? मग कधी त्याला व्यक्ती जबाबदार असायच्या, कधी परिस्थिती. कधी आमच्याही काही चुका झालेल्या असायच्या. हे सगळं आम्ही शेअर करायचो. ‘आपको इस में कुछ करना चाहिये’ अशा धर्तीचा उपदेश कधी कधी स्वामी मलाही करू लागायचे. काही वेळेला मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो किंवा काही वेळेला मी स्पष्ट सांगायचो की, Don't get into that kind of attitude with me. पण त्यामुळे स्वामींना हळूहळू माझ्याबद्दल असं इम्प्रेशन येत गेलं की, विनय हा आता कार्यकर्ता राहिलेला नाही; तो सुखासीन फॅमिली मॅन झालेला आहे. ही तर माझी कायमची पंचायत होती. मी सुखासीन फॅमिली मॅन तर कधी होऊ शकत नव्हतो. पण म्हणून एकच अजेंडा, एकच कार्यक्रम वर्षानुवर्षं राबवायचा, त्याचं मूल्यमापन कधी करायचं नाही, अशा ठिकाणीही मला काम करता यायचं नाही. 

खरं तर आम्हा दोघांमध्ये हे साम्य असल्यामुळेच आमची मैत्री झाली होती. आणि ती मैत्री खूप छान होती. स्वामींची चेष्टा करणारे किती लोक असतील? मला तरी शरद जोशी आणि मी एवढे दोनच ठाऊक आहेत. एकदा कसरावदला एकदा मेधा पाटकर यांचा मेळावा होता. तिथे तर माणसांची भेळच तयार झाली होती. नाना पाटेकर, स्वामी अग्निवेश, बाबा आमटे असे सगळे तिथे होते. आम्ही जे काम 1984 मध्ये करत होतो, तेच काम त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी मेधा पाटकर त्यांच्या संघटनेसाठी करत होत्या. आमचे विजय जावंधियाही त्या वेळेला मेधा पाटकरांना सामील झाले होते. कसरावदला सगळी गंमतच होती. नाना पाटेकर आला म्हणून जवळच्या बडवानी नावाच्या गावातली हजारो कॉलेजवयीन पोरं-पोरी, स्वामी आले म्हणून आर्य समाजाचे सगळे तुंदिलतनू बजरबट्टू, आमच्यासारखे काही कार्यकर्ते, नर्मदा प्रदेशातले आदिवासी, शेतकरी असे सगळे जमले होते. बाबा आमटे यांच्या भक्तगणांची वेगळीच रांग होती. स्वामींच्याही आसपास आर्य समाजाच्या लोकांनी गराडा घातला होता. तिथे आम्ही नर्मदेच्या पात्रात होडीने फिरायला निघालो होतो. नर्मदा हे एक अद्‌भुत प्रकरण आहे. आपण म्हणतो ‘संथ वाहते कृष्णामाई’ वगैरे, पण ते काही खरं नाही. उत्तर हिंदुस्थानातल्या नद्यांची रुंदी, पात्राचा संथपणा आणि प्रवाह पाहताना आपोआप विचार करण्याची लयसुद्धा संथ होत जाते. 

तिथे होड्या सर्रास चालू असतात. आपल्याकडे मराठवाड्याच्या काही भागात गोदावरी नदीमध्ये ऐलतीरावरून पैलतीरावर जायला अजूनही होड्या चालू असतात. आम्ही होडीतून पात्रात शिरलो होतो आणि स्वामी काठावर होते. त्यांनाही सोबत घ्यावं, असं मला वाटलं. शंभरेक फुटांचं अंतर असेल. मी तिथून त्यांना हाक मारली. स्वामी म्हणाले, ‘‘आ रहा हूँ’’ माझ्याबरोबरचे आणि स्वामींबरोबरचे आर्यसमाजी पाहतच राहिले. एक जण मला म्हणाले, ‘‘आप स्वामी को इस तरह से बुलाते है?’’ मी विचारलं, ‘‘इस मे क्या गलती हुई?’’ ते म्हणाले, ‘‘वो संन्यासी है. लोग उनके पैर छूते है’’ मी म्हटलं, ‘‘वो मेरे मित्र है. आप उनसे पूछ सकते है.’’ अनप्रॉडक्टिव्ह असला तरी त्यांच्या मनात स्वामींबद्दल असा आदर होता. अशा स्वामीजींची चेष्टा करणं म्हणजे it was unheard of! 

त्या काळात एक जैन साध्वी इंदूरमधून बेपत्ता झाली होती. त्याची बातमी रोज पेपरमध्ये असायची. त्या दरम्यान मी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा स्वामींना म्हटलं, ‘‘आप बता दिजीये वो साध्वी कहा है? आप ही को मालूम होना चाहिये उसका ठिकाना.’’ ...‘‘भला मुझे क्यूं मालूम होगा?" मी म्हटलं, "साध्वी की बात तो साधूही जाने. हम तो गृहस्थ लोग है. हम ये झमेले समझ भी नहीं सकेंगे. आपकी आंतरिक ताकद से आप उस साध्वी को ढूंढ निकालिये. देश आपको आदर से देखेगा.’’ 

दिल्लीत कधी कधी मोकळा वेळ मिळायचा. त्या दिवशी चर्चेचा मूड नसायचा. अशा एका दिवशी दिल्लीत पीटर ओ’टूलचा एक सिनेमा लागलेला होता. पीटर ओ’टूल आहे म्हणजे सिनेमा चांगलाच असेल, असं वाटून शरद जोशी, स्वामी आणि मी असे तिघे तो सिनेमा पाहायला गेलो. चाणक्य पुरीमधलं चाणक्य थिएटर. आम्ही वेळेवर पोहोचणारी माणसं असल्यामुळे थिएटरमध्ये पिवळे दिवे लावलेले असतानाच आम्ही आत जाऊन बसलो. पगडीवाला साधू तिथे आला म्हटल्यावर सगळे लोक स्वामींकडे रोखून बघायला लागले. फिल्म सुरू झाली. आमच्या दोघांच्या मधे स्वामी बसलेले. 

तो सिनेमा म्हणजे जवळजवळ सॉफ्ट पोर्नोग्राफिक फिल्मच होती. पीटर ओ’टूलचं काम त्यात अगदीच कमी होतं. जाहिरातीमध्ये मात्र त्याचं नाव त्यांनी वापरून घेतलं होतं. दर पाच-दहा मिनिटांनी त्यात एखादा बेडसीन यायचा. आणि तो संपला  की, पुढच्या रांगेतले दोन-चार लोक तरी स्वामींकडे मागे वळून पाहायचे. हे संबंध सिनेमाभर चालू होतं. स्वामी मला म्हणाले, ‘‘विनयजी, कहाँ फँसा दिया आपने?’’ मी त्यांना म्हटलं, ‘‘कम से कम आप पगडी निकाल के रखते तो आपकी तरफ लोगो का ध्यान नहीं जाता.’’ ते म्हणाले, ‘‘मै दीक्षित संन्यासी हूं. पगडी तो निकाल नहीं सकता.’’ सिनेमा संपल्यानंतर ते गडबडीने थिएटरच्या बाहेर पडले. दोन दिवसांनी पंजाब केसरीमध्ये ‘बिस्तर’ नावाच्या हिंदी सिनेमाची जाहिरात. त्याच्यामध्ये इडिपसची थीम होती. जाहिरात अशी होती : ‘जनम दिया मैने तुझे जिस बिस्तर पर, लुटी आबरू तूने मेरी उस बिस्तर पर!’ स्वामींना म्हटलं, ‘‘चलो जाते है, ये भी फिल्म देख लेते है.’’ ते म्हणाले, ‘‘परसो जो भुगतना पडा, वो क्या कम था?’’ मी म्हटलं, ‘‘वो विदेशी स्तर तो हमने देखा. अभी ये स्वदेशी स्तर देखते है. और आप मेरे साथ होंगे तो उसके कुछ और आयाम मेरे नजर में आयेंगे.’’ पण स्वामी कधी रागावले नाहीत. 

एकदा आर्य समाजाविषयी आमची चर्चा चालली होती. स्वामी मला सांगत होते की, आर्य समाजात विवाहाचे तीन प्रकार सांगितले आहेत. सगळ्यात घटिया विवाह म्हणजे 24 वर्षांचा मुलगा आणि 16 वर्षांची मुलगी. (आर्यसमाजी बालविवाहाच्या विरुद्ध आहेत, मात्र पुरुषी संस्कृती आर्य समाजामध्ये किती रूढ झालेली होती, या संदर्भातही हे लक्षात घेण्यासारखं आहे.) त्याच्यापेक्षा चांगला विवाह म्हणजे 32 वर्षांचा नवरा आणि 16 वर्षांची बायको आणि उत्तम विवाह म्हणजे 48 वर्षांचा नवरा आणि 16 वर्षांची बायको. मी त्यांना म्हटलं, ‘‘म्हणजे तुम्हाला अजून आशा आहे!’’ कारण आम्ही बोलत होतो तेव्हा स्वामी जेमतेम पन्नाशीच्या आसपास असावेत. पण त्यावरही ते रागावले नाहीत. 

कधी कधी त्यांनाही माझी चेष्टा करायची लहर यायची. दिल्लीला मी त्यांच्याकडे राहत असलो, तरी विरक्त आणि संन्यासी ते होते; मी नव्हतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला रात्री मी त्यांच्याकडे जेवायला नसायचो. कुणाबरोबर तरी पार्टीला गेलेलो असायचो आणि रात्री उशिराने परत आलेलो असायचो. मग दुसऱ्या दिवशी स्वामी सुरू करायचे. ‘‘कल रात को आपने विनयजी को देखा नहीं. क्या उनकी चाल थी, क्या उनके तेवर थे, क्या उनकी नजर थी...! ऐसा लग रहा था कि, ये पूरी दुनिया को आज साफ कर के रख देंगे!’’ असे टोमणे ते नंतर बराच वेळ मारत राहायचे. That was all friendly banter. 

मला आता हे जाणवतं की, त्यांच्या भगव्या कपड्यांचं दडपण त्यांनी कधीही कुणावर येऊ दिलं नाही. मी सांगितलेली उदाहरणं तर अगदी टोकाची आहेत. पण साध्या चर्चेमध्येही ते त्याच वृत्तीने, ऋजुता कायम ठेवून, शांत आवाजात आपलं म्हणणं मांडायचे. प्रापंचिकांना त्यांनी कधीही तुच्छ लेखलं नाही. आपण अपवादात्मक आहोत, पण आपल्याला भेटणारी बाकी सगळी माणसं प्रापंचिक असणार, ती त्यांच्या इंद्रिय विषयांमध्ये गुंतलेली असणार याची जाणीव त्यांना होती. आणि ते विषय आपल्यासाठी नाहीत, याचं भानही होतं. चर्चा फार तशी व्हायला लागली की, ‘स्वामी जरा ताठ व्हायचे आणि त्यांनी खैर...’ असं म्हटलं, तर आपण समजायचं की, हा विषय त्यांच्या संन्यासी धर्माला सोडून भरकटतो आहे. मग आपण आवरतं घ्यायचं. असा त्यांचा सन्मानही आम्ही ठेवत होतो. कुणाच्या घरी स्वामी गेले, तर ती भेट अत्यंत आदर्श म्हणावी अशीच असायची. घरातल्या सगळ्यांची ते चौकशी करायचे. घरातल्या स्त्रीशी विशेष आदराने बोलायचे. माझ्या पुण्यातल्या घरी ते दोन-तीनदा येऊन गेले होते. हेही मुद्दाम सांगितलं पाहिजे की, स्त्रियांकडे बघताना त्यांच्या नजरेमध्ये मला कधीही गढूळपणा दिसला नाही. आणि संन्यासी असले तरी स्त्रियांच्या सहवासात त्यांना कधी अवघडलेलंही मी पाहिलं नाही. दृढनिश्चयी माणसांच्या नजरेमध्ये एक स्थिरता असते, तशी स्वामींच्या नजरेमध्ये नक्की होती. 

एकदा 14 एप्रिलला जळगावला संघटनेचा मेळावा होता. एप्रिल महिन्यात तिथे तापमान जवळपास 45 डिग्री असतं. त्यामुळे मेळाव्याच्या दोन आठवडे आधी आसपासच्या भागात प्रचार सुरू करायचा, असं ठरलं. तेवढ्यात शरद जोशी आजारी पडले. ते म्हणाले, ‘‘स्वामी भारतात असले, आणि मोकळे असले तर त्यांना प्रचारासाठी बोलवून घ्या.’’ फोन केल्याबरोबर स्वामी आले. त्यांच्या विमानाचं तिकीट काढावं लागायचं. पण ते काम आम्ही आनंदाने करायचो, कारण ते संघटनेत अतिशय पॉप्युलर वक्ते होते. त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याची प्रचारयात्रा होती. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या तिन्हींच्या हवामानांतले दोष या जिल्ह्यामध्ये आहेत. बुलढाणा शहर मात्र तीन हजार फूट उंचीवर असल्यामुळे  तिथे हवा चांगली आहे. पण शहरामध्ये सगळी सरकारी कार्यालयं. तिथे संघटनेचा काय प्रचार करणार? त्यामुळे प्रचार सगळ्या उरलेल्या जिल्ह्यामध्ये. आता स्वामी तिथे पोहोचलेले आहेत, म्हणजे आपल्याला जायची काही गडबड नाही, म्हणून मीही तिथे थोडा उशिरा गेलो. 

मी तिथे पोचलो तोवर स्वामींचा तीन-चार दिवसांचा दौरा झालेला होता. ते खूपच दमलेले आणि काळवंडलेले दिसत होते. मी म्हटलं, ‘‘स्वामीजी, क्या हुआ? आपकी सेहत ठीक नही है?’’ ते म्हणाले, ‘‘भैया कैसे सैतानी देश में फँसा दिया. भाषण वगैरा तो मै सब कर रहा हूँ. पर खाने को तो और कुछ मिल ही नहीं रहा है यहा पर. सुबह भाकर और बेसन, दोपहर मे भाकर और बेसन, शाम को भाकर और बेसन. डेव्हिल्स डायट है ये तो. मै खा ही नहीं सकता. सब लाल लाल होता है, और बाजरी की घटिया रोटी होती है. घी नहीं, लस्सी नहीं, दूध नही, सबजी नहीं, एक केला तक नसीब नहीं हुआ...’’ मी बाहेर जाऊन आमच्या कार्यकर्त्यांना बोलावलं. ते म्हणाले, ‘‘स्वामीजीच आम्हाला सांगे की, मी तुमचा मोठा भाऊ आहो ना! मग तुम्ही खाता ते मी खाईन. मग आम्ही म्हटलं, ‘‘सोईचंच झालं आपलं.’’ त्यांनी सकाळ-संध्याकाळ भाकर-बेसन खायला घालून या आर्यसमाजी गड्याला जेरीला आणलं होतं. स्वामींचा आर्य समाजात दौरा असेल तर खाण्यापिण्याची लयलूट असायची आणि तशाच आहाराची त्यांना सवय झालेली. ते खाणारेही मजबूत होते. एक वाटी तूप, एक वाटी दूध किंवा लस्सी, साताठ रोट्या, डाळ किंवा भाजी आणि शेवटी फळ किंवा मिठाई- हा त्यांचा तिथे नॉर्मल आहार असायचा. मग मी दोन दिवस त्यांना आइस्क्रीम, दूध वगैरे जे काही त्या कुग्रामी मिळण्यासारखं होतं, ते आणून दिलं. त्यावर ते म्हणाले, ‘‘अब कुछ तो बात हुई. वरना जोशीजी वहा बीमार के बीमार रहते और मैं भी यही मर जाता.’’ 

तेव्हा मी स्वामींना म्हणालो की, This is expensive cheap popularity. ‘‘तुम्ही का नाही आपल्या जेवणाचं त्यांना नीट सांगितलं?’’ ते म्हणाले, ‘‘मै बाकी जगह जाता हूं. और ऐसी बाते तो सब करते है. मुझे क्या मालूम, ये लोग वही करेंगे!’’ एकदा मला दिल्लीत भेटले तेव्हा ते लंगडत होते. त्याबद्दल विचारलं तर म्हणाले, ‘‘टूर पे गया था. शाम के समय को एक गाव में था. वहाँ कुछ नौजवान कबड्डी खेल रहे थे. तो मैने सोचा कि, मै भी थोडी कबड्डी खेल लूँ. बहुत सालों मे नहीं खेला था. खेलने लगा और उसमे से एक बहुत बडा तगडा जवान था. उसने एक घूँसा लगा दिया. तब से टांग में दर्द हो रहा है.’’ तेव्हाही त्यांना मी हेच सांगितलं होतं की, This is expensive cheap popularity. ‘हा मोह तुम्ही आवरला पाहिजे.’ people look up to you. एकदम त्यांच्यात इतकं मिसळायची गरज नाही. 

काही वेळा आमची भांडणंही झाली. पण त्यात वैयक्तिक काही नव्हतं. परस्परांच्या कामांची प्रेरणा हा त्या भांडणांमागचा मोठा विषय असायचा. शरद जोशी काय किंवा मी काय; आम्हाला दया, करुणा या प्रेरणा मान्यच नव्हत्या आणि अजूनही नाहीत. आर्थिक दारिद्य्रातून विषमता निर्माण होते आणि संपत्ती निर्माण करणाऱ्या माणसापर्यंतच पैसा जात नाही, हे दारिद्य्र निर्माण होण्याचं कारण असतं. जोपर्यंत आपली अर्थव्यवस्थाच अशी आहे, तोपर्यंत तुमच्या मनात कितीही करुणा, दया, सहानुभूती असली तरी तुम्हाला निर्णायक उपाय मिळूच शकत नाही. अशी आमची मांडणी होती. स्वामींचं म्हणणं वेगळं होतं. ते म्हणायचे, ‘‘ये सब है. लेकिन एक मानवी करुणा भी होती है. जोशी जी, आपका उदाहरण लेते है. आप तो विदेश में सुख-चैन में थे. वहाँ पे आपके चाहनेवाले लोग थे. खासा तनख्वा आपको मिल रही थी. और आप वो सब छोडकर हिंदुस्थान के गरिबो के लिये क्यूँ काम करते है? इसके पीछे मै जो कहता हॅूं, वो मानवी करुणा, सहवेदना यही कारण हो सकता है.’’ 

यावर शरद जोशींनी त्यांना जे उत्तर दिलं, त्याने माझं आयुष्य बदललं. शरद जोशी म्हणाले, ‘‘मला दारिद्य्राची चीड येते. निसर्गाने एवढे रिसोर्सेस दिल्यानंतरही समाजात इतकी गरिबी असावी? गरिबांविषयीची दया माझ्या मनात नाही. मला दारिद्य्र या अवस्थेची चीड आहे आणि दरिद्री लोक त्या अवस्थेतून बाहेर येऊ इच्छित नाहीत, याची मला जास्त चीड आहे. म्हणून मी माझे इतर उद्योग बाजूला ठेवून दहा-पंधरा वर्षं या कामासाठी द्यायची, असं ठरवलं. कृपा करून दया, करुणा असे आरोप तुम्ही माझ्यावर करू नका.’’ शरद जोशी स्वतःला अर्थवादी म्हणून घ्यायचे, त्याचं इतकं कडवं समर्थन मीसुद्धा पहिल्यांदाच त्यांच्याकडून ऐकत होतो. 

असंच त्यांचं आणखी एक वाक्य जाता-जाता सांगतो. ‘शेतकरी संघटनेच्या विचारांसाठी आम्ही आमचं आयुष्य वाहून टाकू... माझा जीव गेला तरी चालेल...’ अशी फॅशनेबल चर्चा कार्यकारिणीमध्ये कधी तरी व्हायची; कारण असं म्हटलं की, करावं काहीच लागत नाही.  दुसरीकडे जाऊन पुन्हा तेच बोलायचं. पण जोशीसाहेब काही इतके बावळट नव्हते. ते म्हणाले, ‘‘तुमच्याच्याने काहीच काम होणार नाही.’’ शरद जोशींची ही एक स्टाईल होती. ते एकदम शीर्षासन करूनच उभे राहायचे. ते म्हणाले, ‘‘तेच विचार पुढे जातात, ज्यांचे अनुयायी इतरांचे जीव घेतात. तुम्ही शेतकरी संघटनेसाठी जीव द्यायला तयार आहात ना? संघटनेला भविष्य नाही!’’ (कोणी जीव न देताही संघटनेला भविष्य नाही, ही स्थिती त्या वेळेला आमच्या कुणाच्याच डोक्यात नव्हती.) 

मी जितका स्वामींचा मित्र झालो होतो, तितके शरद जोशी झाले होते, असं मला वाटत नाही. कारण माणसं जोडताना (आमच्यासारखे काही मोजके अपवाद सोडले तर) शरद जोशींचा एक उपयुक्ततावाद होता. एखाद्याचा आपल्या कामाला उपयोग नाही, असं त्यांच्या लक्षात आलं की, ते त्या माणसाला अलगद बाजूला करायचे. तसंच स्वामींच्या बाबतीत व्हायला त्या क्षणापासून सुरुवात झाली असावी. स्वामी आपला करुणा पक्ष सोडायला तयार नव्हते आणि शरद जोशी आपला अर्थवादी पक्ष सोडायला तयार नव्हते. 

दि.2 ऑक्टोबर 1989 रोजी आम्ही दिल्लीला एक प्रचंड मोठा मेळावा ठरवला होता. त्याआधी व्ही.पी.सिंह यांच्या सटाण्याच्या सभेमध्ये शरद जोशींनी त्या मेळाव्याची घोषणा केली होती. अर्धा कोटी शेतकरी आपल्याला दिल्लीला न्यायचे आहेत, हे ऐकून समोरचे 30 हजार लोक एकदम उठून उभे राहिल्याचं मला आठवतं. त्या वेळेच्या दिल्लीतही 50 लाख लोक आले असते, तर एकावर एक माणूस उभा करायची वेळ आली असती! पण पाचेक लाख लोक आम्ही नेले होते. आणि महेंद्रसिंह टिकैतने तो मेळावा उधळून दिला. शरद जोशींना सभा सोडून जावं लागलं. आम्ही पुढचा धोका ओळखून त्यांना सभेतून बाहेर काढलं. एक्स सर्व्हिसेस लीग नावाच्या सैन्यातल्या लोकांच्या संघटनेचे ब्रिगेडियर रामसिंग तिथे होते. त्यांनी दुसऱ्या्‌ दिवशी येऊन सांगितलं, ‘‘आपने बहुत अच्छा किया. टिकैतवालों के पास करीब सौ बंदूके थी. कही से भी गोली चल सकती थी.’’ महेंद्रसिंह व्यासपीठावर होता तोवरच कोणी गोळी झाडली नसती. तो तिथून हलल्यानंतर या लोकांनी गोळ्या झाडायलाही कमी केलं नसतं. आम्ही जवळजवळ वर्षभर त्या कॅम्पेनवर काम केलं होतं. कित्येक सभा, कित्येक प्रचार दौरे काढले होते. माझ्यासारखी काही माणसं महाराष्ट्राबाहेर काम करत होती. आणि रंगवलेल्या स्वप्नाच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या उडालेल्या आम्ही पाहत होतो. पण निराश व्हायची किंवा डोकं फिरवून घ्यायचीही सोय नव्हती. मी स्टेजच्या जवळच होतो. 

संतापून लालबुंद झालेले स्वामीजी तिथे आले. मला म्हणाले, ‘‘आपको गुस्सा नहीं आता?’’ मी म्हटलं, ‘‘गुस्सा तो बहुत आता है.’’... ‘‘फिर भी आप कुछ नही कर रहे हो.’’... ‘‘क्या करना चाहिये?’’ ... ‘‘इस का बदला यही पर लेना चाहिये. जोशी जी का इतना बडा अपमान हुआ और आप ऐसे यहा बैठे हो? कितने लोग है टिकैत के? शेतकरी संघटना के तो उस से दस गुना ज्यादा लोग होंगे.’’ मी म्हटलं, स्वामीजी, ‘‘कूल डाऊन! आप शांत हो जाइये, या फिर घर जाइये. इस तेवर मे आपने यहा नहीं रुकना है. कैसा बदला लेंगे हम? कमसे कम पाँच हजार महिलाये भीड मे फसी हुई है. और ये लोग सुबह से हुक्के मे गांजा वगैरा डालके पीके आये है. कुछ अनहोनी हो जाये तो एक कार्यकर्ता दुसरे से भिडेगा. इन के पास तो बंदूके है. खूनखराबा हो गया तो पुलीस आ जायेगी. किसी तरह से हमे ये नहीं होने देना है की, पुलिस के हस्तक्षेप के बाद लोग शांत हो गये. हमारे लोग भीड मे से महिलाओं को छुडाने की कोशिश कर रहे है. और जोशी साहब ने भी यही सिखाया है की, जहाँ पर अपमान होता है वहा तुरंत बदला लेना पहलवान आदमी का काम है, दिमागी आदमी ऐसा काम नहीं करता. फिर भी आप इस तरह से बोलना चाहते हो, तो आप घर चाहिये.’’ स्वामी संतापून निघून गेले. 

खरं तर दोन-तीन दिवस आधीपासूनच आमचं थोडं बिनसलं होतं. मेळाव्याच्या प्रचाराच्या भाषणांमध्ये स्वामी प्रत्येक सभेत जाहीरपणे आपला पत्ता, फोन नंबर सांगायचे. आणि म्हणायचे, ‘‘आपका भाई हूँ मै. आप जब दिल्ली आयेंगे तो मेरे घर आना है आपको-’’ आणि मेळाव्याच्या काही दिवस आधी खरोखरच स्वामींच्या ऑफिसमध्ये फोन सुरू झाले, ‘स्वामीजी हमने किधर आना है?’ त्यावरून स्वामी मला म्हणाले की, तुम्ही इतकी माणसं बोलावता आणि त्यांची काही व्यवस्था करत नाही. मी त्यांना सांगितलं की, शेतकरी संघटनेची ही पद्धत नाही. हे तुम्ही स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे. तुम्हाला कुणी सांगितलं होतं, माझ्या घरी राहायला या वगैरे म्हणायला? ते म्हणाले, ‘‘हमारे आर्य समाज के जलसे होते है, तो हर आदमी का हिसाब रहता है. और हर आदमी की सब व्यवस्था रहती है.’’ मी म्हटलं, ‘‘सबसे बडा जलसा कब हुआ था?’’...‘‘कुछ पांच साल पहले’’... ‘‘और कितने लोग आये थे?’’... ‘‘आठ हजार लोक आये थे.’’ 

मी म्हटलं, ‘‘स्वामीजी, ये दरिया मे खसखस है! कहाँ आठ हजार और कहाँ ढाई- तीन लाख. फिर और भी लोग आनेवाले है. तो प्लीज आप लोगो से ये बात ही नहीं करना की- आप की हालत कितनी खराब है, शेतकरी संघटनाने आप की कुछ तो व्यवस्था करनी चाहिये था. चाहे तो आप लोगो से मिलने भी मत जाइये और फोन भी मत उठाइये.’’ ते म्हणाले, ‘‘ये मै कैसे कर सकता हूं?’’ मी त्यांना म्हटलं, ‘‘आपको मै चमत्कार बताता हूँ. दो दिन बाद जब सभा होगी, जोशीजी उठकर हाथ जोडेंगे और बोलेंगे, ‘आप लोगो को बहुत कठीनाईयाँ उठानी पडी, बडी मुश्किले झेलनी पडी.’ और लोग सब भूल जायेंगे. लोगो के जख्म मे नमक डालने का काम आप मत किजिये.’’ या मुद्यावरून आमचं आधीच बिनसायला सुरुवात झाली होती. आणि स्टेजजवळ तर ते थेट हाणामारीचीच भाषा बोलत होते. 

दरम्यान, शरद जोशी ‘एम्स’मध्ये गेलेले होते. हे सगळं झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना मी सांगितलं, ‘‘You are in good company. अगदी शिवाजीपासून कुणा मराठी माणसाची डाळ इथे शिजलेली नाही. शिवाजीच्या तुलनेत आपण आहोतच कोण? त्यामुळे तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. दिल्लीच्या राजकारणात मराठी माणसाला छाप पाडता येत नाही, हे फार जुनं आहे.’’ दोन दिवसांनी जेव्हा मी मुंबईला परत यायला निघालो, तेव्हा गाडीतले लोक माझा बिल्ला पाहून मला सांगत होते, ‘‘अरे वो कहा का टिकैत? टीका तो उसको लोग लगाते है. असल में तो वो लठैती आदमी है. आपने उसके साथ जाना ही नहीं चाहिये था.’’ सभेत सगळे जाट लाठ्या आणि शंभर-दीडशे जण तर बंदुका घेऊन आलेले होते. आमचे तीन-साडेतीन लाख लोक आणि त्यांचे वीस हजार. पण त्यांनी सबंध स्टेजला वेढा दिलेला होता. पण दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळी स्वामी परत माझ्याकडे आले. म्हणाले, ‘‘विनयजी, मै क्षमा चाहता हूँ.’’ स्वामींच्या तेवढ्या एका वाक्यावर मी सगळं विसरलो. ते म्हणाले, ‘‘मै कल होशो हवास खो बैठा था. आपका दिमाग चल रहा था. आप शांत थे, इसलिये कल कुछ अनहोनी नही हुई.’’ नंतर दिवसभर तिथे पत्रकार येत होते, तेव्हा येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला स्वामी हेच सांगत होते की- काल थोडक्यात निभावलं.’’ ‘किसान पंचायत दो धडो मे बटी’ ही बातमी देशभर गेली होती. पण अशा वेळेला जे इतर उत्पात होतात, त्यातलं काहीही झालेलं नाही याचंच आम्हाला समाधान होतं. 

मी आणि स्वामी अशा सर्व प्रकारच्या भावभावनांमधून गेलो होतो. आमची भांडणं झाली, वादविवाद झाले, आम्ही एकमेकांची चेष्टा केली आणि एकमेकांवर प्रेमही केलं. पुढे एकदा मी सहज दिल्लीला त्यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले, ‘‘क्या चल रहा है? आप घर मे बैठे हो आज कल...’’ मी त्यांना म्हटलं, ‘‘मै विनापत्य, विनापाश राजकीय परित्यक्ता हूँ. मुझे कोई चाहता नही. यहाँ तक की जोशीजी भी मुझे नही चाहते जिनके कारण मै ये परित्यक्त जिंदगी भुगत रहा हूं, वो भी मुझे नही चाहते; और जिनको मैने खुद नकारा, वो तो नहीही चाहते.’’ पण स्वामींना हे ठाऊक नव्हतं की- ट्रेकिंग, मोटरसायकलिंग, गाणं ऐकणं, लिहिणं, महाराष्ट्रभर व्याख्यानांना जाणं- असे माझे इतर अनेक उद्योग चालू असायचे. पुण्यात मी एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापकही होतो. पण मी स्वतःबद्दल सुरुवातीलाच सगळं सांगत नसल्यामुळे, मला हे नेहमीच भोगावं लागलं आहे. (शरद जोशींनाही सुरुवातीला असं वाटलं होतं की, हा आपल्याकडे शिष्य बनायला आलेला आहे. पण ज्या वेळेला आम्ही एकत्र भाषण केलं (त्यांनी अर्धा तास, मी पाच मिनिटं) त्या वेळेला त्यांचे डोळे उघडले.) 

स्वामींना मी म्हटलं, ‘‘किसान की जो राजनीती हमने की, उसमें कोई दोष मुझे नजर नहीं आता. लेकिन जोशीजी ही वो राजनीती सफल नही होनी चाहिये, इस तरह से काम कर रहे है.’’ ते म्हणाले, ‘‘हाँ, मुझे भी ऐसेही लग रहा है’’ मी म्हटलं, ‘‘महाराष्ट्र मे मै जोशीजी को नकारके कुछ नही कर पाऊंगा’’ त्यावर स्वामी म्हणाले, ‘‘क्यूं नही? आप अलग से किसान संघटन शुरू किजिये.’’ (त्यांना तेव्हा कैलास सत्यार्थीचा फटका बसलेला नव्हता.) मी म्हटलं, ‘‘स्वामीजी, मेरी एक फिलॉसॉफी है. अगर मुझे लगा की, इस काम मे मुझे न्याय नही मिल रहा, या फिर मुझे लगा की, ये काम जिस कारण शुरू हुआ उस दिशा में नहीं जा रहा, तो मै वहा से चला जाता हूं. उसी तरह का दुसरा काम मै नही करुंगा.’’ त्यांना मी एक मराठी म्हण सांगितली : एका घराची दोन घरं आणि भिकाऱ्यांचं झालं बरं. किसी तरह से मुझे इसी संघटना में ही अपना अजेंडा रखना है. और आज स्थिती ऐसी है कि जोशीजी उसको मना कर रहे है. (पुढे काही वर्षांनी माझं आणि शरद जोशींचं अंडरस्टँडिंग पुन्हा निर्माण झालं.) 

तेव्हा स्वामी मला गमतीने म्हणाले, ‘‘चलो, फिर हम दोनो बुढ्ढे के पास जाते है. महाभारत मे जैसे श्रीकृष्ण और अर्जुन पितामह भीष्म के पास गये थे- आप को हम कैसा मारे ये पुछने के लिये. वैसे हम भी हमारे बुढ्ढे के पास जायेंगे.’’ मी स्वामींना म्हटलं, ‘‘लेकिन इसमे श्रीकृष्ण कौन होगा और अर्जुन कौन होगा, ये तो हमारे बीच का मामला हुआ. पहले उसका निर्णय करते है.’’ स्वामींना त्याचा मथितार्थ कळला. त्यांना माझा गाईड व्हायचं होतं आणि कदाचित त्याचं क्रेडिटही हवं होतं. साधारण सन 2000 च्या आसपास आमच्या मध्ये झालेली ही शेवटची राजकीय चर्चा. 

या काळातच, प्रतीकवादाचा ज्यांनी कायम धिक्कार केला, ते शरद जोशी स्वतःच नवनवीन प्रतीकं शोधत फिरत होते. त्यातलंच एक म्हणजे, कर्जमुक्त झाल्याचा पुरावा म्हणून रामेश्वरला जाऊन कर्जाची सगळी कागदपत्रं बुडवायची. (अर्थात मूळ कागदपत्रं कुणी बुडवली नाहीत, सगळ्या फोटोकॉपीज्‌ होत्या) आणि यातच ‘आम्ही शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या अर्थव्यवस्थेवर विजय मिळवला’ वगैरे. He started withdrawing into oblivion पण शरद जोशी हा भव्य गोष्टी सुचणारा, सर्जनशील माणूस असल्यामुळे त्यांची प्रतीकंही भव्य होती; स्वामींप्रमाणे बाळबोध नव्हती. 

स्वामींची आणि माझी शेवटची भेटही दिल्लीतच झाली. आमच्या स्वतंत्र भारत पक्षाचं ऑफिस सेटअप करायला 2008 मध्ये मी दिल्लीला गेलो होतो. तिथे गेल्यावर तीनचार जणांना फोन केले. त्यात एक अरुण शौरीला केला, दुसरा स्वामींना केला. आणि त्यांना म्हटलं की, ‘‘मी आता दिल्लीत आहे आणि निदान दोन वर्षं इथे राहणार आहे. (शरद जोशींची खासदारकी 2010 पर्यंत होती.) हे काम काही मला 24 तास गुंतवून ठेवणारं नाही. आणि दिल्लीत इतर अजेंडा काहीच नाही. त्यामुळे आपण भेटू या आणि बोलू या.’’ अरुणने त्याला काही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. स्वामींनी मात्र वेळ ठरवली. एका पब्लिक गार्डनमध्ये आम्ही भेटलो. तिथे मी पहिल्यांदाच स्वामींचा पूर्ण पराभूत चेहरा पाहिला. पावणेदोन लाख वेठबिगारांची सुटका एवढं काँक्रीट यश मिळूनही स्वामी मला पूर्ण थकलेले आणि गोंधळलेले दिसले. 

ते मला म्हणाले, ‘‘अच्छी बात हुई. अब आपके पास समय भी है. अब आप मेरी मदत करेंगे. आर्य समाज के दो पत्रिकाओं का मै संपादन कर रहा हूँ. आर्य समाजीओं का प्रबोधन करने का काम अब मैने शुरू कर दिया है. उसमे आप लिखेंगे, संपादन करेंगे, और आपकी नई कल्पनाएँ भी हम उसमे शामील करेंगे.’’ इथे मात्र मी काळजावर दगड ठेवून त्यांना सांगितलं की, मला धार्मिक गोष्टींची किळस येते. तुमचं वेठबिगारांचं काम बघून मी तुमच्याकडे आलो आणि तुमचा मित्र झालो; तुमचा पोशाख आणि वैराग्य बघून नाही. वाया गेलेले संन्यासी आणि वैराग्यही मी पाहिलेलं आहे. धर्म या गोष्टीशी मला संबंधच ठेवायचा नाही. शोषण करणारी प्रस्थापित व्यवस्था कुठल्याही धर्मात असणारच. मग त्या धर्माचं तत्त्वज्ञान भले असं म्हणो की, वेदनेवर फुंकर घातली पाहिजे वगैरे. मुळात अकारण वेदना निर्माणच होणार नाही यासाठी काय करायचं? यावर स्वामीजी रागावले. म्हणाले, ‘‘आप तो हमारे लिए कुछ करना ही नहीं चाहते.’’ मी म्हटलं, ‘‘आप कुछ सेक्युलर काम बताईये.’’ मी त्यांना सुचवत होतो की, ‘‘आपण दोघांनी तीसेक वर्षं जो अनुभव घेतला, त्या सगळ्याचा आपण बसून विचार करू या आणि एखादी नवी लाईन सापडते का बघू या. त्याच्यामध्ये शरद जोशी असतील, इतरही लोक असतील. We have to take this ideological debate forward. पण स्वामींची मूळ प्रेरणाच आयडिऑलॉजिकल नव्हती. 

‘ज्याला समाजासमोर जी समस्या दिसली, त्याने ती सोडवायच्या कामाला लागायचं. तुम्ही एकदा कमिटमेंट घेतली की- तुम्हाला पुढचा मार्ग दिसतो’- हा सगळा माझ्या मते, बकवास आहे. निश्चित मार्ग आखून काम करणं, त्यासाठी स्वतःचा तेवढा आवाका निर्माण करणं, रणनीती ठरवणं- इमिजिएट, इंटरमिजिएट आणि अल्टिमेट अजेंडा ठरवणं- हे सगळं लोकांसमोर मांडून, त्यांना सोबत घेऊन पुढं जाणं हाच मार्ग असतो. त्यानंतर आमची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही. कैलाश सत्यार्थीला नोबेल मिळालं, तेव्हाचा फोन शेवटचा. भाजपच्या गुंडांनी छत्तीसगडमध्ये स्वामींना मारहाण केली होती, त्याही वेळेला मी त्यांना फोन केला होता, पण अर्थातच स्वामी फोनवर येणं शक्य नव्हतं. त्यानंतर थेट परवाची बातमी समजली. ते सिऱ्हॉसिसने आजारी आहेत, हे माहीत नव्हतं. नाही तर मी नक्कीच त्यांना भेटून आलो असतो. 

3 

स्वामींच्या बोलण्यामध्ये कधी लोकमान्य टिळकांचा उल्लेख आल्याचं मला आठवत नाही, पण गीतारहस्यात लोकमान्यांनी जो विचार मांडला आहे तसं आयुष्य स्वामी 50 वर्षं जगले, असं म्हणता येईल. टिळकांनी म्हटलं होतं की, ‘संन्यास घेतला तरी ज्ञानोत्तर कर्म शिल्लक राहतं.’ लोकसंग्रह मेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि- असा तो गीतेतला श्लोक आहे. स्वामींनी स्वतःसाठी काही केलं नाही, पण समाजातला जो अत्यंत उपेक्षित वर्ग होता त्याच्यासाठी पुष्कळ काम केलं. या कामाचं मोजमाप कसं करता येईल? आधीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी वेठबिगारीतून सोडवलेल्या मजुरांची संख्या पावणेदोन लाख होती. वेठबिगारीतून सुटका झाल्यानंतर पुढे त्या सगळ्यांचं काय झालं याचा शास्त्रीय अभ्यास करणं, हा एक मार्ग असेल. कायद्यांच्या आधाराने त्यांची वेठबिगारीतून सुटका स्वामी करू शकले पण गरिबीतून त्यांची सुटका झाली का? 

समाजातला एखादा छोटा शोषित वर्ग निवडून त्याच्यासाठी आयुष्यभर काम करायचं हे कितपत सयुक्तिक आहे, या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर स्वामींकडून कधी मिळालं नाही. गरिबी कुठून निर्माण होते, या प्रश्नाच्या मुळाशी न गेल्यामुळे त्यांचं काम अनुकंपा, दया, सहवेदना या क्षेत्रामध्ये गेलं होतं. पण आपल्याकडे संन्याशाने असंच जगणं अपेक्षित असल्यामुळे स्वामी त्यांच्या संन्यासधर्माला अनुसरूनच जगले, असं म्हणता येईल. मात्र त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचा आपल्या देशातल्या मूळ गरिबीवर किती परिणाम झाला, या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देता येईल, असं मला वाटत नाही. त्यामुळे मला असा प्रश्न पडतो की, स्वामींसारख्या माणसांचं काय करायचं? 

आपल्या तत्त्वज्ञानानुसार स्वामी संन्यासी असल्यामुळे माझ्यासारख्या प्रापंचिकाला तर त्यांचं मूल्यमापन करायचा अधिकारच नाही. संन्यस्त असले तरी प्रापंचिक माणसांच्या बाबतीत ते उदार, सहनशील होते. रस्त्याकडेची एखादी टपरी असो किंवा पंचतारांकित हॉटेलातील एखादी मीटिंग-सेमिनार असो; श्रीमंत-गरीब दोन्ही वर्गांमध्ये स्वामी अत्यंत सहजतेने वावरत असत, याचीही उदाहरणं मी सांगितली. 

‘मला स्वतःसाठी कधी जगायचं नव्हतं, इतरांसाठी जगायला मी संन्यास घेतला’ हे त्यांचं उत्तर इतरांसाठी ठीक होतं, पण कालांतराने स्वामी आपल्या संबंध आयुष्याचा जमाखर्च कधी मांडून पाहत होते का? मनातल्या मनात मांडून पाहत असावेत. पण त्यांनाही त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली असतील असं वाटत नाही.  ‘हेच काम किती वर्षं करत राहायचं?’ अशा विचारांनी कधी उदासीनता आलीच, तर कुठून तरी त्यांच्या बंधुआ मुक्ती मोर्चाच्या कामासाठी मोठी देणगी यायची किंवा अत्यंत वाईट पद्धतीने वेठबिगारीत अडकलेलं एखादं कुटुंब त्यांच्याकडे यायचं. एवढ्या दोन गोष्टीही स्वामींना पुन्हा त्यांच्या कामासाठी उद्युक्त करायला पुरेशा होत्या. लोकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं, पत्रकारांनी प्रसिद्धी दिली, मध्यमवर्गाने त्यांच्याविषयी आदरभाव बाळगला, प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले; पण वेठबिगारीमागच्या गरिबीच्या मूळ प्रश्नाला भिडायचं काम बंधुआ मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून स्वामी करू शकले नाहीत.अर्थात याची त्यांनाही जाणीव असल्यामुळेच ते व्यापक व्यवस्थेशी लढणाऱ्या सगळ्यांशी सांधा बांधून होते. पण ज्यांना स्वतःकरता कोणताही स्वार्थ नाही, स्वतःसाठी काही मिळवायचं नाही- अशा माणसांचं नेमकं करायचं काय? 

मी माझ्या आयुष्यामध्ये अशी बरीच माणसं पाहिली, जी निःस्वार्थ अनुकंपेपोटी स्वतःला झोकून देऊन खूप लोकांसाठी काम करतात. राजकारणापासून ती लांब राहतात आणि दर वेळेला राजकीय उलाढाली झाल्या की, आपण बाजूला फेकले जातो हे लक्षात येऊनही आपापलं काम ती निष्ठेने करत राहतात. अशा माणसांबद्दल आपल्याला व्यक्तिशः आदरच बाळगला पाहिजे. आपल्याला जमेल तेवढी मदतही त्यांना केली पाहिजे. पण व्यवस्था-परिवर्तनाच्या व्यापक लढ्यामध्ये अशा माणसांचा उपयोग होतो की अडचण होते, याबद्दल माझ्या मनात शंका आहे. मला वाटतं, सगळ्यांनी आपापल्या जागी अनेक लहान-सहान उपाय करत राहण्याऐवजी एक महत्त्वाचा उपाय निवडला आणि त्याच्यावर किमान दहा वर्षं तरी मिळून काम केलं, तर आपण व्यवस्था-परिवर्तनाचं काम जास्त प्रभावीपणे करू शकू. 

शेतकरी संघटनेप्रमाणेच स्वामींनी ज्या इतर चळवळींसोबत काम केलं, त्याही चळवळींना जरी स्वामींचा तात्कालिक फायदा झाला तरी त्यांच्यामुळे स्वामींना काहीच मिळालं नाही. उलट, एक क्षण असा यायचा की, त्या आंदोलकांना स्वामी हवेही असायचे आणि नकोही असायचे. स्वामींचं व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व त्यांना हवं असायचं. पण त्या-त्या आंदोलनांचे विषय आणि स्वामींचे विषय वेगळे असायचे. शेतकरी संघटनेचं आंदोलन एका विशिष्ट मुद्यावर होतं, नियोगीचं आंदोलन मुख्यतः खाणीत काम करणाऱ्या आदिवासी मजुरांच्या शोषणावर होतं, मेधातार्इंचं काम ‘नर्मदा बचाव’पुरतं होतं. त्या-त्या चळवळींचा अजेंडा आणि स्वामींचा अजेंडा यांचा धागा कधी जुळला नाही. बंधुआ मुक्ती मोर्चाचं काम स्वामी करतात, या त्यांच्या प्रतिमेचा या तिन्ही इतर आंदोलनांना उपयोग होता; पण बंधुआ मुक्ती मोर्चाच्या कामाचा त्यांना फारसा उपयोग होता, असं मला वाटत नाही. उलट स्वामींच्या भाषणातले, त्यांच्या स्वतःच्या आंदोलनांतले मुद्दे आमच्या गैरसोईचे ठरायचे. याचंही एक उदाहरण सांगतो. 

शेतकरी संघटनेने शिवजयंती आणि आंबेडकर जयंती यांच्यादरम्यान कर्जमुक्तीचा मोठा मेळावा जळगावला आयोजित केला होता. निदान 50 हजार माणसं एप्रिलच्या रणरणत्या खानदेशी उन्हाळ्यात तिथे एकत्र आलेली होती. त्याच्या प्रचारासाठी स्वामी फिरत होते. त्या सभेत त्यांनी बहुपत्नीत्वावर खूप टीका केली. त्यामुळे भाषणानंतर मी त्यांना म्हटलं की, स्वामीजी, शेतकरी संघटनेत हा मुद्दा तुम्ही काढू नका. आम्हाला तो गैरसोईचा आहे. बहुपत्नीत्व नाही, तरी दोन-तीन लग्नं झालेली बरीच माणसं आमच्याकडे आहेत. त्यावर स्वामी म्हणाले, ‘‘फिर मुझे उनकी आलोचना करनी पडेगी’’ मी त्यांना म्हटलं, ‘‘आत्ता आपल्यासमोर असलेला हा मुद्दा नाही. त्यात तुम्ही कशाला जाता?’’ 

पुढे बोलता-बोलता मी त्यांना सांगितलं की, शिवाजीचीसुद्धा आठ लग्नं झाली होती. स्वामी त्यांच्या तारेतच होते. ते म्हणाले, ‘‘फिर मुझे शिवाजी महाराज की भी आलोचना करने पडेगी’’ मी त्यांना म्हटलं, ‘‘फिर मुझे आपका दिल्ली का टिकट कटवाना पडेगा’’ स्वामी म्हणाले, ‘‘ऐसे कैसे हो सकता है? महाराज की आठ शादीयां हुई थी?’’ मी त्यांना म्हटलं, ‘‘वो उनके जमाने की रीत थी. उनके जमाने मे लोगो को जोडने का वो एक तरीका था. ताकि रिश्तेदार होने के नाते लोग दुश्मन से तो नहीं मिलेंगे.’’ मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की, मुळात सगळ्याच ठिकाणी सगळे मुद्दे एकाच वेळेला मांडलेच पाहिजेत का? पण स्वामी त्यांच्या मतावर ठाम होते. ते म्हणाले, ‘‘समाज के सामने वो एक अहम मुद्दा है, और स्त्री का सन्मान हमे रखना चाहिये.’’ 

माझा अंदाज असा आहे की, मेधा पाटकर व नियोगी यांच्याबाबतीतही स्वामींचं हेच होत असलं पाहिजे. भूमीशी निगडित समाजांमध्ये दोन लग्नांची चाल मुस्लिमांपेक्षाही जास्त आहे. आकडेवारी पाहिली तर द्विभार्या प्रतिबंधक कायदा हिंदूंनी मोडल्याची उदाहरणंच जास्त मिळतात. आदिवासी शेतकऱ्यांमध्ये हा प्रकार बऱ्याच प्रमाणात होता. या सगळ्यामुळे स्वामींना प्रत्येक ठिकाणी असा अनुभव यायचा की, माझा सगळा अजेंडा कुणी स्वीकारत नाहीत. अर्थात, त्यांचा अजेंडा चुकीचा नव्हता; पण प्रत्येक आंदोलनाचा एक प्राधान्यक्रम असतो आणि प्रत्येक आंदोलनाची ताकद मर्यादित असते. एकेक मुद्दा घेऊन प्रत्येक आंदोलन वाढलेलं असतं आणि त्या मुद्यापासून लोकांचं लक्ष इकडे-तिकडे जायला लागलं की, त्या-त्या आंदोलनांचे नेते अस्वस्थ होतात. त्यामुळे हा अनुभव स्वामींना आयुष्यभर घ्यावा लागला. 

शेवटच्या काही दिवसांत त्यांनी नक्षलवाद्यांशी-माओवाद्यांशी बोलण्यासाठी जो पुढाकार घेतलेला होता, तिथेही त्यांचं तेच झालं असतं. त्यांच्याशी बोलता-बोलता स्वामींनी जर स्वतःचं सगळं लटांबर त्यांना ऐकवलं असतं, तर त्यांचं बोलणं तिथेच थांबलं असतं. या अर्थी स्वामी एकांडे पडले. 

आर्य समाजालाही त्यांचा ‘वैदिक’ भाग हवा होता, पण ‘समाजवाद’ नको होता. चरणसिंह स्वतः कट्टर आर्यसमाजी होते; पण स्वामींच्या तोंडी ‘सोशॅलिझम’ हा शब्द आल्याबरोबर ते खवळले आणि दोघेही एकाच पक्षात असूनसुद्धा स्वामींचं भाषण त्यांनी बंद पाडलं. त्यामुळे सगळीकडे ‘हा माणूस आपल्याला हवाही आहे आणि हा माणूस आपल्याला अडचणीचाही आहे’ असं त्यांचं मूल्यमापन होत असलं पाहिजे. स्वामींच्या स्वतःच्या संघटनेचा जीव छोटा असला, तरी सुदैवाने ते अशा भ्रमात नव्हते की हेच वेठबिगार कामगार उठतील आणि एक दिवस क्रांती करतील. नाही तर महाराष्ट्रात शेतमजुरांना, भूमिहीनांना संघटित करणाऱ्या कित्येक लहानसहान गटांच्या हे लक्षात येत नाही की, व्यवस्था केवढी प्रचंड आहे. दृश्य व अदृश्य अशा दोन्ही मार्गांनी ती शोषण करत असते. दृश्य मार्गातल्या काही भागांविरुद्ध मूठभर माणसांना घेऊन ते आवाज उठवत असतात. व्यवस्थेशी संघर्ष करण्याची ताकद त्यांच्यात नसते. 

तिसरा मुद्दा स्वामींच्या वैदिक समाजवादाशी संबंधित आहे. समाजवादाचा खरा अर्थ भारतातल्या लोकांना कळला आहे की नाही, असा मला प्रश्न पडतो. समाजवादाचा भारतीय अर्थ घेतला, तर कुणी समाजवादी नाही असं म्हणताच येणार नाही. मूळ समाजवाद ही एक आयडिऑलॉजी आहे. व्यवस्था-परिवर्तनाचं ते एक शास्त्र आहे. समाजवाद संघर्षावर तर विश्वास ठेवतोच, पण त्याचा हिंसेवरही विश्वास आहे. मूळ समाजवादातलं आम्हाला सोईचं तेवढं आम्ही उचलू आणि बाकी सगळं आम्ही आमच्या पद्धतीने करू, असा विचार आपल्या लोकांनी केला. सगळ्या गोष्टींना भारतीय चेहरा देण्याचा मोह आपल्याकडे सगळ्यांना असतो. जागतिकीकरण आपण भारतीय शैलीने करू, समाजवाद भारतीय शैलीने आणू- अशा प्रयत्नांत फारसं तथ्य नसतं, हे या मंडळींच्या लक्षात येत नाही. 

माझे ज्येष्ठ मित्र पन्नालाल सुराणा यांचं आपल्या आठवणींचं पुस्तक मी नुकतंच वाचलं. ‘पायपीट समाजवादासाठी’ असंच नाव त्यांनी या पुस्तकाला दिलेलं आहे. ते वाचताना माझ्या लक्षात आलं की, साधारण 50 च्या दशकात जे प्रश्न सोडवण्यासाठी पन्नालाल निघाले होते, ते सगळेच प्रश्न अजून कायम आहेत. याचं कारण कुठल्याही एका प्रश्नावर ‘निर्णायक लढा’ या टप्प्यापर्यंत भारतातली समाजवादी चळवळ येऊ शकली नाही. नेमकी गल्लत कुठे होते? मुळातली समाजवाद ही आयडियाऑलॉजी सत्ता हस्तगत करण्याच्या बाबतीत क्रूर आणि निर्दयी आहे, हे भारतीय समाजवाद्यांनी कधी लक्षातच घेतलं नाही. समाजवादामध्ये सत्ता का हस्तगत करायची असते? कारण भांडवलशाही आणि सरंजामशाहीमध्ये उत्पादनाची साधनं, उत्पादनाची प्रक्रिया, प्रत्यक्ष उत्पादन व उत्पादनाचं वितरण या चार गोष्टी श्रमिकांच्या सोईच्या नसतात. (उत्पादनाच्या साधनांमध्ये फक्त यंत्रेच येतात असं नाही, रिसोर्सेससुद्धा येतात.) या चार गोष्टींची मालकी आणि त्यांच्यावरचा ताबा महत्त्वाचा असतो. तो मिळवण्यासाठी संघर्ष तर करावाच लागेल, पण रक्तपातसुद्धा करावा लागेल, असं समाजवाद मानतो. 

लोकशाही मार्गाने समाजवाद आणला गेला, असा एकही देश आपल्याला दाखवता येणार नाही. आपल्याला मात्र लोकशाही पाहिजे, मानवताही पाहिजे, विश्वबंधुत्वही पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला आपली आध्यात्मिकताही जपायची आहे; कारण आपण काही भोगवादी नाही! (हे तर इतकं भंपक आर्ग्युमेंट आहे- ‘करून भागले आणि देवपूजेला लागले’ ही म्हणसुद्धा आपल्याकडे आहे, हे आपण विसरतो) साने गुरुजी आणि जयप्रकाश नारायण या दोन्ही मोठ्या नावांविषयी आदर असूनही मला वाटतं की, त्यांच्या मार्गांनी समाजवाद आणता येणार नाही. क्रांतीनंतर समाजवाद मानवतेचा स्वीकार कदाचित करेलही किंवा करणारही नाही. पण अहिंसक क्रांती, सहानुभूती, करुणा, सेवा या गोष्टी समाजवाद मानत नाही.  

समाजवादाचं हिंसक स्वरूप रशियामध्ये दिसलं, चीनमध्ये ते अजूनही दिसतं आहे. जरा विरोधाचा स्वर उमटला की, त्यावर ते काही तरी कुभांड रचून तो स्वर दाबून टाकतात. माओने सांस्कृतिक क्रांती पूर्णपणे हिंसेच्या मार्गाने घडवली. क्युबा हा एवढासा देश. पण तिथेही क्रांती झाल्यानंतर तिथला सत्ताधीश बॅटिस्टा पळून गेला म्हणूनच वाचला, नाही तर रशियातल्या झार मंडळींसारखीच त्याची गत व्हायची होती. समाजवादाचं हे रूथलेस, निर्दयी स्वरूप लक्षात न घेता जर तुम्ही समाजवादाची मांडणी करणार असाल आणि तुमच्यामध्ये हिंसा करण्याचं क्षात्रतेज नसेल, तर मग निदान आम्ही ‘समाजवादी’ आहोत आणि ‘समाजवादाची’ मांडणी करतो, असं तुम्ही म्हणवून घेता कामा नये. बहुतेकदा उत्तरोत्तर अधिकाधिक आक्रमक होण्याच्या मुद्यावरच समाजवादी पक्ष फुटतो, हेही बघण्यासारखं आहे. नाही तर या पक्षाची अवस्था खरं म्हणजे चांगली होती. 52 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा दुसऱ्या स्थानावर कम्युनिस्ट पक्ष होता, हे आज सांगितलं तर आश्चर्य वाटेल. तिसऱ्या स्थानी प्रजा समाजवादी पक्ष होता. अर्थात काँग्रेसच्या तुलनेत हे कुठेच नव्हते. तीन आकडी संख्यासुद्धा कुणाची नव्हती. चौथ्या स्थानी स्वतंत्र पक्ष होता आणि नंतर इतर लहानसहान पक्ष होते. पण तेव्हाही प्रमुख विरोधी गटातले कम्युनिस्ट आणि प्रजा समाजवादी अशी दोन्हींची मिळून 100-125 माणसं झाली असती. पण यांचंही ऐक्य होत नाही. समाजवाद्यांचा सगळ्यात जास्त द्वेष जर कुणी करत असेल, तर कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टांचा सगळ्यात जास्त द्वेष कुणी करत असेल, तर ते समाजवादी! जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असताना त्यांनी चीनवर विनाकारण टीका करून भारताची जागतिक संदर्भात फार पंचाईत करून ठेवली होती. याचं कारण जॉर्ज समाजवादी; कम्युनिस्ट नव्हेत. 

मार्क्सवादाला ‘सायंटिफिक सोशॅलिझम’ म्हणण्याचं कारण व्यवस्था-परिवर्तनाची मेथडॉलॉजी मार्क्सवादामध्ये सांगितलेली आहे आणि त्या मार्गांनी व्यवस्था-परिवर्तन होऊ शकतं, म्हणून त्याला ‘सायंटिफिक’ म्हणतात. प्रजा समाजवाद्यांचीही आयडिऑलॉजी समाजवादच आहे, पण मार्क्सवादी त्यांना कधी जवळ करत नाहीत. खरं म्हणजे हे दोघे एकमेकांना आयडिऑलॉजिकली जवळचे आहेत. पण मार्क्सवाद्यांना मूळ वर्गसंघर्षावरचा फोकस ढळू द्यायचा नसतो, त्यामुळे त्यांना इतर सांस्कृतिक मुद्दे नको असतात. समाजवादाचं उत्तर असं आहे की, अर्थव्यवस्था शुद्ध केल्याबरोबर संस्कृती आपोआप शुद्ध होते. कारण अर्थव्यवस्था जोपर्यंत निर्दय, असंस्कृत व रानटी मनोवृत्तीच्या पण पैसा आणि इतर संसाधनं बळकावून बसलेल्या लोकांच्या हातात आहे तोपर्यंत ती समस्याच निर्माण करणार. 

मार्क्स म्हणतो की, क्रांतीनंतर राज्यव्यवस्था आपोआपच नष्ट होईल कारण शोषण हा अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. ते क्रांतीनंतर संपलेलं असेल. जिथे प्रत्यक्ष समाजवादी क्रांती झाल्या तिथे काय घडलं हा मुद्दा मी आता बाजूला ठेवतो. पण समाजवादाची मूळ मांडणी अशी आहे. भारतीय समाजवाद्यांनी एकाच वेळेला त्यात नैतिक मुद्देही आणले आणि सांस्कृतिक मुद्देही आणले. समाजवाद असं सांगतो की, तुम्ही समाजवादी अर्थव्यवस्था चोखपणे राबवा; अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता राहणार नाही. मालकच उरणार नसल्यामुळे कामगार-मालक संघर्ष राहणार नाही. बूर्झ्वाही राहणार नाही, कारण सगळ्याच बूर्झ्वा लोकांना जगण्यासाठी काम करावं लागेल. बूर्झ्वा म्हणजे दुसऱ्याच्या श्रमांवर जगणारे अभिजन. जगण्यासाठी त्यांना स्वतःला श्रम करावे लागतील. 

रशियात सरकारने जे मोठमोठे प्रकल्प पूर्ण केले, त्यांत त्यांनी सगळा विरोधी इंटेलिजन्शिया कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये (Gulag) पाठवला आणि त्यांच्याकडून फुकट काम करून घेतलं. समाजवाद इतका निर्दय आहे. त्यामुळे आम्ही श्रमदान करू, भूदान करू, मेळावे घेऊ, गाणी म्हणू याने किंवा ‘हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून’ समाजवाद येणार नाही. त्याऐवजी काय येईल, ते आपल्याला माहिती नाही. समाजवाद आणायचा असेल तर फार कठोर आणि निर्दय व्हायला पाहिजे. व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असणारी आणि व्यवस्थेवर जगणारी बांडगूळं कापून टाकावी लागतील. निदान तशी मांडणी तरी करावी लागेल. पन्नालाल यांच्या पुस्तकात असा उल्लेख तीन-चार वेळा आलेला आहे की, भारतीय संदर्भात समाजवादाची पुनर्मांडणी केली पाहिजे. पण भारतीय संदर्भात समाजवादाची मांडणी केली, तर तो समाजवाद राहणारच नाही- हा भाग महाराष्ट्रातल्या समाजवाद्यांनी कधी लक्षात घेतला नाही. 

दुसरीकडे स्वामी तर ‘वैदिक समाजवाद’ म्हणत होते. विशेष म्हणजे, मार्क्सनेसुद्धा भारतामध्ये जातिप्रथा येण्याआधी एक प्रकारचा कम्युनिझम होता, असं म्हटलेलं आहे. वेदकालीन समाजव्यवस्था ही अत्यंत विजिगीषु व्यवस्था होती, असं मानण्याची पद्धत आहे. काही बाबतींत ते खरंही आहे. पण वेद म्हणजे काय आहे? ऐहिक जीवनातल्या सगळ्या अपेक्षांची ती भली मोठी यादी आहे आणि हे सगळं आम्हाला मिळावं यासाठी, ज्या शक्ती आमच्या ताब्यात नाहीत त्यांना (वेदांमध्ये ‘परमेश्वर’ कल्पना नाही) आम्ही यज्ञाच्या मार्गे संतुष्ट करतो आहोत; त्यांनी आमच्यावर प्रसन्न होऊन हे सगळं आम्हाला द्यावं आणि आमच्या शत्रूंकडून सगळं काढून घ्यावं- अशा प्रार्थना आहेत. वेदकालीन समाजाला एक समाज म्हणून आव्हानात्मक असं काही नव्हतं. मुळात समाज पहिल्यांदाच स्थिर व्हायला लागला होता आणि मुख्यतः त्याच्यासमोरची संकटं नैसर्गिक होती. खासगी मालमत्तेची कल्पना अजून यायचीच होती. नैसर्गिक संकटं दूर व्हावीत यासाठीची साधनं लोकांपाशी नसल्यामुळे ती दूर व्हावीत यासाठी लोक या शक्तींकडे प्रार्थना करत होते. त्या शक्तीच आपल्याला तारणार आणि मारणार आहेत, अशी त्यांची धारणा होती. वेदकाळात श्रमविभागणी झाली नव्हती, चातुर्वर्ण्य आणि जातिप्रथाही नव्हती. त्यामुळे तो समाजवादाला जवळचा समाज नव्हता. समाजवादाची मांडणी ही एक आर्थिक तत्त्वज्ञान आणि समाजपरिवर्तनाचं एक हत्यार म्हणून ज्या पद्धतीने 19 व्या शतकात केली गेली, त्याचा मागमूसही वेदांमध्ये नाही. मग स्वामी या सगळ्याशी समाजवाद कसा जोडणार होते? आणि आर्य समाजातला सधनवर्ग स्वामींचा वैदिक समाजवाद कसा स्वीकारणार होता? 

अटलबिहारी यांच्या गांधीवादी समाजवादाची पीडा सुदैवाने आपल्या देशाच्या मागे लागली नाही. वर्ष-दोन वर्षं ते रॅकेट चालू होतं, पण नंतर स्वतः अटलजींसकट कोणी ते फार गांभीर्याने घेतलं नाही. सरकारच नको या मताचे गांधी होते आणि समाजवादात तर सगळं सरकारच करणार! लोकशाही समाजवाद ही एक वेगळी आयडिऑलॉजी मांडण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही समाजवाद ही एक आकर्षक पण अव्यवहार्य तडजोड होती. समाजवाद लोकशाहीदेखील मानत नाही. समाजवाद असंही म्हणत नाही की, क्रांती झाल्यानंतर जी व्यवस्था येईल ती लोकशाहीची असेल. कारण समाजवादाच्या दृष्टीने राजकीय व्यवस्थासुद्धा अर्थव्यवस्थेमधूनच येते आणि अर्थव्यवस्थेच्या सोईची राजकीय व्यवस्था असावी लागते. लोकशाही मार्गाने हे अशक्यच आहे. भारतासारख्या देशात तर ते आणखीनच गुंतागुंतीचं आहे, कारण भारतामध्ये अनेक संघर्ष आहेत. त्यांची सगळ्यांची यादी इथे देणंही शक्य नाही. बीबीसीचा अनेक वर्षं दिल्ली प्रतिनिधी असणाऱ्या मार्क टुलीनं जे पुस्तक लिहिलं : ‘नो फुलस्टॉप्स इन इंडिया’ किंवा व्ही.एस.नायपॉलने जे पुस्तक लिहिलं : ‘अ मिलियन म्युटीनीज नाऊ’; इतके समाजघटक भारतात आहेत! जवळपास पाच हजार जाती-जमातींचे लोक आहेत, त्यांचे एकमेकांमधले संघर्ष आहेत. त्या सगळ्यांच्या आशा-आकांक्षा जाग्या झाल्यानंतर आपण कोणाला कोणाविरुद्ध संघटित करणार?

‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गामध्ये एक ठळक रेषा भारतात आपल्याला दाखवताच येणार नाही. आपल्याकडे प्रत्येक वर्ग काही ठिकाणी ‘आहे रे’च्या अवस्थेत आहे आणि काही ठिकाणी ‘नाही रे’च्या अवस्थेत आहे. याला अपवाद म्हणूनही फार  थोडे गट सापडतील. मग शेवटी निवडणुका हरणं एवढंच समाजवाद्यांच्या हातात राहतं किंवा निवडणुकीसाठी तडजोडी कराव्या लागतात. या सगळ्या माणसांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला अजिबात शंका नाही. त्यामुळे तडजोड करायला लागली की, त्यांच्या मनाला टोचणी लागते. मनाला टोचणी लागली की, आपण जे करतो आहोत याचा पुनर्विचार सुरू होतो. इथे गडबड अशी होते की, ज्याचा पुनर्विचार करायला हवा तो केला जात नाही. ‘आपण समाजापर्यंत पोहोचलो नाही; पुन्हा एकदा उठू या आणि सगळे मिळून समाजाला आपली भूमिका नीट समजावून सांगू या’, अशी भाषा पुन्हा सुरू होते. 

भारतामध्ये एकाच वेळेला आठ-दहा प्रकारचे संघर्ष चालू असतात. समाजवाद्यांनी त्या सगळ्याच संघर्षांवर भूमिका घ्यायचं खरं म्हणजे कारण नाही. शरद जोशींचं आंदोलन इतक्या झपाट्याने का पसरलं? एक उदाहरण सांगतो : निपाणीला तंबाखूच्या भावासाठी आंदोलन झालं. निपाणी म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रांत. द्विभाषिक शेतकरी आंदोलनाला आलेले होते. त्या काळातही संयुक्त महाराष्ट्र समितीचे पाच उमेदवार बेळगाव जिल्ह्यामधून निवडून येत होते. शरद जोशींना पत्रकारांनी विचारलं, सीमाप्रश्नावर तुमचं काय मत काय? ते म्हणाले की, मला सीमाप्रश्न महत्त्वाचा वाटत नाही. माझा मुद्दा शेतीमालाच्या भावाचा आहे. कर्नाटक सरकार जर शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव देणार असेल, तर मी सगळा महाराष्ट्र कर्नाटकात घालायला तयार आहे; आणि उलट. समाजवादी असं उत्तर देतील, असं मला वाटत नाही. पण शरद जोशींचा मुद्दा तरी बरोबर की चूक? निपाणी आंदोलनालाही आता चाळीस वर्षं होतील. मला त्यातला हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो की, एक टाइमबाऊंड कार्यक्रम आखला पाहिजे आणि जे कोणतं आंदोलन असेल, राजकीय पक्ष असेल किंवा मिलिटंट संघटना असेल त्यांनी एक अजेंडा दहा ते पंधरा वर्षं अत्यंत हिरिरीने आणि चिकाटीने मांडल्यानंतर पुनर्विचार करायला हवा. रोज कसला पुनर्विचार करणार? स्वामींच्या हातून झालेला घोटाळा काही त्यांच्या एकट्याचा नाही, तो भारतातल्या संपूर्ण समाजवादी चळवळीचा आहे. 

समाजवाद्यांना कुणी मित्र का राहिला नाही? हिंदुत्ववाद्यांकडे हे ढुंकून बघणार नाहीत, हिंदुत्ववादी यांना पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानणार. (स्वामी गेल्यावर एका भाजपवाल्याची अशी प्रतिक्रिया आहे की, एक हिंदूद्वेष्टा माणूस गेला.) मग राहिला फक्त काँग्रेस आणि मुळात सगळे समाजवादी पूर्वी काँग्रेसमध्येच होते. सन 1930 नंतर काँग्रेसमध्ये असलेल्या समाजवादी गटाच्या नंतर लक्षात आलं की, आता आपल्याला काँग्रेसमध्ये कुणी विचारत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपला वेगळा पक्ष काढला. मग पुढे त्याचे अनेक पक्ष झाले. न्यूक्लियर फिशनमधून ऊर्जा निर्माण होते, इथे मात्र प्रत्येक ठिकाणी ऊर्जा कमी होत गेली. आणि हे पन्नालाल सुराणांनी त्यांच्या पुस्तकात लक्षात घेतलेलं आहे. त्यामुळेच पुन्हा नव्या एकाच समाजवादी पक्षाची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. पण समाजवादाच्या अर्थासंबंधीची गल्लत कायम राहिली, तर त्याही पक्षाला काही भविष्य असणार नाही. 

महाराष्ट्रातील समाजवादी एके काळी नेहरूंच्या प्रचंड प्रेमात होते. अर्थात हिंदुत्ववाद्यांनी केला तसा नेहरूंचा द्वेष त्यांनी करायला हवा होता, असं माझं म्हणणं नाही. पण साने गुरुजींपासूनच सगळ्यांनीच नेहरूंचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या शर्टवरचा गुलाब या सगळ्याची मोठी मिथ उभी केली. (‘पॅरिस लॉन्ड्री सिंड्रोम’ त्यांच्यात फारसा नव्हता) आणि असं म्हणायला सुरुवात केली की, तो क्रूर रशियन समाजवाद आमचा नाही. तो दुष्ट चिनी समाजवाद आमचा नाही. आमचा समाजवाद देखणा, गोंडस आणि कविमनाचा आहे. राजकारणात कविमन आलं की, वाट लागलीच म्हणून समजायचं! माओ कविता लिहीत असे. पण त्याने त्याच्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये त्या कधी वाचल्या वगैरे नाहीत. पण ‘नेहरू फिक्सेशन’ आणि ‘नेहरू फॅमिली फिक्सेशन’मध्ये समाजवादी अडकले. खरं म्हणजे इंदिरा गांधी आता हुकूमशाहीच्या मार्गाने जाणार हे त्यांना 1966 मध्येच कळायला हवं होतं. बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे तनखे रद्द करणं हे दोन बाह्यतः समाजवादी वाटणारे उपाय इंदिराजींनी केल्याबरोबर त्यांनी इंदिराजींचंही परीक्षण करणं बंद केलं. तनखे बंद झाल्याबरोबर संस्थानिक राजकारणात आले आणि त्यांनी स्वतःपुरता प्रश्न मिटवून टाकला. एक तर थेट देशाचा पंतप्रधान झाला. (व्ही.पी. सिंह उत्तर प्रदेशातल्या मांडा या एका संस्थानाचे संस्थानिक होते.) 

काँग्रेसची संपूर्ण रणनीतीच अशी राहिलेली आहे की, समाजवादाची भाषा बोलायची आणि status quoist किंवा ‘जैसे थे’वादी भूमिका सोडायची नाही. पण हे लक्षात  येईपर्यंत उशीर झाला होता. खरं तर लोहिया वगैरेंच्या ते लक्षात आलं होतं, पण लोहियासुद्धा नेहरूंच्या अतिशय प्रेमात होते. तेही म्हणायचे की, संसदेमध्ये ‘आदमी’ तोच आहे फक्त; आम्ही सगळे उंदरांसारखे आहोत. त्यातल्या त्यात भारतीय संदर्भात समाजवादाची पुनर्मांडणी करू शकणारा लोहिया हा एकच माणूस होता. दुर्दैवाने ते फारच लवकर गेले. आयडिऑलॉजी नाही, आयडिऑलॉग नाही; समोर कम्युनिस्टांचं आणि हिंदुत्ववाद्यांचं आव्हान आहे, अशा परिस्थितीत शक्यतो काँग्रेसला धरून राहायचं धोरण समाजवाद्यांनी पत्करलं. त्यांना असं वाटत होतं की, काँग्रेसच्या धोरणांवर आपण अंकुश ठेवू. पण तुम्ही जर सशक्त विरोधी पक्ष नसाल, तर काँग्रेसवर तुम्ही काय अंकुश ठेवणार? इंदिरा गांधी आणि आताचं मोदी सरकार स्वतःविरोधी भाषणंही करू देत नाहीत; नेहरू मात्र सगळ्यांना बोलू द्यायचे आणि विरोधकांची प्रशंसाही करायचे. धारियांच्या आत्मचरित्रात उल्लेख आहे- नेहरूंनी लोकसभेच्या पायऱ्यांवर, लोहियांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना सांगितलं, Be a fearless parliamentarian. अजून आयुष्यात काय मिळवायचं असतं? धारिया खूश झाले. पण नेहरूंनी त्यांना गुंडाळलं, हे त्यांच्या कसं लक्षात आलं नाही? त्यामुळे शेवटी हे समाजवाद्यांचं राजकारण नावापुरतं परिवर्तनवादी राहिलं, जातीयवादविरोधी राहिलं. काँग्रेसशी जुळवून घेतल्यामुळे आणि अतिरिक्त नेहरूप्रेमामुळे भारतातल्या समाजवाद्यांचा खूप गोंधळ उडाला. समाजवादी पक्षांमध्ये स्वामींचे काही मित्र होते, पण कम्युनिस्ट पक्षांमध्ये फारशा कुणाशी त्यांची मैत्री नव्हती. 

मी स्वामींना 12 वर्षांपूर्वी शेवटचं भेटलो आणि त्यांच्या मासिक पत्रिकांच्या संपादनात सहभागी व्हायला नकार दिला, ही गोष्ट चुकली, असं आता वाटतं आहे. धर्म या विषयातली माझी अनिच्छा कितीही बळकट असली तरी मी स्वामींशी वैचारिक चर्चा करायला हवी होती आणि ती त्यांच्या वैदिक समाजवादाच्या विश्लेषणापासूनच करायला हवी होती. पण त्या वेळेला ते घडलं नाही याचं एक कारण म्हणजे 12 वर्षांपूर्वी हा विषय मलाही इतका स्पष्ट झाला नव्हता. भारतातल्या समाजवादी राजकारणाची कुंठितावस्था जाणवत होती, पण स्पष्ट शब्दांत मांडण्याइतकी त्यावर माझी पकड आलेली नव्हती. आणि दुसरं कारण असं की, स्वामी आर्य समाजाचं प्रबोधन करू इच्छितात, हे मला प्रतिगामी पाऊल वाटत होतं. (संघ परिवाराचं प्रबोधन करायचा प्रयत्न जसा आम्ही पूर्वी करायचो) ते काहीही असलं तरी मी चर्चेची दारं बंद करायला नको होती. अर्थात मी अशी खात्री मुळीच देऊ शकत नाही की, स्वामींनी माझं ऐकून आपली भूमिका बदलली असती. तरीही त्यांना काही वास्तव, भक्कम, आर्थिक अजेंडा असलेलं राजकारण करण्याकडे वळवता येण्याची एक शक्यता निसटून गेली, याची खंत मला वाटते. 

शेवटी हे मान्य करायला हवं की, स्वामी हे एक विलक्षण आणि वेगळं व्यक्तिमत्व होतं. कर्मयोगाचा सिद्धांत मानणारं व्यक्तिमत्त्व होतं. प्रश्नांचा केवळ अभ्यास करूनही भागत नाही; ते सोडवले पाहिजेत, त्याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे आणि त्याच्यासाठी वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवला पाहिजे- या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या होत्या. त्यामुळेच मी पुन:पुन्हा मूळ प्रश्नाकडे जातो की, स्वतःचं आयुष्य समाजकार्यासाठी झोकून देणाऱ्या स्वामींसारख्या माणसांचा समाजासाठी, समाज-परिवर्तनासाठी जास्त किफायतशीर वापर कसा करता येईल? स्वामींची शक्ती बऱ्याच प्रमाणात वाया गेली. आता भविष्यातले जे कोणी असे कार्यकर्ते असतील, त्यांची आयडिऑलॉजी वास्तव असेल (अचूक आयडिऑलॉजी असं काही अस्तित्वातच नसतं), त्यांचे मार्ग जास्त स्पष्ट असतील आणि या दोन गोष्टी असल्यानंतर त्यांची परिवर्तनाची व्याख्यासुद्धा जास्तीत जास्त काटेकोर असेल आणि तिचा आर्थिक आशय जास्त स्पष्ट असेल. अर्थव्यवस्थेशी दोन हात केल्याशिवाय राजकीय परिवर्तनाला अर्थ नाही व राजकीय परिवर्तनानंतर अर्थव्यवस्था सुधारली नाही या दुष्टचक्रात अडकता कामा नये, हे ते लक्षात घेतील. शोषण कधीच शंभर टक्के नष्ट होणार नाही. पण ते कमीत कमी ठेवण्याच्या दृष्टीने जास्त वास्तव आयडिऑलॉजी शोधून काढणारे आणि तिचा वापर आपल्या सामाजिक-राजकीय आयुष्यात करणारे कार्यकर्ते भविष्यकाळात निर्माण होतील असे प्रयत्न करणं, हीच स्वामींसारख्यांना आदरांजली ठरेल. 

शब्दांकन : सुहास पाटील 

Tags: बंधुआ मुक्ती मोर्चा वेठबिगार कामगार इंडियन एक्सप्रेस स्वामी अग्निवेश विनय हर्डीकर शरद जोशी सुहास पाटील suhas patil jayprakash narayan sane guruji atal bihari vajpeyi democratic socialism socialism yashwant sinha vinod dua swami agnivesh sharad joshi bonded labour swami agnivesh article in marathi vinay hardikar on swami agnivesh swami agnivesh vinay hardikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनय हर्डीकर,  पुणे ( 59 लेख )
vinay.freedom@gmail.com

पत्रकार, समीक्षक, प्राध्यापक, शास्त्रीय संगीताचे जाणकार, मर्ढेकर-शेक्स्पिअर यांचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, गिर्यारोहक आणि वक्ते




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके